उरूस, 4 एप्रिल 2021
आपल्याच पक्षाची स्थिती जरा कुठे चांगली होताना दिसली की राहूल गांधी अस्वस्थ होतात. मी इतका प्रयत्न करतो आहे पण तरी लोक आम्हाला मतदान करतातच कसे? मग ते एकापेक्षा एक भन्नाट अशा आयडिया काढतात. आणि मनापासून पक्ष पूर्ण खड्ड्यात जाण्यासाठी प्रयत्न करतात.
केरळ जिथे त्यातल्या त्यात कॉंग्रेसची चांगली स्थिती आहे असे पत्रकार निरीक्षक अभ्यासक सर्वेक्षण करणारे सांगत आहेत. तिथे दोन दिवसांत मतदान होणार आहे (6 एप्रिल 2021, 140 जागांसाठी). नेमक्या या मतदानाच्या तीनच दिवस आधी राहूल गांधी यांनी एक मुलाखत अमेरिकेचे माजी राजदूत उच्चपदस्थ अधिकारी आणि हॉर्वर्ड विद्यापीठांत राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या निकोलस बर्न यांना दिली. यात त्यांनी नेहमी प्रमाणे भारतात लोकशाही राहिली नाही हे रडगाणे तर गायले आहेच. पण शिवाय अमेरिका कशी काय गप्प बसून आहे? असं म्हणत याचनाही केली आहे. ही मुलाखत यु ट्यूबवर उपलब्ध आहे. जरूर पहा. नसता परत कॉंग्रेसचे प्रवक्ते अर्वाच्चपणे राहूल गांधी असे बोललेच नाहीत. माध्यमं भाजपला विकली गेली आहेत. गोदी मिडिया म्हणत आरडा ओरड करतात. तूम्ही शब्द तोडून मोडून दाखवत आहेत असा आरोप परत माध्यमांवरच करतात.
यातील सर्वात आक्षेपार्ह मुद्दा असा की चीन आमच्या जमिनीवर अतिक्रमण करून बसला आहे याचा त्यांनी केलेला उल्लेख. ही बाब वारंवार आपल्याकडे चर्चेत स्पष्टपणे समोर आली आहे. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान यांनी प्रत्यक्ष संसदेत स्पष्ट खुलासे केले आहेत. सैन्याधिकार्यांनी सर्व मुद्दे समोर ठेवले आहेत. विविध पत्रकारांनी यातील अगदी बारकावे सर्व देशवासियांना दाखवले आहेत. इतके असतानाही परत परत राहूल गांधी हे एकच तुणतुणं का लावून धरतात? आणि तेही परत परदेशी उच्चपदस्थ अधिकारी विचारवंत प्राध्यापक यांच्या समोर.
आमचा पक्ष निवडणुका कशा लढू शकत नाही असेही एक रडगाणे त्यांनी गायले आहे. सत्ताधारी भाजप मोदी अमित शहा यांनी सर्वच यंत्रणा कशा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत हे मांडले. याचे उदाहरण देताना राहूल गांधी यांनी नेमके असम मधील एका मतदान केंद्रावरील ई.व्हि.एम. मशिन कशी भाजप उमेदवाराच्या गाडीत आढळली हे सांगितले.
यातील खरा प्रकार काय आहे हे माध्यमांनी लगेच समोर आणला होता. निवडणुक आयोगाने त्यावर त्वरीत कार्रवाई केली. शंकेचे निराकरण केले. अजूनही ते एव्हिएम सीलबद्धच आहे. त्या केंद्रावर आता परत मतदान होत आहे. असं असतनाही राहूल गांधी हीच एक घटना परदेशी तज्ज्ञासमोर सांगतात. बरं त्यांना निवडणुकीतील गैर प्रकारांबाबतच बोलायचे होते तर प.बंगाल मधील ममतांच्या पक्षाने ज्या तक्रारी आयोगा समोर मांडल्या त्याचा उल्लेख का करावा वाटला नाही?
राहूल गांधी यांनी नेमकी असम मधील हीच घटना उचलली याचा एक वेगळाच अर्थ आता लावला जात आहे. नेमकी ते ईव्हिएम घेवून जाणारी गाडी बंद पडणे, रस्त्यात ती गाडी थांबवून दुसर्या गाडीला हात करून त्यात ती मशिन घेवून जाणे. ही गाडी दुसर्या मतदारसंघातील का असेना पण भाजप उमेदवाराशी संबंधीत आहे हे कळले की लगेच थोड्या अंतरावर कॉंग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी ती रोकणे. गाडीची मोडतोड करणे. लगेच यावर लोकशाही धोक्यात आली म्हणून गोंधळ घालणे. अगदी माध्यमांनाही धारेवर धरणे. जेंव्हा की पत्रकार कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांना समजावून सांगत आहेत की आम्हीच हा प्रकार उघडकीस आणला. तूम्ही आमच्यावर का आरोप करत आहात? म्हणजे या सर्वातच कॉंग्रेसचे खासदार महान पत्रकार कुमार केतकर म्हणतात तसा काही कट आहे की काय असा वास येतो आहे.
आत्ता जिथे निवडणुका होत आहेत त्यापैकी तामिळनाडू आणि केरळात भाजपचे अस्तित्व जवळपास शुन्य आहे. आणि हे आजचेच नाही तर आधीपासून आहे. अगदी मोदी अमित शहा यांनी सुत्रे हाती घेतली तेंव्हापासून आजपर्यंत 7 वर्षांत फारसा फरक पडला नाही. अजूनही डिएमके आणि डावेच इथे निवडून येतील अशी शक्यता सर्वेक्षणांत समोर आली आहे. पण तरीही राहूल गांधी बिनधास्त आरोप करत आहेत की देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही.
कोरोना काळात देशाच्या आर्थिक विकासाची गती खुुंटली आहे. अर्थक्षेत्रात आपण पिछाडीवर पडलो आहोत हे खरे आहे. वास्तविक सर्वच जग अडचणीत आहेत. तरीही आपला विकासदर बर्यापैकी आहे. आणि राहूल गांधी या मुलाखतीत बिनधास्त जीडीपी महत्त्वाचा नसून नौकर्या निर्माण करण्यासाठी या सरकारने काही केले नाही असले आरोप करत आहेत. आमच्या सरकारच्या काळात मनरेगा सारखी योजना आम्ही कशी राबवली आणि त्याचे किती अप्रतिम असे परिणाम समोर आले असली शेखी मिरवत आहेत.
वास्तविक संरचनात्मक बाबींमध्ये (इन्फ्रा) जास्तीत जास्त पैसा गुंतवला तर त्याचा परतावा जास्त चांगल्या प्रमाणात होतो शिवाय रोजगार (नौकरी नव्हे) निर्मितीची गती संख्या वाढते हे पण जगभरांत पुढे आलेले आहे. अमेरिकन तज्ज्ञ प्राध्यापक तेच राहूल गांधींना सांगू पहात आहेत आणि हे मात्र इतरच बाबींवर बोलत आहेत. मनरेगा कशी फसली याचे पुरावे देशातील सोडा पण परदेशी अर्थतज्ज्ञांनी पण मांडले आहेत. आता तर मजूरांच्या खात्यात सरळ पैसे जमा करतो म्हटले तर गुत्तेदार ही कामेच करायला तयार नाहीत. शेतकर्यांच्या खात्यात सरळ पैसे देतो म्हटले तर अडते दलाल भडकले आहेत. आणि अशा अडत्यांच्या आंदोलनाला राहूल गांधींचा पक्ष पाठिंबा देत आहेत. प्रा. निकोलस बर्न या प्रश्नावर जेंव्हा विचारत आहेत तेंव्हा राहूल गांधी खोटं बोलत आहेत की सरकार शेतकर्यांचे ऐकायलाच तयार नाहीत म्हणून. ज्या अकरा चर्चेच्या फेर्या झाल्या त्या काय होत्या? सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली आहे, त्यासमोर विविध शेतकरी संघटनांनी आपली बाजू मांडली आहे. पण यातले काहीच बर्न यांना सांगितले जात नाही. आपल्याच पक्षाने निवडणुक जाहिरनाम्यात काय कबुल केलं होतं हे राहूल गांधी निकोलस यांना का सांगत नाहीत?
माझा तर निकोलस यांच्यावरही आक्षेप आहे. ते का राहूल गांधींना विचारत नाहीत की तूमचा पक्ष तर याच कृषी कायद्यांच्या बाजूने होता. तसे स्पष्ट तूमच्या जाहिरनाम्यात लिहीले आहे.
मला वाटते आहे की आपल्या लोकशाहीची बदनामी करण्याची ठरवून ठरवून केलेली खेळी आहे. आणि तीही नेमकी पाच महत्त्वाच्या राज्यातील निवडणुका चालू असताना. यातही परत असममधील प्रकरण झाल्या बरोबर एकच दिवसांत ही मुलाखत झाली आहे.
बाकीही अकलेचे तारे राहूल गांधींनी काय तोडलेत ते तूम्ही जरूर पहा. सोनिया आजारी आहेत. प्रियंका यांनी कोरोना मुळे प्रचारात सहभागी होणार नाही असे जाहिर केले आहे. उरले सुरले राहूल गांधी. त्यांनीही प्रचाराकडे दुर्लक्ष करून असल्या मुलाखतींचा पोरखेळ चालवला आहे. दिसतं असं आहे की जर चुकून माकून केरळात आपला पक्ष जिंकला तर काय करायचे? खरंच काठावरची का असेना असम मध्ये सत्ता आलीच तर कसं होणार? या चिंतेने राहूल गांधी हैराण झाले होते. त्यांनी हा मुलाखतीचा फार्स घडवून आणला. आणि आपल्या पक्षाची विश्वासार्हता पुरती मातीत मिसळवून घेतली. स्वत:चे तर ते नेहमी हसे करून घेत आलेले आहेतच.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575