Wednesday, May 16, 2018

जागतिक नृत्य दिवस : थोडे स्मरण- भरपूर विस्मरण


उरूस, सा.विवेक, 16 मे 2018

एक अगदी 70 वर्षांची ज्येष्ठ भरत नाट्यम् नृत्यांगना डॉ. जयश्री राजगोपालन षोडशीच्या उत्साहात हजारो वर्षांपूर्वीच्या लेण्यांमधील शिल्पांतून नृत्य मुद्रा कशा प्रकट झाल्या आहेत हे सांगताना सहजच तशा मुद्रा करून दाखवते. पंच्याहत्तरीचे विख्यात सिने दिग्दर्शक पद्मविभुषण अदूर गोपालकृष्णन नृत्यांवरच्या आपल्या माहितीपटाची माहिती देताना आपल्या लहानपणीच्या कला संस्कारांत रमून जातात. नृत्यासाठी प्रकाश योजना कशी आणि किती महत्त्वाची आहे याचे पैलू उलगडून दाखवताना आपले गुरू गौतम भट्टाचार्य यांचे स्मरण करताना संदीप दत्त गहिवरून जातात. कला पत्रकार सुहानी सिंग यांना छोट्या विद्यार्थीनीने प्रश्‍न विचारताच आपण आई उमा डोग्रा यांच्या कडून प्रत्यक्ष कथ्थक शिकलो हे सांगताना त्यांच्या शब्दांत कलेबाबतचा अभिमान झळकत राहतो. कला समिक्षक कुणाल रॉय हे सजगपणे नृत्याच्या पैलूंवर चर्चा करताना माध्यमांनी केलेला अन्याय मांडतात आणि ऐकणार्‍यांच्या काळजाला घरे पडतात. हे सगळे घडवून आणणार्‍या ओडिसी कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता इंग्रजी हिंदी भाषेचे पूल साधत आपल्या शिष्यांना कला रसिकांना अभिरूचीच्या वेगळ्याच पातळीवर घेवून जात असतात. 

ही दृष्ये आहेत 29 एप्रिल या जागतिक नृत्य दिना निमित्त औरंगाबाद येथे महागामी गुरूकुलात झालेल्या चार दिवसीय कार्यक्रमांमधली. 29 एप्रिल हा दिवस जगभरात नृत्य दिवस म्हणून 1982 पासून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे महान कलाकार जीन जॉर्जेस नोव्हेरे याच्या आठवणीत हा दिवस साजरा केला जातो. 

आपल्याकडे तर नृत्याची परंपरा अगदी शिवाच्या तांडव नृत्यापासून सांगितली जाते. शिवाय जागतिक नृत्य दिवस जो 29 एप्रिल आहे त्या काळाशीही भारतीय संदर्भ जूळून येतो. हा काळ जवळपास वसंत ऋतूचा काळ आहे. आपल्याकडे तसेही वसंत उत्सव साजरा करण्याची परंपरा आहेही.

औरंगाबादेत 21,22,28 व 29 एप्रिल असे चार दिवस हा जागतिक नृत्य दिवस साजरा झाला. केवळ नृत्याचे सादरीकरण इतक्यापुरता हा महोत्सव असला असता तर त्याची फारशी दखल घेण्याचे काही कारण नव्हते. पण या निमित्ताने नृत्याच्या विविध पैलूंवर त्या त्या क्षेत्रातील विद्वान बोलावून चर्चा घडवून आणल्या गेली हे विशेष. 


ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना जयश्री रामगोपालन यांनी जून्या लेण्यांमधील शिल्पांतून ज्या नृत्य मुद्रा प्रकट होतात त्यांचे सप्रयोग स्पष्टीकरण सोप्या भाषेत मांडले. यातून आपल्या नृत्य परंपरेचे भक्कम पुरावेच समोर आले. अगदी आधुनिक काळात शंकराचार्यांनी 1980  मध्ये महाराष्ट्रात सातार्‍याला मंदिर निर्माण करून त्यावर नृत्य मुद्रा कसे आवर्जून कोरून घेतल्या ही माहिती त्यांनी दिली तेंव्हा प्रेक्षकांना सुखद धक्का बसला. कारण हे मंदिर महाराष्ट्रात असून केवळ धार्मिक कर्मकांड करणार्‍या शंकराचार्यांकडून अशी कलाविषयक उत्तम कृती व्हावी हे जरा अनपेक्षीत होतं. पुढे अदूर गोपालकृष्णन यांच्याही विवेचनात नृत्य कलेच्या संगोपनात मंदिरांचा अतिशय मोलाचा वाटा असल्याचे स्पष्ट झाले.

जागतिक किर्तीचे प्रकाश योजनाकार संदीप दत्त यांचे अनुभव विस्मयचकित करणारे होते. आधुनिक काळात प्रकाश योजनेचा वापर करून नृत्याच्या हावभावांना कसा उठाव देता येतो हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले. आदल्याच दिवशी अष्टप्रहर हा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम या महोत्सवात सादर झाला होता. या कार्यक्रमास संदीप दत्त यांची प्रकाश योजना लाभली होती. पहाटेच्या रागांसाठी आल्लाददायक उजळ प्रकाश योजना, दुपारच्या रागांसाठी तीव्र प्रकाश, संध्याकाळच्या रागांसाठी काळोखाची छाया दर्शविणारी हुरहुर लावणारी, रात्रीच्या पहिल्या प्रहराची फिकी निळसर छटा असलेली, उशीराच्या प्रहराची गदड निळ्या रंगाची अशा कितीतरी छटा त्यांनी दाखवल्या होत्या. प्रकाश योजनेत एलईडी दिव्यांचा प्रकाश कसा नृत्याला हानीकारक आहे हे बारकावे त्यांनी सप्रमाण दाखवले. 

सुहानी सिंग या कला पत्रकार म्हणून परिचित आहेत. त्यांनी नृत्यविषयक कार्यक्रमांचे वार्तांकन करताना येणार्‍या अडचणी आणि आव्हाने यांची सविस्तर चर्चा केली. केवळ पारंपरिक नृत्यच नव्हे तर आधुनिक प्रकारच्या नृत्यांचीही एक पत्रकार म्हणून कशी दखल घ्यावी लागते हेही त्यांनी विषद केले. ज्येष्ठ कलाकारांशी वागताना किती काळजी घ्यावी लागते. त्यांच्याकडून माहिती काढून घेताना स्वत:चे असलेले या विषयातील ज्ञान कसे उपयोगी पडते हेही त्यांनी सांगितले.


पद्मविभुषण अदूर गोपालकृष्णन यांचे दोन माहितीपट या महोत्सवात दाखविले गेले. महान कथकली कलाकार कलामंडलम गोपी यांच्यावरचा माहितीपट अतिशय महत्त्वाचा आहे. कथकली कलाकारांना चेहर्‍याची रंगरंगोटी (मेक अप) करण्यासाठी अक्षरश: चार चार तास लागतात. त्यांची पूर्व तयारीच कित्येक तास चालते. गोपी यांच्यावरील हा माहितीपट करण्यासाठी अदूरजींनी अतिशय मेहनत घेतली. इतकेच नाही तर या कलेचे पावित्र्य चित्रिकरण काळातही जपले जाईल याकडे कटाक्ष ठेवला. एक कलाकार एकदा मद्यपान करून आलेला लक्षात आल्यावर त्यांनी त्या संपूर्ण दिवसाचे चित्रिकरण स्थगित ठेवले. त्या कलाकाराला आपली चुक कळल्यावर परत कुणी तसे वागले नाही. 

दुसरा माहितीपट मोहिनीअट्टम या नृत्यप्रकारावर बेतलेला आहे. माहिनीअट्टमच्या चार मान्यवर गुरू आणि त्यांच्या शिष्या असा हा माहितीपट आहे. हे नृत्य मंदिरात जसे सादर केले जाते तसेच चित्रिकरण अदूरजींनी केले आहे. विशेष म्हणजे हे माहितीपट मल्याळम भाषेतच आहेत. आपल्याकडे मातृभाषेत काही करायचे म्हणजे आपण दुय्यम दर्जाचे समजतो. पण अदूरजींसारखी माणसे आपल्या मातृभाषेत आपल्या संस्कृतीत आपल्या कलाप्रकारांतूनच आपली कलाकृती निर्माण करतात आणि त्याला जागतिक मान्यता मिळवून देतात. हे मराठी माणसांनी लक्षात घेण्यासारखे आहे. 

अरूण खोपकर यांनी भरत नाट्यम नृत्यांगना लीला सॅमसंन यांच्यावर केलेला माहितीपट तसेच कुमार सोहनी यांचा सुप्रसिद्ध ओडिसी नर्तक गुरू पद्मविभुषण केलुचरण महापात्रा यांच्यावरील माहितीपटही या महोत्सवात दाखविण्यात आले. 


चर्चा-माहितीपट या सोबतच नृत्य सादरीकरणाचे दोन सुंदर प्रयोग महागामी गुरूकुलाने रसिकांसमोर ठेवले. अष्टटप्रहर या नावाने कथ्थकचे सुंदर सादरीकरण पार्वती दत्ता आणि त्यांच्या शिष्यांनी केले. तसेच ओडिसी नृत्याचेही उत्कल क्रांती नावाने सादरीकरण झाले. ओडिसी नृत्याच्या सादरीकरणात ओडिशाच्या पारंपरिक मर्दलम म्हणजेच पखावज (मृदंग) सोबत सादर होणारा नृत्य प्रकार सादर झाला. ओडिसी नृत्यात पल्लवी हा नृत्यप्रकार म्हणजे शुद्ध कला समजली जाते. त्याचे सादरीकरण करताना तरूण नृत्यांगना त्यातील भाव समजून नृत्य करत होते हे विशेष. अन्यथा नृत्य म्हणजे केवळ यांत्रिक कवायत ठरू शकते. त्यातून रसिकांना आनंद मिळणे शक्य नाही. 

पार्वती दत्ता यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मराठी संतांच्या रचनांचाही अंतर्भाव या सादरीकरणात केला. ज्ञानेश्वरांची रचना ‘चंद्र तेथे चंद्रिका । शंभु तेथे अंबिका । संत तेथे विवेका। असणे  की जे’ ओडिसी नर्तनात प्रत्यक्ष समोर येणे ही एक वेगळीच अनुभूती होती.   चांगली कला नेहमीच प्रदेशाचे भाषेचे काळाचे बंधन ओलांडून पुढे जाते हे खरे आहे.  

चार दिवस जी चर्चा मोठ्या विद्वानांकडून रसिकांनी ऐकली त्याचा अनुभव कथ्थक व ओडिसी नृत्याच्या सादरीकरणातून रसिकांना घेता आला. 

जागतिक नृत्य दिवसा निमित्त जागजागी असे कार्यक्रम व्हायला हवेत. पण तसे फारसे घडलेले दिसत नाही. माध्यमांनीही अशा कार्यक्रमांना पुरेशी प्रसिद्धी दिलेली दिसत नाही. बहुतांश सामान्य रसिक नृत्य साक्षर नसल्याने त्यांना आपल्याकडच्या नृत्य प्रकारांकडे खेचून आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.

केवळ शास्त्रीयच नव्हे तर लोकनृत्यांचीही मोठी परंपरा आपल्याकडे आहे. त्यांचेही जतन होणे गरजेचे आहे. जागतिक नृत्य दिवसाच्या निमित्ताने हा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. शालेय पातळीवर आता स्नेहसंमेलने मोठ्या थाटात उत्साहात बर्‍यापैकी खर्च करून साजरी केली जातात. त्यासाठी बाहेरून मोठी बिदागी देवून कोरिओग्राफर नृत्य शिक्षक बोलावले जातात. यापेक्षा शालेय अथवा महाविद्यालयीन पातळीवर नियमित स्वरूपात नृत्याचे शिक्षण दिले जावे. जेणे करून विद्यार्थ्यांची कलाविषयक जाणिव प्रगल्भ होत जाईल.   
     
           श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Monday, May 14, 2018

कर्नाटक : स्पष्ट बहुमताचीच शक्यता जास्त




मतदानपूर्व आणि मतदानोत्तर सर्व चाचण्या त्रिशंकु विधानसभेची भाकितं करत असताना ‘कुठल्यातरी एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल’ हे विधान धाडसाचे वाटू शकेल. पण शांतपणे विचार केला आणि कर्नाटकातील 2004 पासूनची राजकीय परिस्थिती डोळ्या खालून घातली तर हे पटू शकेल.

2004 साली पहिल्यांदा कर्नाटकाच्या इतिहासात त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात आली होती. 79 जागा जिंकत भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. त्या खालोखाल कॉंग्रेसला 65 जागा मिळाल्या होत्या. आणि देवेगौडांच्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाला 58 जागा होत्या. सर्वात मोठापक्ष म्हणून खरं तर भाजपला सरकार बनविण्यासाठी संधी मिळायला पाहिजे होती. पण तसं घडलं नाही. तेंव्हा मोदी नावाचे कुठलेही वादळ देशात नव्हते. पण भाजपला हिंदुत्ववादी म्हणत देवेगौडांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार एस.एम.कृष्णा चालणार नाही अशी अट घालत धरमसिंग यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. केंद्रातील आपले सरकार कॉंग्रेसने पाडले होते हे राजकीय स्वार्थापुढे देवेगौडा सोयीस्कर रित्या विसरले

पण ही तडजोड टिकली नाही. आपल्या मुलाला मुख्यमंत्री करायचेच हा चंग बांधलेल्या देवेगौडा यांनी कॉंग्रेसचा पाठिंबा काढून घेतला. भाजपशी संधान साधत उर्वरीत काळात मुख्यमंत्रीपद अर्धा अर्धा काळ (20-20 महिने) वाटून घेत सरकार बनविले. कुमारस्वामी यांची 20 महिन्याची कारकिर्द संपली तरी त्यांनी राजीनामा दिलाच नाही. परिणामी भाजपने पाठिंबा काढून घेतला. मग आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली. शेवटी राष्ट्रपती राजवट आली. परत तडजोड करत येदूरप्पा यांना पाठिंबा देण्यास कुमारस्वामी तयार झाले. 2007 मध्ये येदुरप्पा मुख्यमंत्री झाले पण या सरकारचा पाठिंबा निर्लज्जपणे देवेगौडा यांनी काढून घेतला. विधानसभा बरखास्त करून परत निवडणूका घ्याव्या लागल्या.

याचा फटका मतदारांनी 2008 च्या निवडणुकीत देवेगौडांच्या पक्षाला दिला. त्यांच्या जागा घटून 28 झाल्या. भाजपा 110 जागा मिळवत बहुमताच्या जवळ गेला. कॉंग्रेसला 80 जागा मिळाल्या पण मतं भाजपापेक्षाही दीड टक्का जास्त होती.

येदूरप्पांचा भ्रष्टाचार त्यांना भोवला. त्यांना तुरूंगात जावे लागले. पुढे त्यांनी भाजपातून बाहेर पडून वेगळा पक्ष काढला.

भाजपातल्या फाटाफुटीची किंमत त्यांना 2013 मध्ये मोजावी लागली. कॉंग्रेस जीचा मतदानाचा टक्का भक्कम होता तिने 120 जागा मिळवत स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन केले. देवेगौडांच्या पक्षाला आणि भाजपला सारख्याच म्हणजे 40 जागा मिळाल्या.

पाठिंबा देणे काढणे असला पोरखेळ केल्यामुळे देवेगौडा यांच्या पक्षाने विश्वासार्हता गमावली आहे.  आज त्यांचा जातीवर आधारीत आणि भाजप-कॉंग्रेसपासून नाराज असलेला मतदार इतकाच हक्काचा आहे. बाकी राज्यभर या पक्षाला फारसा जनाधार नाही.

आज सर्व चाचण्या या पक्षाला त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त किंमत देत आहेत हे स्वत:ला सोयीचे जावे म्हणून. भाजप विरोधकांना भाजपची मतं घटण्यासाठी आणि कॉंग्रेस विरोधकांना सिद्धरामय्यांचे अपयश दाखविण्यासाठी म्हणून देवेगौडा यांचा पक्ष विश्लेषण करताना एक सोय होवून बसली आहे. असल्या ‘शिखंडी’ आडून हे सगळे तज्ज्ञ अभ्यासक भीष्माचार्य आडाखे बांधत आहेत.

प्रत्यक्षात मतदारांनी संदिग्धता दूर ठेवणेच पसंद केलेले आढळून येईल. 1984 नंतर पहिल्यांदाच केंद्रातही एका पक्षाच्या स्पष्ट बहुमताचे सरकार भारतीय मतदारांनी स्थापन केले आहे. उत्तर प्रदेशात असाच खेळ 2007 पर्यंत चालू होता. पण नंतर मतदारांनी प्रथम मायावतींचा बसप, मुलायम यांचा सप आणि आता भाजप यांना स्पष्ट बहुमताचा जनादेश दिला आहे. महाराष्ट्र आणि बिहार ही दोनच मोठी राज्यं सध्या एक पक्षीय स्पष्ट बहुमत नसताना राज्यकारभार करत आहेत. एरव्ही भारतभर (छोट्या राज्यांचा अपवाद वगळता. तिथले राजकारण अगदी दोन चार आमदार इकडून तिकडे गेले तरी बदलते. पण त्यांची एकूण संख्यात्मक ताकद अतिशय क्षीण आहे.) स्पष्ट बहुमत असलेली एकपक्षीय राजवट आहे.

कर्नाटकात लोक प्रादेशिक पक्षांच्या पोरखेळाला फार पाठिंबा देतील असे दिसत नाही. कॉंग्रेस किंवा भाजप यांना काठावरचे का असेना पण स्पष्ट बहुमत उद्या मिळेल आणि सगळे व्यवसायिक चाचण्यावाले तोंडघाशी पडलेले दिसून येतील. कारण हे मतदारासाठी या चाचण्या करत नसून व्यावसायिक पद्धतीनं कुणाच्या तरी इशार्‍यानं चाचण्या करून हवे ते निष्कर्ष काढत आहेत.     

श्रीकांत उमरीकर
मो. 9422878575
   
     

Thursday, May 10, 2018

कश्मिरी संगीतानं महाराष्ट्र दिन साजरा


उरूस, सा.विवेक, 13-19 मे 2018

देवगिरी किल्ल्याच्या जवळ तळ्याच्या पायथ्याशी हिरण्य हुरडा पर्यटन केंद्र आहे. त्याच्या हिरवळीवर दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संगीताचा कार्यक्रम साजरा होतो. यावर्षी आयोजिक मेधा पाध्ये- सुनीत  आठल्ये या कलाप्रेमी जोडप्याने कश्मिरी कलावंतांना आमंत्रित केले होते. हे कुणी फारसे लोकप्रियता लाभलेले आंतरराष्ट्रीय कलाकार नव्हते. तर होते लोककलाकार. त्यांना कश्मिरी भाषेशिवाय इतर कुठली भाषाही फार सफाईने बोलता येत नव्हती. त्यांच्या वादनाविषयी काही माहिती सांगा म्हटलं तर त्यांनी लाजून ‘इससे अच्छा हमको और बजानेको बोलो’ अशी भावना व्यक्त केली. 

संतुर, सारंगी, रबाब आणि मटका असे चार वाद्य वाजविणारे हे चार कलाकार. ही सगळी वाद्यही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. संतूर तर केवळ आणि केवळ कश्मिरचेच वाद्य आहे. शिवकुमार शर्मा यांनी या संतुरला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांनी या वाद्याला ज्या प्रमाणे शास्त्रीय वाद्य म्हणून मान्यता मिळवून दिली त्याचप्रमाणे कश्मिरी लोक संगीतातील काही धून वाजवून त्याही संगीताला लोकप्रियता मिळवून दिली. ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा तर त्यांचा प्रसिद्ध अल्बम आहेच. पण शिवाय इतरही काही अल्बम आहेत. 

कश्मिरी संगीत मुळ स्वरूपात सादर करणारे हे लोककलाकर. त्यांच्या वादनाने महाराष्ट्रीय श्रोत्यांना थक्क करून टाकले. दाक्षिणात्य संगीतात घटम चा उपयोग तालासाठी केला जातो. या कश्मिरी कलाकारांच्या संचात मटका वादक आहेत. हा मटका विशेष कलाकुसर केलेला आणि वेगळ्या पद्धतीचा असतो. त्याच्या वादनात ठेक्यासोबत मटक्याच्या उघड्या तोंडावर हाताने आघात करून एक वेगळाच घुमार निर्माण केला जातो. त्याने या संगीताची मजा अजूनच वाढते.  हा मटका कश्मिरी शालीसारख्या कलाकुसरीने नटलेला असतो. सारंगीवरही अशी कलाकुसर आढळून येते.  

रबाब हे अफागाणी वाद्य. हिंदी चित्रपटांतील कितीतरी गाण्यात अफगाणी संस्कृतीचा कलेचा स्वाद रसिकांना देण्यासाठी या वाद्याचा उपयोग केल्या गेला आहे. (अलिफ लैला मालिकेचे संगीत, यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी सारखी लोकप्रिय गाणी, काबुलीवाला चित्रपटाच्या संगीतात सलिल चौधरी यांनी केलेला रबाबचा वापर रसिकांच्या कानात अजूनही रेंगाळतो). पण हे कश्मिरी कलाकार जे रबाब वाजवितात ते जरासे वेगळे आहे. त्याला काही जास्तीच्या तारा लावून एक वेगळाच कश्मिरी रंग या कलाकारांनी भरला आहे. 

सारंगी हे तसे उत्तर भारतात लोकप्रिय वाद्य. साथीचे वाद्य म्हणून हे जास्त ओळखले जाते. कोठ्यावरचे वाद्य किंवा मुजरा गाण्यांसाठी साथीचे वाद्य अशी याची जास्त ओळख आहे. पण कश्मिरच्या कलाकारांची सारंगी जरा वेगळी आहे. ती एक तर कलाकुसर असलेली आहेच. पण शिवाय तिच्या तारांची लांबी नेहमीच्या सारंगीपेक्षा जास्त आहे. परिणामी तिचा आवाज वेगळा उमटतो. केवळ करूणच नव्हे तर इतर रस व्यक्त करण्यासाठी पण सारंगीचा वापर हे कलाकार करून घेतात. 

या कश्मिरी कलाकारांच्या वादनाची शैली मोठी मोहक आहे. रबाब किंवा सारंगी वाला एक चाल इतरांसाठी देतो. त्या अनुषंगाने संतूरचे स्वर उमटत राहतात. सारंगी पार्श्वभूमीवर स्वरांचा पडदा धरून ठेवते आणि त्यावर इतरांचे सूर काही सांगितिक चित्र रेखाटत जातात असा विलक्षण अनुभव हे संगीत ऐकत असताना येत राहतो. 

सुरवातील ज्याला आपण मंगलाचरण असे म्हणतो त्या प्रमाणे एक धुन ते कुठेही गेले तर वाजवत राहतात. मग त्यानंतर विविध प्रसंगी वाजविण्यात येणार्‍या धून सादर केल्या जातात. जसे की लग्न समारंभ, प्रियकारानं प्रेयसीची केलेली आळवणी किंवा परदेशी प्रियकराच्या दु:खात होरपळत गेलेल्या प्रेयसीची आर्त वेदना, निसर्गात सर्वत्र फुलं फुललेली असताना होणारी आनंदाची भावना, बर्फाळ दिवस संपून ऊन पडून लख्ख दिवस उजाडतो तो आनंद अशा कितीतरी भावना या लोकधूनांमधून व्यक्त केल्या जातात.

हे कलाकार वागायलाही अतिशय साधे असे आहेत. त्यांंच्या संगीतावर बोलायलाही ते तयार होत नाहीत. प्रियकराची भावना व्यक्त करणारी धून समजावून सांगताना संतूर वादक उमरचे गाल गुलाबी होवून गेले होते. अधीच कश्मिरी  माणसांचा रंग गोरा गुलाबी. 

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम साजरा झाला हे पण एक वैशिष्ट्य. ज्या कश्मिरमधून हे कलाकार देवगिरीच्या जवळ आले त्याबाबत एक सुंदर माहिती लक्ष्मीकांत धोंेड यांनी या कार्यक्रमात सांगितली. आठशे वर्षांपूर्वी कश्मिरातून एक कुटूंब देवगिरीच्या यादवांच्या दरबारात आले. त्या कुटूंबातच पुढे महान संगीत तज्ज्ञ शारंगदेवाचा जन्म झाला. ज्याने ‘संगीत रत्नाकर’ या संगीतातील अद्वितीय ग्रंथाची निर्मिती याच परिसरात केली. आजही हा ग्रंथ संगीत क्षेत्रात प्रमाण मानला जातो. लिपीबद्ध शास्त्रीय स्वरूपातील संगीताला आपल्याकडे ‘मार्गी’ संगीत असे संबोधले जाते. तर याच्या शिवाय जे मौखिक परंपरेत चालत आले आहे, ज्याचे नियम कायदे अजून कुणी कागदावर मांडू शकलेले नाही अशा संगीताला ‘देशी’ समजले जाते. खरे तर देशीतूनच मार्गी विकसित होत जाते. आठशे वर्षांपूर्वी आलेल्या शारंगदेवाने इथे येवून ग्रंथ रचना करत मार्गी संगीताचा पाया रचला. तर आज त्याचा पाठलाग करत हे लोककलाकार ‘देशी’ परंपरेतील त्याच प्रदेशातील संगीत इथे येवून सादर करत आहेत. 

एक विलक्षण अशी गोष्ट म्हणून अभ्यासकांना न सापडलेल्या कितीतरी सांगितीक बाबींचा खुलासा या लोककलाकारांच्या संगीतातून होतो. 

आपल्याकडे तसेही वसंतोत्सव साजरा करण्याची परंपरा आहेच. महाराष्ट्र दिन वसंतातच येतो. तेंव्हा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने काही एक वेगळे संगीत ऐकविण्याची संयोजकांची धडपड विलक्षणच म्हणावी लागेल. या पूर्वीही वीणेसारखे दूर्मिळ वाद्य, जलतरंग सारखे फारसे परिचित नसलेले वाद्य या कार्यक्रमात सादर झाले आहे. 

निसर्गात संगीत ऐकणे हा पण एक विलक्षण अनुभव आहे. पौर्णिमा आदल्याच दिवशी होवून गेली होती. त्यामुळे स्वच्छ आभाळात हसणारा पूर्ण चंद्र, वसंतातील सुगंधीत हवा आणि कानावर पडणारे कश्मिरी संगीत याचा एक वेगळाच अनुभव रसिकांना येत होता. या परिसरात लिंबाची झाडं खुप मोठ्या प्रमाणात आहेत. लिंबाच्या माहोराचा एक मादक सुगंध वसंतात अनुभवायला येतो. 

बहाव्याची पिवळीजर्द झुंबरासारखी फुलं याच काळात फुलतात. गुल्मोहराची लाल मोहिनी याच काळात पसरायला सुरवात झाली असते. थोडसं आधी पळसाच्या रंगांनी होळीच्या दरम्यान कमाल करून टाकलेली असते. या वातावरणात संगीत-नृत्य यांचे महोत्सव साजरे होणं खरंच संयुक्तिक आहे. जागतिक नृत्य दिवसही 29 एप्रिलला असतो. त्या निमित्ताने काही आयोजन विविध ठिकाणी केलं जातं. 

1 मे हा जागतिक कामगार दिवस आहे. दिवसभर श्रमणारे लोक संध्याकाळी एकत्र जमून नाच गाणी म्हणतात अशी आपल्याकडे परंपरा आहे. खरं तर लोकसंगीत हे कष्टकर्‍यांनीच जिवापाड जपले आहे. तेंव्हा या कामगारांनी जपलेले हे लोकसंगीत आता वेगळ्या स्वरूपात सादर होणे आवश्यक आहे. जगभरात लोककलांना मोठ्या आस्थेने जपले जाते. जगभरचे पर्यटक विविध ठिकाणच्या लोककला महोत्सवांना आवर्जून हजर राहतात. हे आपल्याकडे होणे गरजेचे आहे.  शासकीय पातळीवरून होणार्‍या प्रचंड खर्चिक कोरड्या महोत्सवांपेक्षा असे छोटे उपक्रम खुप चांगले आहेत.  

देवगिरीच्या परिसरात पळस, लिंब, गुलमोहर, बहावा ही झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. तेंव्हा हा नृत्य संगीतासोबत रंगाचाही उत्सव होवून जातो. अजिंठ्याच्या रूपाने चित्रांची एक मोठी परंपरा या परिसरात होती याचा जागतिक पातळीवरचा पुरावाच उपलब्ध आहे. वेरूळचे जगप्रसिद्ध कैलास लेणंही एकेकाळी केवळ दगडाचे नसून संपूर्ण रंगीत होते. तेंव्हा असा संगीत-नृत्य- रंग महोत्सव मोठ्या प्रामाणात होणे आवश्यक आहे. 23 एप्रिल शेक्सपिअर दिवस आहे. तेंव्हा नाट्याचीही जोड याला देता येईल.  

(1 ते रोजी सादर झालेल्या कश्मिरी संगीताच्या कार्यक्रमात हे कलाकार सहभागी होते- गुलाम मोहम्मद लोन (रबाब), जहूर अहमद भट (सारंगी), उमर माजीद (संतूर), गुलजार अहमद गाश्रु (मटका).  याच कार्यक्रमात सुस्मिरता डावळकर चे सुमधुर  शास्त्रीय संगीत सदर झाले.) 
           श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Friday, May 4, 2018

...हो मी रस्त्यावर बाटल्या वेचत फिरतो आहे



औरंगाबाद शहरात कचर्‍याचा प्रश्‍न पेटला आहे. या विषयाच्या विविध पैलूंवर आम्ही आंदोलक कार्यकर्ते विचार व प्रत्यक्ष कृती करतो आहोत. कचरा वेचणार्‍या दलित महिलांशी संवाद साधला. त्यांच्या गरजा ओळखून त्यांना आर्थिक मदत केली. त्यांच्याकडून कचरा विकत घेणार्‍या दुकानदारांशी संपर्क साधला. या कचरावाल्यांकडच्या प्लास्टिक पासून दाणे बनविणार्‍या उद्योगांशी संपर्क केला. ही सगळी यंत्रणा गतिमान व्हावी म्हणून उद्योजकांच्या संघटनांशी संवाद साधला.

ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या उद्योजकांशी संपर्क करून त्यांच्या कारखान्याला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सरकारी अधिकारी काम करत असतात पण आपणच त्यांना समजून घेत नाहीत असा आरोप नेहमी केला जातो. म्हणून राज्याच्या सचिव पातळीवर असलेल्या सर्वोच्च अधिकार्‍यांपासून अगदी उपायुक्तापर्यंत तसेच अगदी प्रभाग अधिकार्‍यांपर्यंत संपर्क साधून चर्चा केली. प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता फिरलो.

लॉयन्स रोटरी क्लब सारख्या संस्था सामाजिक कार्य करतात असा समज आहे म्हणून त्या संस्थांच्या पदाधिकार्‍यांना लेखी स्वरूपात या कामात मदत करा असे आवाहनही केले.

सामान्य नागरिकांना सहभागी करून घेतले पाहिजे. स्वत: स्वच्छता केली पाहिजे असे जेंव्हा काही शहाण्या माणसांनी सुचविले त्या प्रमाणे स्वत:च्या प्रभागत दर रविवारी आयोजीत केलेल्या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून प्रत्यक्ष स्वच्छता मोहिम 4 महिने राबविली.

आता एकच काम राहिले होते आणि ते म्हणजे रस्त्यावर प्रत्यक्ष कचरा वेचणे. सगळा कचरा तर शक्य नाही शिवाय त्यासाठी पूर्णवेळ काम करणेही शक्य नाही. म्हणून त्यातल्या त्यात व्यवहार्य पर्याय निवडला. घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर या रस्त्यावर जाता येता ज्या रिकाम्या काचेच्या बाटल्या, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या दिसतील त्या गोळा करायच्या. त्या प्रमाणे 17 मार्च च्या ‘गार्बेज वॉक’ नंतर रोज अशा बाटल्या गाडीला लावलेल्या पोत्यात गोळा करतो आहे. धान्याची 30 किलोची एक गोणी एका चकरेत सहज भरावी इतक्या बाटल्या सध्या रस्त्यावर मिळत आहेत.

औरंगाबाद शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती आपल्या समर्थ नगर ते ज्योती नगर या माझ्या रेाजच्या जाण्या येण्याच्या मार्गावर जर आपण रिकाम्या बाटल्या जमा करून ठेवल्या तर मी जाता येता त्या घेवून जाण्यास तयार आहे. कृपया आपल्या घरातील आजूबाजूच्या परिसरातील रिकाम्या बाटल्या गोळा करून ठेवा. तूमच्या माझ्या सोयीने मी त्या नेईल.

ताराबाई म्हस्के ही कचरावेचक महिला माझ्या घरून सकाळी या बाटल्या नियमित स्वरूपात घेवून जाते. चर्चा खुप झाली. आणि पुढेही करत राहूत. आंदोलन तर चालू आहेच. पण मी माझ्याकडून ही कृती करतो आहे. कृपया तूमच्याकडच्या रिकाम्या बाटल्या देवून माझ्या या अभियानास सहकार्य करा. शहर स्वच्छ ठेवा ! 

श्रीकांत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. 431 001.
मो. 9422878575
   
     

Friday, April 27, 2018

कर्नाटक निवडणुक अंदाजांनी पुरोगामी घायळ


उरूस, सा.विवेक, एप्रिल 2018

कर्नाटकात विधानसभेची निवडणुक होऊ घातली आहे. पुढच्या महिन्यात मतदान होवून नविन सरकार सत्तेवर येईल. या निवडणुकीच्या निकालांचे अंदाज इंडिया टूडे या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने जाहिर केले आहेत. या अंदाजांप्रमाणे कॉंग्रेसला जास्तीत जास्त 100 जागा मिळू शकतात. (आपण जास्तीच्याच जागा गृहीत धरू.) भाजपला कमीत कमी 80 जागा मिळू शकतात. (पुरोगाम्यांच्या सोयीसाठी भाजपच्या कमीच जागा गृहीत धरू.) माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाने  मायावतींच्या बहुजन समाजपक्षा सोबत युती केली आहे. त्यांना 35 जागा मिळतील असे हे सर्वेक्षण सांगते. शिल्लक 9 जागा अपक्ष व इतरांना मिळतील असा अंदाज आहे. (एकुण जागा 224 अधिक एक नेमलेला सदस्य). सध्या कॉंग्रेसच्या ताब्यातील हे एकमेव मोठे राज्य आहे. (पंजाब कॉंग्रसच्या ताब्यात आहे पण तिथे लोकसभेच्या केवळ 13 जागा आहेत. तर कर्नाटकात 28 आहेत.) 

आता या सर्वेक्षणानुसार कॉंग्रेसची सत्ता परत येईल का याची खात्री देणं मुश्किल झाले आहे. आणि यानेच पुरोगामी घायाळ झाले आहेत. या सर्वेक्षणाबद्दल संशय यावा अशी एक आकडेवारी यात आहे. ती म्हणजे सत्ता स्थापनेसाठी जास्तीत जास्त लोकांनी कॉंग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी एकत्र यावे असे मत व्यक्त केले आहे. 

सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मुळचे भारतीय लोकदलाचे. मग ते जनता पक्षात गेले. पुढे देवेगौडा यांच्या सोबत जनता दलात राहिले. कर्नाटक जनतादल मंत्रीमंडळात अर्थमंत्री राहिले. अगदी उपमुख्यमंत्री सुद्धा राहिले. नंतर ते कॉंग्रेसमध्ये गेले आणि आमदार म्हणून निवडून आले. 2013 पासून ते मुख्यमंत्री आहेत. अशा या मुळच्या समाजवादी सिद्धरामय्यांचे देवेगौडा यांच्याशी जराही पटत नाही. 

नुकत्यात झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत देवेगौडांच्या पक्षाचे सात आमदार त्यांनी फोडले आणि कॉंग्रेसचा खासदार निवडून आणला. परिणामी देवेगौडांचा उमेदवार पराभूत झाला.

या सगळ्या पार्श्वभूमीवर जे निवडणुकपूर्व अंदाज प्रसिद्ध झाले आहेत ते पुरोगाम्यांसाठी काळजी करणारे आहेत. कारण देवेगौडा आणि सिद्धरामय्या यांच्यात विस्तव आडवा जात नाही. दुसरीकडून देवेगौडांचे चिरंजीव माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जाहिर सभांमधून ‘कुठल्याही परिस्थितीत कॉंग्रेस सोबत जाणार नाही.’ असे ठासून सांगितले आहे. 

यात अजून दूसरी भर म्हणजे ओवैसी यांचा एम.आय.एम.पक्ष उत्तर कर्नाटकातील 50 जागा लढविणार असल्याची घोषणा केली आहे. हा पक्ष भाजपला मदत करतो असा आरोप पुरोगामी आणि कॉंग्रेसवाले करत असतात. तर दुसरीकडे स्वत: ओवैसी ‘कॉंग्रेस व इतर सेक्युलर पक्ष हेच भाजपला मदत करतात’ असा आरोप करत असतात. 

अजूनही डाव्या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. बाजूच्या केरळात डाव्यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेत आहे. त्यांचा प्रमुख विरोध कॉंग्रेस प्रणीत आघाडी आत्तापर्यंत करत आलेली आहे. याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे कर्नाटकात कॉंग्रेसला कसलेही सहकार्य करू नये असा मतप्रवाह कर्नाटाकातील डाव्या गटांमध्ये आहे. त्यांचा कल देवेगौडा-मायावती युतीकडे आहे. ज्या तत्परतेने मायावती यांनी निर्णय घेवून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आहे ती तशी करण्याची हिंमत अजूनही डाव्या पक्षांनी केली नाही. 

डाव्यांचा हीच नीती त्यांच्या अंगाशी येत असते. गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात इतकी राळ उडवून दिली गेली होती पण एकाही डाव्या पक्षाने प्रत्यक्षात तिथे कॉंग्रेससोबत युती केली नाही. आज बेळगांव भागात सभा घेणारे शरद पवार यांनीही गुजरातेत कॉंग्रेसला कात्रजचा घाट दाखवत स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. 

भीमा कोरेगांवनंतर देशभरच्या दलित राजकारणावर वर्चस्व मिळवू पाहणारे प्रकाश आंबेडकर अजूनही कर्नाटकात फिरकले नाही. गुजरातेत त्यांनी दौरे केले होते. प्रत्यक्ष निवडणुकीत यांनी कसलीच सक्रिय भूमिका घेतली नाही. आता तर तेवढेही त्यांनी कर्नाटकाच्याबाबत केलेले नाही. 

त्रिपुरात मार्क्सवाद्यांची सत्ता होती. त्या ठिकाणी सगळे पुरोगामी एकवटून त्यांनी प्रचार केला असता तर शक्यता होती मार्क्सवाद्यांचा पराभव झाला नसता. तसेही भाजप आणि मार्क्सवाद्यांच्या मतांत फारसा फरक नाही. पण पुरोगामी मोदी द्वेषाने इतके पछाडलेले आहेत की त्यासाठी ते स्वत:चा नाश करून घ्यायला नेहमीच उत्सूक असतात. 

आता कर्नाटकात त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात आली तर त्यात व्यवहारिक पातळीवर देवेगौडा किंवा कुमारस्वामी हे नितीशकुमार यांच्या पायावर पाय ठेवून भाजप सोबत जाण्याची जास्त शक्यता आहे. 

सर्वेक्षणाप्रमाणे कॉंग्रेस आणि देवेगौडा यांचीच युती होईल हे आपण गृहीत धरू. मग दुसरा प्रश्‍न समोर येतो. भाजपच्या सध्याच्या 40 जागा आहेत त्या वाढून 80 होत आहेत. याचे विश्लेषण काय करणार? कारण गुजरातेत कॉंग्रेसच्या 20 जागा वाढल्या तर त्याचे वर्णन ‘नैतिक विजय’ असे केले गेले होते. मग आता भाजपच्या तर 40 जागा वाढत आहेत. मग त्याचे वर्णन ‘दुप्पट नैतिक विजय’ असे करणार का? 

साधारणत: जानेवारीपासून कर्नाटकाच्या लगतच्या राज्यातील भाजप कार्यकर्त्ये त्या त्या लगतच्या कानडी प्रदेशात   कामाला लागले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार आखणी केल्या गेली आहे. 2008 ला पहिल्यांदा भाजपने कर्नाटकात सत्ता मिळवली होती. त्यानंतर सत्ता गमावली पण दुसरा क्रमांक शाबूत ठेवत विरोधीपक्षनेते पद पटकावले होते. आताही किमान दोन नंबरचा पक्ष भाजपच असेल हे सर्वच मान्य करत आहेत. 

भाजपला सत्ता न मिळता त्याच्या जागांची संख्या दुप्पट झाली तरी त्यांचा फायदाच आहे. पण कॉंग्रेसची जर सत्ता यदा कदाचित गेलीच तर ती हानी कॉंग्रेस कशी भरून काढणार आहे? 

आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी स्वत: हारल्या होत्या. पण लगेच त्यांनी कर्नाटकातील चिकमंगळूर येथून पोटनिवडणुक लढवली आणि दणदणीत विजय मिळवत राजकारणात पुनरागमन केले. हा दैदीप्यमान इतिहास कॉंग्रेसचे कार्यकर्ते विसरू पहात असतील तर पक्षासाठी ते मुश्किल आहे. सिद्धरामय्या समाजवादी चळवळीतून राजकारणात आले. कॉंग्रेस तर सेक्युलर राजकारणाचे पेटंट आपल्याकडेच आहे अशा तोर्‍यात असते. मग याच कॉंग्रेस सरकारने लिंगायत धर्माच्या स्फोटक मागणीला निवडणुकीच्या तोंडावर हवा का दिली? समोर भाजपकडे येदूरप्पांच्या रूपाने हुकमाचा लिंगायत एक्का असताना ही खेळी खेळण्यात नेमका कुठला राजकीय शहाणपणा होता? 

1989 पासून सतत मिळणारी मते आणि जागा यांचे संतुलन भाजप राखत आला आहे असे सखोल विश्लेषण सुहास पळशीकर यांच्यासारख्या राजकीय अभ्यासकाने केले आहे. देश पातळीवरील हे विश्लेषण कर्नाटकातही गेल्या वीस वर्षांपासून बाबतीत दिसून येते आहे. दक्षिणेतील पहिली लोकसभेची जागा भाजपने इथूनच जिंकली होती. याच राज्यात पहिल्यांदा स्वत:च्या बळावर  सरकारही स्थापन केले होते. आज सर्वेक्षण करताना त्यांना किमान दोन नंबरच्या जागा आणि कॉंग्रेसच्या बरोबरीने मते ही वस्तुस्थिती अभ्यासकांना मान्य करावी लागते आहे. 

खरं तर भाजपचे यश चिवटपणे सातत्याने राबणारे हजारो लाखो कार्यकर्ते यांच्यामुळे आहे. भाजपवर मात करावयाची असेल तर असे नि:स्वार्थी कार्यकर्ते तयार करावे लागतील. त्यांना सतत विधायक कार्यात गुंतवून ठेवावे लागेल. त्यासाठी सामाजिक संस्थांची मोठ्या प्रमाणात उभारणी करावी लागेल. पण हे काहीच न करता भाजपच्या नावाने बोटे मोडत राहणे येवढा एकच उद्योग पुरोगामी करत आहेत. अगदी कुमार केतकरांसारखे विद्वानही ‘2019 मध्ये भाजप जिंकल्यास देशात लोकशाही उरणार नाही’ असली बीनबुडाची विधानं करत आहेत. याचा परिणाम इतकाच होतो की काठावरचा मतदारही भाजपकडे झुकतो.

सर्वेक्षणात कुणालाच स्वत:च्या बळावर सत्ता मिळणार नाही असे भाकित आहे. आणि हीच पुरोगाम्यांना घायाळ करणारी बाब आहे. कारण इतरांसोबत जूळवून घेणे हे यांच्या डिएनए मध्येच नाही. असं नेहमी गमतीत म्हटलं जातं की दोन डावे मिळून तिन पक्ष स्थापन करतात.  (सट्टेबाजांनी भाजप ला पसंती दिली आहे)        

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, April 15, 2018

बाबासाहेबांची जयंती अशी साजरी केली तर...


उरूस, सा.विवेक, एप्रिल 2018

बा.भ. बोरकरांची एक मोठी सुंदर कविता आहे ज्यात त्यांनी निळ्या रंगाच्या विविध छटांचे वर्णन केले आहे

मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा
इंद्रनिळांतला एक गोड राजबिंड निळा
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा
आभाळाच्या घुमटाचा एक गोलसर निळा
असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे 

अशा निळ्या रंगांच्या विविध सुंदर छटा असताना आपण त्याचा एकच राजकिय अर्थ काढतो हा निळ्या रंगावर अन्यायच नाही का? याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या एकाच पैलूवर चर्चा होत राहते हा त्यांच्यावर पण अन्याय नाही का? बाबासाहेब केवळ दलितांचेच नेते होते असं ठसविल्याने आपण त्यांना लहान करत चाललो आहोत हे कसे लक्षात येत नाही? बरं ज्या दलितांसाठी बाबासाहेबांनी लढा उभारला त्या दलितांच्या इतर काही पैलूंवर दूर्लक्ष करून त्यांच्यावरही अन्याय केला जातो. सामाजिक-राजकिय लढे देत असताना हा दलित समाज कलेच्या बाबतीत आणि कारागिरीच्या बाबतीत एकेकाळी अग्रेसर होता हे विस्मरणात जाते. 

जून्या काळी बोली भाषेत एक म्हण होती, ‘कुणब्या घरी दाणं, बामणाघरी लिवणं आणि म्हारा-मांगाघरी गाणं पिकलंच पाहिजे’. यातील दलितांकडे असलेला कलेचा जो पैलू आहे त्याकडे स्वातंत्र्योत्तर काळात अक्षम्य दुर्लक्ष केल्या गेले. तसंच छोटे मोठे उद्योग करणे, चांभारकीचा व्यवसाय करणं, शिंदीच्या फोकांपासून फडे बनवणे, शेतीसाठी लागणारी अवजारं तयार करणे असे कितीतरी उद्योग दलितांनी वर्षानूवर्षे केले. बांधकामांतही गवंडी काम करण्यात दलित समाज पुढे असायचा. कित्येक गावात सुईणीचे काम पूर्वाश्रमीचे महार किंवा मांग स्त्रिया मोठ्या कुशलतेने करायच्या (नामदेव च. कांबळे यांच्या साहित्य अकादमी प्राप्त ’राघववेळ’ कादंबरीची नायिका वालंबी ही सुईणच दाखवली आहे).  मग ही कारागिरी अजून वाढावी त्यातील आधुनिक तंत्रं दलितांच्या हाती यावे त्यांना त्यातील कुशलता प्राप्त व्हावी यासाठी आपण काय केलं? 

बाबासाहेबांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनंतर आता तरी आपण हा विचार करणार आहोत की नाही? का बाबासाहेबांची जयंती म्हणजे केवळ वस्तीच्या जवळपासचा 2 कि.मी.चा परिसर निळ्या झेंड्यांनी सजवून टाकणे, कमानी उभारणे, निळ्या दिव्यांची आरास करणे, प्रत्यक्ष जयंतीच्या दिवशी डिजे जावून जंगी मिरवणूक काढणे, शहरा शहरातील गावा गावातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ प्रचंड जत्रा भरवणे, लाखो रूपयांच्या सुपार्‍या देवून ऑर्केस्ट्रा आणणे इतकाच अर्थ आहे काय? 

किमान हजार वर्षांचा इतिहास आहे की दलितांनी कलेची जोपासना केली. ज्या काळात कलेची उपेक्षा केली जायची त्या काळात ही कला प्राणपणाने जपली. आता कलेला आणि कलाकारांना बरे दिवस आले आहेत, प्रतिष्ठा मिळत आहे, पैसाही मिळत आहे आणि या काळात मात्र कलेच्या प्रांतात दलितेतरच घुसून पुढे पडत असलेले दिसतात. हे काय गौडबंगाल आहे?

बाबासाहेबांच्या नावाने एक तरी भव्य असा संगीत महोत्सव/लोककला महोत्सव भरवून आदरांजली वहाणं का कुणाला सुचत नाही? तमाशा ही केवळ उपहास करण्याची कला आहे का? ओडिशाच्या मंदिरातून केले जाणारे नृत्य आता ‘ओडिसी’ नृत्य म्हणून विश्वविख्यात बनले आहे ते केवळ गेल्या 100 वर्षांत. एका पद्मविभुषण केलुचरण महापात्रा नावाच्या गुरूनं अखंड मेहनतीने या नृत्य प्रकाराला शास्त्रीय बैठक प्राप्त करून दिली आणि मान्यता मिळवून दिली. दक्षिणेतील मंदिरांमध्ये देवदासी करत असलेल्या नृत्याला गेल्या शंभर वर्षात भरतनाट्यम म्हणून मान्यता मिळाली. मग महाराष्ट्रातल्या लावणीला एक शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता मिळविण्यासाठी का नाही एखाद्या दलित कलाकाराला आपले आयुष्य वेचावे वाटले? उद्या जर लावणीला एक शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता मिळाली तर तो काय बाबासाहेबांचा अपमान ठरणार आहे? 

पद्मश्री मिलींद कांबळे यांनी दलितांमधील उद्योजकतेचे गुण हेरून दलित उद्योजक संघटनेची स्थापना केली. ही बाबासाहेबांना आदरांजली नाही का? कले इतकीच विविध क्षेत्रातील कारागिरी दलितांच्या रक्तात आहे मग तिचा विकास करण्याची योजना का नाही आखली जात? 

गावगाड्यात सेवा व्यवसाय हे दलित आणि इतर मागास वर्गीयांनी हजारो वर्षे बिनबोभाट निमूटपणे अन्याय सहन करत सांभाळले. छोटी मोठी उद्योजकता प्राणपणाने जपली. त्यासाठी कुठलीही प्रतिष्ठा पैसा मान मरातब त्यांना मिळाला नाही. आता स्वातंत्र्योत्तर कालखंडात या गोष्टी मिळायची शक्यता निर्माण झाली असताना आपण दलितांना यापासून जाणिवपूर्वक का दूर ठेवतो? 

सरसकट सर्व दलितांना आरक्षण आणि सरकारी नौकर्‍या, सरकारी योजनांचे गाजर दाखवून भूलावले जात आहे. पण या सोबतच ज्या काही मोजक्या का असेना दलित तरूणांची कलेत काही करायची इच्छा आहे, त्यांच्या गुणसूत्रांत कलेचे गुण आहेत त्यांना त्यासाठी प्रोत्साहन मिळावे, प्रशिक्षण मिळावे यासाठी काही पोषक वातावरण आपण तयार करतो का? 

इतर सवर्णांचे सोडा पण दलित मध्यमवर्गात अजूनही कलेच्याप्रती आस्था दिसून येत नाही. मुलानं चाळीस हजाराचे एखादे वाद्य मागितले तर किती दलित नोकरदार प्राध्यापक अधिकारी सहज घेवून देतील? ‘डफडे वाजवून पोट भरतं का’ असे वाक्य एका मित्राच्या घरी ऐकून मी सर्द झालो. आणि हाच मित्र पोरासाठी महागडी गाडी सहज घेवून द्यायला तयार होतो, त्याला रस नसताना जबरदस्ती विज्ञान विषयात प्रवेश देवून क्लासेसची दोन लाख रूपये फी भरतो, पोराचा स्कोअर आला नाही तर परत त्याला प्रवेश परिक्षा देण्यासाठी भाग पाडतो. हा अट्टाहास का? ज्याला रस आहे अशा दलित तरूणांना जर संगीत शिकण्यासाठी जरासे पोषक वातावरण दिले तर शक्यता आहे तो त्या क्षेत्रात काहीतरी भरीव करू शकेल.

हीच बाब छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायांबाबत. आज महानगरांमध्ये कचर्‍याचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला आहे. यात काम करणार्‍या जवळपास सगळ्या महिला या दलितच आहेत. मग कुणी त्यांना प्रोत्साहन देवून यातील उद्योगाच्या संधी हेरत का नाही मदत करत? या कोरड्या कचर्‍याच्या व्यवसायात जे सध्या काम करत आहेत त्यांच्या अडचणी ओळखून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणे ही बाबासाहेबांना आदरांजली नाही का ठरणार? ही कचरा वाहतूक, या कचर्‍यावर प्रक्रिया असे कितीतरी छोटे मोठे उद्योग उभे राहू शकतात. याचा व्यवसाय-व्यापार गतीमान होवू शकतो. 

पण असा वेगळा विचार आम्हाला करावासा वाटत नाही. हे असे मांडले तर तो दलितांचा अपमान समजला जातो. याच्या उलट सरकारी नौकरी, सरकारी योजना, सरकारी घरे, सरकारी वसतीगृह असल्या भीकमाग्या योजना समोर ठेवल्या तर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. आता तर सवर्णही आम्हीच कसे मागस आहोत याचे जाहिर प्रदर्शन मोर्चे काढून करत आहेत. आम्हाला मागास म्हणा आसा उरबडवा आक्रोश केला जात आहे. या काळात जे खरंच मागास आहेत त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणे, उद्योजकता त्यांच्या अंगात बाणवणे, कलेचे संस्कार करणे हे सगळे मुर्खपणाचेच वाटू शकेल.

पण या गोष्टींची नितांत गरज आहे. माझ्याकडे एक दिलत तरूण नौकरी मागण्यासाठी आला होता. तो केवळ बारावी पास होता. त्याच्याशी थोडी चर्चा केल्यावर त्याला नृत्यामध्ये गती असलेली आढळून आली. तो कोरिओग्राफर म्हणून चांगले काम करू शकतो हे मी त्याच्या लक्षात आणून दिले. एका वर्षात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की त्याला भरपूर काम कोरिओग्राफीत मिळाले, पैसाही मिळाला, आवडीचे काम असल्याने समाधानही मिळाले. असे कितीतरी तरूण कलेत, कारागिरीत पारंगत आहेत. पण आपण त्यांना ओळखत नाही. ही आपली शोकांतिका आहे. अशांना ओळखून त्यांना प्रोत्साहन देवून बाबासाहेबांची जयंती साजरी करता येणार नाही का? ...    

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Thursday, April 12, 2018

राजू शेट्टी : ‘स्वाभिमाना’ची वाजली शिट्टी


उरूस, सा.विवेक, एप्रिल 2018

आमच्या परिसरात एखाद्या गोष्टीचा शेवट झाला की ‘शिट्टी वाजली’ असं म्हटलं जातं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी ज्या पद्धतीनं सध्या कॉंग्रेसशी जवळीक साधत आहेत ते पाहता राजू शेट्टी यांच्या ‘स्वाभिमानाची’च शिट्टी वाजली असं म्हणावं लागेल. (राजू शेट्टी यांचे निवडणुक चिन्हही शिट्टीच होतं.)

1980 नंतर शेतकरी संघटनेची आंदोलनं महाराष्ट्रभर पसरत गेली पण त्याला पश्चिम महाराष्ट्रात फारसा प्रतिसाद सुरवातीला मिळत नव्हता. खरं तर शरद जोशी आधीपासून सांगत होते की कोरडवाहू आणि बागायती असा कसलाच भेद नाही. शोषण सर्वच शेतमालाचे होते. पण सहकाराच्या कृत्रिम ग्राईप वॉटरवर बाळसे धरलेला साखर उद्योग भल्या भल्यांची दिशाभूल करत होता. उसाचेही प्रश्‍न आहेत. उसाचाही उत्पादन खर्च भरून निघत नाही हे पश्चिम महाराष्ट्रात कुणाला पटत नव्हतं. 1995 ला शरद जोशी यांनी औरंगाबादेत उसाची झोनबंदी उठविण्यासाठी उपोषण केलं. तेंव्हा गोपिनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. त्यांनी या प्रश्‍नात लक्ष घातलं. शरद जोशींची मागणी मान्य झाली. उसाची झोनबंदी उठली. साखर उद्योगाला जराशी मोकळी हवा लागली. साखर कारखान्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्रात वाढायला लागली. स्पर्धा निर्माण झाली. आत्तापर्यंत एकाधिकारशाहीनं काय आणि कसे नुकसान केले ते शेतकर्‍यांच्या लक्षात यायला लागले. आत्तापर्यंत झोपी गेलेला पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरीही जागा व्हायला लागला. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी संघटनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळायला सुरवात झाली. शेतकरी संघटनेचे जे अधिवेशन मिरज येथे 1999 ला झाले त्याचे आयोजन रघुनाथदादा पाटील यांनी केले होते. त्या अधिवेशनाच्या यशस्वीतेत राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांचे मोठे योगदान होते. 

शेतकरी चळवळीला मिळत चाललेला प्रचंड प्रतिसाद पाहता राजू शेट्टी यांची महत्वाकांक्षा जागी झाली. त्यांनी रघुनाथदादा पाटील यांच्यासोबतच्या क्ष्ाुल्लक मतभेदांचे कारण पुढे करून शेतकरी संघटना सोडली आणि आपली स्वतंत्र स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी केली. खरं तर तेंव्हाच राजू शेट्टी यांनी वेगळं नाव, वेगळा झेंडा, वेगळा बिल्ला तयार केला असता तर त्यांच्या हेतूबद्दल कुणाला काही शंका राहिली नसती. पण त्यांनी तसं केलं नाही. दिशाभूल करणारा हुबेहुब शेतकरी संघटने सारखाच बिल्ला फक्त खाली छोट्या अक्षरात स्वाभिमानी लिहीलेलं, त्याच पद्धतीचा झेंडा, त्याच पद्धतीचे बॅनर रंगवायला सुरवात केली आणि त्यांचा हेतू स्वच्छ नसल्याचे सगळ्यांच्याच लक्षात आले. 

पश्चिम महाराष्ट्रात ज्यांना शेतकर्‍यांची चळवळ मोडून काढायची होती त्या सर्वांना ही फुट म्हणजे सुवर्ण संधीच वाटली. शिवाय दक्षिण महाराष्टात शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरूद्ध कॉंग्रेसचा एक गट कार्यरत होताच. तसेच मराठा विरूद्ध मराठेतर असाही एक वाद त्या परिसरात टोकाला गेला होता. या सगळ्याचा परिणाम म्हणजे 2004 च्या विधानसभेत राजू शेट्टी आमदार म्हणून निवडून आले. शेतकरी नेता असल्याची एक प्रतिमा राजू शेट्टींनी माध्यमांच्या सहाय्याने तयार केली. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी, सदाशिव मंडलीक आणि कॉंग्रेसचे प्रतिक पाटील अशी एक छुपी युतीच तयार झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभूत करायचे म्हणून प्रतिक पाटील यांच्या बरोबर या दोघांना इतरांनी बळ पुरवले. पुढे हे तिघे निवडुन गेल्यावर ‘एकावर दोन फ्री’ असे पोस्टर्स सांगलीत या तिघांच्या फोटोसह कार्यकर्त्यांनी झळकावले होते. 

शेट्टी खासदार झाले. त्यांना कॉंग्रेसची साथ होती तिथेच त्यांचा स्वाभिमान गहाण पडला होता. पण ते कागदोपत्री अपक्ष खासदार होते. त्यामुळे याची उघड चर्चा झाली नाही. पुढे रागरंग पाहून ते  भाजपच्या गोटात गेले.  ज्या शरद जोशींनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ 1999 मध्ये दिली म्हणून शेतकरी संघटना सोडली असे सांगणारे राजू शेट्टी स्वत:च तिकडे गेले. राजू शेट्टी खासदार झाले पण त्यांना आपला एकही कार्यकर्ता आमदार म्हणून निवडुन आणता आला नाही. यातूनच त्यांची लोकनेता ही प्रतिमा धुसर होवून सौदेबाज ही प्रतिमा ठळक बनली. 2014 च्या लोकसभेत भाजपला विविध घटकांची सोबत हवी होती. त्यात रामदास आठवले, विनायक मेटे, महादेव जानकर यांच्या सोबतच राजू शेट्टीही अलगद भाजपच्या मांडीवर जावून बसले. स्वत:सोबत त्यांनी सदाभाऊ खोत यांनाही माढ्यातून खासदारकीला उभे केले. जानकर, खोत पडले पण राजू शेट्टी भाजपच्या लाटेत निवडून आले. 

भाजपाच्या सोबत गेलो तर पुढची निवडणुक अवघड आहे हे लक्षात आले. कारण शेतकरी असंतोषाने धुमसत होते. त्याचा परिणाम स्वत: राजू शेट्टीवरच होण्याची जास्त शक्यता होती. त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत विधान परिषदेवर आमदार झाले आणि राज्य मंत्री बनले. मग तर त्यांच्या पक्षातील व संघटनेतील कुरबूर प्रचंडच वाढली. सदाभाऊ खोत यांनी बाहेर पडून रयत क्रांती संघटना काढली व आपले मंत्रीपद वाचवले. शरद जोशींशी शेट्टींनी केलेल्या द्रोहाचे उट्टं त्यांच्याच सहकार्‍याने असे फेडले.

राजू शेट्टी यांनी योगेंद्र यादवांसोबत काही काळ चुंबाचुंबी केली. दिल्लीला एक मेळावा आयोजीत केला. देशभरच्या 184 शेतकर्‍यांच्या संघटना एकत्र करून देशव्यापी काहीतरी मोठं केल्याचा आभास निर्माण केला. (त्या मेळाव्याला दोन चार हजार लोकही जमा झाले नाहीत.) पण मुळातच त्यांच्या विचारात व मांडणीत स्पष्टता शिल्लक राहिलेली नव्हती. शेतकर्‍यांचा संप झाला तेंव्हा त्यापासून दूर रहायचे का त्यात शिरून फायदा मिळवायचा याचेही कोडे त्यांना सुटले नाही. 

शेतकरी संपातील मागण्या डाव्यांच्या दबावाखाली मुळ शेतकरी आंदोलनाच्या मांडणीला विसंगत अशा बनत गेल्या. पण त्याचे कुठलेच आकलन राजू शेट्टींना झाले नाही. परिणामी तेही सगळे आंदोलन त्यांच्या हातून निसटले. नाशिक पासून मुुंबईला निघालेला डाव्यांचा किसान लॉंग मार्च हा राजू शेट्टींना टाळूनच निघाला. 

भाजप-समाजवादी-साम्यवादी असे सगळे भोज्जे शिवल्यावर आता शेट्टी कॉंग्रेसच्या आश्रयाला गेले आहेत. म्हणजे ज्या कॉंग्रेसच्या नेहरूनीतीने शेतकर्‍यांना लुटले म्हणून शेतकरी आंदोलन उभे राहिले. हे आंदोलन उभे राहिले म्हणून राजू शेट्टी त्यात सहभागी झाले. या सहकारा विरूद्ध कडक भूमिका घेतली म्हणून त्यांच्या मागे लोक आले. आणि आता तेच शेट्टी याच आपल्या विरोधकाला सामिल होत आहेत. याला काय म्हणावे? 
गेली 15 वर्षे शेट्टी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून स्वतंत्रपणे संघटना चालवित आहेत. शरद जोशी यांनी शेतकरी प्रश्‍नाची जी मांडणी केली त्यापेक्षा वेगळे एक अक्षर तरी राजू शेट्टी यांनी मांडले आहे का? 
स्वामिनाथन आयोगाची शिफारस आता राजू शेट्टी सतत करत असतात. त्यातील व्यवहारिक आणि वैचारिक गल्लत त्यांना लक्षात तरी येते का? आत्ता कापसाची कोंडी बोंड अळीमुळे झाली त्यावर राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष काय भुमिका घेणार? 

मुळात आता प्रश्‍न असा आहे की शेट्टी जर कॉंग्रेसच्या दावणीला जाणार असतील तर आत्तापर्यंत कॉंग्रेसनी जी शेतीविरोधी धोरणे राबविली होती त्याबाबत शेट्टी काय बोलणार? ज्या कॉंग्रेसशी राजू शेट्टी युती करायला निघाले आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून शरद पवार बसले आहेत. मग त्याच्या बाजूला हे बसणार का? गेली 15 वर्षे शरद पवारांना जो विरोध शेट्टींनी केला तो खोटा होता की काय? तेंव्हा वैचारिक विरोध होता तर मग आता काय वैचारिक साम्य निर्माण झाले आहे? कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या शेतीविषयक धोरणात काय फरक पडला आहे? पंजाबात-कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार आहे. तिथे शेतकर्‍यांसाठी काय हिताचे निर्णय घेतल्या गेले की जेणे करून शेट्टींना या पक्षांची साथ द्यावी वाटू लागली आहे? संविधान बचाव मोर्चा शेट्टी यांनी आयोजित केला होता मुंबईत. मग ह्याच संविधानाचे ९ वे कलम शेतकऱ्यावर अन्याय करणारे आहे हे त्यांना का नाही लक्षात आले? का शेती विरोधी कायदे तसेच राहावेत ह्या मताचे शेट्टी आता बनले आहेत? शरद जोशी यांची काहीच शिकवण नं घेता हे मडके कच्चेच राहिले की काय? 

शरद जोशींपासून वेगळे झालेले अनिल गोटे, पाशा पटेल, शंकर धोंडगे, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर यांना आमदारकी, मंत्रीपदं, महामंडळाचे अध्यक्षपद असले लाभ मिळाले. मग यांनी या पदांचा वापर करून शेतकरी हितासाठी काय काय निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडले, यंत्रणेवर दबाव टाकून शेतकरी हिताची कामं करून घेतली याचा हिशोब शेतकर्‍यांसमोर मांडायला पाहिजे. पण हे होताना दिसत नाही. 

‘भीक नको हवे घामाचे दाम’ अशी शेतकरी संघटनेची स्वाभिमानी घोषणा होती. संघटनेतून बाहेर पडलेले कुठलाही स्वाभिमान न दाखवता सत्तेच्या पदासाठी लाचार झालेले पाहिले की यांच्या स्वाभिमानाने कधीच शिट्टी वाजवली आहे हे लक्षात येते. ‘सरकार समस्या क्या सुलझाये सरकार खुद समस्या है’ अशी घोषणा देत देत ज्यांचा वैचारिक पिंड पोसला गेला ते क्षणात बदलतात आणि सरकारी योजनांची/हस्तक्षेपाची शिफारस करायला लागतात हे पाहिले की चकित व्हायला होतं. उद्या लोकसभेला राजू शेट्टी यांच्या विरोधात भाजपने सदाभाऊ खोत यांनाच उभे केले तर हे दोघेही कुठल्या भाषेत एकमेकांना उत्तर देतील?  

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575