Sunday, August 19, 2018

सोमनाथ चटर्जी कुटूंबिय कम्युनिस्ट नेत्यांवर का संतापले?


उद्याचा मराठवाडा, दिनांक १९  ऑगस्ट 2018

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते- लोकसभेचे माजी सभापती- सोमनाथ चटर्जी  यांचे वृद्धत्वाने कोलकत्यात राहत्या घरी 13 ऑगस्टला निधन झाले. ते ज्या पक्षाचे नेते होते एक दोन नव्हे तर तब्बल दहा वेळा लोकसभेवर निवडून आले होते त्या पक्षाने त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे शव पक्ष कार्यालयात अलीमुद्दीन रोड येथे ठेवण्याचा प्रस्ताव चटर्जी कुटूंबियांसमोर ठेवला.

सेामनाथदांच्या कन्या अंशुली बोस यांनी हा प्रस्ताव नाकारला. त्याचे कारणही त्यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले.

2004 मध्ये कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावरच मनमोहन सरकार सत्तेवर आले होते. या लोकसभेचे सभापती म्हणून सोमनाथ चटर्जी यांचे नाव समोर आले. लोकसभेचे सभापती असलेली व्यक्ती कुठल्याही एका पक्षाची रहात नाही. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभापती, उपसभापती, राज्यसभेचा उपाध्यक्ष ही पदे पक्षविरहीत असतात. त्या अनुषंगाने सोमनाथदाही  स्वत:ला कुण्या एका पक्षाचा  न समजता तटस्थपणे वागत गेले. स्वाभाविकच त्यांची गणना लोकसभेच्या उत्कृष्ट सभापतींमध्ये करावी लागते. 

2008 मध्ये अमेरिकेशी करण्यात येणार्‍या अणुकरारावरून कम्युनिस्टांनी मनमोहन सरकारचा पाठिंबा काढला. या सरकार विरोधात अविश्वासाचा ठराव आणण्यात आला. इथपर्यंतही राजकारण म्हणून सारे ठिक होते. समाजवादी पक्षाने ऐनवेळेला ठरावाच्या बाजूने मतदान करून मनमोहन सरकार सावरून धरले. पण कम्युनिस्टांनी सोमनाथदांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. आपण सभापती आहोत तेंव्हा आपण पक्षाने सांगितले म्हणून राजीनामा देणार नाही अशी ठाम भूमिका घेत सोमनाथदांनी नकार दिला. 

खरे तर विषय इथेही संपला असता. पण कम्युनिस्ट म्हणजे नतद्रष्टपणाचा कळसच. त्यांनी सोमनाथदांना पक्षातूनच निलंबीत केले. या दिवशी सोमनाथदांची मुलगी त्यांच्या जवळच दिल्लीत होती. परवा सोमनाथदांच्या निधनानंतर तिने सांगितले, ‘त्या दिवशी बाबांच्या डोळ्यात मी अश्रु पाहिले.’ पक्षाने काढून टाकल्याचे अतीव दु:ख सोमनाथदांना झाले. आपला एक सच्चा कम्युनिस्ट देशाची लोकशाही मुल्ये वाचवितो म्हणून कम्युनिस्टांना अभिमान वाटायला हवा होता. पण त्याऐवजी लोकशाहीचे रक्षण करण्याचे बक्षिस म्हणून सोमनाथदांच्या पदरी निलंबनाची कारवाई आली. 

तसाही कम्युनिस्टांचा लोकशाहीवर विश्वास नाहीच. पूर्वीही 1996 मध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते तेंव्हा भाजपेतर पक्षांनी आघाडी करून ज्योतीबसुंच्या नावाला पाठिंबा देत त्यांना पंतप्रधान होण्याची विनंती केली होती.  भारतीय लोकशाही प्रगल्भ झाल्याची ती खुण होती. पक्षाच्या सीमा विसरून खासदार एकत्र येतात आणि एका निस्पृह व्यक्तिला पंतप्रधान होण्याची विनंती करतात. पण कम्युनिस्ट म्हणजे जन्मजात नतद्रष्ट. त्यांच्या पॉलिटब्युरोने ठराव करून ज्योतीबसूंना विरोध केला. त्यांना पंतप्रधान होवू दिले नाही. ज्योतीबाबूंनी ते ऐकले आणि शांतपणे बसून राहिले. 

सोमनाथदांच्या मुलीने यासाठी कम्युनिस्ट पक्षाला नकार दिला. पण त्यांचा मुलगा ऍड. प्रताप चटर्जी हा बहिणीइतका शांत बसू शकला नाही. डाव्या आघाडीचे संयोजक कॉ. विमान बोस यांना आपल्या घरात अंत्यदर्शनासाठी आलेले पाहताच त्याच्या संतापाचा कडेलोट झाला. ‘हे इथे कसे काय? आत्ताच्या आत्ता यांना हाकला माझ्या घरातून.’ म्हणून तो ओरडला. त्याचे कारण इतरांना माहित होते पण कुणी बोलायला तयार नव्हते. सोमनाथदांना पक्षातून काढून टाकल्यावर विमान बोस यांनी अतिशय अश्लाघ्य शब्दांत टीका केली होती. 

दहा वर्षे उलटून गेल्यावरही त्या टीकेचे ओरखडे प्रताप आणि एकूणच चटर्जी कुटूंबियांच्या मनावर उमटलेले आहेत. म्हणून त्यांचा संताप बाहेर पडला. मुलगा आणि मुलगी यांचा संताप पाहिल्यावर पक्ष नेत्यांना वाटले सोमनाथदांच्या पत्नीला रेणू चटर्जी यांना विचारून पाहूत. पण त्यांनीही आपल्या पतीचा देह पक्ष कार्यालयात नेवून लाल झेंड्यात गुंडाळणे व अखेरचा लाल सलाम देणे या गोष्टीला कडाडून विरोध केला. 
हे सगळे पाहिल्यावर पक्षाचे महासचिव कॉ. सीताराम येच्युरी यांनी बाजू पडती घेत पक्षाच्या नेत्यांना परत जाण्याचा सल्ला दिला. सर्वच कम्युनिस्ट नेत्यांनी सोमनाथदांच्या घरातून काढता पाय घेतला. 

सोमनाथदांनी आपल्या चरित्रात अतिशय संयतपणे आपल्या कारकीर्दीबाबत लिहीले आहे. ते उदारमतवादी होते त्यामुळे पक्षापेक्षाही वर जावून भारतीय लोकशाहीकडे पाहू शकत होते. परिणामी त्यांच्या कृतीने लोकशाही अजूनच प्रगल्भ झाली. पण लोकशाही प्रगल्भ होणे हे कम्युनिस्ट पक्षाला नकोच असावे बहुतेक. 

महाराष्ट्रात असाच नतद्रष्टपणा कॉ. डांगे यांच्याबाबतही पक्षाने केला होता. त्यांचे नाव तर सोडाच पण त्यांनी पक्षासाठी केलेले लिखाण अनुवाद केलेली पुस्तके सर्वच्या सर्व त्यांना काढून टाकताच रात्रीतून कम्युनिस्टांच्या पुस्तकांच्या दुकानांतून हटविण्यात आली. याला काय म्हणावे? पक्षाच्या कॅलेंडरवरून त्यांचा फोटो नाहिसा झाला. 

सोमनाथदांसारख्या सत्शील माणसांचे शापच पुढे पक्षाला भोवले असणार. नंतर लगेच झालेल्या 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 59 जागांवरून धाडकन 30 जागांवर पक्षाची घसरण झाली. पुढच्या लोकसभेत 2014 मध्ये तर पक्षाचे दोन आकडीही खासदार निवडून आले नाहीत. 

सोमनाथदांच्या कुटूंबियांचा संताप अजून एका परिप्रेक्ष्यातून समजून घेतला पाहिजे. कम्युनिस्ट सामान्य लोकांच्या भावभावनांपासून पूर्णपणे तुटून गेले आहेत. सोमनाथदांचे वडिल निर्मलकुमार चटर्जी हे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. श्यामाप्रसाद मुखर्जी त्यांचे जवळचे नातेवाईक. तरीही सोमनाथदा हे डाव्या विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून जेंव्हा पुरस्कार दिल्या गेला तेंव्हा त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी आपले आदर्श संसदपटू कसे होते हे स्पष्टपणे सांगितले. असा हा उदारमतवादी माणूस. पण त्याच्यावर त्याची काही चुक नसताना पक्षाने निलंबनाची कारवाई केली. आणि त्याही पुढे जावून एक व्यक्ती म्हणूनही त्यांना सन्मानाची वागणुक दिली नाही हा चटर्जी कुटूंबियांचा आक्षेप. विमान बोस यांनी अतिशय असभ्य भाषेत टीका करण्याचे काय कारण? पटले नाही तर त्यांना पक्षशिस्त म्हणून निलंबीत केले इथपर्यंत ठीक होते. हा विषय इथेच संपतो. पण एक ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ता, लोकभेचा माजी सभापती म्हणून तर त्यांचा  सन्मान राखला जावा. 

पक्षाने त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शोकसंदेश प्रसारीत करताना त्यांच्या खासदारकीचा उल्लेख केला, ते लोकसभेचे सभापती होते याचा उल्लेख केला पण चुकूनही ते कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते याचा उल्लेख केला नाही. चटर्जी कुटूंबियांना हे पण खटकले. 

एखादा कुणी माणूस इतिहासात जी काही कामगिरी करून जातो ती अमान्य कशी करता येईल? इतिहास कुण्या एका माणसाच्या पक्षाच्या संघटनेच्या हातातील गोष्ट नसते. ती अशा पद्धतीनं पुसून टाकण्याचा प्रयत्न तशी कृती करणार्‍यालाच हास्यास्पद ठरवत असतो. 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोमनाथदांच्या बाबतीत केलेली कृती कुठल्याही संवेदनशील समाजघटकाला निश्‍चितच  खटकणारी आहे. डाव्यांचे असे लोकांपासून तुटत जाणे एक राजकीय संघटन म्हणून फार घातक आहे. मार्क्सची 200 वी जयंती साजरी होत असताना मार्क्सवादी पक्ष लोकांपासून तुटत जात आहे. दोन वर्षांपूर्वी मार्क्सची 198 ची जयंती होती. त्या कार्यक्रमास औरंगाबाद शहरात 198 ही माणसे नव्हती. तेंव्हा मी टीका केली ती डाव्या मित्रांना खुप झोंबली होती. कॉ. पानसरे यांची हत्या झाली तेंव्हा त्याचा निषेध अहिंसा-लोकशाही मानणार्‍यांनी करणे मी समजू शकतो. पण कम्युनिस्टांनी प्रचंड हत्या विरोधकांच्या केल्या आहेत. तेंव्हा आता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या तर त्यांनी समजून घ्यावे. पण निषेध कसा काय करता येईल? असा प्रश्‍न विचारल्यावर डावे कार्यकर्ते प्रचंड चिडले होते.

डाव्यांना आता त्यांच्या घरातूनच आहेर मिळाला आहे. चटर्जी कुटूंबियांनी सोमनाथदांचे शव अंतिमदर्शनासाठी पक्ष कार्यालयात ठेवण्यास नकार देवून मार्क्सवाद्यांना चपराक दिली आहे. बरं या कुटूंबियांवर काही आरोप करावा तर ती सोयही त्यांनी ठेवली नाही. त्यांनी आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे सोमनाथदांचे  ‘देहदान’ करून आपले पुरोगामित्व सिद्धही केले आहे.      

पण असल्या कुठल्याही प्रसंगातून काहीही शिकण्याची जराही तयारी डाव्यांची नाही. 

                   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment