उरूस, पुण्यनगरी, 27 डिसेंबर 2015
डिसेंबर महिना विविध घटनांनी भरलेला आहे. 6 डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण, याच दिवशी बाबरी मशिद उद्ध्वस्त केल्या गेली, 24 डिसेंबर साने गुरूजींची जयंती, अभिनेता देवानंद याची पुण्यतिथी याच महिन्यात आहे (3 डिसेंबर) आणि शोमॅन समजला गेलेला राज कपुरचा जन्मही (14 डिसेंबर) याच महिन्यातला आहे. शरद पवार आणि गोपिनाथ मुंडे यांचा वाढदिवसही याच महिन्यात (12 डिसेंबर) आणि शेतकरी नेते शरद जोशी यांचा स्मृती दिनही (12 डिसेंबर) याच महिन्यात.
या शिवाय अजून एक वेगळी घटना याच महिन्यात घडली. 25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे सार्वजनिक दहन केले. या घटनेला आता 88 वर्षे झाली. बाबासाहेब हे भारतीय परंपरांचे दर्शनांचे मोठे अभ्यासक. त्यांना एखादा ग्रंथ जाळणे म्हणजे काय हे पूर्णपणे माहित होते. पुढे चालून दुर्गाबाई भागवत यांनी ग्रंथ जाळण्याबाबत जी टीका बाबासाहेबांवर केली त्याची जाणीव त्यांना निश्चितच असणार. पण ‘लाथों के भूत बातों से नही मानते’ या म्हणी प्रमाणे एक सणसणीत कृती करावीच लागते. महात्मा फुल्यांनी धार्मिक ग्रंथांची खल्लड ग्रंथ म्हणून निर्भत्सना पूर्वीच केली होती. मग बाबासाहेबांना ग्रंथ जाळण्याचे पुढचे पाऊल उचलणे भागच होते. ते त्यांनी उचलले. बाबासाहेबांच्या या कृतीवर नरहर कुरूंदकरांनी केलेले भाष्य अतिशय मार्मिक आहे. ‘हा ग्रंथ दिसेल तिथे जाळून टाकण्याची बाबासाहेबांची भूमिका नाही. ग्रंथ जाळून नष्ट करण्याचा रानटीपणा बाबासाहेबांना मान्य नव्हता. त्यांचे खरे भांडण पुस्तकाशी नसून त्यात व्यक्त झालेल्या समाजरचनेशी होते. ती समाजरचना जतन करू पाहणार्या मनोवृत्तीशी होते. म्हणून ते प्रतीकात्मक दहन होते. एक धक्का देवून सवर्ण समाजाला खडबडून जागे करण्याचा हेतू त्यामागे होता.’
ही मनुस्मृती नेमकी आहे तरी काय? त्यातील बहुतांश भाग टाकावू आहे यात काही वाद आता उरला नाही.
1950 नंतर घटना लागू झाली आणि देशभर निदान कागदोपत्री समानता प्रस्थापित झाली. तेंव्हा बाबासाहेबांची कृती निश्चितच महत्त्वाची होती. पण सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करणार्यांना मात्र या ग्रंथांला बाजूला ठेवून चालत नाही. आ.ह. साळूंके व नरहर कुरूंदकर यांच्यासारख्या विद्वानांनी यावर अतिशय प्रतिकूल लिहीले आहे. स्वामी वरदानंद भारती यांनी ‘श्री मनुस्मृती सार्थ सभाष्य’ हा ग्रंथ संपादित करून अभ्यासकांना उपलब्ध करून दिला आहे. त्यामूळे त्यात काय आहे हे आता सहज उपलब्ध आहे.
महात्मा फुल्यांनी जेंव्हा अभ्यास करण्याच्या निमित्ताने हा ग्रंथ हाती घेतला तेंव्हा त्यांच्यासमोर इंग्रजी भाषांतर उपलब्ध होते. 1813 मध्ये या ग्रंथांची संस्कृत संहिता पुस्तक रूपात उपलब्ध झाली. मराठी भाषांतर उपलब्ध होण्यास 1877 साल उजाडावे लागले. जनार्दन महादेव गुर्जर यांनी केलेले हे भाषांतर निर्णयसागर प्रेसने प्रकाशीत केले.
सध्या उपलब्ध असलेल्या संहितेप्रमाणे यात 2684 श्लोक आहेत. यातील फक्त 1 ते 58 श्लोक हे मनुने सांगितले आहेत. बाकी सर्व श्लोक हे भृगू ने सांगितले आहेत. म्हणजे एकप्रकारे ही भृगू संहिताच जास्त आहे. यातील किमान दहा टक्के श्लोक आजही विचार करावे असे आहेत. उदगीर येथील डॉ. गुडसूरकर यांनी अभ्यास करून यातील 268 ते 300 श्लोक शोधून काढले आहेत की ज्यांच्यावर आज कुठलाही वाद नाही. आजच्या काळाशी ते सुसंगत आहेत. निखळ वैचारिक भूमिकेतून या श्लोकांचा अभ्यास झाला पाहिजे असे त्यांचे अग्रहाचे प्रतिपादन आहे.
अरोग्य व आहार विषयक काही श्लोक मनुस्मृतीत आहेत. उष्टे अन्न खावू नये, अतिभोजन हे अनारोग्यकारक, आयुष्य कमी करणारे व दुसर्याचा घास हिरावणारे असते म्हणून ते टाळावे. संध्याकाळी जेवू नये व झोपू नये. पचण्यास जड असलेले पदार्थ खाऊ नये. जेवण केल्यावर लगेच स्नान करू नये. उलट स्नान केल्यावर मगच जेवण करावे. जव, गहू व दूध यापासून बनविलेले पदार्थ बर्याच दिवसांपवूर्वी केलेले असले तरी खाण्यायोग्य असतात. उदा. दुधातील दशमी वगैरे. आजच्या मांसाहाराविषयी जे समज गैरसमज पसरले किंवा पसरविले आहेत त्याबाबत एक अतिशय धक्कादायक धाडसी विधान मनुस्मृतीत आहे. या जगातील प्रत्येक सजीव वस्तू ही खाण्यायोग्य आहे. (श्लोक 5-28). आरोग्य विषयक लिहीताना ज्या गावात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल त्या गावात राहू नये. रात्री झाडाखाली झोपू नये. कामवासना उत्कट झाली तरी रजस्वला स्त्रीशी संभोग करू नये.
ही सगळी विधाने आजही लागू पडतात. त्यातील विज्ञान आपण आज योग्यरितीने समजून घेतले आहे. तेंव्हा या भागाचा विचार आजही आपण करू शकतो.
विद्या ही ब्राह्मणांनी आपल्या जवळ लपवून ठेवली आणि ती इतरांना दिली नाही असा एक आरोप केला जातो. पण मनुस्मृतीत मात्र विद्येसंबंधी वेगळे विचार आहे. विद्या ही आपल्या वरिष्ठांकडूनच नव्हे तर कनिष्ठा जवळ असली तरी शिकून घ्यावी. (इथे वरिष्ठ कनिष्ठ हे जातीप्रमाणे नसून सिनिअर ज्युनिअर या अर्थाने आहेत) गुरूने शिष्याला जे काही शिकवायचे ते ताडन न करता मधुर वाणीने शिकवाने. आज मुलांना मारू नये म्हणून जो नियम मानस शास्त्राच्या अभ्यासकांनी करायला लावला आहे त्याचा दाखला मनुस्मृतीत आढळतो. मूल्य घेवून शिकवू नये असा एक नियम मनुस्मृतीत सांगितला आहे. त्याचा आजच्या काळात इतकाच अर्थ काढता येतो की शिक्षणाचा बाजार मांडता कामा नये.
स्त्रीयांवर मनुस्मृतीने अन्याय केला हे खरेच आहे. पण याच मनुस्मृतीत मातृगौरव सांगताना दहा उपाध्यायांपेक्षा आचार्य श्रेष्ठ, शंभर आचार्यांहून पिता, पित्यापेक्षा सहस्त्रपट माता गौरवार्ह आहे असं सांगितले आहे. आई म्हणजे सर्व भार सोसणारी पृथ्वीच होय असेही वर्णन यात आलेले आहे.
थोरल्या भावाची पत्नी ही धाकट्या भावास गुरुमातेप्रमाणे व धाकट्या भावाची पत्नी थोरल्या भावास सुनेप्रमाणे आहे. परस्त्रीशी बोलताना भगिनी सुभगे असे संबोधून बोलावे. असेही यात आलेले आहे.
लग्नाच्या बाबत कन्येसाठी कुठलेही शुल्क घेवू नये असे सांगितले आहे. म्हणजे कुठल्याही अर्थाने हुंडा पद्धत त्याज्य. घरातील वडिलधार्यांनी मुलीचे लग्न योग्य वयात लावून दिले नाही तर तिने स्वत: पती निवडावा.
आपल्या समाजाचा सगळ्यात छोटा घटक हा एक कुटूंब आहे. तेंव्हा गृहस्थाश्रम आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा मानला गेला आहे. मनुस्मृतीने गृहास्थाश्रमास सर्व आश्रमांचा ‘प्राणवायु’ मानले आहे.
सार्वजनिक वाहतुकीचेही नियम मनुस्मृतीत आले आहेत. वृद्ध, रोगी, स्त्री, ओझे वाहणारा, विद्वान व राजा यांना आधी मार्ग उपलब्ध करून द्यावा. आजही हे आपण पाळणे संयुक्तीक आहे. प्रदुषणावर मनुस्मृतीत जे सांगितले आहे ते म्हणजे मल-मूत्र, रक्त, थुंकी, घाण व विष हे जलाशयांत टाकू नये. प्रत्येक गावाच्या भोवती किमान 400 हात रूंदीची मोकळी जागा (हरित पट्टा) गुरांच्या चरण्यासाठी राखून ठेवावी. नगराभोवती हाच पट्टा 2000 हात रूंदीचा असावा. राजमार्गावर घाण, केरकचरा टाकणे दंडनीय आहे.
सार्वजनिक सुरक्षे बाबत सांगताना संध्याकाळी ग्रामांतर करू नये, गाव किंवा घर यांची तटबंदी ओलांडून उडी मारून प्रवेश करू नये, ज्या जलाशायाचे ज्ञान नाही त्यात उतरून स्नान करू नये, भल्या पहाटे अंधारात प्रवासाला निघू नये. हे सगळे साधारणत: दोन हजार वर्षांपूर्वीच्या सामाजिक स्थितीवर लिहीले आहे.
विद्या, शिल्प, शेती, गोरक्षण, मजुरी, भिक्षा व दान यातून अतिरिक्त धन संचय होवू शकत नाही हे मनुने सांगितले आहे. म्हणजे यातून उपजिविका होवू शकते, पोटापुरते मिळू शकते पण काही शिल्लक राहू शकत नाही असे मनुस्मृतीचे म्हणणे आहे.
भेसळीच्या बाबतही काही कडक दंड यात सुचविले आहेत. अंकुरित न होणारी बीजे विकणे तसेच बियाणांची भेसळ या गुन्ह्यासाठी मृत्यूदंड सुचवला आहे. अभिचार कर्म (भानामती, चेटूक, मूठ मारणे इत्यादी वशीकरणाचे प्रयोग करणारे) तसेच जादूटोणा करारे यांना 200 पट दंड सुचविलेला आहे. दाभाळकरांची हत्या झालेल्या या महाराष्ट्रात या बद्दल अजून काय सांगायचे?वैद्यक शास्त्राचे कसलेही ज्ञान नसताना चिकित्सक बनुन जे औषणे वगैरे देतात त्यांनाही जबर दंड सुचविला आहे. बोगस डॉक्टरांच्या कितीतरी बातम्या आपण वाचत असतो.
असे किमान 300 श्लोक आज विचार करावे असे आहेत. डॉ. रंगनाथ गुडसूरकर यांनी आपल्या ‘निवडक मनुस्मृती’ या पुस्तकात यावर चर्चा घडवून आणली हे महत्त्वाचे काम केले आहे. 25 डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन. या निमित्ताने या ग्रंथाला शिव्यादेण्यापेक्षा त्याच्या काळसुसंगत पैलूवर चर्चा होणे हे जास्त महत्त्वाचे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575