उरूस, 10 डिसेंबर 2020
बरोबर 34 वर्षांपूर्वी म्हणजेच 10 डिसेंबर 1986 रोजी कापसाच्या आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केला. हिंगोली जिल्ह्यातील सुरेगांव पाटी येथे तीन शेतकरी या गोळीबारात शहिद झाले.
आज नेमके असेच शेतकरी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर आंदोलन करत बसून आहेत. आज तरी सरकार शेतकर्यांशी बोलणी करत आहे. तेंव्हा कसलीच बोलणी करायला सरकार तयार नव्हते. शेतकर्यांची काय मागणी होती? कापुस एकाधिकार योजनेत शेतकर्याची लूट होत होती. कापसाला भाव वाढून मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कापसाला चांगली किंमत मिळत होती आणि इकडे भारत सरकार मात्र आपल्याच शेतकर्यांचे शोषण करत होते.
आज जे डावे समाजवादी पर्यावरणवादी बुद्धीजीवी सरकारी हस्तक्षेप सरकारी खरेदी यांचे जोरदार समर्थन करत आहेत, एमएसपी प्रमाणे सर्वच खरेदी व्हावी असा आग्रह धरत आहेत त्यांनी याचे उत्तर द्यावे की 34 वर्षांपूर्वी सर्व काही सरकारी असताना हेच शेतकरी आंदोलन का करत होते?
आज जे शेतकरी आंदोलन करत आहेत ते गहू आणि तांदूळ ही पीके घेणारे आहेत. ही पीकं बागायती आहेत म्हणजेच पाण्यावर येणारी पीके आहेत. तेंव्हा जे शेतकरी आंदोलन करत होते ते कापसाचे म्हणजेच कोरडवाहू पीकाचे होते. मग हे डावे ज्यांना बडे शेतकरी बागायतदार शेतकरी म्हणून हिणवायचे त्यांचा उपहास करायचे त्यांच्या आंदोलनाला हे पाठिंबा कसा काय देत आहेत? आणि बरोबर 34 वर्षांपूर्वी जे कोरडवाहू पीकांच्या आंदोलनात रस्त्यावर उतरले होते त्या शेतकर्यांना यांचा विरोध कसा काय होता?
10 डिसेंबर 1986 ही तारीख महाराष्ट्रात अजून एका कारणाने लक्षात ठेवेल. आज जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत त्यात कोण कोणते पक्ष आहेत? सगळ्यात प्रमुख आहे राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष. याच पक्षाचे 1986 ला पंतप्रधान होते राजीव गांधी. राजीव गांधी यांच्या कृत्रिम धाग्यांना पाठिंबा देण्याच्या धोरणाने कापसाची माती केली होती. याच पक्षाचे मुख्यमंत्री होते मा. ना. शंकरराव चव्हाण. त्यांचेच सुपुत्र माजी मुख्यमंत्री आणि आजचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नांदेड जवळच हे आंदोलन तेंव्हा झाले होते. या शेतकर्यांना गोळीबार करण्याचा आदेश देणारे शंकरराव चव्हाणच होते.
अजून एक नाव या संबंधात लक्षात घ्यावे लागेल. देशाचे सलग सर्वात जास्त काळ कृषी मंत्री राहिलेले मा. शरद पवार हे तेंव्हा समाजवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते होते. याच वर्षी म्हणजेच 1986 ला एकीकडे कापूस शेतकर्यांचे आंदोलन पेट घेत होते त्याच काळात अगदी त्याच वेळी नोव्हेंबर महिन्यात याच परिसरांत औरंगाबाद शहरात आमखास मैदानावर मोठा मेळावा भरला होता. हा मेळावा म्हणजे मा. शरद पवार यांचा कॉंग्रेस पक्षातील प्रवेश सोहळा होता. त्याला पंतप्रधान राजीव गांधी आणि जम्मु कश्मिरचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रिय मंत्री आणि आताचे गुपकार गटाचे प्रमुख मा. फारुख अब्दूला हजर होते. एकीकडे शेतकरी कापसाच्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला होता. तीन शेतकरी भाउ पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडले होते. त्या रक्ताने माखलेल्या भूमीवर आज आंदोलनाचे समर्थन करणारे आपले राजकारण सार्थ करत होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मा. शरद पवार आणि कॉंग्रेसचे सर्वच नेते यांना कुणीतरी पत्रकाराने हा प्रश्न विचारायला पाहिजे होता की 34 वर्षांपूर्वी कोरडवाहू कापुस शेतकर्यांच्या आंदोलनाला तूम्ही का विरोध केला होता? आणि आजच्या बागायती पीकांच्या शेतकर्यांच्या आंदोलनाला का पाठिंबा देत आहात? तेंव्हा सरकारी खरेदी च्या विरोधात शेतकर्यांत असंतोष होता. आज या जोखडातून शेतकरी मोकळा होउ पहात आहेत. कृषी कायद्याने शेतकर्याच्या स्वातंत्र्याच्या दिशेने पाउल उचलले आहे. ते पाउल मागे घ्या म्हणून डावे आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रचाराला पंजाबातील काही शेतकरी बळी पडले आहेत. यांना हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवाले कोणत्या तोंडाने पाठिंबा देत आहेत?
शेतकरी संघटनेने 1980 पासून शेतकरी स्वातंत्र्याची मागणी केली. कुठलाही वैचारिक गोंधळ न ठेवता अतिशय स्पष्टपणे सरकारी हस्तक्षेप उठवून लावण्याची मागणी लावून धरली. आजचे शेतकरी आंदोलन नेमक्या त्याच्या उलट सरकारने किमान हमी भाव देवून खरेदी करावी असा आग्रह धरत आहेत. कालची मागणी आमची सुटका करा, तूम्हाला सुटका करता येत नसेल तर बाजूला व्हा आम्ही आमचे स्वातंत्र्य मिळवतो. पिंजर्याचे दार उघडा नसता आम्ही पिंजरा तोडतो अशी होती. फक्त तूम्ही पिंजर्याला बाहेरून कुलूप लावू नका. अशी होती.
आजची मागणी मात्र पिंजरा चांगला कसा करा, त्याला रंग कसा द्या इतकंच नाही तर पिंजरा सोन्याचा करा, पेरूच रोज न देता डाळिंबाचे दाणे द्या, फळांमध्ये विविधता कशी येवू द्या, पिंजरा कधी घरात कधी गॅलरीत कधी बागेत नेवून कसा ठेवा अशी आहे. चुकूनही पिंजर्याचे दार उघडा अशी मागणी नाही.
कोरडवाहू पिकासाठी आंदोलन करताना आम्हाला स्वातंत्र्य द्या म्हणत शेतकरी शहिद झाले. आणि याच्या उलट आज बागायती पिकाचे, मोठ्या प्रमाणात संरक्षण असलेले, सरकारी खरेदीची कवच कुंडले लाभलेले पंजाबातील शेतकरीही सरकारच्या गळ्यात पडून आम्हाला वाचवा म्हणून गळा काढत आहेत.
कालपर्यंत शेतकर्याच्या विरोधात उभे असलेले मेधा पाटकर, योगेंद्र यादव आणि सगळेच पर्यावरणवादी समाजवादी डावे आज शेतकर्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसून येत आहेत. यातूनच या आंदोलनाचे वैचारिक पितळ उघड पडताना दिसत आहे.
निवृत्ती कर्हाळे, परसराम कर्हाळे आणि ग्यानदेव टोंपे या शेतकर्यांचे बळी सरकारी हस्तक्षेपाच्या धोरणाने घेतले. त्यांचे आत्मे आज स्वर्गात हळहळत असतील की आज पंजाबचे शेतकरी आपल्या मागणीच्या नेमक्या उलट्या मागणीसाठी आंदोलन करताना दिसत आहेत.
दोन दिवसांनी म्हणजेच 12 डिसेंबर रोजी युगात्मा शरद जोशी यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी शेतकर्याला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. सरकारी पिंजरा तोडायची दिशा दाखवली. त्यांच्या या खडतर मार्गावर चालताना 23 शेतकरी भाउ शहिद झाले. शेतकरी आंदोलनातील 23 हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेला लाल रंगाचा बिल्ला शेतकरी विचाराचा पाईक सतत आपल्या छातीवर अभिमानाने लावत असतो. तेंव्हा या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, शरद जोशींना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी आपण सर्व शेतकरी स्वातंत्र्याची शपथ घेवू या. आताच्या भीकमाग्या शेतकरी आंदोलनाचा संपूर्ण पराभव होईल यासाठी प्रयत्न करू या.
कृषी कायद्याने शेतकरी स्वातंत्र्याची पहाट होताना दिसत आहेत. आपण त्याचे स्वागत करू.
यूं खूं की महक है के लबे यार की खुशबू
किस राह की जानिब से सबा आती है देखो!
गुलशन मे बहार आई के जिंदा हुवा आबाद?
किस सिम्त से नग्मों की सदा आती है देखो !
(हा रक्ताचा दरवळ आहे की प्रियेच्या ओठांचा सुगंध? हा पूर्वेकडून येणार्या पहाटवारा कोणत्या वाटेने येत आहे ते पहा. वसंत ऋतु फुलला आहे की तुरूंग गजबजला आहे. कोणत्या दिशेने गाण्याचे स्वर ऐकू येत आहेत- सुरेश भट यांनी आपल्या एल्गार कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत या ओळींचा उल्लेख केला आहे.)
शेतकरी आंदोलनातील सर्व शहिदांना आणि मा. शरद जोशी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन.
शेतकरी स्वातंत्र्याचा विजय असो! इडा पीडा टळणार आहे बळीचे राज येणार आहे !!
(छायाचित्रातील शहिदांचे पुतळे गावकर्यांनी पै पै गोळा करून पदरचे पैसे खर्चूृन खासगी देणगी मिळालेल्या जमिनीवर उभारले आहेत. सरकारी जमिनीवर नेत्यांची स्मारकं सरकारी खर्चाने उभे करणार्यांनी याची नोंद घ्यावी. या शेतकरी भावांची माय बहिणींची नियत साफ आहे. हीच शेतकरी चळवळीची शरद जोशींची पुण्याई आहे.)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575