उरूस, 28 सप्टेंबर 2021
उसंतवाणी- 184
(संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी ज्यो बायडेन यांच्यासाठी एक ट्विट केले. त्यात भारतातील किसान आंदोलनाची दखल घेवून मोदींना समजावून सांगा असा आग्रह धरला आहे.)
टिकैत करतो । बीडेनला ट्विट ।
नवे टूलकिट । जाणा जरा ॥
बायडेन तुला । घालतो साकडे ।
सांग बोल खडे । मोदीसाठी ॥
‘कनुन वापसी’ । अडकली गाडी ।
गवसेना नाडी । किसानांची ॥
बोलभांड खुप । पुरोगामी दर्दी ।
शेतकरी गर्दी । जमेचीना ॥
सर्वौच्च कोर्टात । आता आहे चेंडू ।
कोणाशी मी भांडू । कळेचीना ॥
पत्रकार आता । पाहतात टाळू ।
कुणासाठी गाळू । अश्रु दोन ॥
परक्या दाराशी । घरचे भांडण ।
बुद्धीचे कांडण । कांत म्हणे ॥
(26 सप्टेंबर 2021)
उसंतवाणी- 185
(संजय राउत नेहमीप्रमाणे बेताल बोलले आहेत. 2024 पर्यंत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार, राष्ट्रवादीला म्हणजेच अजित पवार यांना त्यांनी इशारा दिला आहे की मुख्यमंत्री अमित शहांना भेटले आहेत तेंव्हा लक्षात घ्या. नाना पटोले यांनी दादापेक्षा नाना मोठा असा चिमटा अजीत दादांना काढला आहे.)
नेहमीप्रमाणे । संजय उवाच ।
बोलतो उगाच । काही बाही ॥
आवेश तो पहा । ‘आता दिल्लीवर ।
आमची नजर । सज्ज रहा’ ॥
बेडकी फुगुन । होईल का बैल ।
जीभ जरी सैल । सोडली ही ॥
बोलभांड नाना । बोललेत ज्यादा ।
नानापेक्षा दादा । धाकलाच ॥
अजीत दादांची । उगा काढी खोडी ।
मित्रपक्ष फोडी । आघाडी ही ॥
राजकारण ना । स्टँडप कॉमेडी ।
जनताच वेडी । पाहणारी ॥
घालविली पत । नको ते बोलुन ।
इज्जत खोलुन । कांत म्हणे ॥
(27 सप्टेंबर 2021)
उसंतवाणी-186
(संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदचे आवाहन केले. त्याला लोकांनी अतिशय अल्प असा प्रतिसाद दिला. कांही जागी जाणीवपूर्वक मोठे ट्रक लावून रस्ता अडवला गेला. परिणामी 5/10 किमी लांब चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी सामान्य लोकांना अतिशय अडचणीला तोंड द्यावे लागले. )
‘भारत बंद’चा । केला ऐसा खेळ ।
कुणाचा न मेळ । कुणापाशी ॥
कृषी आंदोलन । राहिला न मुद्दा ।
जनतेला गुद्दा । बसतसे ॥
अडवले रस्ते । वाहनांच्या रांगा ।
अरेरावी नंगा । नाच चाले ॥
संचार स्वातंत्र्य । आणले धोक्यात ।
टिकैत झोक्यात । सत्ताकांक्षी ॥
कृषी आंदोलन । राहिले न ‘कृषी’ ।
राजकीय उशी । सोयीची ती ॥
सामान्य जनता । धरली वेठीला ।
देशाच्या गाठीला । गोंधळ हा ॥
कांत कायद्याने । शोधावे तत्पर ।
प्रश्नाला उत्तर । आडमुठ ॥
(29 सप्टेंबर 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575