Tuesday, December 17, 2013

कुठे ‘शशांका’चे स्वरचांदणे, कुठे बाजारू गर्दीची पैंजणे

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 17 डिसेंबर 2013

औरंगाबाद शहरात एकाच आठवड्यातील शास्त्रीय संगीताच्या दोन मैफलींमधला हा प्रसंग. पहिली मैफिल होती स.भु.शिक्षण संस्थेने भरविलेल्या गोविंदभाई श्रॉफ स्मृति संगीत समारोहातील. चाळीशीतला प्रौढ तरूण गायक मंचावर आला. त्यानं आपली बैठक जमविली. पहिल्या आलापीतच राग मालकंस गाणार असल्याचे लक्षात आले. ग्वाल्हेर घराण्याची दमदार खानदानी गायकी सिद्ध करत अतिशय तयारीने त्याने आपलं गाणं सादर केलं. बघता बघता समोरच्या मोजक्याच दर्दी श्रोत्यांवर त्याची जादू पसरली. नेमक्या जागी लोकांनी दाद दिली तसं तसं त्याचं गाणं फुलत गेलं. त्या गायकाचं नाव शशांक मक्तेदार. संगीतात डॉक्टरेट मिळविणारा हा प्रतिभावंत गायक आता गोव्यात संगीताचा प्राध्यापक आहे. पंचेविस वर्षांपूर्वी याच स.भु.च्या परिसरात या गायकाचा कोवळा सुर उमटला होता.  मी तेंव्हा त्याच महाविद्यालयात विद्यार्थी होतो. विज्ञानाची प्रात्यक्षिक परिक्षा आटोपून पायर्‍या उतरत असताना शशांकच्या तोडीचे सूर कानावर पडले. त्या सुरांकडे मी ओढला गेलो. जालान सभागृहात शशांक गात होता. त्याची निवड तेंव्हा केंद्रिय युवक महोत्सवात झाली होती. तेंव्हा तो 18 वर्षांचा एक महाविद्यालयीन तरूण होता. पुढे  त्याला अतिशय मानाची आय.टी.सी.ची शिष्यवृत्ती मिळवून भारतात पहिला आला. कलकत्त्याला पं.उल्हास कशाळकरांकडे गाणं शिकला.आज त्याचा प्रौढ सुंदर आवाज कौतूकाच्या पलिकडे जावून प्रस्थापितांच्या रांगेत बसला आहे. ज्या मातीत त्याची पावलं रांगली त्याच मातीत तयारीचा गायक बनून त्यानं मैफल रंगवली. गाणं भरात असताना चंद्रकोर लिंबाआडून  काव्यात्म वाटावी अशी दिसत होती. ठरवूनही अशी स्थिती निर्माण करता येणार नाही.
या मैफलीला श्रोते मोजकेच होते. गाणं संपल्यावर गायकाला भेटणे तसे फारसे अवघड नव्हते. लोकंही आपल्या परिसरात मोठा झालेल्या या प्रतिभावान गायकाला कौतुकाने भेटत होते. असा तो सगळा जिव्हाळ्याचा प्रसंग. बरं या गायकानेही आपली सांगितिक जबाबदारी ओळखून कवी जयदेवाची अष्टपदी बहार रागातून मांडण्याची अवघड किमयाही करून दाखविली. अतिशय स्वच्छ व स्पष्ट उच्चार आणि गाण्याबाबत पूर्ण गांभिर्य दिसून येत होतं. म्हणजेच आपलाच बाळ्या म्हणून त्याचं कौतुक करावं असंही त्यानं काही शिल्लक ठेवलं नाही. एखाद्या मोठ्या तयारीच्या गायकासारखं गावून आपली पात्रता सिद्ध केली होती.   
दुसरा प्रसंग त्या मानाने फारच मोठा प्रचंड म्हणावा असाच. पद्मविभुषण पं. शिवकुमार शर्मा व पद्मभुषण उ. झाकीर हुसेन यांची मैफल प्रोझोन मॉलच्या हिरवळीवर आयोजित केली होती. मैफिलीला प्रचंड गर्दी झालेली. खुर्च्याही संपल्या. कार्यक्रमाला प्रायोजकांचीही गर्दी. भरपूर पैसे खर्च करून आयोजित केलेला कार्यक्रम. आधी तर घंटाभर कार्यक्रम सुरूच झाला नाही. मग सुरू झाल्यावर बराचवेळ शिवकुमार शर्मा यांनी संतुर जुळवण्यात घातले. त्यांनी मारूबिहाग राग वाजवायला सुरवात केली. त्यातले बारकावे इतक्या मोठ्या समुहात समजुन घेणे अवघडच जात होतं. शिवाय गर्दीमुळे प्रत्यक्ष मंचावरचे काही दिसतच नव्हते. बाजूला लावलेल्या पडद्यांवर पाहूनच समाधान मानून घ्यायची वेळ श्रोत्यांवर आली. बरं जे लब्ध प्रतिष्ठित मोठ मोठे लोक समोर बसले होते त्यांना गाण्यातले काही कळतं होतं का? हा प्रश्नच होता. त्यामुळे नेमक्या जागी दाद मिळत नव्हती.
कुठलाही नविन प्रयोग न करता, कुठलीही नविन रचना सादर न करता शिवकुमार शर्मा आणि झाकिर हुसेन यांनी कार्यक्रम संपवला. मधल्या काळात आम्ही ‘लिजेंडस’ च्या कार्यक्रमाला गेलो होतो, त्यांना प्रत्यक्ष पाहिलं असं सांगू पाहणारी नटवी गर्दी ओसरली होती. लोक मध्येच उठून गेले होते. शिल्लक असलेले बरेच जण हाता पॉपकॉर्न, कॉफी, आईसक्रीम सोबत संगीतही पचवून टाकू पहात होते.
कार्यक्रम संपल्यावर माझ्या मुलाला कलाकारांची सही घ्यायची होती म्हणून मी धावतपळत त्याला घेवून मंचाच्या पाठीमागे गेलो. तिथेही प्रचंड मोठी झुंबड. शिवकुमार शर्मा सोबत लोकांचा मोठा जत्था आला आणि ते बघता बघता गाडीत बसून निघूनही गेले. दोन्ही कलाकार गेले असतील या समजात लोक थोडे पांगले. पण उस्ताद झाकिर हुसेन मागेच होते. या संधीचा फायदा घेवून मी त्यांना गाठलं. मुलाला पुढे केले. त्यांनी त्याच्याशी दोन शब्द बोलून त्याच्या वहीवर काहीतरी रेघोट्या मारल्या. मी त्यांना 30 वर्षांपूर्वी परभणीला मी याच वयात तूमची स्वाक्षरी घेतली होती. आता मुलगा घेतो आहे हे सांगताच ते जरा थबकले. माझ्याकडे पहात हसत ‘क्या बात है’ असं म्हणत ते निघूनही गेले.
30 वर्षांपूर्वी उस्ताद झाकीर हुसेन पं. हरिप्रसाद चौरसिया यांचेसोबत परभणीला आले होते. ज्या नुतन संस्थेत त्यांचा कार्यक्रम झाला त्याच्या जवळपास चहाची काहीच सोय नव्हती. मग जवळ असलेल्या माझ्या आजीच्या घरी त्यांना संयोजक असलेले माझे वडिल व त्यांचे मित्र ऍड. वसंतराव पाटील घेवून आले. सगळ्यांशी बोलत हसत खेळत त्यांनी चहा बिस्कीटं घेतली. मला माझे नाव लिहून शुभेच्छा देत सही दिली. त्या छोट्याशा कृतीने मी आवर्जून शास्त्रीय संगीत ऐकायला लागलो. गळ्यात नाही पण कानात मात्र गाणं पुरतं घुसून बसलं.
आजच्या या बाजारू वातावरणात माझ्या मुलाच्या वाट्याला ही कृती आली नाही. त्याला कलाकाराला धड भेटताही आलं नाही. व्यावसायिकतेच्या नावाखाली आम्ही मैफलिंचा इव्हेंट केला. गावभर कार्यक्रमाचे मोठ मोठे होर्डिंग लावले. प्रत्यक्षात कार्यक्रमातून संगीत रसिकांच्या हाती फारसे काही पडले नाही.
याच्या नेमके उलट स.भु.संस्थेच्या कार्यक्रमात काहीतरी फार सुंदर आणि महत्त्वाचे आपण ऐकत आहोत ही भावना श्रोत्यांची झाली. इतकंच काय दोनच वर्षांपूर्वी याच स.भु.शिक्षण संस्थेने उ. राशिद खान यांची मैफल आयोजित केली होती. विजय घाटे सारखा अव्वल दर्जाचा तबलेवाला त्यांच्या साथीला होता. ते गाणं आजही श्रोत्यांच्या कानात ताजं आहे.
मोठे कलाकार बोलवायचे तर त्यांना प्रचंड मोठी बिदागी द्यावी लागते. मग कार्यक्रम वाढत जातो. त्याला व्यवसायिक टेकू द्यावा लागतो आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे संगीताची हत्या होते.
भारतीय संगीत ही प्रचंड मोठ्या समुहात फुलणारी कला नाही. ती छोट्या समुहात बहरणारी कला आहे. त्यासाठी श्रोत्यांचीही थोडी तयारी असावी लागते. हे संगीत ठराविक पद्धतीचे नोटेशन्स लिहून तयार झालेलं संगीत नाही. प्रत्येक मैफलीत ठराविक चौकटीत हे गाणं नव्यानं फुलत असतं. आज गायलेला वाजवलेला राग उद्या नसतो. आणि ते शक्यही नाही. आणि म्हणूनच हे संगीत नित्य नुतन राहिलेलं आहे. प्रचंड मोठ्या समुहात तयार असलेलं संगीत जशाला तसं सादर करता येऊ शकतं. त्यात फार काही प्रयोग किंवा बदल संभवत नाहीत. शिवकुमार शर्मा यांनी राग मारु बिहाग किंवा नंतरचा मिश्र कौसी रागातील दादरा यांचीच निवड केली. यातून त्यांच्यासारख्या प्रचंड ताकदीच्या कलाकाराचीही अडचण सिद्ध होते. खरं तर त्यांच्या ‘‘म्युझिक ऑफ द माउंटन’’ या गाजलेल्या अल्बम मधील एक रचना आपल्या अभंगासारखी आहे. ‘जावू देवाचीया गावा । घेवू तेथेची विसावा ॥ हा तुकारामांचा गाजलेला अभंग. त्यांनी हा वाजवला असता तर श्रोत्यांना एक वेगळा आनंद मिळाला असता. पण हे सांगणार कोण? आणि हे त्या प्रचंड जनसमुहात शक्यही नाही.
कुसुमाग्रजांची विशाखा मधली एक सुंदर कविता आहे
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परी स्मरते आणिक करते व्याकुळ केंव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात
वार्‍यावर येथील रातराणीही धुंद
टाकता उसासे चरणचाल हो मंद
परी स्मरतो आणि करीतो व्याकुळ केंव्हा
तो परसामधला एकच तो निशिगंध

(‘विशाखा’, प्रकाशक कॉन्टिनेंटल पुणे.- अशोक शहाणे नोंद घ्या. मी प्रकाशकाचे नाव दिले आहे.)
प्रोझोन मॉलधमील नवलाख तळपणार्‍या दिव्यात झगमगाटातले संगीत काही मनाला भावले नाही. स.भु.च्या माजघरातील शशांक मक्तेदारचा दिव्यासारखा तेजाळणारा मालकंस मात्र मनात रूतून बसला आहे.
 
            श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

2 comments:

  1. मनापासून गाणे ऐकायला गेल्यावर असे होते कधीकधी .
    गाणे कधी खुलते ,कधी खुपते !

    ReplyDelete