दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 22 एप्रिल 2014
सध्या वाराणसी फार चर्चेत आहे. कारण नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल येथून लोकसभेची निवडणुक लढवत आहेत म्हणून. नरेंद्र मोदी निवडणुक लढवित आहे म्हणजे मुलसमानांची मते कुणाला, मुसलमान उमेदवार कसा उभा करायचा किंवा उभा राहू द्यायचा नाही यावर चर्चा रंगल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर गालिब सारख्या फार्सी-उर्दूच्या महाकविला या शहराबद्दल काय वाटत होते हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तशी कुणालाही आवश्यकता वाटण्याचे कारणच नाही.
गालिब हा प्रतिगाम्यांपेक्षा पुरोगाम्यांची अडचण करणारा कवी आहे. त्याने या शहराचे वर्णन ‘चराग-ए-दैर’ (दिव्यांचे देऊळ) कवितेत जे करून ठेवले आहे त्याने भल्या भल्यांची गोची होवून बसली आहे. गालिबची ही कविता मुळ फार्सीत आहे. त्याचे हिंदी-इंग्रजी भाषांतर सर्वत्र उपलब्ध आहे. पवन कुमार शर्मा यांनी गालिब वर एक सुंदर पुस्तक इंग्रजीत लिहीले आहे (गालिब : द मॅन, द टाईम्स, प्रकाशक साहित्य अकादमी, दिल्ली). या पुस्तकाचे मराठी भाषांतर प्रा.निशिकांत ठकार यांनी केले आहे. या पुस्तकात ही कविता त्यांनी गद्य स्वरूपात दिली आहे. एरवी गालिबच्या उर्दू गझलांचे दाखले सगळेच देतात. पण त्याच्या फार्सी रचना मात्र फारश्या अभ्यासल्या, चर्चिल्या जात नाहीत. "माझ्या अस्सल प्रतिभेचे दर्शन फार्सी कवितेतच सापडते" असे गालिब यानेच लिहून ठेवले आहे. शिवाय आपल्याकडे फक्त गझलांचेच कौतुक करायची परंपरा आहे. त्यामुळे गझलेशिवाय जे काही गालिब किंवा इतर उर्दू कवींनी लिहून ठेवले आहे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. चराग-ए-दैर या सुंदर कवितेचा मराठी भावानुवाद असा होईल...
दिव्यांचे देऊळ
आपल्या रंगभर्या मस्तीने
स्वर्गाला लाजविणार्या बनारसला
न लागो कुणाची वाईट नजर
पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे म्हणतात
इथल्या मरणाला लाभतो
अमरत्वाचा जर
हे मंदिर आहे
रंगीबिरंगी आश्चर्याचे जग
इथल्या वसंतात
सदोदीत फुलण्याची धग
इथे शरद बनून राहतो
उजळ कपाळीचा चंदनटिळा
आणि वसंतवारा घालतो
फुललहरींचे जानवे
इथली धुसर संध्या
स्वर्गीच्या भुवयांमधल्या
कुंकवागत जाणवे
पैगंबराला दिसलेल्या दिव्य प्रकाशापासून
घडलेल्या इथल्या मूर्ती
त्यांच्या चेहर्यावर
गंगेकाठच्या दिव्यांच्या
लवथवत्या उत्साहाची पूर्ती
सूर्य-चंद्र जेंव्हा रेंगाळतात
पूर्व क्षितीजावर टेहळण्यासाठी
ही काशी सुंदरी उचलते गंगेचा आरसा
आपले लावण्य न्याहळण्यासाठी
तार्यांनी खच्चून भरल्या एका रात्री
विशुद्ध भाव बाळगून गात्री
मी विचारले एका साधुला
महाराज,
या दु:खी जगातून
निष्ठा-प्रेम-भलेपणा-विश्वास
यांनी घेतला अखेरचा श्वास
बापलेक दाबताहेत परस्परांचा गळा
भावाचा भावाच्या वाईटावर डोळा
सार्या कोमल भावनांचा
झाला लय
मग का होत नाही प्रलय ?
का वाजत नाही शेवटची रणभेरी ?
अंतिम संहाराची
कोणा हाती दोरी ?
मंद हसू ओठांवर खेळवत
प्रेमभाव डोळ्यांत मिळवत
तो म्हणाला
ही नगरी आहे
विधात्याचे प्रिय काळीज-वतन
तो होऊ देणार नाही ही नष्ट
वा हीचे पतन
हे एैकून अभिमानाच्या गुलालाने
भरून गेले बनारसचे कपाळ
विचारांच्या पंखांना शिवता येऊ नये
असे उंचावले बनारसचे आभाळ
वाराणसीबद्दल इतकी पवित्र भावना बाळगणार्या गालिब यांचे गाव होते दिल्ली. आजही दिल्लीला त्यांची कबर आहे. ते रहात असलेल्या बल्लीमारा मोहल्याचे मोठे सुंदर वर्णन गुलजार यांनी केले आहे. गुलजार लिहीतात,
बल्लीमारा मोहल्ले की वो पेचिदा दलिलों की सी गलिया ।
सामने टाल के नुक्कड पे बटेरों के कसिदे ।
गुडगुडाती हुई पान की पिकों मे वो दाद वो वाह वाह ।
चंद दरवाजे पर लटके हुये बोसिदा से कुछ टाट के पर्दे ।
एक बकरी की ममियाने की आवाज ।
और धुंदलाई हुयी श्याम के बेनुर अंधेरे
ऐसे दिवारोंसे मूं जोड के चलते है यहा,
चुडीवालां की कटरी की बडी बी जैसे,
अपनी बुझती हुई आखोंसे दरवाजे टटोले।
इसी बेनूर अंधेरी गलीकासिम से
एक तरतीब चरागों की शुरू होती है,
एक पुराने सुखन का सफा खुलता है ।
असद उल्ला खॉं गालिब का पता मिलता है ।
गालिबच्या भाषेला न्याय द्यायला गुलजार यांचेच शब्द पाहिजेत. याचे काय भाषांतर करणार?
केवळ कविता लिहूनच गालिब थांबला असे नाही तर आपल्या एका मित्राला लिहीलेल्या पत्रात त्याने असे लिहीले आहे, "धर्माचा त्याग करून एका हातात माळ घ्यावी, कपाळावर टिळा लावावा, गळ्यात जानवे घालावे, गंगेकाठी जाऊन बसावे, अस्तित्वाच्या प्रदूषणापासून स्वत:ला पवित्र करावे आणि थेंब होऊन नदीशी एकरूप होऊन जावे अशी इच्छा मला झाली होती." (गालिब : काळ आणि कर्तृत्व, पवन कुमार वर्मा, अनु. निशिकांत ठकार, साहित्य अकादमी पृ.37)
गालिब यांनी आपल्या कवितेतून आणि पत्रातून व्यक्त केलेली भावना अतिशय विशुद्ध अशी आहे. त्याचा धर्माचा तसा काही संबंध नाही. मोदीं आणि त्यांना विरोध करायचा म्हणून केजरीवाल यांचे हेतू धार्मिक राजकीय आहेत हे काही लपलेले नाही. पण एक सुंदर-पवित्र नगरी, हीचे सौंदर्य पावित्र्य अबाधित ठेवण्याचे काही कोणी निवडणुक प्रचारात बोललेले नाही.
भोवतालच्या सर्व प्रदुषणाचा मनापासून वीट येऊन गालिबसारख्याला वाराणसीच्या गंगेकाठी विशुद्ध पवित्र असं वातावरण सापडले आणि त्याचा त्याला मोह पडला. आजच्या वातावरणात गालिब यांना असे ‘वाराणसी’ कविता लिहायला सापडेल का? गालिबच्या कवितेच्या मोहात पडून आपण वाराणसीला गेलो तर आपल्या हाती काहीच सापडणार नाही. गालिबची कविता आपण आपल्याच मनातील वाराणसी किंवा आपल्याला आवडणारे नदी काठचे कुठलेही गाव/शहर यांना लागू करून मनातल्या मनात आनंद साजरा करू. (मूळ फार्सी कविता चिराग-ए-दैर मला उपलब्ध झाली नाही. कुणाला ती मिळाल्यास जरूर सांगा. अर्थात त्यातील शब्दांच्या अर्थासहीत आणि देवनागरी लिपीत पाठवा. मला स्वत:ला उर्दू लिपी वाचता येत नाही.)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575