Saturday, August 22, 2015

खासगी क्लासला वेसण! सरकारी शिक्षणाला उसण!!


दैनिक पुण्य नगरी, उरूस, २६ जुलै २०१५

महाराष्ट्रातल्या विना अनुदानित शिक्षण संस्था आणि खासगी शिकवण्या (क्लास) यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले आहे. खासगी संस्था सामान्य विद्यार्थ्याला लूटतात नफेखोरी करतात. मग त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलणे सरकारचे कर्तव्यच आहे. सरकारला सामान्य माणसाची किती काळजी आहे हे दाखविण्यासाठी असे काहीतरी पाऊल उचलणे शासनाला भाग आहे.

पण खरी परिस्थिती काय आहे? महाराष्ट्रात खासगी संस्था इतक्या का वाढल्या? गांवोगावी गल्लो गल्ली खासगी शिकवण्याचे पेव का फुटले?

माणसाला घरी जेवायला घातले नाही तर बाहेर जाऊन जेवावे लागते. मग दोष घरच्या आईवर / बायकोला द्यायचा का बाहेरच्या हॉटेलवाल्याला द्यायचा कारवाईचा बडगा घरावर उगारायचा का हॉटेल वर?

शासनाने दोन वर्षांपूर्वी शाळांची पटनोंदणी तपासण्यासाठी मोठे सर्वेक्षण घेतले होते त्यात १४,००० शाळांमध्ये विद्यार्थी संख्या २० पेक्षाही कमी अढळली या सर्व शाळा बंद करण्याची शिफारस केल्या गेली यातील १३५०० इतक्या शाळा जिल्हा परिषदेच्या म्हणजे शासनाच्या स्वत:च्याच होत्या मग याच्यावर काय कारवाई झाली?

खासगी शाळा प्रचंड शुल्क आकारतात सामान्य गरिब माणसाला आपल्या पोराला तिथे शिकवता येत नाही. म्हणून शासनाने नियम केला की विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश राखीव असतील. ते शासनाकडून भरल्या जातील.

आता साधा प्रश्‍न आहे जर शासनाच्या स्वत:च्या १३,५०० शाळा बंद पडत आहेत आणि पालकांना आपली मूलं तिथून काढून खासगी शाळांत टाकावीत असे वाटते आहे याचे कारण काय? म्हणजे खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवाव्यात यातच शासनाचे अपयश मान्य केल्यासारखे आहे. आज महाराष्ट्रात कुठल्याही सरकारी शाळेत प्रवेशासाठी रांग लागली, गर्दी उसळली, पोलिसांना बोलवावे लागले असे घडले का?

उलट खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून रात्रभर पालक दरवाज्यापाशी बसून होते रांगा लावून असे मात्र घडले आहे.  खासगी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश दिले तर त्यांची फिस किती? आणि ती भरायची कोणी?

पाच वर्षांपूर्वी जेव्हा याची चर्चा सुरू झाली तेंव्हा कल्याणकारी राज्याचे भूत डोक्यात शिरलेल्या आपल्या सरकारने असे ठरविले की हे शुल्क स्वत: शासनाने त्या शाळेत जमा करायचे. मग आता प्रश्‍न येतो हे पैसे किती? खासगी शाळा प्रचंड शुल्क आकारतात त्यांनी ठरवलेले शुल्क तर देता येणार नाही शासन जेवढा खर्च प्रत्येक मुलासाठी वर्षभरात करते तेवढा द्यावा असा प्रस्ताव समोर आला.

महाराष्ट्रातल्या खासगी विनाअनुदानित मराठी शाळांच्या संस्थांनी शासना समोर प्रस्ताव दिला की २५ टक्के कशाला १०० टक्के प्रवेश तुम्हीच करा या सगळ्या विद्यार्थांवर शासन एरव्ही जो खर्च करतो तेवढाच आम्हाला द्या. शासकीय फुकट शिक्षण फार चांगले आहे. गरीबांचा तो हक्क आहे अशी मांडणी करणार्‍या विचारवंतांना हा प्रस्ताव फार चांगला वाटला पण जेंव्हा शासन स्वत:च हा प्रस्ताव स्विकारायला तयार होईना तेंव्हा शासनाचे ढोंग उघडे पडले.

खासगी मराठी शाळा तेंव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला वार्षिक ४००० रूपये सरासरी शुल्क अकारत होत्या. आणि शासनाचा अधिकृत आकडा प्रत्येक मुलासाठी वार्षिक १२००० रूपये इतका प्रचंड होता आजही शासन प्रचंड खर्च करून शिक्षणाचे नाटक करते मग हाच खर्च खासगी संस्थांना द्यायला तयार आहे का?

म्हणजे सामान्य माणसाच्या खिशातून जो पैसा कर रूपाने शासन काढून घेते त्याचा विनियोग नीट होत नाही. वार्षीक १२,००० खर्च करून पोराला शिक्षण भेटत नाही. म्हणून पालकाला ट्युशन लावावी लागते. म्हणजे परत किमान ५०० रूपये महिना ६,००० रूपये वर्षाला खर्च करावा लागतो.

यापेक्षा शासनाने आपल्या शाळा बंद करून टाकाव्यात सगळे खासगी संस्थावाले/क्लास ट्युशनवाले कितीतरी कमी पैशात मुलांना शिक्षण देतील खुली स्पर्धा असेल तर हे शुल्क अजूनच कमी होईल.
आजही खासगी विनाअनुदानित मराठी शाळांचा प्रत्येक विद्यार्थ्यामागचा खर्च शासनाच्या खर्चापेक्षा कमी आहे. याचे कारण काय? याच्याकडे कधीतरी डोळे उघडून बघणार नाही का?

२००३ मध्ये विनाअनुदानित मराठी शाळांना परवानगी देण्याचा विषय शासना समोर होता. जयराज फाटक तेंव्हा शिक्षण सचिव होेते. शासनाच्या बैठकीत एन.डी. पाटील यांच्या सारखे ज्येष्ठ उपस्थित होते. उपस्थित असलेल्या पैकी कुणाची मुलं/ नातवंडं सध्या सरकारी शाळेत शिकतात? असा प्रश्‍न जयराज फाटक यांनी विचारला आश्चर्य म्हणजे खासगी विना अनुदानित शाळांच्या नावाने खडे फोडणार्‍या, त्यांना विरोध करणार्‍या कुणाचीही मुले/ नातवंडे सरकारी शाळेत शिकत नाहीत हे सत्य समोर आले.

सरकारी शाळा चांगल्या आहेत का वाईट याची चर्चा नंतर करू गरीबांना शिक्षण फुकट कसे द्यायचे हे पण नंतर बघू आधी ही सगळी चर्चा करणारे/ धोरण ठरविणारे आपल्या मुलांना कोणत्या शाळेत शिकवतात हे तपासले पाहिजे.
खासगी संस्था, क्लासेस हे जर पापच असेल तर ते शासकीय धोरणाचे पाप आहे. ते निस्तरायचे असेल तर कारवाई शासकीय  संस्थावर करायला पाहिजे. खासगीवर नाही.

वेतन आयोगाप्रमाणे पूर्ण पगार घेणारा शिक्षक सरकारी शाळेत नीट शिकवत नाही पण खासगी संस्थेतला शिक्षक मात्र कमी पैशात तुलनेने चांगले काम करतो हे कसे काय?

जर शासकीय शाळांचा दर्जा चांगला राहिला असता तर पालकांनी आपली पोरं खासगी शाळांमध्ये टाकलीच नसती. उलट आज ज्या काही खाजगी संस्था आहेत/ क्लासेस आहेत त्यांच्याच जिवावर पोरांचे शिक्षण चालू आहे. स्वत:च्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालायचे आणि दुसर्‍यावर कारवाई करायची असे केले तर शिक्षणाचे अजूनच हाल होतील.

सगळे आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, पंचायत सदस्य, सरकारी अधिकारी, शासकीय गुत्तेदार या सगळ्यांच्या मुलांना सरकारी शाळेतच शिकण्याची सक्ती केली तर चालेल का? सरकारी फुकट शिक्षणाचा कळवळा असणार्‍यांना हे चालेल का?

शासनाला इतका कळवळा असेल तर त्याने आपल्या शाळा अजून चांगल्या कराव्यात फुकट जेवण द्यावे फुकट रहायची व्यवस्था करावी. फुकट कपडे द्यावे असा सगळा फुकट उद्योग करूनही लोक आपली पोरं सरकारी शाळेत घालायला तयार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागच्या वर्षी एकूण जागांपैकी ३४ टक्के जागा रिकाम्याच राहिल्या यातीलही बहुतांश जागा राखीव होत्या. म्हणजे सर्व सोयीसवलती देऊनही मुलं शिकायला तयार नाहीत.

उलट गल्ली बोळातील खासगी क्लासेस/ स्पर्धा परिक्षा यांच्याकडे गर्दी उसळलेली असते.

याचा अर्थ सरळ आहे शासनाने विद्यापीठ, महाविद्यालय, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा हा सगळा पसारा केवळ शिक्षकांचे नोकरदारांचे पगार व्हावेत म्हणून उभारले आहेत. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणाशी काहीही संबंध नाही.

शासनाचे शिक्षण भाकड बनले आहे. त्याच्यामुळे रोजगार भेटत नाही. या शिक्षणामुळे माणूस भेकड बनतो. त्यामुळे सामान्य लोकांनी याकडे पाठ फिरवली आहे.

आमच्या घराजवळ कटिंगच्या दुकानात कटिंग करणार्‍याला मी विचारले ‘मित्रा तू न्हावी जातीचाच आहेस का? आणि तुला हे शिक्षण कुठून भेटले?’ त्याने उत्तर दिले ‘मी न्हावी जातीचाच आहे. मला माझ्या मामांनी शिकवले. आणि इथे येऊन दुकान टाकले.’

आमच्या घराजवळच्या धोब्यालाही मी हाच प्रश्‍न विचारला गल्लीतल्या चप्पल दुरूस्ती करणार्‍याला हेच विचारले. दुकानदाराला विचारले मोबाईल दुरूस्ती करणार्‍या जावेदला विचारले भंगार/ रद्दी विकत घेणार्‍या अकबरला विचारले.

कोणीही मला शासकीय शाळेत व्यवसायाचे शिक्षण मिळाले असे सांगितले नाही. सगळ्यांनी व्यवसाय कौशल्य खासगी पातळीवर मिळवले होते मग हा सरकारी शिक्षणाचा पांढरा हत्ती का पोसायचा?

आपल्या मुलाला/ नातवाला सरकारी शाळेत शिकवले असेल तरच शासकीय फुकट शिक्षणाची भलावण करावी असा नियम केला तर या विषयावर ढोंग करणार्‍यांची बोलतीच बंद होईल.

नविन काळात मुलं इतर मार्गांनी चांगले शिकतील आणि शाळेत जाणेच नाकारतील मग काय करणार?

जनशक्ती वाचक चळवळ, श्रीकांत उमरीकर - ९४२२८७८५७५

बशर नवाज : उर्दू शायरीचा बुलंद आवाज!

दैनिक पुण्य नगरी, उरूस, १२ जुलै २०१५ 

‘करोगे याद तो हर बात याद आयेगी’ असं म्हणत आठवणींचे महत्व सांगणारा शायर आठवणींच्या जगात कायमचा निघून गेला. बशर नवाज नावानं प्रसिद्ध असलेले उर्दू शायर बशरत नवाज खान हे नुकतेच अल्लाला प्यारे झाले.(९ जुलै २०१५)

औरंगाबाद शहरात कुठल्याही सांस्कृतिक साहित्यीक कार्यक्रमात सडपातळ अंगकाठी, मागे वळवलेले दाट पांढरे केस, पांढरीशुभ्र दाढी, झब्बा-पायजामा त्यावर काळे जाकीट अशा वेशातील तरूणांशी उस्फूर्तपणे संवाद साधणारी व्यक्ती म्हणजे बशर नवाज. नवाज साहेबांचा जन्म १९३५ चा एैंशीच्या घरात त्यांचे वय होते. पण शेवटपर्यंत त्यांचा उत्साह कधी कमी झाला नाही.

उर्दू साहित्यात डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या लेखकांची मोठी परंपरा आहे लोकप्रिय कवी साहिर लूधियानवी, कैफी आजमी, मक्खदूम मोईनोद्दीन, सज्जाद जहीर अशी बरीच नावे आहेत. बशर नवाज याच परंपरेतील लेखक होते.

लेखक कलावंत हे आपल्या आयुष्यात कलेच्या साधनेत गुंग असतात. ते इतर सामाजिक-राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग घेत नाहीत. असेच चित्र आपल्याला पहायला मिळते. बशर नवाज याला अपवाद होते. वेळोवेळी सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला तेंव्हाच्या औरंगाबाद नगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी १९५८ ते १९७३ इतक्या प्रदीर्घ काळात काम केले. औरंगाबादचे वैशिष्ट्य म्हणजे इथे साहित्यीक पत्रकार हे राजकरणात समाजकारणात नेहमीच सक्रिय राहिले आहेत. उर्दू कवी काजी सलिम हे खासदार होते. पत्रकार अनंत भालेराव यांचे सामाजिक योगदान सर्व परिचित आहे. नाटककार अजीत दळवी हेही सामाजिक चळवळीत सक्रिय रहात आले आहेत.

बशर नवाज यांना आपल्या परंपरांचा खूप अभिमान होता. उर्दू भाषेतील पहिली गझल ज्याने लिहीली, उर्दूचा आद्यकवी म्हणता येईल असा शायर वली औरंबागादी हा याच भूमितला होता हे बशर साहेब मोठ्या अभिमानाने सांगायचे.

महान संगीतज्ञ व कवी अमिर खुस्रो याच्या बद्दल त्यांना मोठी आस्था होती. १९८३ मध्ये दूरदर्शन साठी ‘अमिर खुस्रो’ या मालिकेचे १३ भाग त्यांनी लिहून दिले. आकाशवाणीसाठी २६ भागांची ‘सारे जहां से अच्छा’ ही संगीत मालिकाही २००० मध्ये त्यांनी लिहीली होती. अगदी अलिकडे बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी दिल्ली दूरदर्शनसाठी मालिका लिहीली होती.

फाळणीचे दु:ख कितीतरी कवींनी विविध प्रकारे आपल्या शब्दांमधून मांडले. पाकिस्तानचे सुप्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांनी लिहीलं होतं.

ये दाग दाग उजाला
ये शब गजिदा सहर
वो इंतिजार था जिसका
ये वो सहर तो नही

म्हणजे हा डागाळलेला प्रकाश, रात्र डसलेली पहाट, जिची इतकी वाट बघितली ती ही पहाटच नव्हे.
इकडे भारतातील कविंची अवस्था काही वेगळी नव्हती कवी बा. भ. बोरकरांनी लिहीलं होतं.

सगळा यज्ञ संपल्यानंतर
उरली हाती राखच कशी
कुंकू भाळी लागताच कशी
आई झाली वेडी पिशी

बशर नवाज यांची एक जन्म मला या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आठवते. भारतातले कितीतरी मित्र नातेवाईक पाकिस्तानात निघून गेले. हीच अवस्था तिकडच्या लोकांचीही झाली. अशावेळी जाणार्‍याची मन:स्थिती काय असेल? बशर नवाज लिहीतात.

आगे सफर था
पिछे हमसफर था
रूकते तो सफर छूट जाता
चलते तो हमसफर छूट जाता
मंझिल की भी हसरत थी
उनसे भी मोहब्बत थी
ए दिल तू ही बाता
उस वक्त मै कहां जाता?...
मुद्दत का सफर भी था
बरसों का हमसफर भी था
चलते तो बिछड जाते
और रूकते तो बिखर जाते
यू समझ लो....
प्यास लगी थी गजब की
मगर पानी मे जहर था
पीते तो मर जाते और
ना पीतो तो भी मर जाते......

बशर साहेबांनी कधी खुलासा केला नाही. पण त्यांची ही कविता फाळणीत होरपळलेल्या प्रत्येकाची मग तो हिंदू असो की मुसलमान, भारतीय असो की पाकिस्तानी यांची मानसिकता दर्शविणारी आहे असेच मला वाटते.

बशर नवाज यांचे तीन उर्दू कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत स्वत: कविता कथा कादंबरी लिहीणारे समीक्षेच्या बाबत उदासीन असतात असं आढळते. बशर नवाज यालाही अपवाद होते. औरंगाबाद शहरात प्रसिद्ध उर्दू समीक्षक गोपीचंद नारंग यांच्या उत्तर संरचनावाद. या पुस्तकाचे प्रकाशन होते. साहित्य अकादमीच्या या कार्यक्रमात अनेक मान्यवर अभ्यासक सहभागी होते. कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी एका तरूण कवीने या विषयावर एक छोटीशी शंका बशर नवाजांसमोर उपस्थित केली. तेंव्हा त्याला उत्तर देण्यासाठी अतिशय साध्या भाषेत सोप्या पद्धतीनं हा गंभीर विषय समजावून सांगताना मी स्वत: बशर नवाजांना एैकलं आहे. आधूनिक विचारसरणी हा माणूस इतकी कोळून प्याला आहे हे समजून मलाच आश्चर्याचा थोडा धक्का बसला.

उर्दूचा बोलबाला जास्त झाला आणि आजही होतो तो गझलेसाठी बशर साहेबांच्या गझला प्रसिद्ध आहेतच पण त्यांनी गझलेशिवाय असलेल्या उर्दू कवितेला ‘नज्म’ ला अलिकडच्या काळात त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली हे लक्षात घ्यायला पाहिजे.

औरंगाबादला १९८८ मध्ये एकनाथ रंगमंदिराचे उद्घाटन झाले. या नवीन सभाग्रहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्या सुरवातीच्या काळात एक मोठा मुशायरा तिथे भरला होता. खासदार काजी सलिम यांनी मर्ढेकरांच्या कवितेचा उर्दू अनुवाद ‘अभी भी है खुशबू फूलोंमे’ एैकवला होता. याच मुशायर्‍यात सगळे गझल म्हणत असताना बशर नवाज यांनी एक नज्म एैकवली होती. त्यातली एक ओळ मला आजही आठवते.

कोई तो दरवाजा खोले
और सुरज को बोले
अंधेरा इतना घना कब था!
  
बशर नवाज यांनी सामान्य माणसाच्या मनातला आशावाद, सामान्यांची ताकद साध्या शब्दांत प्रभावीपणे मांडली होती. शब्दांच्या फुग्यांना कृत्रिम वा! वा! करणारे कितीतरी प्रेक्षक बशर नवाजांच्या कवितेनंतर एकदम स्तब्ध झाले. सन्नाट्टा पसरला मग भानावर येऊन लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

ज्या गाण्यामुळे बशर यांना अफाट लोकप्रियता लाभली. ते ‘करोगे याद तो हर बात याद आयेगी’ हे बाजार चित्रपटातील गीत आहे. प्रतिभावंत संगीतकार खय्याम यांनी त्याला अप्रतिम अशा चालीत बांधले आहे भूपेंद्र खर्जातला आवाज दमदार गाणं एक सुंदर नज्म आहे. फार जणांचा गैरसमज आहे की ही एक गझल आहे. गझल समजणार्‍यांचा गैरसमज दूर व्हावा म्हणून ती सगळी कविताच इथे देतो. सामाजिक आशय लिहीणार सामाजिक-राजकीय कार्यकर्ता असलेला हा कवी मनानं किती हळवा होता हे त्याच्याच शब्दांतून दिसून येते.

करोेगे याद तो हर बात याद आयेगी
गुजरते वक्तकी हर मौज ठहर जायेगी ॥धृ.||

ये चांद बीते जमानों का आईना होगा
भटकते कब्र मे चेहरा कोई बना होगा
उदास राह कोई दास्ता सुनायेगी ॥1॥

बरसात भीगता मौसम धुऑ धुऑ होगा
पिघलती शम्मों पे दिल का मेरे गुमा होगा
हथेलियों ही हीना याद कुछ दिलायेगी ॥2॥

गलीके मोड पे सुना सा कोई दरवाजा
तरसती ऑखों से रस्ता किसी का देखेगा
निगाह दूर तलक जा के लौट आयेगी ॥3॥

औरंगाबाद भडकल गेट जवळच्या बशर नवाजांच्या घराचा दरवाजा आता रसिकांसाठी ‘सूना सा कोई दरवाजा’ असाच उरला आहे. आणि सर्व चाहत्यांची अवस्था ‘निगाह दूर तलक जाके लौट आयेगी’ अशीच झालेली असणार ‘गालीब’ पुरस्काराने सन्मानित बशर नवाज यांना विनम्र श्रद्धांजली!

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद ९४२२८७८५७



विश्व साहित्य संमेलनास ‘काळ्या पाण्याची’ शिक्षा

दैनिक पुण्य नगरी, उरूस, ५ जुलै २०१५

चौथे विश्व साहित्य संमेलन परदेशात कुठे भरणार नसून भारतातच अंदमान येथे भरणार असल्याची बातमी आहे. गेली चार वर्षे विश्व संमेलनाचा धोका चालू आहे. मुळात हे संमेलन इतके रेंगाळले का, हे समजून घेतले पाहिजे.

पहिले विश्व साहित्य संमेलन अमेरिकेत सॅन होजे येथे झाले. आयोजकांनी जो आव आणला होता त्याचा फुगा पहिल्याच संमेलनात फुटला. परदेशी दौर्‍याची मजा शासनाच्या पैशावर करण्याची संधी असे हे हिडीस स्वरूप समोर आले. सतत तीन संमेलने अशा स्वरूपात भरल्यावर हा खेळ लवकरच आटोपेल हे कोणालाही कळत होते.
अखिल भारतीय साहित्य महामंडळ नावाची संस्था मराठीतील समग्र लेखक-वाचक-प्रकाशक-अभ्यासक यांची चिंता वाटण्यासाठी नसून आपल्याच कार्यकारिणी सदस्यांच्या मौजमजेसाठी आहे हे स्पष्ट झाले. सतत तीन वर्षे सुमार माणसे साहित्यिक म्हणून परदेश दौरा करून आली.

अशा लोकांच्या प्रवासखर्चाचा भार नेहमी नेहमी कोण उचलणार? दक्षिण आफ्रिकेत चौथे विश्व साहित्य संमेलन भरवण्याचे ठरले होते. साहित्यिकांच्या प्रवास खर्चाची तयारी आयोजकांनी ठेवली. पण साहित्य महामंडळाच्या सदस्यांची जबाबदारी त्यांनी घेण्यास नकार दिला. साहित्य महामंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य ‘आम्हाला वगळा गत:प्रभ होतील संमेलने’ असा बाणा घेऊन बसले. त्यांनी आम्ही नाही तर संमेलनच नाही असा पवित्रा घेतला. शेवटी हेही संमेलन रद्द झाले. कारण कुठलेही साहित्यिक कर्तृव्य नसलेल्या महामंडळाच्या फुकट्या पदाधिकार्‍यांचा खर्च करण्यास कोणी आयोजक तयार होईनात.

आता विश्व संमेलनाच्या आयोजनासाठी अंदमानचा प्रस्ताव समोर आला आहे. गेली कित्येक वर्षे सावरकरांचे भक्त स्वखर्चाने दरवर्षी अंदमानला जातात. यावर्षी विश्व संमेलन तिथे भरवल्यामागे आयोजकांची अशीच भूमिका आहे. साहित्यिकांनी स्वखर्चाने अंदमानला यावे. तेथील सर्व व्यवस्था हे आयोजक घेण्यास तयार आहेत. प्रश्‍न असा आहे की, ही स्वावलंबी स्वखर्ची स्वाभिमानी व्यवस्था महामंडळाला मंजूर होईल का?

आजपर्यंत ज्या पद्धतीनं विश्व संमेलनं साजरी झाली ती पद्धत म्हणजे दुसर्‍याच्या पैशाने फुकट मजा करणे, त्यासाठी आपला सगळा स्वाभिमान गहाण ठेवणे. मग आयोजक गर्दी खेचण्यासाठी चित्रपट-नाटक-दूरदर्शन मालिका यातील कलाकरांना बोलावणार त्यांच्यासाठी गर्दी होणार. त्यांच्यावर भरपूर खर्चही होणार आणि हे सगळे आमचे साहित्यिक, महामंडळाचे पदाधिकारी उघड्या डोळ्यांनी विरोध न करता पाहात बसणार कारण काय तर आपल्याला फुकट आणले ना तेव्हा आपण कशाला काही बोलायचे?

आषाढीची वारी जवळ आली आहे. महाराष्ट्र नव्हे तर जवळपासच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातून भाविक स्वखर्चाने या वारीत सामील होतात. गेली सातशे वर्ष ही परंपरा सामान्य माणसाने अखंडपणे जपली आहे. वारीसाठी कुणीही कुणाला आमंत्रण देत नाही. कोणीही प्रायोजक समोर येत नाही. अंतरीच्या ओढीने भाविक पांडुरंगाकडे धाव घेतात. कुठलेही अडथळे त्यांना रोखू शकत नाही. आधुनिक युगातही हे सारे तसेच चालू आहे.

मग एक साधा प्रश्‍न निर्माण होतो याच्या शतांश पटीनेही उत्साह साहित्य संमेलनाबाबत का दिसत नाही? म्हणजे एखाद्या गावात साहित्य संमेलन भरणार आहे हे कळाल्यावर गावोगावचे लेखक-वाचक-रसिक उत्स्फूर्तपणे स्वखर्चाने गटागटाने त्या गावाला जायला निघाले आहेत. वाटेत विविध गावातील साहित्यिक रसिक मित्र त्यांना भेटत आहेत अशा छोट्या मोठ्या दिंड्या तयार होत होऊन ज्या ठिकाणी मुख्य साहित्य संमेलन भरत आहे तिथे येऊन महासंगम तयार झाला आहे. लोक उत्साहाने एकमेकांच्या गळ्यात पडत आहेत. विक्रेत्यांनी पुस्तकांचे गठ्ठे आणून पुस्तकांची दुकाने थाटली आहेत. चार दिवस सगळे एकमेकांशी बोलून, अनुभवांची देवाण घेवाण करून तृप्त मनाने परतत आहेत.

हे असे दृश्य दिसणार कधी? साहित्य संमेलनाची १०० वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे मग हा उत्स्फूर्तपणा आम्ही का नाही निर्माण करू शकलो? ही गोष्ट विश्व साहित्य संमेलनाच्या बाबतीत तरी व्हावी अशी आशा होती पण आम्ही तेही नाही करू शकलो.

ज्या देशात विश्व साहित्य संमेलन भरविणार आहोत त्या देशातील जास्तीत जास्त मराठी माणसांना आम्ही गोळा करू शकलो का? तर याचेही उत्तर नाही असेच येते.

हे असे घडले याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्याप्रमाणे साहित्य संमेलन हे शासनाच्या व प्रायोजकांच्या पैशामुळे पंगू झाले त्याप्रमाणे विश्व संमेलन हेही जनतेच्या रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाअभावी शासकीय अनुदान व प्रायोजकांचा निधी यांचा स्टिरीऑइडवर टिकून होते. त्यांनी हात आखडता घेताच हा डोलारा कोसळला.

गावोगावी उरूस, जत्रा भरतात त्यासाठी कोणीही प्रायोजक नसतो. शासनाचा कुठलाही निधी त्यांना नसतो सर्वसामान्य माणसांनी अंतरस्फूर्तीने हे सगळे सण-उत्सव जपलो म्हणून ते निर्वेधपणे टिकून आहेत. अजूनही ते चालू आहेत.

साहित्य सोहळे गावोगावी विविध संस्था गेली काही वर्षे सातत्याने घेत आहेत. त्यांना कुठलाही भक्कम निधी शासनाकडून उपलब्ध नसतो. स्थानिक पातळीवर स्वत:च्या खिशाला खाद लावून ही मंडळी उपक्रम साजरे करतात. मग हाच नियम मोठ्या साहित्य संमेलनांना लावावयास काय हरकत आहे?

साहित्य महामंडळाने दरवर्षी स्थानिक लोकांच्या मदतीने एक ठिकाण निश्चित करावे. स्थानिक स्वराज्य संस्था (महानगर पालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत) यांनी स्थानिक सोयी सवलती पुरवाव्यात कार्यक्रमाची आखणी स्थानिक महाविद्यालये, शाळा यांच्या मदतीने करण्यात यावी हे सर्व जाहीर करून साहित्यिकांना सहभागी होण्याचे खुले आवाहन करावे.

विश्व साहित्य संमेलनाबाबतही असंच करता येईल पण हे असे होत नाही कारण साहित्य महामंडळाला भीती आहे की आपण सर्व लोकांना साहित्यिकांना स्वखर्चाने येण्याचे आवाहन केले आणि कोणी आलेच नाही तर? पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी युद्धकाळात सर्व भारतीय जनतेला एकवेळ जेवणाचे आवाहन केले होते. तेव्हा शास्त्रींच्या मनात कुठलीही भीती नव्हती कारण शास्त्री स्वत: एकवेळ जेवत होते. त्यांना नैतिक अधिकार प्राप्त झाला होता. महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी फुकटेपणा व लाचारीचे दर्शन घडविल्याने त्यांना इतरांना स्वखर्चाने या असे सांगण्याचा नैतिक अधिकार नाही म्हणून त्यांना भीती वाटते.

चौथे विश्व साहित्य संमेलन अंदमानमध्ये भरणार असेल तर महामंडळाच्या फुकटेपणावर काळाने उगवलेला सूडच म्हणावा लागेल. कित्येक वर्षांपासून सावरकरप्रेमी स्वखर्चाने स्वाभिमानाने अंदमानात जातात. आता हीच सवय साहित्य क्षेत्रातील सर्वांना लागावी.

चौथ्या विश्व साहित्य संमेलनाला काळाने दिलेली ही ‘काळ्या पाण्याची’ शिक्षाच आहे. ती भोगून काहीतरी शहाणपणा साहित्य महामंडळाने घ्यावा. यापुढे सर्व साहित्य संमेलनांचे आयोजन नेटकेपणा, साधेपणा किमान खर्च, भपकेबाजपणा टाळून करण्यात यावे. सातशे वर्षांपूर्वी आपल्या संतांनी कुठलीही अनुकूलता नसताना पंढरीच्या वारीची समृद्ध परंपरा तयार केली. आधुनिक काळात साहित्य महामंडळाच्या सर्व धुरिणांनी सामान्य रसिकांच्या उत्स्फूर्ततेच्या बळावर साहित्य संमेलनाची परंपरा बळकट करावी.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद ९४२२८७८५७५

Saturday, August 15, 2015

उच्चभ्रू स्त्री-पुरुष संबंधांचा वेध घेणार्‍या कथा

दैनिक लोकसत्ता "लोकरंग" १५ ऑगस्ट २०१५ 

सॉमरसेट मॉम हा महान फ्रेंच लेखक. पहिल्या महायुद्धानंतर त्यानं प्रामुख्यानं कथालेखन केलं. डॉक्टर असलेल्या मॉमने वैद्यकीय व्यवसाय केला नाही. पहिल्या जागतिक महायुद्धात तो रेड क्रॉसच्या हेर खात्यात नोकरीला लागला. युद्धकाळात त्यानं भरपूर प्रवास केला. युद्ध संपल्यावर १९२० नंतर तो फ्रान्सला परतला आणि उर्वरित आयुष्य त्यानं तिथेच घालवलं.

मॉमचा अठरा कथांचा मराठी अनुवाद व्यवसायानं अभियंते असलेल्या सदानंद जोशी यांनी केला. या अठरा कथा ‘द हॅपी मॅन आणि कर्नल्स वाईफ या दोन पुस्तकात समाविष्ट आहेत. तांत्रिकदृष्ट्या ही दोन पुस्तकं वेगळी असली तरी त्यांचा एकत्रित विचार करायला हवा.

सगळ्यात ठळक गोष्ट जाणवते ती म्हणजे या कथांमधील आशयसूत्र. दोन-तीन कथांचा अपवाद वगळता सर्वच कथा या स्त्री-पुरुष संबंधाभोवती गुंफलेल्या आहेत. मागच्या शतकांतील युरोपातील वातावरण, भव्य बंगले, नोकर-चाकर, प्रौढ स्त्री-पुरुषांच्या नियमित होणार्‍या पार्ट्या, त्यांचे कपडेलत्ते या सगळ्यांची विस्तृत आणि बारकाईने वर्णनं मॉमने या सर्व कथांमधून केलेली आहेत.

समाजातील प्रौढ राजकीय वजन असलेला पुरुष व कमी वयाची तरुण सुंदर सामान्य परिस्थितीतील स्त्री (ऍपिअरन्स अँड रिऍलिटी), सामान्य कलाकार असलेल्या नवर्‍यासोबत राहणारी पण मनानं एका प्रतिभावंताच्या प्रेमात बुडालेली स्त्री (द सोशल सेन्स) केवळ नोकरी मिळावी म्हणून पन्नाशीत लग्न करणारा पुरुष व अपंग आईची सेवा करत करत अविवाहित राहिलेली स्त्री (द मॅरेज ऑफ कन्व्हिनिअन्स) प्रतिष्ठित पुरुष व त्यानं दुर्लक्षित ठेवलेली काहीशी उपेक्षित राहिलेली त्याची प्रतिभावंत कवियत्री बायको (कर्नल्स वाईफ) मरण पावलेल्या मित्राच्या आठवणीत सैरभैर होवून पत्नीचा संशयावरून खून करणारा कैदी (अ मॅन वुइथ कॉन्शिअस) प्रेमाच्या त्रिकोणात पुरुषाचा झुरून मृत्यू, प्रियकर दूर निघून गेलेला आणि एकटी उरलेली स्त्री (व्हर्च्यू) तरुणाच्या प्रेमात पडणारी सामान्य वयस्क स्त्री काही काळानं त्यालाही सोडून दुसर्‍या प्रौढ पुरुषासोबत लग्न करते (जेन)

अशी कितीतरी रुपं मॉमने रंगवलेली आहेत. स्त्री-पुरुष संबंधांचा, या आदिम नात्याचा वेध घेताना भोवतालचे मोजके सोयीस्कर तपशील तो घेतो. इतर बर्‍याच गोष्टी त्यानं टाळल्या आहेत. कुठल्याच कथांमध्य लहान मूल येत नाहीत. अगदी अपवाद म्हणून सावत्र मुलांसोबत राहणारी आणि त्यांचा अभिमान असणारी स्त्री (इन अ स्ट्रेंज लँड) आढळते.

शिवाय नोकर चाकर, नातेवाईक असेही फारसे कुठेत येत नाही. एकतर त्याची आवश्यकता मॉमला वाटत नाही किंवा सगळं लक्ष स्त्री-पुरुष संबंधावरच एकाग्र केल्यानं त्याला इतर काही दिसतही नाही.

सगळ्या कथांचे निवेदन एकवचनी प्रथमपुरुषी ‘मी’ नेच केलेले आहे. कदाचित त्या काळातील ही शैली म्हणूनही मॉमला वापरावी वाटली असेल.

दोन कथा मात्र सणसणीत अपवाद आहेत. त्यांचा विचार स्वतंत्रपणेच करावा लागेल. पहिली आहे, ‘फॉल ऑफ एडवर्ड बर्नार्ड.’ इझाबेल, बेरमन आणि एडवर्ड असा हा प्रेमाचा त्रिकोण आहे. दोन्ही मित्रांचे इझाबेलवर प्रेम आहे. एडवर्ड आणि तिचा साखरपुडाही झाला आहे. एडवर्डच्या वडिलांना आर्थिक आरिष्टाला सामोरे जावे लागते. अपरिहार्यतेतून एडवर्ड शिकागो सोडून दूरवरच्या ताहिती बेटांंवर कामधंद्याच्या शोधात जावे लागते. त्याची नियमित पत्रे इझाबेललला येत राहतात. पण हळूहळू त्या पत्रांमधून एडवर्ड शिकागोला परत न येण्याचा सूर उमटत रहातो. शेवटी बेरमन एडवर्डचा शोध घेत प्रत्यक्ष त्या बेटांवर पोचतो.

एडवर्ड त्या शांत बेटावर निसर्गरम्य वातावरणात रमून गेलेला असतो. त्याच्या मनातून शिकागोच्या गर्दीची, जिवघेण्या स्पर्धेची चकाचक आयुष्याची ओढच नाहिशी झालेली असते. त्याच्या मनात परतण्याची शक्यताच संपून जाते. गुन्हेगार ठरवलेला शिक्षा भोगून त्या बेटावर गेलेला इझाबेलचा मामा एडवर्डला आसरा देतो. शिवाय जवळचा दुसर्‍या बेटांवर त्याला व्यवसाय उभारण्याची, आपल्या मुलीशी लग्न करण्याची ऑफरही देतो.
या कथेत सॉमरसेट मॉमने निसर्गाच्या वर्णनाचा एक सुंदर उतारा दिला आहे.

‘घराखालील उतारावरून तळ्यापर्यंत सर्वत्र नारळीची झाडं वार्‍यावर डुलत होती. आणि एखाद्या कबुतराच्या छातीप्रमाणे तळ्याचा पृष्ठभाग सांज सकाळी रंगीबेरंगी सूर्यकिरणांनी झळाळत होता. जवळच खाडीच्या काठावर काही झोपड्या होत्या आणि समुद्रातील छोट्या खडकाजवळ एका नावेत दोन नावाडी मासेमारी करत होते. त्याच्या पलीकडे पॅसिफिक महासागर पसरला होता. आणि वीस एक मैलांवर कविकल्पनेतून चितारलेल्या चित्रासारखं म्यूरे बेट धूसर दिसत होतं.’ या कथेचा आवाका खरे तर एका कादंबरीचा आहे. मॉमने याची कथा का केली कळत नाही.

दुसर्‍या महायुद्धानंतर जगाची व्यवस्थाच बदलली. व्यापार, जीवघेणी स्पर्धा, पैशाला अतोनात महत्त्व, महत्वाकांक्षेपोटी आलेली भयानक गती हे सगळे सहन न होवून शांत निसर्गात किमान गरजांसह समाधानानं रहाण्याची ओढ माणसाच्या मनात जास्तच निर्माण झाली. हे सगळे मॉमने फार लवकर ओळखलं व शब्दांत चितारलं.

दुसरी कथा आहे, ‘द व्हर्जर’ नावाची. अल्बर्ट हा चर्चमध्ये फारमन म्हणून काम करणारा सामान्य नोकर. आतापर्यत त्याने त्याचे काम अतिशय नेकीने केले. तो आयुष्याच उतरणीला लागलाय. नवीन आलेला पाद्री त्याच्या निरक्षरतेवर आक्षेप घेतो. लिहिणं, वाचणं शिकला नाहीस तर तुला नोकरीला मुकावे लागेल असे सांगतो. आल्बर्ट विलक्षण अस्वस्ध होतो. या उतारवयात आता साक्षर होणे शक्य नाही. आणि चर्चचे पवित्र काम सोडून दुसरे कुठलेही काम कसे करणारर? ते हलकेच आहे असं लोक म्हणणार ना.

विचारात रस्त्यानं चालताना त्याला सिगारेट प्यायची तल्लफ येते. एरव्ही तो काही नियमित सिगारेट पीत नसतो. अस्वस्थ मनाने त्याला सिगारेटची आठवण येते. बरेच चालले तरी सिगारेटची टपरी भेटत नाही. अचानक त्याच्या मनात कल्पना येते- आपण एखादी इपरी का टाकू नये?

खरेच मग तो सिगारेटचे छोटे दुकान टाकतो. त्याला प्रतिसाद मिळून दुसरे दुकान टाकावे लागते. मग तो हाताशी माणूस ठेवतो. असा त्याचा व्यवसाय बराच वाढतो. तो नियमित बँकेत पैसे भरत जातो. काही वर्षांनी त्याला बँकेचा मॅनेजर म्हणतो, तुम्ही नुसते बचत खात्यात पैसे गुंतवू नका. शेअर्समध्ये गुंतवा. आल्बर्ट म्हणतो, मला त्यातलं काही कळत नाही. मॅनेजर म्हणतो, मी कागदपत्र आणून ठेवतो. तुम्ही फक्त सह्या करा. हा म्हणतो, मला वाचता येत नाही. जेमतेम मी माझी सही करू शकतो.

बँकेचा मॅनेजर आश्चर्यचिातच होतो. तो म्हणतो, ‘अहो, तुम्हाला लिहिता वाचता आले असते तर हाच व्यवसाय किती वाढवता आला असता.’ आल्बर्टच्या तोंडी सॉमरसेट मॉमने दिलेले उत्तर फार महत्त्वाचे आहे. ‘मी शिकलो असतो तर चर्चमध्येच नोकरी करत राहिलो असतो.’

दुसर्‍या महायुद्धानंतर जगभर औपचारिक शिक्षणाची कागदोपत्री पदव्या मिळविण्याची मोठी लाटच आली. १९९० च्या जागतिकीकरणानंतर संपर्क क्रांतीनंतर यातील फोलपणा सगळ्यांच्याच लक्षात येत चालला आहे. हे सगळे शंभर वर्षांपूर्वीच मॉमने जाणले हे विलक्षणच म्हटले पाहिजे.

या दोन्ही पुस्तकांतील अनुवादाची भाषा प्रवाही आणि मूळ कथाविषयाला न्याय देणारी उतरली आहे. एडवर्डच्या कथेच पंचे गुंडाळून दोघे तळ्याच्या पाण्यात उतरतात या वाक्यात टॉपेलला पंचा हा नेमका शब्द वापरून एडवर्डची खेडं आवडणारी मानसिकता सदानंद जोशी यांनी चांगली पकडली आहे.

‘इन अ स्ट्रेंज लँड’ कथेत मला तुर्दिश भाषा येत नसली तरी ती ‘कॉकनी’ ढंगाने अशुद्ध तुर्किश बोलत असेल’ असे ‘कोकणी ढंगाची मराठी वाटेल असे वाक्य जोशी लिहितात. यातून भाषेचा लहेजा त्यांना चांगला पकडता आला हे लक्षात येते.

सदानंद जोशी यांनी प्रस्तावनेत मृणालिनी गडकरी यांचे अनुवादाबद्दलचे मत दिले आहे- ‘अनुवाद करताना अनुवादकाला त्याची बुद्धी, चित्त व अंत:करण पणाला लावावं लागतं. म्हणजेच साहित्य व अनुवाद यांची निर्मितीप्रक्रिया सारखीच सर्जनशील असते.

सदानंद जोशी यांना मॉमच्या लेखनाची बलस्थाने कळली आहेत. त्याची शैली उमगली ओ. तेव्हा त्यांनी सॉमरसेट मॉमच्या कादंबर्‍या आणि इतरही कथा मराठीत आणाव्यात. उमा कुलकर्णी यांना एस. एल. भैरप्पा यांच्या कानडी लिखाणाची नस सापडली आणि त्यांनी भैरप्पांचे बहुतांश लेखन मराठीत आणले. तसेच सदानंद जोशींनी मॉमच्या बाबतीत करावे ही अपेक्षा.

कर्नल्स वाईफ आणि इतर कथा
सॉमरसेट मॉम. अनुवाद: सदानंद जोशी
पद्मगंधा प्रकाशन, पृ. १५२, कि. १६०/-
द हॅपी मॅन आणि इतर कथा
सॉमरसेट मॉम. अनुवाद: सदानंद जोशी
पद्मगंधा प्रकाशन, पृ. १५२, कि. १६०/-

-श्रीकांत उमरीकर

Monday, June 22, 2015

डाळींची आयात ! शेतकर्‍याचा घात !!


उरूस, दैनिक पुण्य नगरी,  21 जून 2015 

देशात डाळींचे भाव कडाडले, डाळ 100 रूपयांच्या पुढे गेली की लगेच शासकीय पातळीवर डाळींची आयात करणार असल्याची आवाई उठवली गेली. सर्वसामान्य माणसांना असे भासविले जाते की हे शासन त्यांची किती काळजी करते. याचा थोडा शांततेने विचार केला की लक्षात येईल की ही घोषणा प्रचंड फसवी आहे. याचा सामान्य माणसांशी काहीही संबंध नाही. आणि शेतकर्‍यांचा तर ही घातच करणारी बाब आहे.
सर्वसामान्य ज्याला ग्राहक म्हणून संबोधल्या जाते त्यातील बहुतांश वर्ग हा शेतकरीच आहे. स्वाभाविकच हा शेतकरी आपल्याला लागणारे बरड धान्य आपल्या शेतातच पिकवितो. महाराष्ट्राचा आपण विचार केला तर असे लक्षात येईल की  शेतकरी त्याला लागणार्‍या डाळीही आपल्या शेतातच पिकवितो. म्हणजे साधा हिशोब आहे की ज्याला गरीब सामान्य म्हणून गणल्या जातो त्यातील बहुतांश हा शेतकरी किंवा शेतीशी संबंधीत आहे. मग तो आपल्याला लागणारे वर्षाचे धान्य, डाळी यांची साठवणूक एकदाच करून ठेवतो. त्याचा बाजारातील चढउताराशी संबंध येतच नाही. राहता राहिला शेतकरी नसलेला इतर शहरी मध्यमवर्गीय ग्राहक. आपण परत महाराष्ट्राचा विचार करू. हा मध्यमवर्गीय ग्राहक नेहमी बरड धान्य व डाळी यांची वार्षिक खरेदी करतो. अगदी फार मोठी शहरं सोडली तर दर महिन्याच्या महिन्याला जावून डाळ, गहु, तांदूळ आणण्याची पद्धत मध्यमवर्गात नाही. अगदी गव्हाचे तयार पीठही खरेदी केले जात नाही. वर्षाचे जे धान्य साठवले असले ते निवडुन गरजे प्रमाणे त्याचे पीठ दळून आणले जाते. बाजरी सारख्या धान्याची तर अशी समस्या आहे की जास्त दिवस हे पीठ टिकत नाही. ते कडून बनते. परिणामी ते दळून आणले की लगेच वापरून टाकावे लागते. 
मग या डाळींचे/बरड धान्यांचे भाव वाढतात किंवा घसरतात याचा परिणाम नेमका कोणावर पडतो?  असा उच्च मध्यमवर्ग आहे ज्याचे वार्षिक उत्पन्न किमान दहा लाख रूपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. चार माणसांच्या एका कुटूंबाचा धान्य, डाळी यांच्यावरील खर्च हा साधारणत: पंधरा हजार इतका आहे. आता जर हा खर्च वाढून वीस हजार झाला तर त्याच्या एकूण बजेट  मध्ये असा काय फार मोठा फरक पडतो? डाळींची धान्याची खरेदी उन्हाळ्याच्या आधी केली जाते. उन्हाळ्यात त्यांना वाळवून कोठ्यांमध्ये भरले जाते. आता पावसाळ्याच्या तोंडावर जर डाळींचे भाव वाढले तर त्याची इतकी चिंता करण्याचे कारणच काय?  

मग ही बोंब का केली जाते? त्याचे साधे कारण म्हणजे कृषीमालाची आंतराष्ट्रीय बाजारपेठ. यात ऑस्ट्रेलिया मधून मोठ्या प्रमाणात डाळ येते. या डाळीचा व्यापार करणारे मोठमोठे व्यापारी दिल्लीत किंवा विविध देशांच्या राजधानीत डेरे देवून बसलेले असतात. त्यांच्याशी संधान साधून आयात करण्यासाठी वातावरण निर्मिती केली जाते. या सगळ्यातून अशी ओरड केली जाते की सामान्य माणसाचे जीवन भरडून निघत आहे. डाळी खाल्ल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणात शाकाहारी असलेला हा हिंदू भारत प्रथिने कुठून मिळवणार? मग यावर उपाय काय तर परदेशातून डाळी आयात करा.

खरं तर सामान्य माणसाला प्रथिनांसाठी सध्या अंडे परवडत आहेत. उन्हाळा आणि पावसाळ्यात अंड्याचा भावही उतरता राहतो. किंवा फार चढला तरी तो पाच सहा रूपयांच्या पुढे जात नाही. कोंबड्यांवर कुठलीही बंदी नाही. कारण कोंबड्यांच्या पोटात देव नाहीत. कोंबड्यांचा उपयोग खाण्यासाठी होतो, अंडी मिळतात म्हणून त्यांची पैदास मोठ्या प्रमाणात केली जाते. परिणामी बाजारात अंडी स्वस्त उपलब्ध आहेत. इतकेच नाही तर खेड्यात सर्रास कोंबड्या पाळल्या जातात. शेळीवरही कुठली बंदी नाही. शेळीच्याही पोटात देव नाही. परिणामी खेड्यांमधून घराघरात शेळ्याही पाळल्या जातात. ज्यांचा व्यवहारीक उपयोग होतो त्यांच्या वंशाच्या वृद्धीसाठी कुठलाही कायदा करावा लागत नाही. लोक त्यांचे पालनपोषण ममत्वाने करतात. त्यांच्या वंशाची अमर्याद वृद्धी होते. यातून सामान्य माणसाची प्रथिनाची गरज भागते. मग हा सामन्य माणूस महाग झालेल्या डाळीकडे वळत नाही.

सामान्य ग्राहक असे विचारतो की जर आम्हाला परदेशातून स्वस्त डाळ मिळत असेल तर आम्ही ती का घ्यायची नाही? याचेही उत्तर शेतकरी चळवळीने शास्त्रशुद्ध पद्धतीने दिले आहे. ‘जर का भारतातील सामान्य ग्राहकाला ऑस्ट्रेलियातील डाळ त्याच्या दारात भारतातील डाळीपेक्षा स्वस्त मिळत असेल तर त्या ग्राहकाचा स्वस्त परदेशी डाळ खरेदी करण्याचा हक्क आम्ही मान्य करतो. आमच्या शेतकरी बांधवांना आम्ही सांगू की तूम्ही डाळीचे पीक घेवू नका. कारण बाजारपेठीय व्यवस्थेत ग्राहक हा राजा आहे हे तत्त्व शेतकरी चळवळीला मान्य आहे. पण जर का शासन परदेशी डाळ जास्त किमतीत आणून इथल्या बाजारपेठेत स्वस्तात ओतण्याचा आततायी धंदा करणार असेल तर मात्र आम्ही त्याला विरोध केल्या शिवाय राहणार नाही.’

आज जी डाळ आयात केली जाणार आहे तिचा भाव काय? ती किती भावाने आणणार आणि भारतातल्या बाजारपेठेत ती किती भावाने विकणार? म्हणजे हा सगळा खटाटोप सामान्य ग्राहकाचे नाव पुढे करून शेतमालाची बाजारपेठ उद्धस्त करून टाकण्याची आहे बाकी काही नाही. समजा जर डाळींचे भाव चढले. त्यात शासनाने काहीही हस्तक्षेप केला नाही. तर जास्तीत जास्त शेतकरी या वाढलेल्या भावाने आकर्षित होतील. पुढच्या मोसमात डाळींचे उत्पादन वाढलेले असेल. परिणामी डाळींचे भाव बाजारपेठेत घसरतील. यासाठी वेगळं काहीच करण्याची गरज नाही. 

पण शेतमालाच्या बाजारपेठेत हस्तक्षेप करून ही बाजारपेठ मोडून काढण्याचा जूना खेळ सोडायला अजूनही सरकार नावाची यंत्रणा तयार नाही. बरं हे नेमकं शेतमालासाठीच का होते? औषधं ही जीवनावश्यक गोष्ट आहे. मग काही मोजक्या जीवनावश्यक औषधांची घावूक खरेदी करून ती बाजारपेठेत आणण्याची योजना शासन का आखत नाही? 

पोटाच्या भुकेनंतर वस्त्राची गरज असते. मग सामान्य माणसांना स्वस्त कापड मिळावं म्हणून कापडगिरण्यांवर शासन नियंत्रण का आणत नाही? उलट हेच शासन या कापडगिरण्यांना शेतकर्‍यांच्या शेतातला कापूस स्वस्त भेटावा म्हणून त्यावर निर्यातबंदी मात्र लादते. कापसाचे भाव पाडले जातात. परिणामी कापडगिरण्यांना कापूस स्वस्त मिळतो. पण हा स्वस्त कापूस वापरून तयार केलेले कापड स्वस्त आहे का महाग हे मात्र बघण्याची तोशीश सरकार स्वत:ला लावून घेत नाही. 

कांद्याचे भाव चढले की लगेच ओरड चालू होते. खरं तर पावसाळ्यात कांदा फार कमी खाल्ला जातो. चातुर्मासात कांद्याचा वापर टाळला जातो. जैन समाज तर कांदा वर्षभर खात नाही. आणि कांदा जिवनावश्यक वस्तूही नाही. हेच साखरे बाबत. साखरेचे भाव उतरले की लगेच शेतकर्‍यांच्या विरोधात सगळे सांगतात, ‘हे मुर्ख शेतकरी भावासाठी आंदोलन करत आहेत. यांना कळत नाही की साखरेचे भाव भारतातच नाही तर जगता उतरले आहेत.’ मग या अर्थशास्त्रज्ञांना हे विचारले पाहिजे की जर साखरेचे भाव कोसळले की लगेच उसाचे भाव कोसळतात तसे भाव चढले की मग शेतकर्‍यांना चढे भाव का नाही दिले जात? 

आज डाळींचे भाव चढले की सगळ्यांच्या डोळ्यात येते आहे. पण जेंव्हा भाव कोसळतात तेेंव्हा कोणी विचारायला येत नाही. डाळींचे पीक तसे किचकट आहे. शेतात पिकली की लगेच डाळ बाजारात आणता येत नाही. तिच्यावर प्रक्रिया करावी लागते. डाळी भरडणे, त्यांना पॉलिश करणे, त्यांचे पॅकिंग करणे आणि मग एक उत्पादन म्हणून तीला बाजारात आणणे. या सगळ्यात शेतकरी एक हिस्सा आहे केवळ. डाळीवर प्रक्रिया करणारे किती उद्योग शेतकर्‍यांनी स्वत: चालविले आहेत? मग ही भावाची ओरड करून कोणाचा फायदा करून दिला जात आहे? मूळात सध्या जो शेतकरी जीवतोडून पेरणीच्या लगीनघाईत गुंतला आहे त्याच्या घरात डाळीचा कण तरी आहे का विकायला? असं म्हणतात की पेरणीच्या काळात शेतकर्‍याच्या बायकोच्या गळ्यात सोन्याचा पिवळा मणीही उरत नाही मग डाळीचा पिवळा दाणा विक्रीसाठी त्याच्या घरात उरणार कसा? 

शेतकरी चळवळीने सातत्याने मागणी केली आहे की शेतीमालाच्या बाजारपेठेत हस्तक्षेप करण्याचे सोडा. ही बाजारपेठ योग्य त्या किंमतीवर स्थिर होवू शकते. साधी मोबाईलची बाजारपेठ स्वस्तात येवून स्थिरावते मग जीवनावश्यक असणार्‍या अन्नधान्याच्या बाजारपेठेची काय कथा. पण दिसते असे आहे की ही बाजारपेठ स्थिर होवू न देण्यातच काही जणांचे हित गुंतले आहे. मग असे असेल तर शेतकर्‍यांसाठी ‘अच्छे दिन’ येणार कधी?             

 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, June 14, 2015

काव्यप्रेमी पुल आणि सुनिताबाई देशपांडे

 उरूस, दै. पुण्य नगरी 14 जून 2015 

नवरा बायकोला लक्ष्मी नारायणाचा जोडा असे आपल्याकडे संबोधले जाते. इंग्रजीमध्ये ‘मेड फॉर इच अदर’ असेही म्हणतात. काही नवरा बायको एकमेकात इतके गुंतून गेले असतात की एकमेकांशिवाय त्यांच्या अस्तित्वाची कल्पनाही करता येत नाही.  सुप्रसिद्ध मराठी लेखक पु.ल.देशपांडे त्यांच्या पत्नी सुनीता देशपांडे हे असेच जोडपे. त्यांचे एकमेकांशी 100 % पटत होते का? तर तसे मुळीच नाही. सुनीताबाईंनी ‘आहे मनोहर तरी’ या आपल्या पुस्तकात अतिशय विस्तृतपणे त्यांच्या सहजीवनाबद्दल तटस्थपणे लिहीले आहे. त्यात मतभेदाचे, मनभेदाचे अनेक मुद्दे आहेत प्रसंग आहेत. पण या सगळ्या लिखाणातून समोर जे काही येते ते त्या दोघांचे एकमेकांच्या सहवासात फुलून आलेले आयुष्य. पु.ल.नी कधीच सुनीबाईंबद्दल फार काही लिहीलं नाही. पु.ल.गप्पच राहिले. या गप्पपणातूनच त्यांनी खुप काही सांगितले आहे. पु.ल. म्हणायचे, ‘आमच्या घरात मी एकटाच देशपांडे, ही उपदेशपांडे आहे.’

हे आठवायचे कारण म्हणजे 12 जून हा पु.ल.देशपांडे यांचा स्मृती दिन. या दिवसाची कहाणी मोठी विलक्षण आहे. पु.ल. अतिशय गंभीर आजारी पडले. आजार त्यांना आयुष्याच्या अगदी अंतिम टप्प्यात घेवून गेला. आता ते जाणार हे निश्चित झाले. त्यांचा भाच्चा दिनेश ठाकूर जो की त्यांचा अत्यंत लाडका होता, ज्याला त्यांनी मुलगाच मानले त्याला अमेरिकेतून बोलावणे पाठवले. तो येईपर्यंत पु.ल. यांना कृत्रिमरित्या जिवंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सगळं चालू असताना सुनीताबाईंच्या लक्षात आले की आपल्या लग्नाचा वाढदिवस 12 जून जवळ येत आहे. त्यांनी हाच दिवस निश्चित केला. तोपर्यंंत दिनेश भारतात परतला. बरोब्बर 12 तारखेला पु.लंना दिलेला कृत्रिम आधार काढून घेतला आणि पु.ल. यांना आपल्या लग्नाच्या 54 व्या वाढदिवशी सुनीताबाईंनी निरोप दिला. ही कहाणी मोठी विलक्षण आहे. 

ज्यांना वाटायचं की आहे मनोहर तरी मध्ये सुनीताबाईंनी ज्या नवर्‍याच्या इतक्या तक्रारी किंवा आपसातले मतभेद वाचकांसमोर मांडले त्या आपल्या नवर्‍यावर खरेच किती प्रेम करतात? पण सुनीताबाईंनी आपल्या आचरणातून दाखवून दिले की त्या पु.ल.मध्ये किती गुंतून गेल्या होत्या. पुढे त्याही फारश्या जगल्या नाहीत.

कविता हा पु.ल. आणि सुनीताबाईंमधला समान दुवा. बा.भ. बोरकर, आरती प्रभू, मर्ढेकर हे दोघांचेही आवडते कवी. यांच्या कवितांचे कार्यक्रम ते मिळून सादर करायचे.
30 नोव्हेंबर 1987 ला पु.ल.व सुनीताबाई यांनी औरंगाबादला बोरकरांच्या कवितांचा कार्यक्रम ‘आनंदयात्री’ सादर केला होता. स.भु. संस्थेच्या जालान सभागृहातील या कार्यक्रमास औरंगाबादकर रसिकांनी  तुडूंब गर्दी केली होती. आमच्या सारख्या शाळकरी विद्यार्थ्यांना तिथे बसायला जागाच उरली नव्हती. शिवाय आमच्या खिशातही तिकीटासाठी पैसे नव्हते. मग आम्ही खिडकीच्या गजाला लटकून उभा राहण्याचा फुकटचा अफलातून पर्याय निवडला. आनंदयात्री हे नाव खरे तर पाडगांवकरांच्या कवितेचे आहे. 

आनंदयात्री मी आनंदयात्री
अखंड नुतन मला ही धरीत्री
प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री

अशा त्या ओळी आहेत.

हे वर्णन बोरकरांना चपखल लागू पडते असे वाटून पुल व सुनीताबाईंनी हे नाव बोरकरांच्या कवितेच्या कार्यक्रमासाठी निवडले. या कार्यक्रमाचे नेपथ्य अगदी साधे पण प्रभावी होते. मागे काळा पडदा लावलेला. पांढर्‍या शुभ्र चादरींची बैठक मंचावर केलेली. त्यावर साध्या पांढर्‍या गुरूशर्ट झब्ब्यात पु.ल. व  फिक्क्या निळ्या जांभळ्या फुलांच्या पांढर्‍या सुती साडीत सुनीताबाई बसलेल्या. पु.ल.समोर हार्मोनियम. काही कविता पु.ल. गाऊन म्हणत आहेत. बोरकरांच्या आठवणी सांगत श्रोत्यांना हसवत आहेत, स्वत: हसत आहेत.

समुद्र बिलोरी आयना
सृष्टीला सातवा महिना

ही बोरकरांची कविता पु.लनी झोकात साजरी केली. ‘निळ्या जळावर कमान काळी’ या कवितेत दुधावर आली शेते या शब्दाचा अर्थ समजावून सांगताना भाताचा शेताचा संदर्भ ते सहज देत होते. पु.ल.च्या विरूद्ध सादरीकरण सुनीताबाईंचे होते. त्या साध्या संथ स्वरात हळूवारपणे बोरकरांच्या कविता म्हणत आहेत. श्रोत्यांच्या हळू हळू लक्षात येत गेले की आपण सर्वात जास्त दाद पुलंना देत आहोत. पण सुनीताबाई जेंव्हा कविता वाचतात तेंव्हा आपण कशात तरी हरखून जातो. अगदी दाद देण्याचेही आपल्या लक्षात रहात नाहीत. कारण सुनीताबाईंनी बोरकरांची संपुर्ण कविता आपल्यात जिरवून घेतली आहे.

एखाद्या साध्या स्वरात आवाजात किती ताकद असू शकते, प्रभाव असू शकतो हे मला तरी त्या दिवशी पहिल्यांदाच जाणवले. पुलंपेक्षा सुनीताबाईंच्या या वाचनाने प्रभावी होवून पुढे कायमस्वरूपी बोरकरांच्या कवितांचे गारूड माझ्या मनावर पडून राहिले.

मर्ढेकरांची कविता 

अभ्रांच्या गे कुंद अफूने 
पानांना ये हिरवी गुंगी
वैशाखाच्या फांदीवरती
आषाढाची गाजारपुंगी

ही वाचत असताना सुनीताबाई थबकल्या. त्यांनी ती पुलंना म्हणून दाखवली. मग पुलंही त्यात अडकून गेले. बोलता बोलता कित्येक तास हे दोघे नवरा बायको मर्ढेकरांच्या कवितांमध्ये गुंतून पडले. एकमेकांना कविता चढाओढीने वाचून दाखवत राहिले. त्यांना असे वाटले की आपल्याला इतका आनंद एकमेकांना वाचून दाखवताना मिळतो आहे तर आपण तो मराठी रसिकांना का नाही द्यायचा? म्हणून त्यांनी मर्ढेकर, बोरकर, आरती प्रभूंच्या कवितांचे कार्यक्रम करण्यास सुरवात केली.

आरती प्रभूंच्या कवितेचे एक उदाहरण पुल व सुनीताबाई आपल्या कार्यक्रमात द्यायचे

तेंव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकूनी मी जाईन दूर गावा

पाण्यात ओंजळीच्या यावा चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यात अर्थ जावा

तारांवरी पडावा केंव्हा चुकून हात
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

सुनीताबाई या कवितेवर बोलताना सांगायच्या, ‘अचानक काहीतरी हाती लागते, ज्यासाठी कितीही मेहनत केली तरी मिळेल याची शाश्वती नसते. कलेचे तर असेच आसते. मग अशावेळी आपली भावना काय होते? सर्वस्व सोडून निघून जाण्याचीच होते. कारण हे कलासक्त मन भौतिक वस्तूंमध्ये अडकलेलेच नसते. ते दूर कुठेतरी काही तरी शोधत असते.’
पुल स्वत: अतिशय प्रतिभावंत लेखक होते. त्यांची कथाकथनाचे, एकपात्री असे कित्येक प्रयोग त्यांनी केले. नाटकात सिनेमात कामं केली, गाण्या बजावण्यात बुडून गेले पण आपल्याला आवडलेल्या इतरांच्या कवितांसाठी त्यांनी जीव पाखडला.

सुनीताबाई याही प्रतिभावंत लेखिका. ‘सोयरे सकळ’ सारखे त्यांचे व्यक्तिचित्रंाचे पुस्तक मोठे विलक्षण आहे. पं. मल्लीकार्जून  मंसूर किंवा पं. कुमार गंधर्व यांच्या सारख्या अलौकिक प्रतिभेच्या गायकांवर त्यांनी अतिशय सुंदर लिखाण केले आहे. मण्यांची माळ मधील ललित लेखन वाचकांना असेच खिळवून ठेवते. त्यांनीही आपले साहित्य बाजूला ठेवून बोरकर, आरती प्रभू, मर्ढेकर यांच्या कवितांवर जिवापाड प्रेम केले. त्यांच्या कवितांचा आनंद स्वत:ला मिळाला तसा इतरांना मिळावा म्हणून त्याचे कार्यक्रम महाराष्ट्रभर केले.

या कार्यक्रमांमधून जमा झालेले पैसे किंवा इतरही कार्यक्रमांचे पैसे, पुस्तकांचे मानधन या सगळ्यांतून या जोडप्याने अक्षरश: लाखो रूपये विविध साहित्यीक संस्थांना दान केले. विविध सामाजिक संस्थांना देणग्या दिल्या.

पुल यांच्या पंच्चाहत्तरी निमित्त एक स्मरणिका प्रकाशित झाली होती. तिच्या मलपृष्ठावर इंद्रजीत भालेराव यांची पुलंवरची एक कविता छापलेली आहे

शब्द मिठी मारलेले
तुम्ही ओठ सोडविले
एक अभयआरण्य
त्यांच्यासाठी घडविले

तुम्ही म्हणाला वाहवा
तुम्ही वाजविली टाळी
तेच भाग्य मिरविते 
आज कविता कपाळी

मराठी कवितेच्या घट्ट मिठी मारलेल्या शब्दांचे अर्थ उलगडून दाखविणारे हे विलक्षण प्रतिभावंत जोडपे. 12 जून हा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. त्या निमित्त पुल आणि सुनीताबाईंचे हे स्मरण. 
           
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, June 7, 2015

नर्गीस-सुनील दत्त : धर्मापलिकडचे शुद्ध प्रेम फक्त


उरूस, पुण्य नगरी,  7 जून 2015 

तीचा जन्म 1 जून 1929 चा. त्याचा जन्म तिच्या बरोबर पाच दिवसानंतरचा 6 जून 1929 चा. तिचे मूळ गाव रावळपिंडी, पश्चिम पंजाब (आताचा पाकिस्तान) त्याचेही मूळ गाव झेलम पश्चिम पंजाब. तिचे वडिल पंजाबी. तोही पंजाबी. तिचे चित्रपट गाजले ते परत त्याच परिसरातील असलेल्या नटासोबत. ती राज्यसभेवर खासदार होती. तिचा नवराही खासदार होता. केंद्रात मंत्री होता. तिची मुलगीही खासदार होती. तीचे खरे नाव फातिमा राशिद.  इतकं सांगितलं तर वाचकांना फारसा उलगडा होणार नाही. पण नर्गीस इतके शब्द उच्चारले की बाकी काही सांगायची गरजच उरत नाही. 

अभिनेत्री नर्गिसचा जन्म कोलकत्त्याचा. तिचे कुटूंब मूळचे पाकिस्तानात गेलेल्या पंजाब प्रांतातले. तिने लग्न केले सुनील दत्तशी. त्याचेही गाव त्याच परिसरातले. फाळणी नंतर सुनील दत्तचे कुटूंब भारतात आले. त्यांना आश्रय दिला तो त्यांच्या वडिलांचे मुस्लीम मित्र याकुब यांनी. हरियानातल्या एका छोट्या गावात ते राहिले. पुढे लखनौला स्थलांतरीत झाले. 

इकडे आपण हिंदू मुस्लीम एकतेच्या गप्पा मारत राहतो. पण कित्येक कलाकार आपल्याकडे असे आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्याची किंमत यासाठी मोजली आहे. आपले आयुष्यच या सगळ्याचे उदाहरण म्हणून समोर ठेवले आहे. भारतात कलेला पोषक वातावरण आहे हे हिंदू इतकेच मुस्लीम कलाकारांनाही माहित होते. बडे गुलाम अली असो की साहिर लुधियानवी असो असे कित्येक कलाकार इथेच राहिले. आणि त्यांनी आयुष्यभर भारतातील कला रसिकांच्या पोटी आपली कृतज्ञता व्यक्त केली. 

नर्गीसने 1935 पासूनच चित्रपटात काम करायला सुरवात केली. पण तिचा खरा बोलबाला झाला तो राज कपुर सोबतच. राज कपुर परत त्याच पंजाब प्रांतातला. फाळणीचे चटके त्याच्याही कुटूंबाला भोगावे लागले. पाकिस्तानात गेलेल्या पंजाबच्या मातीतच काहीतरी कलेचे गुण असावेत.

नर्गीसचे चित्रपट गाजले ते राज कपुर सोबत. ‘आह’ मध्ये लताचा कोवळा सुर नर्गीसला मिळाला आणि ‘आजा रे अब मेरा दिल पुकारा’ हे आर्त अवीट गोडीचं गाणं रसिकांच्या कानावर पडलं. तिथेच लता-नर्गीस-शंकर/जयकिशन-राजकपुर हे समिकरण जूऴून आलं. नंतर राज कपुरच्या चित्रपटात इतरही नायिका आल्या. नर्गीसनेही इतर ठिकाणी काम केलं. पण जी प्रतिमा राज-नर्गीस या जोडीची तयार झाली ती कधीच पुसली गेली नाही. आर के बॅनरचे बोधचिन्ह मोठे सुचक आहे. एका हातात व्हायोलिन व एका हातावर नायिका घेवून उभा असलेला नायक. यात नायक अर्थातच राज कपुर तर नायिका नर्गीस आहे हे वेगळं सांगायची गरजच नाही. 

'आह' मधील ‘जाने न जिगर पहचाने नजर’ किंवा ‘आवारा’ मधील ‘मै तूमसे प्यार कर लूंगी’ किंवा ‘श्री 420’ मधील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ किंवा ‘चोरी चोरी’ मधील ‘ये रात भिगी भिगी’ अशी कितीतरी सुंदर गाणी राजकपुर-नर्गीस यांच्यावर चित्रीत झालेली आहे. भारतीय चित्रपटात प्रेम करणार्‍या जोडप्याचे प्रतिक म्हणून राज-नर्गीस यांचेच नाव घ्यावे लागते. देखण्या देव आनंद आणि स्वरूप सुंदरी मधुबालाचे चाहते खुप आहेत. पण त्यांचे एकत्र चित्रपट मात्र लोकांना तेवढे भावले नाहीत. 

नर्गीसला सुरैय्या किंवा नुरजहां सारखा गोड गळा नव्हता. वैजयंती माला किंवा वहिदा रहमान सारखी नृत्यनिपुणता नव्हती. मधुबाला सारखे सौंदर्य नव्हते. पण गीता बाली, नुतन यांच्यासारखी एक सहजता तिच्यात होती. खाली गुडघ्यापर्यंत येणारी काळी पँट, वरती पांढरा अर्ध्या बाह्यांचा शर्ट, छोट्या केसांच्या दोन सुंदर वेण्या, त्याला लावलेल्या रिबीनी आणि समोरच्या तरूण देखण्या राजकपुरला ‘मै तूमसे प्यार करू लूंगी’ असं म्हणणारी नर्गीस. 1952 मध्ये एखादी नायिका नायकाला सरळ सरळ प्रेमाची कबूली देते आहे. हे अतिशय वेगळं होतं. तिचा वेशही वेगळा होता. तिचे आविर्भावही वेगळे होते.
स्वातंत्र्यानंतर सारंच बदललं होतं. 1950 नंतर जगाचे संदर्भ बदलले. जगभरातील अर्ध्याहून अधिक देश नेमके याच काळात स्वतंत्र झाले. मोकळेपणाचे वारे सगळीकडे वाहू लागले. मग स्वाभाविकच नायक आणि नायिकाही आपल्या प्रेमाची उघड उघड कबूली द्यायला लागले. आपले प्रेम जाहिर व्यक्त करू लागले. याच काळात वैजयंतीमालाचे गाणे ‘सैय्या दिल मे आना रे’ बघणार्‍या एैकणार्‍या प्रेक्षकांना राज-नर्गीस जोडीच्या गाण्यांमधून वेगळं आपल्या जवळचं असे काही  मिळत होतं. ‘सैय्या दिल मे आना रे’ हे शमशादचे गाणे. राज कपुरच्या पहिल्या चित्रपटात ‘आग’मध्ये नर्गीस साठी शमशादचाच आवाज वापरला होता. पण नर्गीस, मधुबाला, वैजयंतीमाला, गीताबाली, वहिदा रहमान यांच्यासाठी शमशादचा आवाज शोभत नव्हता. आता लता, गीता, आशा यांचे सुर त्यांच्या तोंडी असलेले लोकांना जास्त भावत होते.
नर्गीसने पडद्यावर राजकपुर सोबत भूमिका निभावल्या पण पडद्यामागे सुनील दत्त सोबत संसार रंगवला. 1958 ते मृत्यूपर्यंत सुनील दत्त सोबत एकनिष्ठ राहून तिनं पत्नीची भूमिका निभावली. पण पडद्यावर मात्र या दोघांची जोडी जमली नाही.
सुनील दत्तचे चित्रपट नर्गीसची कारकीर्द संपल्यावरच्या  काळात जास्त गाजत गेले. विशेषत: बी. आर. चोप्रा सोबत ‘गुमराह’, ‘वक्त’, ‘हमराज’ हे चित्रपट जास्त लोकप्रिय झाले. साहिर सारखा गीतकार, रवी सारखा संगीतकार असल्याने महेंद्रकपुरचा पडेल निर्जीव आवाजही लोकांनी सहन केला. इतकेच नाही तर या गाण्यांना लोकप्रियता लाभली. ‘चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो’,  ‘इन हवाओ मे इन फिजाओ मे’ (गुमराह), किंवा वक्त मधील गद्य कविता वाटावी असे गाणे ‘मैने देखा है फुलो की वादी मे’ किंवा हमराज मधील ‘तुम अगर साथ देने का वादा करो’ हे गाणे. ही सगळी सुनील दत्तची गाणी लोकांना आजही आठवतात.
मदर इंडिया मध्ये नर्गीसने सुनील दत्तच्या आईची भूमिका केली होती. त्यासाठी तिला अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले. मदर इंडियाची गाणीही विलक्षण गाजली. पण या दोन कलाकारांची पडद्यावरची कारकीर्द रेल्वेच्या रूळांसारखी स्वतंत्रपणे समांतरपणे चालत राहिली. आणि उलट संसारिक आयुष्यात मात्र ते एकरूप होवून गेले होते.
सुनील दत्तने एक वेगळाच चित्रपट रसिकांना दिला. एकपात्री प्रयोग नाटकात केलेला आपणांस माहित असेल. पण एकपात्री सिनेमा असू शकतो का? सुनील दत्तचा ‘यादे’ नावाचा असा चित्रपट आहे. त्यात त्याने एकपात्री भूमिका केली आहे. अजूनही असे धाडस कोणी केले नाही.
सुनील दत्त यांचा 1961 मध्ये ‘छाया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सलिल चौधरी यांनी यात एक सुंदर गाणे दिले आहे. ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा के मै एक बादल आवारा’. तलत महमुद/लता  यांच्या आवाजतील या गाण्याचे शब्द आहेत राजेंद्रकृष्ण यांचे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे जगप्रसिद्ध संगीतकार मोझार्टच्या 40 नंच्या सिंफनीचे संगीत या गाण्याच्या सुरवातीला वापरले आहे. भारतीय वा पाश्चिमात्य संगीताचा असा सुंदर संगम फार कमी ठिकाणी ऐकायला मिळतो. हे गाणे सुनील दत्त व आशा पारेख यांच्यावर चित्रित आहे.  
नर्गीस-सुनील दत्त यांच्या आयुष्यातील एक शोकांतिका मोठी विलक्षण आहे. नर्गीस-सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त. त्याचा पहिला चित्रपट रॉकी 1981 मध्ये प्रदर्शित झाला. त्याचा प्रिमिअर 7 मे रोजी होता. नर्गीस कॅन्सरन आजारी होती. 2 मेला ती कोमात गेली. आणि 3 मे 1981 ला तिचे निधन झाले. मुलाच्या पहिल्या चित्रपटाचा प्रिमिअर तिला पाहता आलाच नाही. या प्रिमिअर साठी सुनील दत्तच्या बाजूची एक सीट नर्गीस साठी रिकामी ठेवण्यात आली.
सुनील दत्त यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. कॉंग्रेसच्या वतीने ते मुंबई मधून खासदार म्हणून निवडून आले. मनमोहनसिंग यांच्या पहिल्या मंत्रीमंडळात ते मंत्रीही राहिले. पुढे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी प्रिया दत्त ही पण खासदार म्हणून निवडून आली होती.
‘प्यार हुआ एकरार हुआ’ या गाण्यात शैलेंद्रने याने असे लिहीले आहे

रातो दशोदिशाओसे कहेगी अपनी कहानिया
गीत हमारे प्यार की दोहरायेगी जवानीया
हम ना रहेंगे तूम ना रहेंगे फिर भी रहेंगी निशानिया...

हे गाणे चित्रित करतान राज कपुर-नर्गीस हे पावसात भिजत आहेत. आणि रस्त्यावरून तीन लहान मुले एकमेकांचा हात धरून जात आहेत. लहानपणीचे शशी कपूर, रणधीर कपूर आणि ऋषी कपुर अशी ही लहान मुले आहेत.
पण याचा ढोबळ अर्थ आपले वारस असा नाही. रहेंगी अपनी निशानिया म्हणजे या कलाकारांनी मागे ठेवलेल्या कलाकृती. नर्गीस-सुनील दत्त यांनी आपल्या मागे कितीतरी सुंदर गाणी, चित्रपट ठेवून दिले आहेत. शिवाय दोघांनी धर्मापलिकडे जाणारी प्रेमाची एक सुंदर निखळ गोष्ट आपल्यासाठी मागे ठेवून दिली आहे हे विशेष. नर्गीस आणि सुनील दत्त या दोघांच्याही जयंती निमित्त त्यांची ही आठवण.  
           
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575