दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 29 एप्रिल 2014
गायकाच्या उजव्या बाजूला तबल्यावर शंकरसिंग रघुवंशी आहेत आणि डाव्या बाजूला हार्मोनियमवर जयकिशन डाह्याभाई पांचाळ. गाणं अप्रतिम आहे आणि लोक भरभरून दाद देत आहेत. असं जर लिहीलं तर कुणाला काहीच कळणार नाही. एखाद्या गाण्याबद्दल हे वर्णन असून कलाकारांची नावे आहेत. पण हेच जर ‘शंकर-जयकिशन’ असा नुसता शब्द लिहीला तर पुढचे फार काही लिहीण्याची गरजच पडणार नाही. जून्या हिंदी गाण्याच्या प्रेमींच्या डोळ्यासमोर शेकडो गाणी दिसायला लागतील. कानात त्यांचे मधुर सुर घुमायला लागतील.
शंकर जयकिशन या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडीतील शंकर यांची 26 एप्रिल ही पुण्यतिथी. (शंकर जन्म:15 नोव्हें.1922 मृ: 26 एप्रिल 1987, जयकिशन जन्म: 4 नोव्हें 1929 मृ.:12 सप्टें.1971) त्यांची आठवण होण्याचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेला लग्नाचा हंगाम. घराच्या जवळ मंगल कार्यालयात एक लग्न होतं. त्याच्या वरातील डिजेच्या ढणढणाटी आवाजात गाणी वाजत होती आणि काही जण नाचत होते काही शांतपणे चालत होते. इतक्यात गाणं बदललं. आणि बघता बघता तरूण म्हातारे मध्यमवयीन बायका पुरूष सगळेच नाचायला लागले. ते गाणे होते ‘‘रामय्या वस्तावय्या, मैने दिल तुझको दिया’’. राज कपुरच्या श्री 420 या चित्रपटातील हे प्रसिद्ध गाणे. मी नाचणार्या एका अठरा वर्षाच्या पोराला थांबवून उत्सूकतेने विचारले, ‘‘मित्रा, हे गाणं कुठलं आहे? तूला माहित आहे का?’’ तो म्हणाला, ‘‘पता नही अंकल. लेकीन ट्यून कितनी जबरा है.’’ सर्वसामान्यांच्या ओठांवर खेळावीत आणि ऐकता ऐकता पायांनी ताल धरावा, सार्वजनिक ठिकाणी सहजपणे नाचता यावे ही ताकद शंकर जयकिशनच्या गाण्यांची होती.
शंकर हे पृथ्वीराज कपुर यांच्या पृथ्वी थिएटर या नाटक कंपनीत तबला वाजविण्याचे काम करायचे. ते एका गुजराती चित्रपट निर्मात्याकडे संगीत देण्याची संधी मिळते का हे पाहण्यासाठी चकरा मारत होते. तेंव्हा त्यांना जयकिशन नावाच्या तरूण मुलाची गाठ पडली. तोही याच कामासाठी चकरा मारत होता. तो हार्मोनिअम अप्रतिम वाजवायचा. या दोघांची ओळख झाली. संगीत दोघांच्याही रक्तात वहात होते. पुढे ही मैत्री इतकी घट्ट झाली की जयकिशन यांच्या अकाली जाण्यानंरतही 16 वर्षे एकट्या शंकर यांनी चित्रपटांना संगीत दिले पण नाव मात्र ‘शंकर जयकिशन’ असेच ठेवले होते. तसा त्या दोघांत करारच झाला होता असं म्हणतात.
शंकर यांनी जयकिशन यांनाही पृथ्वी थिएटरमध्ये बोलावून हार्मोनिअम वाजवायचे काम मिळवून दिले. त्यांच्या सोबतच पृथ्वी थिएटरमध्ये एक गोरा देखणा तरूण आपल्या निळ्या डोळ्यांत नव्या चित्रपटाची स्वप्ने घेवून फिरत होता. त्याने आग नावाने पहिला चित्रपट काढला. त्या चित्रपटाला संगीत देणार्याला राम गांगुली यांना सहाय्यक म्हणून शंकर काम करत होते. दुसर्या चित्रपटाच्यावेळी त्या तरूणाच्या लक्षात आल्या की जुन्या लोकांशी आपले जमणार नाही. समवयस्क शंकरसोबत त्याच्या काळजाच्या तारा जुळल्या. त्याचे नाव राज कपुर. शंकरने जयकिशनला सोबत घेण्याचा आग्रह धरला. बरसात, आह, आवारा, श्री 420, जिस देश मे गंगा बहती है, बुट पॉलिश, संगम, मेरा नाम जोकर असे एकाहून एक चित्रपट देत शंकर-जयकिशन आणि राजकपुर या जोडीने इतिहास घडविला.
शंकर जयकिशनचे नाव काढले की पहिल्यांदा राज कपुरच डोळ्यांसमोर येतो. मुकेशचा आवाज आपल्या कानात घुमायला लागतो ‘मेरा जुता है जपानी’, ‘आवारा हुं’, ‘किसी की मुस्कूराहटों पे हो निशा’, ‘दुनिया बनानेवाले क्या तेरे मन मे समाई, काहे को दुनिया बनाई’, ‘होठों पे सच्चाई होती है’ हीच गाणी येतात. कारण तशी प्रतिमाच तयार झाली आहे.
शंकर जयकिशनबद्दलची भरपूर माहिती आता महाजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध आहे. एकाने तर बरीचशी अचुक अशी आकडेवारीच दिली आहे. ती बघितली की जरा आश्चर्याचा धक्काच बसतो. राजकपुर मुकेश यांच्याशी आपण शंकर जयकिशनला कायम जोडत आलो. पण त्यांच्याकडे लता मंगेशकरला सर्वात जास्त (466) गाणी आहेत.मोहम्मद रफी (363), आशा भोसले (213) यांच्यानंतर मुकेश (134) चा नंबर लागतो. किशोर कुमार (103) आणि मन्ना डे (77) हे नंतर येतात.
पं. नेहरूंच्या समाजवादी व्यवस्थेचा तो काळ होता. त्यामुळे राजकपुरचे चित्रपट त्या विचारसरणीकडे झुकलेले असायचे. हाच धागा गीतकार शैलेंद्र यांनी पकडला. शंकर जयकिशन यांच्या संगीताने या विचारसरणीला कलात्मक रूप दिले. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चिमात्य संगीत असा त्रिवेणी संगम जर कुणाच्या गाण्यात प्रामुख्याने दिसत असेल तर तो शंकर जयकिशन यांच्याच. हसरत जयपुरी आणि शैलेंद्र या दोन गीतकारांचा सर्वात जास्त वापर त्यांनी आपल्या गाण्यात केला.
मुकेशचा आवाज ज्यांच्या संगीताची ओळख बनला त्यांना फिल्म फेअर पुरस्कार मात्र ‘चोरी चोरी’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा मिळाला ज्यात मुकेशचे एकही गाणे नाही. काय आश्चर्य आहे हा चित्रपट राजकपुर-नर्गिसचा आहे पण आरके बॅनरचा नाही. ‘आजा सनम मधुर चांदनी मे हम’, ‘ये रात भिगी भिगी’, ‘जहा मै जाती हु वही चले आते हो’, ‘पंछी बनु उडके फिरू’, ‘मन भावन के घर आये गोरी’ अशी एकापेक्षा एक अप्रतिम गाणी यात आहे ज्यांनी शंकर जयकिशनच्या नावावर पहिल्यांदा पुरस्काराची मोहर उठवून दिली.
त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची संख्या पावणेदोनशेच्या घरात आहे. वयाच्या 41 व्या 1971 मध्ये वर्षी जयकिशन यांचे अकस्मात निधन झाले. गुजरात मध्ये त्यांच्या जन्मगावी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. जयकिशनयांच्या अंत्ययात्रेला प्रचंड जनसमुदाय लोटला होता. जयकिशन गेल्यावर ते ज्या चर्चगेटच्या गेलॉर्ड हॉटेलमध्ये बसायचे त्या टेबलावर मेणबत्ती लावून ‘हा टेबल जयकिशन यांच्यासाठी राखीव आहे’ अशी महिनाभर पाटी ठेवलेली होती.
जयकिशन यांच्या मृत्यूनंतर शंकर आणि राजकपुर यांचे सांगितिक संबंध तुटले. पुढची 16 वर्षे शंकर एकट्याने संगीत देत होते. पण आता त्यांच्यातील प्राणच निघून गेला होता. हळू हळू शंकर एकटे पडत गेले. 1986 मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेंव्हा अंत्यसंस्कार समयी अतिशय मोजके लोक होते. राजकपुरही तेंव्हा उपस्थित नव्हते.
मेरा नाम जोकर हा राजकपुर सोबतचा त्यांचा शेवटच्या काळातला चित्रपट. यात शैलेंद्रचे गाणे आहे
कल खेल मे हम हो ना हो
गर्दीश मे तारे रहेंगे सदा
भूलोंगे तूम भूलेंगे वो
पर हम तूम्हारे रहेंगे सदा
रहेंगे यहा अपने निशा
इसके सिवा जाना कहा
शंकर यांच्याही ओठांवर मृत्यूसमयी हीच ओळ असेल.
पतिता हा त्यांचा अगदी सुरवातीच्या काळातला राजकपुर प्रभावाच्या बाहेरचा अतिशय वेगळा चित्रपट. यात लताच्या आवाजात शैलेंद्रचे शब्द अतिशय समर्पक आहेत. भारतीय रसिकांची शंकर जयकिशन यांच्या प्रती हीच भावना असेल
वो रंग भरते है जिंदगी मे
बदल रहा है मेरा जहां
कोई सितारे लूटा रहा था
किसीने दामन बिछा दिया
रसिकांच्या पदरात चांदण्याचे दान देणार्या या प्रतिभावंतांना श्रद्धांजली.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:
Post a Comment