Sunday, December 20, 2015

एकनाथी भागवत ग्रंथाचा ४४२ वा वाढदिवस !!


उरूस, दै. पुण्यनगरी, २० डिसेंबर २०१५

वेदांतविचारात उपनिषदे, ब्रह्मसुत्रे व भगवद्गीता यांना प्रस्थान त्रयी म्हणून संबोधण्यात येते त्याच प्रमाणे वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व तुकारामगाथा या तीन ग्रंथांना प्रस्थानत्रयी म्हणतात. वारकरी संप्रदायात या तीन ग्रंथांचे पारायण करणे आवश्यक मानले गेले आहे. ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा यांची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यांच्यावर विवेचनात्मक असंख्य ग्रंथ आहेत. या तुलनेत एकनाथ महाराजांचे ‘भावार्थ एकनाथी भागवत’ मात्र कमी चर्चिल्या/वाचल्या जातं. दिवाळी नंतर येणार्‍या पौर्णिमेच्या (त्रिपुरारी पौर्णिमा) दिवशी या ग्रंथाची पुर्तता झाली. म्हणजे या 25 नोव्हेंबरला या ग्रंथाला बरोब्बर 442 वर्षे पूर्ण झाली. हा ग्रंथ एकनाथांनी काशीत बसून पूर्ण केला. तेथील विद्वानांनी या ग्रंथाचा सखोल अभ्यास करून आपला अनुकूल अभिप्राय दिला. या ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. 

मराठी माणसांनी अभिमान बाळगावा अशी एक खास गोष्ट या ग्रंथाबाबत आहे. संस्कृत श्रीमद्भागवताचा इतर भाषांमध्ये अनुवाद गद्य स्वरूपात झालेला नव्हता. कन्नड तामिळ सारख्या भाषांमध्ये भागवताच्या दहाव्या स्कंधावर जो की कृष्णाच्या लीलांवर आधारीत आहे काव्य आढळतात. खुद्द संस्कृतमध्येही दहाव्या स्कंधावर काव्यरचना आहे. पण तत्त्वज्ञानात्मक असलेल्या एकादश स्कंधावर लिहील्या गेलं नव्हतं. संत एकनाथ हे या संस्कृत भागवताच्या एकादश स्कंधावर टीका लिहीणारे संस्कृतेत्तर पहिले विद्वान ठरतात. म्हणून त्यांचे महत्त्व आहे.

मराठी भाषेच्या संदर्भात अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे नाथांनी गायलेली मराठीची थोरवी. संस्कृतमधील ज्ञान आपण मराठीत आणले हे जाणीवपूर्वक केलेले काम आहे. संस्कृतचे महत्त्व ज्यांना असाधारण वाटते अशा विद्वनांनी हा प्रादेशीक भाषेतील ग्रंथ आहे म्हणून याची उपेक्षा करू नये हे एकनाथांनी आग्रहाने मांडले आहे.  

धनवंतु रत्नपारखी पुरा । तेणे धुळीमाजी देखिल्या हिरा । 
गांधी बांधोनि आणी घरा । पारखी खरा निजज्ञाने॥ 
तैसे ज्ञाते विद्वज्जन । ग्रंथु मराठी देखोन । 
उपेक्षा न करितां करावा यत्न । पारखोनि चिद्रत्न साधावया ॥ 
क्षुद्रदृष्टी पाहणे पाहतां । बोलू लागेल व्यासाचे ग्रंथा । 
मा हे तरी मराठी कविता । सांडूनि कुटिलता पाहावी ॥

याहीपुढे जात नाथांनी मराठी भाषेचा गौरव आपल्या ओव्यांमधून एकनाथी भागवताच्या सुरवातीलाच केला आहे. संस्कृत देवांची भाषा आहे मग मराठी भाषा काय चोरापासून झाली असा रोकडा सवाल नाथांनी चारशे वर्षांपूर्वी केला होता. 

संस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी । मा प्राकृती काय उणीवी । 
नवी जुनी म्हणावी । कैसेनि केवी सुवर्णसुमने ॥ 
कपिलेचे म्हणावे क्षीर । मा इतरांचे काय ते नीर । 
वर्णस्वादे एकचि मधुर । दिसे साचार सारिखे ॥ 
जे पाविजे संस्कृत अर्थे । तेचि लाभे प्राकृते । 
तरी न मानावया येथे । विषमचि ते कायी ॥ 
दुबळी आणि समर्थ । दोहीस राये घातले हात । 
तरी दोघीसिही तेथ । सहजे होत समसाम्य ॥ 
देशभाषावैभवे । प्रपंचपदार्थी पालटली नांवे । 
परी रामकृष्णादिनामां नव्हे । भाषावैभवे पालटू ॥ 
संस्कृत वाणी देवे केली । प्राकृत तरी चोरापासोनि जाली । 
असोतु या अभिमानभुली । वृथा बोली काय काज ॥

ज्ञानेश्वर नामदेव संतांनी मराठीत रसाळ रचनेची एक वाट नाथांच्या समोर घालून दिलेलीच होती. नाथांची या पायवाटेचा हमरस्ता करण्याचा यत्न केला. आज इंग्रजी सारख्या भाषेशी तुलना करताना मराठीत विविध विषयांतील ज्ञानाची कमतरता जाणवते. नाथांनी त्या काळाला अनुसरून तेंव्हाचे ज्ञान मराठीत आणले आणि हे करताना सार्थ अभिमानही बाळगला. आजही मातृभाषेतून रचना करणार्‍यांनी ही नाथांची भावना उरी बाळगायला हवी. 

एकनाथी भागवताचा बोलबाला तत्त्वज्ञान ग्रंथ म्हणून झालेला असला तरी त्यातील काव्यही अप्रतिम आहे. प्रलयकाळी शंभर वर्षे जी घनघोर अतिवृष्टी झाली तीचे वर्णन म्हणजे पावसाच्या रौद्र रूपाचा एक अप्रतिम नमूना आहे. आजच्या कुठल्याही आधुनिक कवितेमध्ये असे वर्णन आढळत नाही.

स्वर्ग आणि पाताळतळा ।
कवळूनि उठल्या अग्निज्वाळा ।
तंव प्रळयकर्त्या मेघमाळा ।
क्षोभल्या त्या काळा अतिदुर्धरा ॥
म्हणाल तेथ मोठमोठे ।
वर्षो लागले थेंबुटे ।
तैसे नव्हे गा कडकडाटे ।
एकी धार सुटे अनिवार ॥
जैसी की मदगजाची सोंड ।
तैशा धारा अतिप्रचंड । 
शत वर्षेवरी अखंड ।
पर्जन्य वितंड पैं वर्षे ॥
विजु निजतेजे नभ जाळी ।
कडकडाटे दे आरोळी ।
काळाची बैसे दातखिळी ।
ऐसा प्रलयकाळी मेघ खवळे ॥

या सगळ्या रचनेत कुठे काय देव धर्म यांचा संदर्भ येतो? स्वर्ग पाताळ या पारंपरिक संकल्पना येतात पण त्या धार्मिक अंगाने येत नाहीत. संतांच्या कित्येक रचना या विशुद्ध भावकविता आहेत हेच आपण विसरून चाललो आहोत. ज्या संतांची रचना आहे त्याची जात आपण आधी पाहतो आणि मग तीला चांगली म्हणायचे की नाही याचा निर्णय घेतो. 

मैत्रीवरच्या ओव्याही या एकनाथी भागवतात आहेत. फ्रेंडशिप डे साजरा करणार्‍यांनी नाथांच्या 400 वर्षांपूर्वीच्या या ओव्या जरूर वाचाव्यात. 

जे विषयवियोगे न विटे । नाना विकल्पी न तुटे । 
आलिया परम संकटे । मैत्री नेटपाटे सदा ग्राह्य ॥ 
या नांव गा मित्रभावो। प्राण गेलिया न तुटे पहा हो । 
देखतां कल्पांतकाळाघावो । निजमित्रसमुदावो एकवटे की ॥ 

(जी मैत्री विषयाच्या वियोगाने विटत नाही, नाना प्रकारच्या संशयांनी तुटत नाही तीच सर्वकाळ मनी बाळगावी. प्राण गेला तरी न तुटणारा हा मित्रभाव याच्यावर घाव पडताच सर्व मित्र एकत्र येवून  हल्ला परतवून लावतात.)

धार्मिक वर्गात मोडल्या जाणार्‍या साहित्याचे एक दुर्दैव असे की त्याला सरसकट लाल बासनात बांधून गुंडाळून ठेवल्या जाते. भक्तांना चिकित्सा नको असते आणि विरोधकांना तर स्पर्शही करायचा नसतो. मग अशा ग्रंथांमधले शब्दांचे काव्याचे सौंदर्य कसे समजणार? 

एकनाथी भागवतावर भाष्य करणारे फारसे ग्रंथ उपलब्ध नाहीत. जे उपलब्ध आहेत त्यात ह.भ.प.वै. शंकरमहाराज खंदारकर यांची टीका प्रमाण मानली जाते. वारकरी संप्रदायात खंदारकर महाराजांच्या भाष्याला मोठी किंमत आहेत. खंदारकर महाराजांच्या देहावसनानंतर 1991 मध्ये ‘भावार्थ एकनाथी भागवताची’ पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. एकनाथ पैठणचे-मराठवाड्याचे. खंदारकर महाराजांचे घराणेही मराठवाड्यातीलच. नांदेड जिल्ह्यातील कंधार या गावी साधुमहाराज म्हणून संत इ.स. 1708-1812 या काळात होवून गेले. त्यांचे वंशज म्हणजे शंकर महाराज खंदारकर. पंढरपुरात ते महान निरुपणकार म्हणून प्रसिद्धी पावले. धुंडामहाराज देगलुरकर व मामासाहेब दांडेकर यांच्या बरोबरीने शंकर महाराजांच्या शब्दाला वारकरी फडांमध्ये महत्त्व प्राप्त झाले.

एकनाथांच्या भागवत रचनेवरील भाष्यग्रंथ लिहून खंदारकर महाराजांनी मोठं काम करून ठेवलं आहे. आपण त्याचे निदान वाचन तरी केले पाहिजे. 

एकनाथांचा गौरव करताना संत तुकारामांनी फार सोप्या पण मार्मिक भाषेत अभंग रचना केली आहे. 

ब्राह्मणाचा पोर खेळिया एक भला ।
तेणे जन खेळकर केला रे ।
जनार्दन बसवंत करुनिया तेणे ।
वैष्णवांचा मेळ मिळविला रे ।
एकचि घाई खेळता खेळता ।
आपणचि बसवंत झाला रे ॥

लोकांना सोप्या भाषेत अध्यात्माच्या आवरणातून व्यवहाराचे ज्ञान नाथांनी दिले. मातृभाषेचा गौरव सामान्यांच्या मनात ठसवला. 442 वर्षांचा त्यांचा ग्रंथ त्यामुळे आजही महत्त्वाचा ठरतो.  
       
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

No comments:

Post a Comment