उरूस, सा.विवेक, एप्रिल 2018
औरंगाबादच्या वायव्येला मुकबरा आणि लेण्यांचा मोठा रम्य असा टेकड्यांचा परिसर आहे. याच परिसरात बाबासाहेबांनी आपल्या ‘पिपल्स एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेसाठी जागा घेतली आणि मिलींद महाविद्यालयाची स्थापना केली. तेंव्हापासून हा परिसर ‘मिलींद परिसर’ म्हणून ओळखला जातो. तेंव्हाच्या मराठवाडा विद्यापीठाची स्थापनाही याच परिसरात झाली. पुढे याच विद्यापीठाच्या नामांतराचा लढा मोठा गाजला. या परिसरातील बौद्ध लेण्यांमुळे हा परिसर भारलेला भासतो.
याच परिसरात विद्यापीठाकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर ‘श्रावस्ती’ हा पानतावणे सरांचा बंगला म्हणजे दलित साहित्य चळवळीचे मोठे उर्जा केंद्र. आपल्या ‘अस्मितादर्श’ या नियतकालीकाचा कारभार सर शेवटपर्यंत याच ठिकाणाहून पहात होते. सरांना पद्मश्री सन्मान जाहिर झाला. त्यांचे सगळे विद्यार्थी, चाहते, अस्मितादर्शचे वाचक सरांचा मोठा भव्य सत्कार सोहळा करण्यासाठी उत्सुक होते. पण त्यांच्या निधनाची वार्ता आली आणि सगळेच मनापासून हळहळले.
पानतावणे सर मुळचे विदर्भातील. सुरवातीला ते मिलींद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून लागले आणि पुढे तेंव्हाच्या मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले ते अगदी निवृत्ती होईपर्यंत.
सरांची रहाणी टापटीप असायची. पूर्ण बाह्याची चॉकलेटी रंगाची सफारी, डोळ्यांना जाडसर फ्रेमचा चष्मा, धारदार स्वच्छ आवाज, शांतपणे पण ठासून बोलायची शैली अशा त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप समोरच्यावर पडून जायची. सरांच्या कविता सुरवातील प्रतिष्ठान या मराठवाडा साहित्य परिषदेच्या नियतकालीकांत प्रसिद्ध झाल्या. पण नंतर आपल्या सृजनात्मक लेखनाला बाजूला ठेवून त्यांनी नवोदित दलित लेखकांच्या लेखनाची पाठराखण करायचा अवघड मार्ग अवलंबिला. ‘लिंबाणीच्या झाडामागे’ या अंगाईमध्ये एक ओळ अशी आहे ‘देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी’ पण पानतावणे सरांनी देवकी असूनही हे नवोदितांच्या लेखनाची पाठराखण करण्याचे यशोदेचे काम केले.
सरांची ओळख त्यांनी गेली 60 वर्षे अखंडपणे चालविलेल्या ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकासाठी मराठी साहित्य विश्वात ठसल्या गेली आहे. जेंव्हा दलितांचे साहित्य असा शब्दप्रयोगही रूजला नव्हता तेंव्हा दै. मराठवाडाने तेंव्हा या विषयावर एक परिसंवाद घेतला. त्याच काळात मराठवाडा साहित्य संमेलनातही या विषयावर चर्चा झाली.
60 च्या दशकात सुरू झालेल्या या चर्चेने गंभिर स्वरूप प्राप्त केले. बघता बघता दलित साहित्याचा एक अतिशय जोमदार असा प्रवाह मराठीत खळाळू लागला. या प्रवाहाचे संगोपन करण्याचे काम ‘अस्मितादर्शने’ केले.
पानतावणे सरांचा पिंड मिलिंद परिसरात तयार झाला होता. प्राचार्य म.भि.चिटणीस, म.ना. वानखेडे यांच्यासारख्यांनी मे.पुं. रेंगे, भालचंद्र फडके आदिंसोबत मिलींदच्या विद्यार्थ्यांची मनोभूमी सुपिक करण्याचे मोठे काम केले. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाने भारलेली ही पिढी. बाबासाहेबांच्या संस्थेत काम करत असताना पुरोगामी विचारांचे वारे इथे सतत कसे वहात राहतील याचाच विचार केला गेला. पानतावणे सरांना प्रेरणा याच परिसरात मिळाली. सरांना शेवटपर्यंत याची जाणीव होती. पुरोगामी चळवळीत दलितेतर प्राध्यापक, विचारवंत, लेखक यांनीही मोठे योगदान दिले. या सगळ्यांना उदारपणे पानतावणे सरांनी ‘अस्मितादर्श’ च्या व्यासपीठावर स्थान दिले. केवळ जन्माने दलित आहे तोच दलित साहित्यीक असे न मानता दलितांबद्दल लिहीणारा प्रत्येकजण त्यांना आपला वाटायचा.
केवळ नियतकालिक काढून भागणार नाही हे ओळखून पानतावणे सरांनी अस्मितादर्श साहित्य मेळावेही आयोजीत करायला सुरवात केली. तेंव्हाच्या प्रस्थापित साहित्य संमेलनांमध्ये (जे अजूनही चालूच आहे) नविन लेखकांची कोंडी होत होती. जिथे सगळ्यच नविन लेखकांची कोंडी होते तिथे नविन दलित लेखकांना कोण विचारणार? ही कोंडी फोडण्यासाठी हे अस्मितादर्श मेळावे उपयुक्त ठरू लागले. या मेळाव्यांचे स्वरूप व्यापक होत गेले. संपूर्ण महाराष्ट्रात सदर मेळाव्यांचे आयोजन करून सरांनी कार्यकर्त्यांचे एक मोठे जाळे तयार केले.
एरव्ही दलित चळवळ म्हणजे रस्त्यावर उतरून काहीतरी मोर्चा काढणार, आंदोलन करणार असे स्वरूप असताना साहित्य चळवळीद्वारे एक वैचारिक पाठबळ पुरविण्याचे काम पानतावणे सरांनी केले हे फार मोलाचे होते.
स्वातंत्र्यानंतर दलितांचे स्थलांतर शहरांत मोठ्याप्रमाणात सुरू झाले. या शहरी दलितांना अगदी राहण्यासाठी जागाही मुख्य वस्तीत दिल्या जात नव्हत्या. शहराच्या मुख्य सांस्कृतिक साहित्यीक संस्थांत दलितांचा सहभाग अतिशय नगण्य असायचा. अशा काळात साहित्यिक सांस्कृतिक दलित अस्मिता काळजीपूर्वक जोपासणे मोठी करणे मुख्य प्रवाहाशी फटकून न राहता समन्वय साधणे हे फार जिकीरीचे किचकट काम पानतावणे सरांनी केले. शहरी दलितांमधील मध्यमवर्ग सांस्कृतिक चळवळीत पुढे आला पाहिजे, त्यांनी आपल्या समाजाची वैचारिक जाण उंचावत नेली पाहिजे अशी त्यांची भूमिका असायची.
पानतावणे सरांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणुकी लढवली. त्यांचा पराभव झाला तरी त्याची कटूता त्यांनी मनात बाळगली नाही. साहित्य महामंडळाकडून पहिल्या विश्व संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव एकमताने आला आणि अध्यक्षपदी त्यांची निवड झाली तेंव्हा त्यांनी हे पद मोकळेपणाने स्विकारले. जूनी पराभवाची खंत उगाळली नाही. सरांच्या अशा वागण्याने त्यांचा पराभव करणारेच खजील झाले असतील.
वैचारिक अस्पृश्यता सरांनी कधी बाळगली नाही. संघ प्रणीत समरसता व्यासपीठावर सर गेले तेंव्हा त्यांच्यावर तथाकथित पुरोगाम्यांनी प्रचंड टीका केली. पण सरांनी असल्या विरोधाला फारशी भीक घातली नाही. ‘मी आंबेडकरी विचारांचा पाईक आहे. हा विचार कुठल्याही मंचावरून मी मांडेन. त्याला विरोध झाला तर मी त्या मंचावर जाणार नाही’ अशी सरांची स्वच्छ भूमिका होती.
सरांचे स्वत:चे संदर्भ ग्रंथालय अतिशय समृद्ध असे होते. पुस्तकांच्या गराड्यातच ते रहात असं म्हणायला हरकत नाही. अस्मितादर्श नियतकालिकाचे सगळे जूने अंक डिजीटल स्वरूपात जतन करून ठेवण्याचा प्रकल्प त्यांच्या मनात आकारत होता. त्या दृष्टीने कामही सुरू झाले होते. पण त्याला गती मिळू शकली नाही. सरांच्या समोर जर हे काम झाले असते तर त्यांना मोठे समाधान मिळाले असते.
दलित समाजात पानतावणे सरांसारखे बुद्धिमान प्रतिष्ठीत व्यक्तिमत्वे संख्येने कमी आहेत. हे लोक दलित समाज आणि इतर समाज यांच्यात संवादाचा पूल म्हणून महत्त्वाची भूमिका निभावत असतात. राखीव जागांचे धोरण ठरवत असताना हे आरक्षण प्रातिनिधीक असावं असं घटनाकारांच्या डोळ्यासमोर होतं. आरक्षण मिळालेल्या व्यक्तीने आपल्या समाजासाठी याचा वापर करावा. हा आशय पुरता ध्यानात ठेवून साहित्यिक सांस्कृतिक दृष्ट्या पानतावणे सरांनी काम केले.
दोन गोष्टींची खंत त्यांना सतत जाणवायची आणि ते बोलूनही दाखवायचे. बाबासाहेबांच्या ‘पिपल्स एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेच्या कारभारावर ते अत्यंत नाराज असायचे. ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श संस्था व्हायला हवी होती. तसे झाले असते तर बाबासाहेबांचे स्वप्न खर्या अर्थाने साकारले असते असे त्यांना वाटायचे.
तसेच दुसरी बाब म्हणजे रिपब्लिकन राजकारणाची झालेली फरफट. रिपब्लिकन गटांचे ऐक्य व्हावे व उपेक्षितांना न्याय देणारा एक समर्थ राजकीय पर्याय उभा रहावा या माताचा सतत पाठपुरावा सरांनी केला.
एक विचारवंत म्हणून आपली भूमिका निभावण्यात त्यांनी कुठेही कुचराई केली नाही. बोलण्यातला सौम्यपणा कधी बिघडू दिला नाही. शिव्यांनी भरलेली जहाल भाषा त्यांनी कधीच वापरली नाही.
मराठवाड्यात नाटककार दत्ता भगत, प्रा. अविनाश डोळस आणि डॉ. गंगाधर पानतावणे यांनी दलितत्वाचा शिक्का न मिरवता मुख्य प्रवाहातील वैचारिक साहित्यीक व्यक्तिमत्व म्हणून सन्मानाचे स्थान पटकावले. पानतावणे सरांच्या जाण्याने साहित्य क्षेत्राचे तर मोठेच नुकसान झाले आहेच पण दलित व इतर समाजाच्या संवादाचा सेतू असणारे व्यक्तिमत्व गेले हे दु:ख मोठे आहे.
सरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment