उरूस, 24 जून 2021
उसंतवाणी- 88
(प्रशांत किशोर शरद पवारांना मुंबईला येवून भेटले आणि आज 22 जून रोजी 15 पक्षांच्या नेत्यांची शरद पवारांसह ते दिल्लीत भेट घेत आहेत. यातील कुठलाच नेता खासदार संख्येच्या दृष्टीने हेव वेट नाही. म्हणूनच याची टिंगल केली जात आहे.)
‘किशोर’ बळाने । काका मारी उड्या ।
उठल्या वावड्या । दिल्लीमध्ये ॥
रांगत्या बाळाची । जशी बाबा गाडी ।
तिसरी आघाडी । मोठ्यांची ही ॥
डंगरे बैल नी । भाकड गायींचा ।
बोलण्या सोयीचा । वृद्धाश्रम ॥
लोहियां पासून । चालू आहे खेळ ।
जमला न मेळ । अजूनही ॥
जनता दलाचे । कित्येक तुकडे ।
शरीर लुकडे । राजकिय ॥
दीड दिस राज्य । शिराळ शेटचे ।
औट घटकेचे । तैसेची हे ॥
कांत बिनकामी । कुच्चर हा वट्टा ।
राजकिय थट्टा । चालू आहे ॥
(22 जून 2021)
उसंतवाणी- 89
(शरद पवारांच्या घरी कॉंग्रेसतर भाजपेतर विरोधी पक्षांची एक बैठक बोलविण्यात आली होती. तिला कुठलाच मोठा नेता उपस्थित राहिला नाही. मग घुमजाव करत ही यशवंत सिन्हांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंच या अराजकिय संघटनेची बैठक होती असे घोषित करण्यात आले. एकुणच सारा बार फुसका निघाल्याचे स्पष्ट झाले.)
पवारांच्या घरी । यजमान सिन्हा ।
वाजवितो कान्हा । का बांसरी? ॥
फिरकला नाही । नेता मोठा अन्य ।
शुन्यापाशी शुन्य । शुन्य होयी ॥
सिन्हांचे खेळणे । ऐसा ‘राष्ट्रमंच’ ।
गणंगांचा संच । कुचकामी ॥
बुडाला बेडुक । उडाला कावळा ।
काकांचा आगळा । डावपेच ॥
काकांची ही भाषा । नर वा कुंजीर ।
पाठीत खंजीर । खुर्चीसाठी ॥
गाढवही गेले । गेले ब्रह्मचर्य ।
सारे हतवीर्य । मोदीपुढे ॥
कांत शोभतसे । संन्यास आश्रम ।
गाठीभेटी श्रम । कशासाठी? ॥
(23 जून 2021)
उसंतवाणी- 90
(उत्तर प्रदेश मध्ये मुक बधीर दिव्यांग, गरीब कुटुंबातील तरूण मुली यांचे लालच देवून धर्मांतर करण्याचे प्रकरण समोर आले. एक दोन नव्हे तर 2 हजार इतक्या मोठ्या संख्येने हे धर्मांतर करण्यात आले. या बाबत उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.)
मुक बधीरांचे । केले धर्मांतर ।
प्रदेश उत्तर । प्रश्न झाला ॥
गावा गावातील । कुटुंब हेरून ।
दिव्यांग तरूण । बाटविले ॥
मुळात हे लोक । बुद्धिनेच अधु ।
अमिशाचा मधु । चाखविला ॥
पैसा नि नौकरी । जागा दिली पॉश ।
केले ब्रेनवॉश । एक एक ॥
कायद्याने सारे । सुजाण वयात ।
गुन्हा नाही यात । सिद्ध होई ॥
पालक बिचारा । मोकलून रडे ।
कानामध्ये दडे । समाजाच्या ॥
कांत म्हणे जाणा । जागतिक कट ।
करू कडेकोट । बंदोबस्त ॥
(24 जून 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575