Wednesday, February 19, 2020

बेसूरांनो बंद व्हा !


उरूस, 19 फेब्रुवारी 2020

‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात गायक महेश काळे यांनी ‘हे सूरांनो चंद्र व्हा’ हे नाट्यगीत पाश्चात्य संगीताच्या चौकटीत वेगळ्या पद्धतीनं सादर केलं आणि त्यावर मोठ्या प्रमाणात समाज माध्यमातून ट्रोलिंग सुरू झालं.

वास्तविक महेश काळे हे पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून तालिम घेतलेले घराणेबाज कलाकार आहेत. त्यांचा आवाज चांगला आहे आणि ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाच्या यशानंतर त्यांना भरपूर लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या. 

भारतीय संगीतात विविध प्रयोग कित्येक शतकांपासून चालू आहेतच. डबक्यात साचलेलं पाणी असावं तसं हे संगीत नाही. अगदी अलिकडच्या काळात पं. रवीशंकर यांच्यासारख्या दिग्गजांनी जागतिक पातळीवर आपलं संगीत नेवून त्यात विविध प्रयोग यहुदी मेहुनिन सारख्या जगदविख्यात व्हायोलीन वादकासोबत केले आहेत. रवीशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर ही पण असे प्रयोग करत आहे.

तेंव्हा महेश काळे यांनी ‘हे सूरांनो चंद्र व्हा’ पाश्चात्य शैलीत सादर केलं यात तसा आक्षेप घेण्यासारखं काही नाही. या लेखाचे शिर्षक चिन्मय दातार (पुणे) याला सुचलं त्यातील ‘बेसूर’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. महेश काळे हे बेसूर गायले असा तो मोठा आक्षेप आहे. आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे.

पु.ल. देशपांडे यांच्या ‘रावसाहेब’मध्ये एक फार उत्तम प्रसंग आहे. बालगंधर्वांच्या चाली एक हौशी गायक संगीतकार बदलून गातो. त्यावर रावसाहेब उखडतात. त्या गायकाचा ‘मग आम्ही बदलू नयेत का?’ अशा प्रश्‍न आल्यावर रावसाहेबांचे उत्तर फार महत्त्वाचं पुलंनी नोंदवलं आहे. ‘बदल की रे. ते दिनानाथ मंगेशकर बदललं आमची हिंमत झाली का त्याला विचारायची. त्याची ताकदच ती.’

संगीतात प्रयोग करायचे असतील तर ते ताकदीने झाले पाहिजे. ते रूजवता आले पाहिजेत. हिंदी चित्रपट संगीतात कितीतरी पाश्‍चिमात्य वाद्यं वाद्यमेळ संकल्पना यांचा सुंदर उपयोग करत प्रतिभावंत संगीतकारांनी (सी. रामचंद्र, शंकर जयकिशन, ओ.पी.नय्यर, एस.डी. आणि आर.डी. बर्मन, सलील चौधरी आदी..) हिंदी चित्रपट संगीताचा प्रदेश समृद्ध केला. शास्त्रीय संगीतातही व्हायोलीन, मेंडोलीन सारखी वाद्ये आपल्याकडे पूर्णत: रूजल्या गेली. विश्व मोहन भट (सुरवातील ब्रिजभुषण काबरा यांनी) यांनी गिटारला ‘मोहन वीणा’ असे नाव देवून तिला भारतीय शास्त्रीय संगीतात समर्थपणे रूजवली.

महेश काळे यांनी हा प्रयोग करताना सूर सोडला हा आक्षेप गंभीर आहे. त्यांना साथ देणारे पार्श्वगायक तर काय गात होते कोण जाणे. त्यामुळे ‘बेसूरांनो बंद व्हा’ अशी प्रतिक्रिया उमटली. सोबतच ‘गिटार काळजात घुसली’ असंही ट्रोल केल्या जात आहे. ( श्रेय यशवंत पाटील परभणी)

मुळातच नाट्यगीतांवर विनय हर्डीकर सारख्या संगीत समीक्षकांनी गंभीर आरोप केले आहेत. नाट्यगीतांमुळे न नाटकाचा भलं झालं न संगीताचे. असे ते प्रतिपादन करतात. अलीकडच्या काळात पं. जितेंद्र अभिषेकी बुवांचा अपवाद वगळला तर नाट्यसंगीतात कुठलीच उल्लेखनीय कामगिरी कुणा संगीतकाराला दाखविता आली नाही. नाटकाच्या दृष्टीनेही उल्लेखनीय अशी भर संगीत नाटकांनी अलीकडच्या काळात घातलेली नाही.

संगीत नाटक तर जवळ जवळ बंदच पडले आहे. जून्या नाटकांच्या नाट्यगीतांच्या नॉस्टेलजियाला वापरून कट्यार सारखी कलाकृती चित्रपटांतून परत समोर आणली जाते. जून्याच संगीताला नव्याने साज चढविला जातो. आणि नविन ऐकणार्‍यांची एक पिढी काही प्रमाणात तिकडे खेचली जाते. पण यामुळे परत संगीत नाटकांची चलती सुरू होते असे काही दिसत नाहीये.

दहा वर्षांपूर्वी प्रथमेश लघाटे सारखा ‘लिटल चॅम्प’ मधला गायक ‘मी आता नाट्यसंगीतातच करिअर करणार आहे’ असं आश्वासक बोलतो आणि सगळ्यांना वाटतं की नाट्यसंगीताला बरे दिवस आले आहेत. पण तसं काही होताना दिसत नाही. नाट्यगीतं गायली जातात ती शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत उत्तरार्धात मैफल संपवताना. किंवा सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून एक दोन जूनी नाट्यगीतं गायली जातात तेवढंच.

मराठी नाटक स्वतंत्रपणे वाटचाल करत आहे आणि भारतीय शास्त्रीय संगीतपण स्वतंत्रपणे पुढे जात आहे. मराठी चित्रपटही आपल्या आपल्या गतीनं पुढे जात आहेत. जून्या नाटकांतलं गाणं चित्रपटात घेवून त्याचा वापर परत रिऍलिटी शो मध्ये करून प्रेक्षकांना खेचून घ्यावं लागतं ही एक प्रकारची मजबूरीच आहे. नविन तेवढ्या ताकदीचं आम्ही काही देवू शकत नाही हा पराभव मान्य करण्यासारखंच आहे.

महेश काळे यांच्यावरच्या ट्रोलिंग मधून विचार करण्यासारखा एक मुद्दा पुढे येतो आहे. जे काही प्रयोग करायचे असतील ते जरूर करा पण मुळचा सुरेलपणा सोडू नका. भारतीय संगीताची समृद्धी प्रचंड मोठी आहे. तिने कित्येक बदल गेल्या सात आठशे वर्षांत पचवले आहेत (सात आठशे म्हणण्याचे कारण शारंगदेवाचा संगीत रत्नाकर हा ग्रंथ आणि अमीर खुस्रो याचा कालखंड हा ज्ञात इतिहास). तेंव्हा ‘हे सूरांनो चंद्र व्हा’ पाश्चात्य पद्धतीनं म्हटल्यानं काही आभाळ कोसळत नाही. पण ते सूरात गायले पाहिजे या बद्दल मात्र दुमत होण्याचे काही कारण नाही. गिटारही सुरातच वाजली पाहिजे. पार्श्वगायन (कोरस) करणार्‍यांचाही सूर चांगला लागला पाहिजे याला कुठलाच पर्याय नाही. संगीतात शॉर्टकट नाही.

   श्रीकांत उमरीकर 9422878575


ˆˆ   

Tuesday, February 18, 2020

चारठाणकर पुरस्काराच्या निमित्ताने


उरूस, 18 फेब्रुवारी 2020
(चारठाणकर पुरस्कार वितरण प्रसंगी डावीकडून सौ. वरुणा कुलकर्णी, सौ. वर्षा देशपांडे, प्रा. मधु जामकर, डॉ. जगन्नाथ दिक्षीत, अभिनेते गिरीश कुलकर्णी, पत्रकार धनंजय लांबे, ऍड. श्रीकांत वाईकर)

पैसे देवून पुरस्कार मिळविले जात असतानाच्या काळात सामाजिक कृतज्ञता नोंद म्हणून एक पुरस्कार स्वातंत्र्य सैनिकाच्या वतीने सुरू करण्यात येतो. 32 वर्षे हा उपक्रम उत्साहात चालवला जातो. स्वातंत्र्य सैतिकाच्या माघारीही यातील सातत्य कायम राहते ही एक मोठी महत्त्वाची आणि विलक्षण अशी घटना आहे.

सेलू येथील स्वातंत्र्य सैनिक कै. विनायकराव चारठाणकर यांनी त्यांच्या स्वनिधीतून आपल्या परिसरांतील विविध व्यक्तीमत्वांची दखल घेण्यासाठी या पुरस्काराची सुरवात केली. 1988 ला चारठाणकर प्रतिष्ठानची स्थापना झाली. आणि आजतागायत प्रतिष्ठानचे काम चालूच आहे.

या वर्षी अभिनेते गिरीष कुलकर्णी, आरोग्यतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षीत आणि ज्येष्ठ लेखक समीक्षक प्रा. मधु जामकर यांना हा पुरस्कार दै. पुढारीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
पुरस्काराच्या निमित्ताने काही मुद्द्यांचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. विविध संस्थांद्वारे आजकाल पुरस्कार देण्याचे पेवच फुटले आहे. बरेच पुरस्कार हे प्रायोजीत स्वरूपाचे असतात. काही पुरस्कार माध्यमांनी सुरू केले असून त्यांद्वारे घावून सामाजिक प्रतिष्ठा पैसे घेवून विकली जाते. आणि अशा पुरस्कारांनी आपल्याला प्रतिष्ठा मिळते असाही काही लोकांचा समज आहे. या सगळ्या समजूतींना चारठाणकर पुरस्कार पूर्णपणे छेद देतो.

प्रत्येक गोष्टींचे व्यवसायीकरण करून काही एक मिळवता येते असा समज पसरला आहे. त्यामुळे आपणच पुरस्कार सन्मान यांची अवहेलना करतो आहोत हे लक्षातच येत नाही.

गावोगाव कित्येक वर्षांपासून जत्रा उत्सव उरूस भंडारे लोकांच्या उस्त्फुर्त योगदानातून अखंडपणे साजरे होत आले आहेत. यातून आपली सामाजिक सांस्कृतिक जाण आपण दाखवून देत असतो. आधुनिक काळात हाच जनसहभाग विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांमधून आवश्यक आहे. पण तेच आपण विसरून चाललो आहोत. सगळे काही सरकारनेच करावे या भूमिकेतून किमान क्षमता असलेला सामान्य माणूस हातावर हात धरून बसून राहतो.

चारठाणकर पुरस्काराने याच सामान्य माणसाच्या निष्क्रीयतेवर बोट ठेवले गेले आहे. सर्वसामान्य माणसे उत्स्फुर्तपणे एकत्र येवून काही करू शकतात हे परत एकदा समोर येण्याची गरज आहे. सेलू हे त्यासाठी इतरांना आदर्श ठरावे असे गाव आहे. अजूनही या गावात सामाजिक पुरूषार्थाची जपणून केली जाते. हरिभाऊ चारठाणकरांच्या नावाने भरणारा संगीत महोत्सव असो की विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठानचा सामाजिक कृतज्ञता नोंद सोहळा असो कुठलेही झगमगीतपण टाळून साधेपणाने हे उपक्रम लोकसहभाग आणि लोगवर्गणीतून साजरे होतात हे अतिशय महत्त्वाचे आहे.

प्रत्येक गोष्ट सरकारी अनुदान, मोठे प्रायोजक, आमदार खासदारांचा निधी, कर्मचार्‍यांकडून सक्तिच्या कपातीतून साजरे होणारे उत्सव हे सगळं टाळून साधेपणाने स्वेच्छेने काटकसरीने सांस्कृतिक सामाजिक उपक्रम संपन्न होवू शकतात हे आदर्श समोर येण्याची नितांत गरज आहे.

एकेकाळी चांगली सभागृह, उत्तम ध्वनीव्यवस्था, चांगली प्रकाशव्यवस्था यांचा अभाव असतानाही कला जपल्या जायची. सामाजिक कामं देवा धर्माच्या नावावर का होईना केल्या जायची. आता स्वातंत्र्यानंतर अनुकुलता येत गेली तस तशी सर्वच सामाजिक सांस्कृतिक कामाचं एनजीओ करण होत गेलं. सर्वच कार्यकर्ते उत्स्फुर्तपणा विसरून अनुदान निधी सरकारी देणग्या परदेशी देणग्या याकडे आशाळभूतपणे पाहत बसून राहिले. परिणामी या कामांमधून सळसळता उत्साह निघून गेला आणि एक औपचारिकता यायला लागली. दहा वर्षांपूर्वी ठाण्याच्या साहित्य संमेलनाचा लेखाजोखा त्या आयोजक संस्थेने लोकांसमोर मांडला होता. एक कोटी दहा लाखांपैकी केवळ साडेचार लाखाचा निधी लेखकांच्या मनधनावर आणि पाचलाखाचा निधी स्मृतीचिन्हे वगैरेवर खर्च झाला होता. बाकी सर्व निधी इतर अनावश्यक बाबींवर खर्च झाला होता. 

आजकाल अगदी छोट्यातला छोटा सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर प्रत्यक्ष कलाकार, वक्ते, पुरस्कारार्थी यांच्यावर खर्च झालेल्या रकमेच्या दसपट रक्कम इतर अनावश्यक बाबींवर खर्च झालेली आढळून येते.

संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सव असो स्वातंत्र्य सैनिक विनायकराव चारठाणकर सामाजिक पुरस्कार सोहळा असो यांच्या निमित्ताने सेलूकरांनी एक आदर्श घालून दिला आहे. तो समोर ठेवून इतर सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांनी काही एक पायंडे नव्याने घालून दिले पाहिजेत. तरच समाजाला आवश्यक असणार्‍या सामाजिक सांस्कृतिक चळवळींना खर्‍या अर्थाने चालना मिळेल. या चळवळी सरकारी कारभारासारख्या अनुदानाच्या लाचारीत अडकून पडणं चांगलं नव्हे. साधेपणाने पण सातत्याने आणि मुख्य उद्देश न गामावता या चळवळी चालल्या पाहिजेत.

   श्रीकांत उमरीकर 9422878575


ˆˆ   

Sunday, February 16, 2020

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली !


काव्यतरंग, दै. दिव्य मराठी. रविवार १६ फेबु २०२० 

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडोवेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिजे
हरघडी अश्रु वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे; याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
-नारायण सुर्वे

(ऐसा गा मी ब्रह्म, पॉप्युलर प्रकाशन)

कुठल्याही उत्कृष्ठ कलाकृतीच्या तळाशी अपार अशी वेदना असते. ही वेदना प्रकट करण्याचे कलात्मक माध्यम हे खुप संयत असते. काही वेळा वेदना इतकी तीव्र असते की संयतपणाच्या पदराआडूनही तीची धग जाणवते. किंबहुना जेवढा अविष्कार संयत तेवढी ही तीव्रता जास्तच जाणवते.

नारायण सुर्वे यांची बहुतांश कविता अशीच आहे. रस्त्यावरच्या सामान्य माणसाचे महानगरातील कामगाराचे दु:ख सुर्वे यांनी आपल्या कवितेत मांडले. त्यांची शैली कुठेही आक्रस्ताळी नाही, शब्दही अगदी साधे वापरले आहेत. पण आपण जसजशी ही कविता वाचत जातो तस तसे आतून हादरून जातो. 

‘झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले’ अशी ओळ सहजपणे सुर्वे लिहून जातात. पण त्यातील वेदना जाणवून हा चटका वाचताना आपल्याला बसल्याशिवाय रहात नाही. हीच या लिखाणाची खरी ताकद आहे.

शेवटचा मुगल सम्राट बहादूरशहा जफरच्या उर्दू कवितेचा एक शेर सुर्वे यांना फार भावला. 

उम्र-ए-दराज से मांग के लाये थे चार दिन
दो आरजू मे कट गये दो इंतजार मे

या  ओळींपासून प्रेरणा घेवून पुढे सुर्वे यांनी ही कविता आख्खी स्वतंत्रपणे रचली. मुळच्या ओळीतील आरजू म्हणजेच इच्छा आकांक्षा हा शब्द बदलून सुर्वे यांनी दु:ख हा शब्द वापरला. 

कवितेची दुसरीच ओळ ‘हिशोब करतोय किती राहिलेत डोईवरतील उन्हाळे’ अशी आली आहे. इथूनच कविता वेगळे वळण घेते. एरव्ही पावसाळ्याचा हिशोब वय मोजताना आपण करतो पण सुर्वे उन्हाळ्यांचा आणि तोही राहिलेले उन्हाळे असा करतात आणि त्यांचे वेगळेपण जाणवते. बहादूरशहा जफर स्वत:ला बदनसीब म्हणवून घेत असला तरी राजमहालात राहणारा सम्राट होता. आणि सुर्वे म्हणजे अगदी रस्त्यावर सापडलेले अनाथ पोर. ‘दो गज जमी भी न मिले दफन के लिऐ’ अशी वेदना बहादूरशहाने लिहीली आहे. इथे तर सुर्वे जगायचाही किमान अवकाश न लाभणार्‍या सामान्य पिडीतांचे दु:ख उजागर करत आहेत आपल्या शब्दांमधून.

‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली’ अशी एक वेगळी ओळ या कवितेत येते. महानोरांनी जोंधळ्याला चांदणे लखडून जावे अशी कल्पना मांडली आहे. त्याच्या नेमकी विरूद्ध ही प्रतिमा येते.
माणूस परिस्थितीनुसार घडत जातो असे आपण म्हणतो पण हे असं घडत जाताना त्याला मोठे घाव सोसावे लागतात आणि यासाठी ‘झोत भट्टीत शेकावे पोलाद’ अशी एक उपमा सुर्वे यांच्या कवितेत येते. परिस्थिती आपल्याला हवा तसा आकार देते. त्यासाठी मोठी किंमत आयुष्याची मोजावी लागते. हे सगळं दु:ख भोगून येणार्‍या शांतपणात सुर्वे लिहून जातात. 

सुर्वे कविता वाचनही अतिशय सुंदर करायचे. त्यांचा जाडसर आवाज, त्याला असलेला अप्रतिम असा नाद, त्या वाचनाची एक सुंदर गद्य लय यावर अरूण खोपकर यांनी आपल्या ‘चलत् चित्रव्यूह’ पुस्तकात एक सुंदर लेखच लिहीला आहे. खोपकर सुर्व्यांच्या कविता वाचनाबाबत लिहीतात, ‘सुर्व्यांची कविता ऐकणे हा एक विशेष अनुभव असायचा. ते कविता सादर करीत आहेत असे न वाटता, ते आपल्याशी बोलताहेत असे ऐकणार्‍याला वाटायचे. त्यांच्या वाचनात नाट्य आणि निवेदन असले तरी अभिनिवेश नसायचा. त्यांच्या आवाजाला खर्जाचे वजन होते. आवाजाचे जे चढउतार ऐकू यायचे त्यात कधी संताप असायचा, कधी करुणा असायची, कधी मिष्कीलपणा असायचा, तर कधी रोमांच असायचे, भावना कुठली का असेना, भाषा दैनंदिन व्यवहाराची असायची. मात्र राजच्या भाषेतला विस्कळीतपणा त्यांच्या वाचनात नसायचा. ते एक सुरीले, तालिये कवी होते. त्यांचे कवितावाचन किंवा गायन ह्याला एका उत्तम बांधलेल्या बंदिशीची शिस्त होती.’

सुर्वे यांचे कविता वाचन मला स्वत:ला बर्‍याचदा ऐकायला मिळाले हे माझे भाग्य. परभणीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षच होते. त्यांच्या सहवासात तेंव्हा बराच काळ राहता आले. परभणीला होणार्‍या त्रैभाषिक कवि संमेलन मुशायर्‍यात ते बर्‍याचदा आमंत्रित असायचे. त्यांच्या कवितेची गद्य लय अजूनही कानात घुमते आहे. 

ही कविता तशी समजायला सोपी आहे. त्यामुळेच कदाचित तिचे सौंदर्य चटकन समजत नाही. आपण ते गृहीत धरूनच चालतो. सुर्वे यांच्या समग्र कविता एकत्र करून पॉप्युलर प्रकाशनाने सुंदर पुस्तक प्रसिद्ध केले आहे. सगळ्या मिळून दीडदोनशे कविता आहेत फक्त. इतका कमी पण फार महत्त्वाचा ठेवा सुर्वे मागे ठेवून गेले आहेत.

श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Thursday, February 13, 2020

‘आप’च्या विजयात गांधी विचाराचा पराभव!



उरूस, 13 फेब्रुवारी 2020

भाजपच्या पराभवामुळे उत्साहात आलेले, कॉंग्रेसच्या संपूर्ण अपयशामुळे खुश होणारे आणि भाजपच्या तीनच्या आठ जागा झाल्यामुळे आनंदित झालेले सगळे समोर जो धोका येवू घातला आहे त्याकडे डोळेझाक करत आहेत. या खुशीच्या महापुरात अर्थशास्त्रातील साधे तत्त्व वाहून जात आहे हे लक्षातच घेतले जात नाही. कुठलीच गोष्ट फुकट नसते. त्याची किंमत कुणाला तरी कुठल्या तरी स्वरूपात मोजावीच लागते. महात्मा गांधींच्या स्वयंपूर्ण खेड्याच्या मांडणीला या केजरीवाल यांच्या फुकटा फुकटीने तडा जातो आहे. गांधींच्या दीडशेव्या जयंती वर्षातील आपचा विजय गांधी विचारांचा एक प्रकारे पराभवच मानावा लागेल.

25 वर्षांपूर्वी दिल्ली राजस्थान मध्यप्रदेशच्या निवडणुकांत भाजपचा पराभण कांदे बटाटे यांच्या भाववाढीमुळे झाला होता. असा अपप्रचार केला गेला आणि परिणामी या कृषीमालाचे भाव दाबून टाकणारी यंत्रणा गतिमान झाली. नंतर राज्यावर कुणीही आले तरी शेतकरी मारण्याचे हे धारेण बदलले नाही. शेतकरी आत्महत्येला मिळालेली गती पाहता या आत्महत्या नसून जाणीपूर्वक सरकारच्या शेतीधोरणाने केलेले खुन आहेत ही शेतकरी चळवळीची मांडणी आता सिद्ध होत चालली आहे.

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने 2004 नंतर ज्या पद्धतीनं फुकटा फुकटीची धोरणं राबविली त्यातून आर्थिक नुकसान प्रचंड झाले. सरकारशाही बळकट झाली. याचे परिणाम अजून आपल्याला भोगावे लागत आहेत. आता केजरीवाल यांनी फुकट वीज, पाणी, मोफत दवाखाने, सरकारी फुकट शिक्षण यांचा असा काही देखावा उभा  केला आणि निवडणुका जिंकल्या आहेत की आता इतर कुठलाही पक्ष या झपटमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. दक्षिणेतील फुकट तांदूळ, फुकट सायकल, फुकट टिव्ही, उत्तर प्रदेशातील फुकट लॅप टॉप, महाराष्ट्रातील 10 रूपयांतील शिवभोजन या सगळ्या उटपटांग बाबींना आता विनाकारण गती मिळणार आहे.

नेहरूंच्या समाजवादी अर्थवादाने देशाचे प्रचंड नुकसान केले हे आता अर्थशास्त्राचे अभ्यासक मान्य करत आहेत. आर्थिक गती कुंठीत झाली. सरकारी हस्तक्षेपामुळे विकास थांबतो. सरकारने किमान बाबींवरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. यात परराष्ट्र धोरण, संरक्षण, न्याय व्यवस्था, चलन, रस्ते-वीज-रेल्वे-पाणी या संरचनांशी संबंधीत बाबी पहाव्यात, पोलिस यंत्रणा सक्षम करावी. हे सोडून सरकार नको त्या गोष्टीत लक्ष घालते आणि त्याचे भयानक परिणाम देशाला सोसावे लागतात.

केजरीवाल यांच्या यशाने आता अगदी भाजपासगट सर्वच पक्ष अशा लोकानुयायी उथळ सवंग योजनांच्या नादी लागण्याचा मोठा धोका आहे. चांगला रस्ता तयार झाला, पिण्यासाठी पाणीपुरवठा करता आला, सिंचनाच्या सोयी झाल्या तर गरीबी लवकर हटते त्यासाठी गरिबांना फुकट धान्य देण्याचा आचरटपणा करण्याची गरज नसते. रोजगार निर्माण करणे हे सरकारचे काम नाही. चांगल्या संरचना, उद्योगांना पोषक वातावरण, शेतीची उपेक्षा थांबवणे यातून प्रचंड प्रमाणात रोजगार आपोआप निर्माण होतो. आरोग्य व्यवस्था हे सरकारचे काम नाही. फार तर सरकार प्राथमिक आरोग्य किंवा प्राथमिक शिक्षणाशी संबंधीत काही बाबी ठोसपणे करू शकते. बालवाडी पासून ते पदव्यूत्तर शिक्षणापर्यंत सरकारी हस्तक्षेप अनावश्यक आहे हे आपण कधी समजून घेणार आहोत?
इंग्रजांनी आधुनिक शिक्षण व्यवस्था सरकारी पातळीवर राबवायला सुरवात केली आणि आमच्या गावगाड्यातील शिक्षण व्यवस्था कोसळली हा आरोप कुण्या येरागबाळ्याने नाही तर पुरोगाम्यांचे सर्वात लाडके महात्मा गांधी यांनीच केला आहे. महात्मा गांधी अ-सरकारवादी होते हे आज सरकार समोर लाचार होवून धोरणं आखण्याचा आग्रह धरणारे पुरोगामी समजून घेणार की नाही?

तूम्ही गरिबांसाठी काहीच करू नका, आधी गरीबाच्या छातीवर बसला अहात ते उठा. गरिब त्याची सुधारणा करून घेईल. हे सांगणारे महात्मा गांधी आज कुणालाच नकोसे वाटत आहेत.

गांधींना स्वयंपूर्ण खेडी हवी होती. गांधींच्या खेड्यात न्यायव्यवस्था ग्राम पातळीवर असणार होती. इथे प्रत्येक गोष्ट राज्य किंवा केंद्र सरकार आपल्या हातात घट्ट धरून ठेवतं आहे. प्रत्येक गोष्टीत सरकार नाक खुपसत आहे आणि त्याचे समर्थन करत पुरोगामी विद्वान अशा सरकारची आरती करत आहेत.

आता सर्वत्रच सरकारी दवाखाने चांगले कसे आहेत, सरकारी शाळा चांगल्या कशा आहेत, शिक्षण कसे फुकटच भेटले पाहिजे, सरकारने पाणी कसे फुकटच दिले पाहिजे अशी मांडणी आता जोरकसपणे होणार. गरिबांच्या नावाखाली चालणारा हा सगळा आचरट उद्योग करून आपले खिसे भरण्याचा धंदा आता सगळेच परत जोमाने करायला लागतील हा धोका आहे.

मनरेगा योजना आली आणि मजूरांची ग्रामीण भागात काम करण्याची मानसिकताच संपून गेली. फुकटचा रोजगार, काम न करताही पैसे, फुकटचे रेशनचे धान्य, आता तर 10 रू मध्ये जेवण, कुणी फुकट कपडे वाटत आहे, फुकट घर भेटत आहे. याला पुरूषार्थाचे खच्चीकरण असा शब्द शरद जोशींनी वापरला होता. आणि अशा फुकटा फुकटीला नेहरूंच्या समाजवादी आर्थिक धोरणात मोठे स्थान होते. हे धोरण कॉंग्रेसने राबविणे आपण समजू शकतो. डाव्यांनी याचा आग्रह धरणे समजू शकतो. पण आता आप सारखे पक्षही यात वाहून जाणार असतील तर काय बोलणार? भाजपमध्येही आता या फुकटा फुकटीला ऊत येणार. आधीच गरिबांसाठीच्या योजना भाजप लोकप्रिय करण्यात गुंतला आहेच. दिल्लीच्या पराभवाने आता तेही अजून कडवेपणाने नेहरूंच्या या समाजवादी धोरणांचा अवलंब करतील.

जवाहरलाल नेहरू आणि तूमच्यातील नेमका वैचारिक विरोध कोणता असा प्रश्‍न एकदा पत्रकारांनी महात्मा गांधींना विचारला होता. त्याला महात्मा गांधींनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते. त्याचा मराठी सारांश असा, ‘जवाहरची इच्छा आहे की इंग्रज येथून गेलेच पाहिजेत, त्यांची धोरणं राहिली तरी चालतील. पण मी मात्र इंग्रज राहिले तरी हरकत नाही पण इंग्रजांची धोरणं हद्दपार झाली पाहिजेत या मताचा आहे.’ महात्मा गांधींचा आम्ही सगळ्यांनी मिळून पराभव केला. गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज आला. शेतीच्या लुटीची धोरणं तीच राहिली. सरकारशाही बळकट झाली. कॉंग्रस असो, भाजप असो की आप सगळ्यांनाच सरकारशाहीचा फास सामान्यांच्या गळ्या भोवती आवळणे सोयीचे आणि आवडीचे वाटत आहे. महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंती वर्षात हा गांधी विचारांचा मोठा पराभव आम्ही घडवून आणतो आहोत.
             
   श्रीकांत उमरीकर 9422878575


ˆˆ   

Tuesday, February 11, 2020

गुलाम रसूल संगीत महोत्सव, परभणी वर्ष दूसरे !


उरूस, 11 फेब्रुवारी 2020

मराठवाड्यात स्वातंत्र्याच्या नंतर अगदी सुरवातीच्या काळात संगीत चळवळ रूजविणारी जी मोजकी नावे आहेत त्यापैकी एक म्हणजे परभणीचेा उस्ताद डॉ. गुलाम रसूल. परभणीला गायनाची कुठलीच पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य कुटूंबात उस्तादजींचा जन्म 24 एप्रिल 1927 ला झाला. उस्तादजींनी स्वयंप्रेरणेने संगीताचे शिक्षण प्राप्त केले. 1974 मध्यं संगीताचार्य म्हणजेच डॉक्टरेट ही पदवी त्यांनी मिळवली. भारतभर परिक्षक म्हणून फिरत असताना विविध कलाकारांशी त्यांचा संपर्क आला. आग्रा ग्वाल्हेर घराण्याची गायकी त्यांच्या गळ्यावर प्रभाव टाकून गेली.

1965 च्या दरम्यान त्यांनी ललित कला मंडळाच्या माध्यमातून संगीत शिक्षणाची सुरवात परभणीस केली. त्या काळात असे संगीताचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणार्‍या संस्था आणि संगीतातील पदवी प्राप्त शिक्षक फार दुर्मिळ होते. मराठवाड्यातील अशा मोजक्याच लोकांपैकी डॉ. गुलाम रसूल. त्यांच्या आधीच्या पिढ्या या मौखिक परंपरेतून शिकलेल्या. यांच्यापेक्षा उस्तादींचे वेगळेपण त्यांच्या अभ्यासू व्यक्तीमत्वात शोधता येते. संगीत विषयक मासिकांमधून नियमितपणे लेख लिहीणारे त्यांच्यासारखे फारच थोडे विद्वान त्या काळात होवून गेले.
डॉ. गुलाम रसूल यांच्या स्मृती प्रित्यर्थ औरंगाबादेत त्यांचे शिष्य डॉ. पराग चौधरी गेली अकरा वर्षे संगीत महोत्सव भरवत आहेत. परभणीला त्यांच्या जन्म आणि कर्मभूमीत संगीत महोत्सव झाला पाहिजे अशी त्यांच्या शिष्यांची आणि चाहत्यांची इच्छा होती. त्या इच्छेला देवगिरी संगीत प्रतिष्ठान या शास्त्रीय संगीत चळवळीसाठी मराठवाडाभर काम करणार्‍या संस्थेने मूर्त रूप दिले. गेल्या वर्षीपासून हा संगीत महोत्सव परभणी शहरात भरवला जातो आहे.

या वर्षी 8-9 फेब्रुवारी रोजी हा महोत्सव संपन्न झाला. लोकवर्गणीतून हा महोत्सव साजरा करण्याचा पायंडा सेलू पाठोपाठ आता परभणीतही चांगलाच रूजला आहे. संगीत रसिक, शहरातील गायक वादक, संगीत शिकणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, संगीत प्रेमी या सगळ्यांच्या सहकार्याने हा महोत्सव पार पाडला जातो. लोकसहभाग आणि लोकवर्गणी ही फार महत्त्वाची बाब या महोत्सवात घडून येत आहे. अशा प्रकारचे उत्सवच हळू हळू लोकमहोत्सव बनत टिकून राहतात. एरव्ही बहुतांश उपक्रमांचे आयुष्य फारसे नसते.

शास्त्रीय संगीतासाठी हे घडून येते आहे ही पण फार महत्त्वाची बाब आहे. अन्यथा इतर संगीत प्रकारांसाठी प्रायोजक मिळतात, आश्रयदाते तयार असतात. पण शुद्ध शास्त्रीय संगीतासाठी म्हणून काही उपक्रम करणं कठिण जातं. त्यासाठी येणार्‍या अडचणी विविध प्रकारच्या आहेत. सगळं जूळून आलं तरी समोर जाणकार श्रोते नसतील तरी ते श्रम सार्थकी लागत नाहीत. यासाठी श्रोत्यांचा कान तयार करण्याचे पण मोठे आव्हान संयोजकांसमोर असते.

मराठवाड्याच्या ग्रामीण भागात सर्वत्र संगीतविषयक अतिशय पोषक वातावरण आहे.

शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर ग्रंथात गायन-वादन-नृत्य या तिन्हीला मिळून संगीत म्हटल्या गेलेलं आहे. मराठवाड्यात जास्त करून गायनाचेच कार्यक्रम होतात. त्या तूलनेनं वादन फारसे होत नाही. आणि नृत्य तर त्याहूनही कमी. जवळपास नाहीच. गुलाम रसूल संगीत महोत्सवात आवर्जून वाद्य संगीत आणि नृत्य यांचा समावेश करण्यात येतो. या वर्षी महागामी गुरूकुलाच्या श्रीया दिक्षीत आणि रसिका तळेकर या पार्वती दत्ता यांच्या शिष्यांनी अप्रतिम असा कथ्थक नृत्याचा आविष्कार सादर केला. उस्ताद शाहिद परवेझ यांचे शिष्य आणि पुत्र उस्ताद शाकिर खा यांनी राग जोग आणि पिलू रागातील धून वाजवली.

मराठवाड्यातील युवा कलावंत जालन्याची भक्ती पवार हीच्या आश्वासक सुरांनी मराठवाड्यात शास्त्रीय संगीताचे भवितव्य उज्वल असल्याची ग्वाही दिली. उस्ताद गुलाम रसूल यांचे शिष्य डॉ. पराग चौधरी यांनी पहिल्या दिवशी जो मारवा आळवला त्यात आर्तता तर होतीच पण सोबत गुलाम रसूल यांचा वारसा पुढे चालविण्याची ग्वाहीही होती.

विदूषी मंजिरी कर्वे आलेगांवकर आणि बेंगलुरूचे ज्येष्ठ गायक पं. परमेश्वर हेगडे ही मोठी नावं. मंजिरी ताईंचा नंद असो की परमेश्वरजींचा मारूबिहाग एकाचवेळी रसिकांना बांधून ठेवत होता  आणि गायन क्षेत्रातील जाणकारांना बौद्धिक मेजवानीही देवून जात होता.

महोत्सवाचे आयोजन अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आले. कुठलाही अंगावर येणारा भपका नव्हता, आक्रस्ताळी सजावट नव्हती, असांगितिक लोकांचा अनावश्यक वावर नव्हता. कुठेही भाषणबाजी नव्हती. एखादे घरगुती कार्य असावे त्या निगूतीने आणि आपुलकीने कार्यकर्ते संगीतप्रेमी रसिक शिष्यवर्ग कार्यरत होता.
या महोत्सवाने एक वेगळा पायंडा पाडला आहे.

उस्ताद गुलाम रसूल सारख्यांनी अतिशय प्रतिकूल काळात संगीत चळवळ रूजवली. आज तंत्रज्ञानाची मोठी साथ असताना, आर्थिक दृष्ट्या सामान्य माणसे सुस्थितीत आली असताना कलाविषयक चळवळी मंदावल्या याची खंत आहे. चांगली सभागृहे, ध्वनी व्यवस्था, प्रवासाच्या निवासाच्या सोयी सगळ्यांचीच बर्‍यापैकी समृद्धी गुलाम रसूल यांच्या काळापेक्षा आता दिसून येते. पण कलाविषयक जाणीवा मात्र विस्तारताना दिसत नाहीत. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे भाग आहे. संगीत क्षेत्रातील सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्याला इतरांनी साथ दिली पाहिजे. सामान्य रसिकांचा कान घडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

देवगिरी संगीत प्रतिष्ठान यासाठी कटीबद्ध आहे. मराठवाड्यात ज्यांना कुणाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी संपर्क करावा.
             
 श्रीकांत उमरीकर 9422878575


Thursday, February 6, 2020

किशोरकुमारच्या दुर्मिळ चित्रपटाच्या दोन रीळ सापडल्या


उरूस 6 फेबु. 2020 

किशोरकुमार पडद्यावर दिसतो आहे नायक म्हणून पण गाणं जे चालू आहे ते इतर गायकांच्या आवाजात. हे दृश्य एक दोन नव्हे तर तब्बल 22 वेळा घडले आहे. अशी 22 गाणी सापडली आहे. एका गाण्याबाबत मात्र वाद चालू होता. 1957 ला ‘बेगुनाह’ नावाचा किशोर कुमारचा चित्रपट आला होता. हा चित्रपट डॅनी केच्या ‘नॉक ऑन वूड’ या इंग्रजी चित्रपटाची नक्कल होता. त्यामुळे त्याच्यावर मुळ इंग्रजी निर्मात्यांनी बंदी घालण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आणि चित्रपट डब्यात गेला.

या चित्रपटात मुकेशच्या आवाजातील ‘ए प्यारे दिल बेजुबां’ हे गाणे किशोरकुमारवर चित्रीत झाले असे मानले जायचे. पण प्रत्यक्षात पुरावा काहीच नव्हता. हा चित्रपट पाहणार्‍यांनी हे गाणे संगीतकार जयकिशनवर चित्रित झाल्याचे सांगितले. इसाक मुजावर यांनी आपल्या ‘चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ- 1931 ते 1960’ या पुस्तकात हे लिहून ठेवले आहे.

माझे वडिल अनंत उमरीकर हे हिंदी चित्रपट आणि गाण्यांचे प्रचंड दर्दी. त्यांनी हे गाणे जयकिशनवरचे आहे आणि त्याने पांढरा सुट घातला आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले. मी त्यांना विचारले अहो या चित्रपटावर तर बंदी आली होती. तूम्ही केंव्हा बघितलात? ते म्हणाले बंदी आली पाचव्या दिवशी. मी तर पहिल्याच दिवशी चित्रपट पाहिला होता. ते तेंव्हा हैदराबादला शिकायला होते.

‘द हिंदू’ दैनिकाने या गाण्याची चित्रफित सापडल्याची बातमीच दिनांक 5 फेब्रुवारी 2020 च्या अंकात अगदी पहिल्या पानावर दिली आहे. या गाण्याच्या वेळेसचा फोटोही त्यांनी पहिल्याच पानावर छापला आहे. किशोर कुमारच्या चित्रपटांत त्याच्यासाठी इतर गायकांनी गाणी गायली आहेत हे बहुतेकांना माहित होत नाही. अशा किशोर कुमारच्या गाण्यांची यादी खाली जोडली आहे. ‘ए प्यारे दिल बेजुबान’ चा फोटो सौजन्य दै. द हिंदू. 

किशोर कुमार साठी इतर गातात तेंव्हा

1. बाप रे बाप (1955)- ओ.पी.नय्यर- जाने भी दे छोड ये बहाना-आशा
2. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- चले हो कहां करके जी बेकरार- रफी/आशा
3. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- आंखो को मिला यार से- रफी/बातीश
4. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- हमे कोई गम है- आशा रफी
5. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- हमे कोई गम है- आशा रफी
6. पैसा ही पैसा (1956)- अनिल विश्वास-  ले लो सोने का लड्उू - किशोर/रफी
(एक कडवे रफीचे किशोरवर चित्रित आहे)
7. बेगुनाह (1957)-शंकर जयकिशन-  दिन अलबेले प्यार का मौसम- मन्ना/लता
8. रागिणी (1958)- ओ.पी.नय्यर- मन मोरा बावरा- रफी
9. रागिणी (1958)- ओ.पी.नय्यर- छेड दिये दिल के तार - अमानत अली (उपशास्त्रीय)
10. शरारत (1959)- शंकर जयकिशन- अजब है दास्ता तेरी ए जिंदगी- रफी
11. शरारत (1959)- शंकर जयकिशन- लुस्का लुस्का लुई लुई शा तू मेरा कॉपी राईट- रफी/लता
12. करोडपती (1961)- शंकर जयकिशन-  पहले मुर्गी हुयी थी के अंडा- मन्ना
13. करोडपती (1961)- शंकर जयकिशन- आप हुये बलम मै तेरी हो गयी- मन्ना/लता
14. नॉटी बॉय (1962)- सचिन देव बर्मन - हो गयी श्याम दिल बदनाम-रफी/आशा
15. बागी शहजादा (1964)- बिपीन दत्त- मै इस मासुम चेहरे को- रफी/सुमन
16. अकलमंद (1966)- ओ.पी.नय्यर- जब दो दिल हो बेचैन- आशा/शमशाद
17. अकलमंद (1966)- ओ.पी.नय्यर- ओ बेखबर तुझे क्या खबर- दुर्रानी/महेंद्र/ भुपेंद्र
18. अकलमंद (1966) - ओ.पी.नय्यर बालमा साजना दुनिया भूला दी-आशा/उषा
19. दुनिया नाचेगी (1967) - की जो मै होता हवा का झोका-मन्ना/आशा
20. हाय मेरा दिल (1968)- उषा खन्ना- जानेमन जानेमन तूम-मन्ना/उषा खन्ना
21. हाय मेरा दिल (1968)- उषा खन्ना- काहे जिया की बात- मन्ना
22. प्यार दिवाने (1972)- लाला सत्तार- अपनी आदत है सबको सलाम- रफी

Wednesday, February 5, 2020

तळ्याकाठी निवारा शोधीत थकून आली शांतता !


काव्यतरंग, दै. दिव्य मराठी  २  फेबु २०२० .

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावे मला वाटते
जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिसळून असतो काही
गळून पडत असता पान मुळीच सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी मधूनच नसते वरती येत
पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचारांची धूळ जिथे हळूहळू निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावे मला वाटते
-अनिल
(दशपदी, मौज प्रकाशन)

खुप ताणाताणीचे व्यग्र असे (व्यग्र हा शब्द वापरायच्या ऐवजी आपण चुकीने सर्रास हिंदी अर्थाचा शब्द व्यस्त वापरतो. त्याचा मराठीतला अर्थ ‘सम’च्या विरूद्ध ते ‘व्यस्त’ असा आहे.) जीवन जगत असताना कधीतरी आपल्याला शांततेची तहान लागते. अशी जागा आपण शोधू पहातो तिथे कुठलेच आवाज नसतील. अशा जागी जो आवाज असतो त्याला शांततेचा आवाज म्हणतात. जंगलात एखाद्या तळ्याच्याकाठी अशी जागा आपल्याला सापडते.

कवी अनिलांनी याच भावनेला आपल्या कवितेत शब्दरूप दिले आहे. अनिलांच्या अकादमी पुरस्कार प्राप्त अतिशय प्रसिद्ध अशा ‘दशपदी’ कवितासंग्रहात ही कविता आहे. ‘दशपदी’तील सर्वच कविता या दहा ओळींच्या आहेत. त्यांची वैशिष्ट्ये समिक्षकांनी उलगडून दाखवली आहेत. नुकतेच अनिलांच्या समग्र कवितेचे पुस्तक श्याम धोंड यांनी मोठ्या कष्टाने संपादित करून प्रकाशीत केले आहे.

‘तळ्याकाठी’ या कवितेची लय अतिशय संथ उस्ताद अमीर खां यांचा विलंबीत ख्याल असावा अशी आहे. जवळ जवळ गद्य वाट्याव्या अशा ओळी यात आलेल्या आहेत. आपण ही कविता वाचत जातो तसं तसं आपल्या आत एक शांतता पसरत गेल्याचा विलक्षण अनुभव येत जातो. दुसर्‍याच ओळीत ‘शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते’ असे शब्द येतात. म्हणजेच शांतते साठी जे काही इतर उपाय आपण करत असतो ते सगळे थकून गेले आहेत. त्यांना मर्यादा पडली आहे. आणि ही शांतता नेमकी मिळते कुठे तर वर्दळीपासून पूर्णत: दूर गेल्यावर जंगलातल्या एखाद्या अस्पर्श अशा तळ्याच्याकाठी. जिथे शेकडो वर्षांपासून प्राणी पक्षी वृक्ष यांचे सहजीवन अव्याहतपणे चालू आहे.  मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या जागी आपण जावून त्याच भावनेने शांत बसून राहिलो तरच आपल्याला ही शांतता अनुभवण्यास मिळणार आहे.

व्यंकटेश माडगुळकर यांचे ‘नागझिरा’ हे आख्खे पुस्तक म्हणजेच अनिलांच्या या कवितेचा गद्य विस्तार होय. ‘नागझिरा’ पुस्तकाच्या शेवटी माडगुळकरांनी असे लिहीले आहे की ‘..येताना सोबत जी मद्याची बाटली आणली होती ती बॅगेच्या तळाशी परत येताना तशीच पडून होती.’ त्यांना त्या नशेची कुठली गरजच पडली नाही इतकी नशा या निसर्गातील प्राणी पक्षी वृक्ष यांच्या सहवासात लाभली होती.

अनिलांच्या या कवितेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो प्रत्यक्षपणे शब्दांत आलेला नाही तो म्हणजे या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आपल्यालाही त्यात त्याच पद्धतीनं मिसळावं लागेल हा आहे. नसता निसर्गात जावून आपण जो धुडगुस घालतो, खाण्यापिण्याचा जो आचरटपणा करतो, आरडा ओरडा करून सगळं पाणी गढूळ करून टाकतो ते भयानक आहे. हे पूर्णत: टाळलं पाहिजे. पाणी गढूळ करून टाकतो हे केवळ पाण्याशी संबंधीत विधान नाही. आपण त्या निसर्गातील सगळं जगणंच गढूळ करून टाकतो. रणजीत देसाई यांची एक सुंदर कथा आहे. त्यात रात्रभर जंगलातील विविध आवाजांचे वर्णनं येत जातात. जंगलातील विलक्षण अनुभव देसाई रंगवत जातात. कथेच्या शेवटी असं वाक्य येतं, ‘... खट खट लाकडे तोडण्याचा आवाज येवू लागला. आणि जंगलात माणसांचा दिवस सुरू झाला.’या एकाच वाक्यात मानवी हिंसक वृत्तीची दखल रणजीत देसाईंनी नेमकी घेतली आहे.

व्यंकटेश माडगुळकरांनी नागझिरा तळ्याच्या काठी बसून रात्रभर चांदण्यात विविध आवाज कसे अनुभवायला आले याचे वर्णन केलं आहे. आणि शेवटी तेंदू पत्ता मजूर कसे येतात आणि आवाजाचा कलकलाट कसा सुरू होतो याचे वर्णन येतं. आत्तापर्यंत गढून न झालेलं पाणी पुरतं गढूळ होवून जातं.

निसर्गातील सर्व घटक या शांततेत समाजवून गेलेले असतात. कुणीच कुणाच्या शांततेचा भंग करत नाही. केवळ माणूस हा असा एकच प्राणी आहे की जो गोंगाट करून सगळं काही ढवळून टाकतो.

कवितेचा शेवट हृदयावरची विचारांची धूळ हळू हळू जिथे निवळत जाते असा केलेला आहे. विचार हे मानवी उत्क्रांतीचे एक महत्त्वाचे साधन आहे. बुद्धी आहे म्हणूनच तर माणूस इतर प्राण्यांपासून वेगळा आहे. पण याच विचारांची धूळ बनते आणि ती आपल्या हृदयावर साचून राहते तेंव्हाच आपण शांतता गमावून बसतो. ही धुळ झटकायची असेल तर आपल्यालाही प्राणी पक्षी झाडे यांच्यासारखाच निसर्गाचा एक अविभाज्य घटक बनून तळ्याच्या काठी बसून रहावे लागेल तेंव्हाच ती अनुभूती येईल.

धुळे जिल्ह्यात महाराष्ट्र गुजरात सीमेवर ‘बारीपाडा’ नावाचे सुंदर गाव आहे. या गावाने स्वत:चे जंगल राखले आहे. या जंगलातील तलावाकाठी बसून अनिलांच्या या कवितेचा अनुभव मला स्वत:ला घेता आला. उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींना ही कविता मी म्हणून दाखवली आणि काही काळ शांत बसायला सांगितलं. सगळ्यांना एका विलक्षण अनुभूतीचा साक्षात्कार झाला. तूम्हीपण हा अनुभव जरूर घ्या.

श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575