Saturday, February 27, 2021

समलिंगी विवाहांना विरोध कशासाठी?



उरूस, 27 फेब्रुवारी 2021 

दिल्ली उच्च न्यायालयात समलिंगी विवाहांना मान्यता देण्याबाबत याचिका सुनावणीस आलेली आहे. भारत सरकारच्या वतीने महाभियोक्ता तुषार मेहता यांनी असे शपथपत्र दाखल केले की या विवाहांना परवानगी देण्यास सरकारची तयारी नाही. असे विवाह भारतीय परंपरेत कुटूंब संस्थेच्या चौकटीत बसत नाहीत. हे आमच्या संस्कृतीच्या विरोधात आहे.

एक तर मूळात हा विषय आलाच कुठून ते समजून घ्या. आपपीसी  377 कलमामुळे समलिंगी संबंध गुन्हा ठरविण्यात आले होते. हे कलम रद्दबादल ठरविण्यात आले. आता अशा संबंधांना गुन्हा समजला जात नाही. याचीच पुढची पायरी म्हणजे अशा संबंधी व्यक्तींना एकमेकांसोबत राहण्यासाठी कायदेशीर अधिकार हवे आहेत. त्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. 

खरं तर कुणी आपण होवून विवाह संबंधात अडकण्याची मागणी करत असेल तर त्याचे भारतीय परंपरेचे जे समर्थक आहेत रक्षक आहेत त्यांनी स्वागतच करायला पाहिजे. आपली कुटूंब संस्था जगभरांत गौरविली गेलेली आहे. या कुटूंब संस्थेचे गुणगान ऐकून आजही शेकडो परदेशी नागरिक वाराणशी येवून गंगेकाठी सनातन पद्धतीनं विवाह विधी करतात. ही लग्नं टिकतात अशी त्यांची समजूत आहे. 

ज्या संबंधांना पूर्वी मान्यता नव्हती ती आज आपण दिली आहे. मग त्याचीच पुढची पायरी म्हणजे या व्यक्तींना विवाहाचीही मान्यता दिली पाहिजे. त्यात अडकाठी आणण्याचे कारणच काय? 

समजातील कुठल्याही प्रौढ व्यक्तींनी एकमेकांशी परस्पर संमतीने शारिरीक संबंध ठेवले तर त्याला नाही म्हणणणार कसे? आणि म्हणायचे तरी का? आपला समाज तर सध्या इतका पुढारला आहे की लोकनियुक्त प्रतिनिधी आमदार मंत्री बनतो, आपल्या विवाहबाह्य संबंधांची उघड कबुली देतो. या विवाहबाह्य संबंधापासून झालेली मुलं आपलीच आहे असं सांगतो. आपण त्या मंत्र्याचे जंगी स्वागत करतो. त्याच्या मिरवणुका काढतो. त्याच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाला राजकुमार म्हणून संबोधतो. इतकी तर आपले पुढारलेपण समोर मिरवताना दिसत आहे.

आणि दुसरीकडे समलिंगी प्रौढ न्यायालयात जावून अशी मागणी करत आहेत की आमच्या संबंधांना कायद्याची मान्यता द्या. आम्हाला तुमच्या परंपरेतील उदात्त अशी बंधंनं मंजूर आहेत. आम्ही केवळ शारिरीक पातळीवर एकत्र आलेलो नसून आम्ही समाजाचे नातेबंधन मानायला तयार आहोत. आम्हाला पण एक कुटूंब म्हणून आमची ओळख प्रस्थापित करायची आहे. मग अशावेळी आपण त्याला विरोध का करत आहोत? 

म्हणजे एकीकडे अशी तक्रार करायीच की असे संबंध ही विकृती आहे. शारिरीक भुके पलिकडे यात काही नाही. ही नुसती वासना आहे. या लोकांचे नसते चाळे आहेत. हे पाश्चात्य खुळ आहे. आपल्याकडे असे काहीच नाही. 

मग दुसरीकडे अशी टीका केलेली जोडपी आपण होवून समाज मान्यतेसाठी विवाह बंधन स्विकारत असतील तर त्यांना विरोध करायचा. हे तर आपले ढोंग झाले. 

भारतीय परंपरेत समलिंगी संबंधांचे कितीतरी दाखले आढळून आलेले आहेत. 377 कलम रद्द करताना जी काही चर्चा सर्वौच्च न्यायालयात झाली त्यात हे सर्व मुद्दे सप्रमाण समोर आलेले आहेत. सर्व बाजूने चर्चिल्या गेले आहेत. 

आता त्याच्या पुढची पायरी भारतीय समाजाने गाठण्याची गरज आहे. समलिंगी विवाहांना मान्यता देवून आपले पुरोगामित्व सिद्ध केले पाहिजे. विवाह म्हणजे केवळ दोन शरिरांचे मिलन नसून दोन घराण्यांचे मिलन आहे असे आपण संवाद कितीतरी ठिकाणी वापरत असतो. मग आता हेच या नविन मागणीलाही लागू होत नाही का? 

दोन पुरूष किंवा दोन स्त्रिया जेंव्हा एकमेकांशी लग्न करून एकत्र राहू पहात असतील तर दोन घराण्यांचे एकमेकांशी घट्ट धागे जूळून आले असे का नाही समजायचे? आधीच तर आपल्याकडे कुटूंबव्यवस्था कोसळून पडते की काय अशी भिती काही जणांना वाटते आहे. नविन पिढी लग्न न करता लिव्ह इन मध्ये राहणे पसंत करते आहे म्हणून टिका होते आहे. नको ते संसाराचे झंझट म्हणून तरूण पिढी मोकळे सडाफटिंग राहणे पसंद करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर जर समलिंगी आपण होवून पुढे येवून आम्हाला लग्नाच्या बंधनात अडकायचे म्हणत आहेत तर त्याला विरोध करण्यात काय अर्थ आहे?

तूषार मेहता यांनी न्यायालयात सरकारची बाजू मांडली. माध्यमांतून भाजपचे प्रवक्ते आपली संस्कृती धोक्यात येण्याचा मुद्दा समोर करत आहेत. मुळात भारतीय संस्कृती इतकी लेचीपेची नाही. जगभरांत इतकी दीर्घकाळ टिकलेली आणि आजही कार्यरत असलेली दुसरी जीवनपद्धती नाही. तेंव्हा समलिंगी संबंधांना मान्यता दिल्याने संस्कृती धोक्यात येईल असे समजणे चुक आहे. उलट आपल्या संस्कृतीची बलस्थाने आपल्यालाच न कळाल्याचे हे लक्षण आहे.

आणि तसेही कायद्याने मान्यता दिली नाही तरी अशा व्यक्ती आता समाजात एकत्र वावरत आहेतच. उलट मान्यता दिल्याने त्यांचा नाही उलट आपलाच म्हणजे इतर समाजाचाच प्रश्‍न सुटणार आहे. भारतीय परंपरेत सर्वांना सामावून घेण्याची एक उदार अशी परंपरा सतत राहिलेली आहे. तृतिय पंथीयांना किन्नर म्हणून आम्ही सन्मानाने समावून घेतले आहे. यश गंधर्व किन्नर असे गौरवाने उल्लेख आपल्या प्राचीन साहित्यात आढळतात. आपल्या प्राचीन शिल्पांमधूनही समलिंगी संबंधांचे संदर्भ मिळतात. 

सावरकरांची जयंती कालच आपण साजरी केली. गाय कापून खाल्ली तरी हिंदूत्वाला बाधा येत नाही असा प्रखर विचार मानणारा प्रखर सुधारणावादी आपल्यात जन्मला. अशा हिंदू प्रदेशांत समलिंगी विवाह ही विरोध करण्याची बाब कशी काय होवू शकते?

एक तर आधुनिक काळात तसेही कुणी खासगी बाबीत फार काही कायद्याचा हस्तक्षेप होवू द्यायला तयार नाही. आज जर अशी समलिंगी जोडपी सोबत रहायला लागली (ती एव्हाना रहात आहेतच) तर तूम्ही काय करणार अहात? 

हा भावनिक मुद्दा बनवूनही काय मिळणार आहे? ज्या व्यक्ती असे आयुष्य जगू पहात आहेत त्यांना तर काहीच फरक पडणार नाही. तेंव्हा आपण सर्वांनी मिळून समलिंगीयांना आपले मानुया. त्यांच्या विवाहांना मान्यता देवूया. त्यांच्यातील सकारात्मक बाबी जाणून त्याची पाठराखण करू या. त्यांच्या ज्या बाबी आपल्याला रूचत नाहीत त्याकडे दुर्लक्ष करूया. जोपर्यंत समाजिक पातळीवर त्यांचे वर्तन आक्षेपार्ह असत नाही तो पर्यंत त्यावर टीकेला काही अर्थ नाही.

(औरंगाबाद शहरात अशा समलिंगीयांना पाठबळ देण्याचे काम आम्ही गेली 6 वर्षे करत आहोत. हे वाचणारे कुणी जर समलिंगी असतील तर त्यांनी नि:संकोच संपर्क करा. त्यांची समलिंगी ओळख गुप्त राखली जाईल. त्यांच्या भावभावनांचा सन्मान राखला जाईल.)


    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Friday, February 26, 2021

‘मराठी विद्यापीठा’ची भाकड मागणी



उरूस, 26 फेब्रुवारी 2021 

साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी मराठी राजभाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी विद्यापीठाची मागणी करणारा एक लेख ‘आता मराठी विद्यापीठ हवेच!’आजच्या दै. महाराष्ट्र टाईम्स मध्ये लिहिला आहे. 

लक्ष्मीकांत देशमुख माजी सनदी अधिकारी आहेत. सरकारी पातळीवर मोठ्या पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांचा सरकारी कामाचा अनुभव दांडगा आहे. त्यांच्या पिढीचे आणि त्याही आधीच्या स्वातंत्र्योत्तर भारतातील नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नोकरशहा यांची एक आवडती मागणी नेहमी राहिलेली आहे. काहीही करायचे तर ते सरकारने कसे करायचे याबाबत हे लोक आग्रही असतात.

यांच्या डोक्यातील सर्व कल्पना मंत्रालयात सहाव्या मजल्यावर जन्म घेतात. मग त्या विषयाचा विभाग कोणत्या मंत्रालयाशी जोडल्या जावा, नसेल तर हे नविन मंत्रालयच कसे स्थापन केले जावे, त्यासाठी सचिव पातळीवरचा अधिकारी कसा नेमला जावा. मग अगदी खालपर्यंत नोकरशहांची उतरंड कशी रचली जावी. या विभागाला निधी कसा दिला जावा. मग या कर्मचार्‍यांना वेतन आयोगाप्रमाणे पगार कसे मिळावेत भत्ते कसे असावेत वगैरे वगैरे दिशेने यांची मागणी पुढे सरकत जाते. अशा पद्धतीनं विविध विषयांना सरकारी फायलीत बंद केले लालफितीने त्या विषयाचा गळा आवळला म्हणजे झाले अशी काहीतरी यांची समजूत असावी. 

आताही लक्ष्मीकांत देशमुख यांनी मराठी विद्यापीठाची स्थापना ज्या कारणासाठी करावी असे सांगितले आहे ते जरा तपासून पहा. आज महाराष्ट्रात किमान 25 हजार अतिशय सक्षम अशा बर्‍यापैकी इमारत असलेल्या मराठी माध्यमांच्या शाळा आहेत. एकूण 11 विद्यापीठं आणि त्यांच्या अंतर्गत येणारी किमान 5 हजार महाविद्यालये आहेत. सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या मोजली तर ती 13 हजार इतकी आहे. शाळा आणि महाविद्यालयांतील ग्रंथालये तर जवळपास 25 हजार इतकी आहेत. एक ढोबळमानाने छोट्या मोठ्या शैक्षणिक संस्था आणि त्यांच्यातील ग्रंथालये तसेच सार्वजनिक ग्रंथालये महाविद्यालयीन ग्रंथालये असा सगळा मिळून हिशोब लावला तर 50 हजार इतका आकडा निघतो. 

आज मराठी विद्यापीठाची मागणी करणारे लक्ष्मीकांत देशमुख याची खात्री देवू शकतात का ही सर्व 50 हजार मराठी ग्रंथालये किमान बर्‍यापैकी मराठी पुस्तके खरेदी करत आहेत? या सर्वांना शासकीय निधी मिळतो. यातून काय निष्पन्न झाले? सर्व सरकारी शाळा आणि सरकारी अनुदानांवर चालणार्‍या शाळा येथे मराठी भाषा शिकविणारे शिक्षक सध्याच कार्यरत आहेत. मराठीचे प्राध्यापक विविध महाविद्यालयांत 7 व्या वेतन आयोगा प्रमाणे पगार देवून नेमलेले आहेत. या सगळ्यांची संख्या 10 हजार इतकी आहे. या सर्वांनी मिळून मराठी भाषेसाठी काम करावे असेच अपेक्षीत होते ना? मग ते का नाही झाले? 

सध्या महाराष्ट्र शासनाचे भाषा संचालनालय आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा सल्लागार समिती, विश्वकोश निर्मिती मंडळ असा सगळा शासकीय मदतीवर आधारलेला डोलारा आहे. मग यांच्याकडून भाषेसाठी भरीव काही का घडले नाही? 

आण्णा हजारे याच्या लोकपाल नेमण्याच्या मागणीसारखीच ही पण एक भाकड अशी मागणी आहे. सध्याच्या सरकारी व्यवस्थेतून भाषेचे हित साधले नाही अशी तक्रार करायची आणि त्यावर उपाय म्हणून परत सरकारी मदतीवर आधारलेली तशीच एक नविन व्यवस्था मागायची. याने काय साधणार आहे? 

मातृभाषेच्या मागे सगळ्यात पहिल्यांदा आर्थिक ताकद उभी करावी लागते. तीला व्यवहाराची भाषा बनवावी लागते. जीवनाच्या सर्वच स्थरांत भाषेचा वापर वाढवावा लागतो. सरकारी पातळीवर यासाठी प्रयत्न करावे लागतील हे तर खरंच आहे. सरकारची जी जबाबदारी आहे ती सरकारने निभवलीच पाहिजे. पण त्याहीपेक्षा जास्त जबाबदारी लोकांची आहे. समाजाची आहे. विविध सामाजिक संस्थांची आहे. 1990 च्या जागतिकीकरणानंतर सर्व डाव्या समाजवादी लोकांनी बोंब मारली होती की आता स्थानिक भाषा, प्रादेशीक चित्रपट यांचे काही खरे नाही. पण प्रत्यक्षात काय घडले? एक सैराट सारखा चित्रपट 100 कोटींचा गल्ला सर्वदूर गोळा करतो म्हटले की मराठीत चित्रपट निर्मितीची संख्या बघता बघता वाढत गेली. सरकारी पातळीवर कर परतीच्या योजना आणि पहिल्या चित्रपटाला 15 लाखाचे अनुदान असल्या सरकारी खाबुगिरीला वाव देणार्‍या योजनांच्या कुबड्या कामाला नाही आल्या. 

मराठी भाषा शिकण्यासाठी विद्यापीठातील मराठी विभागांत किती विद्यार्थी प्रवेश घेत आहेत? सध्याच्या सर्वच विद्यापीठांतील मराठी विभागांना उतरती कळा लागलेली असताना परत एक नविन मराठी विद्यापीठ स्थापन करा ही मागणी का लावून धरली जाते? केवळ पाच पंचविस लोकांना नौकर्‍या मिळाव्या म्हणून? 

पैठणला संत विद्यापीठ स्थापन करा अशी एक मागणी वारंवार समोर येत असते. कशासाठी स्थापन करा? सध्या पंढरपुरला वारकरी सांप्रदायिक संस्था अतिशय मोलाचे काम करत आहेत ते काय कमी आहे? त्यांनाच अजून मदत करावी त्यांच्या अडचणी दूर कराव्यात. सर्व काही शासनाने करावे ही मानसिकता आपण बदलणार कधी? 

मराठी विद्यापीठाची वेगळी मागणी पूर्णत: भाकड आहे. सध्या कार्यरत जी विद्यापीठे आहेत त्यांच्या मराठी विभागाला मराठी भाषेसंबंधी कामं वाटून द्यावीत. ती त्यांच्याकडून सक्षमपणे कशी करून घेता येतील हे पहावे. शालेय अभ्यासक्रम बनविणार्‍या ‘बालभारती’लाच गणित विज्ञान सारख्य विषयांचे उच्चशिक्षणासाठी मराठीत पुस्तके तयार करण्याचे काम देण्यात यावे. 

लक्ष्मीकांत देशमुख ज्या अपेक्षा मराठी विद्यापीठाकडून व्यक्त करत आहेत ती सर्व कामे सध्या अस्तित्वात असलेल्या शासनाच्या पैशावर पोसल्या जाणार्‍या संस्था का करू शकलेल्या नाहीत हे आधी तपासावे. आणि त्यांच्याकडूनच ती कामे करून घेण्यात यावीत. आणि ती तशी होणार नसतील तर इतर खासगी संस्था ज्या हे काम करत आहेत/ करू पहात आहेत त्यांना प्रोत्साहन द्यावे. परत एक नविन भाकड विद्यापीठ महाराष्ट्राच्या माथ्यावर लादू नये. त्याची गरज नाही. 

सर्व काही शासनाने करावे आणि बाकी समाजाने हातावर हात ठेवून पहात बसावे ही वृत्ती सोडून द्यावी लागेल. मराठीसाठी काही करण्यासाठी मराठी माणसाने पुढे यावे. आपल्याही खिशाला जरा झळ लागू द्या. एक साधं उदाहरण सांगतो. 19 फेब्रुवारीला शिवजयंती होती. त्या दिवशी महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती मंडळ म्हणजेच बोली भाषेत बालभारतीने प्रकाशीत केलेले ‘छत्रपत्री शिवाजीमहाराज स्मृतीग्रंथ’ हे पुस्तक त्याची माहिती मी समाज माध्यमावर दिली.  अपेक्षा अशी होती की अतिशय कमी किंमत असलेला हा देखणा ग्रंथ हजारो मराठी माणसाला वाचवासा वाटेल. सरकारी पातळीवर याचे वितरण नीट होत नाही तेंव्हा तो आपण बालभारतीच्या कार्यालयांतून विकत आणून लोकांना द्यावा. गेल्या दहा दिवसांत शिवरायांच्या या महाराष्ट्रात शासनाने प्रकाशीत केलेल्या रू. 247/- किमतीच्या या पुस्तकाच्या फक्त10 प्रती विकल्या गेल्या.

आज लक्ष्मीकांत देशमुख जी भाषा बोलत आहेत तीच भाषा 2010 मध्ये हे पुस्तक तयार करताना वापरल्या गेली होती. शासनाने शिवाजी महाराजांवर एक सुंदर ग्रंथ तयार करून कमी किमतीत मराठी माणसांसाठी उपलब्ध करून दिला गेला पाहिजे. असा ग्रंथ तयार करून 10 वर्षे उलटली. हा मराठी माणूस त्या ग्रंथाच्या खरेदीसाठी समोर येतोय का? 

तेंव्हा नविन काही शासनाच्या माथ्यावर लादण्यापेक्षा आधी जे आहे त्याचे काय झाले ते नीट तपासू. त्यासाठी आपण सगळे मिळून काम करू. सर्व मराठी माणसांनी 27 फेब्रुवारीपासून एक साधी शपथ घेवू या. महाराष्ट्रात परक्या माणसाशी बोलताना आधी पहिला शब्द मराठीच असला पाहिजे. डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केलेली ही अपेक्षा साधी वाटत असली तरी ती तितकी साधी नाही. 

मराठी विद्यापीठाच्या मागणीपेक्षा ही अपेक्षा अंमलात आणणे मराठी भाषेसाठी जास्त महत्त्वाचे आहे.   

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Thursday, February 25, 2021

भाजपला जडला व्यक्तीपुजेचा रोग !

    


उरूस, 25 फेब्रुवारी 2021 

नेहरू आणि तूमच्यात नेमके काय मतभेद आहेत असं एकदा महात्मा गांधींना पत्रकारांनी विचारले होते. त्याचे अतिशय मार्मिक असे उत्तर महात्मा गांधींनी दिले होते. गांधीजी म्हणाले होते, ‘माझं म्हणणं आहे की भारतात इंग्रज राहिले तरी चालतील पण इंग्रजांची निती गेली पाहिजे. जवाहरच्या मताने इंग्रजांची निती राहिली तरी हरकत नाही फक्त इंग्रज गेले पाहिजेत. इतकाच मतभेद आहे आमच्यात.’

कालपर्यंत नरेंद्र मोदी संघ भाजप कॉंग्रेसवर टिका करत असताना त्यांच्या घराणेशाहीवर तोंडसुख घेत होते. कॉंग्रेसने नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या नावाचा वापर अमर्यादपणे कसा देशभरात केला यावर आक्षेप नोंदवत होते. जिवंतपणी नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी स्वत: पदावर असताना स्वत:ला भारतरत्न कसे देवून घेतले यावर शेकडो ‘मिम’ समाज माध्यमांत आजही फिरताना आढळून येतात. 

अशा पार्श्वभूमीवर गुजरातमधील मोटेरा क्रिकेट क्रिडांगणाला (स्टेडियम) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले. तेंव्हा आता यावर टिका होणारच. म्हणजे नेहरूंवर टिका करता करता आपणही नेहरूंसारखेच वागायचे असे काही नविन धोरण मोदी भाजपने सुरू केले आहे का? 

जिवंतपणी आपले पुतळे उभारण्याचा उद्धटपणा मायावतींनी उत्तरप्रदेशात केला होता. तेंव्हा त्यांच्यावर टीका करण्यात भाजप आघाडीवर होता. मग आता भाजप पण याच दिशेने पुंढे जाणार आहे का? 

संघ परिवारात व्यक्ती पूजा केली जात नाही असा सर्वसाधारण समज आहे. तसे सकृतदर्शनी पुरावेही आहेत. व्यक्तीपेक्षा संघटना मोठी मानली जाते. असे निदान भाजप संघवाले सांगत असतात. मग आता हा जो नामाभिदान सोहळा पार पडला त्यावर काय प्रतिक्रिया संघाकडून व्यक्त केली जाणार आहे?

मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच मुळात एक आक्षेपार्ह प्रकार भाजपात सुरू झाला होता. या सरकारला ‘मोदी सरकार’ असेच सर्रास संबोधले गेले. वस्तूत: टिकाकारांनी त्यांच्या सोयीसाठी म्हणून हा शब्दप्रयोग केला होता. पण मोदी सरकार म्हणजे जणू काही भूषणार्ह संबोधन आहे असे समजून भाजप संघवालेही तोच शब्दप्रयोग करायला लागले. चार पावले जमिनीपासून उंच चालणारा धर्मराजाचा रथ असल्या भूमिकेमुळे जमिनीवर आदळला असे दिसते आहे. 

संघ भाजपची ही नेमकी काय मजबूरी आहे? त्यांना व्यक्तीपूजेला असणारा विरोध गुंडाळून एकाच माणसाचा उदो उदो करावा लागतो आहे? 

कुठलीही निवडणुक असली की मोदींनाच प्रचार सभा घेत फिरावं लागतं. याचं आत्तापर्यंत कौतूक होत होतं. पण आता सलग दुसर्‍या वेळी सत्ता मिळूनही परत राज्यांराज्यांत प्रचारासाठी मोदींनाच फिरवावं लागत असेल तर याला सुचिन्ह म्हणावं का? 

एक पळवाट भाजप प्रवक्त्यांकडून शोधली जात आहे. हे क्रिडांगण (स्टेडियम) क्रिकेट नियामक मंडळाचे आहे. त्यांच्या अखत्यारीतील वास्तूला काय नाव द्यावे हा पूर्णत: त्यांचा प्रश्‍न आहे. हे काही सरकारी क्रिडांगण नाही. तेंव्हा आम्ही काय करणार? भारत सरकार किंवा गुजरात राज्य सरकारने तर हा निर्णय घेतला नाही. 

अगदी शेंबड्या शाळकरी पोरालाही हा युक्तीवाद पटणार नाही. असे निर्णय का आणि कसे होतात हे सर्वांना माहित आहे. मोदींना खुष करण्यासाठी त्यांची चापलुसी करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला हे उघड आहे. पण यात सर्वात जास्त आक्षेपार्ह आहे ते म्हणजे स्वत: मोदींनी याला मान्यता दिली. आपल्या घरचे कसे साधारण स्थितीत जगतात. आपली आई कशी साध्या घरात राहते याचे भांडवल अप्रत्यक्षरित्या मोदी आणि प्रत्यक्षरित्या भाजप सतत करत आला आहे. मोदींची आई रिक्शात कशी फिरते असे दाखवले जाते. फकिर अशी स्वत:ची प्रतिमा तयार करू पाहणारे मोदी आपल्याच नावाच्या क्रिडांगणाला मंजूरी देतातच कसे? आणि मग जर असे करणार असाल तर इतरांवर टिका करण्याचा नैतिक हक्क तूम्ही गमावून बसता हे लक्षात घ्यायला पाहिजे. 

यातून भाजपची सरंजामी मानसिकता समोर येते आहे. सत्तेवर असताना आणि तूम्हाला सक्षम राजकीय पर्याय नाही तोपर्यंत  लोक हे खपवून घेतील. पण एकदा का जनमत फिरले तर मात्र हे सर्व कुठल्या कुठे उडून जाईल. इंदिरा गांधींची चापलूसी करणारे नेते बघता बघता लोकांनी बेदखल करून टाकले. राजीव गांधींच्या चपला उचलणारे राजकारणांतून हद्दपार झाले. 

दिनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने विविध योजना आणि वास्तू उभारल्या गेले ते आपण समजू शकतो. हे भाजप (पूर्वीचा जनसंघ)चे मोठे नेते होते. उत्तूंग व्यक्तीमत्वं होती. अटल बिहारी यांच्या निधनानंतर त्यांचे नाव लदाखमधील बोगद्याला दिल्या गेले. जिवंतपणी अटलबिहारींनी सत्तेवर असताना आपले नाव नाही कुठे देवू दिले. 

याला उत्तर म्हणून शरद पवार किंवा कॉंग्रेसच्या विविध नेत्यांची नावे कशी दिल्या गेली याची उदाहरण समोर आणली जातील. पण याला काही अर्थ नाही. त्यांच्यावर टिका झाली म्हणून तर तूम्हाला जनतेने निवडून दिले होते. आता तूम्ही पण तेच करणार असाल तर मग प्रश्‍नच मिटला. 

या घटनेचा दुसरा एक गंभीर अर्थ समोर येतो आहे. जर 7 वर्षांच्या दिल्लीतील मजबूत सत्तेनंतर भाजपला व्यक्तीपूजेचाच मार्ग अवलंबावा लागणार असेल तर मग तूम्ही नेमका कोणता राजकीय पर्याय समोर आणला? महात्मा गांधींनी जवाहरलाल नेहरूंवर टिका केली तसेच घडत आहे. गोरा इंग्रज जावून काळा इंग्रज आला तसे कॉंग्रेस जावून भाजप आला. बाकी फरक काहीच नाही. 

ल्युटन्स दिल्लीतील  वर्षानूवर्षे ठाण मांडून बसलेली नौकरशहांची कंपूबाजी तूम्ही मोडून काढली म्हणून कौतूक करावं तर काही दिवसांतच तूमची पण एक वेगळी ‘लॉबी’ तयार होईल. त्याचे काय? मग त्यावर परत काय उपाय शोधायचा?

भाजपचा जो कट्टर भक्तवर्ग आहे, त्यांचा जो हक्काचा मतदार आहे त्यापेक्षा एक अतिशय वेगळा आणि संख्येने खुप प्रचंड असलेला सामान्य मतदार भाजपकडे वळला आहे तो त्यांच्या वेगळेपणामुळे. लाल दिव्यांची संस्कृती मोदींनी संपूष्टात आणली, घराणेशाहीला थारा दिला नाही, सामान्य कार्यकर्त्यांना पद मिळण्याची संधी निर्माण झाली, अगदी सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत विविध योजनांचे लाभ पोचताना दिसू लागले, मधल्या माणसांची दलालांची कॉंग्रेसी संस्कृती कमी झाली यासाठी सामान्य भारतीय मतदारांना जे की कुठल्याच पक्षाला विचारसरणीला बांधलेले नव्हते त्यांची फार मोठी साथ मोदींना भाजपला राहिलेली आहे. 

जर अशा सामान्य मतदारांना भाजपही परत त्याच मार्गाने जाताना दिसू लागला तर ते समोर येणारा अन्य पर्याय निवडतील. भारतीय मतदार कधीच लाचारीने एकाच पक्षाला मतदान करत आलेला नाही. पर्याय नव्हता म्हणून गुजरात मध्ये भाजपला यश मिळाले. नसता पंजाबातील मतदारांनी दाखवून दिले आहे की कॅप्टन अमरिंदर सिंग सारखा पर्याय असेल तर ते भाजप-अकाली-आम आदमी पक्षाची धूळधाण करायला कमी पडत नाहीत.

जिवंतपणी वास्तूला नाव देणे, पुतळे उभं करणे, प्रतिकं तयार करणं ही हिंदू परंपरा नाही. मोदी भाजप संघाला जर इतकाच हिंदू परंपरेचा अभिमान असेल तर त्यांनी याचा गांभिर्याने विचार करावा.

या निर्णयाने विरोधकांना एक वेगळेच कोलीत मिळाले आहे. संपूण क्रिडा संकुलाचे नाव सरदार पटेल असे आहे. त्याला कुठेही बदलले नाही. या संपूर्ण क्रिडा संकुलातील केवळ एका मोठ्या क्रिडांगणाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवण्यात आले आहे. पण आता जितेंद्र आव्हाडांसारखे बुद्धीमान मंत्री यावर टिका करताना खोटे ट्विट करण्यात कमी पडणार कसे? त्यांना तर संधीच उपब्ध करून दिली आहे भाजपने. तेंव्हा त्यांना काय बोलणार?

         

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Wednesday, February 24, 2021

सूफीवाद : डॉ. मुहम्मद आजम यांचा त्रिखंडी ग्रंथराज


उरूस, 24 फेब्रुवारी 2021
 

मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी सूफीवादावर प्रचंड मोठी आणि मोलाची ग्रंथरचना डॉ. मुहम्मद आजम यांनी केली आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळचे खुलताबाद हे गांव फार पूर्वीपासून सूफींचे एक मोठे आणि महत्त्वाचे केंद्र राहिलेले आहे. सूफींच्या चिश्ती परंपरेतील 22 महत्त्वाचे संत आहेत आणि जगभर त्यांचे दर्गे आहेत. यातील ख्वाजा बुर्‍हानोद्दीन गरीब (क्र.21) आणि औरंगजेबाचे गुरू असलेले ख्वाजा जैनोद्दीन चिश्ती (क्र.22) हे दोन दर्गे समोरा समोर खुलताबादलाच आहेत. कादरी, सुर्‍हावर्दी आणि नक्षबंदी परंपरेचे दर्गेही खुलाबाद औरंगाबाद परिसरांत आहेत. 

या संतांसोबतच तत्त्वज्ञान विषयक चर्चेची एक मोठी परंपरा याच परिसरांत फुलली. औरंगाबादच्या पाणचक्की परिसरांत नक्षबंदी परेपरेचा दर्गा आहे आणि तिथेच एक मोठे प्राचीन असे ग्रंथालय आहे. तत्त्वज्ञान विषयक अतिशय मोलाचे ग्रंथ तिथे ठेवलेले आहेत. 

डॉ. मुहम्मद आजम सरांच्या ग्रंथाच्या निमित्ताने मराठीत सूफी चर्चेची जी एक महान परंपरा आहे तिची परत आठवण आली. मुसलमान संत कवींची एक यादीच डॉ. यु.म.पठाण यांनी दिली आहे. वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, नागेश संप्रदाय, रामदासी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वीरशैव या सर्वच संप्रदायांमध्ये मुसलमान कवींनी रचना केलेल्या आहेत. त्यांच्यावर हा प्रभाव पडलेला आहे. यातील सर्वात लोकप्रिय ठरलेलं नाव शेख महंमद यांचे आहे. श्रीगोंद्याला त्यांचे समाधीस्थळ धाकटे पंढरपुर म्हणूनच ओळखले जाते. 

डॉ. मुहम्मद आजम यांनी ‘सूफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन’ हा ग्रंथ 2009 मध्ये लिहून पूर्ण केला. पद्मगंधा प्रकाशनाच्या अरूण जाखडे यांनी तो प्रसिद्ध केला. त्याची मोठी चांगली चर्चा महाराष्ट्रात झाली. प्रा. फक्रुद्दीन बेनूर यांनी आजम सरांचे लक्ष त्यांच्या महत्त्वाच्या प्रकल्पाकडे वेधले. आजम सरांनी 2012 ते 2014 या दोन वर्षांत प्रचंड मेहनत घेवून ‘सूफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ या ग्रंथाचे काम पूर्णत्वास नेले. 

हा ग्रंथ 2000 हजार पृष्ठांचा मोठा झालेला असल्या कारणाने त्यांनी साहित्य संस्कृती मंडळाकडे त्यासाठी काही एक अनुदान मिळू शकेल का याची चौकशी केली. पण हे महत्त्वाचे काम केवळ अनुदान देवून होणार नाही त्यासाठी त्याची संपूर्ण जबाबदारीच कुणीतरी घेण्याची गरज साहित्य संस्कृती मंडळाच्या लक्षात आली. अध्यक्ष बाबा भांड यांनी साहित्य संस्कृती मंडळानेच हा ग्रंथ प्रसिद्ध करावा असा प्रस्ताव मंडळासमोर ठेवला. त्याला मंजूरी मिळून अखेरीस 2019 मध्ये हा ग्रंथ तीन खंडात प्रसिद्ध झाला. 

‘सूफीवाद’ हा भारतासाठी एक फार महत्त्वाचा असा वैचारिक ठेवा राहिलेला आहे. जगभरात इस्लामची ही एका अर्थाने शाखा म्हणूयात भारतीय उपखंडात फार मोठ्या प्रमाणात वाढली फोफावली त्याचा विकास झाला. तत्त्वज्ञान, साहित्य, वास्तूकला, संगीत अशा विविध रूपांत इस्लामचा प्रभाव भारतीय उपखंडांत आढळून येतो. सूफीसारखे अद्वैत तत्त्वज्ञान किंवा संगीत आणि साहित्यातील बंडखोरी ही इथल्या दर्शन विचारांशी जूळणारी होती. 

पहिल्या खंडातच आजम यांनी सूफी हिंदू परंपरेत का मिसळून गेले याची अतिशय साध्या पण योग्य शब्दांत मांडणी केली आहे. सातव्या शतकापासून ते 13 व्या शतकापर्यंत सूफी द्वारे इस्लामचा प्रचार शांततेच्या मार्गाने भारतात झाला. यावर टिपण्णी करताना आजम सर लिहितात, ‘शास्त्र अंतर्गत (बा-शरा) असलेले मुसलमान हिंदू धर्माच्या धर्मस्थानावर आघात करू शकत नव्हते. ते केवळ त्याच्या शरिरास ओरबडून केवळ दु:खी करू शकत, मात्र सूफींनी भारताच्या हृदयावर आपली छाप टाकली. याचे कारण असे होते की सूफीवाद हा भारतीय साधनापद्धतीशी अ-विरोधी होता.

सूफींमध्ये इस्लामी कट्टरतेचा तीव्र गंध नव्हता. म्हणून ते सहजतेने हिंदू समाजाच्या बर्‍याचशा गोष्टी स्वीकारत आणि  मोठ्या प्रेमळपणे ते आपल्या सिद्धांताचे प्रतिपादन करत, बाह्य आणि आंतरिक आचरणामध्ये ‘सूफ’ (लोकर) सारखी निर्मलता आणि पवित्रता असल्याकारणाने त्यांना ‘सूफी’ असे म्हटले जाते.

आजम सरांनी या ग्रंथात सूफीवादाची तुलना इतर धर्मशास्त्रांशी करून अतिशय मौलिक असे प्रतिपादन केले आहे. सूफीवादाचा धागा शंकराचार्यांच्या अद्वैताशी जोडून त्यांनी एक मोठीच वैचारिक परंपरा अभ्यासासाठी समोर ठेवली आहे. सिद्धांत आणि साधना या शीर्षकाखाली आजम सर लिहीतात, ‘सूफीवादाचे सिद्धांत मूलत: शंकराचार्यांच्या अद्वैतवादासारखे होते. वेदांती आणि योगी यांच्यासारखे सूफी पण ब्रह्म आणि जीव यांच्यामधील अद्वैतभावामध्ये पूर्ण विश्वास ठेवतो. तो योग्यांमध्ये पिंडामध्ये सुद्धा ब्रह्मांडाची झलक पाहतो आणि अशाप्रकार आपल्या निर्मळ आचरणांनी शरीरास पवित्र बनवून शरीराच्या आतच अद्वैतानुभूतीचा आनंद प्राप्त करतो."

दुसर्‍या खंडात 7 प्रकरणं आहेत. त्यात सर्वांसाठी नेहमीच आकर्षणाचा आवडीचा विषय असलेल्या सूफी संगीत व नृत्यावर पण लिहीले आहे.  आजम सर लिहीतात, ‘11 व्या 12 व्याा शतकात मध्य अशियात उदयास आलेला सूफी पंथ, बहरला मात्र भारतात. भारतातील संमिश्र सांस्कृतिक पर्यावरणाचा मध्य अशियातील प्रतिभावंतांवर मोठा प्रभाव पडला. येथहील विद्या, कला, तत्त्वज्ञानाची उसनवारी करता-करता त्यांनी त्यात स्वत:च्या ज्ञानाची व प्रतिभेची भर घालून भारतीय विद्या, कला व तत्त्वज्ञान समृद्धही केले. इतकेच नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या संमिश्र वारशाचे ते वाहकही बनले. यात सूफीचे उल्लेखनीय असे योगदान आहे. संगीत हा सूफींसाठी एक वारसा आहे.’

तिसर्‍या खंडाच्या पहिल्या परिशिष्टात ‘सूफी कोण?’ असे एक छोटे टिपण लिहून डॉ. मुहम्मद आजम यांनी अगदी साध्या सोप्या शब्दांत सूफीचे सार सांगितले आहे.

‘सूफीवाद एक जीवन-प्रणाली आहे. ते ना एक धर्मा आहे ना एक तत्त्वज्ञान. मुस्लिम सूफींप्रमाणेच हिंदू सूफी आणि ख्रिश्‍चन सूफी पण आहेत. ‘सूफ’ म्हणजे लोकर. लोकर गरम असत. जर अंत:करण प्रेमळ असेल तर त्यामध्ये प्रेम वसते. प्रेमळ अंत:करणाचा सत हा एक सूफी असतो. गूढवादाशी निगडित असल्याने लोकांमध्ये सूफीवादाविषयी आपुलकी जागृत होते. सूफींच्या ज्ञानाचे गूज फार कमी प्रमाणात ज्ञज्ञत आहे. अनेक वेळा लोक सूफीवादाशी संबंधित कर्मकांडे आचरणात आणतात, परंतु अनेकदा त्यांना त्याचा अर्थ अवगत नसतो. सूफीवादाचे सैद्धांतिकपणे स्पष्टीकरण करता येऊ शकत नाही; प्रत्यक्ष सहभाग आणि सरावामुळेच त्याची जाण होऊ शकते.’

मोठ्या आकाराची 1648 पृष्ठे इतका प्रचंड मोठा विस्तार या ग्रंथाचा आहे. हे तीन खंड सूफी विषयक अभ्यास करणार्‍यांची जरूर वाचावेत. त्याचे चिंतन मनन करावे. 

मराठीत ही इतकी मोठी आणि महत्त्वाची ग्रंथ निर्मिती करून ठेवली म्हणून मराठी भाषिक डॉ. मुहम्मद आजम यांचे कायम ऋणी राहतील. एक फार मोठे वैचारिक काम त्यांनी करून ठेवले आहे. त्यासाठी अक्षरश: आख्खे आयुष्य मोजले आहे. आज 90 ला पोचलेले डॉ. मुहम्मद आजम सर तप करणार्‍या ऋषीसारखेच भासतात. त्यांच्या या ग्रंथाची चांगली दखल घेतली जावो ही अपेक्षा. पुस्तकाचे मुखपृष्ठ हिंगोलीचे सुप्रसिद्ध चित्रकार कवी भ.मा.परसवाळे यांनी चितारले आहे. त्यांची शैली गेली कित्येक वर्षे मराठी वाचकांना परिचित आहे. अगदी अलिकडच्या काळातील अकबर ग्रंथाच्या त्यांच्या मुखपृष्ठाची विशेष दखल रसिकांनी घेतली होती. 

सूफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र, खंड 1. पृ.क्र. 1-556. मुल्य रू. 685/-

सूफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र, खंड 2. पृ.क्र. 557-1162 मुल्य रू. 756/-

सूफीवाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र, खंड 3. पृ.क्र. 1163-1648. मुल्य रू. 623/-  

लेखक : डॉ. मुहम्मद आजम, प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ

प्रकाशन : आवृत्ती पहिली 2019

(हा लेख या ग्रंथाची केवळ ओळख आहे. मी स्वत: या विषयांतील जाणकार नसल्याने त्यावर कसलीही टिपणी करू शकत नाही. या विषयांतील अभ्यासकांनी विनंती की त्यांनी या ग्रंथांचे सविस्तर परिशीलन करून वाचकांसाठी मांडावे.)

  

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Tuesday, February 23, 2021

पुद्दूचेरी : कॉंग्रेसला राजकीय घेरी !



उरूस, 23 फेब्रुवारी 2021 

आपण होवून आपल्या विरोधकांना टिका करण्याची संधी द्यायची असे काही तरी कॉंग्रेसचे अधिकृत धोरण बनले आहे की काय कळायला मार्ग नाही. तामिळनाडूला लागून असलेले लहान पुद्दूचेरी हा केंद्र शासीत प्रदेश आहे. दिल्ली सारखीच याही प्रदेशाला विधानसभा आहे. या विधान सभेची सदस्य संख्य केवळ 33 इतकीच आहे. म्हणजेच आपल्या एखाद्या महानगर पालिकेच्या आकाराची अशी.

तामिळनाडू सोबतच तिथे येत्या दोन चार महिन्यात विधान सभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा वेळी या ठिकाणी सत्ताधारी पक्षात फुट पडावी आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर सरकार कोसळावे याला काय म्हणणार? बरं यासाठी कुणी बाहेरून काही काड्या केल्या आहेत असेही नाही. कॉंग्रेस पक्षातच फुट पडली आहे. राजीनामा देवून आमदार बाहेर पडले आणि विश्वासदर्शक ठराव विधान सभेत दाखल झाला. प्रत्यक्ष मतदानाच्या आधीच मुख्यमंत्री नारायण स्वामी यांनी राजीनामा दिला. आणि कॉंग्रेसच्या हातातील हे लहानसे राज्य निघून गेले. 

पाचच दिवसांपूर्वी याच पुद्दूचेरीत कॉंग्रेसचे माजी आणि भावी अध्यक्ष राहूल गांधी यांचा दौरा होता. सर्व सामान्य मतदरांना जावून भेटावे त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात असा काहीतरी सल्ला राहूल गांधींना देण्यात आला. त्या प्रमाणे ते पुद्दूचेरीच्या लोकांना भेटले. एका महिलेने संतापात काही एक वक्तव्य राहूल गांधी यांच्या उपस्थितीत केले. त्याचे भाषांतर मुख्यमंत्री नारायण स्वामी यांनी अगदी उलट करून राहूल गांधींना सांगितले. 

त्या भागात आलेल्या चक्रिवादळाने आमचे मोठे नुकसान केले. हा तूमच्या बाजूला उभा असलेला माणूस तर आमच्याकडे फिरकलाही नाही. अशी संतापून तक्रार ती महिला करत होती. आणि नारायण स्वामी राहूल गांधींना याचे भाषांतर करून असे सांगत होते की वादळाच्या आपत्तीत मी तिकडे कसा दौरा केला आणि या लोकांना कशी मदत केली असे ही महिला सांगत आहे. 

आता हा सगळा प्रसंग कॅमेरात कैद झाल्याने तो जसाच्या तसा सोशल माध्यमांतून लोकांसमोर आला. काही मोजकी माध्यमे वगळता इतर त्याची वाच्यता होवू दिली गेली नाही. एनडिटिव्ही तर असे विषय दडपण्याचेच धोरण राबवित असतो. पण हा विषय समोर आला आणि कॉंग्रेस सरकारची उरली सुरली अब्रूही चव्हाट्यावर आली. 

निवडणुकीच्या तोंडावर आपल्याच मुख्यमंत्र्याला पायउतार करण्यात कॉंग्रेस आमदारांना कसले सुख मिळाले असेल? याचा एक दुसराच अर्थ समोर येतो आहे. नारायण स्वामी या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढविण्यास कॉंग्रेसचेच आमदार तयार नाहीत. परिणामी राष्ट्रपती राजवट चालेल (केंद्र शासीत प्रदेशात सरकार पडल्यावर काय व्यवस्था आहे मला माहित नाही.) पण हे नेतृत्व नको. 

राहूल गांधी यांनी आपला दौरा झाल्यावर त्यातील मुख्यमंत्र्याचा खोटेपणा उघड झाल्यावर काहीतरी कडक कारवाई करायला हवी होती. पण त्या बाबतीत राहूल गांधी कधीच जबाबदार पद्धतीने वागत नाहीत. एखाद्या राज्यांतील निवडणुक असली तरी ते परदेशांत निघून जातात. संसदेचे सत्र चालू असो की निवडणुक निकाल लागून सरकार बनवायची वेळ असो. तेंव्हा त्यांच्याकडून ही अपेक्षा करणे चुकच आहे. 

राहूल गांधींची वाट बघत न बसता कॉंग्रेस आमदार राजीनामा देवून मोकळे झाले. आता येणारी निवडणुक स्वतंत्रपणे लढवायला ते मोकळे झाले. एक तर राहूल गांधी यांनी त्या सर्व आमदारांशी चर्चा करून पक्षाचे आगामी निवडणुकीतील धोरण ठरवायला हवे होते. पक्षाची सत्ता आहे तर त्याचा वापर करून पक्ष बळकट करायला हवा होता. पण हे काहीच घडलेले दिसले नाही.

याच पुद्दुचेरीच्या दौर्‍यांत मासेमारांसाठी अजून एक वेगळी मागणी करून राहूल गांधी यांनी आपल्या ‘प्रखर’ बौद्धिकतेचे प्रदर्शन घडवले. मत्स्य व्यवसायासाठी वेगळे मंत्रालय का नाही? असा एक मोठा प्रश्‍न त्यांनी आपल्या दौर्‍यात उपस्थित केला. आता हे राहूल गांधींना कुणी सांगावे की असे मंत्रालय 2019 च्या निवडणुकीनंतर तयार झाले आहे. गिरीराज किशोर त्या खात्याचे मंत्री आहेत. राहूल गांधी 17 वर्षे खासदार आहेत आणि त्यांना याचा पत्ताच असू नये याला काय म्हणणार? 

गेली काही दिवस वारंवार असे घडते आहे की राहूल गांधी स्वत:चे आणि पक्षाचे हसे करून घेत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांची मोठी हानी होताना दिसत आहे. याचा मोठा फायदा भाजपला होतो आहे. आताही पुद्दुचेरी सारख्या अगदी छोट्याशा राज्यांत भाजप जो की काही मोठी दखलपात्र राजकीय शक्ती नव्हता आता हातपाय पसरत चालला आहे. 

अगदी आत्ताही बहुतांश पुरोगामी दिल्ली आंदोलनात अडकून पडले आहेत. आणि इकडे भाजप विविध राज्यांतील निवडणुका जिंकत आहे. येणार्‍या निवडणुकांची तयारी करत आहे. अगदी आत्ता गुजरात मध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी पोट निवडणुक झाली. या दोन्ही जागा भाजपने आरामात जिंकून घेतल्या. पुरोगामी माध्यमांनी त्याची दखलही घेतली नाही. पुरोगाम्यांनी तर इकडे ढुंकूनही बघितले नाही. याचा तोटा कुणाला होणार? अर्थाच कॉंग्रेस आणि पुरोगामी पक्षांनाच. पण ते जर त्यांच्या लक्षातच येणार नसेल तर कोण काय बोलणार? 

तामिळनाडू सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षासोबत भाजपने आघाडी केली आहे. शक्यता आहे की येती निवडणुक पुद्दुचेरी मध्ये भाजप त्यांच्या सोबतच लढवेन. किंवा स्वतंत्रपणे लढवून गरज लागलीच तर सत्तेसाठी आण्णा द्रमुक सोबत युती करेन. त्या निमित्ताने दक्षिणेतील एक छोटे राज्य आपल्या अखत्यारीत आणण्यासाठी धडपड करेन. पण इकडे कॉंग्रेस मात्र हातात असलेले राज्य कसे गमावता येईल याची चिंता करत असतो. अजूनही राजस्थानमधील सत्ता जात कशी नाही? पंजाबात स्थानिक स्वराज्य संस्थांत पक्षाल यश मिळतेच कसे? महाराष्ट्रात आपण इतकी कुरकुर करतो आहोत खाट कुरकुरते आहे असे संजय राउत बोलतातच पण तरी सरकार काही पडत नाही अशी चिंता कॉंग्रेसला सतावत असावी. 

कॉंग्रेस पक्ष आणि त्यांचे राहूल सारखे नेते यांच मी एकवेळ समजू शकतो. पण त्यांना पाठिंबा देणारे पुरोगामी कसे काय या सगळ्या राजकीय घडामोडींकडे दुर्लक्ष करतात? कुमार केतकरांसारखे इतरांना शहाणपण शिकवणारे आता अधिकृत रित्या कॉंग्रेसच्या तिकीटावर राज्यसभेत जावून बसले आहेत ते काय मिरवायला? कॉंग्रेस पक्षाचे धोरण ठरवायला या लोकांचा काहीच उपयोग होत नसेल तर यांच कामच काय उरले आहे मग? 

पुद्दुचेरी तसे काही मोठे राज्य नाही. संपूर्ण ईशान्य भारत, कश्मिर, दिल्ली, गोवा येथे एकेकाळी कॉंग्रेसची ताकद  होती. तेथील पक्ष संघटना आता संपत आली आहे. जवळपास सर्वच छोट्या राज्यांतून कॉंग्रेस सरकारे हद्दपार झाली आहेत.   मोठ्या राज्यांतून तर त्यांचा अवतार कधीचाच संपला होता. उत्तर प्रदेश (80), महाराष्ट्र (48), पश्चिम बंगाल (42), बिहार (40), आणि तामिळनाडू (39) ही संख्येने सर्वात मोठी अशी पाच राज्ये. या पाच राज्यांत मिळून कॉंग्रेसचे पाचही खासदार निवडून आलेले नाहीत. पहिल्या तर सोडाच पण दुसर्‍या क्रमांकावरही आता हा पक्ष शिल्लक नाही. अगदी छोट्या अशा राज्यांत त्याचे अस्तित्व टिकून होते. पुद्दुचेरीच्या ताज्या घडामोडींतून आता तेही धोक्यात आल्याचे सिद्ध होते आहे.

गेली दोन वर्षे या पक्षाला आपला अध्यक्ष निवडता आलेला नाही. टिका करणार्‍यांनाच परत विचारले जाते की तूम्ही वारंवार कॉंग्रेसला का बोल लावता. लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज आहे याचा अर्थ असा नव्हे की त्या पक्षाने काहीच करायचे नाही आणि इतरांनीच त्यांची काळजी करून त्यांना जागा बहाल करायच्या. पहिल्या पाच निवडणुकांत नेहरूंच्या आणि इंदिरा गांधींच्या समोर संख्येच्या दृष्टीने दखलपात्र असा विरोधी पक्ष नव्हता. पण ते नेते विचारांच्या पातळीवर जोरदार मांडणी करताना आढळायचे. आंदोलनांमध्ये जोर असायचा. सामान्य जनतेचा त्याला पाठिंबा मिळायचा. 

आता अशी परिस्थिती आहे की विरोधी पक्ष केवळ राजकीय दृष्ट्या संख्येने कमजोर झाला आहे असे नाही तर वैचारिक पातळीवरही तो काहीच मांडत नाहीये. कृषी आंदोलनात किसान युनियनच्या मागे कॉंग्रेससह सर्व विरोधी पक्ष फरफटत निघालेले दिसून येत आहेत. स्वत: काहीच न करता वरतून हेच ओरड करणार की लोकशाही वाचवायची असेल तर विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्ष वाचवायची जबाबदारी पत्रकार संपादक लेखक विचारवंत अभिनेते कलावंत चळवळ करणारे सामाजिक कार्यकर्ते यांचीच आहे काय?      

  

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Friday, February 19, 2021

छ.शिवाजी महाराजांवरील दुर्लक्षीत स्मृतीग्रंथ !



उरूस, 19 फेब्रुवारी 2021
 

आज 19 फेब्रुवारी. इंग्रजी पंचांगांप्रमाणे शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना शिवजयंती तिथीप्रमाणे का तारखेप्रमाणे हा वाद मिटवण्यात आला. तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सरकारवर टिका करत असताना सरकारी पातळीवर झालेल्या चांगल्या कामाचीही दखल घेतली पाहिजे. महाराष्ट्र राजय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ म्हणजेच बोली भाषेत सर्वच ज्याला बालभारती म्हणून ओळखतात त्या संस्थेने शालेय पाठ्यपुस्तकांसोबतच इतरही काही महत्त्वाची पुस्तके प्रकाशीत केली आहेत. त्यातीलच एक आहे ‘छत्रपती शिवाजीमहाराज स्मृतिग्रंथ’. डॉ. जयसिगराव पवार यांच्या संपादनाखाली हा ग्रंथ बालभारतीने 2011 मध्ये प्रकाशीत केला. 

शालेय पातळीवर मुलांना उपयुक्त व्हावा असा हा ग्रंथ. खरं तर याची रचना केवळ विद्यार्थी नव्हे तर सामन्य वाचक, शिक्षक आणि या विषयांत अभ्यास करू पाहणार्‍या सर्वांना मार्गदर्शक ठरेल अशी आहे.

या पुस्तकांत एकूण 16 लेख आहेत. ही यादी जरी आपण बघितली तरी या स्मृतीग्रंथाचा आवाका लक्षात येईल.

1. शिवराय: संस्कार आणि शिक्षण - डॉ.आ.ह.साळुंखे, 2. शिवाजीचा राज्यकारभार - न्या. महादेव गोविंद रानडे 3. शककर्ता शिवाजी -गो.स.सरदेसाई. 4. छत्रपती शिवाजीमहाराजांचे गुणसंकीर्तन - कृष्णराव अर्जुन केळूसकर, 5. शिवाजी-एक महान नेता- सर जदूनाथ सरकार 6. शिवाजीरामांचे व्यक्तिमत्व- डॉ. बाळकृष्ण 7. श्रीशिवछत्रपतींची कामगिरी-त्र्यंबक शंकर शेजवलकर 8. शिवाजीमहाराजांची हिंदवी स्वराज्याची राज्यबंधारणा- वा.सी. बेंद्रे 9. शिवरायासी आठवावे- सेतु माधवराव पगडी 10. दिल्ली जिंकण्याची शिवाजीराजांची प्रतिज्ञा- डॉ.आप्पासाहेब पवार 11. शिवाजीमहाराजांच्या ‘मर्‍हाष्ट’ राज्याची अर्थनीती 12. धर्मनिरपेक्षता आणि शिवाजी- नरहर कुरूंदकर 13. शिवाजीमहाराजांची संरक्षण संघटना- ले.कर्नल म.ग. अभ्यंकर 14. शिवाजीमहाराजांचे आरमार-डॉ.भा.कृ. आपटे 15. दुर्गपुत्र शिवाजी- गो.नी.दांडेकर 16. शिवाजीमहाराजांची चित्रे- ग.ह.खरे

या सर्व महान अभ्यासकांनी विचारवंतांनी शिवाजी महाराजांवर जे प्रचंड आणि मोलाचे लिखाण केले आहे त्यातील मोजका भाग निवडून या स्मृतीग्रंथात समाविष्ट केला आहे. 

स्मृतीग्रंथाला जयसिंगराव पवारांची विस्तृत अशी प्रस्तावना आहे. या स्मृतीग्रंथाचे महत्त्व तर त्यांनी अधोरेखीत केले आहेच पण यात शिवाजी महाराजांच्या राज्याचा नकाशा प्रथमच एकत्रित स्वरूपात दिलेला आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या चौथीच्या पुस्तकांत हा नकाशा होता. तोच आता या स्मृतीग्रंथातही घेण्यात आला आहे. 

महाराजांची ऐतिहासिक अशी सात चित्रे या पुस्तकांत समाविष्ट आहेत. व्हॅलेंटिन या डच चित्रकाराने काढलेले महाराजांचे चित्र, ऑर्मच्या ‘फ्रॅगमेंटस’यातील 1782 चे चित्र, 1685 मधील महाराजांचे दखनी शैलीतील चित्र, इ.स. 1700 मध्ये मीर मुहम्मद याने काढलेले चित्र, 17 व्या शतकाच्या उत्तरार्धात काढलेले आणि आता लंडन येथील ब्रिटिश संग्रहालयात असलेले अशी महाराजांची 7 चित्रे या पुस्तकांत आहेत.  शिवाय वर उल्लेखिलेला स्वराज्याचा नकाशाही दाखविण्यात आला आहे. 

नरहर कुरूंदकरांच्या लेखात शिवाजी महाराजांबाबत एक अतिशय मोलाचे असे वाक्य आलेले आहे, ‘‘.. शिवाजी हे एक जनतेच्या नेत्याचे चित्र आहे. या चित्राचा आकार मध्ययुगाप्रमाणे राजेशाहीचा आहे, त्याचा आशय आपल्या काळाच्या कक्षा छेदून बाहेर पडणारा, लोकशाहीचा, धर्मनिरपेक्षतेचा व लोककल्याणाचा आहे. शिवाजीने वैदिकमंत्राने राज्याभिषेक करून घेतला एवढेच आपण पाहतो. देवळे बांधणे, दानधर्म करणे, यज्ञ करणे, स्मृतींचा कायदा लागू करणे या असल्या परंपरावादात त्याने कधीही रस घेतला नाही हे आपण विसरून जातो.’’  

शेजवलकरांनी शिवाजी महाराजांच्या दक्षिणेतील चढाईला स्वराज्य विस्ताराला मोठे महत्त्व दिले. महाराष्ट्रापेक्षाही स्वराज्याचा विस्तार कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत जास्त झाला हे विसरले जाते. शेजवलकरांच्या लेखातील एक वाक्य फार महत्त्वाचे आहे, ‘.. पण अनेक शतके ज्या समाजाचे वर्तन कासवाप्रमाणे आपले हातपाय व डोके कवचाखाली लपवून सरारी जिवंत राहणाराचे झाले होते, त्याला शिवाजीने मान ताठ करून व हातपाय हालवून निर्भयतेने बदललेली परिस्थिती लक्षात घेण्यास उद्युक्त केले. स्वसंरक्षणाचा खात्रीचा मार्ग शत्रूवर चढाई करण्यातच असतो, हे राजनैतिक व लष्करी तत्त्व अमलात आणून शिवाजीने सर्व हिंदू लोकांसमोर ठेवले.’’

कर्नल अभ्यंकरांचा लेख अतिशय वेगळा असा आहे. शिवाजी महाराजांच्या लढायांचे लष्करी अंगाने त्यांनी विश्लेषण केले आहे. 1645 ते 1660 या पहिल्या पंधरा वर्षांतील मोहिमांचे वर्णन -बचावात्मक मोहिमा असे केले आहे. तर 1661 ते 1672 या काळातील मोहिमांचे वर्णन बचावात्मक पण आक्रमक मोहिमा असे केले आहे. तर शेवटच्या काळातील म्हणजेच 1672 ते 1680 या काळातील मोहिमा आक्रमक मोहिमा होत्या असे प्रतिपादले आहे. 

मोठ्या आकारांतील 140 पानांच्या पुठ्ठा बायडिंगच्या या पुस्तकांची किंमत बालभारतीने केवळ रू. 247 इतकी ठेवली आहे. हे पुस्तक 2011 ला म्हणजे दहा वर्षांपूर्वी प्रकाशीत झाले. पण अजूनही त्याची आवृत्ती संपलेली दिसून येत नाही.  महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने हा स्मृतिग्रंथ तयार करण्यात आला होता. आपण इतका शिवाजी महाराजांबद्दलचा अभिमान सांगतो, त्याचे प्रदर्शन प्रसंगी मोठ्या भडकपणे करतो. शिवाजी महाराजांचे पुतळे गावोगावी तर सोडाच पण गल्लोगल्ली उभारल्या गेले आहेत. पण शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्यावरचे पुस्तके यांची अवस्था आजही दुर्लक्षीत अशीच आहे. हे नेमके कशाचे द्योतक आहे? 

(शिवाजीमहाराजांवरील हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास माझ्या मो.न. वर कळवा. तूम्हाला हा ग्रंथ घरपोच पाठविण्याची सोय करण्यात येईल.)  

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Thursday, February 18, 2021

चीनच्या माघारीने कॉंग्रेसचे दात घशात !


उरूस, 18 फेब्रुवारी 2021 

16 फेब्रुवारी 2021 रोजी लदाखमधील चीनी सैन्याच्या माघारीच्या चित्रफिती माध्यमांवर प्रसारीत झाल्या. त्या पूर्वी  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत चीनी सैन्य आपल्या पूर्वीच्या जागी परतणार असल्याचे सांगितले होते. उच्च पातळीवरची चर्चा चालू असून येत्या 48 तासांत यावर कारवायी होईल. असं सगळं स्पष्टपणे सांगितलं होतं. या वेळी सैन्य प्रमुख मनोज नरवणे संसदेच्या प्रेक्षक कक्षात बसून होते. 

आता इतकी ही गोष्ट स्पष्ट होती. तरी कॉंग्रेस पक्ष आणि राहूल गांधी यांनी पत्रकार परिषद घेवून पंतप्रधान मोदी कायर आहेत, गद्दार आहेत. चीन समोर झुकले. चीनने भारतीय भुभाग बळकावला वगैरे आरोप करण्यात नेमका काय अर्थ होता? 

यावर काही बोलण्यापेक्षा आता देशासमोर चीनी सैन्य माघारी जात असल्याची चित्रफितीच समोर आली आहे. आता यावर तरी कॉंग्रेस पक्ष विश्वास ठेवणार की नाही? उद्या चीनी प्रसार माध्यमेही याला दुजोरा देतील तेंव्हा राहूल गांधी आणि कॉंग्रेस काय करेल? जसे की गलवान खोर्‍यातील चीनी सैन्याला भारतीयांनी करारी मात दिली यावरही राहूल गांधी विश्वास  ठेवायला तयार नव्हते. उलट भारतीय सैन्यावरच आरोप करत होते. त्याचे काय आणि कसे परिणाम झाले सर्वांच्या समोर आहेत. याच पद्धतीने आताही चीनच्या माघारीचे प्रकरण कॉंग्रेसवरच उलटणार आहे. 

राहूल गांधी यांची संरक्षण प्रश्‍नांविषयी समज किती आणि कशी आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. पण त्यांच्या सारखंच शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राउत यांनीही सामनाच्या संपादकियातून अकलेचे तारे तोडायला सुरवात केली आहे. संजय राउत इतर विषयांवर काय बोलतात तो भाग वेगळा पण संरक्षण विषयक बाबींत इतक्या बेजबाबदार पद्धतीने जर लिहीणार असतील तर त्याची दखल घेतली पाहिजे.

लहान मुल कसे एकच हट्ट धरून बसलेले असते तसे संजय राउत यांचे होत चालले आहे. भाजपवर टिका करायची मोदींना झोडपायचे हा एकच बालहट्ट ते धरून बसले आहेत. त्या मागे कुठलेही तर्कशास्त्र नसले तरी त्यांना  फरक पडत नाही. 

आताही संजय राउत यांनी आपल्या संपादकियांत जणू काय बिनतोड मुद्दा मांडला असा दावा केला आहे. चीन जर आत घुसलाच नव्हता तर आता माघार घेतली म्हणून विजयोत्सव कशाला करता? गेली किमान एक वर्ष वारंवार संरक्षण विषयक तज्ज्ञ अभ्यासक सैन्यातील माजी अधिकारी, माजी सनदी अधिकारी यांनी लदाख खोर्‍यातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. सामान्य प्रेक्षकांना वाचकांना माध्यमांतून या विषयावर भरपूर माहिती प्राप्त झाली आहे. 1962 पासून चीनने आपला भूभाग बळकावला आहे. त्यानंतरच्या सरकारांनी या बाबत हवं तेवढं कडक धोरण स्वीकारलं नाही. परिणामी चीनची मुजोरी वाढत गेली. 2014 नंतर मोदी सरकारने आणि त्यांचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लदाख प्रकरणांत काही एक धोरण ठरवले. त्या अनुषंगाने या प्रदेशात कारवायी होताना दिसत आहे. 

पहिली गोष्ट म्हणजे सीमा भागात रस्ते, पुल, हेलीपॅडस, धावपट्ट्या यांची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहेत. या कामांना पूर्वी कधीही प्राधान्य दिल्या गेले नव्हते. अगदी संरक्षण मंत्री ए.के.एंटोनी यांनी भर संसदेत सीमावर्ती भागात संरचना उभ्या न करण्याचे सरकारचे अधिकृत धोरणच आहे असे स्पष्ट केले होते. या पराभूत हताश पार्श्वभूमीवर मोदी सरकारने गेल्या 6 वर्षांत लदाख (आणि एकूणच सीमावर्ती भागात) बांधकामं मोठ्या प्रमाणांवर केली आहेत.

दुसरी बाब सातत्याने स्पष्ट झाली आहे की भारताच्या एक इंचही भूमीवर चीन किंवा पाकिस्तानला नव्याने अतिक्रमण करू दिले गेले नाही. इथे जाणीवपूर्वक मी नव्याने असा शब्द वापरतो आहे. पूर्वीची जी अतिक्रमणे आहेत ती अजूनही आहेतच. तिथूनच चीनला आता मागे ढकलणे चालू आहे. तसेच गिलगिट बाल्टिस्थान हा पाक व्याप्त कश्मिरचा भाग जो की आता लदाख केंद्रशासीत प्रदेशात येतो त्याचा समावेश भारतात करण्याचा गांभिर्याने विचार चालू आहे.

चीनने माघार घेतली असे म्हणत असताना आपल्याच पूर्वीच्या बळकावलेल्या प्रदेशांतून माघार घेतली असा अर्थ निघतो. हे राहूल गांधी किंवा संजय राउत यांना माहित नाही असे नाही. पण ते भाजप विरोधात इतके आंधळे बनले आहेत की त्यांना आपण देशविरोधी काही एक मांडणी करत आहोत हे पण लक्षात येत नाही.

भारताचे सैन्य स्वातंत्र्यापासून राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहिले आहे. सैन्यांतील नेमणूकांत राजकीय हस्तक्षेप कमी जास्त प्रमाणांत होत आलेला असेल. किंवा काही निर्णय घेण्यांपासून सैन्याधिकार्‍यांना राज्यकर्त्यांनी रोकलेही असेल. पण ढोबळमानाने भारतीय लष्कर हे स्वतंत्रच राहिलेले आहे. लष्करी नेतृत्वावर टीका करण्याची पद्धत आपल्याकडे नाही. लष्कर प्रमुखही आपली मर्यादा ओलांडून सामान्यत: भारतीय राजकारणात दखलअंदाजी कधी करत नाहीत. असं सगळं असताना राहूल गांधी किंवा संजय राउत भारतीय लष्करावर प्रश्‍नचिन्ह उभं करून काय मिळवत आहेत?  

दुसर्‍या महायुद्धानंतर जगभराची सत्ता संघर्षाची रूपरेषा बदलून गेली. प्रदेश जिंकण्यापेक्षा व्यापार वाढवत नेला पाहिजे याची आवश्यकता सर्वच देशांना जाणवायला लागली. तरीही शीतयुद्ाची खुमखुमी 1990 पर्यंत टिकली. त्यानंतर जागतिक व्यापार परिषदेने बहुतांश देशांना एका टेबलावर आणले. डंकेल प्रस्तावावर सह्या करण्यास भाग पाडले. त्यालाही आता 30 वर्षे उलटून गेली आहेत. मधल्या काळात अमेरिकेने मध्यपूर्वेत आणि चीनने दक्षिण अशियाची समुद्रात तसेच आपल्या लगतच्या देशांत अशांतता पसरविण्याचे भरपूर प्रयत्न केले. 

2008 च्या जागतिक महामंदीने अमेरीकेचे, नंतरच्या काळात युरोपचे आणि आता कोरोना नंतर चीनचे कंबरडे मोडले. याचा दृश्य परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणातल्या समोरा समोरच्या युद्धाची शक्यता संपून गेली. आता कितीही इच्छा असली तरी महासत्ता प्रत्यक्ष युद्ध छेडणार नाही. कारण ते कुणालाच परवडणार नाही. छोट्या मोठ्या कुरबूरी चालत राहतील. देशां देशांतले सीमाविवाद काही काळ पेटत राहतील. पण आंतरराष्ट्रीय व्यापाराला धक्का पोचेल असे कुणी काही करेल याची शक्यता अतिशय कमी आहे. आखाती देशांना त्यांच्या तेलधार्जिण्या व्यापाराची चिंता आतापासूनच लागून राहिली आहे. चीनला आपले दडपशाहीचे धोरण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चालू ठेवणे आता केवळ अशक्य आहे. 

हे काहीच समजून न घेता राहूल गांधी आणि संजय राउत बडबड करत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे लागेल. फक्त ते देशविघातक बोलतात तेंव्हा त्याची दखल देशहितासाठी घ्यावी लागेल. 

पाकिस्तान सारखा देश चार तुकड्यांत विखुरण्याच्या स्थितीत आहे. चीन कोरोना आपत्तीतून लवकर बाहेर येईल अशी शक्यता नाही. तेंव्हा भारताला ही संधी आहे की सीमा प्रश्‍नांचा होईल तेवढा निपटारा करून आपल्या देशाचे विकासाचे प्रश्‍न मार्गी लावाण्याची. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात संरचनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी राखून ठेवला आहे. त्या बाबी समजून त्यावर काही बोलावं अशी राहूल गांधी आणि संजय राउत यांच्या कडून अपेक्षा नाही. पण आपण सामान्य माणसांनी आता या संरचनांबाबत आग्रही राहून सुधारणांची कामे कशी होतील हे पाहिले पाहिजे.   

    

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575