Saturday, December 19, 2020

गौताळा -अंतुर किल्ल्यावरची कविता...


 
उरूस, 19 डिसेंबर 2020 

दोन वर्षांपूर्वी अंतुरच्या किल्ल्यावर गेलो होतो. या किल्ल्यावरचे आणि त्या परिसरातील निसर्गसंपन्न दृश्य पाहून मन अगदी मोहून गेलं. अजिंठा डोंगर रांगांत गेली तीन वर्षे मी फिरतो आहे. इथल्या विविध स्थळांनी सातत्याने आकर्षून घेतले आहे. परत परत माझे पाय इकडे वळत आले आहेत. पावसाळ्यात तर हा प्रदेश नेत्रसुखद दृश्यांनी नटलेला असतो. गौताळा अभयारण्यातून आम्ही पुढेे अंतुर किल्ल्यावर पोचलो. पुढे एक वर्षांनी माझी मुलं, पुतणे त्यांचे मित्र यांना घेवून परत एकदा मी मुद्दाम या किल्ल्यावर गेलो होतो. तेथील निसर्गसंपन्नतेचा परत एकदा अनुभव घेतला. त्यावेळी सुचलेली ही कविता. 


गवताळ्याच्या । वनराईतूनी । 
येता फिरूनी । जातो भरूनी । 
गर्द पोपटी । हिरवाईने । 
आपुला डोळा ॥
पाखरगाणी । एैकत एैंकत
दगडामधुनी । झुळझुळणार्‍या
पाण्याच्या । पायातील वाजे 
घुंगुरवाळा ॥

गौताळ्याच्या परिसरांतच सर्वत्र या काळात लहान मोठे ओहळ खळखळा वहात असतात. त्यांचा मंजूळ आवाज बाळाच्या पायातील घुुंगुरवाळा भासत रहातो. गौताळा अभयारण्यातून अंतुर किल्ल्याकडे येताना सीता न्हाणी  म्हणून अतिशय सुंदर असा धबधबा आहे. डोंगर चंद्रकोरीसारखा कातरून त्याच्या भोवती दगडी सुळके मोठे आकर्षक असे उभे असलेले दिसून येतात. या घळीतून धबधबा वाहातो तेंव्हा त्याचा विस्तारलेला पाणपसारा मोरपिसार्‍यासारखा वाटतो.

चंद्रकोरसा । डोंगर कापुनी
हिरवाईचे । तुरे लेवूनी
कातळ सुळके । देत पहारा ॥
नाद उमटता । दरीमधुनी 
धबधबाच मग । मोर बनुनी 
नाचे फुलवुनी । पाण पिसारा ॥

श्रावणातील तो काळ असल्याने उन पावसाचा खेळ अनुभवता येत होता. 

जरा सावळ्या । जरा पांढर्‍या
मेघांमधुनी । उन्हांत न्हावूनी
मिश्किल दिसते । आभाळ हसते  
निळे निळे ॥
मस्त कलंदर । शुभ्र पांढर्‍या  
दर्ग्याच्या । पायाशी आहे
पीरासारखे । मुक्तमनस्वी
एक तळे ॥

याच तळ्याचा फोटो वर लेखात वापरला आहे. या तळ्याकाठचा दर्गा एका सुफी संताचा आहे. तिथेच एक छोटी मस्जीदही आहे. इस्लामची निर्गुण अनुभूती अशा एकांतप्रिय निसर्गसंपन्न सुंदर जागी सहजच येते. या तळ्याच्या पाण्यावर उठणार्‍या लाटा पाहून पुढच्या ओळी सुचल्या

तळी साठल्या । पाण्यावरती
वारा लिहीतो । अल्लड गाणी 
थरथरणारी ।
लसलसणार्‍या । गवतामधुनी
लहरत जाते । गाण्याची लय
लवलवणारी ॥

लोकगीतांमध्ये स्वरांचे हेलकावे असतात. त्या ताना त्यामुळे गोड वाटतात. अगदी बासवरीवरची एखादी पहाडी धुन ऐकत असतानाही आपल्याला असा भास होत रहातो. 

श्वासांमधुनी । खेळत आहे
स्वच्छ मोकळी । शुद्ध हवा ॥
डोळे मिटता । मनी उमटतो
ध्यानमग्नसा ।  बुद्ध नवा ॥

या डोंगरावर एक वडाचे झाड आहे. त्या वडाच्या समोर एका सुफी संताची कबर आहे. तळ्याकाठचा दर्गा मस्जीद आणि ही दुसरी कबर आणि तिच्याकाठचे वडाचे झाड यातून एक वेगळीच अनुभूती येत रहाते. खुलताबाद हे सुफी संप्रदायाचे फार मोठे केंद्र राहिलेले आहे. चिश्ती संप्रदायातील अतिश पवित्र मानले गेले 21 वे ख्वाजा बुर्‍हानोद्दीन गरीब आणि 22 वे ख्वाजा औरंगजेबाचे गुरू जैनोद्दीन चिश्ती यांच्या समाध्या याच परिसरांत आहेत. या शिवाय औरंगाबाद परिसरांत अजून काही सुफी संतांच्या समाध्या आहेत. त्यामुळे तो संदर्भ या कवितेत आला. या दर्ग्यामधून सुफी कव्वाल्या आजही गायल्या जातात.  

इथे वडाच्या । पारंबीला
सुफी शांतता । घेते झोका ॥
शतकांपासूनी । विरून गेल्या
कव्वालीचा । स्मरूनी ठेका ॥

अंतुरचा किल्ला आणि गौताळा अभयारण्यातून परत येताना काहीतरी हरवले आहे असे वाटत होते. इतिहासातील प्रचंड घडामोडी जिथे झाल्या तो परिसर आता उध्वस्त विराण असा झाला आहे. पडझड झालेला हा किल्ला आता खुप चांगल्या पद्धतीने संवर्धन केल्या गेलेला आहे. अजून या परिसरांतील बरेच अवशेष विखुरले आहेत. शेवटच्या ओळी केवळ अंतुर किल्ल्यासाठी नसून परिसरांतील सर्वच अवशेषांसाठी आहेत. 

परतू बघता । वाट हरवते
गवसत नाही । काही काही
कानी येती । इतिहासाच्या
नुसत्या हाका ॥
कालपटाच्या । फाटूनी गेल्या
जीर्णशीर्ण । हिमरू शालीचा  
कुशल हाताने । कुणी शिवावा  
टाका टाका ॥

अनंत भालेराव पुरस्कार हिमरू नक्षी तज्ज्ञ अहमद कुरेशी यांना 26 ऑक्टोबर 2020 रोजी प्रदान करण्यात आला. आज यंत्रावर विणली जाणारी हिमरू शाल बहुतेकांना माहित आहे. पण अजूनही हातमागावर विणली जाणारी ही कलाकारी अहमद कुरेशी यांच्या सारख्यांनी जतन करून ठेवली आहे. ही कविता लिहीली तेंव्हा अहमद भाईंचा संदर्भ नव्हता. पण हा पुरस्कार प्रदान सोहळा झाल्यानंतर कवितेत एक बदल करत ‘कुशल हाताने’ असा शब्द वाढवला.

कविता मुक्त आहे. एकमेकांत गुंतत जाणारी अशी लयबद्ध शब्द रचना केली आहे. यमकांचा मुक्त वापर आहे. कडव्यांतील ओळींची संख्याही तशी नियमित नाही. या परिसरांत पावसाळ्यांत गेलात तर हा अनुभव तूम्हाला नक्की येईल.

(छाया चित्र सौजन्य व्हिन्सेंट पास्कीनली) 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, December 18, 2020

ब्लॉगची दशकपूर्ती व्हिडिओचा सुर्वणमहोत्सव



 
उरूस, 18 डिसेंबर 2020 

दहा वर्षांपूर्वी एका ज्येष्ठ पत्रकार मित्राने माझे लक्ष सोशल माध्यमाकडे वेधले आणि त्यावर लेखन करण्याचा सल्ला दिला. तो शिरोधार्ह मानून मी 2011 मध्ये ‘क्वेस्ट फॉर फ्रिडम’ - स्वातंत्र्याच्या कक्षा रूंदावण्याचा प्रयत्न हा ब्लॉग सुरू केला. 17 डिसेंबर रोजी 600 वी पोस्ट टाकली. याच महिन्यात दहा वर्षे संपत आहेत. 

सुरवातीचे एक वर्ष ‘शेतकरी संघटक’ हे पाक्षिकात कार्यकारी संपादक म्हणून लिहीलेले अग्रलेखच मी टाकत होतो. 2012 मध्ये अलिबागच्या कृषीवल दैनिकात पाक्षिक सदर लिहीण्याचा प्रस्ताव संपादक पत्रकार मित्र संजय आवटे यांनी दिला. त्या अनुषंगाने मी दैनिक कृषीवल मध्ये ‘उरूस’ नावाने सदर लिहायला लागलो. या सदरातील लेख ब्लॉगवर टाकायला लागलो. कृषीवल रायगड नविन मुंबई आणि कोकण परिसरांत पोचते. पण उर्वरीत महाराष्ट्रात पोचण्यासाठी या ब्लॉगचा उपयोग झाला. 

प्रस्थापित मुद्रीत माध्यमांच्या मर्यादांवर मात करून सर्वदूर पोचण्याचे साधन हे नविन माध्यम आहे याची जाणीव मला झाली. पुढे दीड वर्षांनी हेच सदर दै. पुण्यनगरीत मित्रवर्य सुशील कुलकर्णी यांनी सुरू केले. तेथे ते तब्बल चार वर्षे चालू होते. या दोन्ही संपादक मित्रांचे मन:पूर्वक आभार त्यांनी माझ्यातील सदर लेखक फुलवला. त्याला वाचकांपर्यंत नेले. ब्लॉगच्या माध्यमातून हे लिखाण सर्वदूर पोचले. दै. ‘उद्याचा मराठवाडा’ साठी संपादक राम शेवडीकर यांच्या आग्रहावरून  त्यांच्याकडेही हेच सदर चालवले.  

साप्ताहिक ‘विवेक’चे दिलीप करंबेळकर, अश्विनी मयेकर आणि मित्रवर्य रविंद्र गोळे यांनी माझे ‘उरूस’ सदर प्रसिद्ध करून त्याच्या कक्षा रूंदावल्या. मराठी माणूस साप्ताहिकांवर विशेष प्रेम करत आलेला आहे. एक मोठी परंपरा मराठीत साप्ताहिकांची राहिली आहे. 

दै. दिव्य मराठीने कवितेविषयक सदर ‘काव्यतरंग’ गेले वर्षेभर प्रसिद्ध केले होते. ते लेखही यात समाविष्ट केले आहेत. दिव मराठीचे दिपक पटवे, संजय आवटे आणि श्रीकांत सराफ या पत्रकार मित्रांचे आभार.

या दैनिक आणि नियतकालिकांतील लिखाणासोबतच विविध दिवाळी अंक आणि मासिकांमधूनही मी लिहीत राहिलेलो आहे. माझे सर्वच लिखाण ब्लॉगवर टाकले आहे. त्यामुळे वाचकांना ते इथे एकत्रित पहायला मिळते. 
विविध दैनिक नियतकालिके मासिके यांच्यासाठी लिहीत असताना काही विषय असे होते की ते मला उत्स्फुर्तपणे सुचले आणि विस्तृत लिहावे वाटले. जे मी स्वतंत्रपणे माझ्या ब्लॉगवर लिहीले. त्याला मिळालेला प्रतिसाद आचंबित करणारा होता. एकदा या माध्यमाची ही ताकद लक्षात आल्यावर मी सातत्याने स्वतंत्रपणे ब्लॉगवर लिहायला सुरवात केली. आता तर कुठल्या नियतकालिकासाठी दैनिकासाठी लिहीलेल्या लेखांपेक्षा स्वतंत्रपणे लिहीलेल्या लेखांचीच संख्या जास्त झाली आहे. माझ्या ब्लॉगने 2 लाख 80 हजाराचा दर्शक टप्पा गाठला. आपण माझ्यावर दर्शविलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद.

ही दशकपूर्ती होत असतानाचा यु ट्यूबवर व्हिडिओ हे नविन माध्यम मी हाताळतो आहे. ऍनालयझर न्युज चे सुशील कुलकर्णी यांच्याकडे लॉकडाउनच्या काळात असे व्हिडिओ करता येतील का अशी चर्चा झाली. त्या अनुषंगाने हे व्हिडिओ करण्यास आम्ही सुरवात केली. त्यांचीही संख्या नेमकी याच महिन्यात 50 पर्यंत गेली. म्हणजे नविन माध्यमांतील व्हिडिओचा हा सुवर्णमहोत्सव आहे. 

दहा वर्षांपूर्वी ब्लॉग हे नविन माध्यम वाटत होते. आता त्याच्याही पुढे जावून यु ट्यूब हे एक माध्यम समोर आले आहे. त्याचेही आव्हान स्विकारावे असे मला मनोमन वाटले. त्याला मिळणारा प्रतिसाद तर अजूनच अचंबित करणारा होता. कोरोना काळात मोठ्याप्रमाणात लोक स्थानबद्ध होवून पडले होते. अशा काळात त्यांच्या पर्यंत पोचणारे प्रभावी माध्यम म्हणून यु ट्यूब व्हिडिओ समोर आले. मनोरंजनासाठी हे माध्यम मोठ्या प्रमाणात वापरले जाते आहे. पण गंभीर असे विषय पोचविण्यासाठी याचा कितपत उपयोग होवू शकेल याची शंका होती. तसा वापर कोणी फारसा केला नव्हता. पण भाउ तोरसेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराने अतिशय साधेपणाने या माध्यमाचा वापर करत 1 लाख 65 हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठून सर्वांना चकितच केले. त्यांच्या दर्शकांची संख्या तर तीन कोटींचा आकडा पार करून गेली आहे. 

भाउंच्या उदाहरणावरून हे सिद्ध झाले की मराठी माणूस गंभीर राजकिय विषय या नविन माध्यमांतून समजून घ्यायला तयार आहेत. ऍनालायझरवरील विविध राजकिय सामाजिक व्हिडिओंना दिलेल्या प्रतिसादाबद्दल दर्शकांना मन:पूर्वक धन्यवाद. तांत्रिकदृष्ट्या अजून चांगले व्हिडिओ यावर देण्याचा आमचा मानस आहे. सुशील कुलकर्णी आणि त्यांचे सर्व तरूण सहकारी यांचे आभार. 

मी रूढ अर्थाने पत्रकार नाही. माझा पिंड सामाजिक सांस्कृतिक साहित्य क्षेत्रातील कार्यकर्त्याचा आहे. त्याला पोषक म्हणून हे ब्लॉग लेखन आणि आता व्हिडिओ यांचा वापर मी केला. पण आता त्यांची ताकद लक्षात येवून त्या पलिकडेही यात खुप काही आहे याची जाणीव झाली आहे. मी माझ्याकडून चांगलं काही देण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन केवळ माझ्या दर्शकांना/वाचकांना देतो असे नाही तर मी मलाच असे आश्वासन यातून देत आहे. 
नामदेवांचे पसायदान फारसे कुणाला माहित नाही. पयासदान म्हटले की ज्ञानेश्वरांचेच आठवते. नामदेवांची भाषा अजूनच साधी सोपी आहे. हे पसायदान अगदी चारच ओळींचे आहे. ब्लॉग लेखनाची दशकपूर्ती आणि ऍनालायझर व्हिडिओंचा सुवर्ण महोत्सव या प्रसंगी मला नामदेवांच्याच ओळी आठवत आहेत

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ।
माझिया सकळा । हरिच्या दासा ॥
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ।
हे तो संत मंडळी । सुखी असो ॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा ।
माझ्या विष्णुदासा भाविकांसी ॥
नामा म्हणे व्हावे तयाचे कल्याण ।
ज्या मुखी निधान । पांडुरंग ॥

नामदेव हरिदासा असे म्हणतात. मी नविन काळात तूम्हा सर्वांना ‘डिजिटल दासा’ असे म्हणेन. तूम्हा सर्वांची विवेक बुद्धी शाबूत राहो. समाजाला विवेकाच्या पातळीवर आणण्याचा आपण सर्व मिळून प्रयत्न करू.
वैयक्तिक/धार्मिक/जातीय वगळून सर्व प्रकारच्या टीकेचे स्वागत.

              श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  

Thursday, December 17, 2020

कृषी आंदोलन -बळीराजाच्या स्वातंत्र्यावर घाला


साप्ताहिक विवेक १४ -२०  डिसेंबर २०२० 

 पंजाबी शेतकर्‍यांनी दिल्लीच्या सीमेवर चालविले आदोलन म्हणजे बळीराजाच्या स्वातंत्र्यावर घाला असेच म्हणावे लागेल. सरकारी खरेदी, सरकारी हस्तक्षेप यात गेली कित्येक वर्षे शेतकरी भरडून निघाला होता. लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. याला जबाबदार असलेली सरकारी धोरणं आता जराशी सैल होत आहेत. नुकतेच जे तीन कृषी विषयक  कायदे संसदेत मंजूर करण्यात आले त्याने शेतकर्‍यांच्या स्वातंत्र्याची चाहूल लागली आहे. त्या दिशेने पावलं उचलली जात असल्याची ग्वाही यात आहे. आणि असे असताना त्याला नेमका विरोध पंजाबी शेतकर्‍यांनी सुरू केला आहे.

कृषी कायद्यात ज्याचा उल्लेखही नाही अशी भिती दाखवून विनाकारण गोंधळ माजवला जात आहे. दोन प्रमुख मागण्या या निमित्ताने समोर आल्या आहेत. आपण त्यांचा विचार करू.

पहिली मागणी आहे ती एम.एस.पी. म्हणजेच किमान आधारभूत किंमत (मिनिमम सपोर्ट प्राईज) या संदर्भात. आजतागायत भारतीय सरकार (सत्तेवर कोणीही असो) कधीही कोणताही शेतमाल आपण स्वत:च जाहिर केलेल्या किंमतीप्रमाणे संपूर्ण खरेदी करू शकलेले नाही.
एमएसपी मुळातच 23 धान्यांची जाहिर केली जाते. बाकी शेतमाल (फळे, भाजीपाला, दुध इ.) सर्वच या एमएसपी च्या बाहेर आहेत. म्हणजे यांचे भाव निर्धारण बाजारात होते. शासन ज्या शेतमालाची एमएसपी जाहिर करते त्यातीलही केवळ गहू आणि तांदूळ या दोघाचीच खरेदी धान्य वितरण व्यवस्थेसाठी (रॅशनिंग) केली जाते. म्हणजे ज्वारी, बाजरी, मका, दाळी, तेलबिया या कशाचीही खरेदी शासकीय यंत्रणा करत नाही. ही खरेदीही परत संपूर्ण गहु तांदूळाची केली जात नाही. सरकारी यंत्रणेची साठवणुकीची जी क्षमता आहे तेवढीच किंवा गरजेप्रमाणे त्याच्याहून कमी इतकीच केली जाते. अगदी ताजी आकडेवारी जी समोर आली आहे त्याप्रमाणे बाजारात उपलब्ध असलेल्या एकूण गहु आणि तांदूळापैकी केवळ 6 टक्के इतकीच खरेदी अन्नमहामंडळाने (एफ.सी.आय. - फुड कार्पोरेशन ऑफ इंडिया) केली आहे. म्हणजे आत्ता जे आंदोलन चालू आहे त्याचा संबंध केवळ या सहा टक्के शेतमालाशीच आहे. इतरांचा त्याच्याशी काहीच संबंध नाही.

दुसरा मुद्दा समोर येतो आहे तो कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थे बाबत. नविन कृषी कायद्यांनी ही व्यवस्था बरखास्त करा असे कुठेही म्हटलेले नाही. उलट पंतप्रधान आणि गृहमंत्री या दोघांनीही अतिशय स्पष्टपणे मंडी व्यवस्था अबाधित राहिल असे आश्वासन दिलेले आहे. अगदी आत्ता जी चर्चा चालू आहे त्यात हे आश्वासन लेखी स्वरूपात देण्याचीही तयारी शासनाने दाखवली आहे. मग असे असताना हे आंदोलन आडून का बसले आहेत?

नविन कृषी कायदे शेतकर्‍यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर शेतमाल विक्रीला परवानगी देतात. यात तक्रार करण्यासारखे काय आहे? जिल्हा परिषदेची शाळा चालूच असताना खासगी शाळेला परवानगी देण्याने नेमकी कोणती हानी होते? तसेच जर शेतकरी आपला माल इतर ठिकाणी विकू शकत असेल तर त्यात शेतकर्‍यावर अन्याय असा कोणता होतो आहे?

केवळ शेतकरी आपला माला दुसरीकडे विकू शकतो असे नाही तर शेतकर्‍याच्या बांधावर येवूनही कुणी खरेदी करण्यास तयार असेल तर त्यालाही या कायद्यांनी परवानगी दिली आहे.

आंदोलन शेतकरी यावरच आक्षेप घेत आहेत. खरं तर हा आक्षेप व्यापार्‍यांचा असू शकतो. दलालांचा असू शकतो. आडत्यांचा असू शकतो. जो उत्पादक आहे तो शेतकरी याला विरोध कसा काय करू शकेल? आजची मंडी व्यवस्था शेतकर्‍याच्या बांधावर जावून माल खरेदी करत आहे का? काही वेळा तर शेतकर्‍याला कृषी उत्पन्न बाजार समितीत माल नेल्यावर झालेला खर्च आणि आलेली रक्कम यात तोटा होवून आपल्याच खिशातून पैसे भरावे लागले असे घडले आहे. याला ‘उलटी पट्टी’ असा शब्द आहे. मग जर कुणी अगदी शेतकर्‍याच्या बांधावर येवून माल खरेदी करणार असेल, शेतमालाचा सौदा शेतकर्‍याच्या बांधावरच होणार असेल तर यात नेमकी अडचण काय आहे?

याच ठिकाणी या शेतकरी आंदोलनाची गोम लपलेली आहे. जर शेतमाल विक्री खरेदी संपूर्णत: खुली झाली तर बाजार समित्यांची मक्तेदारी संपूष्टात येईल. मग हे आडते दलाल व्यापारी हमाल मापाडी सगळे सगळे जे अनुत्पादक आहेत जी या व्यवस्थेतील बांडगुळे आहेत त्यांचे हितसंबंध धोक्यात येतील. जो कुणी स्पर्धात्मक दृष्टीने शेतकर्‍याच्या बांधावर यायला तयार आहे, योग्य तो काटा वापरून अचूक मोजमाप करायला तयार आहे, शेतमालाची वाहतूक व्यवस्था उभी करण्यास तयार आहे, शेतमाला साठवणुकीच्या सोयी करण्यास तयार आहे त्याचा यात फायदा होणार आहे. आणि शेतकर्‍यालाही आपल्याच शेतात राहूल आपल्या मालाची किंमत मिळणार आहे. आत्ताच असे सौदे सुरू झाले आहेत.

कोरोनाच्या काळात शेतातून थेट ग्राहकाच्या घरात फळे दुध भाजीपाला नेणारी व्यवस्था आख्ख्या भारतात सक्षमपणे काम करताना सगळ्यांनी अनुभवली. इतकी मोठी आपत्ती असतानाही कुठेही अन्नधान्य फळे भाजीपाला दुध यांची कमतरता जाणवली नाही. हे कशामुळे शक्य झाले? शासनाने शेतकर्‍याच्या पायातील कृषी उत्पन्न बाजार समितीची बेडी मोकळी केली. हा शेतकरी आपला माल थेट ग्राहकापर्यंत पोचवू लागला. शेतकरीच हे काम करतो आहे असेही नाही. हे काम करणारच्या सक्षम यंत्रणा तयार झाल्या.

कुठलाही मोठा उद्योगपती आपले उत्पादन विकण्यासाठी स्वत: बाजारात उतरत नसतोच. तो विक्रीची साखळी तयार करतो. ती चालविण्याची जाबाबदारी सक्षम आस्थापनांवर सोपवतो. अशी तक्रार कुणीही उद्योगपती करत नाही की मला माझ्या घावूक व किरकोळ विक्रेत्यांनी लुटले. मग जर अशीच सक्षम स्पर्धात्मक व्यवस्था शेत मालासाठी उभी राहणार असेल तर त्याला शेतकरी कशाला विरोध करेल? किंबहुना हे व्हावे यासाठीच शेतकरी 40 वर्षांपासून शरद जोशींच्या विचाराने आंदोलन करत आला आहे.

एमएसपीचा कायदा करा अशी एक मागणी डाव्यांच्या दबावाखाली समोर आली आहे. एक तर कायद्याच्या दृष्टीने अशी मागणी वास्तवात येवूच शकत नाही. कारण एमएसपी प्रमाणे सरकारी खरेदी शक्य आहे जी की एकूण बाजारातील शेतमालाच्या अगदी किरकोळ इतकीच आहे. उर्वरीत माल खासगी व्यापार्‍याने काय भावाने खरेदी करावे असा कायदा केला तर तो त्याला परवडेल तरच खरेदी करेल. नसता बाजारातून बाजूला सरकेल. एकीकडे सरकारची क्षमता संपून गेलेली आणि दुसरीकडे खासगी व्यापारी बाजारातून निघून गेलेला. मग अशा वेळी या शेतमालाचे करायचे काय? आज ज्या व्यापार्‍यांनी पंजाबात शासकीय खरेदीसाठी मध्यस्थ म्हणून गेल्या हंगामात माल खरेदी केला त्याचे पैसे शासनाकडून मिळवले. पण अजूनही शेतकर्‍यांना दिले नाहीत अशी किमान 1100 कोटी रूपयांची रक्कम थकित आहेत. महाराष्ट्रातला अनुभव आहे की एफआरपी प्रमाणे कारखान्यांनी अजूनही शेतकर्‍यांचे पैसे दिलेले नाहीत. जिथे जिथे सरकारी खरेदी आहे तिथे तिथे पैसे थकवले जातात असा शेतकर्‍यांचा अनुभव आहे.

बरोब्बर 34 वर्षांपूर्वी 10 डिसेंबर 1986 रोजी हिंगोली जवळ सुरेगांव येथे कापूस एकाधिकार योजना शेतकर्‍याला लुटते आम्हाला रास्त भाव मिळू द्या म्हणून शेतकरी संघटनेने आंदोलन केले. त्यात तीन शेतकरी पोलिसांच्या गोळीबारात शहिद झाले (परसराम कर्‍हाळे, निवृत्ती कर्‍हाळे आणि ज्ञानदेव टोंपे).

आज जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा  देत आहेत त्यात कोण कोणते पक्ष आहेत? सगळ्यात प्रमुख आहे राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष. याच पक्षाचे 1986 ला पंतप्रधान होते राजीव गांधी. राजीव गांधी यांच्या कृत्रिम धाग्यांना पाठिंबा देण्याच्या धोरणाने कापसाची माती केली होती. याच पक्षाचे मुख्यमंत्री होते मा.ना. शंकरराव चव्हाण. त्यांचेच सुपुत्र माजी मुख्यमंत्री आणि आजचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नांदेड जवळच हे आंदोलन तेंव्हा झाले होते. या शेतकर्‍यांना गोळीबार करण्याचा आदेश देणारे शंकरराव चव्हाणच होते.

अजून एक नाव या संबंधात लक्षात घ्यावे लागेल. देशाचे सलग सर्वात जास्त काळ कृषी मंत्री राहिलेले मा. शरद पवार हे तेंव्हा समाजवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा होते. याच वर्षी म्हणजेच 1986 ला एकीकडे कापूस शेतकर्‍यांचे आंदोलन पेट घेत होते त्याच काळात अगदी त्याच वेळी नोव्हेंबर महिन्यात याच परिसरांत औरंगाबाद शहरात आमखास मैदानावर मोठा मेळावा भरला होता. हा मेळावा म्हणजे मा. शरद पवार यांचा कॉंग्रेस पक्षातील प्रवेश सोहळा होता. त्याला पंतप्रधान राजीव गांधी आणि जम्मु कश्मिरचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रिय मंत्री आणि आताचे गुपकार गटाचे प्रमुख मा. फारुख अब्दूला हजर होते. एकीकडे शेतकरी कापसाच्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला होता. तीन शेतकरी भाउ पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडले होते. त्या रक्ताने माखलेल्या भूमीवर आज आंदोलनाचे समर्थन करणारे आपले राजकारण सार्थ करत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मा. शरद पवार आणि कॉंग्रेसचे सर्वच नेते यांना कुणीतरी पत्रकाराने हा प्रश्‍न विचारायला पाहिजे होता की 34 वर्षांपूर्वी कोरडवाहू कापुस शेतकर्‍यांच्या आंदोलनाला तूम्ही का विरोध केला होता? आणि आजच्या बागायती पीकांच्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला का पाठिंबा देत आहात? तेंव्हा सरकारी खरेदी च्या विरोधात शेतकर्‍यांत असंतोष होता. आज या जोखडातून शेतकरी मोकळा होउ पहात आहेत. कृषी कायद्याने शेतकर्‍याच्या स्वातंत्र्याच्या दिशेने पाउल उचलले आहे. ते पाउल मागे घ्या म्हणून डावे आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रचाराला पंजाबातील काही शेतकरी बळी पडले आहेत. यांना हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवाले कोणत्या तोंडाने पाठिंबा देत आहेत?

शेतकरी संघटनेने 1980 पासून शेतकरी स्वातंत्र्याची मागणी केली. कुठलाही वैचारिक गोंधळ न ठेवता अतिशय स्पष्टपणे सरकारी हस्तक्षेप उठवून लावण्याची मागणी लावून धरली. आजचे शेतकरी आंदोलन नेमक्या त्याच्या उलट सरकारने किमान हमी भाव देवून खरेदी करावी असा आग्रह धरत आहेत. शेतकरी संघटनेची मागणी होती आमची सुटका करा, तूम्हाला सुटका करता येत नसेल तर बाजूला व्हा आम्ही आमचे स्वातंत्र्य मिळवतो. पिंजर्‍याचे दार उघडा नसता आम्ही पिंजरा तोडतो अशी होती. फक्त तूम्ही पिंजर्‍याला बाहेरून कुलूप लावू नका. अशी होती.

आजची मागणी मात्र पिंजरा चांगला कसा करा, त्याला रंग द्या, पिंजरा सोन्याचा करा, पेरूच रोज न देता फळांमध्ये विविधता येवू द्या, पिंजरा कधी घरात कधी गॅलरीत कधी बागेत नेवून ठेवा अशी आहे. पंजबाचे आजचे आंदोलक शेतकरी आणि त्यांचे नेते चुकूनही पिंजर्‍याचे दार उघडा अशी मागणी नाही.

कोरडवाहू पिकासाठी आंदोलन करताना आम्हाला स्वातंत्र्य द्या म्हणत शेतकरी शहिद झाले. आणि याच्या उलट आज बागायती पिकाचे, मोठ्या प्रमाणात संरक्षण असलेले, सरकारी खरेदीची कवच कुंडले लाभलेले पंजाबातील शेतकरी सरकारच्या गळ्यात पडून आम्हाला वाचवा म्हणून गळा काढत आहेत.

कालपर्यंत शेतकर्‍याच्या विरोधात उभे असलेले मेधा पाटकर, योगेंद्र यादव आणि सगळेच पर्यावरणवादी समाजवादी डावे आज शेतकर्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसून येत आहेत. यातूनच या आंदोलनाचे वैचारिक पितळ उघड पडताना दिसत आहे.

12 डिसेंबर ही युगात्मा शरद जोशी यांची पुण्यतिथी. त्यांनी शेतकर्‍याला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. सरकारी खरेदीचा हस्तक्षेपाचा पिंजरा तोडायची दिशा दाखवली. शरद जोशी यांनी 1990 साली विश्वनाथ प्रताप सिंह आणि 1999 साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कृषी सल्लागार समितीचा अहवाल शासनाकडे सुपूर्त केला. त्यातील तरतूदींच्या अनुषंगानेच आजचे नविन कृषी विधेयक तयार झाले आहे. या कृषी विधेयकाचे स्वागतच केले पाहिजे.  

    श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, 9422878575

Wednesday, December 16, 2020

कृषी कायद्यांच्या समर्थनात कृषी मंत्र्यांना निवेदन

 


उरूस, 16 डिसेंबर 2020 

भारतभर पसरलेल्या विविध राज्यांतील शेतकरी संघटनांनी 1983-84 साली सर्व शेतकरी संघटनांमध्ये समन्वय असावा म्हणून शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय किसान समन्वय समितीची स्थापना केली होती. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेंव्हाचा आंध्रप्रदेश या प्रमुख कृषी प्रधान राज्यांतील शेतकरी संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला होता. 

शेतकरी स्वातंत्र्याच्या बाजूने या अखिल भारतीय समितीने सातत्याने भूमिका घेतलेली आहे. त्या पद्धतीची तीव्र आंदोलनेही केली आहेत. केंद्र शासनाने पारित केलेली तीनही कृषी कायदे शेतकर्‍यांच्या हिताचे असल्याने आम्ही त्यांचे खुले समर्थन करतो आहोत अशी भूमिका किसान समन्वय समितीने घेतलेली आहे. या समितीने कृषी मंत्र्यांना जे निवेदन दिले त्याचा मराठी अनुवाद खालील प्रमाणे आहे

मा. कृषी मंत्री

भारत सरकार

भारतातील विविध राज्यांतील शेतकरी संघटनांचे आम्ही प्रतिनिधी पदाधिकारी आहोत. या सघंटनांनी स्व. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली गेली 40 वर्षे शेतकर्‍यांच्या स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष केला आहे. 

1991-92 मध्ये देशभर डंकेल प्रस्तावाच्या विरोधात वातावरण तापलेले असताना आम्ही डंकेल प्रस्तावाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. आमची स्पष्ट धारणा आहे की जागतिक बाजारपेठेत उतरल्याशिवाय शेतकर्‍याचे हित साधल्या जावू शकत नाही. त्यासाठी बाजारपेठ खुली असावी आणि स्पर्धात्मक वातावरण असावे ही अट मात्र आहे. 

गेली तीन दशके शेतमालाची खरेदी विक्री व्यवस्था ज्या कायद्यांनी चालली त्यामुळे शेतकर्‍यांचे शोषण झाले. शेतमाल विक्रीची जी बंधने शेतकर्‍यांवर लादली गेली त्यामुळे त्याच्या मालाला योग्य भाव मिळू शकला नाही. यासाठी आम्ही निरंतर संघर्ष केला. आंदोलने उभारली. जागतिकीकरणाचे खुले वारे लाभलेला ‘इंडिया’ ज्याला नेहमीच लायसेन्स कोटा परमिट राज्याचा फायदा मिळाला आणि दुसरीकडे जागतिकीकरणातही बंंधनात खितपत पडलेला लायसन कोटा परमिट राज्याचा तोटा सहन करणारा ‘भारत’ असा संघर्ष नेहमीच राहिलेला आहे. या संघर्षात आम्ही नेहमीच भारताची बाजू लावून धरलेली आहे. 

अशा वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी स्वातंत्र्याच्या दिशेने पाउल टाकणारी तीन कृषी कायदे संसदेत मंजूर करून घेतली त्यासाठी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि खुलेपणाने या निर्णयाचे स्वागत करतो. शेतकरी स्वातंत्र्याच्या या पहाटवेळी दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन गैरसमजातून उभे राहिले आहे. जाणीवपूर्वक पंजाबातील शेतकर्‍यांची दिशाभूल केली जात आहे. सध्या अस्तित्वात असलेली शेतमाल विपणन व्यवस्था शेतकर्‍यांवर अन्याय करत होती तेंव्हा कुठल्याही परिस्थितीतून या जोखडातून शेतकर्‍यांची सुटका झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. हे नविन कृषी कायदे लागू करावेत इतकेच नव्हे तर त्यांची व्याप्ती अजून वाढवून शेतकर्‍यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या दिशेने पाउल उचलावे असा आग्रह आम्ही सरकारला धरतो आहोत. 

शेतकर्‍याला तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य, बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. शेती विरोधी कायदे पूर्णत: बरखास्त झाले पाहिजेत (आवश्यक वस्तू कायदा, जमिन अधिग्रहण कायदा, जमिन धारणा कायदा). 

डाव्या विचारधारेच्या नेत्यांनी या आंदोलनात शिरकाव करून आपले धोरण समोर आणले आहे. कुणाच्याच दबावात येवून हे कायदे मागे घेतल्या जावू नयेत असा आमचा आग्रह आहे. 


आपले विनीत


गुणवंत पाटील हंगरगेकर (महाराष्ट्र), मणिकंदन (तामिळनाडू), अजय वडियार (तेलंगाना), गुणी प्रकाश (हरियाणा), बाबु जोसेफ (केरळ), बिनोद आनंद (बिहार), कृष्ण गांधी (उत्तर प्रदेश), अविनाश प्रताप सिंह (मध्य प्रदेश), ऍड. दिनेश शर्मा (महाराष्ट्र) 


सदस्य 

अखिल भारतीय किसान समन्वय समिती 


या निवेदनांतून किसान समन्वय समितीने आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे समोर मांडली आहे. पंजाबी शेतकर्‍यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देणारे सर्व घटक हे शेतकर्‍याला परत एकदा समाजवादी पद्धतीचा भीकवाद शिकवत आहेत.  शरद जांशींनी शेतकर्‍यांना स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. तो मार्ग शेतकर्‍याचे तर हित साधणारा आहेच पण त्या सोबतच देशाचेही हित साधणारा आहे. कुठल्याही स्थितीत परत एकदा जुन्या समाजवादी भीकवादी मार्गाने जाणे देशाला आणि शेतकर्‍यालाही परवडणारे नाही. झाले तेवढे नुकसान पुरे. ‘मुझपे इतना आखरी ऐहसान करो के अबके बाद मुझपे कभी ऐहसान मत करो.’ अशीच ही भूमिका आहे. महात्मा गांधी म्हणायचे गरिबांसाठी काही करण्यापेक्षा आधी त्याच्या छातीवरून उठा. तसंच आता हे कायदे शेतकर्‍यांच्या छातीवरून उठण्याची बात करत असतील तर परत हे समाजवादी धोरणाचे भूत आमच्या छातीवर नकोच अशी स्पष्ट भूमिका किसान समन्वय समितीची आहे. या भूमिकेचे मन:पूर्वक स्वागत.


              श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  

मूर्ती मालिका - १७



विष्णुची वराह मूर्ती
मत्स्य, कुर्म या नंतर तिसरा अवतार वराह मानला जातो. वैष्णव मंदिरांवर वराह अवताराच्या मूर्ती प्रामुख्याने आढळून येतात. ही वराहमूर्ती जाम (ता. जि. परभणी) येथील प्राचीन मंदिरावरची आहे. मुख वराहाचे व शरिर मानवाचे अशी स्थानक मूर्ती (म्हणजे उभी) या प्रकारातील हा नृवराह म्हणून ओळखला जातो. उजव्या खालच्या हातात गदा आहे. वरच्या हातात पद्म आहे. त्यातही वैशिष्ट्य म्हणजे वरती कमळ फुललेले तर खालच्या बाजूस कळी आहे. डावा मुडपलेला हात आहे त्यावर लक्ष्मी विराजमान आहे. त्या हातात शंख आहे. डाव्या खालच्या हातात चक्र आहे. डावा पाय शेष नागाच्या फण्यावर टेकवला आहे. शिवाय कासवही या पायाखाली आढळून येते. मूर्तीला सुंदर अलंकारांनी मढवले आहे. शंख पकडला त्या हातात शंखाला पकडण्यासाठी सोन्याची साखळी गुंफावी असाही दागिना दिसून येतो. शंखाच्या खोबणीत बोटं बरोबर बसवली आहेत. शंख कसाही पकडला आहे असे नाही. उजव्या हाताची गदा ऐटदारपणे जमिनीवर रोवलेली आहे. सगळ्याच मूर्तीला एक छानसा डौल प्राप्त झालेला आहे. जामचे मंदिर वैष्णव मंदिर असल्याने विष्णुने सुंदर कलात्मक प्रतिमांचे अंकन यावर आढळून येते.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.
(छायाचित्र सौजन्य
Arvind Shahane



वेरूळ लेण्यातील वराह अवतार शिल्प
काल जाम येथील वराह अवतार शिल्पाची चर्चा केली होती. तेंव्हा कैलास लेण्यातील याच शिल्पाचा विषय निघाला होता. हे शिल्प वेरूळच्या लेणी क्र. १४ मधील आहे. या लेणीला "रावण की खाई" म्हणून ओळखले जाते. हिरण्याक्षाने वसुंधरेला समुद्रतळी नेले होते. विष्णुने वराह अवतार घेवून तिला वर काढले अशी कथा आहे.
नागाच्या आभोगावर, वेटोळ्यावर उभा असणारा वराह. एक पाय पुढे, एक हात कमरेवर. याला आढील आसन म्हणतात याला. काहीतरी जगावेगळा पराक्रम करून पृथ्वीला पाण्या बाहेर काढलेला आश्वासक आवेग जाणवतो इथे. पृथ्वी अतिशय मनापासून हुश्श म्हणून त्याला धन्यवाद म्हणत असावी इतकी सहज सुंदर आहे. तिच्या कानात असणारे एक कुंडल माने जवळ आहे तर दुसरे लांब आहे.
खाली बाजूला हिरणाक्ष आणि त्याची पत्नी हात जोडून उभ्या असलेल्या दिसतील. पाताळ, पाणी असणारा प्रदेश, इतर असंख्य गोष्टी आणि नाग देवता यांचे नाते सर्वश्रुत आहे.
इथे वराहाने धरलेले चक्र आणि पृथ्वीची त्रिभंग मूर्ती खूप महत्त्वाची. हातात चक्र नेमकेपणाने धरले आहै. महाभारत मालिकेत मध्ये नितीश भारद्वाज किंवा सगळे नर्तक धरतात तसे कधीही धरत नाहीत.
भुदेवीने आपला उजवा हात वराह मुखावर सहजपणे टेकवला आहे. तिच्या दूसर्या हातात कमंडलू दिसत आहे. पाठीमागे अर्धवर्तूळांतून समुद्र सुचीत केलेला आहे. वराह अवतार शिल्प मराठवाड्यात बर्याच ठिकाणी आढळून येतात.
वराह अवताराचे या प्रदेशातील हे सर्वात भव्य शिल्प आहे.
(पुरक माहिती
Rahul Deshpande
यांनी दिली)
छायाचित्र सौजन्य
Travel Baba Voyage



योगमुद्रेतील विष्णु
जाम (ता.जि.परभणी) येथील मंदिरावर बाह्यभागात दशावतार मूर्ती शिल्पांकित आहेत. त्यावरून या मूर्तीला चुकून बौद्ध अवतारातील विष्णु संबोधले जाते. पण मूर्तीला चार हात असून वरच्या दोन हातात शंख आणि चक्र स्पष्ट दिसत आहेत. त्यावरून हा विष्णु असल्याचे स्पष्ट होते. खालील दोन हात योगमुद्रेत असून उजव्या हातात पद्म आहे. पद्ममासनातील ही मूर्ती दूर्मिळ आहे. अशीच मूर्ती उमरगा येथील शीव मंदिरावर देखील आहे. योगासनातील या विष्णुमूर्तीवर अलंकरण अतिशय किमान दाखवलेले असते. मस्तकापाठिमागे प्रभावळ दिसून येते. याच मूर्तीला हातातील आयुधांच्या क्रमावरून "आसनस्थ केशव" असे संबोधन देगलुरकरांनी आपल्या संशोधनात वापरले आहे. गदेचा अपवाद वगळता बाकी आयुधांचा विचार केल्यास ते बरोबरही वाटते.
या योगमुद्रेतील मुर्तीचे बुद्ध मुर्तीशी साम्य चटकन डोळ्यात भरते. याच परिसरातील विष्णु मुर्तींवर दशावतारांचे अंकन दाखवत असताना ९ वा अवतार बुद्ध दाखवला जातो. औंढा येथील केशव मुर्तीवर तो दाखवलेला आहे.
छायाचित्र सौजन्य
Arvind Shahane
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

मूर्ती मालिका -१६



गणेशासोबत नृत्यमग्न उंदीर उंदरी
गणेशाच्या विविध मोहक शिल्पकृती मंदिरांवर आढळून येतात. यातील नृत्यगणेश तर खुपच सुंदर आहेत. घोटण (ता. शेवगाव जि. नगर) येथील खांबांवर पशु पक्षांची शिल्पे ठळकपणे आढळून येतात. छायाचित्रातील शिल्पाने मला चकितच केले. शिल्पात नृत्य करणारा गणेश आहे. पण त्याच्या सोबत कोण आहे? तर दोन उंदीर दिसत आहेत. कमरेखाली उंदीर आणि वर मनुष्य. यातही परत डाव्या बाजूला आहे ती स्त्री तर उजव्या बाजूला पुरूष. उंदरी नाचत आहे तर उंदीर झांज वाजवत आहे. या मंदिरातील पशुपक्षांची शिल्पे संख्येन जास्त आणि ठळक आहेत. या शिल्पात गणपतीचे वाहन म्हणून छोटासा उंदिर न दाखवता त्याच्या सोबत नृत्य करणारी तेवढ्याच आकाराची ही उंदिर नवरा बायकोची जोडी. या कलाकाराच्या कल्पकतेला सलाम. (या आकृती किन्नरांच्या आहेत असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यावर इतर अभ्यासकांनी प्रकाश टाकावा.)

(छायाचित्र Vincent Pasmo




अशोक वनात हनुमान
घोटणच्या मल्लिकार्जूनेश्वर मंदिरात (ता. शेवगांव जि. नगर) पशुपक्ष्यांची शिल्पे लक्षणीय आहेत हे मी आधी सांगितले होतेच. या शिल्पात सीतेच्या शोधातील हनुमान दाखवला आहे. शिल्पाची झीज झाली शिवाय मोडतोड झाल्याने आधी लक्ष्यात नाही आले. तेथील पुजार्याने सांगितल्यावर नीट लक्ष्य देवून बघितले. मग हनुमानाने पुढे केलेले बोट म्हणजे तो सीतेला अंगठी दाखवतोय हे लक्ष्यात आले. बाजूला दोन बलदंड स्त्रीया म्हणजेच राक्षसी आहेत. अंगठी दिसताच सीतेने मान वरती केली, अंगठीसाठी हाताची ओंजळ पुढे केली. एरव्ही सीता खाली मान घातलेली दाखवली जाते. पण रामाची अंगठी दिसताच ती आनंदली. या शिल्पकाराने नेमका हा क्षण टिपला आहे. मागची अशोकाचे खोड सरळ न दाखवता कलात्मक असे त्रिभंग मुद्रेत उभ्या असलेल्या सुरसुंदरी सारखे दाखवले आहे. हनुमान हा आकाराने लहान होवून सीते समोर उभा राहिला असे वर्णन रामायणात आहे. इथे शिल्पकाराने त्याचाही विचार केलाय हे विशेष. बसलेल्या सीतेइतकीच हनुमानाची उंची आहे.
जेंव्हा हे शिल्प संपूर्ण चांगल्या स्थितीत असेल तेंव्हा त्याचे सौंदर्य काय आणि किती असेल. आज केवळ अवशेषांवरून अंदाज लावला तर त्याचे सौंदर्य जाणवते. मंदिरावरची छोटी शिल्पे आकारामुळे दूर्लक्षीत राहतात पण त्यांच्यातही मोठा अर्थ दडलेला असतो.
(छायाचित्र
TravelBaba
)  



मानस्तंभावरील जैन देवता
चारठाणा (ता. जिंतूर जि. परभणी) येथ ३४ फुटी उंच भव्य सुंदर आणि कलात्मक असा मानस्तंभ आहे. याचा कालखंड १३ व्या शतकातील आहे. पैठण आणि वेरूळच्या कैलास लेण्यात असलेल्या स्तंभांशी याची तूलना करता येते. याच्यावर चार दिशांना चार मातृदेवता कोरलेल्या आहेत. देवतांच्या वर छोट्या देवकोष्टकात जैन तीर्थंकारांच्या मूर्ती असल्याने या जैन मातृदेवता असल्याचे अनुमान निघते.
पूर्वेकडील चक्रेश्वरी जिच्या हातात चक्र असून वाहन गरुड ,उत्तरेकडील पद्मावती जिचे वाहन हंस , पश्चिमेकडील अंबिका जिचे वाहन सिंह , दक्षिणेकडील ज्वालामालिनी जिचे वाहन वृषभ व अष्टभुजा .
याच स्तंभाच्या समोर मंदिराच्या द्वारशाखेवरील तोरणाचे अवशेष आढळून येतात. इथे उत्खननास परवानगी मिळाल्यास मंदिर सापडण्याची शक्यता अभ्यासक ज्यांनी या मूर्तीवर/ स्तंभावर संशोधन केलेले
Laxmikant Sonwatkar
हे सांगतात.
हा सगळा परिसर निव्वळ उकिरडा बनला आहे. स्वच्छता अभियान राबवून गावकरी प्रयत्न करत आहेत. पण उत्खननास परवानगी आणि निधी मिळाल्या शिवाय इथला प्रश्न निकाली निघणार नाही. सरकारी निधी न मिळाल्यास जैन संघटनांनी याकडे लक्ष द्यावे निधी उपलब्ध करून द्यावा ही कळकळीची विनंती.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

Tuesday, December 15, 2020

डाव्यांच्या कृषी आंदोलनाचा ‘अण्णु गोगट्या’ झाला


उरूस, 15 डिसेंबर 2020 

व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांत पुलंनी अंतु बर्वा हे एक अफलातून व्यक्तिमत्व चितारले आहे. या लेखात गावांतील अण्णु गोगटे वकिल प्रत्येक निवडणुकीत पडायचे त्यामुळे विहिरीत पोहरा पडला तरी त्याचा ‘अण्णु गोगट्या झाला’ असे अंतू बर्वा यांच्या तोंडी वाक्य आहे. 

कृषी आंदोलनात डावे घुसले आणि त्या आंदोलनाचा ‘अण्णु गोगट्या’ झाला असेच आता म्हणावे लागेल. एखादे आंदोलन आपला मुळ हेतू विसरून कसे भरकटत जाते आणि त्यामागे हे डावे आपल्या सोबत इतर पुरोगामी टोळीची पण बौद्धिक फरफट करतात. याचे ताजे उदाहरण दिल्लीत चालू असलेले कृषी आंदोलन.

किमान आधारभूत किंमत आणि त्याप्रमाणे होणारी शासकीय खरेदी हा आंदोलनातील सगळ्यात कळीचा मुद्दा होता. सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी लागणारे धान्य (पी.डि.एस.) खरेदी करणारी सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीची (ए.पी.एम.सी.) व्यवस्था अबाधीत रहावी अशी प्रमुख मागणी होती. वस्तुत: आंदोलन सुरू झाले तेेव्हाच याला तत्वश: मंजूरी मोदी सरकारने दिली होती. चर्चेनंतर तसे लेखी आश्वासन देण्याची पण तयारी दर्शवली होती. या शासकीय खरेदी मध्ये गहु आणि तांदळाची खरेदी केली जाते. ही बहुतांश खरेदी पंजाब आणि हरियाणातून होते. 
यातील शेतकर्‍यांच्या मागण्या आणि त्याला सरकारने दिलेले उत्तर हा वेगळा विषय आहे. पण डाव्यांनी या आंदोलनात घुसून आपल्या बौद्धिक भ्रष्टाचाराचा पुरावाच कसा दिला ते आपण पाहू. 

पहिला मुद्दा होता तो मेधा पाटकर सारख्या नेत्यांचा. सरदार सरोवर प्रकल्पाला विरोध करत नर्मदा बचाव आंदोलन त्यांनी उभारले. त्यासाठी कडवी झुंज दिली. ‘डुबेंगे पर हटेंगे नही’ अशा घोषणा दिल्या. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल  विरोधात गेल्यावरही आपला आडमुठपणा सोडला नाही. नर्मदेवरील सरदार सरोवर प्रकल्पामुळे गुजरातच्या कच्छ भागातील कोरडवाहू शेतकर्‍यांना पाणी मिळणार होते. शेतीला तर सोडाच पण पिण्याच्या पाण्याचाही मोठा दुष्काळ त्या भागात होता. मेधा पाटकरांच्या आंदोलनास या भागातील शेतकर्‍यांनी सामान्य जनतेने तीव्र विरोध केला. सरदार सरोवरातील कळशीभर पाणी कच्छकडे जाणार्‍यां पाटांमध्ये सोडून या शेतकर्‍यांनी सामान्य जनतेने आंदोलनही केले होते. मग तेंव्हा शेतकरी विरोधी असलेल्या या मेधा पाटकर आता या आंदोलनात शेतकर्‍यांच्या बाजूने कशा काय उभ्या आहेत? 

जे शेतकरी आंदोलन करत आहेत ते गहु तांदूळ पिकवणारे आहेत. ही पीकं पाण्यावरची आहेत. म्हणजे या डाव्यांच्या भाषेत ‘पाणीवाले बडे शेतकरी’. कालपर्यंत हे यांच्या विरोधात बोलत होते. पाणीवाले विरूद्ध कोरडवाहू, बडे शेतकरी विरूद्ध छोटे शेतकरी, नगदी पिकवाले शेतकरी, भांडवली विळख्यात शेती अशी भाषा डाव्यांची असायची. मग आता हे या पाणीवाल्या बड्या बागायतदार शेतकर्‍यांच्या बाजूने कसे काय रस्त्यावर उतरले आहेत? 
पर्यावरणावादी आंदोलनातील लोकांनी सातत्याने पंजाबातील भात शेतकर्‍यांच्या विरोधात आवाज उठवला होता. हे भातवाले शेतकरी भाताचे तुस जाळतात. परिणामी प्रदुषण होते आणि दिल्लीतली हवा विषारी बनते. मग आता हे पर्यावरणवादी सगळे या आंदोलनात याच भाताच्या म्हणजेच तांदळाच्या शेतकर्‍यांच्या बाजूने कसे काय आहेत? 
तांदळासारखे पीक हे जास्त पाणी घेणारे आहे. शिवाय सध्या देशात तांदळाचे जास्तीचे उत्पादन होते आहे. अशा स्थितीत तांदळाचे उत्पादन घेवू नका असे सांगायची गरज आहे. या जास्तीच्या तांदळाची खरेदी शासनाने एमएसपी प्रमाणे करावी, त्याचा कायदा करावा अशी मागणी यांच्याच विचारसरणीच्या विरोधातील आहे. हे यांना कळत नाही का? आणि जर कळत असेल तर असा बौद्धिक भ्रष्टाचार हे काय म्हणून करत आहेत? 

भारतभर गहू आणि तांदूळ पिकतो. तो काय केवळ पंजाब आणि हरियाणातच पिकतो असे नाही. मग असे असताना किमान आधारभूत किमतीने (एम.एस.पी.) सरकारी खरेदी पंजाब आणि हरियाणालाच उजवे माप का? सरकारने ही खरेदी भारतभर खुली निविदा काढून करावी.  एकाधिकारशाहीला विरोध करणारे डावे पंजाब हरियाणातील शेतकर्‍यांची गहु तांदळाच्या बाबतीत सरकारी खरेदीतील जी एकाधिकारशाही निर्माण झाली आहे तिची काय म्हणून भलावण करत आहेत? चालू हंगामात मध्यप्रदेशातून पंजाब आणि हरियाणापेक्षा जास्त खरेदी झाली आहे. यातून मध्यप्रदेशाच्या शेतकर्‍यांना काही एक फायदा मिळू शकला आहे. हे डाव्यांना मंजूर नाही का?  
जसे की कामगारांच्या संघटना बांधत असताना यांनी केवळ संघटित कामगार आणि कर्मचार्‍यांकडेच लक्ष दिले. या उलट विखुरलेले असंघटित क्षेत्रातील कामगार दुर्लक्षिले. त्याच प्रमाणे गहु आणि तांदळाचे पंजाब हरियाणातील संघटीत ट्रॅक्टरवाले शेतकरी यांना दिसतात पण भारतभर विखुरलेले गरिब सामान्य शेतकरी (ही यांचीच भाषा आहे. शेतकरी संघटनेत शरद जोशींनी कायम शेतकरी तितुका एक एक अशीच भाषा वापरली.) दिसत नाहीत असेच म्हणावे लागेल. 

नविन कृषी कायद्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची मक्तेदारी मोडकळीस येणार आहे. त्यामुळे साहजिकच त्या मंड्यांमधील दलाल हमाल मापाडी व्यापारी यांचे हितसंबंध धोक्यात आले आहेत. डावे सतत दलित शोषितांची भाषा करत आले आहेत. मग आता ते या दलाल हमाल मापाडी व्यापारी यांची बाजू घेणार्‍या आंदोलनात का उतरले आहेत? खरेदी करणारे जास्त लोक बाजारात उतरले तर उत्पादकाचा फायदाच होतो. शेतकर्‍याच्या बांधावरून खरेदी करण्यासाठी स्पर्धा सुरू होईल. मग हे डावे नेमके या सामान्य कष्टकरी शेतकर्‍याचा फायदा करणार्‍या कायद्यांच्या विरोधात कसे काय? 

या आंदोलनातून अजून एक गंभीर मुद्दा समोर येतो आहे. पाणीवाल्या पिकांना विरोध करताना कोरडवाहूची पिके दुर्लक्षीत राहत आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये  (रॅशनिंग पी.डि.एस.) ज्वारी, बाजरी, मका यांची खरेदी व्हावी अशी आग्रही मागणी डावे का लावून धरत नाहीत? ज्यांना भरड पीके म्हणतात त्यांची खरेदी रॅशनिंग मध्ये झाली पाहिजे. त्या पीकांना हमीभावाचा फायदा (जो मिळतो असा यांचा भ्रम आहे) मिळावा अशी मागणी का नाही केली जात? 

पाण्यावरची पीके बड्यांची आहेत ते श्रीमंत शेतकरी आहेत अशी मांडणी करणारे मग कोरडवाहू पीके बाजरी- मका- हलकी ज्वारी- मुग- सोयाबीन- तुर- हुलगा-नाचणी-वरी यांची भलावण का करत नाहीत? यांच्या बाबतीत आंदोलन का उभारत नाहीत? (हे मुद्दे या आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या पत्रकावर सहि करणार्‍या राजन गवस यांच्याच कादंबरीतील आहेत).   

डाव्यांनी अलीकडच्या काळात जी जी आंदोलने पुकारली किंवा समोर आलेल्या आंदोलनात घुसखोरी केली त्या सर्वांचा फज्जा उडालेला दिसून येतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने पण अशा प्रकरणांमध्ये फटकार लगावली आहे. शाहिनबाग प्रकरणांतही हेच घडले. कश्मिरबाबतचे 370, तीन तलाक, सीएए सर्व ठिकाणी हेच घडले. संख्यात्मक पातळीवर किंवा राजकीय पातळीवर ही आंदोलने फसली हा वेगळा मुद्दा. पण वैचारिकदृष्ट्या यंाचा ‘अण्णु गोगट्या’ झाला हे डाव्यांच्या बाबतीत जास्त महत्त्वाचे आणि त्यांच्या दुष्टीने शोकांतिका ठरणारे आहे. एकमेकांना विरोध करणारे समाजवादी-साम्यवादी- गांधीवादी-पर्यावरणवादी हे सगळेच या बौद्धिक भ्रष्टाचारात एकमेंकांच्या हातात हात घालून समोर आले आहेत हे पण दिसून येत आहे.

              श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575