लोकसत्ता वर्धापनदिन पुरवणी शुक्रवार १२ डिसेंबर २०१४
एका झोपडपट्टीतील चिंचोळा रस्ता. जवळचा कमी गर्दीचा मार्ग म्हणून त्या रस्त्याने निघालो तर रस्त्यात जेवण समारंभ चाललेला. सार्वजनिक गणपती महोत्सवाचा तो भंडारा होता. त्यासाठी सगळा रस्ता अडवला गेलेला. त्रासून मनात म्हणालो साला या लोकांना अक्कलच नाही. सगळा रस्ताच अडवतात. काही दिवसांनी एका उच्चभ्रू वस्तीतून जात होतो. रस्ता बर्यापैकी मोठा. पण दोन्ही बाजूंना लोकांनी मोठमोठ्या चारचाकी गाड्या पार्क करून ठेवलेल्या. एक अलिशान कार आली आणि सगळी रहदारीच थांबली. कोणी गाडी मागे घ्यावी? आणि कशी घ्यावी? दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी शेवटी तो रस्ता मोकळा करून घ्यावा लागला. झोपडपट्टीतील लोकांनी रस्ता अडवला त्यासाठी सार्वजनिक कारणतरी होते. तेवढे संपले की मग रस्ता परत मोकळा तरी होतो. पण हे उच्चशिक्षीत, जास्त पैसे कमावणारे भल्यामोठ्या गाड्या घेवून आपल्याच घरासमोरचा रस्ता कायम अडवून ठेवणार याला काय म्हणायचे? जास्त पैसा कमावताना सार्वजनिक प्रश्नांबाबतची अक्कल कमावायची विसरतात की काय माणसे?
दिडशे मर्सिडिज या शहरात एकाचवेळी खरेदी झाल्या म्हणून मोठी बातमी झाली. सगळीकडे चर्चा झाली. पण कांही दिवसांतच यातील फोलपणा लक्षात आला. कारण या गाड्या रस्त्यांवर दिसेनात. आपल्या आपल्या गॅरेजमध्ये बंद झाल्या. मालकांनी दुसर्या लहान गाड्या बाहेर काढल्या. कारण या गाड्या चालवाव्यात असे रस्तेच आमच्याकडे नाहीत. धरण बांधावे आणि कालवा मात्र बांधल्या जावू नये. मग धरणातील पाण्याचे जे व्हावे ते या मर्सिडिजचे झाले. मर्सिडिजच नाही तर सगळ्या मोठ्या चारचाकी गाड्यांचे हेच हाल आहेत. जानेवारी 2012 मध्ये मोठ्या धाडसाने पुरूषोत्तम भापकर यांनी गुलमंडीवरील अतिक्रमणांवर हातोडा घातला. भर गुलमंडीवरील रस्ता रूंद झाला. पण हा आनंद काही काळच टिकला. रस्त्याचे रूंदीकरण झाले, रस्त्याचे काम पूर्ण झाले की लगेच या रस्त्याला दुचाकी वाहनांचा असा काही फास पडला की आता परत हा रस्ता जूना होता तितकाच वाहतुकीसाठी शिल्लक आहे.
एकीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आणि दुसरीकडे याच काळात दुचाकी/चारचाकी वाहनांचा पूर औरंगाबाद शहरात येत गेला. 1987 ला औरंगाबाद महानगरपालिकेची स्थापना झाली त्यावेळी विद्यापीठ-चिकलठाणा, रेल्वेस्टेशन-सिडको-हडको-बसस्टँ ड-रेल्वेस्टेशन, जवाहर कॉलनी-औरंगपूरा-बेगमपुरा, शाहगंज-औरंगपुरा-रेल्वेस्टेशन अशी लांबलांबची अंतरे बसने पार करणे सहज शक्य होते. विशेषत: म्हातारी माणसे, लहान मुले यांना ही मोठी वाहने सोयीची आणि सुरक्षीत होती. माझ्या आजीची मोठी बहिण अक्का मावशी नावाची सत्तरीपर्यंत मोठ्या आत्मविश्वासाने हातात एक छोटी कापडाची पिशवी घेवून बसने शहरभर फिरायची. तिला बसचे वेळापत्रकही पाठ होते. आज सत्तरीची कुठली म्हातारी या शहरात एकट्याने आत्मविश्वासाने फिरू शकते?
औरंगाबाद शहराची मुख्य वाहतुकवाहिनी म्हणजे जालना रोड. त्यावर अफाट वाहतूक वाढली म्हणून त्याला समांतर रस्ता वेदांत हॉटेल-पीरबाजार-दर्गा-सुतगिरणी चौक असा आणि दुसरा समांतर रस्ता वरद गणेश-सावरकर चौक-सिल्लेखाना-मोंढा-कैलासनगर स्मशान-एमजीएम असा प्रस्तावित आहे. पण आजही यांची कामं पूर्ण झाली नाहीत. शिवाय जालना रोडवर तीन पुलांचे काम एकाचवेळी चालू आहे.
शहरातील ऍटोरिक्शा ही एकेकाळी भरवश्याची वाहन व्यवस्था होती. त्यांची संख्या जवळपास पंचेवीस हजार आहे. यातील जवळपास सतरा हजार ऍटो नियमित स्वरूपाचे ज्यांनी लायसन काढले आहे, ज्यांच्या रिक्क्षांना मीटर आहे अशा आहेत. पण मोठ्या रस्त्यांवर धावणार्या सहा आसनी कित्येक रिक्क्षा या अवैध आहेत. त्यांना मीटर नाहीत. प्रवाशांची सुरक्षा हा तर विषयच विचारात घेतला जात नाही. दुसरा काही पर्याय नसल्यामुळे या धावत्या छळपिंजर्यांतून सामान्य लोक प्रवास करतात.
रस्त्यांच्या प्रश्नांवर काम करताना ऍटोरिक्क्षांना खराब रस्त्यांचा जास्त त्रास होतो म्हणून त्यांच्या संघटनांशी संपर्क केला. तेंव्हा लक्षात आले की अवैध रिक्क्षांच्या प्रश्नांवर सगळ्यात संताप या नियमाने चालणार्या रिक्क्षाचालकांमध्ये आहे. कारण त्यांना याचा जास्त त्रास होतो. त्यांनी वारंवार प्रशासनाला वाहतुकीच्या शिस्तीबद्दल जाणीव करून दिली. नियमांचा आग्रह धरला पण पोलिस यंत्रणाच यावर उदासीनता दाखवते असा आरोप या रिक्क्षचालकांनी केला.
अजून एक समस्या आपण निर्माण करून ठेवली आहे. ज्या ज्या सार्वजनिक खुल्या जागा शाळांसाठी उपलब्ध होत्या त्या त्या जागी धार्मिक किंवा इतर अतिक्रमण करून जागा व्यापून टाकल्या. आता शाळांसाठी मध्यवस्तीत जागाच उपलब्ध नाहीत. परिणामी रोज सकाळी शहरांतून बाहेर जाणार्या आणि दुपारी बाहेरून शहरांत येणार्या पिवळ्या बसेसची एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. या मोठ्या बस जेंव्हा छोट्या रस्त्यांवरून जातात तेंव्हा पूर्णच रस्ता व्यापला जातो. परिणामी दुसर्या वाहनांना जायला जागाच उरत नाही.
भर वस्तीतील जी मंगल कार्यालय आहेत त्यांच्याकडे वाहनतळ नाहीत. परिणामी वाहने सर्रास रस्त्यावर उभी राहतात. छोटे रस्ते अडण्यासाठी तितके कारण पुरे होते. लग्नाची वरात असेल तर मग काही विचारूच नका. मंगल कार्यालये सोडाच पण मोठ मोठी दुकानं, मॉल, दवाखाने यांच्याकडेही वाहनांची व्यवस्था नाही.
आज संपूर्ण शहरभर रस्त्यांची पुलांची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. रस्ता रूंदीकरण केला पण विजेचे खांब रस्त्याच्या मध्यभागी तसेच आहेत. आज सगळ्यांत पहिल्यांदा स्थानिक आणीबाणी घोषित करून महानगरपालिका बरखास्त केली पाहिजे. बाकी आर्थिक शिस्त वगैरे लावता येईल तो वेगळा विषय. पण वाहतुकीच्या बाबतीत म्हणावे तर मुख्य रस्त्यांची कामे तातडीने हाती घेवून पूर्णत्वास नेली पाहिजेत. रेल्वेस्टेशन, वाळूज, सिडको बस स्टँड, टिव्ही सेंटर, बस स्टँड, शहागंज, औरंगपुरा, जवाहर कॉलनी, शिवाजी नगर, देवळाई रोड, सातारा, पैठण रोड, बेगमपुरा, विद्यापीठ, चिकलठाणा अशी महत्त्वाची जास्त गर्दीची ठिकाणं शोधून यांच्यादरम्यान बस वाहतूक कार्यक्षमतेने कुशलतेने चालविली गेली पाहिजे. दौलताबाद, रेल्वे स्टेशन, पीर बाजार, मुकूंदवाडी, चिकलठाणा अशी लोकल रेल्वे सुरू केली पाहिजे. जे रेल्वेचे रूळ आहेत त्यांना समांतर ही दुसरी लाईन टाकल्या गेली पाहिजे.
सार्वजनिक वाहतूक सुरळीत सुरक्षित नियमित झाली तर खासगी वाहनांचा वापर कमी होतो हे जगभर वारंवार सिद्ध झाले आहे. कितीही तोटा झाला तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जपलीच पाहिजे कारण खासगी वाहनांचा जो खर्च होतो तो कधीही जास्तच आसतो.
ज्यांच्याकडे पैसे जास्त होते त्यांनी मोठ्या गाड्या घेवून आणि ज्यांच्याकडे कमी होते त्यांनी दोनचाकी गाड्या घेवून वाहतुकीची कोंडी करण्यात हातभार लावला. शहराची लोकसंख्या तिप्पट वाढली, वाहनांची संख्या पाचपट वाढली आणि रस्ते मात्र जराही वाढत नाहीत.
दिडशे मर्सिडिजच्या रत्नांचा हार घालणारे हे महानगर म्हणजे खरूज झालेले अंग झाकून त्यावर झगझगीत कपडे घालून एखाद्या बाईने गळ्यात मात्र हिर्यांचा हार घालावा तसे दिसते आहे.
श्रीकांत अनंत उमरीकर