Tuesday, March 16, 2021

उडण्याआधीच कटला एमआयएम चा पतंग



उरूस, 16 मार्च 2021 

ओवैसी यांचा एमआयएम पक्ष ज्या हैदराबाद येथील आहे तिथल्या भाषेत एक म्हण आहे, ‘बाहर से शेरवानी, अंदरसे परेशानी’. पाच राज्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकांत ओवैसी यांच्या पक्षाची अवस्था अशीच झाली आहे. पाच राज्यांत मिळून विधानसभेच्या 824 जागां आहेत. (प.बंगाल 294, तामिळनाडू 234, केरळ 140, असम 126, पुद्दुचेरी 30) यापैंकी तामिळनाडूंत केवळ 3 जागी एमआयएम ने उमेदवार घोषीत केले आहेत. बाकी कुठेच काही नाही. 

म्हणजे जो पक्ष 824 पैकी केवळ 3 जागी निवडणुक लढवत आहे त्याची चर्चा मात्र, ‘हातभर लाकुड दहा हात ढिलपी’ अशी दिसून येते. म्हणजेच याचा अर्थ केवळ आणि केवळ माध्यमांनी मिळून उभे केलेली ही हवा  आहे. राजकीय दृष्ट्या ओवैसी यांचा पक्ष कसलेच  आव्हान उभं करत नाही. 

बिहारच्या निवडणुकांनंतर असे चित्र उभं केल्या गेले होते की प.बंगाल मध्ये मुसलमानांची लोकसंख्या 30 % इतकी प्रचंड आहे. तेंव्हा याचा फार मोठा फायदा ओवैसींच्या पक्षाल होईल. तसे वक्तव्य वारंवार ओवैसी यांच्याकडूनही दिल्या गेले होते. असे केल्याने ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला कसा फटका बसेल. त्याचा फायदा भाजप कसा घेईल. अशी चर्चा गेली 4 महिने सातत्याने केल्या गेली. माध्यमांत यावर घमासान म्हणता येईल अशा चर्चा रंगल्या. सामान्य दर्शकाला चक्क मुर्ख बनवल्या गेले. आणि जेंव्हा प्रत्यक्ष निवडणुकीची वेळ आली तेंव्हा एमआयएम चे हाल झालेले दिसून आले.

ज्या प. बंगालची चर्चा सर्वात जास्त झाली तिथे फुर्फुरा शरीफचे पीरजादा आब्बास सिद्दीकी यांच्यावर ओवैसींची सर्व मदार होती. त्यांनी आपला वेगळा पक्षच स्थापन करून डावे आणि कॉंग्रेस सोबत आघाडी करणे पसंद केले. ओवैसींच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जमीर-उल-हसन यांना पक्षांतून काढून टाकण्यात आले किंवा त्यांच्या म्हणण्या नुसार तेच बाहेर पडले. परिणाम एकच झाला की एमआयएम ला एकाही जागी उमेदवार मिळाला नाही. 

केरळात आधीच मुस्लीम लीग सारखा पक्ष अस्तित्वात आहे. त्यासमोर ओवैसींचे काही चालणे शक्यच नव्हते. हीच गत असम मधेही आहे. बद्रुद्दीन अजमल यांचा पक्ष तिथे मुस्लीम राजकारण करतो आहे. त्याने कॉंग्रेस सोबत युती केली आहे. तिथेही ओवैसींना काहीच संधी नव्हती. तामिळनाडूत मुळातच मुसलमानांचे प्रमाण अतिशय कमी आहे. तिथले राजकारण अजूनही डिएमके आणि एडिएमके या पक्षां भोवती फिरत आहे. तिथे अजूनही तिसर्‍या पक्षाला शिरकाव मिळालेला नाही. त्यात ओवैसी सारख्यांचा तर निभाव लागणे शक्यच नाही. तरी तिथे त्यांनी शशिकला यांचे भाच्चे दिनाकरन यांच्या पक्षासोबत युती करून तीन जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुद्दुचेरी अतिशय लहान आहे. तिथेही यांना काही राजकीय संधी मिळण्याची शक्यता नव्हतीच.  

या पार्श्वभूमीवर ओवैसींच्या पक्षाच्या राजकीय बळाची चर्चा झाली पाहिजे. 2014 नंतर भाजपची जसजशी राजकीय वाढ होत गेली तस तशी ओवैसींची चर्चा वाढत गेली. भाजपला सांप्रदायिक पद्धतीने शिव्या देत आपली जागा तयार करण्याची सोय आपल्या तथाकथित सेक्युलर म्हणवून घेणार्‍या देशांतल्या राजकारणांत आहे. याचाच फायदा ओवैसी घेत आहेत. 

याचा एक  सर्वात ताजा पुरावा नुकताच समोर आला आहे. उत्तर प्रदेशांत योगी सरकारने एनकाउंटर मध्ये मारलेल्या गुन्हेगारांची यादी जाहिर केली. त्यात 37 % नावे मुसलमानांची आहेत. त्यावरून एक मोठा गदारोळ ओवैसींनी आत्तापासूनच सुरू केला आहे. वस्तुत: सध्या निवडणुका चालू कुठे आहेत? त्यातील आपली भूमिका काय आहे? यावर त्यांनी मुग गिळून गप्प बसणं पसंद केलंय. आणि उत्तर प्रदेशांत पुढच्या वर्षी होणार्‍या निवडणुकांसाठी आत्तापासूनच वातावरण  निर्मिती करण्यास सुरवात केली. याच ओवैसी यांनी 2017 ची उत्तर प्रदेश विधान सभा निवडणुक लढवली होती. त्यात त्यांना संपूर्ण अपयश आले. 

ओवैसींना आत्तापर्यंत आपणच  मुसलमानांचे तारणहार आहोत असे वाटत होते. कॉंग्रेसने कसा मुसलमानांचा वापर करून घेतला हे ते वारंवार सांगायचे. पण 2014 नंतर हळू हळू भाजप विरोधी राजकारणाचे केंद्र कॉंग्रेस पासून सरकत सरकत इतर प्रदेशीक पक्षांकडे गेले आहे. त्यामुळे भाजपला टक्कर देवू पहाणारे जे इतर लहान प्रादेशीक पक्ष आहेत त्यांची शक्ती वाढताना दिसत आहे. आणि स्वाभाविकच ज्यांना भाजपला विरोध करायचा आहे ते सरळ सरळ या प्रादेशीक पक्षांकडे झुकत आहेत. आत्ताच्या निवडणुकांचा विचार केल्यास प.बंगाल मध्ये ममता, तामिळनाडूत स्टॅलिन आणि केरळात डाव्या आघाडीकडे मुसलमान भाजपला सशक्त राजकीय पर्याय म्हणून पाहू शकतात.

ओवैसींची हीच खरी तडफड आहे. उत्तर प्रदेशांत मायावती किंवा अखिलेश, बिहारमध्ये तेजस्वी, तेलंगणात चंद्रशेखर राव, दिल्लीत केजरीवाल असे कितीतरी पर्याय मुसलमांनां समोर आहेत. एक साधा विचार मुसलमान मतदार करतो आहे की आपण आपला म्हणून वेगळा गट करण्यापेक्षा मध्यवर्ती प्रवाहातील राजकीय पक्षांचा पर्याय निवडावा. 

मुळात मुसलमानांचे व्होट बँकेचे राजकारणच भाजपने उद्ध्वस्त केल्याने हळू हळू ओवैसींचे राजकारणही आटत जाणार आहे. भाजपेतर ज्या पक्षांना इथून पुढे मुसलमानांची मतं हवी आहेत त्यांना त्यांच्याकडे इतरांसाखेच एक सन्मानिय मतदार म्हणून पहावे लागेल. विशेष वेगळी वागणूक देत त्यांच्या समोर लांगूलचालन केले तर त्याचा फायदा भाजपलाच होतो याचा अंदाज आता इतर सर्व राजकीय पक्षांना आलेला आहे. त्याप्रमाणे या निवडणुकांत ममता, स्टालिन आणि डावी आघाडी यांचे वर्तन दिसून येते आहे. याचा एक त्रास ओवैसींना होतो आहे. 

ज्या राज्यांत निवडणुका चालू आहेत तिथे न जाता ओवैसी जेंव्हा उत्तर प्रदेशांत वेळ खर्च करत आहेत यावरून हेच दिसून येते. आंध्र प्रदेशांतील स्थानिक स्वराज्य संस्था  निवडणुकांत सभा घेत ते फिरत राहिले पण त्यांना फारसे काहीच हाताला लागले नाही. उलट ज्या पश्चिम बंगालात त्यांनीच मोठ्या आशा उंचावल्या होत्या तिथून ते पूर्ण गायब झाले. यातून त्यांची राजकीय दिवाळखोरी दिसून येते आहे. 

गुजरात मधील गोध्रा येथील स्थानिक स्वराज्य संस्थांत आपले उमेदवार कसे निवडुन आले याचा ते डंका पिटत आहेत. अहमदाबाद मध्ये मुस्लीम बहुल भागात आपले सात नगरसेवक कसे निवडुन आले हे जोर जोरात सांगत आहेत. पण हे एकूण सर्व जागांत मिळून किती किरकोळ आहे हे ते लक्षात घेत नाहीत.

महाराष्ट्रात दलित राजकारणाने एकेकाळी नगर पालिकेत छोटे छोटे गट करून राजकीय वाटमारी करण्यात धन्यता मानली. त्याचा परिणाम आता दिसून येतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून दलित राजकारणाची जी काही सद्दी होती ती संपून गेली. हीच अवस्था काही दिवसांत देशांतल्या राजकारणांत ओवैसींच्या पक्षाची झालेली दिसून येईल.         

 

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Monday, March 15, 2021

टिकैत का पळाले सिंगूरमधून?


उरूस, 15 मार्च 2021 

किसान आंदोलन कसे सैरभैर झाले आहे याचा पुरावा त्यांचे नेते राकेश टिकैत यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून आणि बोलण्यांतूनच देशाला करून दिला. 

घटना आहे प.बंगालमधील निवडणुकांची. 14 मार्च हा दिवस नंदीग्राम-सिंगूर या परिसरासाठी विशेष असा आहे. बरोबर 14 वर्षांपूर्वी (14 मार्च 2007) याच परिसरांत जमिन अधिग्रहणा विरूद्ध मोठे आंदोलन शेतकर्‍यांनी केले होते. कम्युनिस्ट पक्षाच्या गुंडांनी शेतकर्‍यांना धमकावून जबरदस्ती त्यांच्या जमिनी सरकारी अधिग्रहणात देण्यास भाग पाडले असा आरोपच तृणमुल कॉंग्रेसने केला होता. त्या वेळेसे राज्यात कम्युनिस्ट पक्षाचे सरकार सत्तेवर होते. बुद्धदेव भट्टाचार्य मुख्यमंत्री होते. केंद्रात डाव्यांच्याच पाठिंब्यावरचे मनमोहन सरकार सत्तेवर होते. 14 मार्च रोजी झालेल्या गोळीबारांत 14 शेतकर्‍यांचा बळी गेला. 100 च्यावर शेतकरी तेंव्हापासून गायब आहेत. त्यांचा आत्तापत्ता आजही लागलेला नाही. 

या दिवसाच्या स्मृती जागविण्यासाठी 14 मार्च हा दिवस नंदीग्राम सिंगून परिसरांत ‘शहिद दिवस’ म्हणून मानण्यात येतो. या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला या दिवसाचे महत्त्व अतिशय आहे. कारण त्यांची राजकिय कारकिर्द या आंदोलनापासूनच चमकायला सुरवात झाली. पुढे चारच वर्षांनी 2011 च्या विधानसभा निवडणुकांत त्यांचा पक्ष कम्युनिस्टांना हरवून सत्तेवर आला. 

संयुक्त किसान मोर्चाला असे वाटले की ही चांगली संधी आहे. आपणही 12 ते 14 मार्च या दरम्यान कोलकोत्ता, नंदीग्राम आणि सिंगूर येथे ‘किसान महापंचायत’ करावी. राजकिय वातावरण तापलेले आहे तेंव्हा यावर आपली पोळी भाजून घ्यावी. 

पहिल्या दिवसांपासून किसान संयुक्त मोर्चा असे सांगत आला आहे की आमचे आंदोलन हे राजकीय नाही. पण या मागचा पक्षीय हस्तक्षेप लपून राहिलेला नाही. राकेश टिकैत 12 मार्चला कोलकोत्ताच्या सुभाषचंद्र बोस विमानतळावर उतरले तेंव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी हजर होत्या तृणमुलच्या खासदार डोला सेन. राकेश टिकैत एकटे नव्हते आले. त्यांच्या सोबत संयुक्त किसान मोर्चाचे 50 कार्यकर्ते होते. इतक्या जणांच्या विमानाचे तिकीट यांच्या गाड्यांची राहण्याची सोय. सभेचे आयोजन हे सर्व तृणमुलने प्रायोजीत केले असा आरोपच त्यांच्यावर केला गेला. हा आरोप अजूनही टिकैत यांना खोडता आलेला नाही. 

बंगालच्या भूमीवर पाउल ठेवताच विमानतळावरच त्यांनी पत्रकारांना आपण इथे का आलो या प्रश्‍नाचे उत्तर देताना सांगितले की, ‘बंगाल मे किसानोंकी हालात सबसे ज्यादा खराब है’. झालं या एका उत्तराने त्यांच्या दौर्‍याचे प्रयोजक असलेले तृणमुलचे नेते भडकले. कारण जर देशात प. बंगालातील शेतकरी जास्त वाईट अवस्थेत असेल तर त्याची जबाबदारी ममतांवर येवून पडते. पुढे टिकैत यांनी सावरा सावर करायचा प्रयत्न केला पण व्हायची ती इजा होवूनच गेली होती. 

कोलकत्ता आणि नंदीग्राम येथील दोन कार्यक्रम कसेबसे पार पडले. कोलकत्ता येथील सभेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय पत्रकारांनी जेंव्हा कम्युनिस्टांच्या उपस्थितीचा प्रश्‍न मांडला त्यावर किसान मोर्चाला उत्तर देता येईना. कारण सिंगूर नंदीग्राम आंदोलनच मुळात कम्युनिस्टांच्या विरोधातील होते. 14 शेतकर्‍यांचे खुनी कम्युनिस्ट आहेत अशीच मांडणी आत्तापर्यंत ममता आणि त्यांच्या पक्षाने सतत केली होती. मग आता त्याच शहिद दिवसाच्या कार्यक्रमांत कॉम्रेड हनन मौला यांचे भाषण कसे? आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून किसान मोर्चाचे नेते बसतातच कसे? 

संध्याकाळी दुसरी सभा प्रत्यक्ष नंदीग्राम मध्ये पार पडली. त्याला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहून राकेश टिकैत यांचे मनसुबे ढासळले. सकाळीच ते पत्रकारांना संपूर्ण बंगालात जावून शेतकर्‍यांशी बोलणार असल्याचे सांगत होते. आणि इथे तर शेतकरी त्यांच्या कार्यक्रमांत यायलाच तयार नाहीत. 

याहीपेक्षा कळस झाला तो सिंगूरला. तिथे तर प्रत्यक्ष मंचावरच ममता दिदींचे फोटो लावलेले होते. ते पाहून पत्रकार आणि इतरांनी संयोजकांवर टिकेचा भडिमार केला. त्यांना तातडीने ते पोस्टर हटवावे लागले. तोपर्यंत एकूणच विरोधात जात असलेली हवा पाहून राकेश टिकैत यांनी काढता पाय घेणे पसंद केले. सर्वजण त्यांची सिंगूर येथील सभेसाठी वाट पहात होते. टिकैत यांनी तातडीने कोलकत्ता गाठले. दुपारचे विमान पकडले आणि संयुक्त किसान मोर्चाची जी मध्यप्रदेशांत रेवा येथे सभा होती तिथे निघून गेले. 

राकेश टिकैत यांनी पलायन केलेले पाहून त्यांच्या प्रवक्त्यांना प्रश्‍न विचारले तेंव्हा त्यांनी बगल देत, ‘मध्य प्रदेशांतील सभेचा कार्यक्रम आधीच ठरलेला होता. आणि या आंदोलनाचा एक नेता नाहीये. एकूण 40 नेते आहेत. त्यांनी विविध ठिकाणी सभा घ्याव्यात. देशभर भाजप विरोधात वातावरण तयार करावे असे ठरले आहे. तेंव्हा राकेश टिकैत यांनी सिंगूर येथील सभेत उपस्थित राहण्याचा मुद्दाच येत नाही.’ अशी गोलमटोल भाषा केली. 

आपले आंदोलन राजकीय नाही असं म्हणणारे हे लोक निवडणुकांच्या प्रचारांत का सामील होत आहेत? यावर ‘बीजेपी को वोटसेही चोट दे सकते है. आंदोलन से इनपे कुछ असर नही पडता. इसीलिये हम उनके विरोध मे प्रचार करेंगे.’ असं त्यांचे प्रवक्ते सांगत आहेत. 

आता यातून एक मोठा गंभीर प्रश्‍न सामाजिक आंदोलनबाबात समोर येता. जर आंदोलनाने फरक पडणार नसेल तर दिल्लीच्या सीमेवर हे ठिय्या देवून कशाला बसले आहेत? तातडीने त्यांनी तंबू खाली करावेत. रस्ते मोकळे करावेत.  जिथे जिथे निवडणुका आहेत तिथे तिथे भाजप विरोधात जोरदार प्रचार करावा. मुळात असे असेल तर सरळ सरळ राजकीय पक्ष स्थापन करूनच निवडणुका लढवाव्यात. पण हे तसं करणार नाहीत. कारण टिकैत यांनी यापूर्वीही निवडणुका लढवल्या आहेत. त्यांना जमानतही वाचवता आलेली नाही.

माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी यांच्या इतकी डोक्यात गेली आहे की आपण देशभरच्या शेतकर्‍यांचे नेते आहोत असेच टिकैत यांना वाटू लागले आहे. ते त्या भ्रमात रहावेत म्हणून काही भाजप विरोधक त्यांना अगदी पुरेपूर वापरून घेत आहेत. आताही जेंव्हा आदांलनाच्या खर्चाबाबत प्रश्‍न विचारले की टिकैत, त्यांचे प्रवक्ते, कार्यकर्ते भडकतात. नंदीग्राम मध्ये राकेश टिकैत यांना तूम्ही ओळखता का? असे पत्रकारांनी सामान्य लोकांना विचारले तर त्यांनी सरळ सांगितले कोण टिकैत? आम्ही ओळखत नाही. टिकैत यांच्या कार्यकर्त्यांना पत्रकारांनी विचारले की 14 मार्चचा शहिद दिवस म्हणजे काय? तूम्हाला काय महिती आहे? तर त्यांना उत्तरच देता येईना. 

नंदीग्राम सिंगूर परिसरांतील सर्वात महत्त्वाचे पीक कोणते? असं विचारलं तर त्याचेही उत्तर टिकैत यांच्या सहकार्‍यांना देता येईना. ते आपले एमएसपी च्या बाता मारत बसले. त्या भागात बटाटा जास्त पिकतो. आणि त्याचा एमएसपीशी काहीच संबंध नाही. ज्या कम्युनिस्टांच्या मांडीला मांडी लावून टिकैत बसत आहेत त्या कम्युनिस्टांच्या केरळात कृषी उत्पन्न बाजार समितीच नाही. संयुक्त किसान मोर्चाचे प्रवक्ते त्यावर असं सांगतात की तिथे एपीएमसीची गरज नाही. 

असे आपल्या बुद्धीचे दिवाळे हे लोक स्वत:च काढत निघाले आहेत. आंदोलनाचे तर कधीच धिंडवडे निघाले आहेत. योगेंद्र यादव, मेधा पाटकर यांना मोदींनी संसदेत ‘आंदोलनजीवी’ म्हणलं तेंव्हा तथाकथित पुरोगामी भडकले होते. आता हे सर्व लोक आपण खरेच कसे आंदोलनजीवी आहोत हे सिद्ध करत चालले आहेत. प. बंगाल मधील शेतीचे प्रश्‍नही यांना माहिती नाहीत आणि त्या ठिकाणी हे किसान पंचायत करत आहेत. बंगालच्या शेतकर्‍यांनी यांना प्रतिसाद न देणे स्वाभाविक आहे.  मग ट़िकैत यांना पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय काय आहे? 

(छायाचित्र सौजन्य झी हिंदुस्तान) 

 

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Sunday, March 14, 2021

सुरेश भटांची आमच्या शाळेतील आठवण

 


उरूस, 14 मार्च 2021 

आज सुरेश भटांचा स्मृती दिन. त्यांना जावून आता 18 वर्षे झाली. आजही त्यांच्या आठवणीत सोहळे साजरे होतात. 

त्यांची एक अतिशय सुंदर आठवण बाल विद्या मंदिर परभणी या माझ्या शाळे बाबतची  आहे.  परभणीला स्टेडियमवर भव्य असा कविसंमेलन मुशायरा साजरा व्हायचा. माझे वडिल त्या समितीचे संस्थापक सचिव प्रमुख कार्यकर्ते. त्यामुळे मराठी कवी परभणीला यायचे तेंव्हा त्यांच्याशी बाबांचा वैयक्तिक स्नेह जमायचा. बाबांना शायरीची मराठी कवितेची चांगली आवड असल्याने हा रसिकत्वाचा धागा कविंना बाबांशी बांधून ठेवायचा. 

1985 च्या जानेवारी महिन्यात परभणीला कविसंमेलनासाठी भटांना बोलावले होते. ते माझ्या घरी आले. त्यांचा नविन कवितासंग्रह ‘एल्गार’ या पूर्वीच बाबांना त्यांनी सप्रेम भेट म्हणून पाठवला होता. आमच्या बैठकीत कवितेची एक छानशी मैफलही झाली. हे सर्व आमच्या जवळच राहणार्‍या हंसाबाई (सौ. उज्ज्वला कुरूंदकर या माझ्या मराठीच्या शिक्षीका. त्यांना आम्ही माहेरच्या नावानेच संबोधायचो.) यांनी भटांना आमच्या घरी आलेलं पाहिलं. त्या स्वत: अतिशय चांगल्या कविता लिहायच्या. त्यांना बाबांची साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातली सक्रियता माहित होती. त्यांनी आणि आमचे मराठीचे शिक्षक कथाकार गणेश घांडगे यांनी आमचे मुख्याध्यापक माधव पोटेकर सरांपुढे असा प्रस्ताव मांडला की सुरशे भटांना आपल्या शाळेत काव्यगायनासाठी आमंत्रित करावे. पोटेकर सरांनी लगेच याला मंजूरी दिली. त्यांचे परभणीच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रावर अतिशय बारीक असे लक्ष असायचे. 

पण मुख्य अडचण अशी होती की भटांना बोलवायचे कुणी? भटांच्या विक्षिप्तपणाचे भरपूर किस्से तोपर्यंत सर्वत्र पसरले होते. त्यांचे मानधन प्रचंड आहे. एका एका गाण्यासाठी ते किती पैसे घेतात. ते फारच व्यवसायिक आहेत वगैरे वगैरे. हंसाबाईंनी जरा डोकं लढवलं. आपण हे काम श्रीकांतला सांगू असे त्यांनी पोटेकर सरांना सुचवले. 

खरं तर या मोठ्या माणसांत माझ्यासारख्या पोराचे नाव पुढे येण्याची गरज नव्हती. पण माझं नाव पुढे आलं त्याला एक छोटंसं कारण घडलं होतं. शाळेत मराठीच्या पेपरला माझा आवडता कवी म्हणून निबंधासाठी विषय दिला होता. तेंव्हा मी सुरेश भटांवर अतिशय सुरेख (अर्थात माझ्या दृष्टीने) निबंध लिहिला होता. त्यात भटांच्या त्यांनी बाबांना सप्रेम भेट दिलेल्या एल्गार पुस्तकांतील कितीतरी कवितांच्या ओळीच्या ओळी दिल्या होत्या. मला भटांच्या इतक्या कविता पाठ आहेत याचे कौतूक हंसाबाईंना होते. त्यांनी तो निबंध शाळेच्या स्टाफरूम मध्ये सर्व शिक्षक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक यांच्या समोर वाचून दाखवला. त्यामुळे भटांना बोलावण्याची जबाबदारी याच्यावरच टाकावी असे ठरले. 

दुसरंही एक कारण घरातले होते. तूमच्या कविता याला पाठ आहेत असं कौतुक बाबांनी भटांसमोर केल्यामुळे माझी कॉलर तशीही ताठ झाली होती. हा 9 व्या वर्गातला पोरगा आपल्या कवितेवर प्रेम करतो म्हटल्यावर भटांनी मला प्रेमाने जवळ घेतले. माझ्या पाठीवर हात ठेवला. पुढे परभणीत ते आल्यावर त्यांच्या जाहिर कार्यक्रमांसोबतच घरगुती मैफीलिंना मी आवर्जून जायचा तेंव्हा ते मला प्रेमाने जवळ बसवून घ्यायचे. 

भटांना शाळेतल्या कार्यक्रमाचे आमंत्रण कसे देवू असं बाबांना विचारल्यावर ते म्हणाले की मी तूला त्यांच्या हॉटेलपाशी सोडतो. तू कुणालाही बरोबर घेवू नकोस. सरळ त्यांना विनंती कर. लहान मुलाने आमंत्रण दिल्यावर ते नाकारणार नाहीत. शिवाय कुठलीही अट घालणार नाहीत. बाबांचा हा वकिली सल्ला मी अवलंबला. त्यांची विश्रांती झाली आहे हे कळल्यावर त्यांच्या खोलीत गेलो. त्यांना शाळेत येण्याची विनंती केली. वेळ तूमच्या सोयीनं सांगा असंही बोललो. बाबांची क्लुप्ती कामा आली. भटांनी तातडीने होकार दिला. मला आनंद झाला. धावत त्या हॉटेलच्या जीन्यांवरून खाली आलो. हंसाबाईंच्या घरी जावून भटांनी होकार दिला असून उद्या दूपारची वेळ ठरल्याचे सांगितले. त्या खुपच खुश झाल्या. 

आता मोठा प्रश्‍न उभा राहिला भटांना शाळेत आणायचे कसे? तेंव्हा वाहने फारशी नव्हती. मग रिक्शात आणायचे ठरले. मी आपला सायकलवर पोटेकर सरांनी सांगितलेला त्यांच्या ओळखीच्या रिक्क्षा घेवून हॉटेलवर गेलो. भटांना चलण्याची विनंती केली. रिक्क्षात येवू शकाल का? असे विचारलेही. ते नेमक्या कुठल्या मस्त मुडमध्ये होते कळले नाही पण त्यांनी होकार दिला. भटांचे वजन प्रचंड. ते रिक्क्षात बसल्यावर मला रिक्क्षावाल्याची दयाच आली. 

आमची वरात शाळेत पोचली. रिक्क्षा सरळ मुख्याध्यापकांच्या केबीन जवळ नेली. भटांना सरांकडे घेवून गेलो. दुपारची वेळ होती. जानेवारीतले आल्हाददायक दिवस. शाळेच्या नविन बांधलेल्या सिमेंटच्या वर्गांसमोर (बाकी शाळा टपरी म्हणजे लाकडी फळ्या आणि वर पत्रं अशी होती) मोठा कॅरिडोर होता. तिथेच छानशी व्यवस्था केली होती. तख्त जोडून मंच केला होता. समोर सतरंज्यावर खच्चून मुलं मुली शिक्षक यांनी गर्दी केली होती.  

भटांची औपचारिक ओळख गणेश घांडगे सरांनी करून दिली. स्वागत वगैरे झाले. हंसाबाईंनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. आणि माईक भटांच्या हवाली केला. पुढचे दोन तास भटांनी मनसोक्त कविता वाचल्या, गायल्या, आठवणी सांगितल्या. ‘गोठ्यात इंदिरेच्या आता गाय दादा’ ही त्यांची तेंव्हा गाजलेली राजकीय कविता जी पुस्तकांत नव्हती मी तिथेच ऐकली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतरची ‘संपून राख गेली हाडे विकून झाली, ते मागतात आता आपापली दलाली’ ही कविताही तिथेच पहिल्यांदा ऐकलेली मला चांगले आठवते. त्यांच्या बाकी सुंदर कविता तर होत्याच. भट एरव्ही मंचावरून सादर करायचे नाहीत त्या कविताही त्यांनी म्हटल्या. आम्ही आपले पुढे बसून फर्माईश करत होतो. भट आमची मागणी पुरी करत होते. 

अतिशय रंगलेला हा कार्यक्रम संपला. आमचे मुख्याध्यापक वेगळ्याच कारणांनी अडचणीत आले होते. भटांना मानधन काय द्यायचे?  ठरले तर काहीच नव्हते. शिवाय भटांनी अटीही काहीच घातल्या नव्हत्या. पोटेकर सर मला म्हणाले त्यांना मानधनाचे विचार. माझी तर काहीच हिंमत होईना. शेवटी हंसाबाईंनी सरांना पाकिटांत काही रक्कम घालून श्रीकांत जवळ द्या. तो भटांना देईन. असे सुचवले. त्याप्रमाणे पोटेकर सरांनी एक पाकिट माझ्या हातात दिले आणि भटांना द्यायला सांगितले. मी आपला चाचरत घाबरत भटांना म्हणालो, ‘हे मानधन... ’ पुढे मला काहीच बोलता येईना. भट मस्त हसले. त्यांना सर्व अडचण कळली असणार. माझ्या हाताने पाकिट देण्याची किंवा माझ्याच तोंडून निमंत्रण देण्याची सगळी खेळी कदाचित लक्षात आली असणार. त्यांनी आपल्या खिशातून एक रूपयाचे नाणे काढले. त्या पाकिटावर ठेवले आणि मला म्हणाले, ‘ही तूझ्याच शाळेला देणगी..’ मला कळेच ना काय प्रतिक्रिया द्यावी ते. ‘अरे घे रे.. मी मानधन नाही घेणार तूझ्या शाळेकडून.’ आमचे मुख्याध्यापक, हंसाबाई, उपमुख्याध्यापक औंढेकर सर, गणेश घांडगे असे सगळे भटांच्या या कृतीने चकितच झाले. मधल्या मध्ये उगाचच माझा भाव वाढून गेला. 

त्याच दिवशी संध्याकाळचे जाहिर कविसंमेलन भटांनी गाजवले. त्याची आठवण सगळे अजूनही काढतात. पुढे एकदा भर पावसात कविसंमेलन उधळण्याच्या बेतात आले होते तेंव्हा सर्व कवी व रसिक मिळून मंचावरून स्टेडियच्या आतल्या लहानश्या जागेत गेले. आणि तिथे साध्या सतरंजीवर बसून कुठल्याही माईकशिवाय चार तास कविसंमेलन कसे रंगत गेले याच्या आठवणीही सगळे अजून सांगतात.

पण माझ्या आठवणीत मात्र आमच्या शाळेत रंगून कविता सादर करणारे भटच रूतून बसले आहेत. भटांनी बाबांना दिलेल्या पुस्तकावरच्या त्यांच्या स्वाक्षरीवर हात फिरवताना मोरपिसावर हात फिरवल्यासारखे वाटते. भट गेले, पोटेकर सर गेले, हंसाबाई तर चटका लावून अचानक गेल्या. 

ही आठवण मनात अजूनही भटांच्या कवितेसारखीच तशीच ताजी टवटवीत राहिली आहे.    


    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Saturday, March 13, 2021

ढोंगी गर्दीत पुरस्कार नाकारणारे नंदा ‘खरे’



उरूस, 13 मार्च 2021 

ज्येष्ठ मराठी लेखक नंदा खरे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार नाकरला. त्याची चर्चा मराठी साहित्य विश्वात लगेच सुरू झाली. नंदा खरे यांनी 5 वर्षांपूर्वी यापुढे कुठलाही पुरस्कार स्विकारणार नसल्याचे जाहिर केले होते. याही पुरस्काराला नकार देताना त्यांनी नम्रपणे हीच भूमिका जाहिर केली आहे. त्यांनी त्यावर कुठलीही टिप्पणी केली नाही. कुणावर टीका केली नाही. 

नंदा खरे यांची ही कृती कुणालाही सरळ साधी अशी भासेल. अशा लोकांना साहित्य अकादमी आणि त्यातले राजकारण माहित नसेल म्हणूनच ते तसा निष्कर्ष काढू शकतील. पण ज्यांना साहित्य अकादमीची किमान माहिती आहे त्यांना नंदा खरे यांचा यातील ताठ कणा स्वतंत्र बाणा लक्षात येईल. 

दुर्गा भागवत, विनय हर्डिकर आणि आता नंदा खरे हे तीनच लेखक असे आहेत ज्यांनी शासकीय सन्मान नाकारले. अन्यथा या पुरस्कारांसाठी किती आणि कशी लाचारी केली जाते याचे अगणित किस्से आहेत. केवळ पुरस्कारच नव्हे तर  शासकिय निधीसाठी कशी लाचारी पत्करली जाते हे पण आपण पहात आलो आहोत.

साहित्य संमेलनासाठी सरकारी पैसे हवे असतात. मंत्री आमदार खासदार माजी मंत्री यांचेपुढे लांगुलचालन केले जाते हे सगळं आजही पहायला मिळतं. शासकीय मदत हवी की नको यावर निष्कारण वाद केला जातो. 

मराठीचे विद्यापीठ हवे अशी मागणी नुकतीच 27 मार्चच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली होती. ती मागणीही नंदा खरे यांनी नाकारलेल्या पुरस्काराच्या निमित्ताने लक्षात घ्यायला हवी. 

साहित्य अकादमी ही सरकारी संस्था आहे. सरकारी पातळीवरचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. ज्ञानपीठचा आणि सरकारचा काही संबंध नाही. तो टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपचा पुरस्कार आहे. त्याला उत्तर म्हणून एक्सप्रेस ग्रुपने सरस्वती सन्मान सुरू केला होता. 

साहित्य अकादमी पुरस्कार कोण कोणत्या पुस्तकांना दिल्या गेले आहेत, या पुस्तकांचे इतर भाषांत अनुवाद करताना काय काय राजकारण झाले आहे, मराठीत इतर भाषांतून पुस्तके अनुवादीत करताना काय राजकारण होत असते हे सर्व पाहिलं तर नंदा खरे यांच्या नकाराचे महत्त्व लक्षात येते. 

तुकाराम महाराजांना न्यायला विमान आले आणि सोबत आपल्या बायकोलाही त्यांनी चल म्हटल्याची दंतकथा आहे. त्यावर बोरकरांची एक सुंदर कविता आहे.

आलेल्या मुक्तीला धाडीले माघारी

तुक्याहूनी थोरी जिजाउची

अशी ओळ बोरकरांनी लिहीली आहे. त्याचप्रमाणे नंदा खरे यांनी चालत आलेला पुरस्कार नाकारला यालाही एक महत्व आहे. पुरस्कार वापसी करताना मराठी लेखकांनी महाराष्ट्र शासनाने दिलेले पुरस्कार नाकारले होते. यात एक फरक लक्षात घेतला पाहिजे. साहित्य अकादमी पुरस्कारासाठी कुठलाही अर्ज केला जात नाही. ही समिती पुस्तकांचा शोध घेवून त्या प्रमाणे ठरवते. याच्या नेमके उलट महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारासाठी अर्ज मागवले जातात. तेंव्हा आपणहोवून अर्ज करून पुरस्कार मिळाल्यावर तो नाकारण्यात कुठली नैतिकता आहे? साहित्य अकादमीचे पुरस्कार ज्या अमराठी लेखकांनी नाकारले निदान त्यांची भूमिका एका नैतिकतेवर तरी आधारलेली आहे. पण महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार वापस करणार्‍या लेखकांना हा आधार नाही. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणूनच नंदा खरे यांची भूमिका झळाळून उठून दिसते. खरे यांच्या निर्णयांतून समोर येणारी एक दुखरी बाजू आहे तीपण समजून घ्या. ते स्वत: याचा उच्चार करणार नाही पण या लेखकाला उतारवया पर्यंत का वाट पहायला लावली गेली? यापूर्वीच हा पुरस्कार मिळायला हवा होता. 

तसेच दुसरा पण एक मुद्दा आहे. जो नेहमीच कायम वादाचा ठरत आला आहे. ज्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला त्या पुस्तकाची किती कदर मराठी वाचक, ग्रंथालये, महाविद्यालये, विद्यापीठांतील मराठी विभाग, त्यांचा अभ्यासक्रम ठरविणारी मंडळी यांनी केली? ज्या पुस्तकाला साहित्य अकादमी हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला त्यांच्या किती आवृत्त्या निघाल्या? 

मुळात या पुरस्कारांच्या निमित्ताने समोर येणारी विदारक चित्र असे आहे की मोठे सन्मानाचे पुरस्कार मिळणारी पुस्तकेही मराठीत उपेक्षीत रहात आली आहेत. त्यांची दखल घेणे, त्यावर सखोल चर्चा होणे, किमान अ व ब वर्ग ग्रंथालयांत त्यांची प्रत उपलब्ध असणे, समिक्षकांनी त्यावर सविस्तर लिहीणे, अभ्यासक्रमांत त्यांचा समावेश होणे यातील आपण काय आणि किती करत आलो आहोत? 

परभणीचे गणेश वाचनालय आणि औरंगाबाद येथील जीवन विकास ग्रंथालय येथे आम्ही एक पुस्तक एक दिवस हा उपक्रम गेले कित्येक वर्षे चालवत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात असे किती उपक्रम चालवले जातात? (नाशिक, अकोला असे काही ठिकाणचे उपक्रम मला माहित आहेत.) संपूर्ण महाराष्ट्रात किमान 25 हजार सरकारी अनुदानावर चालणारी ग्रंथालये आहेत. मग अशा महाराष्ट्रात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकाच्या किती प्रती खपायला हव्या? आणि आज काय परिस्थिती आहे? 

नंदा खरे यांनी पुरस्कार नाकारून शांतपणे कसलीही टिप्पणी न करता आपल्या ताठ कण्याचे दर्शन दिले आहे ते मी या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणतो आहे. 

सरकारी अनुदानावर चालणारी ग्रंथालये, साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, विश्वकोश निर्मिती मंडळ, राज्य मराठी सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळ, साहित्य अकादमी, मराठी शिकवणारे प्राध्यापक, शाळांत मराठी शिकविणारे शिक्षक यांनी मराठीचे काय आणि किती भले केले याचा हिशोब झाला पाहिजे. आधुनिक काळात यांच्यावर विनाकारण खर्च होणारा निधी इतरत्र सकारात्मक कामासाठी वळवला गेला पाहिजे. सरकारी मदतीशिवाय ज्या ज्या ठिकाणी मराठीचे काम चालते त्याची दखल घेवून सामान्य माणसांनी त्याला मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले पाहिजे.       

 

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Friday, March 12, 2021

प्राचीन मंदिरे बारवांत दिवे लागले रे



उरूस, 12 मार्च 2021 

कोरोनाची मळभ अजून दाटलेले आहे. आणि अशा वातावरणांत औरंगाबाद परभणी येथील प्राचीन बारवांत मंदिरांत शिवरात्रीला दिपोत्सव साजरा झाला हे विशेष. दु:ख दळून खाणारी माणसं असे वर्णन खेड्यांतल्या माणसांचे करण्यात येते. या माणसांनी कोरोनाच्या अंधारावर मात करून दिवे लावले आहेत. 

परभणी जिल्ह्यात गेले दोन वर्ष प्राचीन वारश्याबाबत जागृती अभियान राबवले जात आहे. विविध गावांतील प्राचीन मंदिरे, मूर्ती, नदीचे घाट, समाधीस्थळे, बारवा यांचा शोध घेतला जातो आहे. त्या बाबत माहिती गोळा केली जाते आहे. जिल्हाधिकार्‍यांनी एक समिती तयार केली असून त्यांच्या वतीने जानेवारी महिन्यांपासून अशा प्राचीन वारसा असलेल्या स्थळांचे सर्वेक्षण दौरे केले जात आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल 50 गावं अशी सापडली आहेत की जिथे प्राचीन वारसा स्थळं आहेत. 

11 तारखेला शिवरात्रीच्या दिवशी परभणी जिल्ह्यातील हातनुर, रायपुर, चारठाणा, पिंगळी,  ढेंगळी पिंपळगांव आणि धारासुर या गावांत गावकर्‍यांनी दिपोत्सव साजरा केला. प्राचीन बारवा साफ केल्या. जून्या मंदिरांची स्वच्छता केली. हातनुर गावचा आदर्श समोर ठेवून रायपुर येथील ग्रामस्थांनी आपल्या बारवेची दुरूस्ती केली. त्यासाठी स्वेच्छा वर्गणी गोळा केली. शिवरात्रीला ही बारव दिव्यांनी सजवली गेली होती. 

परभणी नांदेड रेल्वे मार्गावर पिंगळी रेल्वेस्टेशन आहे. या गावांतील बारव आणि तिच्या काठावर पिंगळेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. ही बारव भव्य आणि मोठी देखणी आहे. गावकर्‍यांनी या बारवेची साफसफाई करून इथे दिवे लावले.  धारासुर, ढेंगळी पिंपळगांव आणि चारठाणा येथील मंदिरांची साफसफाई आणि सजावट गावकर्‍यांनी केली. या मंदिरांवरही शिवरात्रीला दिवे लावण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालूक्यात शेकटा या गावी एक मोठी बारव आहे. या बारवेची पाहणी जानेवारी महिन्यात व्हिन्सेंट या फ्रेंच मित्राला घेवून आम्ही केली होती. गावातल्या तरूण मुलांना एकत्र केले. बारवेची अवस्था अतिशय वाईट होती. किमान इथे स्वच्छता तरी करा असे आवाहन केले. त्या तरूणांनी हा विषय मनावर घेतला. शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तेथे स्वच्छता अभियान राबविले गेले. त्या तरूण मुलांनी मला फोन करून सगळा वृत्तांत कथन केला. फोटो पाठवले. शिवरात्रीला तेथे मोठा दिपोत्सव गावातील महिलांनी साजरा केला. 

हाच उत्साह गावागावांत पसरण्याची गरज आहे. परभणी जिल्ह्यांत ज्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे जनसामान्यांनी ही चळवळ पुढाकार घेवून चालवली आहे तशी ती इतरत्र चालली पाहिजे. नसता केवळ सरकारी पातळीवर किंवा एनजीओ पद्धतीने झाल्यास त्यातला उत्साह संपून जातो. केवळ कर्मकांड शिल्लक राहते. कितीही टिका केली तरी मंदिर संस्कृती हजारो वर्षे आपण टिकवून ठेवली आहे. तेंव्हा ही प्राचीन स्थळेही त्याच भावनेने जपली गेली तरच ती टिकतील. पौर्णिमा, शिवरात्र, जत्रा, उत्सव अशा निमित्ताने यांची देखभाल स्वच्छता झाली पाहिजे. या सण समारंभांवर पुरोगामी बनून टिका करण्यात काहीच अर्थ नाही. गुढी पाडवा, पौर्णिमेच्या निमित्ताने का होईना पण बारवेत दिवे लागत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. गुढी पाडवा साजरा कशाला करायचा? असले मुर्खतापूर्ण प्रश्‍न विचारण्याचे इथे काहीच औचित्य नाही. 

हीच बाब प्राचीन मंदिरे, मुर्ती, शिलालेख यांच्या बाबत आहे. याचा काय उपयोग? आम्ही हे सगळेच नाकारत आलो आहोत असा दृष्टीकोन ठेवता येणार नाही. आपला प्राचीन वारसा जपणे याला कर्मकांड म्हणत नाहीत.  परदेशांत विशेषत: युरोपात प्राचीन वास्तुंबाबत अतिशय काळजीपूर्वक धोरण आखले जाते. त्यांचे जिवापाड जतन केले जाते. आणि या साठी केवळ सरकारवर अवलंबून राहिले जात नाही. स्वयंस्फुर्तपणे लोक पुढे येतात. देगण्या गोळा होतात. स्वयंसेवी संस्था पुढे येतात. आपल्याकडे नेमके याच्या उलट सगळं काही सरकारने करावं अशी अपेक्षा ठेवून आपण हातावर हात ठेवून बसून राहतो. केवळ हातावर हात ठेवून लोक शांत बसून आहेत असंही असलं असतं तर चाललं असतं. पण आपण प्राचीन वारसा खराब करतो. तिथले दगड चोरून नेतो. जून्या बारवांत कचरा टाकतो. त्यांना बूजवून टाकतो. ही नेतकी काय वृत्ती आहे? जून्या दगडी मंदिरला वार्निश फासून काय मिळते? जून्या वीरगळी, शिलालेख, सतीच्या शीळा धुण्याच्या कामासाठी वापरल्या जातात. ही भयानक अनास्था काय दर्शवते? 

13 एप्रिलला गुढी पाडवा आहे. या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांश बारवा साफ होतील. त्यातील गाळ काढला जाईल. दुरूस्ती होईल आणि तिथे दिवे लागतील यासाठी आपण प्रयास करूया. परभणीने आदर्श समोर ठेवला आहे. औरंगाबादने त्यापासून प्रेरणा घेतली आहे. सारा महाराष्ट्र याच वाटेने जाईल अशी आशा करू या.    

 

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


आजीची पुण्यतिथी आणि रंगांची आठवण



उरूस, 11 फेब्रुवारी 2021 

हा सुंदर फोटो माझ्या मोठ्या भावाने 30 वर्षांपूर्वी काढला होता. आज शिवरात्र आजीची पुण्यतिथी. तिची आठवण होताना मला नेहमी हाच फोटो डोळ्यांसमोर येत राहतो. 

1994 च्या धुळवंडीची ही गोष्ट. आम्ही दोघा भावांनी असं ठरवलं की आज आपल्या नात्यातल्या सगळ्या मोठ्या पुरूषांना त्यांच्या बायकोला रंगवायला लावायचे. आमच्या घरांतून तर असल्या उचापत्यांना कायम प्रोत्साहनच मिळत आलेलं होतं. आई बाबांना दोघांनाही रंग खेळण्यात भरपूर रस. 

आम्ही पहिलं घर गाठलं आमच्या मागेच राहणार्‍या हरिदादा या चुलत भावाचे. हा आमचा सगळ्यात मोठा भाउ. अगदी बाबांपेक्षाही पाच वर्षांनी मोठा. त्यांना पटवून वहिनींना रंग लावायला लावला. या वहिनींचा रंग अतिशय गोरा सुंदर.  आता दोघेही हयात नाहीत. यांच्याच घरातल्या महालक्ष्या अतिशय सुंदर असतात. दुसरं घर गाठलं विद्या नगर मधील आईच्या मावशीचे माणकेश्वरांचे. हे काका तसे रागीट. पण माझ्या मात्र फार आपुलकीने सलगीने वागायचे. भावानं डोकं लढवून मलाच पुढे केलं त्यांना पटवायला. कसे काय की पण ते लगेच तयार झाले. त्या मावशी आज्जीला रंग लावला तेंव्हा त्यांच्या दोन्ही मुलांना फारच हसू आलं. हे काकाही आता हयात नाहीत. 

तिसरं घर गाठलं बाबांच्या बहिणीचे नांदापुरकरांचे. ही आत्या लहान भाउ असल्याने बाबांवर आणि स्वाभाविकच आमच्यावर भरपूर माया करायची. तिच्यासारख्या पोळ्या कुणाच्याच मी खाल्ल्या नाहीत. गोविंदराव काका हे पोलिस प्रॉसिक्युटर राहिलेले. मानवत खुन खटल्यासारखा मोठा खटला त्यांनी सरकारच्या बाजूने लढवलेला. त्यांनी आमचा हट्ट मानला आणि आत्याला रंग लावला. 

चौथं घर गाठलं आमचं आजोळ. म्युनिपल कॉलनी परभणीतील ‘निशीगंध’ हे आजीचं घर. आजोबांचा जूना वाडा वडगल्लीत आहे. तो त्यांच्या लहान भावांना मिळाला. 

आम्ही आण्णांना (आजोबांना आम्ही आण्णा म्हणायचो) पटवलं. माईला (आज्जीला आम्ही माई म्हणायचो) रंग लावायची आयडिया सांगितली. ते तसे आजच्या पोरांच्या भाषेत सांगायचे तर ‘कुल’ आजोबा होते. आम्हा नातवंडांचे तर विशेष लाड करायचे. आज्जीला गोड बोलून मी अंगणात आणायचे. आणि मग आण्णांनी तिला रंग लावायचा असा कट होता. माझ्या मोठ्या भावाने दादाने इकडे कॅमेरा सज्ज करून ठेवला होताच. ठरलेल्या कटाप्रमाणे सगळं घडून आलं. आज्जी न चिडता उलट मस्त हसली. तिनेही आण्णांना उत्साहानं रंग लावला. हा प्रसन्न क्षण दादाने टिपला. 

माईची आज पुण्यतिथी. ही बाई मोठी विलक्षण होती. एक आज्जी-आई- मोठी बहिण- मोठी जावू अशा जबाबदार्‍या तिनं मोठ्या उत्साहानं प्रेमानं पार पाडल्या. पण याहीपेक्षा मला विलक्षण वाटतं ते तिचं सामाजिक कार्यात झळाळून निघालेलं व्यक्तिमत्व. 

ती सलग 20 वर्षे परभणी नगर पालिकेत नगरसेविका होती. महिला बाल कल्याण सभापती होती. घरचे डोहाळजेवणं मंगळा गौरी, महालक्ष्म्या असे सण जशा सहजतेने साजरे करायची तसंच महिला बाल कल्याण विभागाच्या बैठकाही घेताना मी पाहिलं आहे. आणीबाणी नंतरच्या निवडणुकांत कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार लिंबाजीराव दुधगांवकर यांचा प्रचार करताना मी तिच्यासोबत जीपमधून गावोगाव फिरलेलो आहे. याच निवडणुकीतील एक किस्सा मला चांगला आठवतो. तीच्यासोबत जीपमध्ये प्रचारात फिरत असताना आम्ही घोषणा द्यायचो, ‘शेष्या कुठे गेला, गाडीखाली मेला’. कारण  विरोधी पक्षाचे उमेदवार शेषराव देशमुख हे होते आणि त्यांची निवडणुक निशाणी बैलगाडी होती. 

एकदा प्रचारांतून फिरून आल्यावर जीप वडगल्लीत तिच्या घराकडे वळली आम्ही कोपर्‍यावरच गाडीतून उड्या मारल्या. नानलपेठत आमचे घर. घरी आलो तेंव्हा बैठकीत काही लोक पांढर्‍या स्वच्छ कपड्यांत बसलेले होते. बाबांनी लगेच आदेश दिला पाणी आणून ठेव. आणि आईला चहा करायला सांग. मी पाणी आणून ठेवलं. चहा आणून दिला आणि वर माडीत निघून गेलो. पुढे चालून जेंव्हा हा प्रसंग बाबांना सांगताना माझ्या लक्षात आले गाडीतून ज्यांच्या नावाने आम्ही शिव्यांची लाखोली वाहिली होती ते शेषराव देशमुखच आमच्या घरांत बसले होते. आज्जी कॉंग्रेसचा प्रचार करत होती लिंबाजीराव दुधगांवकर यांच्यासाठी तर वडिल शेकापचा प्रचार शेषराव देशमुख यांच्यासाठी करत होते. त्या निवडणुकीत शेषराव देशमुख खासदार म्हणून निवडूनही आले होते. अशी एक राजकिय सहिष्णुता माझ्या घरांतच मला अनुभवता आली होती. 

दिल्लीला महिलांची एक कुठलीशी परिषद होती. महिला बाल कल्याण सभापती म्हणून आज्जी  त्या परिषदेला गेली होती. तेंव्हाचा पंतप्रधान इंदिरा गांधींसोबतचा तिचा फोटो आमच्या आजोळी लावून ठेवलेला आहे. चीन आणि पाकिस्तान सोबतच्या युद्धात सर्वांना प्राथमिक आरोग्याचे प्रशिक्षण द्यावे अशी काही एक योजना होती. त्यात माझी ही आज्जी ते प्रशिक्षण घेवून आली होती. आम्हा नातवंडांची  नातेवाईकांची दुखणी खुपणी तिने निस्तरली त्याचे हे पण एक वेगळे आणि महत्त्वाचे कारण. दवाखान्यात भरती व्हावे तसे आम्ही आजारी पडलो की तिच्या वसंगळी असायचो. आज आश्चर्य वाटते की आरोग्य विषयक जागृकता त्या काळात हीने कशी आत्मसात करून घेतली असेल. तिने कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया छोट्या मामाच्या जन्मानंतर करून घेतली होती. मला तिच्या या सुधारणावादी वृत्तीचे फारच अप्रुप वाटते. ती कधीच धर्मभोळी वाटली नाही. तिने देवदेवही कधी केलेला मला फारसे दिसले नाही.    

वयोमानाप्रमाणे तिने सक्रिय राजकारणांतून निवृत्ती घेतली. त्या काळातला एक प्रसंग माझ्या समोरच घडला. माझे मोठे काका पण कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते. परभणी नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष राहिलेले. पण वडिल मात्र विरोधी पक्षांत. जनता पक्ष शेतकरी कामगार पक्ष नंतर जनता दल असे सक्रिय राहिलेले. त्यामुळे समाजवादी पुरोगामी शेकापच्या नेत्यांचा आमच्याकडे नियमित राबता. 

आमच्या बैठकीत शेकापचे खासदार मा. शेषराव देशमुख, आजी आमदार नेते आण्णासाहेब गव्हाणे नगराध्यक्ष बाबुराव मठपती हे बसून निवडणुकीची बोलणी करत होते. आज्जी नेमकी आमच्याकडे आली होती आणि  आत स्वयंपाकघरात आईशी बोलत होती. त्यांचे बोलणे झाल्यावर आईने मला सांगितले की हीला स्कुटरवर तिच्याघरी नेवून सोड. स्वयंपाकघरांतनून बाहेर जाण्यासाठी आमच्या बैठकीतून जावं लागायचं. आज्जीला पहाताच शेषरावांनी हात जोडले आणि म्हणाले, ‘अरे व्वा विमलाबाई. तूम्हाला एक आग्रह करायचा होता. अगामी निवडणुकांत तूम्ही उभं रहा. आमच्या पक्षांकडून रहा असं नाही सांगत कारण तूमचे आयुष्य कॉंग्रेसमध्ये गेलंय. तूम्ही निष्ठावान अहात. आम्ही एक स्वतंत्र आघाडी करत आहोत. तूम्हाला आम्ही पाठिंबा देतो. तूमच्यासारख्या कर्तृत्ववान नि:स्पृह महिलांची आजही राजकारणात गरज आहे.’ मी चकित होवून हा संवाद ऐकत स्तब्ध उभा राहिलो. माझ्या समोर आपल्या विरोधात आयुष्यभर लढलेल्या बाईला हा खासदार राहिलेला मोठा नेता आपण होवून विनंती करतो आहे. 

आज्जीने मोठे सुंदर उत्तर दिले, ‘भाऊ (शेषरावांना सगळे भाऊ याच नावाने संबोधायचे) आता माझं वय राहिलं नाही आणि आता आमचा पक्षही तसा राहिला नाही तूम्हाला माहित आहे. आता नविन लोकांना पुढे आणा. आमचा तर पाठिंबाच राहिल.’ खरंच तेंव्हा परभणीतील सर्व पक्षांतील जाणत्यांनी मिळून नगर विकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळवली होती. 

आज्जीने शेवटचा श्‍वास घेतला तेंव्हा 4 मुलं 4 सुना 1 मुलगी (माझी आई) जावाई, आम्ही 12 नातवंडं, 14 पतवंडं अशा भरल्या गोकुळांत ती होती. 

8 मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने ज्या चर्चा मी ऐकल्या लेख वाचले त्यात अशा स्वातंत्र्यपूर्व काळातील विपरीत परिस्थितीत कसला बाउ न करता शांतपणे समाजकार्य करणार्‍या महिलांची फारशी दखल घेतल्या गेलेली दिसली नाही. तेंव्हाच्या पुरूषांत सहसा न आढळणारा गुण माझ्या आजोबांत होता. ते जिल्हा परिषदेच्या नौकरीत असल्याने स्वत: सामाजिक कार्यात सक्रिय राहू शकत नव्हते पण त्यांनी आज्जीला मात्र पुर्ण पाठिंबा दिला. प्रोत्साहन दिले. त्यांच्या बोलण्यात नेहमीच आज्जीबद्दल केवळ बायको म्हणून जिव्हाळाच नव्हे तर एक आदर मला नेहमीच जाणवत राहिलेला आहे. 

पाच बहिणींत आज्जी दोन नंबरची. तीला भाऊ नाही. इकडे आजोबाही पाच भावांत दोन नंबरचे. त्यांना बहिण नाही. या दोन्ही घरांत आज्जीचा दुसरा नंबर असतानाही अधिकारांत तीनं नेहमीच एक नंबरचं स्थान कमावलं. तिचा प्रेमळ धाक सर्वांवरच असायचा. तिला सर्वच मान द्यायचे. आमच्या नातेवाईकांत कुणाच्याही घरांत काही छोटा मोठा निर्णय तिला विचारल्याशिवाय व्हायचा नाही. 

केवळ नातेवाईकांतच नव्हे तर वाड्यांतील इतर भाडेकरू (मंडलीक, धोंड, भेडसुरकर) शेजार पाजारची घरे (सोबणे, पिंगळकर, कात्नेश्वरकर) अगदी गल्लीला लागून असलेल्या सुभाष रोडवरचे मानवतकरांचे घर, गल्लीतलेच जहागिरदार, डावरे, मोकाट, तिची नणंद तुका आत्याचे औंढेकरांचे घर या सगळ्यांत तिला प्रेमाचे आदराचे वडिलकीचे स्थान होते.   आजही या घरांतील सगळी मंडळी अगदी जवळचे नातेवाईक असल्यासारखे भेटतात जिव्हाळा दाखवतात मी माझा मोठा भाउ आम्ही पहिले पहिले नातवंडं असल्या कारणाने या सर्व ठिकाणी आमचे आजोळासारखेच लाड व्हायचे त्याला कारण आज्जीच. सर्व वडगल्लीच आमचं आजोळ होतं. 

तिच्या स्वतंत्र बाण्याच्या व्यक्तीमत्वाचा उलगडा तिच्या छोट्या बहिणीने (जिजी मावशी) सांगितलेल्या एका प्रसंगातून मला झाला. आजीचे वडिल तिच्या लहानपणीच गेले. पाच बहिणीपैकी सर्वात मोठी (आक्का मावशी) हीचेच फक्त लग्न झाले होते. आज्जीचे वय तेंव्हा 16 वर्षांचे म्हणजे त्या काळाच्या मानाने थोराडच झाले होते. हीच्यासाठी कुठलेही स्थळ आले तर आपल्या सांगण्यांवरून ती हो म्हणणार नाही.  तेंव्हा तीला आधी विचारले पाहिजे हे तिच्या मोठ्या मावस भावाने (मधुकरराव चौकेकर, बेगमपुरा औरंगाबाद) जाणले. आज्जीचे मोठे मामा, ही मावस भावंडं यांनी तीला स्थळाबाबतची अट विचारली. 

वडिलांच्या माघारी लासूरला घरची शेती आणि सगळा कारभार चोखपणे सांभाळणारी ही माझी आज्जी 1945 ला स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या मोठ्या मावसभावाला असं म्हणाली, ‘दादा मी भाड्याच्या घरांत राहणार नाही आणि विकतची ज्वारी खाणार नाही.’ पुढे चालून आज्जीने चिवटपणे भांडून आजोबांच्या घराण्याची वडिलोपार्जित जमिन कुळाकडून कब्जेदारांकडून सोडवून आणली त्यातून तीची जिद्द आपल्या हक्कासाठी संघर्षाची तयारी दिसून येते.

आज्जीची आज पुण्यतिथी. तिच्या स्मृतीला अभिवादन करताना सतत वाटत राहते की आपण तिचा सामाजिक कार्याचा वारसा जसा जमेल तसा चालवावा. तीच तीला खरी श्रद्धांजली. 


 -श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Wednesday, March 10, 2021

महागठबंधन, एक्झिट पोल आणि दुबळी कॉंग्रेस


उरूस, 10 मार्च 2021 

पाच विधानसभांच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. एक्झिट पोल विविध संस्थांच्याद्वारे घेतले जात आहे. त्याचे आकडे आता समोर आले आहेत. टाईम्स नाऊ आणि सी व्होटर यांनी घेतलेल्या निवडणुक पूर्व सर्वेक्षणात पाचही राज्यांत कॉंग्रेसची अवस्था दयनीय दिसून येते आहे. हाच महत्त्वाचा मुद्दा चर्चेला समोर येतो आहे.

तीन वर्षांपूर्वी कर्नाटक विधानसभेचे निकाल जाहिर झाले होते. एच.डि.कुमारस्वामी यांच्या पक्षाला कॉंग्रेसच्या अर्ध्याच जागा मिळाल्या होत्या तरी त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी हट्ट धरला. कॉंग्रेसने ते पुरवला कारण कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून दूर राखायचे होते. तेंव्हा जे छायाचित्र प्रसिद्ध झाले त्यात देशभरांतील भाजपेतर विरोधी पक्ष नेते एकमेकांच्या हातात हात घालून उभे असलेले दिसून आले. 

या महागठबंधनाची खुप तारीफ तेंव्हा पुरोगामी पत्रकार विचारवंत यांनी केली होती. त्या सगळ्यांना साक्षात्कार झाला होता की भाजपला अतिशय सबळ असा राजकीय पर्याय उभा राहिला आहे. त्याचे नेतृत्व कॉंग्रेस पक्ष करत आहे. आणि अर्थातच कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी हेच देशाचे पुढचे पंतप्रधान असणार आहेत. 

ही सगळी राजकीय कवायत 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी चालू होती. साहजिकच कुणाचीही अशी अपेक्षा होती की किमान त्या निवडणुकीआधीच्या विधानसभांच्या निवडणुका तरी महागठबंधन म्हणून लढवल्या जातील. 

याला पहिला अपशकुन स्वत: कॉंग्रेसनेच केला. 2018 च्या डिसेंबर मध्ये होवू घातलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, पंजाब या निवडणुकांत मायावती यांचा बसपा आणि मुलायम यांचा सपा यांचा सफाया स्वत: कॉंग्रेसनेच केला. पुढे प्रत्यक्ष निकाल लागले आणि कॉंग्रेसला पंजाब, छत्तीसगढ मध्ये स्पष्ट बहुमत भेटलेही. मध्यप्रदेशांत अगदी दोन जागांनी बहुमत हुकले. राजस्थानातही असेच अगदी काठावर बहुमत मिळाले. तिथे मायावती यांचा बसपा कॉंग्रेस सोबत जाण्यास तयार होता. पण कॉंग्रेसने तो पक्षच फोडला. आणि सर्व 6 आमदार आपल्या पक्षात सामील करून घेतले. कर्नाटकांत मायावतींच्या आमदाराने कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. मध्यप्रदेशांत समाजवादी पक्षा सोबत कॉंग्रेसचा खटका उडाला. या सगळ्याचा परिणाम लगेच दिसून आला. लोकसभा निवडणुकांत महागठबंधन नावाने कसलीच मोठी आघाडी उभी राहू शकली नाही. कर्नाटक आणि मध्यप्रदेशांतील कॉंग्रेसची सत्ताही त्यांच्याच आमदारांमुळे गेली.

आता ज्या पाच विधानसभांच्या निवडणुकां होत आहेत ती सर्व राज्ये महागठबंधन मधील पक्षांसाठी महत्त्वाची राज्ये आहेत. कॉंग्रेसची असम मध्ये 2016 पर्यंत सत्ता होती. पुद्दुचेरी मध्ये चालू विधानसभेत कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री होता. कॉंग्रेसच्याच आमदारांनी राजीनामे दिले आणि ते सरकार निवडणुकीच्या तोंडावर पडले. 

केरळात दर पाच वर्षांनी सत्तांतर होत आले आहे. गेल्या 45 वर्षांतला हाच पायंडा आहे. त्यानुसार डाव्यांचा पराभव होवून कॉंग्रेसची सत्ता येण्याची जास्त शक्यता होती. 

आता या पार्श्वभूमीवर टाईम्स नाउ आणि सी व्होटर यांनी निवडणुक पूर्व सर्वेक्षणाचे जे आकडे समोर आणले आहेत ते कॉंग्रेससाठी निराशाजनक आहेत. 

असममध्ये भाजपचीच सत्ता कायम राहण्याचे संकेत आहेत. तिथे कॉंग्रेसचे तरूण गोगाई 2016 पर्यंत मुख्यमंत्री होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जो पराभव झाला तो 2016 च्या विधानसभेत टाळण्यासाठी काय करावे लागेल हे सांगण्याचा हेमंत बिस्व शर्मा हे नेते आटोकाट प्रयत्न करत होते. त्यांना राहूल गांधी यांनी साधी भेटही नाकारली. आणि जेंव्हा भेट मिळाली तेंव्हा राहूल गांधी आपल्या कुत्र्याला बिस्कीटं भरवत राहिले पण यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. याचा परिणाम काय झाला? तर हेमंत बिस्व शर्मा तिथून उठले आणि सरळ भाजपमध्ये सामील झाले. 2016 मध्ये तर कॉंग्रेसची सत्ता गेलीच पण आताही ती येण्याची शक्यता दिसत नाही. 

पश्चिम बंगाल मध्ये डाव्यांच्या दुप्पट जागा घेवून कॉंग्रेस विधान सभेतील प्रमुख विरोधी पक्ष बनला होता. शिवाय लोकसभेत दोन खासदार पण निवडु न आले होते. स्वाभाविकच कॉंग्रेसचे राजकीय आव्हान तगडे असायला हवे होते. पश्चिम बंगालचे खासदार अधीर रंजन चौधरी हेच कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते पण आहेत. 

एक्झिट पोल मध्ये कॉंग्रेस डावे आणि पीर जादा आब्बास सिद्दीकी यांच्या आघाडीची अगदी किरकोळ मध्ये वासलात काढण्यात आली आहे. ममतांचे बहुमत घटेल पण त्यांचीच सत्ता राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. सट्टाबाजार मध्ये भाजपचे बाजूने कौल देण्यात आला आहे. याती कुणीही खरे ठरो पण कॉंग्रेसला कुणीच मोजायला तयार नाही ही कॉंग्रेसच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. तीन जागा असलेला भाजप सत्तेसाठी दावेदारी करतो आहे. त्याला किमान 100 तरी जागा मिळतील अशी शक्यता आहे. आणि 44 जागा असलेल्या कॉंग्रेसचे राजकीय आव्हान संपूष्टात आलेले दिसत आहे ही मोठी आश्चर्याची बाब आहे. 

तामिळनाडूत कॉंग्रेस ज्या पक्षा सोबत आहे त्या एम.के. स्टालिन यांचा डि.एम.के. सत्तेवर येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागच्यावेळीसही कॉंग्रेस डि.एम.के. सोबतच आघाडीत होता. कॉंग्रेसने 41 जागा लढवून 8 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळेस डि.एम.के. ने त्यांची मुळ मागणी फेटाळून 25 जागांवर तडजोड करण्यास भाग पाडले आहे. तामिळनाडूत पुश अप्स काढून शाळकरी मुलांचे रंजन करणारे राहूल गांधी राजकीय पुश अप्स कधी काढणार? त्यांचा शरिरीक फिटनेस चांगला असल्याचे पुरावे ते देत आहेत पण कॉंग्रेस पक्षाचा राजकीय फिटनेस कसा सिद्ध करणार? 

केरळात आश्चर्य म्हणजे परत डाव्यांचीच सत्ता येईल असे सर्वेक्षणातील आकडे सांगत आहेत. मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या काळात सोन्याच्या तस्करीसारखे गंभीर मुद्दे समोर आले आहेत. अशावेळी अपेक्षा अशी असते की याचा फायदा घेत विरोधी पक्षाने रान उठवत सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. आणि तशी संधी कॉंग्रेसला आहेही. पण केरळात जावून राहूल गांधी माच्छीमारांसोबत समुद्रात डुबक्या मारण्यात गुंग आहेत. पक्ष राजकीय पाण्यात बुडतो आहे त्याची त्यांना काळजी दिसत नाही. त्यांच्याच वायनाड लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस पदाधिकार्‍यांनी राजीनामे देत पक्षातून बाहेर जाणे पसंद केले आहे. आणि हे मात्र भाषणांत उत्तरेपेक्षा दक्षिणेतील मतदार कसे प्रगल्भ आहेत, उत्तरेतील राजकारण कसे वरवरचे उथळ झाले आहे अशी ग्वाही देत आहेत. मग याच दक्षिणेतील प्रगल्भ मतदारांनी तुम्हाला नाकारले तर तूम्ही काय उत्तर देणार? उत्तरेच्या उथळ लोकांनी तर तूम्हाला आधीच नाकारले आहे. 

पुद्दुचेरीमध्येही कॉंग्रेसचा पराभव होवून भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे. तिथे राहूल गांधी यांनी नुकतीच भेट दिली होती. मच्छीमारांशी बातचीत करताना या क्षेत्रासाठी वेगळे मंत्रालय असण्याची गरज व्यक्त केली होती. 17 वर्षे खासदार असलेल्या या ज्येष्ठ नेत्याला (ते जरी स्वत:ला तरूण म्हणवून घेत असले तरी) सरकारी मंत्रालयांची रचना कशी आहे हे माहित नसू नये? 2019 मध्येच मच्छीमारांसाठी वेगळे मंत्रालय स्थापन झाले आहे. गिरीराज किशोर त्याचे मंत्री आहेत. याच मंत्रालयासंदर्भात एक प्रश्‍न राहूल गांधी यांनीच लोकसभेत 2 फेब्रुवारीला विचारला होता अशीही माहिती त्यांनी देत राहूल गांधीना उघडे पाडले. आता पुरोगामी पत्रकार राहूल गांधींना विचारणार का की तूम्ही असले धादांत खोटे का बोलता ते? याचा परिणाम मतदारांवर होतो. त्यानंतरच्या सर्वेत कॉंग्रेसची पुद्दुचेरीतील सत्ता जाण्याचे अंदाज समोर आले आहेत. 

त्याच भेटीतील एक खोटेपणाही समोर आला आहे. एक महिला मुख्यमंत्री नारायण सामी यांनी वादळाच्या भयानक आपत्तीत आपल्याला किंवा कुणालाच कशी मदत केली नाही हे संतापून सांगत होती. तामिळ भाषा न कळल्याने राहूल  गांधींनी मुख्यमंत्री नारायण सामींना विचारले ती काय बोलत आहे? नारायण सामींनी नेमके उलटा अर्थ सांगितला. आपण कशी त्यांना मदत केली आणि त्यासाठी ती आपल्याला धन्यवाद देत आहे. आता हे सर्व समाज माध्यमांत समोर आले आणि कॉंग्रेसची इज्जत गेली. 

कॉंग्रेस शिवायचे महगठबंधनातील भाजपेतर पक्ष आपल्या आपल्या दृष्टीने राजकीय मेहनत करत आहेत. त्याचे फळ त्यांना मिळत असल्याचे या एक्झिट पोल मधून समोर आले आहे. पश्चिम बंगालात ममता, तामिळनाडून स्टालिन आणि केरळात डावे सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत. पण कॉंग्रेस कुठे आहे? खुद्द कॉंग्रेसच्या नेत्यांनाच आपल्या पक्षाचा भरवसा वाटत नाही. याचा एक पुरावा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष विधानसभेचे माजी सभापती नाना पटोले यांनी दिला आहे. त्यांचा पक्ष डावे आणि पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्या सोबत प.बंगालात लढतो आहे. आणि हे असे वक्तव्य करत आहेत की प. बंगालात ममता दिदींचे सरकार निश्चित येणार आहे. आता या मानसिकतेला काय म्हणणार?

भारतात सक्षम विरोधी पक्ष उभा राहताना दिसतो आहे पण तो पुरोगामी विचारवंत पत्रकारांच्या अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेस मात्र नाही. ममता, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, स्टालिन, केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन अशी एक भाजपविरोधी आघाडी सशक्त होते आहे. यांच्या सशक्त होण्यातच कॉंग्रेसच्या विनाशाची बीजे दडलेली आहेत. कारण हे पक्ष कॉंग्रेसची जागा घेत त्यांचीच मतपेढी बळकावत पुढे सरकत आहेत.            


    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575