Monday, December 31, 2018

साहित्य संमेलनाने कात टाकायला हवी


संबळ, अक्षरमैफल, जानेवारी 2019

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणुक टाळून एक चांगला पाऊल साहित्य महामंडळाने उचलले आहेच. आता याचाच पुढचा भाग म्हणजे संमेलनाचे आयोजनही अतिशय वेगळ्य पद्धतीनं झाले पाहिजे.

1. ग्रंथ प्रदर्शन.
संमेलनाची सुरवात ग्रंथ दिंडीने होते. काही संमेलनात तर संमेलनाच्या एक दोन दिवस आधीच ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन करून सुरवात करण्यात आली होती. तेंव्हा ग्रंथ महोत्सव ही एक अतिशय वेगळी आणि महत्त्वाची बाब आहे हे जाणून त्याचे आयोजन करण्यात यायला हवे. 

खरे तर तीन दिवसांचे साहित्य संमेलन, एक दिवसाचे ग्रंथालय संघाचे राज्य अधिवशेन आणि एक दिवसाचे प्रकाशक परिषदेचे आयोजन असा किमान पाच दिवसांचा हा सोहळा झाला पाहिजे. एकत्रितपणे विचार केल्यास ‘माय मराठी सप्ताह’ असे याचे स्वरूप असायला हवे. एक याला जोडून सातही दिवस ग्रंथ महोत्सव आयोजीत करण्यात यावा. 

या ग्रंथ महोत्सव परिसरात पुस्तकांचे गाळे, पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी मंच, अभिवाचन असे नियोजन केले जावे. ग्रंथ प्रदर्शनात गाळे काय आणि कसे असावेत याबाबत सतत टिका होत राहते, सुचना येत राहतात. यातून मार्ग काढण्यासाठी साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाच्या नियोजनासाठी प्रकाशक, ग्रंथ विक्रेते आणि स्थानिक संयोजक यांची एक वेगळीच समिती असावी. त्यात महामंडळाचा प्रतिनिधी असावा. या ग्रंथ प्रदर्शनाचे नियोजन पूर्णत: वेगळे असावे. बहुतांश ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन उघड्यावर भरवले जाते. बंदिस्त मंडप घातला जात नाही. तसेच खाली मॅट नसल्या कारणाने धुळ उडत राहते व पुस्तके खराब होतात. यासाठी बंदिस्त मंडपात ग्रंथ प्रदर्शन भरवून रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था पुरवली जावी. नसता रात्री पुस्तकांच्या पाशीच झोपावे लागते. थंडीच्या दिवसात ग्रंथ प्रदर्शनवाल्यांचे मोठे हाल होतात. दिवसा ऊन आणि धुळीने पुस्तकांचे मोठे नुकसान होते. हे सगळे टाळता येईल. 

2. उद्घाटन सोहळा
हार तूरे स्वागताची औपचारिकता आणि राजकीय नेत्यांचा अनावश्यक सहभाग यांमुळे उद्घाटन सोहळ्यावर नेहमीच प्रचंड टीका होत आलेली आहे. हे सर्व टाळण्यासाठी शासकीय मदत घेत असल्या कारणाने शासनाचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री अथवा त्या खात्याचा मंत्री यांना प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रित केले जावे. इतर भारतीय भाषांतील एखादा मोठा साहित्यीक उद्घाटक म्हणून मंचावर असावा. या व्यतिरिक्त माजी संमेलनाध्यक्ष, संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष आणि महामंडळाचे अध्यक्ष इतक्याच खुर्च्या मांडल्या जाव्यात. या शिवाय कुणालाही मंचावर आमंत्रित करू नये. भाषणेही मोजक्याच लोकांची असावी. साहित्य संमेनाच्या अध्यक्षाने केवळ उत्स्फुर्त भाषण करावे. त्याचे लिखीत स्वरूपातील सविस्तर भाषण एका स्वतंत्र सत्रात ठेवावे. शिवाय त्या भाषणावर चर्चाही आयोजीत करावी. पण हे भाषण संपूर्ण लिखीत स्वरूपातील उद्घाटन सत्रात ठेवू नये. 

याच पद्धतीनं समारोप सोहळाही आटोपशीरपणे आखण्यात यावा. आयोजन समितीच्या वतीने सरचिटणीसांनी झालेल्या सर्व कार्यक्रमांचा थोडक्यात आढावा घ्यावा. महामंडळाच्या वतीने अध्यक्षांनी उद्घाटनाच्या सत्रात भाषण केले असल्याकारणाने मंडळाच्या सचिवांनी भूमिका मांडावी. महामंडळाचे ठराव हा निव्वळ उपचार ठरला आहे. तेंव्हा महामंडळाने ठरावाचे नाटक बंद करून आपल्या मागण्या शासनाकडे मोजक्या शब्दांत ठाशीवपणे मांडाव्यात. 

3. परिसंवाद 
संमेनात होणारे परिसंवाद कुणीच गांभिर्याने घेत नाहीत. ज्यांना विषय दिले आहेत ते लेखी स्वरूपात काहीच मांडत नाहीत. परिणामी चर्चा करावयाची असल्यास ते मुद्दे लिखीत स्वरूपात उपलब्ध नसतात. हा दोष दूर करण्यासाठी किमान सहा महिने आधीपासून वक्त्यांना त्यांचा विषय कळवून त्यासाठीचे भाषण लेखी स्वरूपात मागवले जावे.

यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कुणी असा आक्षेप नोंदवेल की संमेलन होणार की नाही, कुठे होणार हेच माहित नसते तर इतके नियोजन करणार कसे?

संमेनाचा निर्णय महामंडळाने किमान सहा महिने आधी घेणे बंधनकारक असावे. जेंव्हा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडला जात होता तेंव्हा महामंडळ किमान चार महिने आधीपासून नियोजन करतच आलेले आहे. तेंव्हा संमेलनाचे ठिकाण, संमेलनाचा अध्यक्ष, परिसंवादाचे विषय आणि त्यासाठीचे वक्ते हे सगळं सहा महिने आधी ठरवणे फारसे अवघड नाही. 

हे परिसंवाद भव्य व्यासपीठावर घेणे गरजेचे नाही. त्या त्या शहरातील महाविद्यालयांची निवड करून तिथे हे परिसंवाद घेतले जावेत. म्हणजे त्या त्या संस्थांही संमेलनाशी जोडल्या जातील. किंवा शहरातील उच्चमाध्यमिक शाळांची निवड यासाठी केली जावी. हे जर व्यवहार्य पातळीवर अशक्य वाटल्यास त्याच परिसरात छोटी व्यासपीठं निर्माण केली जावीत. भव्य अशा मुख्य मंचावर परिसंवादांचे आयोजन हास्यास्पद बनते कारण बर्‍याचवेळा समोर प्रेक्षकच नसतात. हजारो रिकाम्या खुर्च्यांशी संवाद साधणे वक्त्यांनाही त्रासदायक वाटते.

4. साहित्य विषयक सादरीकरणाचे कार्यक्रम (अभिवाचन, एकपात्री, साहित्यकृतींवरील विविध नाट्यप्रयोग)
साहित्य समाजाच्या विविध स्तरांवर पोचविण्यासाठी प्रत्यक्ष वाचनासोबत त्याला जोडून इतर विविध उपक्रम कल्पकपणे सादर केले जातात. याचा विशेष विचार केला गेला पाहिजे. ज्या लेखकाची जन्मशताब्दि असेल त्याच्या कवितांचे कथांचे अभिवाचन, त्याच्या गद्य मजकुरावर अधारीत नाट्यकृती, त्याच्या कवितांना चाली देवून संगीतमय  सादरीकरण, त्या कवितांवर नृत्य अशा विविध मार्गांनी साहित्याकडे सामान्य रसिकांना खेचण्यासाठी प्रयत्न केला जावू शकतो. असे प्रयोग वाचनाकडे एरव्ही न वळणार्‍याला खेचून घेवू शकतात. 

5. स्मृती चिन्हं, पुष्पगुच्छ यांना फाटा
संमेलनातील स्मृती चिन्हांबाबत तर आता सरकारी अध्यादेश काढावा अशीच वेळ आली आहे. संमेनाच्या अध्यक्षाला भव्य असे एखादे सुंदर स्मृतीचिन्ह देणे समजू शकते. पण सहभागी प्रत्येकाला, उद्घाटकाला स्मृती चिन्ह देण्याची काय गरज आहे? राजकीय नेते किंवा प्रस्थापित मोठे लेखक, मोठे कलाकार यांच्याकडे अशा विविध स्मृती चिन्हांचे डोंगर लागलेले असतात. त्यात परत नव्या स्मृती चिन्हांची भर कशाला?
ज्या मराठी पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे त्याच्या प्रती स्मृती चिन्ह व पुष्कगुच्छ म्हणून सहभागी सर्व साहित्यीकांना देण्यात याव्यात. भव्य मोठे पुष्पगुच्छ, शाली, श्रीफळ या सगळ्या अनावश्यक बाबींना तातडीने फाटा देणे आवश्यक आहे. 

6. प्रवासखर्च, मानधन, निवास व्यवस्था
साहित्य संमेलन हा एक मोठा सोहळा आहे. लेखकांची ही आषाढी एकादशी आहे. तेंव्हा ज्या प्रमाणे महाराष्ट्रभरातून वारकरी स्वखर्चाने ओढीने पंढरपुरला गोळा होतात त्याच धरतीवर साहित्यीकांनी संमेलनात सहभागी झाले पाहिजे.  अगदीच एखादा अपवाद वगळता सहभागी होण्यासाठी किमान पैशांची सोय होत नाही असा लेखक मराठीत जवळपास नाही. या लेखकांना राहण्याची व्यवस्था शहरातील रसिकांनी करावी. प्रत्येकाने एक साहित्यीक आपल्या घरी रहायला नेला तर त्यातून जास्तीत जास्त लोकांचा सहभाग संमेलनात निर्माण झाल्याचे दिसते. त्या लेखकाचा त्या रसिकांशी त्याच्या कुटूंबाशी संवाद निर्माण होवू शकतो. कवि संमेलनातील 50 कवी, पाच परिसंवादातील मिळून 25 वक्ते, इतर कार्यक्रमांतील 25 सहभागी लेखक, सांस्कृतिक कार्यक्रमातील कलाकार व इतर काही निमंत्रीत अशी सगळी मिळून संख्या 200 वर मर्यादीत केली जावी. म्हणजे दोनशे घरांमधून प्रत्येकी एक निमंत्रीत सहज सामावला जावू शकतो. त्याच्या जेवण निवासाची आणि संमेलन स्थळापर्यंत येण्याची सर्व व्यवस्था याची जबाबदारी त्याच रसिकाकडे असावी. 
याचा परिणाम असा होईल की संमेलन हे रसिकांचे आहे ही भूमिका अधोरेखित होईल. आपला पण यात खारीचा वाटा आहे ही भावना तयार होईल. 

गावागावात हरिनाम सप्ताह, भागवत सप्ताह साजरे होतात, गावोगाव जत्रा उत्सव साजरे होतात, उरूस भरतात या सगळ्याचे नियोजन अशाच पद्धतीने होते. याचा एकत्रित परिणाम म्हणजे सामान्यांना त्या उत्सवापोटी आत्मियता वाटायला लागते. अन्यथा हे उत्सव म्हणजे ‘इव्हेंट’ बनून जातात. आणि त्याचा अपेक्षीत परिणाम साधला जात नाही.

7. समारोप 
जानेवारी महिन्यात दुसर्‍या आठवड्यात संमेलन आयोजीत केले जाईल असे एकदा पक्के असले की त्या प्रमाणे साहित्य रसिक आपले आपले नियोजन करू शकतात. बाहेरगावाहून येणार्‍या रसिकांसाठी निवास भोजनाची व्यवस्था स्थानिक संयोजन समितीने किमान शुल्कामध्ये करून द्यावी.

साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा वेगळा विचार केला तरच या संमेलनांना रसिकांचा प्रतिसाद मिळेल.  बदलत्या काळात रसिकांना विविध पर्याय समोर असल्याने त्यांना संमेलनाची गरज नाही. 

गाणे, नाटक या सादरीकरणाच्या कला आहेत. त्याप्रमाणे साहित्य ही काही सादरीकरणाची कला नाही. त्यामुळे साहित्य प्रेमीला संमेलनास उपस्थित राहण्याची सक्ती असूच शकत नाही. तो आपल्या आपल्या जागीच राहून आवडीचे पुस्तक मिळवून वाचून आपली भूक भागवू शकतो. तेंव्हा साहित्य संमेलने आयोजीत करणार्‍या संस्थांनी तारतम्याने आपले आयोजन केले पाहिजे. 

साहित्य संमेलनातील भाषणे, परिसंवादात वाचले गेलेले निबंध, झालेल्या चर्चा, प्रश्‍नोत्तरे यांचे शब्दांकन करून त्याचे पुस्तक पुढच्या संमेलनात प्रकाशीत झाले पाहिजे. ही जबाबदारी महामंडळाने उचचली पाहिजे. हे पुस्तक पुढच्या वर्षी वाचकांना अभ्यासकांना उपलब्ध असले पाहिजे. प्रत्यक्ष पुस्तक छापण्यासाठी येणार्‍या अडचणी, वितरणाच्या किचकट बाबी यांसाठी पर्याय हवा असेल तर हे सगळे शब्दांकन डिजीटल स्वरूपात महाजालावर मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. 

साहित्य संमेलनाच्या आयोजनावर कित्येक वेळा सुचना करून झाल्या आहेत. कित्येक प्रतिभावंतांनी शेवटी कंटाळून संमेलनाला जाणेच सोडून दिले आहे. काही चांगले पट्टीचे वाचकही आता संमेलन म्हटले की तोंड वाकडे करतात. ही स्थिती चांगली नाही. 

नविन पिढी तर संमेलनाच्या भोंगळ अवाङ्मयीन आयोजनाला केवळ नाक मुरडते असे नाही तर त्यांनी हा रस्ताच ‘बाय पास’ करून टाकला आहे. आपल्याला या नविन पिढीची भाषा समजून घेतली पाहिजे. 

‘समज फुल मी झालो आई’ ही टागोरांची कविता कुसुमाग्रजांची अतिशय सुंदर अशी मराठीत अनुवादीत केली आहे. ही कविता अभिवाचनाच्या कार्यक्रमात सतत मी वाचकांसमोर (मी यासाठी रसिक किंवा प्रेक्षक अस शब्द जाणीवपूर्वक वापरत नाही. कारण आपल्याला प्रेक्षक नव्हे वाचक निर्माण करायचे आहेत.) मांडतो. बहुतांशवेळा अगदी तरूण असणार्‍यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत येणारी प्रतिक्रिया ‘अरे व्वा.. कविता इतकी साधी सुंदर असते.. याची कल्पनाच नव्हती.’ अशी असते.  त्यापांसून प्रेरणा घेवून ‘रसाळ नामदेव ते ढसाळ नामदेव’ असा मराठी कवितांचा ‘रसयात्रा’ हा कार्यक्रम आम्ही सादर करतो. आणि लक्षात असे येते की चांगली कविता सामान्य लोकांपर्यंत अभिनव पद्धतीनं आपण पोचवू शकलो तर हे चांगले वाचक होण्याची शक्यता आहे. याच पद्धतीनं कथा पोचवता येवू शकतात. कादंबरी अंश पोचवता येवू शकतात. 
आणि मग लक्षात येते की ज्याची आपण अपेक्षाही केली नव्हती तो सामान्य माणूसही विशेषत: नविन पिढी वाचनाकडे ओढली जाते आहे. चांगल्या पुस्तकांचा रसाळपणे परिचय करून देण्याची गरज आहे. त्यांतील मर्म उलगडून दाखविण्याची गरज आहे. पुस्तक परिचयाचे कार्यक्रम जास्तीत जास्त कसे होतील हे पाहिले गेले पाहिजे. 

विविध पद्धतीनं साहित्य संमेलन कात टाकून सळसळत्या उत्साहानं नविन तजेलदार कांती घेवून समोर आले पाहिजे म्हणजे नविन पिढी त्याला प्रतिसाद देईल.

श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

No comments:

Post a Comment