Tuesday, December 3, 2013

हे आंबेडकर किती दलितांना माहित आहेत?

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 3 डिसेंबर 2013 


माझ्या अतिशय जवळच्या मित्राने प्रकाश भेरजे याने घर बांधले. त्याची जात माहित नसल्याच्या शाळेकरी चड्डितल्या दिवसांची आमची मैत्री. त्यानं मला मोकळेपणाने घराच्या नावाबद्दल विचारलं. तो बौद्ध धर्माचा (बौद्ध परिभाषेत धम्माचा) अनुयायी असल्यामुळे बौद्ध तत्त्वज्ञानातील, आंबेडकरांच्या लिखाणातील एखादे नाव शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो. त्याच्या अगदी जवळच्या मित्रांमध्ये सगळ्या विविध जातीचे मित्र आहेत (ब्राह्मण, मराठा, ओबीसी). ही त्याची समन्वयाची दृष्टी लक्षात घेवून मी ‘कनिष्क’ हे नाव त्याला सुचवले. 

कनिष्काबद्दल माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘बौद्ध ऍण्ड हिज धम्मा’ या पुस्तकातच आहे. भिक्षु  नागसेन यांच्याशी  झालेल्या ऐतिहासिक प्रश्नोत्तरानंतर ग्रीक राजा मिलींद बौद्ध बनला.  नंतर कुशाणांनी ग्रीकांवर विजय मिळवला. भारतात येण्यापूर्वीच कुशाणांची बौद्ध धर्माची ओळख झाली होती. इ.स.78 मध्ये कुशाण सम्राट ‘कनिष्क़’ यास बौद्धधर्माविषयी सुरुवातीस सहानूभूती नव्हती. पण नंतर तो बौद्ध बनला. त्यानेच बौद्ध भिक्षूची  परिषद बोलावली होती. ती चतुर्थ धर्म संगीती या नावाने ओळखिली जाते. या धर्मसंगीती मागचा कनिष्काचा उद्देश बौद्धधर्मग्रंथाचे विवेचन करणे हा होता. या विवेचनामागची भाषा पाली नसून संस्कृत होती. (भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, मराठी आवृत्ती, प्राक्कथन, पृ. 17)

मित्राला "कनिष्क" हे नाव मी सुचविले पण त्या निमित्ताने ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पुस्तकाचे वाचन करण्याचा योग आला. बुद्धीवर आधारीत असलेल्या एक नव्या रसरशीत धर्माची वेगळी ओळख बाबासाहेबांनी करून दिली आहे असं लक्षात आले. बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध हा पारंपरिक बुद्ध नाही. श्रीमद् भागवतात मानल्या गेलेला विष्णूचा नववा अवतार असा हा बुद्ध नाही.

सर्वांना परिचित असलेली गोष्ट म्हणजे राजपुत्र सिद्धार्थाने मृत देह, मराणांत वेदनांनी कळवळणारा रूग्ण व जख्ख म्हातारा मनुष्य पाहिला. आणि त्याने सन्यास घेण्याचे ठरविले. (बौद्ध परिभाषेत परिव्रज्या) बाबासाहेबांनी याला हास्यास्पद म्हणून उडवून लावले आहे. खरं तर या मिथकावर जी.ए. कुलकर्णी सारख्या लेखकाने मोठी गोष्ट लिहीली. ती शालेय अभ्यासक्रमात एकेकाळी होती. हे नाकारताना बाबासाहेबांनी दिलेला तर्क बुद्धीला पटणारा आहे. ते म्हणतात, ‘वरवर पाहताही हे उत्तर हास्यास्पद वाटते. बुद्धाने आपल्या वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी परिव्रज्या ग्रहण केली. ह्या तीन दृश्यांची परिणती म्हणून जर त्याने परिव्रज्या ग्रहण केली असली तर ही तीन दृश्ये तत्पूर्वी त्याला कधी कशी दिसली नाहीत? ह्या शेकड्यांनी घडणार्‍या नेहमीच्या घटना आहेत. आणि त्या तत्पूर्वी बुद्धांच्या सहजच नजरेस न येणे असंभव आहे.’

या सन्यासाच्या संदर्भात जो प्रसंग घडला आहे त्याची अतिशय वेगळी आणि बुद्धिला पटणारी मांडणी बाबासाहेबांनी केली आहे. वयाची वीस वर्षे पूर्ण झालेल्या युवकाला शाक्य संघाची दिक्षा देण्यात येत असे. राजपुत्र सिद्धार्थाने ही दिक्षा घेतली त्याला आठ वर्षे उलटून गेलेली होती. म्हणजे शाक्य संघाच्या कामाचा त्याला आठ वर्षे इतका अनुभव होता. संपूर्ण माहिती होती. 

शाक्य आणि कोलिय (जवळपासचे दोन राज्ये) यांच्यात रोहिणी नदीच्या पाण्यावरून तंटा उत्पन्न झाला. (नगर-नाशिक आणि औरंगाबादच्या लोकांना या प्रश्नाच्या तीव्रतेबाबत काही सांगायची सध्या गरज नाही. गोदावरीचे पाणी त्याचे साक्षी आहे) शाक्यांच्या सेनापतीने सभेत युद्धाचा ठराव मांडला. सिद्धार्थ गौतमाने याला विरोध दर्शविला. ‘युद्ध करून हेतू सफल होत नाही.  प्रथम दोष कोणाचा हे समजून घ्यावे. आपल्या लोकांनीही आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो.’ असे सिद्धार्थाने मांडले. 

वादविवादात ठराव मतास टाकल्या गेला. (तेंव्हा राजदंड पळविणे, प्रत्यक्ष मतदान न होऊ देता गोंधळ घालणे, टिव्ही चॅनलवरून बाईट देऊन वातावरण भडकविणे असल्या गोष्टी त्या काळच्या लोकांना येत नव्हत्या असे दिसते.....) फार मोठ्या बहुमताने ठराव सिद्धार्थाच्या विरोधात संमत झाला. 

युद्धाची निश्चिती झाल्यावर सैन्यभरती सुरू झाली. त्याला सिद्धार्थाने विरोध केला व युद्ध करण्याचे नाकारले. हा संघाच्या नियमाचा भंग होता. त्याला ज्या शिक्षेला सामोरे जावे लागणार होते त्यात 1. देहांत शासन 2. देशत्याग 3. कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन मालमत्तेची जप्ती. यांचा समावेश होता.  

सिद्धार्थाने देहांत अथवा देशत्यागाची शिक्षा स्विकारण्याची तयारी दाखविली. स्वत:च्या निर्णयाची शिक्षा कुटूंबाला नको अशी त्याची भूमिका होती. पण ही शिक्षा देण्यास संघ तयार झाला नाही. तेंव्हा बुद्धाने परिव्रजेचा मार्ग सुचविला. मी आपणहून सन्यास घेतो व देश सोडून जातो. पण त्यातली अडचण म्हणजे घरच्यांची परवानगी घेतल्याशिवाय असे करता येत नाही. तेंव्हा ही परवानगी घेवून अथवा न मिळाल्यास तसेही परिव्रज्या स्विकारून देश सोडण्याचे वचन सिद्धार्थाने दिले आणि हा तिढा सोडवला. 

घरच्यांची परवानगी घेताना शेवटी पत्नी यशोधरा हीने ज्या धैर्याने सिद्धार्थाला उत्तर दिले त्याचा उल्लेख फारसा कुठे येत नाही. बाबासाहेबांनी नेमकी हीच जागा हेरून त्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यशोधरा सिद्धार्थाला म्हणते आहे, ‘ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत अहात त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की, तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल.

पुढे ज्या भांडणाचे कारण होवून सिद्धार्थाने संन्यास घेतला ते कारणच नष्ट झाले. तो तंटा मिटविण्याचा निर्णय झाला व लोकांनी  सिद्धार्थास परत येण्याचे विनविले. पण ‘युद्धामुळे मी घर सोडले हे खरे. पण शाक्य व कोलीय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की, माझ्यापुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे.’ असा निर्धार करून सिद्धार्थाची ‘बुद्ध’ बनण्याची वाटचाल सुरू झाली. 

बाबासाहेबांनी सोप्या पद्धतीने बुद्ध चरित्राची मांडणी केली आहे. यात कुठेही चमत्काराला जागा नाही. कुठेही कर्मकांडाचा विषय नाही. कुठेही भाकड कथा नाहीत. हे सगळं टाळून बाबासाहेब ही मांडणी करत जातात. 
बाबासाहेबांनी हे नाकारणे याला एक खास अर्थ आहे. त्यांना जो बुद्ध धर्म मांडायचा आहे तो वेगळा आहे. तो जसा आहे तसा ते स्विकारायला तयार नव्हते. बुद्ध आत्मा अमान्य करतात पण कर्म आणि पुनर्जन्म मान्य करतात. हा विरोधाभास होय अशी टिका बौद्ध तत्त्वज्ञानावर केल्या जाते. त्याचेही अतिशय सोपे विश्लेषण बाबासाहेबांनी केले आहे. अंब्याची कोय असते. कोयीतून आंब्याचा वृक्ष निर्माण होतो. आंब्याच्या वृक्षाला आंब्याची फळे येतात. हा आंब्याचा पुनर्जन्म आहे. अशा भाषेत बाबासाहेब हा गहन विषय सोपा करतात.
पण असा हा बुद्धीवर आधारलेला बुद्ध धर्म आज किती जणांना हवा आहे? मुळात तो दलितांना तरी हवा आहे का असा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी घटना समितीसाठी दिलेले योगदान प्रचंड मोठे आहे. आपल्या परंपरेतील लोकशाही तत्त्वे शोधून तसेच इतर देशातील लोकशाही तत्त्वे यांचा अभ्यास करून त्या सगळ्याचा समावेश त्यांनी त्यात केला. ही घटना  मानवी दु:खाचे मुळ शोधायला बाहेर पडलेल्या आणि विविध पंडित विद्वानांशी ऋषींशी चर्चा करणार्‍या राजपुत्र सिद्धार्थाशी जूळणारीच आहे. आपण ते समजून घेत नाहीत हेच खरे दुर्दैव आहे.
6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दलितांचे उद्धारकर्ते म्हणून सोडा पण एक अतिशय बुद्धीमान महामानव म्हणून तरी आम्ही बाबासाहेबांना समजून घेणार आहोत का? 

माझे वडिल वकील आहेत. त्यांच्या बैठकीच्या खोलीत बाबासाहेबांचा मोठा फोटो लावला आहे. मला वाटायचे इतरांसारखे त्यांनाही आपण दलितांचे कैवारी असल्याचा देखावा करायचा असावा. पण मी कधी त्यांना विचारले नाही. त्यांच्या अतिशय जवळच्या मित्राने त्यांना एकदा  न राहवून विचारले, ‘‘हा आंबेडकरांचा फोटो तू काय म्हणून लावून ठेवला आहेस? बरं इतर कुणाचाही फोटो तूझ्या घरात नाही.’’ माझे वडिल काय उत्तर देतात हे मी उत्सूकतेने मधल्या खोलीत बसून ऐकत होतो. त्यांनी दिलेलं सहज उत्तर मला थक्क करून गेलं. ‘‘हे बघ मी वकील आहे. आमच्या क्षेत्रातला सगळ्यात मोठा माणूस म्हणजे डॉ. आंबेडकर. तेंव्हा मी त्यांचा फोटो लावणं यात तूला काय खटकतं?’’ त्यांचे मित्र निरूत्तर झाले. 'दलितांचा कळवळा' हे गुळगुळीत उत्तर देवून त्या आधारावर दलितमित्र पुरस्कार ते मिळवून घेवून शकले असते. तेवढं त्यांचं सामाजिक वजन आहेही.

स्वाभाविकपणे आंबेडकरांना स्वीकारायची वृत्ती दाखवून त्यांनी अजून मोठी उंची गाठली असंच मला वाटलं. आज बुद्धीच्या तर्कावर आधारलेला बुद्ध धम्म स्वीकारणारे बाबासाहेब आम्ही (दलित आणि सवर्ण दोघेही) स्वीकारणार आहोत का हा खरो प्रश्न आहे.

5 comments:

  1. लेख आवडला
    आणि मुळात तो गृहत्यागाच्या सत्य गृहितकांवर आधारभुत आहे
    त्यामुळे आभारी आहे

    मात्र हे आंबेडकर किती दलितांना माहित आहेत?

    असे शिर्षक देणं इथं चुकिचं वाटलं
    लेखात मांडलेल्या गोष्टि बुद्ध आणि आंबेडकर अभ्यासलेल्या प्रत्येकाला माहित आहेत
    दलितांना माहित आहेत का ?
    असे लेखकाला का विचारावेसे वाटले ते समजले नाही
    त्यापेक्षा "हे आंबेडकर किती भारतियांना माहित आहेत?"
    असे शिर्षक जास्त संयुक्तिक ठरले असते
    कृपया दलित-सवर्ण असे उल्लेख आपण टाळायला सुरुवात केली पाहिजे
    असो
    जय भीम !!

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या परखड प्रतिक्रियेबद्दल खरेच आभारी आहे. धन्यवाद!

      Delete
  2. लेख मी खूप उशिरा पाहिला , वाचला,आवडलाही .
    जीएंच्या "भेट" कथेचाच संदर्भ आपण दिला आहे ना ?
    धुमाळ्यांची सूचना नेमकी आहे ,योग्य आहे.
    तुमचे त्या सूचनेच्या स्वीकाराचे उत्तर त्वरीत आले आहे , तेही खूप आवडले.

    ReplyDelete
  3. आपले प्रगल्भ लेखन आमच्या सारख्या नवलेखकांना मोठी प्रेरणा देतात
    .............
    jagarblog.com

    ReplyDelete
  4. मिलिंद धुमाळे यांच्या मताशी मी सहमत आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वर्षावासाच्या काळात विहारांमधून नियमित वाचन केल्या जाते। गृहत्यागाचे पारंपरिक कारण केंव्हाच नाकारण्यात आले आहे. सिद्धार्थ मध्यरात्री यशोधरा आणि राहुल झोपलेले असतांना गुपचूप निघून गेले, ही कहाणी देखील नाकारली आहे। पण आपण विचारलेला प्रश्न की बुद्धीवाद बाबासाहेब आपण स्वीकारले का? हा विचार करावा असा प्रश्न शिल्लक राहतोच। बाकी आपण केलेली मांडणी छानच आहे। अभिनंदन आणि आधारही

    ReplyDelete