Monday, November 30, 2020

मूर्ती मालिका -१२


औंढ्या नागनाथचा केवल शिव

शिवाची मूर्ती ज्या आणि जितक्या विविध भावमूद्रेतल्या आढळून येतात तशा इतर कुठल्याच देवतेच्या नाहीत. औंढा नागनाथच्या प्राचीन मंदिरावर शिव विविध मूर्तीं पैकी हा एक वैशिष्ट्यपूर्ण "केवल शिव".
शिवाचा उजवा खालचा हात वरद मूद्रेत असून त्यावर अक्षमालाही आहे. उजव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. डाव्या वरच्या हातात नाग धारण केला आहे. वैशिष्ट्य म्हणजे या नागाचा शेपटाकडचा भाग खाली भक्तांच्या माथ्यावर आशिर्वाद वाटावा असा पसरला आहे. उजव्या त्रिशुलधारी हातात तोडे आहेत. पण डाव्या नाग धारण केलेल्या हाताला सर्पाचाच वेढा तोड्या सारखा दाखवला आहे. कलात्मकतेची कमाल आहे. डाव्या खालच्या हातात बीजपुरक आहे. शिवाच्या उजव्या बाजूला नंदी बसलेला आहे.
शिवाची आभुषणेही उग्र रूपातच दाखवली जातात. पण इथे केवल रूपात ही आभुषणे जाडसर ठोकळच पण कलात्मक दाखवून शिल्पकाराने आपल्या प्रतिभेची पावतीच दिली आहे. पायात रूळणारी नररूंडमाळ इथे जाडसर दागिना दर्शवली आहे. कानात झुलणारे वर्तूळाकार कुंडल, यज्ञोपवितही कलात्मकरित्या खाली जावून परत वर मेखलेच्या पट्टीत अडकवले आहे.मुद्रा केवळ सौम्य नसून जरासे स्मित करणारी आहे. या मुर्तीच्या वरच्या हातातील त्रिशुळ, सर्प आणि खालचा नंदी झाकला तर आपण खुशाल याला विष्णु म्हणू शकतो. खालच्या भक्तांसोबत एक चामरधारिणीही आहे.
केवल शिवाचा अर्थ एकट्या शिवाची मूर्ती असा ढोबळ नाही. उत्पत्ती स्थिती लय यात लयाची देवता असलेल्या शिवाची केवल शिवाची मूर्ती फार वेगळं काही सुचवते. जिर्ण झालेलं, नकोसं असलेलं, विहित कार्य संपलेलं ते मी नष्ट करतो. आणि नविन सुंदर रसरशीत अर्थपूर्ण जगण्याला निर्माण होण्यासाठी जागा करून देतो असा व्यापक सुंदर अर्थ "केवल शिवा"चा लावता येतो. सनातन धर्मात मृत्युला वाक्याच्या शेवटचा पूर्णविराम न मानता दोन वाक्याच्या मधला ठिपका मानतात. (पूनर्जन्म संकल्पना) केवल शिवाची ही किंचित स्मित शांत मूद्रा त्या आगामी जिवाच्या स्वागतासाठी उत्सुक अशी आहे. शिवलीलामृतात
कारूण्य सिंधू भवदू:ख हारी
तूजवीण शंभो मज कोण तारी
अशी प्रार्थना याच आर्ततेतून उमटते.
महाकवी गालिबला आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या काशी विश्वनाथ मंदिर, तो परिसर आणि आख्या काशी नगरीचेच फार अप्रुप वाटले. त्याने या शहरावर फार्सीत कविता लिहिली. (गझल नाही, नज्म म्हणजे कविता) शिवाच्या सान्निध्यात आपल्याला शांती लाभली हे वर्णन करणारी गालिबची ही कविता. मूळ कविता फार्सी. तिचे नाव "चराग-ए-दैर".त्याचा गद्य अनुवाद निशिकांत ठकार सरांनी केलाय. पद्य अनुवाद मी केलाय.
दिव्यांचे देऊळ
आपल्या रंगभर्या मस्तीने
स्वर्गाला लाजविणार्या बनारसला
न लागो कुणाची वाईट नजर
पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे म्हणतात
इथल्या मरणाला लाभतो
अमरत्वाचा जर
हे मंदिर आहे
रंगीबिरंगी आश्चर्याचे जग
इथल्या वसंतात
सदोदीत फुलण्याची धग
इथे शरद बनून राहतो
उजळ कपाळीचा चंदनटिळा
आणि वसंतवारा घालतो
फुललहरींचे जानवे
इथली धुसर संध्या
स्वर्गीच्या भुवयांमधल्या
कुंकवागत जाणवे
पैगंबराला दिसलेल्या दिव्य प्रकाशापासून
घडलेल्या इथल्या मूर्ती
त्यांच्या चेहर्यावर
गंगेकाठच्या दिव्यांच्या
लवथवत्या उत्साहाची पूर्ती
सूर्य-चंद्र जेंव्हा रेंगाळतात
पूर्व क्षितीजावर टेहळण्यासाठी
ही काशी सुंदरी उचलते गंगेचा आरसा
आपले लावण्य न्याहळण्यासाठी
तार्यांनी खच्चून भरल्या एका रात्री
विशुद्ध भाव बाळगून गात्री
मी विचारले एका साधुला
महाराज,
या दु:खी जगातून
निष्ठा-प्रेम-भलेपणा-विश्वास
यांनी घेतला अखेरचा श्वास
बापलेक दाबताहेत परस्परांचा गळा
भावाचा भावाच्या वाईटावर डोळा
सार्या कोमल भावनांचा
झाला लय
मग का होत नाही प्रलय ?
का वाजत नाही शेवटची रणभेरी ?
अंतिम संहाराची
कोणा हाती दोरी ?
मंद हसू ओठांवर खेळवत
प्रेमभाव डोळ्यांत मिळवत
तो म्हणाला
ही नगरी आहे
विधात्याचे प्रिय काळीज-वतन
तो होऊ देणार नाही ही नष्ट
वा हीचे पतन
हे एैकून अभिमानाच्या गुलालाने
भरून गेले बनारसचे कपाळ
विचारांच्या पंखांना शिवता येऊ नये
असे उंचावले बनारसचे आभाळ
हा केवल शिव पाहून मला गालिबच्या या ओळी आठवल्या.
(छायाचित्र
Travel Baba
.)



लक्ष्मी नारायण अलिंगन मूर्ती
औंढा नागनाथ मंदिर ज्योतिर्लिंग मंदिर आहे तेंव्हा स्वाभाविकच शिवाच्या मूर्तींचे प्रमाण अधिक आहे. याच मंदिराच्या मंडोवरावरील ही एक सूंदर लक्ष्मी नारायण अलिंगन मूर्ती लक्ष वेधून घेते.
विष्णुच्या हातातील गदा स्पष्ट दिसते. दूसर्या हातात काय आहे स्पष्ट दिसत नाही. ही मूर्ती निवडण्याचे मुख्य कारण विष्णुचा लक्ष्मीच्या कमरेवरचा डावा हात आणि लक्ष्मीचा विष्णुच्या खांद्यावरचा उजवा हात. लक्ष्मीची उंचावलेली मान. तिच्या डाव्या हातात कमळाची कळी आहे. विष्णुला सखा मित्र सोबती मानणारी ही मूद्रा फार मोहक आहे. विष्णुचा उजवा पाय गुडघ्यात जरा वाकला आहे. लक्ष्मीचा डावा पाय असाच गुडघ्यात वाकुन मग खाली आला आहे. हा पाय भंगला असून परत खाली तळव्यापाशी जरा दिसतो आहे. तिच्या कानातले वर्तूळाकार कुंडल आणि त्यात परत एक फुल मोठं मोहक आहे.
विष्णुच्या बाजूने खाली गरूड हात जोडून मांडी टेकवून बसला आहे. त्याचे पंख मागे दिसत आहेत.
आपल्याकडे "लक्ष्मी नारायणा" सारखा जोडा म्हणायची पद्धत आहे. या म्हणीचं हजार वर्षांपूर्वीचे हे शिल्पांकित देखणं दृश्यरूप. इथे दोघांची उंचीही जवळपास समान दाखवली आहे. विष्णु जरासा डावीकडे झुकलेला आणि लक्ष्मीही त्या बाजूने जराशी झुकलेली आहे. अतिशय लालित्यपूर्ण अशी ही मूद्रा आहे. त्याचा डावा आणि तिचा उजवा पाय ठामपणे जमिनीवर रोवलेले आहेत. तर विष्णुच्या उजवा तळव्याची बोटंच जमिनीवर टेकतात. लक्ष्मीचा डावा तळवाही असाच अधर आहे. चार पैकी दोन पाय भक्कम आणि बाकी दोन ललित या कल्पनेला दाद दिली पाहिजे. सुखी संसाराचे रहस्यच शिल्पकाराने मांडलय.
दोघांचेही चेहरे समोर असले असते तर हे शिल्प सपाट वाटले असते. पण लक्ष्मीच्या संपूर्ण मूर्तीला ३० अंशाचा जरासा कोन देवून शिल्पकाराने जो ३ डि परिणाम साधलाय त्याला तोड नाही. कमाल आहे.
लक्ष्मी नारायणाच्या स्थानक मूर्ती (उभ्या असलेल्या) फार कमी आहेत. याच मंदिरावर अशी अजून एक मूर्ती आहे. लोणारला दैत्यसुदन मंदिरावर पण एक आहे. पण ही सर्वात लालित्यपूर्ण.
(छायाचित्र सौजन्य
Travel Baba
)



नृत्य भैरव होट्टल
शैव मंदिरांवर भैरवाच्या मूर्ती प्रामुख्याने आढळून येतात. या मूर्तीचे हात खंडीत आहेत. या हातात त्रिशुळ, डमरू अशी आयुधे सहसा असतात. शिवाय एका हातात नरमुंड ही असते. मूर्तीच्या डाव्या बाजूला खाली श्वान दाखवले आहे वर मान केलेले. ते नरमुंडातून ठिबकणारे रक्त चाटत असते. भैरवाच्या अंगावर वस्त्र नाहीत. पायावर नरमुंडमाला लोंबत आहे. डोक्यावर मागे ज्वालेसारखे दिसणारे प्रभामंडल आहे. कपाळावर पट्टा आहे. पाठशिळेच्या वरच्या भागात किर्तीमुख आहे. सहसा भैरवाचे डोळे बटबटीत, चेहरा भयानक दाखवला जातो. पण इथे चेहरा सौम्य आहे. मांडीवर साप गुंडाळलेला आहे. कमरेच्या मेखलेची माळ मांडीवर रूळत आहे. त्याच्या खालच्या टोकाला घंटा आहेत.
पायात नुपुर आहेत. पायाचा कमरेपर्यंतचा भाग एका रेषेत, कमरेपासून मानेपर्यंत दूसर्या कोन रेषेत. आणि मानेपासून वरती परत वेगळ्या रेषेत अशी ही त्रिभंग मूद्रा आहे. नृत्यमुद्रेत हीची गणना होत असल्याने नृत्य भैरव असा याचा विचार करावा लागेल.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणचे पादत्राणे. उंच टाचेच्या सँडल्स असतात त्या प्रकारचे वेगळे असे हे पादत्राण आहे. हे अशा पद्धतीनं कुठे दिसत नाही.
होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या बाह्य भागावर ही भैरवमूर्ती आहे. याच्या आजूबाजूला सुरसुंदरींची शिल्पे आहेत. या मूर्तीला मिळालेले स्थान तिला देवता मानल्याचे सुचित करते.
छायाचित्र सौजन्य
Travel Baba
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

Sunday, November 29, 2020

पाच प्राचीन स्थळांवर आज दिपोत्सव...


उरूस, 29 नोव्हेंबर 2020 

 दिवाळी नंतर 15 दिवसांनी येणारी पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी मंदिरांवर नदीच्या घाटावर दिवे लावून उत्सव साजरा केला जातो. सध्याच्या कोरोना आपत्तीच्या काळात सार्वजनिक मोठ्या उत्सवांवर मर्यादा आली आहे. जास्तीची गर्दी टाळली जात आहे. एकूणच निराशेचे वातावरण आहे. 

अशावेळी देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानने पुढाकार घेवून ग्रामीण भागांतील पुरातत्त्वीय दृष्ट्या महत्त्वाच्या गावांशी संपर्क केला आणि दिपोत्सवाची कल्पना मांडली. पाच गावांनी यासाठी तयारी दर्शविली. आज संध्याकाळी येथे दिपोत्सव साजरा होतो आहे.

पहिलं गांव आहे मंदिरांचे गाव म्हणून ओळखले जाणारे चारठाणा (ता. जिंतूर जि. परभणी). या गावात पुरातत्त्व खात्याने संरक्षीत केलेली अशी 7 मंदिरे आहेत. या शिवाय अजून काही मंदिरं आणि अवशेष जागोजागी सापडतात. या गावातील प्राचीन मानस्तंभ हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. वेरूळचे कैलास लेणे आणि पैठण अशा दोनच ठिकाणी असे मानस्तंभ/किर्तीस्तंभ आढळून येतात. या स्तंभाचा परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी संध्याकाळी दिवे लावले जाणार आहेत. या गावाला हेरिटेज व्हिलेज म्हणून मान्यता मिळावी असा प्रस्ताव दाखल झाला असून त्यासाठी गावकरी आणि समस्त इतिहास प्रेमी पाठपुरावा करत आहेत.

दुसरं गांव आहे शेंदूरवादा (ता. गंगापुर जि. औरंगाबाद). येथे सिंदूरवदन गणेशाची प्राचीन स्वयंभू मूर्ती आहे. औरंगाबाद शहरांतून वाहणार्‍या खाम नदीचा प्रवाह वाळूजच्या पुढे डावीकडे वळतो. याच नदीच्या चंद्राकार वळणावर हे गाव वसले आहे. शिवकालीन संत मध्वमुनीश्वरांचा येथे आश्रम आहे. गणेश मंदिराच्या परिसरांत दिवे लावले जाणार असून नदीच्या पात्रातही दिवे सोडले जाणार आहेत. शिवाय नृत्य, गायन वादन असाही मोठा सांस्कृतिक कार्यक्रम मंदिराच्या ओट्यावर खुल्यात होणार आहे. 

तिसरं गांव आहे धारासुर (ता. गंगाखेड, जि. परभणी). येथील गुप्तेश्वर मंदिर हजार वर्षांपूर्वीचे आहे. त्यावरील अप्रतिम असा शिल्पाविष्कार अभ्यासकांना पर्यटकांना इतिहास प्रेमींना आचंबित करतो. या मंदिराच्या जिर्णाद्धाराचे काम पुरातत्त्व खात्या कडून सुरू होते आहे. गावकर्‍यांनी इतिहासप्रेमींना यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. गोदावरी नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. मंदिराची साफसफाई गावकर्‍यांनी केली असून संध्याकाळी दिपोत्सव होतो आहे. 

चौथे गांव आहे जाम (ता.जि. परभणी). येथील प्राचीन जगदंबा मंदिर परिसरांत दिपोत्सव साजरा होतो आहे. मंदिरावरील विष्णु अवतराच्या मूर्ती, विष्णुची दुर्मिळ अशी योग नारायण मूर्ती, देखण्या सुरसुंदरींच्या मुर्ती या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. गावकर्‍यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला असून या परिसरांत आज दिपोत्सव संपन्न होतो आहे.

पाचवे गांव आहे पिंगळी (ता.जि.परभणी). येथील प्राचीन बारवेच्या काठावर महादेव मंदिर आहे. त्रिदल पद्धतीचे हे मंदिर ढासळलेले आहे. मंदिरासमोरची बारव कलात्मक आणि भव्य अशी आहे. या परिसरांत आज स्वच्छता मोहीम राबवली गेली असून सायंकाळी बारवेच्या पायर्‍यांवर दिपोत्सव साजरा होतो आहे. 

एरव्ही त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दिपोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. पण या पाच ठिकाणी जो दिपोत्सव साजरा होतो आहे त्याला एक वेगळे महत्त्व आहे. पुरातन वास्तू जतन करणे, त्यांची डागडुजी करणे, त्या ठिकाणी इतिहास प्रेमी कलाकार अभ्यासक पर्यटक यंाना आमंत्रित करणे. या वास्तूंचा जिर्णोद्धार, परिसरांतील अतिक्रमणे हटवणे, तेथपर्यंत रस्ते तयार करणे, परिसरांचे सुशोभन असा एक मोठा प्रकल्प देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानने घेतला आहे. त्या मोहिमेचा भाग म्हणून या पाच ठिकाणी दिपोत्सव होतो आहे. या ठिकाणी पूर्वी अशी काही परंपरा नाही. जूनी ढासळलेली उद्ध्वस्त मंदिरे भंगलेल्या मूर्ती यांची पूजा होत नाही. साहजिकच या परिसराकडे दुर्लक्ष होते. कचरा साठतो. गवत वाढते. जे चांगले अवशेष आहेत तेही ढासळायला लागतात. दगडी चिरे दुसरीकडे लोक घेवून जातात आणि त्यांचा इतरच कारणांसाठी वापर व्हायला लागतो.

प्राचीन ऐतिहासिक महत्त्वाचा ठेवा असलेल्या या वास्तूंचे जतन अतिशय आवश्यक आहे. इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आपल्या उदात्त संस्कृतिचा परंपरेचा हा मोलाचा ठेवा आहे. 

आम्ही हा मजकूर वाचणार्‍या सर्वांना विनम्र आवाहन करतो की आपल्या आपल्या परिसरांती प्राचीन महत्त्वाच्या वास्तूंची शिल्पांची देखभाल दुरूस्ती साफसफाई यासाठी पुढाकार घ्या. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था (ग्राम पंचायत, नगर पालिका, महानगर पालिका) यांच्या दृष्टीस याचे महत्त्व आणून द्या. शासकीय पातळीवर पुरातत्त्व खात्या कडून जिथे मदत निधी शक्य असेल तिथे तो मिळवा. जिथे शासकीय यंत्रणा काम करणार नाही तिथे स्थानिकांनी पुढाकार घ्यावा. सध्या जी मोठी मंदिर संस्थाने आहेत त्यांनी आपला निधी या प्राचीन मंदिरांच्या ऐतिहासिक वास्तूंच्या दुरूस्ती देखभाल जिर्णाद्धार यासाठी देणगी म्हणून द्यावा. मोठ्या आस्थापनांनी आपल्या सीएसआर (सामाजिक कृतिज्ञता निधी) मधून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. 

सगळ्या महत्त्वाचे आहे की आपण सर्व सामान्य जनांनी आपल्या परिसरांतील अशा वास्तूंबाबत स्थळांबाबत आस्था बाळगली पाहिजे. यांच्या देखभालीसाठी दुरूस्तीसाठी जे जे शक्य होईल ते ते केले पाहिजे. त्यासाठी आपली सर्व शक्ती आपण याच्या मागे लावूया. त्रिपुरी पौर्णिमेचा हाच एक संदेश आहे. कोरोना निरोशेचा अंधकार दूर करून एक आशेची पणती आज आपण आपल्या अंतरात लावू या. 

दिवे सोडूया जळात

दिवे लावू मंदिरात

एक आशेची पणती

आज लावू अंतरात

(लेखात सुरवातीला वापरलेले छायाचित्र चारठाणा येथील मानस्तंभाचे आहे) 

      

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  

    

 

Saturday, November 28, 2020

हैदराबाद- बीफ बिर्यानी वि. पोर्क बिर्यानी


उरूस, 28 नोव्हेंबर 2020 

हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुका कधी नव्हेत तो या वेळी राष्ट्रीय पातळीवर पोचल्या आहेत. त्याला कारणही तसेच आहे. ओवैसी यांच्या एआयएमआयएम ने बिहार विधानसभा निवडणुकांत 5 जागा मिळाल्या. त्यामुळे ओवैसी जोरात आहेत. वर वर पाहताना ओवैसी मोदींच्या विरोधी (ओवैसी हा उच्चार ‘मोडी’ असा करतात) बोलतात पण त्यांच्या निशाण्यावर आहेत चंद्रशेखर राव यांचा टी.आर.एस.

ही निवडणुक ओवैसी यांनी भाजपसाठी अतिशय सहज सोपी करून टाकली आहे. जितकी कट्टरता ते भाषणांत दाखवतात तितका भाजपला प्रचार करायला सोपे पडते. उदा. चारमिनार परिसर ओवैसी यांचा बालेकिल्ला आहे. याच चार मिनारला लागून असलेल्या भाग्यलक्ष्मी मंदिरांतून भाजप नेहमी प्रचाराची सुरवात करतो. याच देवीच्या नावावरून हैदराबादचे मुळ नाव भाग्यनगर ठेवावे ही मागणी जोर पकडते. 

हैदराबादची प्रसिद्ध बीफ बिर्यानी (बीफमध्ये म्हशीचे रेड्याचे बैलाचे मांसही येते. बीफ या शब्दांतून केवळ गोमांस हा संदर्भ देवून गैरसमज पसरविला जातो) खाण्यासाठी भाजपच्या नेत्यांना आमंत्रण देताना ओवैसी विसरून गेले की हा मुद्दा आपल्यावरच उलटू शकतो. हिंदू वाल्मिक समाजाचा एक मोठा हिस्सा याच शहरात राहतो. डुक्कर पकडणे हा त्यांचा व्यवसाय आहे. डुकराच्या मांसाची बिर्यानी हे लोक खातात. इस्लामला डुक्कर वर्ज्य आहे. मग जेंव्हा भाजप आमदाराने या वाल्मिकी समाजाच्या काही नेत्यांना हाताशी धरून ओवैसी यांना पोर्क बिर्यानी खाण्यासाठी आमंत्रण दिलं त्यावरून मोठा गदारोळ उसळला. याला नेमके काय उत्तर द्यायचे हे एआयएमआयएम च्या कार्यकर्त्यांना कळलेले नाही. 

ही निवडणुक महत्वाची का आहे हे समजून घेण्यासाठी याचा आवाका लक्षात घ्यावा लागेल. हैदराबाद शहर आणि आजूबाजूचा ग्रामीण परिसर असा एकूण 5 लोकसभा मतदारसंघाचा हा प्रदेश आहे. 25 विधानसभा मतदारसंघ या क्षेत्रात येतात. (मुंबईचा मनपाची व्याप्ती 6 लोकसभा मतदारसंघ आणि दिल्लीची 7 मतदारसंघ. यावरून हैदराबादचे महत्त्व लक्षात येईल.)

चंद्रशेखर राव यांचा टिआरएस पक्ष नेहमीच ओवैसी सोबत युती करत आला आहे. कधी ही युती छुपी पण राहिली आहे. मागच्या निवडणुकीत टिआरएस ने 99 जागा जिंकल्या होत्या. त्यात तेलगु देसमचा एक नगरसेवक नंतर सामिल झाला. आणि हा आकडा 100 झाला. ओवैसीच्या पक्षाने 44 जागा जिंकल्या होत्या. दोघांनी मिळून महानगर पालिकेवर राज्य केले. भाजप 4 आणि कॉंग्रेस 2 इतक्याच किरकोळ जागांवर विजय मिळाला होता.

या वेळी सगळा प्रचार भाजपने आपण विरूद्ध इतर असा ओढून घेतला आहे. ओवैसी सुद्धा आपल्या भाषणांत भाजप मोदी अमित शहा यांनाच टार्गेट करत आहेत. याचा एक फायदा आपोआपच भाजपला मिळत आहे.

सिकंदराबाद मतदारसंघातून निवडुन आलेले भाजप खासदार जी. किशन रेड्डी केंद्रात गृहराज्य मंत्री आहेत. भाजपने पूर्वीही बंडारू दत्तात्रय यांचे नेतृत्व पुढे केले होते. सातत्याने हैदराबाद मध्ये राजकीय जागा शोधण्याचा भाजपचा प्रयत्न राहिला आहे. ओवैसी यांची टीआरएस सोबतची छूपी युती हाच भाजपने मुख्य मुद्दा बनवला आहे. आम्ही ओवैसी विरूद्ध लढत आहोत असे ओरडून ओरडून टीआरएसला हिंदू मते मिळावीत म्हणून सांगावे लागत आहे.  

एमआयएम एकूण 150 जागांपैकी केवळ 60 जागा लढवत आहे. याच जागांमधून जास्तीत जास्त जागा जिंकून टीआरएस सोबत युती करून महापौर पद हस्तगत करण्याचा त्यांचा डाव आहे. हाच मुद्दा म्हणून भाजपने समोर आणला आहे.  टीआरएसला मत दिले तरी ते ओवैसीलाच जाणार आहे. तेंव्हा त्यांनाही मत देवू नका. हा मुद्दा सामान्य हिंदू मतदारांच्या मनावर ठसविला जात आहे. यामुळे टीआरएसलाच खरा धोका जाणवत आहे. त्यांच्या जागांवर भाजपने विजय मिळवला तर त्यांना  राजकीय दृष्ट्या अवघड जाणार आहे. दुसरीकडून मुस्लिम मत ओवैसीकडे जाईल आणि आपल्याला त्याचाही फायदा होणार नाही. या निवडणुकीत खरा अडचणीत आला आहे तो चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष.

ओवैसी यांना खात्री आहे की मुस्लिम अधिक्य असलेल्या भागांत त्यांनाचा विजय मिळू शकतो. या 60 जागांपैकी 44 त्यांनी पुर्वी जिंकलेल्या आहेत. यावेळी हा आकडा जराही कमी आला तरी तो त्यांचा पराभव ठरेल. दुसरीकडून इतर 90 जागा आहेत त्यांच्यावर भाजपचा डोळा आहे. यातील जास्तीत जास्त जागा जिंकून भाजप आपली ताकद दाखवून देण्याची योजना बनवत आहे. 

ओवैसी यांना हैदराबाद मध्येच पायबंद केला तर पक्षाची देशभरातील विश्‍वासार्हता धोक्यात येवू शकते. त्यामुळे भाजपने अगदी विधानसभा निवडणुकांसारखा जोर लावला आहे. केंद्रिय नेतेही प्रचारात उतरवले आहेत.

अगदी मोजक्या अशा जागांवर निवडणुक लढवून राजकारण आपल्या बोटांच्या तालावर नाचविण्यात आत्तापर्यंत ओवैसी यशस्वी झाले. ओवैसी यांची वाढ ही भाजपला सोयीची आहे. कारण प्रतिक्रिया म्हणून आपोआपच हिंदू मत एकत्र होतात. त्यासाठी वेगळा प्रचार करण्याची गरज पडत नाही. हैदराबादची निवडणुक मजलिस वि. भाजप अशी झाली तर दोघांच्याही सोयीची आहे. आणि त्यासाठीच त्यांचे प्रयत्न चालू आहे.

या निवडणुकीचे पडसाद पश्चिम बंगाल मध्ये उमटण्याची शक्यता जास्त आहे. कारण उत्तर प्रदेशच्या खालोखाल पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लोकसंख्या आहे. हैदराबादसारखे मुस्लिम लोकसंख्येचे गढ भारतभराचे मुस्लिम मानस काय आहे याचे दिशादर्शक आहेत. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रजाकरांनी केलेल्या अत्याचाराचा मुद्दा प्रकर्षाने प्रचारात आणला आहे. शिवाय 17 सप्टेंबर हा मुक्तिदिन म्हणून हैदराबादला साजरा झाला पाहिजे असाही एक अस्मितेचा मुद्दा समोर आणला आहे. आत्ताचे तेलंगणा राज्य, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि कर्नाटकांतील गुलबर्गा, बिदर, रायचुर हे तीन जिल्हे म्हणजे पूर्वीचे हैदराबाद राज्य. हे संस्थान 17 सप्टेंबर 1948 ला स्वतंत्र झाले. तेंव्हा मराठवड्यातील जनतेने भांडून 17 सप्टेंबरचे सरकारी झेंडावंदन पदरात पाडून घेतले. पण हा दिवस हैदराबाद संस्थानाच्या इतर भागांत साजरा होत नाही. हा मुद्दा हैदराबाद मधील जनतेला स्पर्शून जाणारा आहे. यावरही पहिल्यांदाच चर्चा होते आहे. आत्तापर्यंत या मुद्द्याचे गांभिर्य कुणाला फारसे जाणवले नव्हते. पण भाजपने हा मुद्दा समोर आणून टिआरएस सारख्यांची तोंडे बंद केली आहेत. एमआयएम ची रजाकारी पार्श्वभूमी प्रकर्षाने समोर आणली जात आहे. एमआयएम ला ते सोयीचेच आहे. पण यातून खरी गोची होते आहे ती चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती (टी.आर.एस.) या पक्षाची. 

एमआयएम आणि भाजप या निवडणुकीचा देशभर आपआपला प्रचार करण्यासाठी फायदा करून घेत आहे. यातून सेक्युलर म्हणवून घेणार्‍या इतर सर्व पक्षांची गोची झालेली दिसून येते आहे. हैदराबाद निवडणुकांत कॉंग्रेस, एकेकाळी राज्य करणारा तेलगु देसम पक्ष, डाव्यांचा एकेकाळचा गढ असलेला तेलंगणा यांची कुणी चर्चाही करत नाही. त्यांचे बेदखल होणे हे कशाचे द्योतक आहे? सेक्युलर नावाचे ढोंग लोकांनी नाकारले आहे हेच यातून दिसून येते आहे.     

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  

    

 

Friday, November 27, 2020

मूर्ती मालिका -११

सुरसुंदरी

मंदिराच्या बाह्यांगावर अतिशय आकर्षक, डौलदार, सौष्ठवपूर्ण अशी स्त्री शिल्पे आढळून येतात. त्यांना सुरसुंदरी असे म्हणतात. इथे उदाहरणादाखल होट्टल (ता. देगलूर, जि. नांदेड) च्या मंदिरावरील ३ सुरसुंदरींचे छायाचित्र घेतले आहे. सगळ्यात डावीकडची आहे ती तंतू वाद्य वाजविणारी "तंत मर्दला". आज स्त्रीया गाताना नृत्य करताना आढळतात. पण त्या मानाने वाद्य वादन करताना फारशा आढळून येत नाहीत. पण प्राचीन मंदिरांवरील शिल्पात वादक स्त्रीया दर्शविलेल्या आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळात स्त्रीया संगीताच्या क्षेत्रात सर्वच अंगांनी आपले योगदान देत होत्या.
मधली आहे तिच्या हातात देवी देवतांच्या हातात असते तसे बीजपुरक आहे व दूसरा हात अक्षमालेसह वरद मूद्रेत आहे. स्त्रीला देवते इतके महत्व आम्ही देतो हे सामान्य स्त्रीचेच शिल्प कोरून सिद्ध केले आहे. ही सुरसुंदरी त्या दृष्टीने वेगळी आणि महत्वाची ठरते.
सगळ्यात उजवीकडची आहे ती "दर्पणा". सौंदर्याचा एक सुंदर अविष्कार यातून समोर येतो. दूसर्यावर प्रेम करायच्या आधी आरशात पाहून आपण आपल्याच प्रेमात पडायचे ते वय असते. नेमका हाच क्षण शिल्पात पकडला आहे. राजेंद्रकृष्ण यांनी शब्दबद्ध केलेले सी. रामचंद्र यांचे सुंदर गाणे आहे (अमरदीप, १९५८, देव आनंद, वैजयंतीमाला).
झुलेसे घबराके उतरा जो बचपन
भुलेसे एक दिन देखा जो दर्पण
लागी अपनी नजरीया कटार बनके
कोई दिल मे समा न जाये प्यार बनके
तशी ही दर्पणा.
सुरसुंदरी केवळ स्त्रीच्या बाह्य सौंदर्याचा अविष्कार प्रकट करतात असे नव्हे. एकुणच स्त्रीचे जे विविधअंगी विविधपैलू व्यक्तिमत्व आहे त्याचा आविष्कार प्रकट करतात. ही शिल्पे होट्टल, माणकेश्वर, गुप्तेश्वर मंदिर धारासुर, धर्मापुरी, निलंगा येथील मंदिरांवर मोठ्या सख्येने आणि आकर्षक पद्धतीनं आढळून येतात.
(छायाचित्र
Travel Baba
)



अंजली मूद्रेतील हनुमान आणि गरूड
आपल्याकडे हनुमानाची मूर्ती म्हणजे शेंदूर फासलेला दगड. अगदी देखणी कोरीव मूर्ती कुठे दिसत नाही. द्रोणागिरी पर्वत हाती घेवून उडणारा पवनपुत्र अशी मूर्ती मंदिरात आढळून येते. पण ही मूर्ती हात जोडलेली म्हणजेच अंजली मुद्रेतील आहे. या हनुमानाच्या अंगावर बारीक अशी वस्त्रे प्रावरणे आणि आभुषणे कोरली आहेत. त्याची गती दाखविण्यासाठी कोपरावरून मागे सोडलेले वस्त्राचे गोंडे जमिनीला समांतर असे उडताना दाखवले आहेत. कानातले कुंडलेही छान आहेत.
बाजूची मूर्ती गरूडाची आहे. हा गरुडही अंजली मूद्रेत आहे. त्याचे बाकदार नाक उठून दिसते.एरवी भेदक दिसणारे त्याचे नेत्र शांत दिसत आहेत. पंख पसरलेले रेखीव असे कोरले आहेत. खाली त्याच्या वस्त्राची टोकं कोरलेली आहेत. हे वस्त्रही कलाकुसरयुक्त आहे कारण गरूड विष्णुचे म्हणजेच ऐश्वर्यसंपन्न देवतेचे वाहन आहे. याचा मुकूटही देखणा आहे.
या दोन्ही मूर्ती शेंदूरवादा येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस ठेवलेल्या आहेत. विठ्ठल देवता वैष्णव देवता आहे. स्वाभाविकच गरूड तिथे असणं समजू शकतो. विठ्ठलाला विष्णुचा ९ वा अवतार मानलं जातं. पण हनुमानाची मूर्ती इथे का? याचं कोडं उलगडत नाही. (यावर राहूल देशपांडे या मित्राने केलेला खुलासा समर्पक व समाधानकारच आहै. .. दास मारुती हा कायम भागवत पंथात आराध्य देवतेसमोर उभे असण्याचा उल्लेख आहे."गरुड हनुमंत पुढे उभे राहती..." हे वाक्य आहेच आरती मध्ये.)
मध्वमुनीश्वरांच्या काळापासूनचे (इ.स. १६६०) हे विठ्ठल मंदिर आहे. तेंव्हा या मूर्तीही ३६० वर्षांपासूनच्या आहेत. खाम नदीच्या काठी औरंगाबादपासून अगदी जवळ ३० किमी. अंतरावर गंगापूर तालूक्यात हे गांव आहे.



एकनाथांचा विजय विठ्ठल
काल कार्तिकी एकादशी होती. हीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशीनंतर देव निद्राधीन होतात. बरोबर ४ महिन्यांनी म्हणजेच कार्तिकी एकादशीला त्यांची निद्रा पूर्ण होते. हे चार महिने संत विद्वान अभ्यासक मंडळी पंढरपुरातच मुक्काम ठोकून ग्रंथांवर कुटचर्चा विचारविनिमय अभ्यास प्रवचन करतात.
सामान्य लोकांच्या दृष्टीने विचार केला तर हा काळा खरीपाचा म्हणजेच कोरडवाहू शेतीचा मोठा हंगाम असतो. शेतीची कामे असतात. कार्तिकी एकादशी तर पीक घरात येते. पुढचा रब्बीचा हंगाम सगळ्या शेतकर्यांसाठी नसतो. कारण मग ती पाण्यावरची म्हणजेच ओलीताची शेती असते.
या कार्तिकी एकादशीला पैठणच्या नाथांच्या देवघरातला पुजेतला पांडुरंग म्हणून काही मूर्तींचे फोटो व काही माहिती सोशल मिडियावर पसरत होती.
हा सोबत दिलेला त्या मूळ पांडुरंग मूर्तीचे छायाचित्र. पांडुरंगाचे दोन्ही हात कटेवर ठेवलेले असतात. कानात मकर कुंडले. पायाखाली वीट असते. समचरण असा हा विठ्ठल उभा असतो. अहोबिल येथे प्राप्त झालेली विठ्ठल मूर्ती किंवा तिरूपती येथील मूर्ती अशीच समपाद असून डाव्या हातात शंख व उजवा हात वरद मूद्रेत आहे. पांडूरंगाला विष्णुचाच अवतार मानल्याने शंख त्याच्या हातात दाखवला जातो. पंढरपुरच्या मूर्तीचे दोन्ही हात कटीवर आहेत. डाव्या हातात ज्ञानाचे प्रतिक शंख व उजव्या हातात पावित्र्याचे प्रतिक पद्म आहे (दूरूस्ती प्रवीण योगी यांनी सुचवली).
नाथांच्या पुजेतील मूर्तीही अशीच आहे. फक्त वरद मूद्रेतील उजवा हात वरच्या ऐवजी खालच्या बाजूला वळलेला आहे.
पंचधातूची ही दिडफुटाची मूर्ती वजनदार असून पायावर सोन्याचा पत्रा मढवला आहे.
आपल्या संत मंडळींनी पांडुरंगासाठी कितीतरी सुंदर अभंग रचले आहेत. पण प्राचीन काळातील आणि भारताच्या सर्व भागात उच्चारले जाणारे अष्टक म्हणजे शंकराचार्यांनी रचलेले पांडुरंग अष्टक "भजे पांडुरंगम" अतिशय प्रासादीक आणि गोड आहे. (फोटो सौजन्य
Yogesh Kate
)

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

Thursday, November 26, 2020

शर्जिल इमाम खालीद उमर । कायद्याने तोडली कमर ॥


उरूस, 26 नोव्हेंबर 2020 

 गेली पाच सहा वर्षे पुरोगामी एक गोष्ट सतत मांडत होते की जेएनयु मधील विद्यार्थी समाजातील प्रश्‍नांवर आंदोलन करत आहेत. त्यांना देशद्रोही म्हणणे त्यांच्या विरोधात कसलेही पुरावे नसताना आरोप करणे चुक आहे. दिल्ली दंग्यांच्या खटल्याच्या निमित्ताने असे भक्कम पुरावे गोळा करून युएपीए अंतर्गत खटलाही दाखल झाला. शर्जिल इमाम आणि उमर खालीद यांना तुरूंगात डांबले गेले. पोलिसांनी या प्रकरणात 200 पानांचे नविन आरोपपत्र पहिल्या आरोप पत्राला पुरवणी म्हणून काल (25 नोव्हेंबर 2020) न्यायालयात सादर केले. 

पोलिसांनी दाखल केलेल्या या आरोपपत्रात विविध तारखांसह अतिशय सविस्तर पद्धतीने हा कट कसा रचला ते मांडले आहे. पहिली तारीख आहे 4 डिसेंबर 2019. दिवशी मंत्रिमंडळाने सीएए संबंधी विधेयक मांडण्यास परवानगी दिली. नेमके या दिवसापासूनच सर्जिल इमामने उमर खालीदच्या सहाय्याने मुस्लीम विद्यार्थ्यांना एकजूट करण्यास प्रारंभ केला. जेएनयु मध्ये हा विद्यार्थी गट तयार करण्यात आला. त्याचे नाव ठेवले एम.एस.जे. (मुस्लीम स्टूडंटस ग्रुप ऑफ जेनयु). या व्हाटसअप गटात 70 विद्यार्थी होते. 

6 डिसेंबरला बाबरी मस्जीदीच्या नावाने पत्रके विविध मस्जिदींमध्ये वाटण्यात आली. जेएनयु नंतर जामिया मिलीया येथील मुस्लीम विद्यार्थ्यांचा एक व्हाटसअप ग्रुप तयार करण्यात आला. त्याचे नाव होते एस.ओ.जे. (स्टूडंटस ऑफ जामिया). 13 डिसेंबरला जामिया मधील विद्यार्थी प्रदर्शने आणि हिंसा ही पूर्व नियोजीत होती. याचे पुरावे या व्हाटसअप ग्रुप मधील चॅटिंग मधून तपास यंत्रणांनी शोधून न्यायालया समोर मांडले आहे. या सगळ्याच्या मागे शर्जिल इमामचे डोके होते. शर्जिलची भडक भाषणे समोर आलेली आहेत. त्यांचेही पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केले आहेत. दिल्लीत दंगे भडकावून दिल्लीचे दुध पाणी बंद करण्याचा आपला इरादा शर्जिलने जाहिरच केलेला होता. 

शर्जिलच्या भाषणांत कन्हैय्या कुमार आणि इतर डाव्यांची भाषणबाजी काही कामाची नाही याचाही उल्लेख आहे. यातून नुसते फोटो छापून येतात. प्रत्यक्षात काही उपयोग होत नाही. तेंव्हा आता लोकांच्या संतापाचा ‘प्रॉडक्टीव’ वापर आपल्याला आंदोलनासाठी करावयाचा आहे. अशी अतिशय स्पष्ट भडक भाषा शर्जिनले वापरली आहे. 

15 डिसेंबरला शाहिन बागेत धरणं आंदोलनाची मुहूर्तमेढ अर्शद वारसीला हाताशी पकडून शर्जिलने रोवली. 

दिल्ली विद्यापीठ आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचेही व्हाटसअप ग्रुप तयार करण्यात आले. आंदोलनाचा भडका पसरविण्यासाठी समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. या सर्व बाबी याच व्हाटसअप ग्रुपच्या चॅटिंग मधून समोर आलेल्या आहेत. आपणच या शाहिनबाग आंदोलनाचा ‘मास्टर माईंड’ आहोत असेही शर्जिलने मुजम्मल नावाच्या मित्राला पाठवलेल्या मेसेज मध्ये समोर आले आहे. 

2 जानोवारीपासून शर्जिल ने शाहिनबाग आंदोलन आपल्या इतर सहकार्‍यांवर सोपवले आणि तो इतर नियोजनावर काम करू लागला. 9 जानेवारीला जेएनयु मधील एक विद्यार्थीनी आफरीन हीच्याशी झालेल्या चॅटिंग मधून हे समोर येते आहे की शाहिनबागेत नविन आंदोलनकर्ते यावेत आणि त्या सोबतच इतर ठिकाणीही ही आंदोलने झाली पाहिजेत असे धोरण आखले गेले. विविध ठिकाणांहून आंदोलनासाठी रसद मिळले आणि नविन लोक यात समाविष्ट झाले पाहिजेत म्हणजे आंदोलन दीर्धकाळ चालेल. अचानक प्रचंड संख्येने लोक गोळा झाले पाहिजेत अशी ‘हॉंगकॉंग’वाले धोरण आखण्यात आले. ज्या पद्धतीनं हॉंगकॉंग मध्ये मोठ्या प्रमाणात सरकार विरोधी आंदोलनात जनता रस्त्यावर उतरली हे ते धोरण होते. याचा उद्देश सरळ सरळ गोंधळ माजवणे असाचा होतो. जर लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले तर शासनाला काहीच करता येत नाही. किंवा जर काही केले तर दंगा अजूनच उसळतो. अशी ही ‘हॉंगकॉंग’वाली स्टॅ्रटजी. 

11 जानेवारीला डोनाल्ड ट्रंप यांची भारत भेट जाहिर झाली. लगेच त्या भेटी दरम्यान दिल्लीत दंगे करण्याची योजना शर्जिल उमर यांनी बनवली. 17 फेब्रुवारीला महाराष्ट्रात अमरावतीला उमर खालीदने डोनाल्ड ट्रंप भारतात येतील तेंव्हा लोक रस्त्यावर उतरतील असे वक्तव्य केलेले होते. 

पोलिसांनी विविध पुरावे यापुर्वीही सादर केलेले आहेतच. इतरही पुरावे गोळा केलेले आहेत. याच काळात पैशाचे जे व्यवहार झाले त्यांचीही नोंद करण्यात आलेली आहेत. 

येत्या 15 डिसेंबरला शाहिनबाग आंदोलनाला एक वर्षे पूर्ण होत आहे. वर्षभरातच तपास यंत्रणांनी अतिशय सक्षमपणे काम करून दंगेखोरांना तुरूंगात डांबून त्यांच्याविरोधात भक्कम पुरावे सादर केले आहेत. आता यांची बाजू घेणारे जे तमाम पुरोगामी आहेत त्यांनी या आरोपांना उत्तर द्यावे.

याच पद्धतीने नक्षलवाद्यांच्या विरोधातही कार्यवाही चालू आहे. यातील कायद्याच्या बाबी अतिशय किचकिट आहेत. त्यांचा फायदा देशद्रोह्यांना मिळतो आणि सुरक्षा यंत्रणा तपास यंत्रणांना मात्र मोठे जिकीरीने सावधपणे काम करावे लागते. गुन्हेगार गुन्हा करून मोकळा होतो पण त्याचा गुन्हा सिद्ध करणे हे एक मोठे अवघड काम होवून बसते. कधी कधी वैतागुन असे म्हणावे वाटते की कायदा गुन्हेगारांना मदत करण्यासाठी बनविला आहे की काय? पण म्हणतात ना ‘सत्य परेशात हो सकता है पराजित नाही’ त्या प्रमाणे हळू हळू सत्य बाहेर येत आहे.

यावर मोजक्या वाहिन्या वगळता कुणी फारसे बोलायला तयार नाही. वरील सर्व घटनाक्रम रजत शर्मांच्या इंडिया टिव्ही ने काल (दि. 25 नोव्हेंबर 2020) ‘आज की बात’ कार्यक्रमात सविस्तर मांडला आहे. 

यातील कायद्याची लढाई जी चालू आहे ती होत राहिल. पण आपण सामान्य जनतेचे सगळ्यात महत्त्वाचे काम आहे की आपण या देशद्रोह्यांना प्रतिष्ठा देणे बंद केले पाहिजे. या प्रश्‍नावर जेंव्हा जेंव्हा बुद्धीवादी म्हणवून घेणारे पुरोगामी दिशाभूल करतात तेंव्हा रोकले पाहिजे. त्यांना टोकदार प्रश्‍न विचारून पुरावे मागितले पाहिजेत. देशद्रोही वृत्तीचे समर्थन अवघडच नव्हे तर अशक्य करून टाकले पाहिजे. 

आजही निखिल वागळे जेंव्हा वरवरा राव सारख्या नक्षलवाद्याचे समर्थन करतात तेंव्हा त्यांना रोकले पाहिजे. त्यांच्या या भाषणावर कडक प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहिजेत. समाज माध्यमाची मोठी ताकद आपल्या हाताशी आहे. आपण त्याचा वापर केला पाहिजे. सामान्य माणसांच्या मौनाचा अतिशय चुक अर्थ पुरोगामी लावतात. तेंव्हा त्यांना याची जाणीव करून दिली पाहिजे की तूमची आधारहीन असत्य देशद्रोही मांडणी आम्ही ऐकून घेणार नाहीत. 

रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे, न्यायालयीन लढाई लढणारे, चळवळ करणारे सामाजिक राजकीय कार्यकर्ते त्यांचें काम करत असतात. पण आम्ही सामान्य माणसं आहोत आम्ही काय करू शकतो? असं जेंव्हा जेंव्हा कुणी विचारतो तेंव्हा तेंव्हा मी त्यांना संागतो की तूम्ही किमान जे समाज माध्यम वापरत अहात त्यावर तूमची प्रतिक्रिया व्यक्त करा. तिथे शांत बसू नका. बायकोचा वाढदिवस, पोराचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, साहेबांचा वाढदिवस, कुठल्या सहलीच्या फोटोत प्राचीन वास्तुपेक्षा आपलाच मोठा फोटो दाखवण्यात जेवढा वेळ आणि ऊर्जा खर्च करता त्याच्या किमान 10 टक्के तरी इकडे खर्च करा. तरी खुप मोठा बदल घडण्यास सुरवात होईल. 

दिल्ली दंग्यांचा कट उघडकीय आणणार्‍या सर्व तपास यंत्रणेचे मन:पूर्वक अभिनंदन. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तूमच्या पाठिशी आहोत. आमची कृती तूम्हाला मदत करणारी असेल. आपण सगळे मिळून देशाला लागलेली किड काढून टाकू. अशी आपण आज प्रतिज्ञा घेवू या. 26/11 च्या शहिदांना मृत्यूमुखी पडलेल्यांना हीच खरी श्रद्धांजली.    


         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  

    

 

Wednesday, November 25, 2020

कॉंग्रसमधील लेटरा-लेटरी आणि खेटरा-खेटरी


उरूस, 14 नोव्हेंबर 2020 

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते माजी मंत्री ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी राजदीप सरदेसाई यांना एक सविस्तर मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी बर्‍याच गोष्टींचा खुलासा केला आहे. 23 ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी पक्ष पातळीवर आत्मपरिक्षण करण्याबाबत पत्र लिहीलं होतं. त्यावर टिका करणार्‍यांनी पक्षात बोलायच्या गोष्टी बाहेर का बोलल्या म्हणून ओरड केली होती. तेंव्हा त्याचा खुलासा करताना या पूर्वीच पक्ष कार्यकारिणीच्या उच्चाधिकार समितीत हे विषय कसे उपस्थित केले होते आणि त्यांची दखल कशी घेतली गेली नाही हे सिब्बल यंानी मांडले आहे. आता या नेत्यांवर टिका करणारे सिब्बल यंाच्या खुलाश्यावर काही बोलायला तयार नाहीत.

हेमंत बिस्व शर्मा हे असममधील नेते वारंवार राहूल गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागत होते. पण त्यांना वेळ मिळाली नाही. आणि जेंव्हा भेटीची संधी मिळाली तेंव्हा राहूल गांधी आपल्या कुत्र्याला बिस्कीटं खावू घालण्यात मग्न होते. त्यांनी हेमंत बिस्व शर्मा यांच्याकडे लक्षच दिले नाही. त्यानंतर हेमंत शर्मा यांनी पक्षाचा त्याग करून भाजपत प्रवेश घेतला. पुढे काय घडले ते सर्वांना माहित आहे. संपूर्ण ईशान्य भारतातून राजकीय दृष्ट्या कॉंग्रेस नामशेष होत आली आहे. 

पत्र लिहीणार्‍या प्रश्‍न विचारणार्‍या नेत्यांना पिंजर्‍यातील पोपट म्हणणारे ‘हे पोपट पाळले कुणी?’ याचे उत्तर देतील काय? पोपट कधीच आपणहून पिंजर्‍यात प्रवेश करत नाही. मालकालाच पोपटपंची ऐकायची हौस असते. म्हणून तर तो सोनेरी पिंजरा, पिकलेली फळे अशी अमिषे दाखवून पोपट पिंजर्‍यात अडकवतो. म्हणजे दोष पोपटांचा नसून आधी मालकाचा आहे हे पहिले ध्यानात घेतले पाहिजे.

कॉंग्रेसमधील सध्याचा असंतोष केवळ नेतृत्वाविरोधात वैयक्तिक आहे असे नाही. पक्षाचा सतत पराभव होतो आहे. सत्ता मिळवून देण्यास नेतृत्व असमर्थ ठरत आहे म्हणून हा विरोध आहे. याच सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली 2004 ते 2014 अशी सलग दहा वर्षे सत्ता उपभोगता आली. त्यामुळे त्या काळात कधी असंतोष उफाळून आला नाही. तेंव्हाही राहूल गांधी निर्णय केंद्रात सक्रिय होतेच. कॉंग्रेस पक्षाला डाव्यांच्या पाठिंब्याने सत्ता मिळवता आली. दुसर्‍या कालखंडात (2009 ते 2014) इतरांच्या पाठिंब्याने सत्ता अबाधित राहिली. या काळात पक्षाची निकोप वाढ होत होती असे नाही. आण्णांचे लोकपाल आंदोलन आणि निर्भया प्रकरणानंतर जो प्रचंड जनआक्रोश उसळला त्याला तोंड द्यायला कॉंग्रेस नेतृत्व कधीच जनतेला सामोरे गेले नाही. याच काळात भाजपचे आक्रमक नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रूपाने समोर आले. याचा एकत्रित परिणाम म्हणून सत्ता परिवर्तन घडले. 

कॉं्रग्रेसला स्वत:चे बहुमत नव्हते. इतरांच्या पाठिंब्यावरच सत्ता टिकलेली होती. पण त्यानंतर आलेल्या भाजपला मात्र स्वत:च्या बळावर सत्ता एकदा नव्हे तर दोनदा मिळालेली आहे. हा फरक लक्षात घ्यायला हवा. कॉंग्रेस नेतृत्वाच्या मर्यादा आधीही होत्या. पण सत्तेमुळे त्या झाकुन राहिल्या. राहूल गांधी गेली 16 वर्षे खासदार आहेत. पण त्यांनी संसदेत किंवा प्रचार सभांमध्ये केलेले एकही प्रभावी भाषण आढळून येत नाही. एकही प्रभावी मुद्दा त्यांनी ऐरणीवर आणला नाही. अर्णब गोस्वामीला दिलेली 2013 मधील राहूल गांधींची मुलाखत आजही यु ट्यूबवर उपलब्ध आहे ती जरूर पहा. राहूल गांधींच्या नेतृत्वाचा  अपरिपक्व पैलूच त्यातून झळकतो.  संघटनात्मक पातळीवरील कॉंग्रेस पक्षाची बांधणी अतिशय उत्तम होती असे प्रत्यक्ष सत्ता काळातही कधी दिसून आली नाही. 

जोवर सक्षम पर्याय समोर येत नव्हता तोपर्यंत लोकांनी कॉंग्रेसला सहन केले. कॉंग्रेस हाच जर खरा पर्याय वाटत होता तर 1984 नंतर एकदाही त्या पक्षाला जनतेने स्पष्ट बहुमत का दिले नाही? 84 नंतर एक दोन नव्हे तर तब्बल 9 सार्वत्रिक निवडणुका झाल्यात. यातील एकाही निवडणुकांत कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत नाही. 1991, 2004 आणि 2009 या तीन निवडणुकांत इतर पक्षांच्या पाठिंब्याने सरकार टिकले. कॉंग्रेसने जेंव्हा जेंव्हा इतरांना पाठिंबा दिला ती सरकारे कधीही आपला कार्यकाळ पूर्ण करू शकली नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा जनता पक्षाच्या फुटीनंतर चरणसिंह सांचे सरकार आले होते. विश्वनाथ प्रतापसिंह यांचे सरकार गडगडल्यावर चंद्रशेखर यांचे सरकार आले होते. 1996 ला सगळ्यात मोठा पक्ष असूनही भाजपचे अटलबिहारी वाजपेयीं सरकार 13 दिवसांतच कोसळले तेंव्हा कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर देवेगौडा आणि नंतर इंद्रकुमार गुजराल अशी दोन सरकारे आली. पण या चारही पंतप्रधानांना कॉंग्रेसने जास्त काळ राज्य करू दिले नाही. वर्षेभरातच सरकारले कोसळली. 

कॉंग्रेसने आपल्या पक्ष वाढीसाठी कधीच नियोजनबद्ध काम केलेले दिसून येत नाही. संघटना बळकट नसण्याचे परिणाम आता सतत होणार्‍या पराभावातून दिसून येत आहेत. विचारसरणी म्हणून काही कॉंग्रसपाशी शिल्लकच नाही. नरसिंह रावांच्या काळात मुक्त आर्थिक धोरणे राबविणारे अर्थमंत्री मनमोहनसिंग नंतरच्या काळात पंतप्रधानपदी आल्यावर डाव्यांच्या दबावात डावी धोरणं राबवायला लागले. कृषी विधेयकांचा समावेश कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यात होता. कृषी उत्पन्न बाजार समितींसाठीचा मॉडेल ऍक्ट मनमोहनसिंगांच्या काळातच मंजूर झालेला होता. पण तरीही भाजपने कृषी विधेयके आणली की विरोध सुरू झाला. आधार कार्ड बाबत योजना निलकेणींनी राबवली तेंव्हा कॉंग्रेसचेच सरकार होते. नंतर याच आधार कार्डांवरून गोंधळ घातला गेला. ई.व्हि.एम. चा निर्यण राहूल गांधींच्या काळातला आहे. कॉंग्रेंसच्या काळातच याचा वापर सुरू झाला. पण नंतर याच कॉंग्रेसने ई.व्हि.एम.ला अर्थहीन विरोध केला.  तेंव्हा कॉंग्रेसला कसलीही विचारसरणी शिल्लक राहिली नाही. 

संघटनात्मक रचना बळकट नाही. विचारसरणी काही शिल्लक नाही. नेतृत्व कमकुवत प्रभावहीन आहे. असा कॉंग्रेसचा तिहेरी पेच आहे. त्यामुळे आधीची लेटरा लेटरी संपून आता खेटरा खेटरी सुरू झालेली दिसत आहे. 

संपूर्ण भारताचा विचार केल्यास उत्तर प्रदेश (80), महाराष्ट्र (48), पश्चिम बंगाल (42), पूर्वीचा आंध्र प्रदेश (42), आधीचा बिहार (54) आणि तामिळनाडू (39) अशा जवळपास 305 जागी कॉंग्रेस पहिल्याच काय पण दुसर्‍या क्रमांकाचाही पक्ष शिल्लक राहिला नाही. देशातील इतर काही छोट्या राज्यांचा विचार केल्यास एकूण 350 जागी कॉंग्रेस पक्षाची ताकदच शिल्लक राहिलेली नाही. 543 पैकी केवळ 200 जागी हा पक्ष आपली काही ताकद बाळगून आहे. म्हणजे लढायच्या मन:स्थितीत आहे. यश किती मिळेल तो नंतरचा मुद्दा आहे. 

बिहार सोबत भारतभरच्या ज्या पोटनिवडणुका झाल्या त्या बहुतांश जागा कॉंग्रेसच्याच होत्या. 58 पैकी केवळ 11 जागा कॉंग्रेसला राखता आल्या. म्हणजे असलेल्या जागाही कॉंग्रेसने गमावल्या आहेत. ही खरी शोकांतिका आहे. 

कॉंग्रेसचे कार्यकर्ते ज्यांना मंत्रीपदे मिळाली, संस्था लाभल्या ते सर्व सुखासीन होवून बसले आहेत. मतदानासाठी मतदारांना बाहेर काढणे, पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी सातत्याने कार्यक्रम राबवणे, रस्त्यावर उतरणे, आपत्तीच्या काळात लोकांना मदत करणे हे करताना तो कुठेही दिसत नाही. फाईव्ह स्टार कल्चर असा शब्दप्रयोग स्वत: ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीच केला आहे.

राहूल गांधी यांनी स्वत: होवून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून आमच्या कुटूंबातील कुणी अध्यक्ष नको असे स्पष्ट केले असताना परत परत विषय गांधी घराण्यापाशीच का येवून थांबतो? इतका मोठा देश आहे, इतका मोठा पक्ष आहे, इतकी मोठी दीर्घ परंपरा पक्षाला लाभली आहे आणि परत परत एका कुटूंबाच्या पायाशी लोळण घेत लाचारी दाखवणे ही नेमकी काय मानसिकता आहे? देशापुरता म्हणाल तर देशाने सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही मुद्दे आपल्या परीने निकालात काढले आहेत. देशाच्या पातळीवर नसले तरी राज्याच्या पातळीवर केजरीवाल, ममता बॅनर्जी, नविन पटनायक, चंद्रशेखर राव, जगन मोहन रेड्डी, पी. विजयन, पलानीस्वामी, हेमंत सोरेन, उद्धव ठाकरे, नितीशकुमार असे भाजपा-कॉंग्रेस शिवायचे मुख्यमंत्री जनते समोर आहेत. यातील काहींना भाजप आणि काहींना कॉंग्रेसनेच पाठिंबा दिला आहे. हे लक्षात घेतले तर सत्ताधारी भाजप आणि त्याच्या समोर कॉंग्रेस यांच्या शिवायचा काही एक पर्याय लोकांनी स्विकारलेला आहे.

आता कॉंग्रेसने स्वत:साठीच स्वत:त बदल करण्याची गरज आहे. देशातील उज्ज्वल परंपरा आणि भवितव्य असलेल्या लोकशाहीचा विचार केल्यास जनतेसमोर सर्व सक्षम पर्याय उपलब्ध आहेत. लोकशाही वाचवायला कॉंग्रेसची गरज नाही. सुरवातीच्या 5 निवडणुका (1952, 57, 62, 67, 71) कॉंग्रस हाच मुख्य पक्ष होता. अगदी विरोधी पक्षनेतेपद मिळावे इतकाही विरोधी पक्ष शिल्लक नव्हता. देशाला पहिला विरोधी पक्ष नेता लाभला तोच मुळी जनता पक्षाच्या काळात कॉंग्रेसच्या यशवंतराव चव्हाणांच्या रूपाने (विरोधी पक्ष नेत्याला केंद्रिय मंत्र्याचा दर्जा, सोयी सवलती, काही एक अधिकार या अर्थाने विरोधी पक्षनेते पद). तरीही आपल्या लोकशाहीला धोका पोचला नाही. मग आताच कॉंग्रेसची घसरण सुरू झाल्यावर विरोधी पक्ष नसेल तर लोकशाहीला धोका आहे अशी ओरड पुरोगामी का करत आहेत? त्यांच्या या छाती पिटण्याला अर्थ नाही.   

कॉंग्रस सत्तेच्या लोभाने टिकून राहणारा पक्ष आहे. सत्ताच मिळणार नसेल तर कॉंग्रस संपायला काहीच वेळ लागणार नाही. म्हणूनच आता कॉंग्रेसमध्ये लेटरा-लेटरी नंतर खेटरा-खेटरी सुरू झाली आहे.        


         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  

    

 

Tuesday, November 24, 2020

मूर्ती मालिका -१०

पारशिवनीची महालक्ष्मी

महालक्ष्मी म्हणजे कोल्लापुर इतकेच आपल्याला माहित असते पण कोल्हापुरच्या मूर्ती सारखीच अप्रतिम मूर्ती नागपुरपासून उत्तरेला रामटेकच्या दिशेने पारशिवनी गावात स्थित आहे. एक मिटर उंचीची ही मूर्ती खोदकामात सापडली. मूर्तीच्या उजव्या हातात बीजपुरक आहे, वरच्या हातात गदा आहे. डाव्या वरच्या हातात खेटक म्हणजेच ढाल आहे तर डाव्या खालच्या हातात पानपात्र आहे. कोल्हापुरची महालक्ष्मी पण अगदी अशाच आयुधांनी युक्त आहे. हीला अंबाबाई असे पण संबोधतात. महालक्ष्मी असा शब्द आला की तीला विष्णुपत्नी असं मानण्याची प्रथा आहे. पण महालक्ष्मी ही केवळ विष्णुपत्नी नव्हे. मुक्तेश्वरांनी (एकनाथांच्या मुलीचा मुलगा) महालक्ष्मीची जी आरती लिहीली आहे त्यातील एका कडव्यात
तारा सुगतागमी शिवभजका गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री नीजबीज निगमागम सारी
प्रकटे पद्ममावती जीन धर्माचारी
असे वर्णन आले आहे. म्हणजे बौद्धांची तू तारा आहेस, शैवांची गौरी आहेस, सांख्यांसाठी तू प्रकृती आहेस, आगम पंथियांसाठी गायत्री आहे आणि जैनांसाठी पद्मावती आहेस. आरती म्हणताना आम्ही "तारा शक्ती अगम्य" अशी अगम्य भाषा करून बौद्धांचा संदर्भ उडवला. तर "नीज धर्माचारी" असा शब्द वापरून जीन धर्मियांचा म्हणजेच जैनांचा संदर्भ उडवला.
पारशिवनीची ही महालक्ष्मी अतिशय देखणी आहे. तिच्या मुकुटांत सयोनीलिंग आहे. पाठशिळेवर खाली सिंह, मग घोडा मग व्याल कोरलेले आहेत. पायाशी खाली चामरधारिणी आहेत. गळ्यात हार, कर्णभुषणे, मेखला असे अतिशय नजाकतीनै कोरलेले आहेत. पंचमहाभुतांचे प्रतिक म्हणून पाठशिळा पंचकोनात कोरलेली असते. तशी ती इथेही आहे.
(फोटो व माहिती सौजन्य प्रविण योगी, पोलीस अधिकारी हिंगोली)


चामूंडा : भयानक व बिभत्स रसाचे दर्शन
आपल्या परंपरेत मानवी भावभावनेतील सर्व रसांचा विचार केला गेला आहे. काही गोष्टी नकोशा वाटतात पण त्यांचे अस्तित्व मात्र असते. असे दोन रस भयानक आणि बिभत्स यांचे दर्शन चामुंडा मूर्तीत दाखलेले आहे. ही मूर्ती नीलकंठेश्वर मंदिर निलंगा (जि. लातुर) मंदिराच्या बाह्य भागावर देवकोष्टकांतील आहे.
उजव्या हातात सुरा, वरच्या हातात त्रिशुळ, डाव्या वरच्या हातात खट्वांग (मानवी कवटीपासून केलेले हत्यार), डावा मधला हात तोंडात असून त्याची नखं ती दाताने कुरतडत आहे, खालच्या हातात कपाल व नरमुंड आहे. एक हात खंडित आहे. ही सहा हाताची चामूंडा आहे.
पोटावर विंचू आहे. सर्प बंध आभुषण म्हणून स्तनाभोवती कमरेला दाखवलेले आहेत. जांघेत घंटा दिसून येते आहे. नरमुंडमाला पायावर लोंबत आहे.
तिचे वाहन प्रेत पायाशी आहे. उजवीकडे पिशाच्च नाच करत आहे. डाव्या बाजूला कुत्रे आहे. वर मान करून नरमुंडातील रक्त ते चाटत आहे. देवीची हाडे स्पष्ट दिसतात. हाडं आणि कातडी असे मांसरहित रूप चामुंडेचे ग्रंथात वर्णीलेले आहे. स्तन शुष्क असून खाली लोंबत आहेत. (उन्नत उभारलेले स्तन समृद्धतेचे मातृत्वाचे प्रतिक समजले जाते)
भयानक व बिभत्स रसाचे दर्शन या मूर्तीत शिल्पकाराने घडवले आहे. नउ रसांची नावे लक्षात ठेवण्यासाठी एक छोटी कविता आहे
'अद्भुत' वाटे 'भयानका'चे
'बिभत्स' दर्शन होता जगाचे
मनात 'करूणा' दाटून येते
'रौद्रा'तूनी जन्म 'वीरा'स देते
'हास्या'त 'शृंगार' शोभे विहंगम
सगळ्या रसाचा 'शांतीत' संगम
सप्तमातृकां पैकी चामुंडा एक मानली जाते. या मातृकांची संख्या आठ, नऊ पण सांगितली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सप्तमातृका आढळून येतात.
(फोटो सौजन्य दत्ता दगडगावे, लातूर. चामुंडा रूप विवरण डाॅ. माया पाटील (शहापुरकर) यांच्या ग्रंथाच्या आधाराने)



आळतं सुंदरी
प्राचीन मंदिरांच्या मंडोवरावर (बाह्यभागावर) सुरसुंदरींची शिल्पे हे एक वैशिष्ट्य आढळून येतं. १२ व्या शतकातील प्राचीन अशा गुप्तेश्वर मंदिर (ता. गंगाखेड जि. परभणी) येथे "आळतं सुंदरी"चे हे शिल्प कोरलेलं आहे. मंदिराच्या उत्तर भागात विष्णुचे पद्मनाभ रूपातील शिल्प देवकोष्टकात आहे. त्याच्या बाजूला हे शिल्प आहे. मंगल कार्य घरात असेल तेंव्हा उखळा जात्याचा मुहूर्त केला जातो. उखळ जात्याची पूजा करून पाच स्त्रीया त्यावर ठेवलेले विडे उचलून उखाणे घेतात. यावेळी वधु, करवली, तिची आई किंवा वरमाय यांना न्हाउ घातलं जातं. व नंतर त्यांच्या पायावर ओल्या कुंकवाचे पट्टे रेखतात. स्वस्तीक काढलं जातं. याला "आळतं" म्हणतात.
या शिल्पात ही नववधु वेलीला टेकुन उभी आहे. तिच्या तळपायावर दूसरी स्री आळतं भरत आहे. हे खोड वेलीचं आहे कारण याच परिसरांत जात्यावरच्या ओव्यांत एक गोड असा संदर्भ आलेला आहे
दारी मांडव ग घाला ।
फुला सगट जाईचा ।
छंद मुलाच्या आईचा ।।
दारात वेल आहे आणि त्या फुलांचा सुगंध सर्व परिसरात भरून राहिला आहे. शिल्पाच्या वरच्या भागात वेलीचा पर्णविस्तार नक्षीच्या माध्यमातून दाखवला आहे. या शिल्पातील स्त्रीचा जो केसांचा मोठा अंबाडा दाखवला आहे त्यावर गजरा माळलेला आहे.
काही शिल्पं "सुरसुंदरी" या शब्दांत बसत नाहीत. पत्र सुंदरी, शत्रु मर्दिनी, पुत्र वल्लभा अशी शिल्पं ज्यांच्यावर याच सदरात लिहिलं आहे ती स्त्री स्वभावाचे विविध पैलू दाखवतात. ती केवळ शृंगारापुरती मर्यादीत नाही हे स्पष्ट करतात. ही आळतं सुंदरी पण अशीच वेगळी आहे. या परिसरांतील रिती रिवाज परंपरा यांचे प्रतिबिंब यात उमटले आहे. अभ्यासक डाॅ. ए.डि. शिंदे सर यांनी आळतं सुंदरी हे नाव या शिल्पाला दिलं. मला हे मोठं वैशिष्ट्यपूर्ण असं शिल्प वाटलं. या मंदिराला जरूर भेट द्या.
(फोटो सौजन्य अरविंद शहाणे, परभणी. swaraj infotain या u tube वाहिनीवर या मंदिवर बनवलेले दोन माहितीपट उपलब्ध आहेत त्याची link इथे देतोय https://youtu.be/CaPlMqklJmI )
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575