Monday, June 11, 2018

भंडारा पालघर - पुरोगामी राजकारणाला घरघर !


दै. उद्याचा मराठवाडा, नांदेड  १० जून २०१८ 

महाराष्ट्रात नुकतीच लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुक पार पडली. विधानसभेसाठी (पलूस कडेगांव) विश्वजीत कदम यांच्याशिवाय कुणी अर्जच न भरल्याने ती निवडणुक बिनविरोध झाली. त्याची चर्चा करण्याची काही गरजच नाही. 

लोकसभेच्या पालघर आणि भंडारा-गोंदिया या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. दोन्ही जागा भाजपच्या होत्या. चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरची तर नाना पटोले यांच्या राजीनाम्याने भंडारा-गोंदियाची पोटनिवडणुक घ्यावी लागली. जो काही निकाल लागला त्यापेक्षा एक वेगळ्या पैलूची चर्चा होणे आवश्यक आहे. तो म्हणजे भाजप-सेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशिवाय पुरोगामी पक्षांनी पण ही निवडणुक लढवली होती. त्यातही प्रकाश आंबेडकरांनी भंडारा तर मार्क्सवादी कम्युनिस्टांनी पालघर प्रतिष्ठेचे केले होते. 

एक स्वाभाविक प्रश्‍न कुणालाही पडेल की सत्ताधारी रालोआ आणि त्या विरोधातील कॉंग्रेस प्रणीत संपुआ यांच्या शिवाय जे कुणी तिसर्‍या आघाडीतील स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारे पक्ष आहेत त्यांनी एखादा संयुक्त उमेदवार उभा करून आपली लढाई नेमकी कशासाठी आणि कुणा विरोधात आहे हे अधोरेखीत केले का?

निवडणुकीचे निकाल पत्र (ज्यात सर्व उमेदवारांच्या मतांचे आकडे दिलेले असतात) कुणी संपूर्ण पाहिलेले दिसत नाही. नसता त्यावर चर्चा झाली असती. जिंकलेल्या आणि पराभूत उमेदवारांची मते फक्त काही बातम्यांत दाखवल्या गेली. त्यांना मिळालेली मतांची टक्केवारीही सांगितली गेली. पण पुरोगामी म्हणवून घेणार्‍या तिसर्‍यांचे काय आणि कसे बारा वाजले हे कुणी सांगितले नाही. 

पहिले विचार करू भंडारा-गोंदियाचा. या मतदार संघात निवडुन आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 47 टक्के इतकी मते मिळाली. पराभूत भाजपच्या उमेदवाराला 42 टक्के इतकी मते मिळाली. म्हणजे सहजच कुणाच्याही लक्षात येईल की शिल्लक इतर सर्व उमेदवारांना मिळून केवळ 11 टक्के मते मिळाली. प्रकाश आंबेडकरांच्या भारीप-बहुजन महासंघाच्या उमेदवाराला मिळालेली मते आहेत 40,326 (केवळ 4 टक्के). या निवडणुकीत डाव्या पक्षांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीचे उमेदवार ऍड. मधुकर कुकडे हे खैरलांजी प्रकरणात संशयीत आरोपी होते. ते भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले तेंव्हा पुरोगाम्यांनी मोठा गदारोळ केला होता. तेच कुकडे आज राष्ट्रवादी कडून उभे राहिले तर कम्युनिस्ट पक्षाने त्यांना चक्क पाठिंबा दिला. या ठिकाणी निवडुन येणे एकवेळ बाजूला ठेवू. कम्युनिस्टांची ताकद मर्यादित आहे हे पण समजून घेवू. मग असे असताना तत्त्व म्हणून भारीप-बहुजन महासंघाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात काय हरकत होती? 

पण याचे काही उत्तर कुणी पुरोगामी देत नाही. जी चर्चा सोशल मिडीयावर झाली त्यात दोन्ही गटांतील कार्यकर्ते खुप तावातावाने आपआपली बाजू मांडत होते. कॉ. प्रकाश रेड्डींसारख्या ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्यांनी पक्षाची चुक झाल्याची कबुली दिली. राष्ट्रवादीला पाठिंबा का दिला? सगळे पुरोगामी मिळून एकत्र का नाही?  रोहित वेमुलाने कम्युनिस्टांच्या पॉलिट ब्युरोत दलित का नाही? हा प्रश्‍न विचारला होता. कम्युनिस्ट चळवळ दलितांना वाईट वागणुक देतेे.  असा आरोप दलित कार्यकर्ते करत आले आहेत. पण महाराष्ट्रात हा आरोप दडपुन टाकण्यात आला. सगळे पुरोगामी एकत्र असे ढोंग सतत मांडले जाते. पण हे ढोंग निवडणुकीत उघडे पडले. 

या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडुन आला म्हणून सगळे गप्प बसले. कारण भाजपच्या पराभवात यांचे सुख. पण आपण एकमेकांच्या विरोधात का लढलो? याचे कुठलेही पटणारे उत्तर यांच्याकडे नाही. 
आता दुसरी पोटनिवडणुक बघु. पालघर मध्ये भाजपच्या विजयी झालेल्या उमेदवाराला 31 टक्के मते मिळाली. पराभूत शिवसेनेच्या उमेदवाराला 27 टक्के मते मिळाली.  कॉंग्रेसची अवस्था तर फारच वाईट होती. त्यांच्या उमेदवाराला 5 टक्के इतकीच मते मिळाली.

आता या पार्श्वभूमीवर तिसर्‍या आघाडीची म्हणजेच पुरोगामी आघाडीची मते विचारात घेवू. बहुजन विकास आघाडी म्हणून एक तिसरा पर्याय या मतदारसंघात आहे. त्यांचे तीन आमदारही आहेत. या उमेदवाराला25 टक्के इतकी लक्षणीय मते मिळाली. ही निवडणुक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने लढवली होती. सगळ्या पुरोगाम्यांचा यांना पाठिंबा आहे असे गृहीत धरू. त्यांना मिळालेली मते होती केवळ 8 टक्के. कम्युनिस्टांच्या उमेदवाराला अपशकुन करण्यासाठी कम्युनिस्टांच्याच लाल निशाण पक्षाने निवडणुक लढवली होती. त्यांना मते मिळाली केवळ अर्धा टक्का. (एकुण मतदान 8,86,869 आणि लाल निशाण पक्षाला मिळालेली मते 4,884). सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही आघाड्या बाजूला ठेवल्या तर या मतदार संघात बहुजन विकास आघाडी अधिक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अधिक लाल निशाण पक्ष हा उमेदवार आकड्यांची बेरीज केली तर खासदार म्हणून निवडुन येतो. तसेही बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव 2009 ला खासदार म्हणून निवडुन आलेच होते. 

म्हणजे जातीयवादी म्हणविणार्‍या भाजप आणि शिवसेना यांच्या मतांत डाव्यांच्या हक्काच्या मतदार संघात प्रचंड वाढ होते. इतकेच नाही तर तेच निवडुन येतात. शिवाय दोन नंबरची मते पण तेच घेतात. याचा अर्थ काय? 

दुसरीकडे भंडारा-गोंदियात भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेलाच उमेदवार निवडुन येतो. यातही परत एक मोठा काव्यगत न्याय आहे. भाजपचे खासदार नाना पटोले हे राजीनामा देवून कॉंग्रेसमध्ये गेले. अपेक्षा अशी होती की ही जागा कॉंग्रेसकडून तेच लढवतील. तसे झाले असते आणि ते जिंकले असते तर त्यांचे बंड यशस्वी झाले असे म्हणता आले असते. बरं दुसरीकडून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडुन आला म्हणून आनंद साजरा करावा तर स्वत: पटोले प्रफुल पटेल यांच्यावर कडाडून टीका करून मोकळे झाले. 

एकीकडे पालघरमध्ये निधन पावलेल्या खासदाराच्या पुत्राला सहानुभूतीची लाट तारू शकली नाही. त्या लाटेवर शिवसेनेची नाव तरली नाही. दुसरीकडे राजीनामा देवून बाहेर पडलेल्या उमेदवाराला तिकीटच मिळू नये अशी व्यवस्था करण्यात आली. शिवाय दुसरा उमेदवार निवडुनही आला. 

या सगळ्यात बोजवारा वाजला तो पुरोगामी राजकारणाचा. 1989 पासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे आघाडी विरूद्ध युती असे स्पष्ट ध्रुवीकरण झालेलेच आहे. तिसरे म्हणून जे निवडुन येत होते त्यांनी यापैकी एकाचा उघड अथवा छुपा पाठिंबा घेतलेलाच होता. तिसर्‍यांचा वापर युती आणि आघाडीने आपल्या आपल्या सोयीसाठी करून घेतला. 

1998 ची लोकसभेची मध्यावधी निवडणुक तर याचे सगळ्यात उत्तम उदाहरण. शरद पवार तेंव्हा कॉंग्रेसमध्ये होते आणि विरोधीपक्षनेते सुद्धा होते. त्यांनी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर खुल्या जागेवरून प्रकाश आंबेडकर (अकोल), रा.सु.गवई (अमरावती), जोगेंद्र कवाडे (चिमुर), रामदास आठवले (मुंबई) यांना निवडुन आणले होते. आणि या जोडाजोडीत आपले 33 खासदार पण निवडुन आणले होते. परत तसे यश कॉंग्रेसला आजतागायत कधी मिळाले नाही.

याच धर्तीवर 2014 च्या निवडणुकीत भाजपने राजू शेट्टी यांना हाताशी धरत 42 खासदार निवडुन आणले. राजू शेट्टी निवडुन आले पण सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर पडले.
अजून एक विचार करण्यासारखी बाब म्हणजे 'नोटा' ला फारसे मतदान पडत नाही.. ज्या आग्रहाने पुरोगामी चळवळीने नोटा साठी आग्रह धरला होता तो फारसा यशस्वी होताना दिसत नाही. चांगले उमेदवार मोठ्या पक्षांनी उभे करावे म्हणून एक दबाव लोकांनी तयार करणे भाग आहे. किंवा स्वतंत्र उमेदवार उभा करून त्याला मोठ्या प्रमाणात मतदान करणे भाग आहे. पण आम्हाला कुणीच मंजूर नाही अशी नकारार्थी भूमिका आपल्या लोकशाहीत फारशी पाचलेली दिसत नाही.  

तिसर्‍या पुरोगामी आघाडीचा वापर दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही आघाड्यांनी आपल्या सोयीसाठी करून घेतला. पोटनिवडणुकीत पराभवापेक्षाही आपसांतील क्ष्ाुद्र मतभेद पुरोगामी आघाडीने चव्हाट्यावर आणले हे त्यांच्या भविष्यासाठी फार घातक आहे. रामदास आठवले यांची रिडालोस जशी एकेकाळी हास्यास्पद ठरली होती तशी आता कुणी तिसरी आघाडी केली तर हास्यासपद ठरेल. त्यांना निवडुन येणे तर सोडा अनामत वाचवणं सुद्धा मुश्किल जाईल. आधी मुळात हे सगळे एकत्र येवून एकमेकांच्या विरूद्ध निवडणुक न लढवो म्हणजे खुप काही आहे.

1989 नंतर युती (भाजप सेना) विरूद्ध आघाडी (कॉंग्रेस राष्ट्रवादी) असे धृवीकरण झाल्यानंतर तिसरी आघाडीच्या नावाने पुढील प्रमाणे खासदार त्या त्या मतदारसंघात निवडून आले होते. यांना बर्‍याचदा सत्ताधारी आघाडी किंवा विरोधी यांची साथ लाभली होती.       

(सुदामकाका देशमुख (अमरावती-कम्युनिस्ट),  व्यंकटेश काब्दे (नांदेड-जनतादल), बबनराव ढाकणे (बीड-जनतादल), किसनराव बाणखेले (खेड-जनतादल), हरिभाऊ महाले (मालेगाव-जनतादल), मधु दंडवते (राजापुर-जनतादल), रामचंद्र घंगारे (वर्धा-कम्युनिस्ट), प्रकाश आंबेडकर (अकोला-भारीप बम), रा.सु.गवई (अमरावती-भारीप), जोगेंद्र कवाडे (चिमुर-भारीप), रामदास आठवले (मुंबई आणि पंढरपुर-भारीप), रामशेठ ठाकुर (रायगड-शेकाप), बळीराम जाधव (पालघर-बहुजन विकास आघाडी), सदाशिव मंडलीक (कोल्हापुर-अपक्ष), राजु शेट्टी (हातकणंगले- स्वाभिमानी)

पालघर पोटनिवडणुक मे 2018 निकाल 
1. गहाळा किरण राजा- सीपीआय (एम) 71,887 (08.1 %)
2. गावित राजेंद्र धेड्या - भाजप  2,72,782 (30.7 %)
3. दामोदर बारकु शिंगडा- कॉंग्रेस 47,714 (05.3 %) 
4. श्रीनिवास चिंतामण वनगा- शिवसेना 2,43,210 (27.4 %)
5. बळीराज सुकूर जाधव- बहुजन वि आघाडी 2,22,838 (25.1 %)
6. कॉ. शंकर भागा बडदे- लालनिशाण पक्ष         4,884 (00.5 %)
7. संदीप रमेश जाधव- अपक्ष                          6,670 (00.7 %)
नोटा 16,884 (01.9 %)
एकुण वैध मते 8,86,869 

भंडारा गोंदिया पोटनिवडणुक मे 2018 निकाल
1. कुकडे मधुकर यशवंतराव-राष्ट्रवादी 4,42,213 (46.6 %)
2. पटले हेमंत भाजप 3,94,116 (41.5 %)
3. एल.के.मडावी भारीप बम                        40,326 (04.2 %)
4. इतर सर्व                                           65,393 (06.8 %)
5. नोटा                                                  6,602 (00.6 %)
एकुण वैध मते 9,48,650   


(शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस ही तिसऱ्या आघाडीचा घटक म्हणून गृहीत धरली नाही. कारण सध्या त्यांनी स्वताला कॉंग्रेस आघाडीचा घटक म्हणून जाहीर केले आहे. गुजरात आणि कर्नाटकात त्यांनी कॉंग्रेस च्या विरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांची भूमिका अजूनतरी संशयास्पद आहे.)

श्रीकांत उमरीकर
मो. 9422878575

No comments:

Post a Comment