औरंगाबाद शहरात कचर्याचा प्रश्न पेटला आहे. या विषयाच्या विविध पैलूंवर आम्ही आंदोलक कार्यकर्ते विचार व प्रत्यक्ष कृती करतो आहोत. कचरा वेचणार्या दलित महिलांशी संवाद साधला. त्यांच्या गरजा ओळखून त्यांना आर्थिक मदत केली. त्यांच्याकडून कचरा विकत घेणार्या दुकानदारांशी संपर्क साधला. या कचरावाल्यांकडच्या प्लास्टिक पासून दाणे बनविणार्या उद्योगांशी संपर्क केला. ही सगळी यंत्रणा गतिमान व्हावी म्हणून उद्योजकांच्या संघटनांशी संवाद साधला.
ओल्या कचर्यावर प्रक्रिया करणार्या उद्योजकांशी संपर्क करून त्यांच्या कारखान्याला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सरकारी अधिकारी काम करत असतात पण आपणच त्यांना समजून घेत नाहीत असा आरोप नेहमी केला जातो. म्हणून राज्याच्या सचिव पातळीवर असलेल्या सर्वोच्च अधिकार्यांपासून अगदी उपायुक्तापर्यंत तसेच अगदी प्रभाग अधिकार्यांपर्यंत संपर्क साधून चर्चा केली. प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता फिरलो.
लॉयन्स रोटरी क्लब सारख्या संस्था सामाजिक कार्य करतात असा समज आहे म्हणून त्या संस्थांच्या पदाधिकार्यांना लेखी स्वरूपात या कामात मदत करा असे आवाहनही केले.
सामान्य नागरिकांना सहभागी करून घेतले पाहिजे. स्वत: स्वच्छता केली पाहिजे असे जेंव्हा काही शहाण्या माणसांनी सुचविले त्या प्रमाणे स्वत:च्या प्रभागत दर रविवारी आयोजीत केलेल्या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून प्रत्यक्ष स्वच्छता मोहिम 4 महिने राबविली.
आता एकच काम राहिले होते आणि ते म्हणजे रस्त्यावर प्रत्यक्ष कचरा वेचणे. सगळा कचरा तर शक्य नाही शिवाय त्यासाठी पूर्णवेळ काम करणेही शक्य नाही. म्हणून त्यातल्या त्यात व्यवहार्य पर्याय निवडला. घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर या रस्त्यावर जाता येता ज्या रिकाम्या काचेच्या बाटल्या, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या दिसतील त्या गोळा करायच्या. त्या प्रमाणे 17 मार्च च्या ‘गार्बेज वॉक’ नंतर रोज अशा बाटल्या गाडीला लावलेल्या पोत्यात गोळा करतो आहे. धान्याची 30 किलोची एक गोणी एका चकरेत सहज भरावी इतक्या बाटल्या सध्या रस्त्यावर मिळत आहेत.
औरंगाबाद शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती आपल्या समर्थ नगर ते ज्योती नगर या माझ्या रेाजच्या जाण्या येण्याच्या मार्गावर जर आपण रिकाम्या बाटल्या जमा करून ठेवल्या तर मी जाता येता त्या घेवून जाण्यास तयार आहे. कृपया आपल्या घरातील आजूबाजूच्या परिसरातील रिकाम्या बाटल्या गोळा करून ठेवा. तूमच्या माझ्या सोयीने मी त्या नेईल.
ताराबाई म्हस्के ही कचरावेचक महिला माझ्या घरून सकाळी या बाटल्या नियमित स्वरूपात घेवून जाते. चर्चा खुप झाली. आणि पुढेही करत राहूत. आंदोलन तर चालू आहेच. पण मी माझ्याकडून ही कृती करतो आहे. कृपया तूमच्याकडच्या रिकाम्या बाटल्या देवून माझ्या या अभियानास सहकार्य करा. शहर स्वच्छ ठेवा !
श्रीकांत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. 431 001.
मो. 9422878575
No comments:
Post a Comment