Wednesday, April 24, 2019

लोकसभा निवडणुक आणि केतकरांचा खोटारडेपणा !



लोकसभा निवडणुकीची तिसरी फेरी पार पडली. एकूण 302 मतदारसंघात आत्तापर्यंत मतदान झाले. झालेले मतदान एकूण सरासरीपेक्षा जास्त असल्याचे आकडेही एव्हाना हाती आले आहेत. ज्या भागामध्ये मतदानाबाबत शंका होत्या, गोंधळाची शक्यता होती, रक्तपाताची भिती व्यक्त होत होती तिथेही शांततेत मतदान पार पडले. झारखंड, छत्तीसगढ सारखा नक्षली प्रभावी प्रदेश, कश्मिर, पश्चिम बंगाल येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार पूर्वी झालेला होता. या वेळेसे सर्वत्र किरकोळ अपप्रकार वगळता मतदान शांततेत पार घडले.

दोन तृतियांश जागांवर मतदान पार पडले आहे. शक्यता आहे उर्वरीत भागांतही अशाच प्रकारे मतदान होईल. मग  प्रश्‍न उपस्थित होतो कॉंग्रेसचे खासदार आणि एकेकाळचे पत्रकार राहिलेले मा. कुमार केतकर सारख्यांनी निवडणुकाच होणार नाहीत ही भिती कशाच्या आधारावर व्यक्त केली होती? मोदी हुकूमशहा आहेत ते निवडणुका घेणारच नाहीत हा आरोप का केला गेला होता?

2014 ला मोदी निवडुन आल्यानंतर भारतात 27 निवडणुका विधानसभांच्या पार पडल्या. यातील एक तरी निवडणुक दिलेल्या मुदतीपेक्षा लांबली काय? एका तरी निवडणुकीत पूर्वीपेक्षा जास्त हिंसाचार झाला, मतदानाचे प्रमाण अत्यल्प राहिले असे काही घडले का? मग हा आरोप नेमका कोणत्या आधारावर केला गेला?

जम्मु कश्मिरमध्ये तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही या नविन सरकारने घेवून दाखवल्या. कश्मिर विधानसभेची निवडणुक सध्या लांबलेली आहे. इतका एक अपवाद वगळता देशभरात कुठलीही निवडणुक लांबली नाही. कश्मिरात लोकसभेच्या निवडणुका बाकी देशासोबत होत आहेत. अलीकडच्या काळातील कदाचित ही पहिलीच निवडणुक असावी ज्यावेळी संपूर्ण 543 मतदारसंघात निवडणुक होत आहे. मग असला आरोप केतकरांसारखे विद्वान का करतात?

दुसरा एक आरोप असा आहे की पराभव झाल्यावर मोदी सत्ता सोडणारच नाहीत. आता याचा खुलासा प्रत्यक्ष मोदींचा पराभव झाल्यावरच होवू शकेल. पण आत्तापर्यंत ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला तेथील सत्ता भाजपने सोडलीच नाही असे कुठे घडले आहे का? कर्नाटकात भाजपाने अट्टाहासाने सरकार बनवले. मुख्यमंत्री म्हणून येदूरप्पा यांनी शपथ घेतली. पण त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही तेंव्हा महिन्याच्या आतच राजीनामा द्यावा लागला. आणि कुमारस्वामी यांनी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकान बनवून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गेली आठ महिने हे सरकार चालू आहे. स्वत:ला सत्ता भेटावी म्हणून धच्चोटपणा भाजपने केला हा आरोपही मंजूर करू. पण जेंव्हा सभागृहात बहुमत सिद्ध करता आले नाही तेंव्हा मुकाट राजीनामा देवून कुमारस्वामींच्या सत्तास्थापनेचा मार्ग भाजपच्या येदूरप्पांना मोकळा करावा लागला. हे सगळे समोर असताना कुमार केतकर मोदी सत्ता सोडणार नाहीत असा आरोप का करतात?

1975 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यावर केतकर ज्यांची आरती ओवाळतात त्या इंदिरा गांधींनीच सत्ता न सोडता आणीबाणी लादून आपण हुकूमशहा आहोत हे सिद्धच केले होते. त्या इंदिरा गांधींचे आणि विशेषत: आणीबाणीचे समर्थन करणारे कुमार केतकर मोदींवर हुकूमशहा असल्याचा आरोप करतात तेंव्हा मोठी गंमत वाटते.

मोदी पंतप्रधान होणे हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचा आरोप केतकर करतात. खरं म्हणजे मोदी हुकूमशहा आहेत म्हणून तथ्यहीन टीका करणे हाच एक मोठ्या कटाचा भाग आहे की काय अशी शंका आता येवू लागली आहे.

दहा वर्षांपूर्वी केतकरांना ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. सध्याची जागतिक परिस्थिती यावर बोलताना भाषणाच्या शेवटी अचानक एक वाक्य केतकर बोलून गेले. ‘... सध्यातरी जगात एकच माणूस विचार करतो आहे. आणि तो म्हणजे बराक ओबामा.’

ज्याचा किमान अभ्यास आहे अशी कुणीही व्यक्ती  बराक ओबामा यांना विचारवंत म्हणून स्विकारेल का? अमेरिकेत सतत सुमार लोकच अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. त्यातल्या त्यात ओबामा शहाणे असं फारतर म्हणता येईल. मग अशा परिस्थितीत कुमार केतकर बराक ओबामा यांचे कौतूक करताना, ‘... जगात सध्या एकच माणूस विचार करतो आहे’ असं करतात तेंव्हा ते कसे पटणार? असं बोलणं म्हणजे आंतरराष्ट्रीय कटाचा भागच वाटू लागतो. म्हणजे ओबामांचे कौतुक करणे आणि आपल्या देशात लोकशाही मार्गाने मिळालेले पंतप्रधानपद कटाचा भाग म्हणणे हे काय कोडे आहे? 


कालपर्यंत केतकर केवळ पत्रकार होते. त्यामुळे त्यांनी विविध वेळी भाषणांमधून मोदी भाजप संघावर आरोप करणे समजू शकत होतो. पण आता ते सगळ्यात जून्या पक्षाचे राज्यसभेत अधिकृत प्रतिनिधी आहेत. आताही ते केवळ बीनबुडाचे आरोप करत तोंडाची वाफ दवडणार असतील तर त्यांना कुणी गांभिर्याने घेणार नाही. ज्या पद्धतीनं माध्यमे मोदी-भाजपची बाजू घेणे किंवा विरोध करणे असा आंधळेपणा करत आपली विश्वासार्हता गमावून बसले आहेत तसेच केतकरांचे होईल.

लोकसभा निवडणुक म्हणजे एक मोठी संधी केतकरांसारख्या विचारवंतांना होती. भाजप मोदी विरोधात देशभर एक मोठी वैचारिक आघाडी ते उघडू शकत होते.  काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे भाजप संघाला घेरण्याचे काम सहज शक्य होते. तर तेही करण्यात ते कमी पडत आहेत.

केतकरांना ‘सुमार केतकर’ म्हणून जे ट्रोलींग समाजमाध्यमांवर केलं जातं त्यासाठी ते स्वत:च जबाबदार आहेत. आत्तापर्यंत शांततेत पार पडलेल्या निवडणुका हा ‘निवडणुका होणारच नाहीत’, ‘मोदी हुकूमशहा आहेत’ या केतकरांच्या आरोपातील खोटारडेपणाचा मोठाच पुरावा आहेत.   
         
श्रीकांत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
 

Tuesday, April 23, 2019

अल्पेश ठाकोरांनी सोडला कॉंग्रेसचा ‘हात’..


विवेक, उरूस, एप्रिल 2019

गुजरातमधील कॉंग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर यांनी आपल्या दोन सहकारी आमदारांसह (धवलसिंग ठाकोर, भरतजी ठाकोर) कॉंग्रेसचा राजीनामा दिला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसला एक धक्का बसणारी ही बातमी बहुतांश माध्यमांनी दाबून टाकली आहे. त्याचे तसे एक कारणही आहे. अल्पेश ठाकोर सारख्यांना माध्यमांनीच मोठे केले होते. त्यामुळे आपले चुक आकलन ते कशाला जाहिरपणे मांडत बसतील. 

मुळात अल्पेश काही कॉंग्रेसचे कार्यकर्ते नाहीत. पण मोदींच्या अंधविरोधासाठी गुजरात विधानसभा निवडणुकीत माध्यमांनी ज्याला जमेल त्याला हाताशी धरत विरोधी प्रचाराची राळ उडवून दिली होती. गुजरातमधून तीन वेगळे चेहरे तेंव्हा माध्यमांच्या हाती लागले. त्यात दलित चळवळीतून पुढे आलेला जिग्नेश मेवाणी, पाटीदार आंदोलनातील हार्दिक पटेल आणि गुजरात ठाकोर क्षत्रीय सेनेचे अल्पेश ठाकोर हे प्रमुख होते. यातील कोणीच मुळचा कॉंग्रेसी नाही. पण केवळ भाजप विरोध या एका सुत्रात सगळ्यांना बांधून भाजपचा पराभव घडवून आणण्याचा माध्यमांचा हेतू होता. 

भाजप विरोधाच्या या दबावात अल्पेश ठाकोरांच्या गुजरात ठाकोर क्षत्रीय सेना या संघटनेने कॉंग्रेसशी आघाडी केली. कॉंग्रेसच्या चिन्हावर त्यांच्या संघटनेचे तीन आमदार निवडूनही आले. आता स्वाभाविक यांची अपेक्षा होती की ज्या मागण्या यांनी केल्या होत्या त्याची दखल घेतली जावी. पण कॉंग्रेस मुळातच एक ढिसाळ असे संघटन आहे. सत्तेच्या स्वार्थाने ते जोडून ठेवल्या गेलेले दिसत होते.  पण आता सत्ताही नाही. त्यामुळे माणसे जोडून ठेवणे जमेना. 

खरा संघर्ष तेंव्हा सुरू झाला जेंव्हा कॉंग्रेसने पाटीदार आंदोलनाशी जवळीक सुरू केली. हे आंदोलन पटेलांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून पेटलं. ही मागणीच मुळात अल्पेश ठाकोर यांच्या ओ.बी.सी. हीताच्या विरोधी आहे. कारण पटेलांना आरक्षण देण्यासाठी त्यांचा समावेश ओ.बी.सी. मध्ये करावा लागणार. आणि तसे केले तर जे आधीपासून या प्रवर्गात मोडतात त्यांच्यावर अन्याय होणार. आधीच जागा थोड्या. त्यात पटेलांसारखी तगडी जात यात आली तर आपला निभाव लागणार नाही अशी एक भावना इतर मागास वर्गीयांमध्ये निर्माण झाली.

हा केवळ गुजरातचाच प्रश्‍न नाही. सर्वत्र जिथे जिथे शेती करणार्‍या गावगाड्यांतील प्रमुख जाती आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्या तिथे तिथे त्या जाती आणि ओ.बी.सी. यांच्यात एक सुप्त संघर्ष आहे. जसे की महाराष्ट्रात मराठा वि. कुणबी, मराठा वि. माळी असा एक संघर्ष आहे. 

भाजपला विरोध करताना असले परस्पर विरोधी घटक एकत्र आणून एक मोट माध्यमे बांधू पहात होते. त्याचा फायदा राजकीय पक्ष म्हणून कॉंग्रेस घेवू इच्छित होती. आणि त्यांनी तो तसा घेतलाही. पण हे फार काळ टीकणारे नव्हते.

लोकसभेचा बिगुल वाजायला सुरवात झाली तेंव्हा ठाकोर क्षत्रिय सेनेने आपल्या उमेदवाराला लोकसभेत तिकीट मिळावं अशी मागणी केली होती. पण ती काही कॉंग्रेसने स्विकारली नाही. तेंव्हा या संघटनेच्या कार्यकारिणीत कॉंग्रेसला सहकार्य न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस स्वत: अल्पेश ठाकोर हजर नव्हते. त्यांना 24 तासाच्या आत कॉंग्रेस सोडा अन्यथा संघटना सोडा असा ‘अल्टीमेटम’ देण्यात आला. त्याला प्रतिसाद देत अल्पेश ठाकोर यांनी दोन आमदार सहकार्‍यांसह कॉंग्रेसचा राजीनामा देणे पसंद केले. 

एक राजकीय पक्ष म्हणून कॉंग्रेस किंवा भाजप यांची धोरणं काय आणि कशी आहेत हा  स्वतंत्र चर्चेचा मूद्दा आहे. पण माध्यमांनी गेली काही दिवस ‘महागठबंधन’ ची पतंगबाजी सुरू केली होती. त्याच्या अशा रोज चिंधड्या उडत आहेत. ही एक मोठी गंभीर विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

ज्या पद्धतीनं गुजरात विधानसभेत अल्पेश-जिग्नेश-हार्दिक यांना भाजप विरोधी म्हणून मिरवलं गेलं, त्यांचा वापर करून घेतला गेला ते आज लोकसभेच्यावेळी कुठे आहेत? त्याचा पाठपुरावा ही माध्यमांतली पुरोगामी मंडळी का करत नाहीत? हार्दिक पटेल यांच्यावर गुन्हा असल्याने त्यांना निवडणुक लढविण्यास बंदी घातली गेली आहे. जिग्नेश मेवाणी पार बिहारात जावून कन्हैय्या कुमार साठी बेगुसराय मध्ये सभा घेत आहे पण गुजरात मध्ये फिरायला आणि कॉंग्रेसचा प्रचार करायला तयार नाहीत. आणि अल्पेश यांनी तर कॉंग्रेसच सोडली आहे. 

महगठबंधनची पतंगबाजी अजून एका उदाहरणात दिसून आली. उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीत गोरखपुर या योगी अदित्यनाथ यांच्या मतदारसंघात भाजपचा पराभव करून समाजवादी पक्षाचा उमेदवार जिंकला होता. त्याचे नाव होते प्रवीण निषाद. हा काही मुळचा समाजवादी पक्षाचा उमेदवार नव्हता. त्याला या निवडणुकीपुरते उसने घेण्यात आले होते. पाठोपाठ इतरही मतदारसंघात पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. की लगेच महागठबंधनच्या पतंगबाजीस सुरवात झाली होती. आता नेमके लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या प्रवीण निषाद यांनी समाजवादी पक्षातून बाहेर पडून भाजपत प्रवेश केला आहे. आणि तो आता भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढवत आहे. 

अल्पेश ठाकोर भाजपात जातील का हे अजून स्पष्ट नाही. ते तसे जाणार नाहीत असे आपण गृहीत धरू. पण मुळ प्रश्‍न तसाच राहातो की या सगळ्यांना भाजप विरोधी आघाडीत सामील करून घेत असताना भक्कम अशा एखाद्या पक्ष संघटनेने सांभाळून का नाही घेतलं? भाजप निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-नितीशकुमारांचा जनता दल- अकाली दल यांच्याशी जूळवून घेत प्रसंगी पडतं घेत काही जागा जिंकलेल्या सोडत तडजोड करतो आहे. तामिळनाडूत नविन समिकरणं जूळवली जात आहेत. इशान्य भारतात तर अतिशय नव्याने सगळी जूळवाजूळव केली आहे. अरूणाचल प्रदेश मधून एक खासदार बिनविरोध निवडून आणण्यात भाजपला यश मिळाले आहे. 

या पार्श्वभूमीवर प्रमुख विरोधी पक्ष असलेला, गेल्या लोकसभेत 19 टक्के मते मिळवणारा कॉंग्रेस पक्ष कसा वागत आहे? महाराष्ट्राचा अपवाद वगळता अख्ख्या भारतभर कुठेही कॉंग्रेसने समाधानकारक रित्या आपल्या सहकारी पक्षांशी जूळवून घेतलेले नाही. दिल्लीतील आम आदमी पक्षाची तर अशी अवस्था आहे की कॉंग्रेसने त्यांना इतके झुलवले आहे की प्रत्यक्ष अर्ज भरायची शेवटची तारीख निघून गेली आणि आघाडी झालीच नाही. 

अल्पेश ठाकोर यांच्या उदाहरणावरून एक स्पष्ट झालं आहे. निवडणुकीत विरोधकांना हरवण्यासाठी राजकीय तडजोडी केल्या जातात. पण विजय मिळवल्या नंतर तो पचविण्यासाठी अजून जास्त मेहनत करावी लागते. सत्ता जिंकायची असेल तर ठाकोर क्षत्रिय सेनेची जी काही मागणी आहे ती विचारात घेवून कॉंग्रेसने वागायला हवे होते. त्यांच्या उमेदवाराला काही जागा सोडायला हव्या होत्या. प्रसंगी पडतं घेवून आपले राजकीय चातुर्य दाखवायला हवे होते. पण हे काहीच झाले नाही.

आता राजकीय अभ्यासक पुरोगामी पत्रकार विचारवंत यांनी उत्तर द्यायला हवे. एक तटस्थ विश्लेषक म्हणून तूम्ही भाजप-शहा-मोदी-संघाला विरोध करता. पण सोबतच या विरोधासाठी म्हणून कॉंग्रेसचे दोष काय म्हणून झाकून ठेवता? त्यांच्याकडे तटस्थपणे पाहून का नाही विश्लेषण केल्या जात? 

अल्पेश ठाकोर-हार्दिक पटेल यांच्यातील विरोधाचे मुद्दे पत्रकारांना माहित नव्हते का? कन्हैय्या कुमार आणि कॉंग्रेस यांच्यातील विरोध, कन्हैय्या आणि दलित संघटना यांच्यातील ताण तणाव पत्रकारांनी का नाही समजून घेतला? 

ज्या पद्धतीनं 1977 साली कॉंग्रेसला  विरोध करत विविध पक्ष एकत्र आले होते पण ते सगळे आपसांत एक नव्हते. 1989 ला जनता दलाला पाठिंबा देणारे सगळे एकजिनसी एक विचाराचे नव्हते. याच पद्धतीनं आता भाजप विरोधी म्हणून जे कुणी आहेत ते सगळे एकत्र असतील असं का गृहीत धरलं जात आहे? 

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भाजप-कॉंग्रेस विरोधी स्वतंत्र तिसरी आघाडी अशी एक व्यवहार्य संकल्पना मांडली होती. पण डाव्यांनाच कॉंग्रेस प्रेमाचा उमाळा आला होता. ‘आप’लाही कॉंग्रेस शिवाय करमत नव्हते. महाराष्ट्रात शरद पवारांना एक चांगली संधी चालून आली होती. त्यांनी ज्या मुद्द्यावर कॉंग्रेस सोडली व मुख्यमंत्री पद मिळवलं तीच कॉंग्रेस विरोधाची दिशा पकडत या तिसर्‍या आघाडीला बळ देता आले असते.  शरद पवार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नविन पटनायक, जगनमोहन रेड्डी, चंद्रशेखर राव, एम.के.स्टॅलिन, मायावती, अखिलेश अशी एक भक्कम तिसरी आघाडी उभी राहिली असती. प्रत्येकाचे प्रभाव क्षेत्र वेग वेगळे असल्याने मतभेदाचा मुद्दाच नव्हता. आणि पुढे पंतप्रधानपद ज्याच्या त्याच्या संख्येने ठरले असते. पण कॉंग्रेसला सोबत घेण्याचा एक दबाव माध्यमांनी विचित्र पद्धतीनं यांच्यावर टाकला. पुरोगामी विचारवंत कॉंग्रेसचे भाट असल्यासारखे भाजपची भिती दाखवत यांना कॉंग्रेसच्या कळपात खेचत राहिले. परिणामी भाजप विरोधी कुठलीच भक्कम आघाडी उभी राहू शकली नाही. 1971 च्या निवडणुकांत ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांनी आपसांत लढून इंदिरा गांधींना विजय सहज करून दिला होता तशीच ही स्थिती आहे. सगळ्या विरोधी पक्षांनी मिळून मोदींची वाट सोपी करून दिली आहे. 

आज अल्पेश ठाकोर सारखी उदाहरणं समोर येत आहेत. निवडणुक निकालानंतर अजून फाटाफुट विरोधी पक्षांमध्ये दिसून येईल.     
              
श्रीकांत उमरीकर 


जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

Monday, April 22, 2019

खैरे झांबड नको जलील । फक्त हर्षवर्धन जाधव पाटील ॥



औरंगाबाद आणि जालना मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. जालन्यात शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर माजी न्यायधीश त्र्यंबक जाधव (निशाणी कपबशी) उभे आहेत. त्यांना मतदान करा अशी विनंती मी जालन्याच्या मतदारांना करत आहे.

औरंगाबाद शहरात हर्षवर्धन जाधव यांना पाठींबा दिला म्हणून काही जणांनी माझ्यावर टीका केली. त्याचा खुलासा करण्यासाठी हे लेखी आवाहन. गेली 30 वर्षे खैरे औरंगाबाद शहरात आमदार खासदार मंत्री म्हणून सत्ता उपभोगत आहेत. शहराच्या विकास प्रश्‍नांवर वारंवार त्यांच्याकडे लोकांनी आग्रह धरला. नेहमी ते आश्वासनं देत राहिले. प्रत्यक्षात शहराचे प्रश्‍न गंभीर बनत गेले. आता तर परिस्थिती हाताच्या बाहेर गेली आहे. 2013 मध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी मी आंदोलन करून तुरूंगात गेलो. सुटला झाल्यानंतरच्या एबीपी माझावरील जाहिर चर्चेत खा. खैरे यांनी जनतेला नागरी प्रश्‍न सोडविण्याचे आश्वासन दिले होते.  पण खैरे यांनी काहीच केले नाही.
सतत ‘खान पाहिजे की बाण पाहिजे’ असा धर्मांध प्रचार करून सामान्य मतदाराची दिशाभूल केली गेली. औरंगाबाद शहराच्या मतदारांनी मनपा-विधानसभा-लोकसभा सतत सगळं विसरून शिवसेना भाजपलाच पाठिंबा दिला. इतकंच नाही तर मी ज्या भागात राहतो त्या ज्योती नगर भागातून तर शिवसेना नगरसेवक म्हणून सौ. हाळनोर बिनविरोध निवडून गेल्या. मतदारांचे इतके प्रेम लाभूनही त्याची जराशीही उतराई शिवसेना झाली नाही.

त्याचा निषेध म्हणून शिवसेनेला मतदान न करण्याचे आवाहन मी करतो आहे. इम्तियाज जलील हे सुशिक्षीत बुद्धिमान उमेदवार आहेत. पण त्यांनी निवडलेला पक्ष हा धर्मांध आणि मध्ययुगीन बुरसटलेल्या मानसिकतेचा आहे. हा मराठवाडा निजामाच्या जूलमी राजवटीविरोधात लढला आहे. तेंव्हा आम्ही परत त्या रझाकारी मानसिकतेला मत देवू शकत नाही.

कॉंग्रेस हा नेहरू प्रणीत भीकवादी समाजवादी आर्थिक धोरणं राबविणार्‍यांचा पक्ष. सोनिया-राहूल यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाने खुली आर्थिक धोरणं राबविणार्‍या मनमोहनसिंग यांचा पार कचरा करून टाकत त्यांना आपली भीकवादी धोरणं राबविण्यास भाग पाडले. अजूनही त्यांची मानसिकता बदललेली दिसत नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे सुभाष झांबड यांना आम्ही मतदान करू शकत नाहीत.

मतविभागणी होवून जलील निवडून येतील म्हणून दिल्लीत मोदींसाठी शिवसेनेच्या खैरे यांना मतदान करा असे भावनिक आवाहन करण्या येत आहे. मी स्वत: जलील यांचा धर्म मुस्लिम आहे म्हणून त्यांना विरोध करत नाहीये. शेतकरी संघटनेने शेख अन्वर मुसा या मुस्लिम युवकालाच निवडणुक मैदानात उतरविले होते. पण तांत्रिक कारणामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. परिणामी मी (वैयक्तिक पातळीवर. शेतकरी संघटना म्हणून नाही.) जाधवांना पाठिंबा देण्याचे आवाहन करतो आहोत.

हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहिर करताच काही जणांनी माझ्यावर जाधवांशी हितसंबंध जूळलेले आहेत असे वाह्यात आरोप केले आहेत. माझा हर्षवर्धन जाधव यांच्याशी कुठलाही परिचय नाही. त्यांच्याशी आत्तापर्यंत मी कधीही बोललेलो नाही. प्राप्त परिस्थितीत आणि जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यात मला त्यांची उमेदवारी पाठिंबा देण्यालायक वाटली.

या पूर्वीच्या राजकीय कारकिर्दीत हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या चुकांची कुठलीही तरफदारी मी करत नाही. भविष्यातही करणार नाही. प्राप्त परिस्थितीत अपात्र इतर उमेदवार किंवा नोटाला मत देवून आपला लोकशाही अधिकार मर्यादित करण्यापेक्षा हर्षवर्धन जाधव यांच्यासारख्या तरूण अपक्ष उमेदवाराच्या पाठिशी राहणे माझ्या सत्सत् विवेक बुद्धीला पटत आहे. म्हणून तसे आवाहन मी सर्व मतदारांना करतो आहे.

मी काही वाद उकरून काढून चर्चेत राहू इच्छितो आणि त्याचा फायदा घेतो असा बेजबाबदार बेताल आरोप करण्यात आला. त्यांना मी इतकेच सांगू इच्छितो

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही
मेरी कोशीश है की ये सुरत बदलनी चाहीये
मेरे सिनेमे नही तो तेरे सिनेमे सही
हो कही भी आग लेकीन आग जलनी चाहीये
- दुष्यंत कुमार

             
श्रीकांत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
 

Friday, April 12, 2019

पुरोगामी पाढा । भाजपाला पाडा ॥


विवेक, उरूस, एप्रिल 2019

येत्या सार्वत्रिक निवडणुकांत देशभरातील 600 कलाकारांनी भाजपाला पाडण्याचे आवाहन मतदारांना एका पत्रकाद्वारे केले आहे. पुरोगाम्यांच्या पुरस्कार वापसी नंतर या पत्रकाला मोठी प्रसिद्धी माध्यमांनी दिली आहे. यात कोण कोण कलाकार आहेत, त्यांच्या भूमिका काय आहेत, त्यांचा भाजप-संघ, मोदी-शहा यांच्यावर काय आणि कसा राग आहे हे मुद्दे जरा बाजूला ठेवू. पण या निमित्ताने लोकशाहीच्या एका बलस्थानावरच हे लोक घाला घालायला निघाले आहेत त्याची पुरेशी चर्चा झाली पाहिजे. निवडणुक संपूनही जाईल. पण हा विषय मात्र लोकशाहीसाठी कायम महत्त्वाचा आहे. 

1950 ला घटना लागू झाल्यानंतर आपण सार्वत्रिक निवडणुकांची जी पद्धत स्विकारली त्यात एका मतदार संघातून विविध उमेदवारांमधून एक प्रातिनिधीक स्वरूपात निवडल्या जातो. लोकसभेचे 543 मतदार संघ आहेत. म्हणजे 543 उमेदवार प्रतिनिधी म्हणून निवडले जातात. यात इतरांपेक्षा ज्याला किमान 1 मत जास्त मिळाले आहे तो प्रतिनिधी म्हणून निवडला जातो अशी ही पद्धत आहे. ही कितीही दोषास्पद असली तरी हीच पद्धत गेली 65 वर्षे आपल्याकडे चालू आहे. 

उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एक आपण निवडतो. ज्या उमेदवारावर आपला राग आहे, जो  आपल्या दृष्टीने अयोग्य आहे त्याला आपण मत देत नाही. इतकी साधी ही गोष्ट आहे. 

आता एकदा ही पद्धत स्विकारली म्हणजे आपण आवडीचा किंवा त्यातल्या त्यात बरा उमेदवार निवडून देत असतो असा याचा अर्थ निघतो. त्यामुळे प्रत्येक पक्ष अथवा अपक्ष स्वतंत्र उमेदवार मला मत द्या असा आग्रह मतदारांना करत असतो. लोकशाहीत निवडून येण्यासाठी येवढी एकच पद्धत वैध रित्या उपलब्ध आहे. मग जाहिरपणे या उमेदवाराला मते देवू नका अशी मोहिम राबविण्या मागे काय हेतू आहेत? आणि जर असं काही करायचं असेल तर सामान्य मतदार एक साधा प्रश्‍न अशी मोहिम राबविण्यार्‍यांना विचारेन. ‘बाबा रे याला मत द्यायचं नाही हे बरोबर आहे पण मग कुणाला द्यायचं ते तू सांग. तूझा कोणता उमेदवार आहे?’ 

नेमका हाच घोळ सध्या ‘भाजपाला पाडा’ म्हणणारे करत आहेत. मुळात एखाद्याला पाडायचे म्हणजे काय? तर त्याला मते देवू नका. कारण पाडण्यासाठीचे स्वतंत्र असे बटन सध्यातरी इ.व्हि.एम. वर बसविलेले नाही. त्यामुळे जो पर्यंत तूम्ही स्वतंत्र पर्याय देवू शकत नाही तोपर्यंत ‘याला पाडा’ मोहिमेला धार येवू शकत नाही. 

याच मानसिकतेच्या लोकांनी काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून ‘नोटा’ ची मागणी लावून धरली होती. आणि प्रत्यक्षात ती गेली दोन निवडणुका अस्तित्वात आली आहे. याचा काय उपयोग झाला? जे लोक असे म्हणत होते की उभे असलेले सगळेच उमेदवार आम्हाला नको आहेत त्यांना हे विचारायला पाहिजे की तूम्हाला मग पाहिजे तरी काय? 

‘नोटा’च्या मतदारांची संख्या आत्तापर्यंत तरी नगण्य राहिलेली आहे. स्वत:च्या घरातून बाहेर पडून मतदान केंद्रावर जावून नोटाचे बटन दाबणार्‍यांनी आपली हीच सगळी ताकद प्रस्थापित राजकीय पक्ष किंवा अपक्ष उमेदवार यांचे मत परिवर्तन करण्यासाठी किंवा त्यांच्यावर दबाव यावा म्हणून का नाही वापरली? 

आज जे कलावंत, बुद्धिवादी, लेखक ‘भाजपाला पाडा’ म्हणत आहेत त्यांनी गेली 5 वर्षे एखादा राजकीय पर्याय निर्माण करण्यासाठी का नाही प्रयत्न केले? 2014 मध्ये हीच सगळी मंडळी अण्णा हजारेंच्या प्रभावात येवून आम आदमी पक्षाच्या मागे गेली होती. याच सगळ्यांनी देशभर ‘आप’ हाच जणू प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय आहे असे चित्र निर्माण केले होते. आश्चर्य म्हणजे त्याही निवडणुकीत नोटाचा वापर करणारे होते. त्यांनी ‘आप’लाही इतर प्रस्थापित पक्षांसारखेच नाकारले होते. 

या नकार दर्शविणार्‍या माणसांवर सरकार चालत नाही.  टीका करण्यापूरतं, वैचारिक सभांमधून, कार्यशाळांमधून, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिसंवादांतून भाषणं करणं यापुरतं हे नाटक ठीक आहे. 

आज जे मोदींना पाडा म्हणत आहेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांना आधी प्रश्‍न विचारला पाहिजे की तूम्ही पर्याय म्हणून समोर आला होतात. आम्ही तूम्हाला दिल्लीची सत्ता सोपविली होती. त्याचे तूम्ही काय केले?

व्यवहारिक पातळीवर सामान्य लोकांमध्ये मिसळणे, त्यांच्या समस्या समजावून घेणे, त्यासाठी उभ्या आडव्या दिशेने देशभर प्रवास करणे हे सगळं तथाकथित बुद्धिवादी कलाकार विचारवंत लेखक हे विसरूनच गेले आहेत. 1980 नंतर फार मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षांचे (म्हणजे कॉंग्रेसेतर) एनजीओकरण झाले. या लोकांना मोठ्या प्रमाणात माध्यमांमधून प्रसिद्धी मिळायला लागली. यातही डाव्या समाजवादी मंडळींचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ही मंडळी या प्रसिद्धीलाच आपलं मोठेपण मानून भ्रामक समजूत करून घ्यायला लागली. यांना कॉंग्रेसने मोठ्या प्रमाणावर पोसले होते. आता कॉंग्रेसची सत्ता गेल्यावर गेली पाच वर्षे हे व्याकुळ झाले आहेत. निधीचा मुख्य आधारच तुटला आहे. 

2014 च्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात आम आदमी पक्षाचा दणकुन पराभव झाला. यात एकाच उमेदवाराची अमानत रक्कम वाचली. ज्याला सगळ्यात जास्त मते मिळाली होती तो उमेदवार म्हणजे चंद्रपुर मतदारसंघातील शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप. त्यांना सव्वादोन लाख मते मिळाली होती. पण याच्या अगदी विपरित केवळ 75 हजार मते घेवून अमानत रक्कम गमावलेल्या मेधा पाटकरांची जास्त हवा माध्यमांनी निवडणुकीपूर्वी केली होती. ही नेमकी काय मानसिकता आहे? 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-संघ हे धनदांडगे, वर्चस्ववादी, घराणेबाज पक्ष आहेत. यांना सत्तेचा माज आहे. मग उर्वरीत जे काही पक्ष आहेत त्यांच्या पाठीशी हे सगळे महान कलाकार बुद्धिवंत विचारवंत लेखक का नाही उभे राहत? यांनी पत्रक काढून या पैकी त्यांना जे उमेदवार योग्य वाटतात त्यांना आपला पाठिंबा का नाही दिला? असं केलं असतं तर यांचे हेतू स्वच्छ आहेत हे लक्षात आले असते. पण यांनी केवळ ‘भाजपाला पाडा’ असा एक कलमी कार्यक्रम घेवून आपले हेतू शुद्ध नाहीत, लोकशाही निकोप बनविण्याचे नाहीत हेच सिद्ध केले आहे.

भाजप संघाला विरोध करण्याच्या  10 टक्केही आवेश हे लोक वंचित बहुजन आघाडी, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांच्यावर चांगले उमेदवार देण्यासाठी दबाव म्हणून का दाखवत नाहीत? किंवा या सगळ्या कलाकारांनी मिळून प्रतिक म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागत (कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ) एक असे 6 उमेदवार उभे केले?

पण हे यांनी केले नाही. इतकेच नाही जे कुणी लेखक कलावंत बुद्धिवादी विचारवंत आहेत ते नियमित मतदान करतात की नाही हे का नाही तपासले? सुशिक्षीत म्हणवून घेणार्‍या लोकांमध्ये मतदानाचे प्रमाण कमी असल्याचे सतत आढळून येते. यावर हे शहाणे लोक बोट का नाही ठेवत? नेहमी ग्रामीण भागात मतदान जास्त असते पण उलट शहरी भागात मतदान तुलनेने कमी किंवा फार तर तेवढेच आढळते. नसरूद्दीन शहा, अमोल पालेकर, कोंकणा सेन शर्मा, अनुराग कश्यप यांनी आपल्या राहत्या भागातील बुथवर जावून 100 टक्के मतदान झालेच पाहिजे यासाठी काय आग्रह धरला?

हे लोक ढोंगी आहेत म्हणून यांची फारशी दखल सामान्य जनता घेत नाही. केवळ माध्यमं यांना प्रसिद्धी देतात म्हणून हे असा एक भास निर्माण करतात की यांनी उपस्थित केलेला मुद्दा किती महत्त्वाचा आहे आणि त्याला लोकांमध्ये किती मोठा पाठिंबा आहे. विविध नायक नायिकांनी सतत प्रस्थापित पक्षांकडून तिकीट घेवूनच निवडणुका लढवल्या आहेत. दक्षिणेतील अभिनेते ज्या प्रमाणे स्वतंत्र पक्ष स्थापून सक्रियपणे राजकारणात उतरतात तसे काहीच या कलाकारांनी केले नाही. या सोबतच येणारा पुढचा गंभीर आरोप म्हणजे ज्या नट नट्यांनी राजकीय पक्ष स्थापन केले त्यांनी तरी असे काय वेगळे राजकारण सिद्ध करून दाखवले?  

केवळ कुणाला पाडा असा संदेश घेवून जाणे हे लोकशाहीला घातक आहे. या सोबतच सक्षम पर्याय समोर ठेवावा लागतो. या कलाकारांच्यापुढे जात राज ठाकरे यांनी दिवाळखोरपणा केला आहे. त्यांचा तर स्वतंत्र राजकीय पक्ष असताना त्यांनी निवडणुकाच न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. इथपर्यंतही ठीक होते. पण ते आता भाजप विरोधी सभा घेत निघाले आहेत. त्यांना कुणीतरी विचारायला पाहिजे की भाजपाला मते देवू नका हे ठीक आहे पण मग कुणाला मते द्यायचे ते तरी सांगा? शिवाय तूम्ही 13 वर्षांपासून राजकीय पक्ष चालवत आहात तूम्हाला समर्थ पर्याय का नाही उभा करता आला? 13 वर्षातच गुजरातमधून बाहेर पडून मोदी देशाचे पंतप्रधान बनले होते ना.  तूमच्यापेक्षा मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला महाराष्ट्रात जास्त मते मिळतात. ही मते म्हणजे तूमच्या विश्वासार्हतेवर सामान्य मतदारांनी लावलेली थप्पड आहे. असे कुणीतरी खडसावून राज ठाकरेंना सांगायला हवे.

‘भाजपला पाडा’ असा एकच पाढा जर हे पुरोगामी घोकत राहिले तर लोक यांनाच राजकीय दृष्ट्या बेदखल करतील यात शंका नाही. या पूर्वी आम आदमी पक्षाला भारतभर झटका मिळालेलाच आहे. पण यातून शहाणपण शिकायचे नसेल तर त्याला कुणी काही करू शकत नाही.  
            
श्रीकांत उमरीकर 


जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

Monday, April 8, 2019

कॉंग्रेस, डावे आणि ‘हात’ तोडा !!


विवेक, उरूस, एप्रिल 2019

ही निवडणुक कुणाच्या फायद्याची किंवा तोट्याची असेल त्याचा निकाल 23 मेलाच लागेल. पण त्यापूर्वी डावे मात्र तोटा झाल्या प्रमाणे आरोप करत सुटले आहेत. आणि त्याचे मुख्य कारण भाजप संघ नसून कॉंग्रेस आहे. डाव्यांचे चिन्ह आहे विळा हातोडा. पण मतदानापुर्वीच कॉंग्रेसने आपल्या हाताने डाव्यांचा हातोडा मोडला आहे.

भाजप विरोधी एक मोठी आघाडी भारतभर तयार करण्याच्या हालचाली कर्नाटकातील निवडणुकांनंतर सुरू झाल्या. यात डाव्यांना भरोसा वाटत होता की भाजप संघाच्या भितीने कॉंग्रेसवाले नरम पडतील. मग आपण त्यांच्या सोबत आघाडी बनवूत. या आघाडीत इतरांचे अडथळे होते पण त्यांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. कॉंग्रेसवाले आपलं ऐकतीलच. त्यांच्याही भवितव्याचा प्रश्‍न आहे. 

भाजप विरोधी महागठबंधनला ममता, चंद्राबाबू, मायावती, अखिलेश, चंद्रशेखर राव यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्याच. दिल्लीत केजरीवाल यांना स्वत: कॉंग्रेसनेच झिडकारले. पवारांनी महाराष्ट्रात, देवेगौडांनी कर्नाटकात, स्टॅलिन यांनी तामिळनाडूत आणि लालूंनी बिहारात  कॉंग्रेसला आपल्या सोबत घेत तडजोड केली. स्वाभाविकच डाव्यांना असं वाटत होतं की आपल्यालाही या महागठबंधनच्या गाडीत जागा मिळेल. पण तसं काही घडलं नाही. कॉग्रेससोबत तडजोड करणार्‍या पवारांनी डाव्यांना मात्र खड्यासारखे बाजूला ठेवले. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीची जागा त्यांना दिली नाही. लालूप्रसादांनी बिहारात कन्हैय्याला पाठिंबा देण्याचे नाकारले. 

पश्चिम बंगालात तर डाव्यांची विचित्र पंचाईत झाली. भाजप ममता तर हाडवैरी. उरली फक्त कॉंग्रेस. तर तिथेही कॉंग्रेसने डाव्यांसोबत आघाडी करायला नकार दिला.  मागल्या लोकभेत डाव्यांना पश्चिम बंगालात फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. उलट कॉंग्रेसला त्यांच्या दुप्पट म्हणजे 4 जागा मिळाल्या होत्या. पश्चिम बंगालातील कॉंग्रेसच्या लोकांनी डाव्यांना सोबत घेण्यास नकार देत सर्वच जागा लढवायची तयारी दाखवली. या भूमिकेमुळे डावे हताश झाले. 

खरा बॉंबगोळा टाकला राहूल गांधी यांनी. अमेठी सोबतच त्यांनी केरळातील वायनाड मतदारसंघातून निवडणुक लढवायचे जाहिर केले. आता मात्र डाव्यांचा संताप संताप झाला. केरळ हा त्यांचा शिल्लक शेवटचा गढ आहे. भारतभर भाजप विरोधी सर्व असे वातावरण असताना केरळात मात्र डावी आघाडी विरोधी कॉंग्रेस आघाडी अशी लढाई आहे. पण ही लढाई मित्रत्वाची असावी अशी एक भाबडी स्वप्नाळू अपेक्षा डाव्यांची होती. 

ए.के.अँटोनी सारख्या ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्याला केरळात आपला नेमका शत्रू कोण हे माहित होते. राहूल गांधींनी  केरळातून निवडणूक लढवावी अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. त्याला प्रदेश कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकार्‍यांनी, कार्यकर्त्यांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. आता ही जागा नेमकी कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू यांच्या सीमेवरची आहे. या जागी मुस्लिम लीगचा उमेदवार कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेला आहे. त्यांनी राहूल गांधींना सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. 

देशभरात भाजपशी लढाई असताना राहूल गांधींनी डाव्यांविरूद्ध तलवार कशाला उगारली अशी मांडणी वृंदा करात, सिताराम येच्युरी, प्रकाश करात हे नेते करत आहेत. या त्यांच्या तक्रारीत अजून एक छूपा अर्थ दडलेला आहे. मुस्लिम लीगची जागा राहूल गांधी लढवणार आहेत. मुस्लिम ख्रिश्‍चनांचा प्रभाव असलेल्या मतदार संघातून ते निवडून आले तर त्याचा दूसरा परिणाम असा होईल की हिंदू मते भाजपकडे ढकलले जातील. या मुद्द्याचा भाजप आपल्या फायद्यासाठी जोरदार प्रचार करेल. काठावरची हिंदू मतेही तिकडे खेचली गेली तर त्याचा फटका डाव्यांनाच बसेल. तामिळनाडू आणि केरळात भाजपचा जोर नाही. पण कर्नाटकात आहे. आधीही भाजपने तिथे चांगली बाजी मारलेली आहे. राहूल गांधींच्या ख्रिश्‍चन मुस्लिम मतदारसंघात मते मिळविण्याचा फायदा भाजपला कर्नाटकात चांगला मिळू शकतो. 

डाव्यांची दुहेरी खेळी अशी होती की कॉंग्रेस सोबत युती झाल्यास आपल्या जागा वाढतील. भाजप विरोधी कुणालाच बहुमत मिळाले नाही तर आपल्याच्या पाठिंब्याशिवाय कॉंग्रेसला सरकार बनविता येणार नाही. मग आपण परत 2004 प्रमाणे आपल्या अटींवर नविन सरकारला नाचवू.  

आता अडचण अशी आहे की देशभरात भाजप आघाडी विरूद्ध कॉंग्रेस प्रणित आघाडी विरूद्ध प्रादेशिक पक्ष विरूद्ध सपा बसपा विरूद्ध डावे अशी लढत आहे. याचा प्रादेशिक पक्षांना आपल्या आपल्या बालेकिल्ल्यात बर्‍यापैकी फायदा होवू शकतो. प्रत्येकी 10-15 खासदार निवडून आले तरी खुप झाले. त्याचा उपयोग करून बहुमत हुकलेल्या पक्षाशी सौदेबाजी करता येऊ शकते. पण डाव्यांची मात्र ही स्थिती नाही. त्यांचे सध्या देशभरात केवळ 9 खासदार आहेत. आणि केरळ शिवाय आता कुठलेच राज्य प्रभाव क्षेत्र म्हणून शिल्लक राहिलेले नाही. 

दुसरा एक तोटा लक्षात आल्याने असेल कदाचित त्यांचा संताप होतो आहे. ज्यांना भाजपवर राग आहे तो मतदार सरळ कॉंग्रेसकडे किंवा उपलब्ध असलेल्या प्रादेशिक पक्षाकडे जाईल. तो मतदार डाव्यांकडे वळण्याची शक्यता नाही. म्हणजे जे काही पानिपत 2014 मध्ये झाले होते त्याच्यापेक्षाही भयानक स्थिती या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. खासदार निवडून येणे तर दूरच पण मतेही किती मिळतील ही शंका आहे. पहिल्यांदाच मान्यताप्राप्त पक्ष म्हणून जी मते मिळायला हवी (एकूण मतदानाच्या 4 टक्के) ती पण मिळतील की नाही याची भिती वाटते आहे. महागठबंधन ची पतंगबाजी जाऊ द्या पण किमान कॉंग्रेस सोबत आघाडी झाली असती तरी पक्ष म्हणून देश पातळीवर मान्यता टिकावी इतकी मते पदरात पडली असती. 

डाव्यांची ही एक नेहमीच शोकांतिका राहिली आहे की त्यांना स्वत: होवून काहीच करायचे नाही. निवडणुकीत मेहनत घ्यायची नसते.  यांनी समाजवादी विचार पहिल्यांदा नेहरूंच्या डोक्यात घुसवून पाहिला. डाव्यांमधले समाजवादी तर कॉंग्रेस पक्षात गेलेही. कम्युनिस्टातले डांग्यांसारखे लोक तर कॉंग्रेसची बी टीम म्हणून टिकेचे धनी झाले. त्यांच्यावर टिकेची झोड उठविणारे, त्यांना पक्षातून काढून टाकणारे आता कॉंग्रेसकडे युतीसाठी भीक मागत आहेत. हा काळाने उगवलेला सुडच म्हणावा लागेल. 

1984 ला देशभर इंदिरा गांधींच्या हत्येमुळे सहानुभूतीची लाट होती. महाराष्ट्रात कॉंग्रेस 48 पैकी 47 जागा लढवित होती. केवळ एकच जागा कॉं. डांगेंची मुलगी रोझा देशपांडे यांच्यासाठी सोडली होती. त्या जागेवर त्यांच्या विरूद्ध कामगार नेते दत्ता सामंत उभे होते. मधु दंडवते (राजापुर), शरद पवार (बारामती), साहेबराव पाटील डोणगांवकर (औरंगाबाद) आणि दत्ता सामंत (मुंबई) या चारच जागा विरोधकांच्या निवडून आल्या. बाकी सर्व 44 जागा कॉंग्रेसने जिंकल्या होत्या. तेंव्हा गुरूदास कामत सारख्यांनी कडवट पणे विधान केले होते की रोझा देशपांडेंची जागा आम्ही उगीच सोडली. तिथेही पंजा चिन्ह असले असते तर कुणीही उमेदवार निवडून आला असता. व्यवहारिक पातळीवर हे खरंही होते की काय म्हणून डाव्यांना कॉंग्रेसने पाठिंबा देवून मोठे करावे?

केरळ, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या तिन्ही राज्यांत त्यांचा मुख्य शत्रू कॉंग्रेसच राहिला आहे. यात कुठेही भाजपचा  संबंध नव्हता. उलट या डाव्यांबाबत नरम भूमिका घेतल्यानेच आपले नुकसात होते आहे. त्रिपुरा त्याचे जिवंत उदाहरण आहे.  याचा व्यवहारिक  पैलू म्हणजे डाव्यांचा आणि कॉंग्रेसचा मतदार एकच असल्याने त्यांनी आपसात युती करून स्वत:चे नुकसान का करून घ्यावे? त्यामुळे साहजिकच कॉंग्रेसच्या हाताने डाव्यांचा हातोडा तोडून टाकला. 

निवडणुकीत प्रत्यक्ष जास्तीत जास्त उमेदवार उभेच करावे लागतात. त्यासाठी केवळ चर्चा करून काहीच होत नाही. डाव्यांच्या राजकारणाचा सगळा भर जमिनीवरचे राजकारण करण्यापेक्षा चर्चेवरच राहिला आहे. आज इतके नुकसान होवूनही डझनभर डावे कम्युनिस्ट एक होवून एक बलवान मजबूत कम्युनिस्ट पक्ष का तयार करत नाहीत? या विविध डाव्या पक्षांमध्ये असे कोणते वैचारिक मतभेदाचे मुद्दे शिल्लक राहिले आहेत? 

काहीतरी आत्मनाशाची बीजेच कदाचित या विचारसरणीत असावीत. भारतासारख्या लोकशाही देशात काही काळ यांना लोकांनी आपलेसे केले. काही राज्यांमध्ये दीर्घकाळ सत्ता बहाल केली. केंद्रातही अप्रत्यक्षरित्या सत्ता देवून यांना संधी दिली. पण डाव्यांनी संधीची मातीच केली. कॉंग्रेसवाले व्यवहारी आहेत. त्यांनी युती तोडून डाव्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. पूर्णत नविन मांडणी, सर्व डाव्या पक्षांचे एकत्रिकरण, जनआंदोलनाची नविन भाषा असं केल्याशिवाय डाव्यांना काही भवितव्य भारतीय लोकशाहीत आहे असे दिसत नाही.   
(छायाचित्र सौजन्य सा. विवेक)

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Friday, April 5, 2019

एक ‘गरिब’ झेलू बाई दोन ‘गरिब’ झेलू... !


दैनिक महाराष्ट्र टाईम्स, २ एप्रिल २०१९ 
प्रसिद्ध व्यंगचित्रकार अजीत नैनन यांचे एक व्यंगचित्र आहे. खेड्यातील एका झोपडीसमोर गरिबांसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थेचे (एन.जी.ओ.) प्रतिनिधी उभे आहेत. उघडं नागडं पोर त्यांच्याकडे पाहून आपल्या बापाला विचारतं

‘हे काय करतात?’
‘ते गरिबांसाठी काम करतात.’
‘अशानं काय होतं?’
‘त्यांची गरिबी दूर होते.’

गरिबांसाठीच्या योजनांवर या व्यंगचित्राइतकं मार्मिक भाष्य दूसरं नाही. 

आपल्याकडे सगळ्या गरिबांसाठीच्या योजना ह्या राबविणार्‍यांची गरिबी दूर करण्यासाठीच आहेत.

मूळात गरिब गरिब हा खेळ कधी सुरू झाला? दुसर्‍या महायुद्धाच्या काळात सैन्यासाठी अन्न पुरवणे हा एक मोठा जिकीरीचा विषय होता. त्यासाठी इंग्रजांनी आपल्याकडे रॅशनिंग व्यवस्था सुरू केली. ही व्यवस्था म्हणजे या ‘गरिब’ खेळाची सुरवात मानता येईल. पुढे स्वातंत्र्यानंतरही ही योजना बंद झाली नाही. कारण गरिबांना धान्य पुरवणे यात इतरांचे मोठे हीत सामावलेले होते. त्यामुळे ‘गरिबांचे कल्याण हेच आमचे हीत’ हे बिरूद लावत हा कारभार सुरूच राहिला. त्यासाठी ‘लेव्ही’च्या नावाखाली शेतीचे अधिकृत शोषण सुरू झाले.  

1965 च्या हरितक्रांतीनंतर जगभरातून अन्नधान्याचा तुटवडा हा विषय जवळपास संपून गेला. शिल्लक राहिला तो विषय म्हणजे या अन्नधान्याचे वाटप. त्यातील त्रृटी आजही आहेत. परिणामी मेळघाट सारख्या अदिवासी भागांत कुपोषणाची बळी आढळतात. (आता त्यांचे प्रमाण कमी झाले आहे.)

सगळ्याच राजकीय पक्षांचा हा गरिबीचा खेळ अतिशय आवडता आहे. 1971 ला इंदिरा गांधींनी गरिबी हटाव ची घोषणा दिली. विरोधकांची खिल्ली उडवताना इंदिरा गांधींनी याचा चपखल उपयोग करून घेतला. ‘मै केहती हू गरिबी हटाव, वो केहते है इंदिरा हटाव.’ सोशल मिडिया नसण्याच्या त्या काळातही इंदिरा गांधींचा हा प्रचार वार्‍यासारखा पसरला आणि त्यांना दोन तृतियांश इतके बहुमत संसदेत मिळाले. तेंव्हापासून ‘गरिबी’ हे निवडणुकीतलं चलनी नाणे बनले. 

पुढे आलेले जनता पक्षाचे सरकारही याला अपवाद ठरले नाही. मोहन धारिया तेंव्हा व्यापार मंत्री होते. त्यांनी कांद्याची निर्यात रोखली. परिणामी भारतात कांद्याचे भाव कोसळले. शेतकर्‍यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. चाकणला प्रचंड मोठा रास्ता रोको झाला. शासनाच्या कांदा धोरणाच्या मुळाशी ‘गरिबांना कांदा स्वस्त हवा.’ हीच मानसिकता होती.

आज इतक्या वर्षांनंतरही हीच परिस्थिती कायम आहे. गरिबांच्या नावाने राजकारण करण्याला प्राधान्य मिळत राहिले आहे. संपुआ-1 च्या काळात डाव्या पक्षांच्या पाठिंब्याावर मनमोहन सरकार सत्तेवर आलं. त्या काळात मनरेगा सारख्या योजना राबविण्यात आल्या. अन्नसुरक्षेच्या नावाखाली सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेला बळकटी देण्यात आली. या दोन्हीमुळे ‘गरिबी’ चे राजकारण जोरात सुरू झाले. मूळात प्रश्‍न असा उभा राहतो की गेली 50 वर्षे आपण मोठ्या प्रमाणात गरिबीचे राजकारण करतो आहोत मग गरिबी संपत का नाहीये? गरिबीचा उगम कुठे आहे? 

1980 पासून शेतकरी चळवळीनं आग्रहानं हे कटू सत्य पुढे आणलं की भारतातील कोरडवाहू शेती ही गरिबीचा सगळ्यात मोठा कारखाना आहे. आणि या कोरडवाहू शेतीची सतत उपेक्षा करण्याचे अधिकृत धोरण शासन राबवत आहे. परिणामी गरिबी दूर करण्याची भाषा करत असताना ती कायम राहिली पाहिजे असंच धोरण राबविल्या गेले आहे.

गरिबी कायम स्वरूपी रहावी याचे काही एक राजकीय फायदे मिळत आलेले आहेत. कारण गरिबांसाठी काही तरी करतो आहोत हे दाखवत राहणे हे आपल्या सगळ्या समाजालाच आवडते. सरकार तर सोडाच पण खासगी संस्थांनाही गरिबांसाठी काही तरी करण्याचे दाखविण्यात विलक्षण रस असतो. नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांना पैश्याची मदत केली. त्याला मोठी प्रसिद्धी माध्यमांनी दिली. पण कुणीही असा प्रश्‍न विचारला नाही की या विधवांना उपजिविकेसाठी दूसरा काही मार्ग कामयस्वरूपी उभारून देण्यासाठी का नाही प्रयत्न केल्या गेले? नाम फाउंडेशनला लाखा लाखाचे धनादेश देणार्‍यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या घरात किमान एक नौकरी/ रोजगार/ छोटा उद्योग व्यापार उभारून देण्याची जाबाबदारी का नाही घेतली? 

जळगांवचे डॉ. सुनील मायी यांनी भिकार्‍यांच्या प्रश्‍नावर मोठे संशोधन करून आपला अभ्यास मांडला आहे. त्यांचा एक निष्कर्ष मोठा धक्कादायक आहे. भिक मागण्यापेक्षा भिक देणार्‍यांची ती जास्त गरज असते असा तो धक्कादायक निष्कर्ष आहे. हिंदू, जैन आणि इस्लाम या धर्मांमध्ये दानाला महत्त्व असल्याकारणाने भिकार्‍यांची संख्या जास्त आहे. या उलट शीख, बौद्ध आणि क्रिश्चन यांच्यात भीकेला जराही स्थान नाही. परिणामी या धर्मांमध्ये भिकारी आढळत नाही. हे निरीक्षण अतिशय नेमके असे आहे. शीखांनी गरिबांची व्यवस्था आपल्या लंगरमध्ये करून दिली. किमान काम पण त्यांच्या हाताला मिळवून दिले. भगवान गौतम बुद्धांनीही आपल्या धर्मात अशा भिकार्‍यांना जागा ठेवली नाही. 

म्हणजे भीक ही मागणार्‍यापेक्षा देणार्‍याची गरज आहे हे एकदा लक्षात घेतले म्हणजे ‘गरिबी’चा खेळ खेळण्यात कुणाला जास्त रस आहे हे सहजच उमगून येते. 

सगळे राजकीय पक्ष गरिबांच्या भावनांशी निवडणुकांच्या निमित्ताने खेळत असतात. कारण त्यांना त्यांचा राजकीय ‘उल्लू’ सिधा करून घ्यायचा असतो. तसेच नौकरशाहीला या योजना राबविण्यात प्रचंड रस असतो. कारण या योजनांमध्ये ‘मलिदा’ मिळण्याची शक्यता जास्त असते. मनरेगाचे उदाहरण ताजे आहे. जेंव्हापासून हे पैसे मजूरांच्या खात्यात सरळ जमा होणार असा निर्णय घेण्यात आला तेंव्हापासून सर्वत्र ही योजना राबविण्यातील नौकरदारांचा ठेकेदारांचा रसच संपून गेला. 

गरिबीचे राजकारण करण्यात डाव्यांना आधिपासून प्रचंड रस राहिलेला आहे. मनरेगाचे समर्थन करणारे गरिबाला रोजगार मिळावा असा मुद्दा पुढे मांडतात. ते या प्रश्‍नाचे उत्तर देत नाहीत की आज कुठल्याही तालूक्याच्या ठिकाणी खुल्या बाजारात मजूरीचा दर किमान 250 रूपये होवून बसला आहे. जेा की मनरेगाच्या दरापेक्षा जास्त आहे. मग तूम्ही हे मनरेगाचे राजकारण का पुढे रेटत अहात? गरिबांसाठी सगळ्यात मोठा रोजगार हा शेतीतच उपलब्ध आहे. मग त्या शेतीची उपेक्षा करून गरिबी हटावचा कार्यक्रम कसा काय यशस्वी करता येईल? बहुतांश गरिब हे शेतीशी निगडीत आहेत. मग तो जे अन्नधान्य पिकवतो त्याच अन्नधान्याच्या रॅशनिंगच्या योजना त्यांच्या माथी का मारल्या जातात? 

शहरातील गरिब झोपडपट्टीवासी हा खेड्यातून स्थलांतर करूनच आलेला वर्ग आहे. मग त्याला त्याच्या शेतीतून हुसकावून लावल्यावर परत त्याची काळजी म्हणून या ‘गरिबीच्या’ योजना राबविल्या जातात. 

महात्मा गांधी असे म्हणायचे की गरिबांसाठी काही करण्यापेक्षा गरिबाच्या छातीवरून आधी उठा. सध्या हीच परिस्थिती आहे. गरिबांच्या छातीवर सरकारी धोरणं अशी बसली आहेत की त्यांना ती उठू देत नाहीत. परिणामी गरिब हा गरिबीतून बाहेर येवू शकत नाही. 

कुठल्याही अर्थशास्त्रज्ञाने गरिबाच्या खात्यात सरळ पैसे जमा करण्याचे योजनेचे शास्त्रीय भाषेत समर्थन करून दाखवावे. ही गोष्ट अर्थशास्त्रात बसतच नाही तीचा गौरव अमर्त्यसेन यांच्यापासून रघुराम राजन सारखे लोक करतात तेंव्हा अर्थशास्त्राचे किमान ज्ञान असणारा कुणीही अवाक होतो. भारत हा देश समाजशास्त्रज्ञांच्या तोंडाला पाणी सुटणारा आणि अर्थशास्त्रज्ञांच्या डोळ्यात पाणी आणणारा देश आहे असं म्हणतात ते यामुळेच पटतं 

गरिबी दूर करण्याचा राजमार्ग शेती विरोधी कायदे खारीज करणे, ग्रामीण भागात किमान संरचनांचे सुविधांचे जाळे निर्माण करणे, शेतीला उद्योगाचा दर्जा देवून तिच्या मार्गातील अडथळे दूर करणे हाच आहे. सगळ्यात जास्त लोकसंख्या सामावून घेण्याचे सामर्थ्य फक्त शेतीतच आहे. 40 टक्क्यांच्या जवळपास लोकसंख्या शहरात आली तर शहरांची सगळी व्यवस्था कोलमडून पडली आहे. अजून माणसं शहरात आली तर काय होईल? आणि शहरातील स्थलांतरे ही गरिबांचीच जास्त आहेत. हे लक्षात घेतले तर ग्रामीण भागाची शेतीची उपेक्षा ही आता न परवडणारी बाब आहे हे लक्षात येईल.   

(व्यंगचित्र सौजन्य दैनिक महाराष्ट्र टाईम्स) 

श्रीकांत उमरीकर 


जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

Thursday, April 4, 2019

सुफी : हिंदू-मुस्लिम जोडणारा रेशमी धागा


संबळ, अक्षरमैफल, एप्रिल 2019

औरंगाबाद शहरात जिथे औरंगजेबाचा राजवाडा होता (होता म्हणायचे कारण आता केवळ अवशेष शिल्लक आहेत) त्या किलेअर्क  परिसरात नौबत दरवाज्या जवळ कबरस्तानात एक छोटी मजार आहे. बाकी सगळ्या उजाड वातावरणात ही छोटीशी वास्तू वेगळी उठून दिसते. गालिबच्याही आधी ज्यांनी उर्दूत पहिली गझल लिहीली त्या वली औरंगाबादी सोबतचा शायर सिराज औरंगाबादी याची ही कबर आहे. या सिराजची एक गझल आजही जगभरचे कव्वाल गातात. पाकिस्तानातले कराचिचे कव्वाल फरिद्दूदिन अय्याज व अबु मुहम्मद यांच्या सारख्यांनी लोकप्रिय केलेल्या या गझलेचे शब्द आहेत

खबर-ए-तहव्वूरे इश्क सून 
न जूनू रहा न परि रही
न तो तू रहा ना तो मै रहा
जो रही सो बेखरी रही

सिराजचा काळ (1712-1763) हा तसा अलीकडचा काळ. सिराज यांनी चिश्ती संप्रदायाचे सुफी संत शाह अब्दुर्रहमान यांच्या पासून दिक्षा घेतली होती. याच्याही पेक्षा जूनी रचना अमीर खुस्रो (1253-1325) ची ‘मै निजाम से नैना लडायी रे’ ही पण हे कव्वाल गातात. अमीर खुस्रो ख्वाजा निजामोद्दीन औलिया यांना आपला गुरू मानत. तेंव्हा उर्दू भाषा जन्मलेलीच नव्हती. तेंव्हा अमीर खुस्रोने आपल्या रचना त्या काळातील बोली असलेल्या ‘खडी बोली’ मध्ये केल्या आहेत. 

इस्लामचा भारतात जो प्रवेश झाला तो क्रुर राज्यकर्त्यांमुळे झाला असा गैरसमज बाळगला जातो. पण प्रत्यक्षात असे नाही. इस्लामचा सगळ्यात पहिला ठळक संदर्भ प्रत्यक्ष मुहम्मद पैगंबरांच्या हयातीतलाच आहे. केरळचा राजा चेरामन हा मक्केत गेला आणि त्याने इस्लाम स्विकारला. पैगबरांच्या नात्यातील मुलीशी लग्न केले (भाची किंवा पुतणी). परत येत असताना वाटेतच त्याचे निधन झाले. भारतीय किनार्‍यावर त्याची नाव लागल्यानंतर त्याच्या राणीने या राजाच्या स्मृतीत प्रार्थना स्थळ उभारण्याचे ठरवले. भारतातील ही पहिली मस्जिद (आणि जगातील दुसरी) केरळात आहे जिचे नाव ‘चेरामन जामा मस्जीद’ असेच आहे. जिचे तोंड पश्चिमेस नसून हिंदू पद्धतीप्रमाणे पूर्वेलाच आहे. शिवाय इथे रोज हिंदू पद्धतीप्रमाणे दिवाही लावला जातो. 

जालंधर येथील इमाम नसिरूद्दीन (इ.स. 945) आणि डाक्का येथील अल कादर (इ.स.951) या सुफी संतांच्या कबरी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आगमनाच्या कितीतरी आधीच्या आहेत. 

सर्व सुफी संतांमध्ये सगळ्यात जास्त ज्यांना लोकप्रियता लाभली ते चिश्ती संप्रदायाचे संत म्हणजे अजमेर येथील ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती (इ.स. 1192). हजरत मुहोम्मद पैगंबरांपासून सुफींमधील चिश्ती संप्रदायाची सुरवात होते असे मानले जाते. पैगबरांना पहिले ख्वाजा मानले जाते. मोईनोद्दीन चिश्ती हे 17 वे ख्वाजा होते. 

सुफींचे चार प्रमुख संप्रदाय आहेत. 1. चिश्ती 2. सुर्‍हावर्दी 3. कादरी 4. नक्क्षबंदी.

महाराष्ट्रीय परंपरेत सुफी संतांचे एक मोठे योगदान राहिले आहे. (या लेखाची मर्यादा महाराष्ट्रातील सुफींपुरती आहे)

महाराष्ट्रात पहिला संदर्भ सुफी संतांचा मिळतो तो औरंगाबाद जिल्ह्यात. डोणगांव येथे समाधिस्त असलेले संत नुरूद्दीन हे महाराष्ट्रातील पहिले सुफी संत. संत एकनाथांचे गुरू संत जनार्दन स्वामी हे देवगिरीच्या किल्ल्याचे किल्लेदार होते. या जनार्दन स्वामींचे गुरू म्हणजे चांद बोधले. हे चांद बोधले सुफींच्या कादरी परंपरेतील होते. चांद बोधले हे सुफी परंपरेतील हिंदू संत. ते दत्तसंप्रदायी होते. वारकरी संत शेख महंमद यांचे वडिल राजे महंमद हे ग्वाल्हेरच्या कादरी परंपरेतील सुफी संत होते. हे राजे महंमद हे चांद बोधले यांचे गुरू. याच चांद बोधलेंचे दोन शिष्य म्हणजे संत जनार्दनस्वामी (संत एकनाथांचे गुरू) आणि शेख महंमद.   

चांद बोधले यांनी सुफी संप्रदाय स्विकारला म्हणून त्यांची समाधी बांधण्यास हिंदू तयार नव्हते. तर त्यांनी इस्लाम स्विकारला नसल्या कारणाने मुसलमान त्यांच्या कबरीसाठी पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीत संत जनार्दन स्वामींनी  आपल्या अधिकारात गुरूची समाधी बांधली. ही समाधी देवगिरी किल्ल्याच्या अगदी समोरच आहे. सध्या ही समाधी दुर्लक्षीत अवस्थेत आहेत. कमानी भक्कम असल्यातरी एका बाजूची भिंत ढासळायला लागली आहे. छताचा काही भाग कोसळला आहे.

चांद बोधलेंचे दूसरे शिष्य म्हणजे शेख महंमद. शेख महंमद हे वारकरी संप्रदायातील संतकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. पण हे मुलत: सुफींच्या कादरी परंपरेतील आहेत. शेख महंमदांचे मुळ घराणे बीड जिल्ह्यातील धारूरचे. शेख महंमद यांच्या लिखाणात वारकरी संप्रदायातील अद्वैतमत, नाथ संप्रदायातील योगसाधना आणि सुफीमत असा तिन्हींचा संगम आहे. शेख महंमदांच्या रचनांचा अभ्यास वारकरी मंडळीत होत राहिलेला आहे. 

मुसलमानात होऊनिया पिरू । 
मराठियांत म्हणती सद्गुरू ।
तोचि तारील हा भवसागरू ।
येर बुडोन बुडविती ॥

अशा सुबोध प्रसादिक शब्दरचनेत आपले मनोगत शेख महंमदांनी मांडून ठेवले आहे. 

सर्व महाराष्ट्री सुफी संतांमध्ये सर्वात जास्त प्रभाव मराठी मनावर अजूनही टीकून आहे तो शेख महंमद यांचा. शेख महंमद यांनी आपल्या सुफी कादरी परंपरेचा वारकरी संप्रदायाशी संयोग घडवून आणला आणि एक सुंदर अशी साहित्य निर्मिती झाली. ‘ज्ञानयाचा एका, नामयाचा तुका आणि कबीराचा शेका’ अशी एक सुंदर म्हणच आहे. ज्ञानेश्वरांची तत्त्वज्ञान सांगण्याची परंपरा एकनाथांनी चालवली, नामदेवांच्या काव्यगुणांचा वारसा तुकारामांमध्ये सापडतो त्या प्रमाणेच कबीराच्या निर्गूणाची परंपरा शेख महंमद मध्ये आढळते. 

शेख महंमदांनी आपल्या काळांतील मुसलमान राज्यकर्त्यांनी ज्या प्रकारे हिंदू मंदिरांचा विद्धंस केला त्यावर अतिशय परखडपणे कोरडे ओढले आहेत. ते लिहीतात

अनिवार पंढरी । अविनाश श्रीहरी ।
वाहीन अंतरी । व्यापुनि अलिप्त ॥
मूर्ती लपविल्या । अविंधी फोडिल्या ।
म्हणती दैना जाल्या । पंढरीच्या ॥
अढळ न ढळे । ब्रह्मादिकां न कळे ।
म्हणती आंधळे । देव फोडिले ॥
चराचरीं अविट । गुप्त ना प्रकट ।
ओळखावा निकट । ज्ञानचक्षे ॥
हरि जित ना मेे । आले ना ते गेले ।
हृदयांत रक्षिले । शेख महंमद ॥

या शेख महंमदांची समाधी श्रीगोंदा येथे आहे. 

सुफींच्या चिश्ती परंपरेतील 21 वे ख्वाजा बुर्‍हानोद्दीन गरीब व 22 वे ख्वाजा जैनोद्दीन चिश्ती यांच्या समाध्या खुलताबाद येथे आहेत. बुर्‍हानोद्दीन गरीब यांच्या जवळच पहिले निजाम मीर कमरूद्दीन यांचीही कबर आहे. या बुर्‍हानोद्दीन गरीब यांच्या दर्ग्यात कव्वाली गायनाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. आजही खुलताबादला या दर्ग्यात देश विदेशातून कव्वाल येवून आपली हजेरी लावून जातात. 

21 वे ख्वाजा बुर्‍हानोद्दीन गरीब यांच्या नंतरचे 22 वे ख्वाजा म्हणजे जैनोद्दीन चिश्ती. औरंगजेब यांना आपले गुरू मानायचा. आपल्या मृत्यूनंतर आपल्याला याच गुरूच्या सान्निध्यात पुरावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली होती. त्याप्रमाणे आलमगीर औरंगजेबाची कबर याच जैनोद्दीन चिश्ती दर्ग्यात आहे. या दर्ग्यात गायनाला बंदी आहे. इथे कव्वाली गायली जात नाही. 

अजेमरच्या ख्वाजा मोईनोद्दीन चिश्तीच्या उरूसानंतर भारतातील सगळ्यात मोठा उरूस मराठवाड्यात परभणी येथे भरतो. सुफी संत हजरत तुरूत पीर हे कादरी परंपरेतील संत आहेत. यांनी रामदासांच्या मनाच्या श्लोकांचा ‘मन समझावन’ नावाने दखनी भाषेत अनुवाद केलेला आहे. 

जून्या हैदराबाद संस्थानात गुलबर्गा रायचूर बीदर हे कर्नाटकातील तीन जिल्हे समाविष्ट होते. महाराष्ट्राला लागून असलेल्या या परिसरात बीदर येथील बादशहा शहा मुंतोजी ब्राह्मणी (इ.स. 1575-1650) हे ‘मृत्युंजय स्वामी’ या नावाने ओळखले जातात. हे कादरी परंपरेतील सुफी संत होत. 

शाह मुतबजी ब्रह्मणी । 
जिनमे नही मनामनी ।
पंचीकरण का खोज किये ।
हिंदू-मुसलमान येक कर दिये ॥ 

अशी त्यांची रचनाच प्रसिद्ध आहे. 

सुफी संतांचे महाराष्ट्रात विविध स्मृती स्थळे आहेत. त्या ठिकाणी उरूस भरतात. या दर्ग्यांमधून कव्वालीच्या रूपाने संगीत परंपरेचेही जतन केले जाते. ही पीरांची ठीकाणं हिंदूंचीही श्रद्धास्थळे आहेत. याचे सर्वात मोठे उदाहरण महाराष्ट्राची अस्मिता असलेले शिवाजी महाराज यांच्या बाबतीतच आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांनी पुत्र प्राप्तीसाठी शाह शरीफ दर्ग्यात नवस बोलला होता. हा दर्गा अहमद नगर येथील भिंगार परिसरात आहे. पुत्र झाल्यास त्याचे नाव पीरावरून ठेवले जाईल असा तो नवस होता. पुढे मालोजी राज्यांच्या पत्नी दीपाबाई यांच्या पोटी दोन पुत्र जन्मले. या दोघांची नावे शाह शरीफ दर्ग्याच्या नावावरून शाहजी आणि शरीफजी अशी ठेवण्यात आली. या दर्ग्याला उत्पन्नासाठी दोन गावे इनाम दिल्याची कागदपत्रे मराठा रिसायतीत सापडली आहेत. छत्रपती शाहूंपासूनची काही कागदपत्रेही उपलब्ध आहेत. 

इस्लामच्या भारतातील आगमनांनंतर तीन गोष्टीत ठळकपणे इस्लाम-हिंदू परंपरेचा मिलाप झाल्याचे दिसून येते. त्यातील सगळ्यात जूने संदर्भ सुफी संगीत आणि साहित्याचे आहेत. इस्लामच्या जगातील इतर भागांतील संगीतापेक्षा भारत उपखंडातील संगीत वेगळं आढळून येतं. सुफी साहित्याचीही समृद्धी भारतात सगळ्यात जास्त आहे.

दुसरी ठळक बाब म्हणजे स्थापत्य. इस्लामी राज्यकर्त्यांनी मंदिरं पाडून मस्जिदी बनविल्या याची शेकडो हजारो उदाहरणं आहेत. पण या सोबतच या परिसरात ज्या काही नविन वास्तू उभारल्या त्या अतिशय अप्रतिम अशा आहेत. ताजमहाल सारख्या वास्तू ज्यांच्या कळसावर कमळाच्या फुलांसारखी हिंदू प्रतिकं कोरली आहेत ही अतिशय ठळक अशी उदाहरणं आहेत. ताजमहाल नव्हे तेजोमहाल म्हणत पोरकटपणा करणार्‍यांनी हे समजून घेतलं पाहिजे बिहार मधील शेरशहा सुरींचा मकबरा (इ.स.1545), दिल्लीतील हुमायून मकबरा (इ.स.1572), औरंगाबादचा बिबी का मकबरा (इ.स.1678) आणि जूनागढच्या नवाबाचा मकबरा (इ.स.1892)अशी किमान चारशे वर्षांची एकाच पद्धतीचे मकबरे बांधण्याची परंपरा मुसलमान राज्यकर्त्यांची आहे. ताजमहाल या मालिकेतील सर्वात सुंदर अशी निर्मिती आहे (इ.स. 1648). तेंव्हा आरोप करताना त्यातील तथ्य समजून घेतलं पाहिजे. हिंदू पद्धतीत गर्भगृह कधीच प्रशस्त भव्य असे बांधले जात नाही. ते आधीपासून लहान कमी उंचीचे असे राहत आले आहे. (अपवाद वेरूळचे कैलास लेणे. पण ते पारंपरिक अर्थाने मंदिर म्हणून पूजा होत नाही.) या उलट मुसलमानी मकबर्‍यांमध्ये आतील मोठ्या जागेत कबर असते. खांब कमानी अशा कितीतरी बाबी इस्लामी स्थापत्याची वैशिष्ट्ये आहेत.  

परंड्याच्या (जि. उस्मानाबाद) किल्ल्यातील मस्जिद तर जगातील एकमेव अशी हिंदू पद्धतीचे खांब आणि छत असलेली मस्जित असावी. ही मस्जिद म्हणजे मंदिर तोडून त्याचे खांब वापरून बांधलेली नाही. गुलबर्ग्याचा बहामनी सुलतान  याचा वजीर महमुद गवान याने या परिसरातील हिंदू कारागिरांना आमंत्रित करून खास बांधून घेतली आहे. इस्लामला मानवी आकृत्या मंजूर नाही म्हणून खांबांवर किंवा इतरत्र कुठेही मानवी शिल्प नाहीत. बाकी सर्व कलाकुसर हेमाडपंथी मंदिरांतील खांबांप्रमाणेच आहे.  

इस्लामवर हिंदूंचा ठळक प्रभाव असलेली तिसरी गोष्ट म्हणजे उर्दू भाषा. ही भाषा दिल्लीत जन्मली. इस्लामला विरोध करणार्‍यांना हे लक्षात येत नाही उर्दू ही कुठल्याही मुसलमानी प्रदेशात जन्मलेली भाषा नाही. भारतीय उपखंड वगळता ही भाषा कुठल्याही इस्लामी देशात बोलली जात नाही. या भाषेच्या पूर्वी दक्षिणेतील सुफी संतांनी ‘दखनी’ भाषेत तर उत्तरेतील संतांनी ‘खडी बोलीत’ रचना केल्या आहेत. त्या मोठ्या प्रमाणात उपलब्धही आहेत. 

आज  इस्लामचे कट्टरपंथी अनुयायी हा सुफी उदारमतवादी प्रवाह थांबवायला निघाले आहेत. भारतातील बहुतांश मुसलमान हे सुफी प्रभावातील आहेत. तेंव्हा त्यांच्या या भावनेची बूज ठेवत आपण हे सुफी संगीत, सुफी अध्यात्म आणि स्थापत्याच्या रूपाने ही सौंदर्यवादी परंपरा जतन केली पाहिजे. कारण यातून आपल्याच संस्कृतीचे प्रगल्प पैलू जगासमोर येत गेले आहेत.

(लेखातील छायाचित्र बुऱ्हानोद्दिन गरीब दर्गा, खुलताबाद)

(या लेखासाठी संदर्भ खालील पुस्तकांतून घेतले आहेत. अभ्यासकांनी ही पुस्तके जरूर वाचावीत.)
1. सुफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन/ डॉ. मुहम्मद आजम/ पद्मगंधा पुणे 
2. इमारत/ फिरोज रानडे/ मौज मुंबई
3. मुसलमान (सूफी) संतांचे मराठी साहित्य/ डॉ. यु.म.पठाण/ म.रा.साहित्य संस्कृती मंडळ मुंबई
4. मुसलमान मराठी संतकवी/ रा.चिं.ढेरे/पद्मगंधा पुणे
5. दखनी भाषा-मर्‍हाटी संस्कृतीचा एक आविष्कार/श्रीधर रंगनाथ कुलकर्णी/राज्य मराठी विकास संस्था, मुंबई.  
     


श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575