संबळ, अक्षरमैफल, ऑगस्ट 2019
कालिदासाच्या स्मृतीत आषाढाचा पहिला दिवस ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ साजरा केला जातो. कालिदासाच्या सर्वात लोकप्रिय ‘मेघदूता’तील दुसर्या श्लोकातच हा आषाढाच्या पहिल्या दिवसाचा उल्लेख आहे. कालिदासाचे नाटक ‘शाकुंतल’ हे जास्त चर्चिले गेले. काव्यामध्ये मेघदूता खेरीज ’रघुवंश’ व ‘कुमारसंभव’ ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. कालिदासाच्या एकूण उपलब्ध 7 रचनांपैकी ऋतुसंहार व विक्रमौर्वशीय या दोन काहीशा उपेक्षीत आहेत.
3 जूलै हा दिवस या वर्षी आषाढाचा पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने औरंगाबाद येथे धनंजय बोरकर यांचे कालिदासाच्या ऋतुसंहार काव्यावर एक व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.
धनंजय बोरकर यांनी कालिदासाच्या ‘ऋतुसंहार’चा मराठीत भावानुवाद केला आहे. या भावानुवादाच्या दोन आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.
बोरकर हे अभियंता असून भारतीय संरक्षण खात्यात त्यांची अधिकारी म्हणून काम केले आहे. एअर इंडिया मुंबई आणि सिंगापुर एअरलाईन्स येथेही त्यांनी काम केले आहे. निवृत्तीनंतर बोरकरांनी संस्कृतच्या ध्यासातून संस्कृत काव्याचा अभ्यास करायला सुरवात केली. जयदेवाच्या ‘गीत गोविंद’चे त्यांचे भाषांतरही नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
सहा ऋतूंचे सहा सर्ग अशी मांडणी ‘ऋतुसंहार’ या खंडकाव्याची आहे. या काव्याची सुरवात वसंताने न होता ग्रीष्माने होते. कदाचित कालिदास मूळचा काश्मिरी असल्याने ग्रीष्मापासून सुरवात केल्याचा उल्लेख बोरकरांनी प्रस्तावनेत केला आहे. चार वेदांत अथर्ववेदाच्या सहाव्या कांडात ग्रीष्माचा उल्लेख पहिला ऋतू म्हणून येतो. अथर्ववेदाच्या एका शाखेचा उगम काश्मिरात आहे. त्यामुळे कालिदासही अशी मांडणी करत असावा. यापेक्षा दुसरा एक तर्क पटण्यासारखा आहे. कालिदासाच्या रचना या सुखांत आहेत. त्यामुळे सुरवात जर ग्रीष्मापाशी केली तर आपोआपच शेवट वसंतापाशी येतो. तेच जर सुरवात वसंतापाशी केली तर शेवट शिशीरात म्हणजेच पानगळीत होतो. हे कालिदासाच्या प्रकृतीला रूचणारे नाही.
मूळात कालिदासाला ऋतूवर्णनाची आवडच असल्याचे मिराशींसारख्या विद्वानांनी आपल्या अभ्यासातून मांडले आहे. कुमारसंभव-वसंत ऋतू, विक्रमोर्वशीय-वर्षा ऋतू, मेघदूत-वर्षा ऋतू, शाकुंतल-ग्रीष्म, आणि रघुवंशात जवळपास सर्वच ऋतूंची वर्णने आलेली आहेत.
‘ऋतुसंहार’ मध्ये ग्रीष्माच्या पहिल्या सर्गात 28 श्लोक आहेत. ‘प्रचंडसूर्य: स्पृहणीयचंद्रमा:’ या पहिल्याच श्लोकाचे बोरकरांनी अतिशय सुलभ असे भावांतर केले आहे
प्रखर सुर्य तापतो नी चंद्र वाटतो हवा
जलाशयहि आटले जलौघ ना दिसे नवा
दिवस तप्त करत स्नान मदनही विसावला
जनावनास तापवीत ग्रीष्म आज पातला॥
विरोधी प्रतिमा वापरण्याची कालिदासाची शैली या अगदी पहिल्या श्लोकापासूनच दिसून येते.कालिदासाचे हे पहिले काव्य समजले जाते. ग्रीष्मात सूर्य प्रखर असा तळपत आहे आणि त्या सोबतच याच ऋतूत रात्री शीतल असा चंद्र अनुभवावयास येतो आहे. जितका दिवस तापलेला तितकी चंद्रप्रकाशात न्हालेली रात्र शीतल आहे.
भावानुवादात बोरकरांनी काही ठिकाणी मुळ संस्कृत शब्द तसेच ठेवूनही त्याला मराठी बाज चढवला आहे. कारंज्यासाठी कालिदासाने ‘जलयंत्र’ हा जो संस्कृत शब्द योजला आहे त्याचा तसाच वापर बोरकर करतात. त्याने मुळचे सौेदर्य कायम राहते.
होत मुदित कौमुदीत सैर रात्र उजळता
शैत्य मिळतसे तनूस जलयंत्री खेळता।
अशी छान रचना ते करून जातात.
बोरकरांनी भावानुवाद करताना साध्या शब्दांसोबतच शब्दरचनाही मराठी वळणाची सोपी ठेवली आहे. संस्कृत शब्दरचना कोड्यासारखी उलगडत जाणारी असते. तशी शैली मराठीत कामाची नाही.
ग्रीष्मातीलच एक वर्णन असे आहे की प्रचंड असा उष्मा जाणवत आहे. तहानेने सर्व जीवजंतू व्याकूळ झाले आहेत. एरव्ही एकमेकांच्या जीवावर उठलेले प्राणीही जलाशयी मात्र सोबतच तहान भागवत आहेत. असे अद्भूत चित्र एरव्ही कधी पहायला मिळत नाही. मूळच्या ग्रीष्म सर्गातील 27 व्या श्लोकाचे मराठी रूपांतर बोरकरानी सुबोध मराठीत केले आहे
वणवा देई चटके झाले पशू जणू मित्र
वैर त्यागुनी गवे सिंह अन कुंजर एकत्र ।
घरे सोडूनी निघती सारे अतीव खेदाने
उतारावरी वाट पुळणिची नव्या उमेदीने ॥
पहिल्या सर्गाचा शेवट करताना ग्रीष्म्याचा दाह सह्य होण्यासाठी रात्री चांदण्यात गीत संगीताची मैफल जलयंत्रांभोवती बसून रसिकांनी रंगवली आहे अशी शब्दकळा कालिदासाने योजली आहे. कालिदासाच्या ओळी आहेत, ‘सुख सलिलनिषेक: सेव्यचन्द्रांशुजाल:’ याचे भावांतर बोरकर सहजपणे ‘उडो फवारे सुखद जलाचे शुभ्र चांदण्यात’ असे करतात.
दुसरा सर्ग वर्षा ऋतूचा आहे. वर्षाऋतू मनाला भावणारा आहे. एखाद्या राजाप्रमाणे त्याची स्वारी कशी वाजत गाजत येते आहे. स्त्रीयांनी भरलेले घडे राजासमोर रिते करावेत, शृंगारलेल्या हत्तींचे पथक पुढे चालले आहे, चौघडे वाजत आहेत
कृष्णमेघ संपृक्त जाहले भरले जेवी घडे
पथक चालले मत्त गजांचे शोभायात्रेपुढे
वीज कडाडुनि मेघामधुनी वाजतात चौघडे
वर्षाऋतुची राजसवारी रसिकमना आवडे ॥
बोरकरांची ही रचनेची साधी शैली पाहिली की ही मुळची मराठीच कविता आहे की काय अशी शंका येत राहते. पण हे करत असताना कालिदासाच्या मूळ कवितेतील भावाला कुठेही धक्का पोचत नाही हे महत्त्वाचे आहे.
अप्रतिम कल्पना विस्तार, उपमा, शब्दसौंदर्य यांच्या बाबतीत कालिदासाचा हात धरणारे कुणी नाही याचा प्रत्यय या पहिल्या साहित्यकृतीतही आढळते. याच ‘ऋतूसंहार’ मध्ये वर्षा ऋतूच्या सर्गात 14 व्या क्रमांकाच्या श्लोकात कमळे नसल्याने भूंगे काय करावे हे न सुचून भ्रमित झाले आहेत. अशा भूंग्यांसाठी जे वर्णंन कालिदास करतो त्याचा तोय प्रत्यय बोरकरांच्या भावानुवादातही येतो.
पाठ फिरवुनी मधुप पळाले नसताना कमळे
कर्णमधुर जे करीत होते गुंजारव सगळे
पिसे फुलवुनी नर्तन चाले मयुरांचे दंग
निळ्या पंकजी आशा, वेडा झेपावे भृंग ॥
कमळे न आढळल्याने मोराच्या पिसार्यावरच भुंगे भाळले आहेत हे मूळ कालिदासाचे वर्णन मराठीत वाचतानाही प्रभावी वाटते. त्याचा आनंद रसिकांना त्याच तीव्रतेनं घेता येतो.
या वर्षा ऋतूच्या सर्गात 28 श्लोक आहेत. पुढचा सर्ग अर्थातच शरद ऋतूचा आहे. शरदातील पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या कोजागिरीच्या चांदण रातीसाठी एक सुंदर उपमा कालिदासाने वापरली आहे. उदा. म्हणून तेवढी एकच इथे नोंदवतो. विस्तारभयास्तव सगळी वर्णनं देणं शक्य नाही. धरती आणि आकाश दोन्हीकडे एक समृद्धीची सायच जणू पसरली आहे. तळ्यात पाणी आहे, त्यात राजहंस विहरत आहे. तसाच नभात कोजागिरीचा चंद्र विहरत आहे.
दिव्य रूप ते आकाशीचे धरतीचे साजिरे
कमळे फुलली स्फटिकजली अन् निरभ्रव्योमी हिरे
सलिली जेवी मार्ग काढितो राजहंस लिलया
पसरित आभा सखा निशेचा साथ देतसे तया ॥
कालिदासाचा मूळ स्वभाव शृंगाराचाच आहे. त्याला निसर्गाकडे पाहून स्त्रीया आणि स्त्रीकडे पाहून निसर्गच आठवत राहतो. शरद ऋतूच्या सर्गाचा शेवट करताना त्याने जे स्त्रीयांचे वर्णन शरदाच्या माध्यमातून केले आहे त्यातून ही वृत्ती ठळकपणे समोर येते. ही सगळी वर्णनं शालिनतेने येतात. त्यात कुठेही उन्मादकता अश्लिलता असे काही आढळून येत नाही. शरदाच्या सौम्य प्रकृतीसारखीच ही वर्णनंही आहेत.
विकसित कमलापरी नेत्र अन् नेत्र निळी कमळे
हरित तृणाच्या शुभ्र फुलाचे वस्त्र असे आगळे
कुमुदफुलापरी मोहक कांती मादक रूपमती
शारद वनिता फुलवो जीवनी तुमच्या बहुप्रीती ॥
या तिसर्या सर्गात 26 श्लोक आहेत. ( शरदातील कमळासाठी खास कुमुद शब्द वापरला आहे. ज्याचा अर्थ शुभ्र कमळ असा होतो. पुढे वसंतातील कमळासाठी पद्म असा शब्द आहे. ज्याचा अर्थ लाल कमळ असा होतो.)
चौथा सर्ग हेमंताचा आहे. या सर्गात तशा काही विशेष अशा रचना नाहीत. पण एक श्लोक मोठा विलक्षण आहे. कर्नाटकातील बेलूर मंदिरावर दर्पण सुंदरीचे एक अप्रतिम असे शिल्प आहे. या शिल्पाला आधार असा संस्कृत साहित्यातील हा श्लोक असावा. हा शृंगार नेमका हेमंत ऋतूतील आहे हे पण विशेष. अन्यथा शृंगारासाठी वसंत किंवा वर्षा किंवा फार तर शरद ऋतूची निवड कालिदासाने केली असती. पण आपल्याकडे बोलीत एक म्हण आहे, ‘उन्हाळा जोगी, पावसाळा रोगी आणि हिवाळा भोगी’. त्या अनुषंगाने या दर्पण संुंदरीचे वर्णन करण्यासाठी हेमंत ऋतूच योग्य आहे. कालिदासाने हे हेरून हा श्लोक नेमका याच ऋतूत रचला आहे.
घेत तनुवरी ऊन कोवळे पसरे जे भूवरी
मुखकमला सजविण्या सुंदरी दर्पण घेई करी
पाही अधरी निरखुन आपुल्या जेवी दंतव्रणा
अधरामृत प्राशिता ठेवि तो प्रियकर मागे खुणा ॥
या सर्गातील श्लोक आधीच्या तिन्हीपेक्षा कमी आहेत. या सर्गात 18 श्लोक आहेत.
पाचवा सर्ग शिशिराचा आहे. पानगळीचा हा ऋतू कालिदासाला फारसा भावलेला दिसत नाही. कुठलीही विशेष अशी वर्णनं यात आलेली नाहीत. कालिदास काश्मिर भागातील होता हे पटणारी काही वर्णनं या सर्गात आलेली आहेत. विशेषत: हिमवर्षावाचा अनुभव हिमाचल, काश्मिर भागात येतो तसा इतरत्र येत नाही. हिमांकित थंड रात्रीची वर्णनं कालिदासाने यात केलेली आहेत.
हिमाच्या झोतांनी अधिकच हवा थंड बनली
तया इन्दूकिरणे झिरपून जणू धार चढली
नभीचे न दिसती पुंज जसे धुरकट नयना
अशा रात्री तेणे गमती सुखदा आज न जना ॥
शिशिरात येणारी संक्रांत हा एक मोठा सण मानला जातो. याचे वर्णन शेवटच्या श्लोकात एका ओळीत आलेले आहे.
’उदंड झाल्या गुळ रेवड्या, रस, साळी, शर्करा
उत्कट रतिरंगाने येई पंचशरा तोरा ।
बाकी या सर्गात फारशी इतर वर्णनं नाहीत. या सर्गात एकूण 16 इतके कमी श्लोक आहेत.
सहावा आणि शेवटचा सर्ग ऋतूराज वसंताचा आहे. वसंत म्हणजे शृंगार रसाची मनापासून आवड असणार्या कालिदासासाठी ‘होमपीच’ आहे. या ऋतूत मदन जणू योद्धा बनून हे कामयुद्ध जिंकण्यास निघालेला आहे अशी वर्णनं कालिदासाने केली आहेत. आंब्याचे झाड या ऋतूचे प्रतिक म्हणून समोर येते. एक तर जो डेरेदारपणा आंब्याला आहे तो इतर कुठल्याच झाडाला नाही. त्यामुळे त्याच्या पायथ्याशी घनदाट सावली मिळते. हा जो आकार आंब्याला प्राप्त झालेला आहे तसा डौल इतर कुठल्याच झाडाला नाही. दुसरं म्हणजे अंब्याच्या मोहराचा धुंद करणारा गंध. कोकिळेला त्यामुळे फुटलेला कंठ. कैरी आणि पुढे चालून पिकलेला रसाळ अंबा. म्हणजे रस रंग गंध या सगळ्याचा सर्वोत्कृष्ट अविष्कार इथे प्रत्ययाला येतो. शिवाय नेत्राला सुखद, कोकिळेच्या मधुर आवाजाने कानाला सुखद असा अनुभव देणारा एकमेव वृक्ष म्हणजे आम्रवृक्ष. साहजिकच त्याचे वर्णन करताना कालिदासाच्या प्रतिभेला नवे नवे कोंब न फुटले तरच नवल. वसंताच्या सर्गातील पहिलाच श्लोक याच आम्रवृक्षावर आहे.
आम्रतरूचे नूतन पल्लव बाण तीक्ष्ण साचा
रूंजी घाली माळ भ्रामरी धनुची प्रत्यंचा
हाती घेऊन पहा पातला योद्धा ऋतुराज
मना जिंकण्या प्रणयिजनांच्या चढवितसे साज ॥
काही ठिकाणी अनुवाद करताना बोरकरांना भाषेची आणि वृत्तीचीही अडचण झालेली जाणवते. संस्कृत साहित्यात शृंगार जसा सहज येतो तसा तो मराठीत येत नाही. वसंत ऋतूचे वर्णन करताना कालिदासाने जी अप्रतिम ओळ लिहून ठेवली आहे
द्रुमा: सपुष्प सलिलं सपद्मम् । स्त्रिया: सकाम: पवन: सुगन्धि: ॥
या ओळीचे भाषांतर करताना स्त्रिया: सकाम: पाशी बोरकर अडतात. हे मराठीत आणताना
पानोपानी फुले डंवरली जलीजली कमळे
मुक्त खेळता वायुसंगे सुगंधही दरवळे
इथपर्यंतच येवून ते थांबतात. ही अडचण केवळ बोरकरांची नसून मराठी माणसाच्या वृत्तीचीही येत असणार. कारण याचे मराठीत योग्य भाषांतर होत नाही. दूसरी एक अडचण संस्कृत संकेत व्यवस्थेचीही असणार. सलील म्हणजे पाणी इतकेच अपेक्षीत नाही. तिथे तळे सरोवर पाणसाठा असे खुप पैलू आहेत. यासाठी बोरकरांनी शोधलेला मार्ग बरोबर आहे. ‘जलीजली कमळे’ म्हणून ते चांगली योजना करतात. संस्कृत मध्ये पद्म, पंकज, अंबुज, कुमुद, कुवलय ही सगळी कमळासाठीचीच नावे आहेत. पण यात सुक्ष्म अर्थभेद आहेत. (उदा. कुमुद म्हणजे पांढरे कमळ. पद्म म्हणजे लाल कमळ. कुवलय म्हणजे नीळे कमळ). इथे सलिलं सपद्मम् असं कालिदास म्हणतो तेंव्हा त्याला लाल कमळ असे तर अपेक्षीत आहेच पण सोबतच पद्मचा अजून एक अर्थ आहे. तो म्हणजे चंचल असे कमळ. ही चंचलता वसंतातच शोभून दिसते. शरदातील कमळाला कुमुद (मागे उल्लेख आला आहे) म्हणत असतानाच त्याचा कदाचित दुसरा अर्थ शांत कमळ म्हणजेच चंचल नसलेले असा पण असे शकतो. तज्ज्ञांनी शोध घ्यावा.
वसंत म्हणजे रंगाची उधळण. या ऋतूत मोठी झाडे फुलांनी नटलेली असतात. त्यामुळे ‘द्रुमा: सपुष्प’ असा शब्द कालिदास वापरतो.
वसंताच्या सर्गात 27 श्लोक आहेत. शेवटच्या श्लोकात हा राजाधिराज कसा शोभतो असे वर्णन परत आले आहे. जसे शरदातील पौर्णिमा महत्त्वाची तशीच नेमकी तिच्यापासून सहा महिन्यांच्या अंतरावर असलेली वसंतातील पौर्णिमा (होळी पौर्णिमा) पण सुंदर आणि महत्त्वाची आहे. या वसंत ऋतूराजाचे वर्णन बोरकरांनी खुप प्रत्ययकारी पद्धतीनं मराठीत आणलं आहे
आम्रमंजिरी बाण जयाचे पलाश होई धनू
भृंगमालिका प्रत्यंंचा अन् मलयानिल वाहनु ।
पूर्णचंद्रमा छत्र जया दे कोकिळ ललकारी
तो ऋतुराजा जीवन तुम्हा देवो हितकारी ॥
पुस्तकाच्या शेवटी बोरकरांनी कालिदासाच्या या काव्यात ज्या ज्या फुलांचे वृक्षांचे संदर्भ आले आहेत त्यांची यादी दिली आहे. सोबतच त्यांची इंग्रजी व मराठी नावे पण दिली आहेत. प्राजक्ताला संस्कृतमध्ये शेफालिका म्हणतात, जाई म्हणजे मल्लिका, कोरांटीला कुरबक म्हणतात अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी नोंदली आहे.
ऋतुसंहारच्या प्रस्तावनेत कालिदासाबाबत माहितीही बोरकरांनी दिलेली आहे. त्यासाठी वापरलेले संदर्भग्रंथ कोणकोणते आहेत त्याचीही यादी पुस्तकाच्या परिशिष्टात जोडली आहे. वा.वि. मिराशींचे ‘कालिदास’ हे पुस्तक तसेही मराठी वाचकांना कालिदास प्रेमींना परिचित आहेच.
अजिभात संस्कृत वाङ्मय मराठीत आणताना आपल्या परंपरेचा धागा जोडून दाखवण्याचे अतिशय महत्त्वाचे काम बोरकर करून जातात. ही बाब आज जास्त महत्त्वाची आहे. काव्याच्या सौंदर्यशास्त्राची ओळखही रसिकांना होते. आधुनिक काव्याच्या नावाखाली एक रूक्षताच जास्त करून पसरवली जाते. अशा काळात आपल्या वाङ्मय परंपरेतील सौंदर्यस्थळे परत रसिकांच्या नजरेखालून घालणे आवश्यक आहे.
संस्कृतच्या अभ्यासकांनी विविध संस्कृत साहित्याचे मराठी अनुवाद, त्याचा रसास्वाद, त्यावरच्या टीका, काव्याचे भावानुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिले पाहिजेत. त्याची आज गरज आहे. धनंजय बोरकरांनी हे महत्त्वाचे काम केले. इतरही संस्कृत काव्यांबाबत ते काम करत आहेत. ही मराठीसाठी फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी बोरकरांनी एक रसिक म्हणून लाख लाख धन्यवाद !
श्रीकांत उमरीकर जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
No comments:
Post a Comment