Thursday, April 3, 2014

.............. चैत्र पालवी । मनी फुटावी।


                              उरूस, गुरूवार 3 एप्रिल 2014

नुकताच गुढी पाडवा होवून गेला. त्या दिवशी अतिशय गलिच्छ मजकुर फेसबुकवर फिरत होता. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या या दिवशी झाली. परिणामी हा सण साजरा करणे ही कशी ब्राह्मणी विकृती आहे असे सांगितले जात होतं. आपल्याकडे सण समारंभ म्हटले की त्याचा धर्माशी आणि स्वाभाविकच ब्राह्मणांशी संबंध जोडणं ही एक सोय आहे. खरं तर काही सण समारंभ यांचा ब्राह्मणांशी काडीचाही संबंध नाही. पण इतका सारासार विचार अशा विकृत लोकांना करायचा नसावा.

पाडव्याचा पहिला संदर्भ येतो तो रामायणातील. प्रभु श्रीराम या क्षत्रिय राजाने रावण या ब्राह्मणाचा पराभव करून त्याचा वध करून विजय मिळविला. अशा श्रीरामाचे लक्ष्मण, सीता, हनुमान व इतर वानर सैन्यासह अयोध्येत आगमन झाले तो हा दिवस. या दिवशी अयोध्येतील जनतेने मोठ्या आनंदाने आपआपल्या घरासमोर गुढ्या उभारल्या. तोरणं बांधली. रांगोळ्या काढल्या. आज ज्याला साडी व त्यावर उलटा तांब्या असं म्हणून हिणवलं गेलं ते म्हणजे जरीचे वस्त्र व त्यावर कलश अशी रचना आहे. जमिनीवर कलश मांडताना सुलटा ठेवला जातो तर तोच कलश काठीवर ठेवायचा असेल तर उलटा केला जातो त्यामागे कुठलेही कारस्थान असण्याचे कारण नाही. संभाजी महाराजांचे मस्तक म्हणजे हा कलश असा विपरीत अर्थ कशासाठी काढल्या जातो? आणि जर जातीचाच विचार केला तर या सणाची सुरूवात ही क्षत्रियांपासून होते. ब्राह्मणांपासून नाही.

दुसरा संदर्भ आहे तो शेती करणार्‍या कुणब्यांचा. शेतीची सर्व कामे या काळात संपलेली असतात. मोठी पेरणी जी दिवाळीच्या दरम्यान होते तीचे खळे उरकलेले असते. इंद्रजीत भालेराव यांच्या ‘पीकपाणी’ या संग्रहात शेतीसंबंधी एक दीर्घ कविता आहे. तिच्या शेवटच्या तुकड्यात

खळेदळे उरकले
झाला कुणबी मोकळा
चैती वाहुटळीसंग
उडू लागला पाचोळा


असा संदर्भ आलेला आहे. पाडव्याला जुने सगळे हिशोब मिटवून नव्यानं ‘साल’ सुरू होतं. नविन सालदार याच दिवशी नेमले जातात. भारत काळे यांच्या ‘ऐसे कुणबी भुपाळ’ या कादंबरीत हे संदर्भ आलेले आहेत. तेंव्हा पाडवा म्हणजे कुणब्याचा मार्च एन्ड होवून नविन वर्ष सुरू होण्याचा दिवस.

याच काळात जत्रा भरतात. लग्न समारंभ याच रिकाम्या काळात आटोपले जातात. कारण कुणब्याच्या हातात पैसा आलेला असतो शिवाय शेतात काही महत्त्वाचे काम नसते. त्यामुळे पाडवा साजरा करण्यात येतो. यात कुठेही ब्राह्मणांचा आणि धार्मिक संदर्भ नाही.

तिसरा संदर्भ तर फारच महत्त्वाचा आहे. आणि तो म्हणजे निसर्गाचा. रामाचा जय असो नाही तर संभाजी महाराजांची हत्या असो याच्या पलिकडे निसर्ग ही एक फार मोठी शक्ति आपल्या जीवनाला व्यापून राहिलेली आहे. भारतीय उपखंडात हा काळ वसंत ऋतू म्हणून ओळखल्या जातो. जुनी पानं टाकून झाडांना नविन पालवी फुटते. लिंबाच्या मोहराचा घमघमाट सर्वत्र पसरलेला असतो. पिंपळ, कडु लिंब, अंबा, पळस ही या ऋतूची सुंदर प्रतिकं आहेत. पिंपळाच्या कोवळ्या लुस पानांवरून अक्षरश: नजर ठरत नाही. कडु लिंबाच्या घमघमाटाने सारा आसमंत भरून जातो. अंब्याचा मोहोर आणि मग त्याला लगडलेल्या कैर्‍या, पळसाच्या फुलांचा अप्रतिम लाल केशरी रंग आणि त्यांच्या देठाजवळचा काळसर मखमाली रंग नजरेला वेडं करतात. झाडांच्या पालवीला म्हणून जो शब्द आहे तो ‘चैत्र पालवी’ असा आहे नुसता पालवी असा नाही. शिवाय या काळात एक विलक्षण रिकामपण, एक शांतता पसरलेली असते. मर्ढेकरांनी मोठं सुंदर वर्णन या काळाचे केलं आहे

झोपली ग खुळी बाळे
झोप अंगाईला आली
जड झाली शांततेची
पापणी या रित्या वेळी

चैत्र बघतो वाकून
निळ्या नभांतून खाली
आणि वार्‍याच्या धमन्या
धुकल्या ग अंतराळी


या काळातील रंग आणि गंध याचा मोह बोरकरांसारख्या कवीला न पडता तरच नवल. बाराही महिने आणि त्या काळातील निसर्ग यांच्या उपमा प्रेयसीला देताना बोरकर लिहीतात

फुलवित चित्र चैत्र तुझ्या अंगी झाला धुंद
वक्षी फळून वैशाख उरी लोटी दाह गंध


हे सारं विसरून काही तरी विकृती मनात ठेवायची आणि तिचं प्रदर्शन या इतक्या सुंदर काळात करायचं याला काय म्हणावं? खरं तर हा काळच जुनं सारं विसरून नव्यानं काही तरी करण्याची उमेद बाळगावी असा असतो. जगण्याचे तत्त्वज्ञानच या काळात निसर्ग आपल्याला शिकवतो. धनंजय चिंचोलीकर या मित्राच्या दारापुढील पिंपळाला पाहून मला जी कविता सुचली होती तिच्यात मी हेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे

कात टाकूनी पुन्हा नव्याने
करितो सळसळ दारी पिंपळ
मिटवून टाकी पानगळीचे
अंगोपांगी उठलेले वळ

अटवून टाकी चैत्राचे ऊन
साकळलेले दु:खाचे जळ
डबडब भरण्या सज्ज जाहले
मनामनाचे सुकलेले तळ

जीर्ण शीर्ण जे पडले ते ते
उडवूनी लावी पिशी वावटळ
जूने बाजूला सरल्यावरती
नव्यास मिळते रूजण्याला बळ


जूने साचलेले कुबट अटून जावून नविन लसलसणारे चैतन्यमय असे काही तूमच्या मनामनात रूजो हीच चैती पाडव्याच्या निमित्ताने प्रार्थना. (लेखातील छायाचित्र -श्रीकृष्ण उमरीकर)

  श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575     

No comments:

Post a Comment