सा.विवेक, जानेवारी 2019
जालना जिल्ह्यातील अंबड हे गांव केवळ मत्सोदरी देवीच्या नावानेच ओळखले जाते असे नसून हे एक प्रागैतिहासिक स्थळ आहे. भारतातील जांबूवंताचे एकमेव मंदिर, जवळच जामखेडला खडकेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, प्रत्यक्ष अंबड नगरीत देवीच्या मंदिरासोबतच जेजूरीची प्रतिकृती असलेले खंडोबाचे अप्रतिम असे मंदिर, पुष्करणी बारव आणि त्या बारवेतील महादेव मंदिर अशा ऐतिहासिक पौराणिक स्थळांनी नटलेले हे गांव. जांबुवंताच्या मंदिरात नारदाचे गायन गर्व हरण झाल्याचा पुराणात उल्लेख आहे. अहिल्याबाईंनी या शहरातील मंदिरांचा जिर्णाद्धार केला. त्यांच्या या महान कार्याची आठवण ठेवून अहिल्याबाईंचा पुतळा मत्सोदरी देवीच्या पायर्यांजवळ उभारला गेला आहे.
या परिसरातील पुरातन अशा खडकेश्वर महादेव मंदिरात वाद्य वाजविणार्या, गायन नर्तन करणार्या सुंदरींचे शिल्प आहे. त्यावरून या परिसरात संगीताची परंपरा आढळते.
95 वर्षांपूर्वी अंबड जवळ भणंग जळगांव इथे त्र्यंबक नारायण कुलकर्णी यांना त्यांच्या गुरूंनी दत्त जयंती निमित्ताने संगीत सेवा सुरू करण्याचा आदेश दिला. त्यांची आज्ञा प्रमाण माणून त्र्यं.ना.कुलकर्णी यांनी हे कार्य सुरू केले. त्र्यंबकरावांच्या पोटी गायनाचार्य गोविंदराव जळगांवकर यांचा जन्म झाला. त्यांच्या लहानपणापासून संगीताचे संस्कार झाले. हैदराबादचे प्रसिद्ध गायक वासुदेव नामपल्लीकर यांच्याकडून गांविंदरावांना आग्रा घराण्याच्या गाण्याचा वारसा मिळाला. गाविंदरावांनी पुढे अंबड शहरात वास्तव्यास आल्यावर दत्त जयंती संगीत महोत्सव अंबडला सुरू केला. तेंव्हा पासून ते आजतागायत अंबड शहरात अखंडपणे ही गायन चळवळ चालू आहे.
चार वर्षांपूर्वी पं. गोविंदराव जळगांवकरांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य असे सभागृह अंबड नगर पालिकेने उभारले आहे. त्यांचा सुंदर असा अर्धाकृती पुतळा सभागृहाच्या दर्शनी भागात उभारण्यात आला आहे. एखाद्या गायकाच्या नावाने ग्रामीण भागात भव्य सभागृह असणे आणि अखंडपणे त्याची आठवण संगीत महोत्सवातून जतन केली जाणे हे दुर्मिळ उदाहरण आहे. आज घडीला अंबड इतकी जूनी परंपरा असलेला संगीत महोत्सव दूसरा नाही. मोठ्या शहरांमधून आता नव्याने भव्य असे संगीत सोहळे आयोजीत केले जात आहेत. त्या सोहळ्यांमध्ये भरपूर चमकधमक पहायला मिळते. अशा महोत्सवांना प्रसिद्धीही भरपूर मिळते. कलाकारांची सोय उत्तमरित्या केली जाते.
अंबड सारख्या गावात दत्त जयंती संगीत महोत्सवाची स्थिती मात्र वेगळी आहे. हा शुद्ध शास्त्रीय संगीताचाच महोत्सव आहे. इथे फ्युजनच्या नावाखाली चाललेली भेसळ सहन केली जात नाही. रात्रभर उशीरापर्यंत श्रोते शास्त्रीय संगीत ऐकत बसतात हा अतिशय दूर्मिळ अनुभव असल्याचे इथे आलेले गायक नेहमीच सांगतात. आयोजनात साधेपणा आणि अगत्य आढळून येते.
दत्त जयंती संगीत महोत्सव गोविंदराव जळगांवकरांच्या माघारी त्यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आला आहे. 1998 ला त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांनी स्थानिक कार्यकर्ते, मराठवाड्यातील कलाप्रेमी रसिक आणि कलाकार यांच्या सहकार्याने गेली वीस वर्षे सातत्याने ही चळवळ चालवलेली आहे.
या वर्षी 22,23 डिसेंबरला हा संगीत महोत्सव संपन्न झाला. निरंजन भालेराव या तरूण बांसरी वादकाने महोत्सवाची सुरवात केली. ‘यमन’ नंतर त्यानं सादर केलेल्या पहाडी धूनला रसिकांनी उत्स्फुर्त अशी दाद दिली. तरूण कलाकारांना हे व्यासपीठ त्यांच्या भविष्यातील वाटचालीासाठी शुभ अशिर्वाद वाटत आले आहे. चिकित्सक रसिकांची नेमकी दाद पाहून कलाकारही आनंदित होत होते. पं. गिरीश गोसावी यांना तंतूवाद्यांवर जास्तकरून साद होणारा किरवाणी सादर करण्याची उर्मी या चिकित्सक रसिकांमुळेच मिळाली. पिकलेलं रसाळ फळ असावं असा गिरीश गोसावींचा किरवाणी वाटत होता.
या मंचावर लोकप्रिय रागांसोबतच अनवट राग सादर झाले आणि त्याला रसिकांनी दाद दिली हे महत्त्वाचे. पं. राजेंद्र कंदलगांवर यांनी सदाबहार दरबारी कानडा रंगवल्यानंतर पं. हेमंत पेंडसे यांनी ‘धनकोनी कल्याण’ सारखा अनवट राग मुद्दाम निवडला. मराठवाड्याचे महान गायक पं. सी.आर.व्यास यांनी या रागाची रचना केली आहे. आणि हा राग याच मराठवाड्याच्या भूमित सादर झाला याचे समाधान पं. हेमंत पेंडसे यांनी व्यक्त केले.
या संगीत महोत्सवासाठी पं. विश्वनाथ दाशरथे यांच्या सारखा गायक कला सादर करतो या पेक्षाही संगीत संयोजनाची जबाबदारी स्वीकारतो, आपल्या आठ दहा तरूण शिष्यांना घेवून तिथे दोन दिवस मुक्काम ठोकून राहतो, या निमित्ताने अंबड शहरात संगीत शिक्षणाचा उपक्रम सुरू करतो हे जास्त महत्त्वाचे आहे. शांतीभुषण चारठाणकर सारखा हार्मोनियम वादक संगीतकार हा महोत्सव म्हणजे आपल्या घरचेच कार्य असल्यासारखे समजून नियोजनात सहभागी होतो ही वृत्ती महत्त्वाची आहे.
स्व. गोविंदराव यांच्या घरात आजही त्यांनी गोळा केलेली वाद्यं आहेत. या जून्या दूर्मिळ वाद्यांसाठी एक चांगले संग्रहालय अंबड शहरात करण्याची गरज आहे. संगीत महोत्सवा निमित्त शहरात दोन दिवस मुक्काम होता तेंव्हा आम्हाला असे आढळले की या ठिकाणी अतिशय पोषक असे वातावरण आहे. एक चांगले संग्रहालय होवू शकते. पं. गोविंदराव जळगांवकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ संगीत विद्यालयाची सुरवात पं. विश्वनाथ दाशरथे यांनी केलेली आहेच.
शहरात आज तरूण पिढी शास्त्रीय संगीताकडे फिरकत नाही म्हणून तक्रार केली जाते. अशा स्थिती असताना अंबड सारख्या ठिकाणी शास्त्रीय संगीतासाठी जमा झालेल्या गर्दीत अर्ध्याच्यापेक्षा जास्त संख्या तरूणांची असते हे चित्र खुप आशादायी आहे. याच तरूणांचा प्रतिनिधी म्हणून निरंजन भालेराव (बांसरी), शाश्वती चव्हाण (गायन) आदित्य देशमुख (तबला सोलो) कलाकारांनी आपली कला महोत्सवात सादर केली. पं. गिरीश गोसावी, पं. हेमंत पेंडसे सारखे ज्येष्ठ अनवट वेगळे राग सादर करून या तरूणां समोर एक आदर्श उदाहरण घालून देत होते. हे चित्र संगीत क्षेत्रासाठी उर्जा देणारे आहे.
गोविंदराव जळगांवकरांच्या घराण्यात त्यांचे चिरंजीव धनंजय जळगांवकर हे उत्तम तबला वादक आहेत. या महोत्सवात गोविंदरावांच्या घरी परंपरागत किर्तनही सादर झाले. अगदी काल्याचे किर्तन झाल्यानंतरच मुख्य संगीत महोत्सवाला सभागृहात सुरवात झाली. परंपरा आणि नवता यांचा मेळ अतिशय चांगल्या पद्धतीनं घातला गेला. या महोत्सवाचे समन्वय करणार्या महेश वाघमारेंसारखे कार्यकर्ते प्रत्येक गावात तयार झाले पाहिजेत.
आज सगळी चळवळ ही शहर केंद्री बनलेली आहे. पण शहरी वातावरण हे कलेला फारसे पोषक नाही. केवळ व्यवहारीक पातळीवर तेथे प्रायोजक मिळतात, आर्थिक उलाढाल मोठी होते, आकाशवाणी दूरदर्शन सारखी माध्यमे असतात, धनिक रसिक तेथे आहेत म्हणून शास्त्रीय संगीत शहरात फोफावलेले आहे असे भासते. प्रत्यक्षात छोट्या गावांमधून कलाकार अपरिहार्यपणे शहरात स्थलांतर करतो. त्याच्या व्यवहारिक अडचणींसाठी त्याला शहरात रहावे लागते. अन्यथा कलाकार म्हणून त्याला समाधान देणार्या मैफिलींचे आयोजन शहरात क्वचितच होते. अगदी मोठ्या महोत्सवात तर रसिकांचा चेहराही कलाकाराला दिसू शकत नाही अशी व्यवस्था केलेली असते. अशा झगमगाटात शास्त्रीय संगीताचा जीव घुसमटतो. हे संगीत अतिशय वेगळे आहे. याला ‘रॉक’ पद्धतीचे आयोजन सोसत नाही. याची हाताळणी करण्यासाठी वेगळी दृष्टी आयोजकांनी बाळगायला हवी.
अंबड सारखी महाराष्ट्रात किमान 50 छोटी गावे अशी आहेत जिथे हे शास्त्रीय संगीत चांगले फुलू फळू शकते. अंबड सोबतच आता सेलू येथे ज्येष्ठ गायक संगीतरत्न हरीभाऊ चारठाणकर यांच्या स्मृतीत संगीत सोहळा होत आहे. अशापद्धतीनं महाराष्ट्रातील छोटी गावं निवडून तिथे संगीत महोत्सव भरविण्याचे काम सुरू झाले तर ती एक मोठी संगीत चळवळ ठरेल. मराठवाड्यात सेलू, किनवट, वसमत, माजलगांव, उमरगा, अंबाजोगाई, उदगीर इथे असे संगीत महोत्सव नियमित स्वरूपात होवू शकतात. मराठवाड्यातील आणि बाहेरही अशी स्थळं निवडून प्रयत्न करण्याची गरज आहे.
छोट्या छोट्या गावांमध्ये महाराष्ट्रभर संगीत परंपरा रूजलेल्या आहेत. या परंपरा मंदिरंमध्ये किर्तनाच्या निमित्ताने जतन केल्या जातात. आजही मंदिरांमध्ये पखवाज वाजवणारे हमखास आढळतात. पुजार्यांचे गळे चांगले असतात. एकादशी, दत्त जयंती, शिवरात्र, गुरूवारची पंचपदी, हरिनाम सप्ताह या निमित्ताने गायन परंपरा पुढे जात आहे हे आपण फारसे लक्षात घेत नाहीत. खरं तर याची जाणीव ठेवून संगीत चळवळीत काम करणार्यांनी असे विखुरलेले बिंदू जोडून भव्य अशी रांगोळी तयार केली पाहिजे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment