प्रसंग आहे बरोबर 340 वर्षांपूर्वीचा आहे. महाराष्ट्रात धुमश्चक्री चालू होती. शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. कुठलेही अस्मानी संकट म्हणजे पाऊस, पूर, दुष्काळ आलेले नव्हते, तर संकट सुलतानी होते. (अस्मानी संकट म्हणजे आभाळातून प्रचंड पडलेला किंवा न पडलेला पाऊस, गारपीट किंवा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती आणि सुलतानी संकट म्हणजे राज्य करणार्या सुलतानाने लहरीप्रमाणे केलेला अन्याय. हे यासाठी सांगितले की एका प्रतिष्ठित दैनिकाच्या संपादकाला अस्मानी आणि सुलतानी यातील फरकच माहीत नव्हता. परिणामी, त्यांच्या लेखनात या शब्दांची गल्लत होत गेली. ) मोगलांच्या सैन्याने मराठी मुलखाला पुरते कोंडीत पकडले होते. पेरणीचे दिवस तोंडावर आलेले होते. गनिमी काव्याचा आधार घेऊन शिवाजी महाराज मोगलांना अजून कितीही काळ या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर करत फिरवत बसू शकले असते; पण महाराजांच्या लक्षात आले की हा पेरणीचा काळ वाया गेला, तर पूर्ण शेती उद्ध्वस्त होईल. महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी तह केला. ही तारीख होती 12 जून 1665.
आजचे शेतकर्यांचे पुत्र असलेले राज्यकर्ते, 'जाणते राजे' सकाळ-दुपार-संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ शाहू फुले आंबेडकर हा जप करतात. शिवाजी महाराजांच्या नावाने जयजयकार करतात; पण आपल्या कृतीत यांची धोरणे येवू नये याची काळजी घेतात. शिवाजी महाराजांनी सगळे राजकारण बाजूला ठेवून शेतकर्यांच्या हितासाठी मिर्झा राजे जयसिंगांशी तह केला.
तेव्हा पेरणी तोंडावर होती. आज सुगी संपून धान्य हाती येण्याच्याच नेमक्या काळात अस्मानी गारपिटीने शेतकर्यांच्या ताटात माती कालवली आहे. शेती पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. दिल्लीच्या निवडणुका तोंडावर आहेत. एकही राज्यकर्ता अजून असं म्हणाला नाही की, शेतीची अतिशय दयनीय अवस्था पाहता महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात. पुढे होणार्या विधानसभा निवडणुकांबरोबर या निवडणुका घेतल्या जाव्यात. सध्या आपण सगळे मिळून शेतकरी राजा पुन्हा उभा कसा राहील, यासाठी कंबर कसून प्रयत्न करूत.
'जाणते राजे' म्हणवले जाणारे शरद पवार केंद्रात कृषिमंत्री आहेत. पंचनामे झाल्याशिवाय शेतकर्यांना मदत मिळू शकत नाही, हे त्यांनी सांगितले. एखादा रुग्ण अतिशय आजारी आहे. त्यातच त्याचे देहावसान झाले. त्याचे शव विच्छेदन अजून व्हावयाचे आहे. डॉक्टरांनी त्याला अजून मृत घोषित केले नाही. तोपर्यंत त्याला जिवंत समजायचे काय? दिल्लीचे पंचनामे अजून झाले नाहीत, तोपर्यंत शेतकर्यांना काय वार्यावर सोडायचे? मागच्या वेळी झालेल्या गारपिटीची मदत आजतागायत शेतकर्यांपर्यंत पोहचली नाही. आजही ही मदत देण्यासाठी आताच आजच्या जाणत्या राज्यांनी खळखळ सुरू केली आहे. कुठल्या दृष्टीने यांना शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणायचे?
आजचे राज्यकर्ते म्हणजे 'जाणते राजे' नसून या दिल्ली दरबारातील लाचारांच्या फौजा आहेत. शिवाजी महाराज आग्र्यात गेले, तेव्हा त्यांचे वर्तन कसे होते? आग्रा येथील किल्ल्यात शिवाजी महाराजांची पाऊले पडली तेव्हा त्या मातीला काय वाटले असेल याचे कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेत फार छान वर्णन केले आहे.
या जमिनीवर
या जमिनीवर असेल तेव्हा
प्रिय माझ्या त्या शककर्त्याचे
पडले पाऊल
या भूमीच्या सुगंधसिंचित धूलिकणांना
सह्याद्रीवर अवतरलेल्या
ऊर्जस्वल स्वातंत्र्य उषेची
इथे लागली पहिली चाहूल
याच ठिकाणी-
मावळ खोर्यामधले वादळ
इंद्रसभेवर या आदळले
कृष्णेचे जळ खडकांमधले
यमुनेच्या श्रीमंत तटावर येथे वळले
इथे तमाच्या अधिराज्याला
तेजाचे बळ प्रथमच कळले
मखमली गाद्यांवर सळसळ
संतापाची असेल उठली
माळ करांतील या तख्तावर असेल तुटली
काच बिलोरी ऐश्वर्याची
पोलादाच्या त्या तुकड्यावर इथेच फुटली
(पृ.10-11, स्वगत, पुनर्मुद्रण 86, कॉन्टिनेंटल प्रकाशन- पुणे)
सध्याचा अनुभव मात्र उलटा आहे. महाराष्ट्रातला नेता दिल्लीत जातो आणि अजूनच लाचार होतो. महाराष्ट्रासाठी कुठलीही मदत मागायची असो आणि त्यातही परत शेतकर्यांसाठी काही मागायचे असो. यांचे शब्द तोंडातल्या तोंडातच जिरतात. दिल्लीच्या इंद्रसभेवर यांच्या पोलादाचे तुकडे जाऊन आदळत नाहीत, कारण हे रबराचे तुकडे आहेत. रे रबरी चेंडू आपले आपणच उड्या मारत राहतात. आपलेच प्रतिबिंब तिथल्या आरशात पाहण्यात गुंग होतात.
आग्र्यावरून परतल्यावर पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची व्यवस्था लावणे, जमिनीची मोजणी करून घेणे, शेतसार्याची नीट मांडणी करणे या मोहिमा हाती घेतल्या होत्या. शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे 19 मार्च रोजी आहे. सरकारी जयंती तारखेप्रमाणे 20 फेब्रुवारीला पार पडली आहे. शिवाजी महाराज असते, तर निश्चितच कडाडले असते आणि पहिल्यांदा गारपीटग्रस्त शेतकर्यांना मदत देण्यासाठी सरसावले असते.
महाराष्ट्रातील शेतकरी सुलतानी जाचातून शिवाजी महाराजांनी मुक्त केला तेंव्हा मोगलाईतील जाट शेतकरी अन्यायाने त्रस्त होवून औरंगजेबाविरूद्ध बंड करत होता. या बंडाचा वणवा इतका होता की औरंगजेबाचा सरदार अब्दुलनबी याला सामान्य शेतकर्यांनी ठार केले. आजच्या राज्यकर्त्यांना शेतकरी निवडणुकीत गार करेल म्हणजे त्यांचे डोळे उघडतील
‘शेतकर्यांचा राजा शिवाजी’ या पुस्तकात शरद जोशी यांनी शिवाजी महाराजांच्या या पैलूचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे. श्रीकांत देशमुख यांनी नुकतेच याच विषयावरील ‘कुळवाडीभुषण शिवराय’ हे पुस्तक सिद्ध केले आहे. या पुस्तकाला मसापचा म.भि.चिटणीस साहित्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी हे लिखाण निदान नजरेखालून तरी घालावे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment