उरूस, 9 जून 2021
उसंतवाणी- 73
(आर.बी.आय. ने सहकारी बँकांवर नियंत्रण आणले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकिय सहकार लॉबी अस्वस्थ झाली आहे. शरद पवारांनी तातडीने सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन केला. त्याला या संबंधात तातडीने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.)
आर.बी.आय.ने । आवळला फासा ।
सहकारी मासा । तडफडे ॥
जाणूनिया वर्म । दिल्ली करी वार ।
घायाळ प‘वार’ । कासावीस ॥
सहकारी बँका । मार्केट कमिट्या ।
दूध सोसायट्या । साम्राज्यं ही ॥
आणि कारखाने । संस्था शैक्षणिक ।
तिंबती कणीक । राजकीय ॥
ऐसी दहा तोंडे । रावणाची जरी ।
नाभी ‘सहकारी’ । जाणा खरी ॥
त्यावरी अचूक । मर्मभेदी बाण ।
राजकीय घाण । साफ होवो ॥
‘कांत’ सहकार । पिकलेले गळु ।
आता लागे गळू । तेची बरे ॥
(7 जून 2021)
उसंतवाणी- 74
(महाविकास आघाडीत धुसफुस चालू आहे. कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार चालविणे आमची जबाबदारी नाही असे सांगून टाकले आहे. उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत अशी पवारांची तक्रार आहे.)
आघाडीच्या पोटी । बिघाडीचे यंत्र ।
लबाडीचे मंत्र । ओठावर ॥
काकाच लावती । नरडीला नख ।
जन्मदाता चोख । घात करी ॥
नाही गरजेचा । बाहेरून हल्ला ।
आतूनच किल्ला । ढासळतो ॥
पाच वर्षे नाही । टिकू दिले कधी ।
मुख्यमंत्री पदी । कुणालाच ॥
दुसर्या पक्षाचा । असो की स्वत:चा ।
करी लेचापेचा । नेतृत्वाला ॥
पाच वर्षे टिकू । हमी छातीठोक ।
बुरूजाला भोक । आघाडीच्या ॥
जनहिता पायी । वापरावी सत्ता ।
यांना नाही पत्ता । कांत म्हणे ॥
(8 जून 2021)
उसंतवाणी- 75
(पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना मोफत लस केंद्र देणार असल्याची घोषणा केली. तसेच 80 कोटी लोकांना दिवाळीपर्यंत धान्य पुरविणार असल्याचेही सांगितले. सातत्याने केंद्राच्या नावाने खडे फोडणारे विविध राज्यांतील विरोधी पक्षांची यामुळे खरी गोची झाली. आधी सांगितले विकेंद्रीकरण करा, मग आपत्ती व्यवस्थापन जमले नाही म्हणून ओरड सुरू केली आता सगळे केंद्रानेच हाताळले पाहिजे. आता केंद्रच सर्व ताब्यात घेणार आहे.)
मोफत राशन । मोफतच लस ।
करी ठसठस । विरोधक ॥
आधी म्हणे हवी । राज्यांना लिबर्टी ।
केंद्र करी डर्टी । पॉलिटिक्स ॥
केंद्र देई मग । संपूर्ण स्वातंत्र्य ।
जमेनाच तंत्र । आरोग्याचे ॥
दुसर्या लाटेचा । बसला दणका ।
तुटला मणका । व्यवस्थेचा ॥
केंद्रावर सारे । दिले ढकलून ।
मागे बोंबलून । मदत ही ॥
विरोधाच्यासाठी । केवळ विरोध ।
द्वेष मळमळ । ओठी पोटी ॥
कांत केंद्र राज्य । हवे हाती हात ।
करोनाला मात । देण्यासाठी ॥
(9 जून 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575