दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 16 सप्टेंबर 2014
ज्येष्ठ मराठी लेखक बी. रघुनाथ यांचा 7 सप्टेंबर हा स्मृतिदिन. गेल्या वर्षी त्यांची जन्मशताब्दि साजरी झाली. गेली 12 वर्षे परभणी शहरात गणेश वाचनालय ‘बी. रघुनाथ महोत्सव’ साजरा करीत आहे. गेली 25 वर्षे औरंगाबाद शहरात ‘नाथ संध्या’ साजरी केली जाते आहे. बी रघुनाथ यांच्या नावे साहित्य पुरस्कार दिला जातो आहे. बी. रघुनाथ यांच्या मृत्यूनंतर लगेच तीनच वर्षात परभणी शहरात सामान्य नागरिकांनी त्यांची आठवण जपण्यासाठी 1957 साली बी.रघुनाथ हॉल बांधला. या वेळी त्यांचे सुरेख तैलचित्र प्रसिद्ध चित्रकार त्र्यंबक वसेकर यांनी काढले होते. कार्यक्रमासाठी ते नांदेडहून आणायचे तर चित्राचे रंग ताजे होते. मग थोर विचारवंत नरहर कुरूंदकर यांनी दुसर्या कुणाच्या हाती ते न सोपवता स्वत: ओल्या रंगांना जपत नांदेडहून परभणीला आणले आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात त्याचे अनावरण झाले.
परभणीला 1995 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. बी. रघुनाथांचे दुर्मिळ झालेले सर्व साहित्य सव्वाशे कविता, एकोणसाठ कथा आणि सात कादंबर्या तीन खंडांत प्रकाशित करण्यात आल्या. मग बी. रघुनाथांच्या सहित्यावर एक परिसंवाद घेवून मराठीतील मान्यवर समिक्षकांकडून लेख लिहून घेण्यात आले. त्या सर्वाचे एक संदर्भ पुस्तकही तीन वर्षांनी प्रकाशित झाले. परभणी शहरात बी रघुनाथ यांच्या नावे महाविद्यालय स्थापन करण्यात आले आहे.
बी. रघुनाथ मेळ्यांसाठी गाणी लिहून देत. गानमहर्षि अण्णासाहेब गुंजकर त्याला चाली लावून देत. ही गाणी परभणी परिसरात मोठी लोकप्रिय होती. आजही सुरमणी कमलाकरराव परळीकर यांनी बी. रघुनाथांच्या कवितांना दिलेल्या चाली परभणीचे गायक मोठ्या उत्साहाने गातात.
हे सगळं घडले आणि पुढेही घडत राहिल ते सामान्य रसिकांनी आपल्या काळजात बी. रघुनाथांना स्थान दिले म्हणून. म्हणजे बी. रघुनाथांना या रसिकांनीच खर्या अर्थाने जतन करून ठेवले. पण शासकीय पातळीवर काय घडले?
2002 साली बी. रघुनाथ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक कोटी रूपये खर्च करून भव्य स्मारक उभारण्यात आले. बी. रघुनाथांचा पुतळा, त्या भोवती आकर्षक बाग, कारंजे, छोटेखानी सभागृह आणि वाचनालयासाठी इमारत अशी रचना करण्यात आली होती. सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन झाले होते. ज्या दिवशी उद्घाटन झाले त्या दिवशी अमावस्या होती. बी. रघुनाथ गेले त्या दिवशीही अमावस्याच होती. कवी बा.भ.बोरकर यांनी आपल्या एका कवितेत लिहीले होते
मी विझल्यावर त्या जागेवर
नित्याच्या जनरिती प्रमाणे
विस्मरणाची थंड काजळी
उठेल थडगे केविलवाणे
मी विझल्यावर त्या जागेवर
पण कोण्या अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या कविता माझ्या
धरतील चंद्रफुलांची छत्री
बी. रघुनाथ यांच्या स्मारकावर धुळीत विखुरल्या त्यांच्या कवितांनी चंद्रफुलांची छत्री धरली असे चित्र 7 सप्टेंबर 2002 साली होते. आता मात्र परिस्थिती बिकट झाली आहे. पुतळ्या मागच्या भिंतीच्या फरश्या निखळुन पडल्या आहेत. कारंजे तर केंव्हाचेच बंद पडले आहे. ज्या इमारतीत वाचनालय व्हावे असे अपेक्षित होेते तिथे आजतागायत एकाही पुस्तकाला कुठल्याच निम्मित्ताने प्रवेश मिळाला नाही. पहिले वर्ष स्थानिक संस्था आणि प्रकाशक यांनी एक पुस्तक प्रदर्शन त्या इमारतीत भरवले होते. आजही एक कायमस्वरूपी प्रदर्शन त्या परिसरात चालू आहे. पण ते पार्किंगच्या चिंचोळ्या गैरसोयीच्या जागेत.
सभागृह सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मिळत नाही कारण सरकारी बैठका तिथे होतात. तारीख रिकामी असेल तर जागेचे भाडे सांस्कृतिक उपक्रमांना परवडणे शक्य नाही. स्वत: महानगरपालिकेने काही उपक्रम घ्यावा तर राजकीय इच्छाशक्तिचा पूर्णपणे अभाव. महापौर किंवा कुणीतरी सरकारी प्रतिनिधी 7 सप्टेंबरला आठवण झाली तर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात. जे कोणी सोबत त्यांचे सगे सोयरे दोस्त मंडळी असतील त्यांना चहा पाजविला जातो. इतर राजकीय कार्यक्रमाच्या घाईने आणि ओढीने महापौर किंवा इतर कुणी राजकीय नेते निघून जातात. बी. रघुनाथांवर प्रेम करणारे मोजके साहित्यप्रेमी आपले काही तरी हरवले असावे अशा अविर्भावात पुतळ्या भोवती काही काळ रेेंगाळत राहतात. शेवटी उन चढत जाते तशी माणसे पांगतात. त्या परिसरातील शिपाई मुख्य दरवाजा लावून घेतो. परत बी. रघुनाथ वाळत चाललेल्या हिरवळीकडे पहात विमनस्कपणे बसून राहतात. नाही तरी त्यांनीच आपल्या कवितेत लिहीले होते
राउळी जमतो भाविक मेळा
गुरवाचा गांजावर डोळा
त्यातही डोळे किती निराळे
भक्त कुणा समजावे
आज कुणाला गावे
बी. रघुनाथांना केवळ मठ मंदिरांमधील भक्त अपेक्षित नव्हते. साहित्याचा मंदिरातील भक्तही अपेक्षीत होते. आणि त्यांचेही वर्तन आज तसेच आढळते.
बी. रघुनाथांचे शासनाच्या साहित्य पुरस्काराला देण्यात आले होते. नंतर पुरस्कारांची संख्या कमी झाली. तसे ते नावही उडाले. बी. रघुनाथांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा जन्मशताब्दि वर्षात परभणी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली होती. आता तीचाही सोयीस्कर विसर सगळ्यांना पडला. बी. रघुनाथांच्या कन्या सुधा नरवाडकर यांनी साहित्य परिषदेला काही देणगी उपक्रमासाठी दिली होती. त्याचेही पुढे काय झाले कळायला मार्ग नाही.
मराठवाड्यात दोन विद्यापीठं अस्तित्वात आहेत. 1995 नंतर बी. रघुनाथ यांचे समग्र साहित्य चांगल्या स्वरूपात उपलब्ध झाले. नंतर 2005 साली नांदापुरकरांचे साहित्य उपलब्ध झाले. पण एकाही विद्यापीठाला ते अभ्यासक्रमाला लावावे वाटले नाही. आता अभ्यासक्रमाला जे काही लावले गेले आहे ते पाहता जे झाले ते बरेच झाले म्हणावयाची पाळी आहे.
या सरकारी अनास्थेच्या उलट सामान्य रसिकांच्या पाठिंब्यावर आजही बी. रघुनाथ महोत्सव साजरा होतो आहे. एक चांगला पायंडा या निमित्ताने पडला आहे त्याचा विचार केला पाहिजे. साहित्यकी सांस्कृतिक उपक्रमांमधील राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवून निखळ वाङ्मयीन स्वरूपात साधेपणात हे उपक्रम साजरे केले पाहिजेत. महाराष्ट्रभर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा अ वर्ग वाचनालय आहेत. किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कृपेने महाविद्यालयांच्या इमारती बर्यापैकी अवस्थेत आहेत. या ठिकाणी जिल्ह्याभरच्या साहित्यप्रेमी रसिकांच्या आश्रयाने हे उत्सव, उपक्रम साजरे होवू शकतात. यासाठी लागणारा निधीही सामान्य रसिकांमधून, प्रस्थापित संस्थांमधून सहज उभा राहू शकतो. प्रत्येकवेळी मोठ मोठ्या रकमा उभ्या करायच्या. त्या खर्चाच्या ओझ्याने साहित्यीक कार्यकर्ते बाजूला पडतात. आणि भलतेच उपटसुंभ पुढे येतात. ते मग त्या उपक्रमाचा काय बट्ट्याबोळ करतात हे परत वेगळे सांगायची गरज नाही. खरं तर कुठलाच राजकीय पुढारी साहित्यीक संस्थांच्या दाराशी येवून लुडबूड करू इच्छित नसतो. साहित्य क्षेत्रातील सामान्य कुवतीचे साहित्याची खरी जाण नसणारे गणंगच राजकीय नेत्यांच्या दाराशी पडून असतात. मग स्वाभाविकच या क्षेत्राचा वापर करण्याची राजकीय नेत्यांची वृत्ती बळावते. यात त्यांचा दोष कमी आणि साहित्यीकांचा दोष जास्त आहे.
साधेपणाने साजरा होणार्या बी. रघुनाथ महोत्सवाने एक आदर्श समोर ठेवला आहे. त्याचे डोळसपणे अवलोकन या क्षेत्रातील मान्यवरांनी रसिकांनी करावे ही अपेक्षा.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575