उरूस, दै. पुण्य नगरी 14 जून 2015

हे आठवायचे कारण म्हणजे 12 जून हा पु.ल.देशपांडे यांचा स्मृती दिन. या दिवसाची कहाणी मोठी विलक्षण आहे. पु.ल. अतिशय गंभीर आजारी पडले. आजार त्यांना आयुष्याच्या अगदी अंतिम टप्प्यात घेवून गेला. आता ते जाणार हे निश्चित झाले. त्यांचा भाच्चा दिनेश ठाकूर जो की त्यांचा अत्यंत लाडका होता, ज्याला त्यांनी मुलगाच मानले त्याला अमेरिकेतून बोलावणे पाठवले. तो येईपर्यंत पु.ल. यांना कृत्रिमरित्या जिवंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सगळं चालू असताना सुनीताबाईंच्या लक्षात आले की आपल्या लग्नाचा वाढदिवस 12 जून जवळ येत आहे. त्यांनी हाच दिवस निश्चित केला. तोपर्यंंत दिनेश भारतात परतला. बरोब्बर 12 तारखेला पु.लंना दिलेला कृत्रिम आधार काढून घेतला आणि पु.ल. यांना आपल्या लग्नाच्या 54 व्या वाढदिवशी सुनीताबाईंनी निरोप दिला. ही कहाणी मोठी विलक्षण आहे.
ज्यांना वाटायचं की आहे मनोहर तरी मध्ये सुनीताबाईंनी ज्या नवर्याच्या इतक्या तक्रारी किंवा आपसातले मतभेद वाचकांसमोर मांडले त्या आपल्या नवर्यावर खरेच किती प्रेम करतात? पण सुनीताबाईंनी आपल्या आचरणातून दाखवून दिले की त्या पु.ल.मध्ये किती गुंतून गेल्या होत्या. पुढे त्याही फारश्या जगल्या नाहीत.
कविता हा पु.ल. आणि सुनीताबाईंमधला समान दुवा. बा.भ. बोरकर, आरती प्रभू, मर्ढेकर हे दोघांचेही आवडते कवी. यांच्या कवितांचे कार्यक्रम ते मिळून सादर करायचे.
30 नोव्हेंबर 1987 ला पु.ल.व सुनीताबाई यांनी औरंगाबादला बोरकरांच्या कवितांचा कार्यक्रम ‘आनंदयात्री’ सादर केला होता. स.भु. संस्थेच्या जालान सभागृहातील या कार्यक्रमास औरंगाबादकर रसिकांनी तुडूंब गर्दी केली होती. आमच्या सारख्या शाळकरी विद्यार्थ्यांना तिथे बसायला जागाच उरली नव्हती. शिवाय आमच्या खिशातही तिकीटासाठी पैसे नव्हते. मग आम्ही खिडकीच्या गजाला लटकून उभा राहण्याचा फुकटचा अफलातून पर्याय निवडला. आनंदयात्री हे नाव खरे तर पाडगांवकरांच्या कवितेचे आहे.
आनंदयात्री मी आनंदयात्री
अखंड नुतन मला ही धरीत्री
प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री
अशा त्या ओळी आहेत.
हे वर्णन बोरकरांना चपखल लागू पडते असे वाटून पुल व सुनीताबाईंनी हे नाव बोरकरांच्या कवितेच्या कार्यक्रमासाठी निवडले. या कार्यक्रमाचे नेपथ्य अगदी साधे पण प्रभावी होते. मागे काळा पडदा लावलेला. पांढर्या शुभ्र चादरींची बैठक मंचावर केलेली. त्यावर साध्या पांढर्या गुरूशर्ट झब्ब्यात पु.ल. व फिक्क्या निळ्या जांभळ्या फुलांच्या पांढर्या सुती साडीत सुनीताबाई बसलेल्या. पु.ल.समोर हार्मोनियम. काही कविता पु.ल. गाऊन म्हणत आहेत. बोरकरांच्या आठवणी सांगत श्रोत्यांना हसवत आहेत, स्वत: हसत आहेत.
समुद्र बिलोरी आयना
सृष्टीला सातवा महिना
ही बोरकरांची कविता पु.लनी झोकात साजरी केली. ‘निळ्या जळावर कमान काळी’ या कवितेत दुधावर आली शेते या शब्दाचा अर्थ समजावून सांगताना भाताचा शेताचा संदर्भ ते सहज देत होते. पु.ल.च्या विरूद्ध सादरीकरण सुनीताबाईंचे होते. त्या साध्या संथ स्वरात हळूवारपणे बोरकरांच्या कविता म्हणत आहेत. श्रोत्यांच्या हळू हळू लक्षात येत गेले की आपण सर्वात जास्त दाद पुलंना देत आहोत. पण सुनीताबाई जेंव्हा कविता वाचतात तेंव्हा आपण कशात तरी हरखून जातो. अगदी दाद देण्याचेही आपल्या लक्षात रहात नाहीत. कारण सुनीताबाईंनी बोरकरांची संपुर्ण कविता आपल्यात जिरवून घेतली आहे.
एखाद्या साध्या स्वरात आवाजात किती ताकद असू शकते, प्रभाव असू शकतो हे मला तरी त्या दिवशी पहिल्यांदाच जाणवले. पुलंपेक्षा सुनीताबाईंच्या या वाचनाने प्रभावी होवून पुढे कायमस्वरूपी बोरकरांच्या कवितांचे गारूड माझ्या मनावर पडून राहिले.
मर्ढेकरांची कविता
अभ्रांच्या गे कुंद अफूने
पानांना ये हिरवी गुंगी
वैशाखाच्या फांदीवरती
आषाढाची गाजारपुंगी
ही वाचत असताना सुनीताबाई थबकल्या. त्यांनी ती पुलंना म्हणून दाखवली. मग पुलंही त्यात अडकून गेले. बोलता बोलता कित्येक तास हे दोघे नवरा बायको मर्ढेकरांच्या कवितांमध्ये गुंतून पडले. एकमेकांना कविता चढाओढीने वाचून दाखवत राहिले. त्यांना असे वाटले की आपल्याला इतका आनंद एकमेकांना वाचून दाखवताना मिळतो आहे तर आपण तो मराठी रसिकांना का नाही द्यायचा? म्हणून त्यांनी मर्ढेकर, बोरकर, आरती प्रभूंच्या कवितांचे कार्यक्रम करण्यास सुरवात केली.
आरती प्रभूंच्या कवितेचे एक उदाहरण पुल व सुनीताबाई आपल्या कार्यक्रमात द्यायचे
तेंव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकूनी मी जाईन दूर गावा
पाण्यात ओंजळीच्या यावा चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यात अर्थ जावा
तारांवरी पडावा केंव्हा चुकून हात
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा
सुनीताबाई या कवितेवर बोलताना सांगायच्या, ‘अचानक काहीतरी हाती लागते, ज्यासाठी कितीही मेहनत केली तरी मिळेल याची शाश्वती नसते. कलेचे तर असेच आसते. मग अशावेळी आपली भावना काय होते? सर्वस्व सोडून निघून जाण्याचीच होते. कारण हे कलासक्त मन भौतिक वस्तूंमध्ये अडकलेलेच नसते. ते दूर कुठेतरी काही तरी शोधत असते.’
पुल स्वत: अतिशय प्रतिभावंत लेखक होते. त्यांची कथाकथनाचे, एकपात्री असे कित्येक प्रयोग त्यांनी केले. नाटकात सिनेमात कामं केली, गाण्या बजावण्यात बुडून गेले पण आपल्याला आवडलेल्या इतरांच्या कवितांसाठी त्यांनी जीव पाखडला.
सुनीताबाई याही प्रतिभावंत लेखिका. ‘सोयरे सकळ’ सारखे त्यांचे व्यक्तिचित्रंाचे पुस्तक मोठे विलक्षण आहे. पं. मल्लीकार्जून मंसूर किंवा पं. कुमार गंधर्व यांच्या सारख्या अलौकिक प्रतिभेच्या गायकांवर त्यांनी अतिशय सुंदर लिखाण केले आहे. मण्यांची माळ मधील ललित लेखन वाचकांना असेच खिळवून ठेवते. त्यांनीही आपले साहित्य बाजूला ठेवून बोरकर, आरती प्रभू, मर्ढेकर यांच्या कवितांवर जिवापाड प्रेम केले. त्यांच्या कवितांचा आनंद स्वत:ला मिळाला तसा इतरांना मिळावा म्हणून त्याचे कार्यक्रम महाराष्ट्रभर केले.
या कार्यक्रमांमधून जमा झालेले पैसे किंवा इतरही कार्यक्रमांचे पैसे, पुस्तकांचे मानधन या सगळ्यांतून या जोडप्याने अक्षरश: लाखो रूपये विविध साहित्यीक संस्थांना दान केले. विविध सामाजिक संस्थांना देणग्या दिल्या.
पुल यांच्या पंच्चाहत्तरी निमित्त एक स्मरणिका प्रकाशित झाली होती. तिच्या मलपृष्ठावर इंद्रजीत भालेराव यांची पुलंवरची एक कविता छापलेली आहे
शब्द मिठी मारलेले
तुम्ही ओठ सोडविले
एक अभयआरण्य
त्यांच्यासाठी घडविले
तुम्ही म्हणाला वाहवा
तुम्ही वाजविली टाळी
तेच भाग्य मिरविते
आज कविता कपाळी
मराठी कवितेच्या घट्ट मिठी मारलेल्या शब्दांचे अर्थ उलगडून दाखविणारे हे विलक्षण प्रतिभावंत जोडपे. 12 जून हा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. त्या निमित्त पुल आणि सुनीताबाईंचे हे स्मरण.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment