Wednesday, June 9, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग २५



उरूस, 9 जून  2021 

उसंतवाणी- 73

(आर.बी.आय. ने सहकारी बँकांवर नियंत्रण आणले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकिय सहकार लॉबी अस्वस्थ झाली आहे. शरद पवारांनी तातडीने सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन केला. त्याला या संबंधात तातडीने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.)

आर.बी.आय.ने । आवळला फासा ।
सहकारी मासा । तडफडे ॥
जाणूनिया वर्म । दिल्ली करी वार ।
घायाळ प‘वार’ । कासावीस ॥
सहकारी बँका । मार्केट कमिट्या ।
दूध सोसायट्या । साम्राज्यं ही ॥
आणि कारखाने । संस्था शैक्षणिक ।
तिंबती कणीक । राजकीय ॥
ऐसी दहा तोंडे । रावणाची जरी ।
नाभी ‘सहकारी’ । जाणा खरी ॥
त्यावरी अचूक । मर्मभेदी बाण ।
राजकीय घाण । साफ होवो ॥
‘कांत’ सहकार । पिकलेले गळु ।
आता लागे गळू । तेची बरे ॥
(7 जून 2021)

उसंतवाणी- 74

(महाविकास आघाडीत धुसफुस चालू आहे. कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार चालविणे आमची जबाबदारी नाही असे सांगून टाकले आहे. उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत अशी पवारांची तक्रार आहे.)

आघाडीच्या पोटी । बिघाडीचे यंत्र ।
लबाडीचे मंत्र । ओठावर ॥
काकाच लावती । नरडीला नख ।
जन्मदाता चोख । घात करी ॥
नाही गरजेचा । बाहेरून हल्ला ।
आतूनच किल्ला । ढासळतो ॥
पाच वर्षे नाही । टिकू दिले कधी ।
मुख्यमंत्री पदी । कुणालाच ॥
दुसर्‍या पक्षाचा । असो की स्वत:चा ।
करी लेचापेचा । नेतृत्वाला ॥
पाच वर्षे टिकू । हमी छातीठोक ।
बुरूजाला भोक । आघाडीच्या ॥
जनहिता पायी । वापरावी सत्ता ।
यांना नाही पत्ता । कांत म्हणे ॥
(8 जून 2021)

उसंतवाणी- 75

(पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना मोफत लस केंद्र देणार असल्याची घोषणा केली. तसेच 80 कोटी लोकांना दिवाळीपर्यंत धान्य पुरविणार असल्याचेही सांगितले. सातत्याने केंद्राच्या नावाने खडे फोडणारे विविध राज्यांतील विरोधी पक्षांची यामुळे खरी गोची झाली. आधी सांगितले विकेंद्रीकरण करा, मग आपत्ती व्यवस्थापन जमले नाही म्हणून ओरड सुरू केली आता सगळे केंद्रानेच हाताळले पाहिजे. आता केंद्रच सर्व ताब्यात घेणार आहे.)


मोफत राशन । मोफतच लस ।
करी ठसठस । विरोधक ॥
आधी म्हणे हवी । राज्यांना लिबर्टी ।
केंद्र करी डर्टी । पॉलिटिक्स ॥
केंद्र देई मग । संपूर्ण स्वातंत्र्य ।
जमेनाच तंत्र । आरोग्याचे ॥
दुसर्‍या लाटेचा । बसला दणका ।
तुटला मणका । व्यवस्थेचा ॥
केंद्रावर सारे । दिले ढकलून ।
मागे बोंबलून । मदत ही ॥
विरोधाच्यासाठी । केवळ विरोध ।
द्वेष मळमळ । ओठी पोटी ॥
कांत केंद्र राज्य । हवे हाती हात ।
करोनाला मात । देण्यासाठी ॥
(9 जून 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Sunday, June 6, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग २४



उरूस, 6 जून  2021 

उसंतवाणी- 70

(लॉकडाउन उठणार की नाही यावर एक घोळ प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि दुसरे मंत्री विजय वडेट्टीवर यांच्या विरोधी वक्तव्यातून पुढे आला. तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री यांचीही वक्तव्यं अशीच आली.)

एक म्हणे चालू । एक म्हणे बंद ।
गोंधळाचा छंद । आघाडीला ॥
सांगे मुख्यमंत्री । त्या उलट मंत्री ।
लावुनिया ‘संत्री’ । बोलती का? ॥
प्रशासनावर । पकड हो सैल ।
जू सोडूनी बैल । चाललेले ॥
ढकलली पोरे । न घेता परिक्षा ।
आघाडीची रिक्षा । तैसी चाले ॥
दोन मंत्री गेले । एक वाटेवर ।
काय खाटेवर । कुरकुरे ॥
‘सिल्व्हर’ भेटीचे । चमके पितळ ।
चाले खळबळ । मातोश्रीला ॥
‘कांत’ या सत्येचा । अनैतिक पाया ।
लागला ढळाया । तोल हिचा ॥
(4 जून 2021)

उसंतवाणी- 71

(विधानपरिषदेवर नेमायचे 12 आमदार अजून अडकूनच पडले आहेत. राज्यपालांशी विनाकारण घेतलेल्या पंग्याने महाविकास आघाडी सरकार स्वत:च अडचणीत सापडले आहे.)

राजकिय डाव । उलटला सारा ।
आमदार बारा । अडकले ॥
आढ्याला टांगले । शिंकोळ्यात लोणी ।
हातावर कोणी । देईचीना ॥
रोकले विमान । केला अपमान ।
दिली उगा मान । हातामध्ये ॥
अस्वस्थ खडसे । आणि राजू शेट्टी ।
दोघांचिही शिट्टी । वाजविली ॥
गप्प राज्यपाल । ऐसे कोशियारी ।
दावी होशियारी । नियमांची ॥
आशेला लागले । पुरोगामी सारे ।
लाचारी पाझरे । लेखणीतूनी ॥
कांत परिषद । करा बरखास्त ।
भ्रष्ट गड ध्वस्त । बांडगुळी ॥
(5 जून 2021)

उसंतवाणी- 72

(आशुतोष मिश्रा यांनी टाईम्स नाउच्या चर्चेत सेंट्रल विस्टा प्रकल्पाला ‘मोदी मकबरा’ अशी असभ्य भाषा वापरली. ज्या पद्धतीने कोरोना आपत्तीत देशाची बदनामी करण्याची मोहिम मोदि विरोधात हाती घेतली गेली आहे ती संपूर्णत: निषेधार्ह आहे. )

निर्लज्ज होवूनी । बोले चराचरा ।
‘मोदी मकबरा’ । लिब्रांडू हा ॥
चॅनल चर्चेचा । कुच्चर हा वट्टा ।
रोज ऐसी थट्टा । नॅशनल ॥
राजस्थानामध्ये । चाले बांधकाम ।
कराया आराम । आमदारा ॥
त्यावरती नाही । बोलती भाडोत्री ।
मालकाची कुत्री । भुंकणारी ॥
स्मारकास जागा । सरकारी पैसा ।
कॉंग्रेसचा ऐसा । डाव असे ॥
समाजवादाचे । रूप हे सर्कारी ।
लुटते तिजोरी । जनतेची ॥
कांत ढोंगावर । मोदी करी घाव ।
चाले काव काव । पुरोगामी ॥
(6 जून 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Thursday, June 3, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग २३




उरूस, 3 जून  2021 

उसंतवाणी- 67

(नविन संसद भवनाच्या बांधकामावर आक्षेप घेणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली शिवाय याचिका कर्त्या पुरोगाम्यांना 1 लाखाचा दंड ठोठावला.  )

नविन संसद । भवन विरोधी ।
याचिकेची व्याधी । उपटली ॥
कोर्टाने ठोठला । एक लाख दंड ।
पुरोगामी भंड । थंड सारे ॥
हजारो कोटींचा । ‘मोदिका महेल’ ।
फेक न्यूज खेळ । चालविला ॥
खासदार संख्या । वाढणार पुढे ।
सर्व आराखडे । भविष्याचे ॥
सर्व कार्यालये । एका जागी मेळ ।
वाचे पैसा वेळ । कमालीचा ॥
कॉंग्रेसी निर्णय । सेंट्रल वीस्टाचा ।
विरोध कशाचा? । आज चालू ॥
‘कांत’ न्यायालये । काम केले छान ।
उपटले कान । लिब्रांडूंचे ॥
(1 जून 2021)

उसंतवाणी- 68

(ऑनलाईन शाळा, बैठका, चर्चा सगळंच चालू आहे. पण त्याचा एक कंटाळा सर्वत्रच आढळतो.)


कॅमेरा हो बंद । स्पीकरही म्युट ।
ऐसे सारे झुठ । ऑन्लाईनी ॥
झुम मिटविते । भेटण्याची आस ।
भेटल्याचा भास । उरे फक्त ॥
कमी जास्त गती । चालतसे नेट ।
काळजाला थेट । भिडेचीना ॥
ऑनलाईनने । पोरे केली ऑफ ।
उत्साहाची साफ । शक्ति गेली ॥
जगाने दाबले । पॉज चे बटन ।
कधी मी सुटेन । वाटतसे ॥
सदोदीत घाला । तोंडावरी मास्क ।
अवघड टास्क । माणसाला ॥
कांत लागे ब्रेक । जगाच्या गतीला ।
तोंड द्या स्थितीला । संयमाने ॥
(2 जून 2021)

उसंतवाणी- 69

(शेजारील मुस्लीम देशांतील धार्मिक अल्पसंख्यकांना नागरिकत्व देण्याचा विषय परत ऐरणीवर आला. गृह मंत्रालयाने यासाठी अर्ज मागवले. त्याला पीएफआय आणि मुस्लीम लीग यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. परत परत हाच विषय समोर आणून तीच तीच चर्चा घडवून आणली जात आहे. )

धर्माच्या नावाने । ज्यांचे हो शोषण ।
त्यांना आमंत्रण । भारतात ॥
हिंदू बौद्ध शीख । जैन नी पारसी ।
क्रिश्‍चन जनांसी । छळिले गा ॥
बांगलादेश नी । अफगाणिस्तान ।
आणि पाकिस्तान । खेळ करी ॥
मुसलमानांचा । नाही समावेश ।
दावूनी आवेश । विचारे जो ॥
अल्पसंख्यकांचे । जगणे बत्तर ।
आधी द्या उत्तर । याचे तूम्ही ॥
कुराणा मधील । वगळा आयत ।
वाढे दहशत । ज्यांच्यामुळे ॥
कांत म्हणे हवे । कडक धोरण ।
दाखवा सरण । धर्मांधांना ॥
(3 जून 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Monday, May 31, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग २२


 

उरूस, 31 मे 2021 

उसंतवाणी- 64

(26 जानेवारी 2021 ला लाल किल्ल्यावर जो दंगा झाला त्यातील 18 आरोपींवर दिल्लीतील तिस हजारी कोर्टात चार्जशीट पोलिसांनी दाखल केली आहे. या गुन्हेगारांचे समर्थन करणारे अकाली दल आणि किसान युनियन चे नेते कार्यकर्ते देशद्रोह्यांचा बचाव करता करता अडचणीत सापडले आहेत. )

ज्यांनी केले होते । लाल किल्ला दंगे ।
त्यांना केले नंगे । कायद्याने ॥
कोर्टात दाखल । झाली चार्जशीट ।
कटाची ती नीट । कुंडलीच ॥
तिरंग्याचा केला । ज्यांनी अपमान ।
आवळा ती मान । कायद्याने ॥
म्हणूनी किसान । त्यांना पुन्हा पुन्हा ।
झाकताती गुन्हा । देशद्रोही ॥
पोलिसांच्यावर । करोनिया हल्ला ।
कृषीहित कल्ला । खोटा खोटा ॥
ट्रॅक्टर आमुचा । आहे म्हणे टँक ।
मांडिला आतंक । दिल्लीमध्ये ॥
‘कांत’ मिळाला हा । भक्कम पुरावा ।
मातीत पुरावा । देशद्रोह ॥
(29 मे 2021)

उसंतवाणी- 65

(पंतप्रधान मोदींनी चक्रिवादळाच्या नुकसानी संदर्भात एक बैठक पश्चिम बंगालात बोलावली होती. खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या त्याला 30 मिनीटे उशीरा आल्या आणि 15 मिनिटांत काही एक कागदपत्रे सादर करून निघूनही गेल्या. त्यांच्या सोबत राज्याचे मुख्य सचिव अलपन बंधोपाध्याय हे पण उशीरा आले. राज्यशिष्टाचाराचा भंग उघड उघड केल्या गेला.  )

ममतांचा चाला । राजकिय दंगा ।
प्रोटोकॉल ठेंगा । दाविती हा ॥
पंतप्रधानांची । असू दे मिटिंग ।
माझी ही सेटींग । वेगळीच ॥
माझ्यासाठी माझे । राज्य हाची देश ।
पुसून प्रवेश । करा इथे ॥
बोलभांड ऐसे । नेमले प्रवक्ते ।
गाती माझी सुक्ते । भक्तिभावे ॥
मीच संपविले । कॉंग्रेस नी डावे ।
फुर्फुराचे दावे । शुन्य केले ॥
भाजपा रोकले । शंभराच्या आत ।
सुरू ऊतमात । ‘कांत’ म्हणे ॥
लोकशाहीमध्ये । माजती जे दैत्य ।
वैध बंदोबस्त । त्यांचा करू ॥
(30 मे 2021)

उसंतवाणी- 66

(महाराष्ट्रातील लॉकडाऊन उठविण्यासंदर्भात एक फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांच्या भाषणांत काहीच अर्थपूर्णता नव्हती. शिवाय निर्णय तर कुठलाच घेतला नाही. ‘माहित्या’, ‘आपत्या’ असे शब्द वापरून आपले भाषेबाबतचे गाढ अज्ञानच त्यांनी उघड केले. )

फेसबुकवरी । चालते लाईव्ह ।
दिशा ना ड्राईव्ह । नाही दिसे ॥
बोलताना वाटे । केवळ पुतळा ।
धन्य शब्दकळा । गोल गोल ॥
घरात बसून । हाकतो शकट ।
असू दे बिकट । परिस्थिती ॥
कोकणचा केला । वेगे वेगे दौरा ।
जागेवर भौरा । फिरे जैसा ॥
पंधरा दिसांनी । वाढले निर्बंध ।
गोत्यात सबंध । व्यवसाय ॥
का बरे लाईव्ह । केला अट्टाहास ।
काहीच ना खास । सांगितले ॥
कांत बोलताना । अडकते गाडी ।
जनतेची नाडी । गवसेना ॥
(31 मे 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Friday, May 28, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग २१



उरूस, 28 मे 2021 

उसंतवाणी- 61

(कॉंग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीला एक ट्विट केले. त्यात राहूल गांधी आणि राजीव गांधी यांचे फोटो आहेत आणि असं लिहिलं आहे की ‘किंग ऑफ डेमोक्रसी’. ही जी गुलामीची मानसिकता आहे त्यावर मग बरीच टीका झाली. )

सल्मान खुर्शीद । करितसे ट्विट ।
गाली लावा तिट । राहूलच्या ॥
राजीव नंतर । राहूलच राजा ।
वाजवा रे बाजा । अंगणात ॥
कॉंग्रेसी भाट हे । बोलती जोशात ।
राजस वेशात । लोकशाही ॥
वारसाचा हक्क । आहे गादीवर ।
बाकीचे चाकर । भोवताली ॥
राहूल हा ‘किंग’ । त्यालाच मुजरे ।
राज्यात हुजरे । जागजागी ॥
पटेलांनी केली । संस्थाने खालसा ।
तरिही वारसा । सांगती हे ॥
‘कांत’ शरिरात । गुलामीचे रक्त ।
लोकशाही फक्त । देखावाच ॥
(26 मे 2021)

उसंतवाणी- 62

(समाज माध्यमं यांना भारतीय कायद्याने काही नियम पाळण्यास सांगितले होते. त्याची तीन महिन्याची मुदत 25 मे रोजी संपली. पण यांनी कुणीच त्यावर काही भारत सरकारला कळवले नाही. संबित पात्रा यांच्या ट्विटरवर मॅनिप्युलेटेड असा शिक्का मारण्यात आला आणि या वादाने उचल खाल्ली. त्यातच सरकारने दिलेली मुदत संपली. ट्विटरचा डावा अजेंडाही उघड झाला.  )

चाले चुरू चुरू । ट्विटर ट्विटर ।
बसले खेटर । कायद्याचे ॥
बोलभांड इथे । दोन कोटी जीव ।
करी चिव चिव । सदोदीत ॥
ट्विटर म्हणजे । वैश्विक चव्हाटा ।
लिब्रांडू बोभाटा । सदा इथे ॥
केवळ माध्यम । वाहती कंटेन्ट ।
जाणे ना इंटेन्ट । आव ऐसा ॥
मॅन्युप्युलटेड । ऐसा मारी शिक्का ।
इरादा हा पक्का । राजकीय ॥
अभिव्यक्ती नावे । देशद्रोही काम ।
ऐसे हे हराम । जाणावे जी ॥
‘कांत’ म्हणे खास । लोकांची दुनिया ।
सोशल मिडिया । नाव जरी ॥
(27 मे 2021)

उसंतवाणी- 63

(26 मे ला वैशाखी पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा होती. बुद्धाची जयंती साजरी करताना त्या विचाराकडे आपण कधी लक्ष देतो? इतक्या अप्रतिम बुद्ध मुर्ती प्राचीन लेण्यांमधुन आढळून येतात. आधुनिक काळात अशा किती मुर्ती आपण निर्माण करू शकलो? एका जातीत बुद्धाला अडकवून पूर्वाश्रमीचे महार आणि इतरही सर्व मोकळे झाले.  )

बाबासाहेबांचा । बुद्ध हवा कोणा ।
केवळ धिंगाणा । जयंतीला ॥
देव जो नाकारे । त्याचा केला देव ।
चाले देवघेव । पुर्वीचीच ॥
बुद्धीप्रामाण्याची । वाहे धम्मधारा ।
तिला नाही थारा । इथे कुठे ॥
लेण्यातील शिल्प । देखण्या त्या मुर्ती ।
नाही जरा स्फुर्ती । घेत कुणी ॥
गल्लोगल्ली उभे । बेढब पुतळे ।
फुटलेले डोळे । सौंदर्याचे ॥
अथांग निळाई । आहे कल्पांतीत ।
कोंडली जातीत । इवलाश्या ॥
‘कांत’ आज दोघे । भीमराव बुद्ध ।
किती हातबुद्ध । जाणवती ॥
(28 मे 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, May 26, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग २०



उरूस, 26 मे 2021 

उसंतवाणी- 58

(गडचिरोलीच्या ऐटापल्ली गावात जंगलात 13 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. कांही दिवसांपूर्वीच अर्बन नक्षलींच्या याचिका फेटाळून त्यांना तुरूंगात डांबण्यात आले. या अर्बन नक्षलींचे कोडकौतुक करणारे आज मात्र काहीच बोलताना दिसत नाहीत. नुकतेच 22 जवान नक्षलींच्या हल्ल्यात शहिद झाले त्यावरही हे मानवाधिकारवाले काहीच बोलत नाहीत. )

नक्षलवाद्यांचा । होत असे खात्मा।
शांत होई आत्मा । सैनिकांचा ॥
शूर जवानांनी । बाराच्या भावात ।
तेरांना ढगात । पोचविले ॥
धोकादायक हे । भागात जंगली ।
अर्बन नक्षली । त्यांच्याहूनी ॥
पत्रकार आणि । कलाकार मुर्त ।
ऐसे सारे धूर्त । पुरोगामी ॥
नक्षली क्रांतीचे । बोल हे बोबडे ।
तुकडे तुकडे । ऐकू येती ॥
स्वतंत्र देशात । मागती आझादी ।
पूर्ण बरबादी । विचारांची ॥
‘कांत’ म्हणे सोपी । शस्त्रांची चढाई ।
मेंदूची लढाई । आव्हान हे ॥
(23 मे 2021)

उसंतवाणी- 59

(उद्धव ठाकरे यांनी कोकणचा चक्रिवादळ नुकसान पाहणीचा दौरा केवळ 5 तासांत आटोपला. जनतेच्या भावनाही त्यांनी जिल्ह्याधिकार्‍यांच्याच तोंडून समजून घेतल्या. आणि याच भागात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर चार दिवस लोकांना भेटत नुकसानीची पाहणी करत फिरत होते तर त्याला यांनी फोटो सेशन करतात म्हणून टोमणा मारला. विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त आहे म्हणून सांगितले. )
चक्रिवादळाच्या । वेगाहूनी भारी ।
सीऐमची फेरी । कोकणाची ॥
काय त्यांची गती । काय तो झपाटा ।
परतीचा टाटा । लागलीच ॥
सकाळचा नाष्टा । दुपारी जेवण ।
यामध्ये कोकण । उरकले ॥
लोकांचा आक्रोश । कलेक्टर ओठी ।
किती सिद्धी मोठी । उद्धवाची ॥
मोडून पडला । संसार रिकामा ।
आधी पंचनामा । महत्त्वाचा ॥
विरोधी नेत्यांचा । म्हणे फोटो दौरा ।
सीऐमचा तोरा । सरकारी ॥
‘कांत’ आधी नोंद । येत्या वादळाची ।
मग मदतीची । आस धरा ॥
(24 मे 2021)

उसंतवाणी- 60

(कृषी आंदोलन एका विचित्र अवस्थेत पोचले आहे. गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होतो आहे. पण अडमुठपणा करत आंदोलन जिद्दीवर अडून बसले आहेत. 26 मे ला आंदोलनाला 6 महिने पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने त्यांनी मोठा मोर्चा धरणे कार्यक्रम करण्याचे घोषित केले आहे. )

कृषी आंदोलक । कोरोना लाटेत ।
बैसले वाटेत । आडमुठे ॥
भाव मिळताच । गेले शेतकरी ।
दलाल व्यापारी । उरलेले ॥
गव्हाची खरेदी । खात्यामध्ये पैसा ।
तडफडे कैसा । बिचोलिया ॥
कृषी कायद्यांत । काय शब्द उणा? ।
सांगता येईना । कुणालाच ॥
कुणीच पाळेना । कोरोना नियम ।
आमंत्रिती यम । दुष्टबुद्धी ॥
बागायती साठी । आंदोलन खेळ ।
जिरायती वेळ । संकटाची ॥
‘कांत’ ना कामाचे । वैचारिक मुद्दे ।
कायद्याचे गुद्दे । हाणा यांना ॥
(25 मे 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, May 23, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग १९



उरूस, 23 मे 2021 

 उसंतवाणी- 55

(सिंगापूरमध्ये आढळलेल्या नविन व्हायरसचा लहान मुलांना धोका आहे. याचा भारतावर परिणाम होवू शकतो म्हणून आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्यात यावी. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी भारताने सज्ज असावे असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले. यातील खोटेपणा लगेच उघडा पडला. सिंगापूर सरकारने कडक शब्दांत केजरीवाल यांना सुनावले. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांना यावर भारताची भूमिका स्पष्ट करावी लागली. )
सिंगापूरी नवी । कोरोनाची चाल ।
केजरी(ब)वाल । करितसे ॥
तिसर्‍या लाटेचा । मुलांना हा धोका ।
विमानांना रोका । सांगतसे ॥
अपुरी माहिती । मारितसे बाता ।
परदेशी लाथा । बसताती ॥
वर्षापासूनिया । बंद हे विमान ।
केजरूला ज्ञान । नाही जरा ॥
तिसर्‍या लाटेचा । मोदीला दे सल्ला ।
दुसरीचा हल्ला । पेला आधी ॥
मदतीला देश । सिंगापूर खडा ।
त्यांवरी शिंतोडा । उडवे हा ॥
‘कांत’ केजरूचे । ट्विट खोडसाळ ।
बदनामी आळ । देशावरी ॥
(20 मे 2021)

उसंतवाणी- 56

(कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांना देशाचा पंतप्रधान करण्यात यावे अशी मागणी करून धमाल उडवून दिली आहे. हेच पटोले 2019 च्या लोकसभेला याच नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणुक लढवताना हरलो तर राजकारणांतून सन्यास घेईन असे बोलून बसले होते. )

गडकरी यांना । करावे पीऐम ।
मोदींचा हो गेम । नाना म्हणे ॥
नाना पटोलेंची । काय झाली स्थिती ।
गडकरी स्तुती । करिती हे ॥
बेताल बोलणे । बदलला मुड ।
काळ कैसा सूड । उगवतो ॥
लोकसभे वेळी । बोलले हे खास ।
हारता संन्यास । घेणार मी ॥
गडकरी करी । पटोलेंचा खुर्दा ।
मिडियात गर्दा । बहु झाला ॥
पटोले निस्तरा । समस्य घरची ।
पक्षाध्यक्ष खुर्ची । रिकामीच ॥
‘कांत’ नाना उडे । कॉंग्रेस आकाशी ।
लक्ष भाजपाशी । गुंतलेले ॥
(21 मे 2021)

उसंतवाणी- 57

(माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त 21 मे 2021 कॉंग्रेस खासदार कुमार केतकर यांनी दै. लोकमत मध्ये एक लेख लेहिला. त्यात त्यांनी राजीव इंदिरा हत्या आंतर राष्ट्रीय कटाचा भाग आहेत असं परत एकदा सांगितलं. शिवाय यात तपास पूर्ण झाला नाही असाही आरोप केला. आता मुद्दा असा आहे की 1984 पासून 2021 पर्यंत एकूण 37 वर्षांपैकी 23 वर्षे कॉंग्रेसच सत्तेवर होती किंवा तिचा पाठिंबा होता सरकारला. किंवा कॉंग्रेसीच पंतप्रधान पदावर होते. मग का नाही तपास केला गेला? आता ज्या डिएमके सोबत युती केली आहे त्याच पक्षाचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राजीव मारेकर्‍यांना मुक्त करण्याची मागणी केली आहे. मग हे कुमार केतकरांना दिसत नाही का? मग हा नेमका कोणता कट आहे?  )

आंतरराष्ट्रीय । कटाची पिपाणी ।
‘कुमार’ मुखानी । वाजू लागे ॥
इंदिरा-राजीव । हत्या मोठा कट ।
तपासात फट । ऐसी शंका ॥
24 वर्षे ही । 84 पासून ।
सत्तेत बसून । कोण आहे? ॥
कटाच्या नावाने । चिवडिती शिते ।
संशयाची भुते । नाचविती ॥
स्टॅलिन बोलला । मोकळे सोडा रे ।
राजीव हत्यारे । झडकरी ॥
स्टॅलिन सामील । आहे का कटात? ।
त्याच्यात गोटात । कॉंग्रेस ही ॥
‘कुमार’ बुद्धीचा । सुमार हा कट ।
व्यर्थ खटपट । कांत म्हणे ॥
(22 मे 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575