Tuesday, June 19, 2018

कानडी भ्रतार मराठीने केला । भाषा सेतू बळकट उभारीला ॥


उरूस, सा.विवेक, जून 2018

‘मराठीने केला कानडी भ्रतार’ असे आपल्याकडे म्हणतात. या अभंगात दोघांना एकमेकांची भाषा कळेना म्हणून कशी पंचाईत होते असे विनोदाने सांगितले आहे. पण इथे मात्र वेगळंच घडलं. कानडी नवरा केल्यावर कानडीतून तिने जवळपास 55 पुस्तके मराठीत अनुवादली. आणि नवर्‍याने मराठीतून कानडीत 25 पुस्तके नेली. मराठी-कानडी हा सेतू बळकट करणारी ही काही काल्पनिक कथा नाही.  सगळा भाषावाद बाजूला ठेवून बेळगांवसारख्या संवेदनशील गावच्या मुळच्या असलेल्या सौ. उमा आणि विरूपाक्ष कुलकर्णी या जोडप्याची ही खरीखुरी कथा आहे. 

उमा कुलकर्णी या मुळच्या बेळगांवच्या 100 टक्के मराठी कुटूंबात जन्मलेल्या वाढलेल्या शिकलेल्या. त्यांच्यासाठी वडिलांनी विरूपाक्ष कुलकर्णी या इलेक्ट्रील इंजिनिअरचे स्थळ आणले तेंव्हा त्यांची कानडी पार्श्वभूमी असल्याने उमाताईंनी  लग्नालाच नकार दिला. पुढे वडिलांनी त्यांची समजूत काढली. कानडी असला तरी हा मुलगा पुण्यात राहतो आहे. त्यामुळे तूला काही अडचण येणार नाही. 

विरूपाक्ष कुलकर्णी यांना लहानपणापासून वाचनाची मोठी आवड. त्यातही अध्यात्मिक तत्त्वज्ञानाची तसेच ललित पुस्तके अगदी चांदोबा पासून वाचून फडशा पाडायची सवय. हळू हळू त्यांची वैचारिक उंची वाढत गेल्यावर त्यांना भाषे भाषेतील भेद फार क्ष्ाुल्लक वाटायला लागले. त्यात आपण पुण्यासारख्या विद्येचे संस्कृतीचे माहेरघर असलेल्या नगरात राहतो याचा काहीसा अभिमानच आजही वाटतो. त्यांनी मराठी कुटूंबातील या मुलीला जीवनाथी म्हणून मनोमन स्वीकारले.  

औरंगाबादला उमा-विरुपाक्ष कुलकर्णी या जोडप्याच्या मुक्त संवादाचा एक कार्यक्रम नुकताच पार पडला. स.भु.संस्थेच्या हिरवळीवर मोजक्याच श्रोत्यांसमोर हवेच्या सुरेख झुळकांसोबत या दोघांनी उलगडलेले भाषेतील संवादाचे सुत्र श्रोत्यांना सुखावून गेले. 

उमाताईंना कानडी भाषा वाचता येत नाही. मग विरूपाक्ष रोज सकाळी पुस्तकाची पाने वाचून टेप करून ठेवायचे. मग ते गेल्यावर दिवसभर वेळ मिळेल तसा उमाताई तो टेप केलेला मजकूर ऐकून त्याचा अनुवाद मराठीत करायच्या. त्यांचे शिक्षण मराठीत झालेले. त्यांच्या लक्षात आले की मराठीत मोठ्या आकाराच्या कादंबर्‍या नाहीत. तशा ताकदीचे कादंबरीकारही नाही.  उलट कानडीत भरपूर आहेत. मग हा सगळा मजकूर आपण मराठीत का आणू नये? त्या प्रमाणे मग त्यांनी पहिले शिवराम कारंथ यांच्या पुस्तकाचा अनुवाद केला. पण तो आधीच कुणीतरी केल्यामुळे त्याचे पुस्तक प्रकाशीत होवू शकले नाही. मग त्यांनी कारंथांच्या दुसर्‍या कादंबरीचा अनुवाद केला. तो मात्र मराठीत प्रकाशीत झाल्या. 

इन्फोसिस फाउंडेशनच्या संचालक प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी त्यांना भैरप्पा यांच्या ‘वंशवृक्ष’ कादंबरीचा अनुवाद मराठीत करण्याची सुचना केली. त्यांनी त्या अनुषंगाने त्या कादंबरीला हात घातला. आणि मग पुढे त्या भैरप्पांच्या लिखाणाच्या प्रेमातच पडल्या. भैरप्पांच्या बहुतांश कादंबर्‍या त्यांनी मराठीत आणल्या.  भैरप्पांचे आत्मचरित्रही त्यांनी मराठीत आणले. पुढे शिवराम कारंथ, अनंतमुर्ती, गिरीश कार्नाड (कर्नाड नाही.. कार्नाडच उच्चार आहे असे उमाताई आवर्जून सांगतात.) यांचेही लिखाण त्यांनी मराठीत आणले. सुधा मूर्ती यांची पुस्तके पण त्यांनी अनुवादित केली आहेत.  आज त्यांची 55 पुस्तके प्रसिद्ध आहे. एका कुठल्या व्यक्तिने भारतीय भाषांत असे ध्यास घेवून एका भाषेतून दुसर्‍या भाषेत सतत इतका मजकूर आणणे हा एक विक्रमच मानावा लागेल. अनुवाद करताना येणार्‍या अडचणींची उमाईंनी मोकळेपणाने चर्चा केली. कन्नड दलित साहित्याला मराठीत आणणं मला शक्य झालं नाही. ती भाषा मला अनुवाद करता आली नाही अशी स्वच्छ कबुलीही त्यांनी दिली. 

मराठी-कानडी यांना जोडणारा दुवा कोकणी भाषा आहे. कितीतरी शब्दांचे अर्थ कोकणी भाषेत सापडून मला अनुवाद करताना मदत झाली असा एक वेगळा मुद्दाही त्यांनी श्रोत्यांसमोर ठेवला. 

विरूपाक्ष कुलकर्णी यांचा मराठी माणसांना फारसा परिचय नाही. त्याला कारणही तसेच आहे. विरूपाक्ष यांनी मराठीतून कन्नड अशी भाषांतरे केली आहेत. तेंव्हा स्वाभाविकच मराठी माणसांना ते माहित असण्याची किंवा ते वाचले असण्याची शक्यता नाही. सावरकरांच्या ‘माझी जन्मठेप’ चा त्यांनी केलेला कानडी अनुवाद खुप गाजला. पण हा अनुवाद प्रसिद्ध होण्यासाठी 22 वर्षे लागली अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. कानडीत प्रकाशक आधी शोधल्या शिवाय अनुवाद करणे व्यवहार्य कसे नाही हेही सोदाहरण सांगितले. 

सुनिताबाई देशपांडे यांच्या ‘आहे मनोहर तरी’ चा त्यांनी कन्नड अनुवाद केला. तो कुणी छापायला तयार होईना. कन्नड माणसांना पु.ल. बद्दल फारशी माहिती नाही. मग त्यांच्या बायकोचे पुस्तक कोण कशाला वाचेल अशी भूमिका कन्नड प्रकाशकांनी घेतली. स्त्रीवादी साहित्य छापणार्‍या प्रकाशिकेकडे हा मजकूर गेला. हे पुस्तक एका स्त्रीच्या आत्मसन्मानाचा कसा प्रवास आहे, त्याही काळात नवर्‍याला बरोबरचा मित्र समजून संसार करणार्‍या बाईचा हा प्रवास आहे असे पटवल्यावर त्या प्रकाशिका हे पुस्तक छापायला तयार झाल्या. पण मुद्दा अडला तो अनुवादकावर. त्यांचे म्हणणे हा एका पुरूषाने केलेला अनुवाद आहे. तो आम्ही नाही छापणार. पुढे अजून काही काळ गेल्यावर तडजोड म्हणून या पुस्तकावर अनुवादक म्हणून उमाताईंचे नाव कसे टाकले आणि ते पुस्तक शेवटी प्रकाशीत झाले हा किस्साही उमाताईंनी श्रोत्यांना रंगवून सांगितला. ‘मला आजही कन्नड वाचता येत नाही पण ते कन्नड पुस्तक मात्र माझ्या नावावर आहे’ असे त्यांनी त्यांनी सांगताच श्रोत्यांनाही हसू आवरले नाही. 

उमाताई-विरुपाक्ष या साठी सत्तरी पार केलेल्या जोडप्याच्या भाषेविषयक या नितळ गप्पा ऐकताना आपला भाषेविषयीचा विचित्र अभिमान किंवा गंड दोन्हीही गळून पडायला होतं. जिथे भाषेचे राजकारण पेटले त्या बेळगांवातील एक जोडपे कन्नड-मराठी असा अनुवादाचा बळकट सेतू उभा करते. ज्या आपल्या पुण्याबद्दल आपणच क्वचित हेटाळणी पूर्वक ‘पुणेरी’ असा उल्लेख करतो त्या पुण्याच्या सांस्कृतिक सांगितीक बौद्धीक वैचारिक श्रीमंतीचा मला कसा अतोनात फायदा झाला असा उल्लेख विरूपाक्षांसारखा एक कानडी गृहस्थ करतो तेंव्हा एक मराठी म्हणून आपण किती कोते आहोत असेच वाटत राहते. मोकळेपणाने भाषांना एकमेकांच्या सहवासात राहू वाढू विकसित होवू दिलं पाहिजे. याची खात्री परत परत पटते.   

एखादं व्रत बाळगावं असं हे जोडपं कन्नड-मराठी भाषाव्यवहारात बुडून गेलं आहे. विरूपाक्ष अस्खलित मराठी शुद्ध उच्चारांसह बोलतात तेंव्हा तर हे कानडी आहेत हे सांगूनही पटत नाही. 

उमाताईंचे ‘संवादु अनुवादू’ या नावाने 400 पानांचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशीत झाले आहे (मेहता प्रकाशन, पुणे). त्या पार्श्वभूमीवर या जोडप्याने एकमेकांशी आणि श्रोत्यांशी साधलेला संवाद खुपच जिवंत वाटला. भैरप्पांना मराठी वाचकवर्ग फार मोठ्या प्रमाणात मिळाला. कानडीपेक्षा जास्त मला मराठी वाचक मिळाला असे भैरप्पा जेंव्हा सांगतात तेंव्हा त्यात उमाताईंचा मोठा सिंहाचा वाटा आहे हे जाणवते. भैरप्पांना मराठी चांगलं कळतं. त्यांच्याशी संवाद साधताना ते आवर्जून सांगतात तूम्ही मराठीतच बोला. मला या भाषेचा नाद फार आवडतो. 

कार्यक्रमाचा शेवट करताना संयोजकांची आभाराला सुरवात करताच उमाताई यांनी त्यांना थांबवले. आणि त्यांची एक अफलातून सुचना केली. ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा विरूपाक्ष यांनी कन्नड अनुवाद केला आहे. त्याने आपण शेवट करू अशी सुचना केली. विरूपाक्ष यांची वाणी अतिशय शुद्ध, आवाज स्वच्छ किनरा टोकदार. त्यांच्या तोंडून पसायदान ऐकताना काहीतरी विलक्षण ऐकत आहोत असाच भास होत होता. पसायदान तर सगळ्या मराठी माणसांच्या ओठांवर आहे. त्यांचे कन्नड शब्द ऐकताना मराठीच होवून गेले आहेत असे वाटत होते. पसायदानाच्या शेवटी ‘ज्ञानदेवानी वरदिंदा सुखिया..’ असे विरूपाक्ष यांनी आळविले तेंव्हा खरेच ज्ञानदेवानी हे गोड कन्नड शब्द ऐकले असते तर तेही सुखावले असते असेच वाटले.

भाषेच्या केलेल्या कामासाठी आपण या जोडप्यापोटी कायम कृतज्ञता ठेवली पाहिजे.    
  
                  श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

4 comments:

  1. Presently reading the book and really loving it to the core. I knew that she has translated many bhairappa books including my favourite vanshvruksha .. it was a revealation to me that she has Shivram karant translations also up her sleeve .a salute to her and her love for both the languages and her giagantic efforts to translate the literature for the greater reach and benefit of literature lovers

    ReplyDelete
  2. छान माहिती सांगितली आहे। मला वाटत आपण दोघांनी एकदमच ब्लॉग सुरू केला आहे.

    ReplyDelete
  3. स्तुत्य
    मराठी कानडी हा वाद बेळगाव मुळे पेटता राहिला आहे.
    संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र
    यात विदर्भ मराठवाडा व बेळगाव करावा निपाणी सह ही
    घोषणा व हा उल्लेख आचार्य अत्र्यांच्या मराठा या पत्राच्या संपादकीयाच्या शीर्षकाच्या जवळ छापलेला असायचा.
    फाझलभाई कमिशनने महाराष्ट्राच्या या मागणीस भीक न घालता बेळगावचे माप कर्नाटकाच्या पदरात टाकले व हा वाद आजपर्यंत पेटता राहिला आहे.
    मराठीने केला कानडी भरतार ही ओळ कुठल्याश्या अभंगात आहे एव्हडेच आठवत होते.
    माझी आजी कर्नाटकात गदग या गावी आजोबांच्या बदलीमुळे मुली व मुलांसह बराच काळ राहिली होती.
    तिच्या घरात सर्वांना कानडी येत असे.
    नंतर माझी एक बहीण म्हैसूरला तिच्या पतीच्या परिचयातील गृहस्थांच्या घरी राहिली होती.
    या बहिणीने अल्पशा वास्तव्यात कानडी शिकून घेतले होते!
    बहुधा आजीच्या जीन्सचा हा प्रभाव तिच्यात टिकला असावा.
    हे सादर वाचनीय आहे.
    गुगलवर टाकल्याबद्दल आभार .

    ReplyDelete