उद्याचा मराठवाडा, रविवार 26 ऑगस्ट 2018
पुरोगामी चळवळ म्हणजे काय तर भाजप-संघाच्या विरोधी जे जे आहेत ते सगळे पुरोगामी. असा सोयीस्कर अर्थ पुरोगामी म्हणवून घेणार्यांनी लावून घेतला. या सगळ्यांची भाषा कुणी जिंकावे, कुणी पंतप्रधान व्हावे, कुणी मुख्यमंत्री व्हावे, कुणी आमदार व्हावे अशी बिल्कुल नाही. तर केवळ आणि केवळ भाजपचा पराभव झाला पाहिजे.
किमान भाजप विरोध या मुद्द्यावर सगळे पुरोगामी एकच आहेत असे चित्र आत्ता आत्तापर्यंत पहायला मिळत होते. पण नुकतेच कम्युनिस्ट पक्षाचे (सी.पी.आय.) केंद्रिय कार्यकारिणी सदस्य मा. कन्हैय्याकुमार (जे आता कागदोपत्री विद्यार्थी नेते राहिले नाहीत. कारण त्यांची पीएच.डि. पूर्ण झाली आहेत. विद्यार्थी म्हणून त्यांची अधिकृत कारकीर्द संपली असून त्यांना विद्यापीठांतून आता बाहेर पडावे लागेल.) यांच्या मराठवाडा दौर्यातून काही विचित्र मुद्दे खुद्द पुरोगामी म्हणविणार्यांनीच पुढे आणले आहेत.
कन्हैय्याकुमार यांची मुळ एकच सभा परभणीत शुक्रवार 24 ऑगस्ट रोजी ठरली होती. पण ह्या जंगी पुरोगामी उरूसाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो अशी आशा वाटल्याने पाथरी आणि नांदेड अशा आणखी दोन सभा आयोजीत केल्या गेल्या आहेत (लेख हातात पडेपर्यंत त्या संपन्नही झाल्या असतील.)
या सभांना विरोध करत परभणीच्या काही दलित कार्यकर्त्यांनी कन्हैयाच्या जातीचा उल्लेख केला. कन्हैय्या बिहार मधील भूमिहार ब्राह्मण जातीत मोडतो. (हे संशोधन पण त्याच दलित कार्यकर्त्यांचे आहे. माझे नाही. कन्हैय्याची जात अजून दुसरी काही असली तरी मला फरक पडत नाही.) त्याच्याच जातीचे नाव लावणार्या एका फुटकळ संघटनेने दिल्लीत संविधान जाळण्याचा ‘थोर’ कार्यक्रम नुकताच पार पाडला. या दलित कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की संविधान जाळणारे आणि त्याला विरोध करणारे हे सगळे एकाच जातीचे आहेत. जो मिडीया मोदी यांना भरमसाठ प्रसिद्धी देतो (दलित कार्यकर्त्यांना मोदींची जात माहित नसावी. कारण भाजप संघाचा कुणीही कुठल्याही जातीचा कुठल्याही मोठ्या पदावर बसलेला असो त्या सगळ्यांना मनुवादी ब्राह्मणी डोक्याचे म्हणूननच संबोधले जाते.) तोच मिडीया कन्हैया कुमारला पण प्रसिद्धी देतो. या तुलनेत जिग्नेश मेवाणी व उमर खालीद यांना प्रसिद्धी दिली जात नाही. एक रोहित वेमुला आत्महत्या करतो आणि नंतर लगेच कन्हैय्याची राष्ट्रीय राजकारणात दिमाखात ‘एंट्री’ होते. पुढे मग कुठल्याच दलित जातीतील रोहीत वेमुला पुढे येवू दिला जात नाही.
असा सगळा आरोपांचा बाजार दलित कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर मांडला आहे. इतकेच नाही तर कन्हैया च्या सभेच्या पोस्टरवर बाबासाहेबांचा फोटो का नाही म्हणूनही जाब विचारला गेला.. काही वेळातच सोशल मेडिया वर नवीन पोस्टर झळकले. त्यात बाबासाहेब- शिवाजी महाराज -शाहू- फुले- अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमा आल्या.
कन्हैय्या कुमार दलित नसून उच्चवर्णीय ब्राह्मण आहे इतकेच नाही तर त्याच्या नंतर जो स्टूडंट युनियनचा अध्यक्ष म्हणून निवडून आला तो मनोज पांडे हा पण उच्चवर्णीयच होता.
कन्हैय्या कुमार दलित नसून उच्चवर्णीय ब्राह्मण आहे इतकेच नाही तर त्याच्या नंतर जो स्टूडंट युनियनचा अध्यक्ष म्हणून निवडून आला तो मनोज पांडे हा पण उच्चवर्णीयच होता.
आता कुणालाही असे वाटू शकेल की मनोज पांडेच्या विरोधात कुणी भाजप-संघ म्हणजेच अ.भा.वि.प.चा उमेदवार रिंगणात असेल. तो होताही. त्याला तिसर्या क्रमांकाची आणि फारच कमी मते मिळाली. पण दोन नंबरवर जो उमेदवार होता त्याचे नाव होते राहूल सोनपिंपळे. जे.एन.यु.मध्ये जी विद्यार्थी संघटना प्रबळ आहे ती डाव्यांची जीच्यावतीने कन्हैय्या निवडून आला होता. आणि त्याच्या नंतर मनोज पांडे. याच विद्यापीठात सवर्णांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ‘बिरसा फुले आंबेडकर, जे.एन.यु. की धरतीपर’ अशी घोषणा देत दलित आदिवासी इतर मागासवर्गीयांची एक विद्यार्थी संघटना तयार झाली. तिचे नाव ‘बाफसा’ (बिरसा फुले आंबेडकर स्टुडंस् असोसिएशन). यास संघटनेने डाव्यांना कडवी लढत देत दुसरे स्थान पटकावले.
ज्या रोहित वेमुलाचा सतत उल्लेख पुरोगामी करत असतात आणि त्याची हत्या भाजप-संघानेच केली असा आरोप करतात. वास्तवात ती आत्महत्या होती. आश्चर्य म्हणजे हा रोहित वेमुला डाव्या विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी होता. (एस.एफ.आय.) आणि त्याने या पदाचा राजीनामा दिला होता. रोहित वेमुला याने असा प्रश्न उपस्थित केला होता की कम्युनिस्टांच्या पॉलिट ब्युरोत एकही दलित का नाही? (रोहितच्या दुर्दैवी आत्महत्येनंतरही या परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाही. डिसेंबर महिन्यात मार्क्सवादी कम्युनिस्टांच्या पॉलिटब्युरोची नव्याने आखणी झाली त्यातही दलितांना प्रतिनिधीत्व दिलेले नाही.)
म्हणजे रोहित वेमुला प्रत्यक्षात आपल्याच विद्यार्थी संघटनेत दलितांना महत्त्वाचे स्थान दिले जात नाही म्हणून नाराज होता. त्याने राजीनामाही दिला होता. पण सगळे डावे पुरोगामी रोहितच्या मृत्यूनंतर असा आकांत करत राहिले की ही भाजप-संघाने केलेली हत्याच आहे. कुणी चुकूनही डाव्यांना याचा जाब विचारला नाही की तुमच्या संघटनेतून त्याने राजीनामा का दिला होता?
ही वस्तुस्थिती डाव्या पुरोगाम्यांनी झाकुन ठेवायचा प्रयत्न केला. पण सत्य कधी फार काळ लपून राहत नाही म्हणतात. त्याप्रमाणे मराठवाड्यातील दलित कार्यकर्त्यांनी स्वत:च कन्हैय्याची जात काढली आणि त्याच्या सभेवर आक्षेप घेतला.
पुरोगामी बोलतात एक आणि प्रत्यक्षात वागतात वेगळेच असा आरोप राजकीय दृष्टीकोनातून स्व. प्रमोद महाजन करायचे. तेंव्हाच्या जनता दलाचे नेतृत्व मृणाल गोरे आधीचे समाजवादी नानासाहेब गोरे, एस.एम.जोशी, यदुनाथ थत्ते, ग.प्र. प्रधान, साने गुरूजी यांच्यावर टीका करताना आपल्या पक्षात कसे बहुजन नेतृत्व आहे असे चतुर खवचटपणे सांगत ते गोपीनाथ मुंढे, ना.स.फरांदे, सुर्यभान वहाडणे, महादेव शिवणकर, एकनाथ खडसे यांची नावे घ्यायचे.
याच वाटेने पुढे जात भाजपने आपल्यातील बहुजन, इतर मागास, दलित यांना मोठ मोठी पद उपलब्ध करून दिली. जे पुरोगामी कालपर्यंत भाजप हा शेटजी भटजींचा पक्ष आहे असे म्हणत होते त्यांना आता या चतुर खेळीचे तोडीस तोड उत्तर देणे जमेना. मग ‘चेहरा बदलनेसे कुछ नही होता, चरित्र बदलना चाहिये’ अशी एक पळवाट पुरोगाम्यांनी शोधून काढली.
खरं तर दलित कार्यकर्ते जेंव्हा कन्हैय्याची जात काढतात तेंव्हाच पुरोगामी चळवळीच्या नेत्यांनी त्यांना वैचारिक पातळीवर समज द्यायला हवी होती. दलित चळवळीचा एक मोठा घटक रामदास आठवलेंच्या रूपाने प्रत्यक्ष भाजपच्याच मांडीवर जावून बसला आहे. राखीव जागांवरही भाजपने मोठ्या प्रमाणात आपले कार्यकर्ते निवडुन आणले आहेत. आता अशी भूमिका कशी घेणार की भाजप कडून निवडून आलेला दलित, इतर मागस हे त्या त्या प्रवर्गाचे प्रतिनिधीच नाही?
स्वातंत्र्यापूर्वी हंगामी मंत्रिमंडळाची स्थापना करताना ब्रिटीशांनी कॉंग्रेस आणि मुस्लिम लीगला आपल्या प्रतिनिधींची नावे सुचवा असे सांगितले. त्यात मोहम्मद अली जीनांनी मोठी विचित्र अट घातली, ‘मुसलमानांचे प्रतिनिधीत्व केवळ आम्हीच करतो. सबब कॉंंग्रेसच्या वतीने कुणीही मुस्लिम प्रतिनिधी आम्हाला चालणार नाही. त्यांनी केवळ आणि केवळ हिंदूंचीच नावे द्यावीत.’ वाद नको म्हणून मौलाना आझाद यांनी आपणहूनच बाजूला रहायचे ठरवले.
दलित कार्यकर्त्यांच्या भाजप विरोधाला एक राजकीय किनार तरी आहे. पण कन्हैय्या सारख्या तरूण उभरत्या पुरोगामी नेतृत्वाला विरोध करून, त्याची जात काढून, त्याची तूलना उमर खालेद-जिग्नेश मेवाणीशी करून हे नेमके काय साधत आहेत?
गुजरात विधानसभा निवडणुकांत जिग्नेश कौंंग्रेसच्या पाठिंब्यावर निवडुन आला पण त्याने कुठल्याही पक्षाचे सदस्यत्व स्विकारले नाही. मायावती किंवा प्रकाश आंबेडकर यांच्यापैकी कुणाच्याही पक्षात अधिकृतरित्या प्रवेश घेतला नाही. त्या मानाने कन्हैय्या तरी अधिकृतरित्या कम्युनिस्ट पक्षात प्रवेश घेवून संसदिय राजकारण करू इच्छित आहे असे दिसते आहे. मग त्याला विरोध करण्यामागची नेमकी मानसिकता काय? तुमच्या बाजूने लढणारा सवर्ण तुम्हाला चालत नाही असा याचा अर्थ घ्यायचा का? आपल्याकडे ग्रामीण भागात एक म्हण आहे, ‘नवरा मेला तरी हरकत नाही, पण सवत रंडकी झाली पाहिजे’ त्या अनुषंगाने पुरोगामी राजकारण खड्यात गेले तरी चालेल, भाजप 2014 मध्ये 282 जागांवर निवडून आला पुढे 2019 मध्ये तो 350 जागा जिंको पण आम्हाला कन्हैय्या सारखा सवर्ण नेता चालणार नाही. त्याला अपशकुन करून आम्ही आमची दलित चळवळ चालवू. ही नेमकी कोणती मानसिकता आहे.
(मी स्वत: जातीच्या संघटनांना राजकारणाला कडाडून विरोध करतो. माझ्या जातीच्या व्यासपीठावरही मी कधी गेलो नाही. मी निखळ अर्थवादी चळवळ असलेल्या शेतकरी संघटनेची वैचारिक बांधिलकी मानतो. तेंव्हा प्रतिवाद करणार्यांनी माझी जात काढू नये ही विनंती. ज्या दलित कार्यकर्त्यांनी कन्हैया च्या जातीचा उल्लेख केला आहे त्या पोस्टच्या स्क्रीन शॉटचा पुरावा मी घेऊन ठेवला आहे.. )
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment