दैनिक पुण्य नगरी, उरूस, १२ जुलै २०१५
सगळा यज्ञ संपल्यानंतर
आगे सफर था
बशर साहेबांनी कधी खुलासा केला नाही. पण त्यांची ही कविता फाळणीत होरपळलेल्या प्रत्येकाची मग तो हिंदू असो की मुसलमान, भारतीय असो की पाकिस्तानी यांची मानसिकता दर्शविणारी आहे असेच मला वाटते.
कोई तो दरवाजा खोले
‘करोगे याद तो हर बात याद आयेगी’ असं म्हणत आठवणींचे महत्व सांगणारा शायर आठवणींच्या जगात कायमचा निघून गेला. बशर नवाज नावानं प्रसिद्ध असलेले उर्दू शायर बशरत नवाज खान हे नुकतेच अल्लाला प्यारे झाले.(९ जुलै २०१५)
औरंगाबाद शहरात कुठल्याही सांस्कृतिक साहित्यीक कार्यक्रमात सडपातळ अंगकाठी, मागे वळवलेले दाट पांढरे केस, पांढरीशुभ्र दाढी, झब्बा-पायजामा त्यावर काळे जाकीट अशा वेशातील तरूणांशी उस्फूर्तपणे संवाद साधणारी व्यक्ती म्हणजे बशर नवाज. नवाज साहेबांचा जन्म १९३५ चा एैंशीच्या घरात त्यांचे वय होते. पण शेवटपर्यंत त्यांचा उत्साह कधी कमी झाला नाही.
उर्दू साहित्यात डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या लेखकांची मोठी परंपरा आहे लोकप्रिय कवी साहिर लूधियानवी, कैफी आजमी, मक्खदूम मोईनोद्दीन, सज्जाद जहीर अशी बरीच नावे आहेत. बशर नवाज याच परंपरेतील लेखक होते.
लेखक कलावंत हे आपल्या आयुष्यात कलेच्या साधनेत गुंग असतात. ते इतर सामाजिक-राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग घेत नाहीत. असेच चित्र आपल्याला पहायला मिळते. बशर नवाज याला अपवाद होते. वेळोवेळी सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला तेंव्हाच्या औरंगाबाद नगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी १९५८ ते १९७३ इतक्या प्रदीर्घ काळात काम केले. औरंगाबादचे वैशिष्ट्य म्हणजे इथे साहित्यीक पत्रकार हे राजकरणात समाजकारणात नेहमीच सक्रिय राहिले आहेत. उर्दू कवी काजी सलिम हे खासदार होते. पत्रकार अनंत भालेराव यांचे सामाजिक योगदान सर्व परिचित आहे. नाटककार अजीत दळवी हेही सामाजिक चळवळीत सक्रिय रहात आले आहेत.
बशर नवाज यांना आपल्या परंपरांचा खूप अभिमान होता. उर्दू भाषेतील पहिली गझल ज्याने लिहीली, उर्दूचा आद्यकवी म्हणता येईल असा शायर वली औरंबागादी हा याच भूमितला होता हे बशर साहेब मोठ्या अभिमानाने सांगायचे.
महान संगीतज्ञ व कवी अमिर खुस्रो याच्या बद्दल त्यांना मोठी आस्था होती. १९८३ मध्ये दूरदर्शन साठी ‘अमिर खुस्रो’ या मालिकेचे १३ भाग त्यांनी लिहून दिले. आकाशवाणीसाठी २६ भागांची ‘सारे जहां से अच्छा’ ही संगीत मालिकाही २००० मध्ये त्यांनी लिहीली होती. अगदी अलिकडे बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी दिल्ली दूरदर्शनसाठी मालिका लिहीली होती.
फाळणीचे दु:ख कितीतरी कवींनी विविध प्रकारे आपल्या शब्दांमधून मांडले. पाकिस्तानचे सुप्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांनी लिहीलं होतं.
ये दाग दाग उजाला
ये शब गजिदा सहर
वो इंतिजार था जिसका
ये वो सहर तो नही
म्हणजे हा डागाळलेला प्रकाश, रात्र डसलेली पहाट, जिची इतकी वाट बघितली ती ही पहाटच नव्हे.
इकडे भारतातील कविंची अवस्था काही वेगळी नव्हती कवी बा. भ. बोरकरांनी लिहीलं होतं.
सगळा यज्ञ संपल्यानंतर
उरली हाती राखच कशी
कुंकू भाळी लागताच कशी
आई झाली वेडी पिशी
बशर नवाज यांची एक जन्म मला या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आठवते. भारतातले कितीतरी मित्र नातेवाईक पाकिस्तानात निघून गेले. हीच अवस्था तिकडच्या लोकांचीही झाली. अशावेळी जाणार्याची मन:स्थिती काय असेल? बशर नवाज लिहीतात.
आगे सफर था
पिछे हमसफर था
रूकते तो सफर छूट जाता
चलते तो हमसफर छूट जाता
मंझिल की भी हसरत थी
उनसे भी मोहब्बत थी
ए दिल तू ही बाता
उस वक्त मै कहां जाता?...
मुद्दत का सफर भी था
बरसों का हमसफर भी था
चलते तो बिछड जाते
और रूकते तो बिखर जाते
यू समझ लो....
प्यास लगी थी गजब की
मगर पानी मे जहर था
पीते तो मर जाते और
ना पीतो तो भी मर जाते......
बशर साहेबांनी कधी खुलासा केला नाही. पण त्यांची ही कविता फाळणीत होरपळलेल्या प्रत्येकाची मग तो हिंदू असो की मुसलमान, भारतीय असो की पाकिस्तानी यांची मानसिकता दर्शविणारी आहे असेच मला वाटते.
बशर नवाज यांचे तीन उर्दू कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत स्वत: कविता कथा कादंबरी लिहीणारे समीक्षेच्या बाबत उदासीन असतात असं आढळते. बशर नवाज यालाही अपवाद होते. औरंगाबाद शहरात प्रसिद्ध उर्दू समीक्षक गोपीचंद नारंग यांच्या उत्तर संरचनावाद. या पुस्तकाचे प्रकाशन होते. साहित्य अकादमीच्या या कार्यक्रमात अनेक मान्यवर अभ्यासक सहभागी होते. कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी एका तरूण कवीने या विषयावर एक छोटीशी शंका बशर नवाजांसमोर उपस्थित केली. तेंव्हा त्याला उत्तर देण्यासाठी अतिशय साध्या भाषेत सोप्या पद्धतीनं हा गंभीर विषय समजावून सांगताना मी स्वत: बशर नवाजांना एैकलं आहे. आधूनिक विचारसरणी हा माणूस इतकी कोळून प्याला आहे हे समजून मलाच आश्चर्याचा थोडा धक्का बसला.
उर्दूचा बोलबाला जास्त झाला आणि आजही होतो तो गझलेसाठी बशर साहेबांच्या गझला प्रसिद्ध आहेतच पण त्यांनी गझलेशिवाय असलेल्या उर्दू कवितेला ‘नज्म’ ला अलिकडच्या काळात त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली हे लक्षात घ्यायला पाहिजे.
औरंगाबादला १९८८ मध्ये एकनाथ रंगमंदिराचे उद्घाटन झाले. या नवीन सभाग्रहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्या सुरवातीच्या काळात एक मोठा मुशायरा तिथे भरला होता. खासदार काजी सलिम यांनी मर्ढेकरांच्या कवितेचा उर्दू अनुवाद ‘अभी भी है खुशबू फूलोंमे’ एैकवला होता. याच मुशायर्यात सगळे गझल म्हणत असताना बशर नवाज यांनी एक नज्म एैकवली होती. त्यातली एक ओळ मला आजही आठवते.
कोई तो दरवाजा खोले
और सुरज को बोले
अंधेरा इतना घना कब था!
बशर नवाज यांनी सामान्य माणसाच्या मनातला आशावाद, सामान्यांची ताकद साध्या शब्दांत प्रभावीपणे मांडली होती. शब्दांच्या फुग्यांना कृत्रिम वा! वा! करणारे कितीतरी प्रेक्षक बशर नवाजांच्या कवितेनंतर एकदम स्तब्ध झाले. सन्नाट्टा पसरला मग भानावर येऊन लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
ज्या गाण्यामुळे बशर यांना अफाट लोकप्रियता लाभली. ते ‘करोगे याद तो हर बात याद आयेगी’ हे बाजार चित्रपटातील गीत आहे. प्रतिभावंत संगीतकार खय्याम यांनी त्याला अप्रतिम अशा चालीत बांधले आहे भूपेंद्र खर्जातला आवाज दमदार गाणं एक सुंदर नज्म आहे. फार जणांचा गैरसमज आहे की ही एक गझल आहे. गझल समजणार्यांचा गैरसमज दूर व्हावा म्हणून ती सगळी कविताच इथे देतो. सामाजिक आशय लिहीणार सामाजिक-राजकीय कार्यकर्ता असलेला हा कवी मनानं किती हळवा होता हे त्याच्याच शब्दांतून दिसून येते.
करोेगे याद तो हर बात याद आयेगी
गुजरते वक्तकी हर मौज ठहर जायेगी ॥धृ.||
ये चांद बीते जमानों का आईना होगा
भटकते कब्र मे चेहरा कोई बना होगा
उदास राह कोई दास्ता सुनायेगी ॥1॥
बरसात भीगता मौसम धुऑ धुऑ होगा
पिघलती शम्मों पे दिल का मेरे गुमा होगा
हथेलियों ही हीना याद कुछ दिलायेगी ॥2॥
गलीके मोड पे सुना सा कोई दरवाजा
तरसती ऑखों से रस्ता किसी का देखेगा
निगाह दूर तलक जा के लौट आयेगी ॥3॥
औरंगाबाद भडकल गेट जवळच्या बशर नवाजांच्या घराचा दरवाजा आता रसिकांसाठी ‘सूना सा कोई दरवाजा’ असाच उरला आहे. आणि सर्व चाहत्यांची अवस्था ‘निगाह दूर तलक जाके लौट आयेगी’ अशीच झालेली असणार ‘गालीब’ पुरस्काराने सन्मानित बशर नवाज यांना विनम्र श्रद्धांजली!
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद ९४२२८७८५७