Wednesday, August 28, 2019

पक्ष फोडण्याचे फळा आले पाप । आपलाही पक्ष फुटे आपोआप ॥


      
उरूस, ऑगस्ट 2019
विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्षांतरांची लाट आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी ‘पक्षनिष्ठा नावाची काही गोष्टच शिल्लक राहिली नाही.’ असे विधान त्या पार्श्वभूमीवर केले आहे. 

हे विधान अजीत पवारांनी करण्यातही एक अजब असा योग आहे. स्वत: अजीत पवारांना राजकीय कारकीर्द सुरू केल्यापासून कायमच सत्तेत रहाण्याची सवय राहिली आहे. मुळात शरद पवारांचे एकूणच राजकारण कायमच सत्तेभोवती केंद्रित राहिलेले आहे. त्यांनी अगदी तरूण वयात 35 आमदार सोबत घेवून कॉंग्रेस पक्षात फुट पाडली व  विरोधी पक्षाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री पद प्राप्त केले. 100 आमदार असलेला जनता पक्ष त्यांना पाठिंबा देत होता पण कुणीही असा प्रश्‍न उपस्थित केला नाही की केवळ 35 आमदारांच्या नेत्याला मुख्यमंत्री पद कसे काय? तेंव्हा केवळ इंदिरा गांधींच्या विरोधात सर्व एकत्र आले होते. या फोडाफोडीचे कुणाला काहीच तेंव्हा वाटले नाही. 

अवघ्या दोनच वर्षांत केंद्रातील सरकार पडले. इंदिरा गांधींनी आपल्या वैयक्तिक करिश्म्याच्या बळावर कॉंग्रेसच्या आपल्या गटाला संसदेत बहुमत मिळवून दिले. इंदिरा गांधींनी जनतेने आपल्याला केंद्रात निवडून दिले आहे या नावाखाली महाराष्ट्रातील शरद पवारांचे सरकारही बरखास्त केले. परत नव्याने निवडणुका घेतल्या. त्यात इंदिरा कॉंग्रेसला लोकांनी निवडून दिले. यशवंतराव चव्हाणांसारखे शरद पवारांचे गुरूही तेंव्हा इंदिरा कॉंग्रेसमध्ये परतले. शरद पवार मात्र ‘समाजवादी कॉंग्रेस’ नावाने आपला वेगळा पक्ष करून राहिले. त्यांच्या भोवती महाराष्ट्रातील शेकाप, समाजवादी पक्ष अगदी तेंव्हाचा भाजप सगळे पक्ष गोळा झाले होते. या गटाला पुरोगामी लोकशाही दल ‘पुलोद’ असे म्हटले जायचे. 1985 ची निवडणुक पवारांनी या ‘पुलोद’ आघाडी करून लढवली. थोड्या थोडक्या नव्हे तर 105 इतक्या जागा पुलोदला मिळाल्या होत्या. पण सत्ता मिळाली नाही.

पवारांना सत्तेचा हा विरह फार काळ सहन झाला नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस केंद्रात प्रचंड बहुमताने विजयी झाली. देशभर कॉंग्रेसमध्ये परतायचे वेध जून्या कॉंग्रेस जनांना लागले. शरद पवारांनीही आपला पक्ष 1986 मध्ये औरंगाबादेत आमखास मैदानावर मोठा मेळावा घेवून पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये विसर्जीत केला. सत्तेसाठी आपण कुठल्याही ‘आम’ लोकांसोबत नसून सत्तेच्या ‘खास’ खुर्चीसोबतच आहोत हा संदेश शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. 

1989 ला केंद्रात कॉंग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर फेकला गेला पण पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनून सत्तेत होतेच. 1996 ते 1999 ही केवळ तीन वर्षे पवार सत्तेतून बाहेर होते. पण त्यातही देवेगौडा व गुजराल सरकारला कॉंग्रेसचा पाठिंबा असताना शरद पवारांची त्यात मोठी भूमिका होतीच. शिवाय ते 1998 मध्ये वाजपेयींच्या 13 महिन्याच्या रालोआ सरकारच्या काळात विरोधी पक्ष नेता होतेच. 

पवारांनी 10 जून 1999 मध्ये कॉंग्रेस मधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला आणि चारच महिन्यात सत्तेच्या लोभापायी त्याच कॉंग्रेस सोबत युती करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. 

सत्तेशिवाय आपण राहूच शकत नाहीत हा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना ते सतत देत राहिले. याचा परिणाम इतकाच झाला की त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सत्तेशिवाय रहायचे कसे? पक्ष टिकवायचा कसा? याचे प्रशिक्षण मिळाले नाही. 2004 ते 2014 या काळात तर केंद्रात आणि राज्यातही पवारांचा पक्ष सत्तेत होता. नेमक्या याच काळात त्यांच्या पक्षाची जी काय व्हायची ती वाढ झाली (जास्तीत जास्त 71 आमदार व 9 खासदार) किंवा पक्ष टिकून राहिला. 

1978 ला पवारांनी कॉंग्रेस फोडली. 1991 ला छगन भूजबळांच्या नेतृत्वाखालील 13 आमदारांसह शिवसेना फोडली, बबनराव पाचपुतेंच्या नेतृत्वाखाली 9 आमदारांसह जनता दल फोडला. या सगळ्यांना कॉंग्रेसच्या मांडवाखाली आणून सत्तेचा टिळा लावला. जर पवारांनी आपल्याच कार्यकर्त्यांना सत्तेची चटक लावली असेल, दुसर्‍या पक्षातून माणसे आणून उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोचवली असतील तर आता त्यांच्या पक्षातील लोक त्याच कारणासाठी राष्ट्रवादी सोडत असतील तर दोष कुणाला देणार? 

सत्ता नसताना केंद्रात अथवा राज्यातला भाजपचा छोटा मोठा एकही नेता 2004 ते 2014 या काळात फुटला नाही. मग 2014 मध्ये सत्ता जाताच राष्ट्रवादीचे नेते सैरभैर होवून सत्ता का सोडत आहेत? या प्रश्‍नाचे उत्तर अजीत पवार/ शरद पवार/ सुप्रिया सुळे देवू शकतात का?

पवारांच्या समर्थकांची सत्तालालसा इतकी होती की 1995 ला महाराष्ट्रात युतीचे सरकार आले तेंव्हा त्याला पाठिंबा देणार्‍यांत जे अपक्ष आमदार होते त्यात बहुतांश पवारांचेच शिष्योत्तम होते. ज्यांनी पुढे चालून राष्ट्रवादीत प्रवेश करून आपल्या पवारनिष्ठेचा म्हणजेच सत्तानिष्ठेचा पुरावाच दिला. 

रस्त्यावर उतरून संघर्ष करायचा असतो, लोकांच्या प्रश्‍नांसाठी लढे उभारायचे असतात हे पूर्णत: विसरूनच राष्ट्रवादी पक्षाची सत्ताकेंद्रि बांधणी करण्यात आली. सत्तेच्या लाभाने पक्षाभोवती जे कुणी गोळा झाले त्यांनाच कार्यकर्ते संबोधल्या गेले. या कार्यकर्त्यांनी सत्तेच्या आश्रयाने आप आपली साम्राज्ये उभी केली. शिक्षण, उद्योग, वृत्तपत्रादी माध्यमे, कला-सांस्कृतिक क्षेत्र या सगळ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तेच्या आश्रयाने शिरकाव केला. स्वतंत्रपणे निरपेक्ष वृत्तीने सरकारी मदतीशिवाय सत्तेशिवाय काम करणार्‍या व्यक्ती आणि संस्थांची जी कार्यशैली असते तशी कधीच शरद पवारांच्या कार्यकर्त्यांची राहिली नाही. या सगळ्यांच्या निष्ठा शरद पवारांवर केवळ ते सत्ता प्राप्त करून देवू शकतात म्हणून होत्या. जेंव्हा सत्ता मिळत नाही हे स्पष्ट झाले तस तसे हे कार्यकर्ते दूरावायला सुरवात झाली.

प्रत्यक्ष पक्षातले कार्यकर्ते असे सत्तेसाठी दूर जात असताना अजून एका मोठ्या अडचणीला शरद पवारांना तोंड द्यावे लागत आहे. जनता पक्षाच्या पाठिंब्यावर पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेंव्हापासून महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीच्या गळ्यातले ते ताईत बनले होते. हे पुरोगामी कार्यकर्ते विविध सहकारी संस्था, कामगार संघटना, ऍटो रिक्शा चालक संघटना,  मोलकरणींच्या संघटना, अंधश्रद्धा निर्मुलन, पर्यावरण, धरणग्रस्त, दलित-आदिवासी-भटके- विमुक्त यांच्यासाठी काम करणार्‍या चळवळी चालवायचे. यांचा आधार शरद पवारच होते.

म्हणजे एक मोठा विरोधाभास 1978 ते 2014 पर्यंत महाराष्ट्राने बघितला. एकीकडून गावात अत्याचार करणारा बलदंड असा उच्च जातीचा नेता पवारांच्या पक्षाचा प्रमुख असायचा आणि त्याच गावात ज्याच्यावर अत्याचार होतो त्या दलित ग्रामीण बहुजन आदिवासी भटके विमुक्त यांच्या संघटनांनाही परत पवारांचाच आशिर्वाद असायचा. व्यवस्थेविरोधात कलाकार लेखक विचारवंत हे जोरदार आवाज उठवायचे. त्यांच्या संस्थांना पवारांचेच आशिर्वाद असायचे. आणि हे ज्यांच्या विरोधात आवाज उठवायचे ते परत पवारांच्याच सत्ताधारी पक्षाचे नेते असायचे. 

समाजवादी चळवळीतील कित्येकांनी सक्रिय राजकारणातून सक्तिच्या निवृत्तीनंतर विविध सामाजिक संघटना संस्था सुरू केल्या. या सगळ्यांना पवारांचा आधार असायचा.

आता पवारांच्या हातून सत्ता गेल्यानंतर ही सगळी पुरोगामी मंडळीही अस्वस्थ झाली आहे. हे तर पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते नव्हते. पण यांच्या हातात पवारांच्या आधाराने स्वतंत्र अशी वेगळी वैचारिक सांस्कृतिक कलाविषयक सत्ता होती. महाराष्ट्रातील 2014 पर्यंतचे साहित्य संस्कृती कला क्षेत्रातील पुरस्कार कुणाला मिळाले याची यादी तपासा म्हणजे सहजपणे लक्षात येईल. किमान 10 अखिल भारतीय साहित्य संमेलने आणि 50 विभागीय साहित्य संमेलने यांचे उद्घाटक शरद पवारच होते आणि त्या संमेलनांचे स्वागताध्यक्ष राष्ट्रवादीचेच नेते होते यातच सर्व काही आले. 

2014 पुर्वी संघ प्रणीत सामाजीक समरसता मंचाच्या व्यासपीठावर गेले म्हणून गंगाधर पानतावणें सारख्या दलित विचारवंतावर पुरोगाम्यांचा बहिष्कार सहन करायची पाळी आली. विनय हर्डिकरांसारख्या लेखकाला संघ पार्श्वभूमीमुळे अकादमी पुरस्कार नाकारण्यात याच पवारनिष्ठ गटाचा दबाव होता.  आज अशी परिस्थिती शिल्लक राहिली नाही. राजकीय लेकांची पक्षांतरे उठून दिसतात पण लेखक कलावंत विचारवंत पत्रकार यांनी हळूच ‘विचारांतर’ करून घेतले आहे, संघ प्रणीत व्यासपीठांवर जायला सुरवात केली आहे हे लवकर लक्षात येत नाही.

पवारांची आयुष्यभर फोडाफोडीचे राजकारण केले. ते पाप त्यांच्याच पक्षाला आता भोवत आहे. सत्ताकेंद्रि पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही, सत्तालोलुप कार्यकर्ता सत्तेशिवाय टिकू शकत नाही हे राष्ट्रवादीच्या सामुहीक पक्षांतरांतून दिसून येते आहे.     

श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

No comments:

Post a Comment