Wednesday, November 4, 2020

भाज्यांच्या हमीभावाची केरळी थट्टा


 म.टा. 3 नोव्हेंबर 2020 संपादकीय पानावरील लेख 

कृषी विधेयकांतील धान्यांच्या किमान हमी भावा (मिनिमम सपोर्ट प्राईज, एम.एस.पी.) वरून प्रचंड गदारोळ पंजाब आणि हरियाणात माजवला गेला. पंजाब विधानसभेने वेगळा कायदा राज्यासाठी मंजूर करून घेतला. हे वादळ शमत नाही तोच आता केरळने भाज्यांसाठी किमान हमी भावाचे धोरण जाहिर करून शेतमालाच्या बाजारात हस्तक्षेप करण्याचा मनसुबा  अंमलात आणण्याचे ठरवले आहे. 

कुठल्याही कारणाने शेतमालाची बाजारपेठ नियंत्रित करून शेती आणि शेतकरी हिताचा बळी देण्याचे धोरण डाव्या सरकारांनी नेहमीच राबवले आहे. शेतकर्‍याचे मरण हेच सरकारचे धोरण ही घोषणा शेतकरी चळवळीत त्यामुळेच रूजली. 

ज्यांची साठवणूक करणे शक्य आहे, वाहतुकही सोयीची आहे अशा धान्यांच्या बाबतही एम.एस.पी. धोरण आत्तापर्यंत कुठल्याच सरकारांना नीट राबवता आलेले नाही. धान्यांतही फक्त गहु आणि तांदूळ यांचीच खरेदी आणि तीही परत फक्त काही प्रदेशांत (पंजाब, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचे विदर्भातील पाच जिल्हे) एम.एस.पी. प्रमाणे केली जाते. या शिवाय संपूर्ण भारतात कुठल्याही शेतमालाची एम.एस.पी. प्रमाणे खरेदी सरकारी पातळीवर केली जात नाही. तशी यंत्रणाही सरकारकडे नाही. 

मग असे असताना केरळात नाशवंत असलेल्या भाज्यांच्या बाबत हमीभावाची घोषणा का केल्या गेली? 

यातील काही त्रुटी तर अगदी लगेच लक्षात याव्यात अशा आहेत. एक तर संपूर्ण केरळात कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे कृषी उत्पन बाजार समित्यां सारखी सरकारी शेतमाल खरेदी बाजारपेठ नाही. परिणामी सरकार खरेदी करणार कसे? याचे कुठलेच संयुक्तीक उत्तर केरळ सरकारने दिलेले नाही. 

दुसरी गोष्ट यात नमुद केली आहे की खुल्या बाजारात भाज्यांचे भाव हमी भावापेक्षा पडले तरच सरकार हस्तक्षेप करणार. म्हणजे काय? जर भाव जास्त असतील तर सरकार तसेही निर्यात बंदीेचे शस्त्र हाताळून भाव पाडत आले आहेच.

असं समजू की सरकारने जाहिर केलेल्या हमीभावा पेक्षा भाजीचे भाव जास्तीचे आहेत. साहजिकच व्यापारी या खरेदीपासून लांब रहातील.  सरकारी यंत्रणेला खरेदी करण्यास भाग पाडतील आणि त्यांच्याकडून त्या कमी भावाने खरेदी करून व्यापार करतील. किंवा आपण स्वत: चढ्या भावाने खरेदी न करता जो हमी भाव आहे त्यापेक्षा जरा कमी किंवा त्याच्या आसपासच खरेदी करतील. म्हणजे हा हमीभाव हा शेतकर्‍याच्या माथ्यावर ठोकलेला खिळाच बनेल. ज्याच्या वर किंमती कधीही चढणार नाहीतच. 

आता सरकारी हमी भावापेक्षा भाज्यांच्या किंमती पडलेल्याा आहेत ही परिस्थिती लक्षात घेवू. अशावेळी सगळी गर्दी सरकारी खरेदीकडे होईल. इतकेच नाही तर शेजारच्या तामिळनाडू आणि कर्नाटकांतून भाजीपाला केरळात येईल. हा सगळा भार सरकारी यंत्रणेला पेलणे अशक्य होवून बसेल. आणि सगळी यंत्रणाच कोलमडून पडेल.

कापूस आणि उसाच्या बाबतीत महाराष्ट्राने हे अनुभवले आहे. शेजारच्या तेलंगणात (तेंव्हाचा आंध्र प्रदेश) कापसाचे भाव चढले की महाराष्ट्रातला कापूस तिकडे जायचा. आणि सीमारेषांवर काळाबाजार पोलीसांचे हप्ते यांना ऊत यायचा. तसेच दक्षिण महाराष्ट्रातला ऊस कर्नाटकांत जायचा. आंध्रातला स्वस्त तांदूळ चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात यायचा. उत्तर महाराष्ट्रातला कापूस जिनिंग साठी गुजरातेत जायचा. 

भाव कोसळले तर हमी भावाने खरेदी करावी म्हणून प्रचंड शेतमाल केरळात येऊ शकतो. अशावेळी सरकारी यंत्रणा काय करणार? कमी भावाने भाज्या खरेदी करून ती सरकारी यंत्रणेच्या माथी मारण्याचा उद्योग जोरात चालेल. महाराष्ट्रात डाळींच्या बाबतीत हे घडले आहे. शेतकर्‍यांची डाळ अतिशय कमी भावाने खरेदी करून सरकारी यंत्रणेत ती चढ्या भावाने विकून अधिकारी राजकीय नेते व्यापारी दलाल या यंत्रणेने केलेला मोठा भ्रष्टाचार सर्वांना माहित आहे. 

भाज्यांच्या बाबतीत सगळ्यात त्रासाचा जिकीरीचा आणि कटकटीचा मुद्दा आहे तो साठवणूकीचा, वाहतुकीचा. सरकारी यंत्रणेने हा भाजीपाला खरेदी केला तर तो साठवणार कसा? कारण घावूक भाजी बाजार हा जेमतेत तीन चार तासांचा उद्योग असतो. पहाटे अगदी अंधारात सुर्य उगवण्याच्या आत शेतकर्‍यांनी भाजीपाला विकायला आणलेला असतो. त्याचे लिलाव होतात.  आणि किरकोळ भाजीवाले ही भाजी घेवून विकायला निघून जातात. म्हणजे सकाळी 6 वाजता सुरू झालेला हा व्यवहार 9 वाजता सगळं संपून जिकडे तिकडे झालेले असते. 

आता केरळातील सरकारी यंत्रणा इतक्या तातडीने काम करू शकते का? केरळच नव्हे तर आख्ख्या भारतातील कुठली सरकारी यंत्रणा अशी तातडीने बाजारपेठेच्या बाबतीत कार्यक्षम राहू शकते? भाजी बाजारात थोडा जरी उशीर झाला तर भाजी खराब होवून जाते. एका ठिकाणची भाजी दुसर्‍या ठिकाणी नेण्याची काय व्यवस्था सरकार कडे आहे? सध्या शेतकरी आपणहून भाजी मोंढ्यात घेवून येतो. आणि किरकोळ व्यपारी आप आपल्या गांड्यांतून हातगाड्यांतून ती त्या जागेवरून घेवून जातो. हे सगळे एका विशिष्ट शिस्तीत सोयीने चालू असते.  मग यात सरकारने हस्तक्षेप करून हा सगळा अव्यापारेषू व्यापार करण्याची आवश्यकताच काय आहे? 

केवळ केरळच नव्हे तर कुठल्याही सरकारला भाजी बाजारात काही सकारात्मक चांगले करायचे असेल तर आधी भाज्यांच्या साठवणुकीसाठी मोठी यंत्रणा उभारण्यास उद्योजकांना मदत करावी. त्यासाठी अग्रक्रमाने कर्ज मंजूर करावे. जागा उपलब्ध करून द्याव्यात. (केळ पिकविण्यासाठी आमच्या एका उद्योजक मित्राला कृषी उत्पन्न बाजार समितीने इतका त्रास दिला की शेवटी त्याने ते रायपनिंग चेंबर गावाबाहेर दूर जवळच्या खेड्यात शेतजमिनीवर उभे केले). भाज्यांची वाहतूक ही पण मोठी जिकीरीची समस्या आहे. त्यासाठी कोल्ड स्टोरेज व्हॅन हव्या आहेत. तसेच भाज्यांवर प्रक्रिया करणार्‍या यंत्रणा सक्षम हव्या आहेत. हे सगळं करण्यासाठी आधी शेतमाल बाजार मोकळा केला पाहिजे. तरच त्यात गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. 

एकदा का हमी भावाचा म्हणजेच कमी भावाचा खिळा शेतकर्‍याच्या माथी ठोकून टाकला की मग तिथे गुंतवणुक करण्यास कुणी तयार होत नाही. भाव चढले तर हमी भावाच्या पातळीवर आपोआप येवून कोसळणार आणि उतरले तर मात्र सगळेच वार्‍यावर सोडून देणार असाच नेहमी अनुभव राहिला आहे. 

केरळ मधील डाव्या सरकारने ही शेतकर्‍यांची उडवलेली थट्टा आहे. ‘जेणे राजा व्यापारी तेणे प्रजा भिखारी’ अशी म्हण गुजरातीत आहे. केरळात सरकार भाजी बाजारात उतरणार असेल तर त्यातून शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. 1 नोव्हेंबर पासून हे धोरण राबविण्याचे केरळ सरकारने घोषीत केले आहे. 

नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या चार महिन्यांच सगळ्यांत चांगला आणि मुबलक प्रमाणात भाजीपाला बाजारात येतो. हेच चार महिने ज्याच्याकडे जरा पाणी आहे तो शेतकरी भाजीपाला घेवून चार दोन पैसे गाठीला बांधून आपला तोटा भरून काढण्याचे स्वप्न पाहतो. नेमका त्याच स्वप्नाचा चक्काचुर केरळाचे डावे सरकार करत आहे.

  

    श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, 9422878575   

      


Tuesday, November 3, 2020

बर्दापूरकर बोरकर आणि बरवा हिरवा

  


उरूस, 3 नोव्हेंबर 2020 

 ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर सरांच्या ब्लॉगवर सामाजिक राजकीय लिखाणासोबतच ललित लेखनही आढळून येते. मला हे लेख विशेष भावतात. ‘अजूगपणातल्या नोंदी’ या मालिकेत गेली काही दिवस ते लेख टाकत आहेत. 16 वी नोंद  (ता. 2 नोव्हेंबर 2020)  वाचत असताना त्यातील हिरव्या रंगाच्या उल्लेखाने माझ्या मेंदूत काही तरी चमकले. बोरकरांच्या ‘निळा’ या कवितेची आठवण झाली. बर्दापूर आणि बोरकर यांनी माझ्या मेंदूचा पुरता ताबाच घेतला. कामाला निघायची गडबड विसरून मी आधी हाती कागद पेन घेवून बसलो. झरझर कविता लिहून काढली. बर्दापूरकर सरांना तातडीने प्रतिक्रिया म्हणून व्हाटसअप वर पाठवली. मग दुपारी तिच्यात जराशी दुरूस्ती. रात्री लक्षात आलं अनुष्टूभ म्हणजे केवळ आठ आठ अक्षरं एका ओळीत हवी इतकं सोपं नाही. पहिला शब्द दोनच अक्षरांचा असावा. बाकी तीन तीन चे दोन असावे लागतात.  मग परत किरकोळ दुरूस्ती केली. तरी ‘लोभस’ शब्दपाशी अडलोच. तो काही बदलता आला नाही. बोरकरांच्या निळा कवितेच्या शैलीतील हिरव्या रंगावरची ही कविता ‘बरवा हिरवा’


निळ्या आभाळ मंडपी

खाली गालीचा हिरवा

सदा सुखवी जीवाला

रंग हिरवा बरवा ॥


एक कुणी हटखोर

एक असे समंजस

एका अत्तराचा गंध

त्याला म्हणतात खस ॥


एक जरठ दिसतो

दूजा भासतो कोवळा

राठ कुणी नी कुणाचा

लोभस हा तोंडवळा ॥


एक पाहतो रोखून

आहे हिरवा उद्धट 

एक झुकवितो डोळे

भासे जरासा लाघट ॥


महा-वृक्षाचा हिरवा

वाटे गुढ आत्ममग्न 

चिंब चिंब भिजूनिया

वेली हिरव्याशा नग्न ॥


सांज सोनेरी उन्हात

एक झाकोळ हिरवा

जरा कातर कातर

कानी घुमतो मारवा ॥


फेर धरून नाचतो

असा भवती हिरवा

डोळे भरून जातात

मनी दाटतो गारवा ॥


     

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Saturday, October 31, 2020

मुर्ती मालिका -२


शेंदूर्णीचा त्रिविक्रम विष्णु

वामनाने तीन पावलांत स्वर्ग पृथ्वी पाताळ जिंकून घेतले या रूपाला त्रिविक्रम विष्णु म्हटलं जातं. सहसा केशवराज विष्णु या रूपातील मुर्ती जास्त आढळून येतात (पद्म, शंख, चक्र, गदा असा शस्त्र क्रम). त्रिविक्रम रूपातील मुर्तीच्या हातातील शस्त्र क्रम पद्म, गदा, चक्र आणि शंख असा असतो (डावीकडून उजवीकडे). अशी ही त्रिविक्रम विष्णु मुर्ती शेंदूर्णी (ता. जामनेर, जि.जळगांव) येथे आहे. या विष्णुच्या शक्तीला क्रिया असे म्हणतात. सोयगांव पासून हे गांव अतिशय जवळ आहे. या मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे बाजूची प्रभावळ ही जवळपास मुर्ती इतकीच आहे. एरव्ही प्रभावळीवर कोरलेले दशावतार फार लहान असतात. पण इथे मुर्तीच्या सोबत जणू सर्व विश्वच कोरले आहे. आणि त्याचे कारणही परत तीन पावलांत जग व्यापणारा त्रिविक्रम दाखवायचा आहे.
Jitendra Vispute
आणि
Sudhir Mahajan
या मित्रांमी ही मुर्ती माझ्या निदर्शनास आणून दिली. त्यांचे धन्यवाद. कुणाकडे त्रिविक्रम विष्णु मुर्तीचे अजून स्षष्ट फोटो असतील तर जरूर टाका. जेणेकरून प्रभावळीवरील मुर्ती वाचता येतील. ही मुर्ती अगदी उकिरड्यात पडलेली होती. शेंदूर्णीच्या एका सत्पुरूषाला दृष्टांत झाला. उकिरडा उकरला गेला आणि ही पाच फुटी भव्य मुर्ती सापडली.
येथे आषाढी एकादशीला व कार्तिकी एकादशीला त्रिविक्रमाची मोठी यात्रा भरते.आषाढी एकादशीला पंढरपूरचा विठ्ठल शेंदुर्णीला त्रिविक्रमाच्या मंदिरात आलेला असतो अशी श्रद्धा आहे. शेंदुर्णीच्या ज्या सत्पुरूला त्रिविक्रमाच्या मूर्तीचा साक्षात्कार झाला ते सत्पुरूष कडोबा महाराज. त्यांचे शेंदुर्णीला मोठे मंदिर आहे. यात्रेकरू त्रिविक्रमांच्या दर्शना सोबतच कडोबा महाराजांचे ही श्रध्देने दर्शन घेतात. (लेखक मित्र रविंद्र पांढरे यांनी दिलेली माहिती).
या दंत कथेतला खरेखोटेपणा आपण बाजूला ठेवू. पण गावकर्यांनी भव्य मंदिर उभारून या अप्रतिम मुर्तीची जोपासना केली हे महत्वाचे. ग्रामीण पर्यटन वाढवायचे तर अशी ठिकाणं लोकांपर्यंत समोर आणली पाहिजेत. तिथपर्यंत किमान चांगले रस्ते बनवले पाहिजेत.



उग्र नरसिंह
हळेबीडू येथील होयसळेश्वर मंदिरावर बाह्य भागात ही आसनस्थ मुर्ती दिसली आणि माझे पाय खिळले. नरसिंहाची हिरण्यकश्यपुचे पोट फाडतानाची मुद्रा सर्वत्र आढळते. पण या ठिकाणी हिरण्यकश्यपुच्या पोटातील आतडे बाहेर काढून त्याची कलात्मक नक्षी दाखवली आहे ती पाहून मी चकित झालो. तिथे आलेल्या एका जर्मन अभ्यासकाने मला हेही सांगितले की या आतड्याची लांबी त्या आकाराच्या माणसाच्या आतड्या इतकीच शिल्पात दाखवली आहे. माझ्या जवळ मोजायची काही साधने नव्हती. पण ८०० वर्षांपूर्वी एका शिल्पकाराला मानवी शरिरशास्त्राची पोटातील अवयवांसह पूर्ण माहिती होती आणि ती तो कलात्मक पातळीवर दाखवून देवू शकत होता हे थक्क करणारे आहे. ही आतड्याची माळ डाव्या बाजूची पूर्ण आहे. उजव्या बाजूला तुटलेली दिसते आहे.
हा नरसिंह आठ हातांचा आहे. चार हातात विष्णुची आयुधं (शंख चक्र गदा इ. दिसत आहेत) दोन हातांनी हिरण्यकश्यपुचा पाय आणि डोके पकडले आहे. आणि बाकी दोन हातांनी नखाच्या सहाय्याने पोट फाडलेले दिसत आहे.
वरील मुर्ती उग्र नरसिंह अथवा विदारण नरसिंह म्हणून ओळखली जाते. नरसिंहाच्या अजून दोन मुर्ती प्रचलीत आहेत. योगमुद्रेतील शांत सौम्य मुर्तीला योग नरसिंह म्हणतात. तिसरी मुर्ती लक्ष्मी बरोबरची तिला लक्ष्मी नरसिंह किंवा भोग नरसिंह असे म्हणतात,
नरसिंहाची जी प्राचीन मंदिरे आहेत त्यात गोदावरी काठी नांदेड जिल्ह्यात राहेर येथे आहे (बाकी बहूतांश मंदिरे तुलनेने अलीकडच्या काळातील आहेत).
नांदेड परभणी परिसरात या तीन प्रकारच्या नरसिंहाला बोली भाषेत आग्या नरसिंह, योग्या नरसिंह आणि भोग्या नरसिंह अशी नेमकी अनुप्रास जुळणारी नावे आहेत.
प्रत्यक्ष मंदिरं कमी असली तरी बहूतांश विष्णु मंदिरांवर उग्र नरसिंहाचे शिल्प बाह्य भागात, देवकोष्टकात आढळून येते.



योग नरसिंह
काल उग्र नरसिंहाच्या मुर्तीवर लिहिले होते. आज ही दूसरी अप्रतिम शिल्पकामाचा नमुना असलेली "योग" नरसिंह मुर्ती आहे. औंढा नागनाथ जवळ राजापुर इथे ज्या तीन मुर्ती आहेत त्यातील ही दूसरी (सरस्वतीच्या मुर्तीबाबत पूर्वी लिहीलं आहे). अर्ध सिद्धासनातील हा नरसिंह असून चेहरा सौम्य आहे. योग नरसिंह मुर्तीला योगपट्टा असतो. तो इथे दिसत नाही. हंपी येथील प्रसिद्ध जी मुर्ती आहे तिला योगपट्टा स्पष्ट आणि मोठा दिसून येतो. ही मुर्ती साडेतीन फुटाची आहे.
अर्ध सिद्धासनातील नृसिंह मुर्ती फारच थोड्या आहेत. हा नरसिंह दोनच हातांचा आहे त्यामुळे पण याचे वेगळेपण दिसून येते (पैठण येथे १४ हातांची विदारण नृसिंह मुर्ती आहे). राजापुर येथील तिन्ही मुर्ती त्यांच्या विलक्षण शिल्पसौंदर्याने अभ्यासकांना चकित करतात. या मुर्तींचा कालखंड १३ व्या शतकापर्यंत मागे जातो. विष्णुच्या याच अवतारातील मंदिरे ११ व्या ते १४ व्या शतकात जास्त आढळून आली आहेत. बाकी विष्णु अवताराची मंदिरे जवळपास नाहीतच. (फोटो सौजन्य हरिहर भोपी, औंढा)

Friday, October 30, 2020

चीनची घुसखोरी राहूल गांधींच्या मेंदूत!

 


उरूस, 30 ऑक्टोबर 2020 

बिहार विधानसभेची धुमश्‍चक्री चालू आहे. प्रचारात राहूल गांधी यांनी परत एकदा आपले चीनविषयक लाडके मत मांडले आहे. चीन भारतात 1200 किमी आत घुसला असल्याचे राहूल गांधी बोलून गेले. 

अशी वक्तव्ये आल्यावर विरोधक चिडून काहीतरी बोलतात, टीका करतात, समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर ‘ट्रोलींग’ केल्या जाते. राहूल गांधी असं का करतात हे जरा नीट लक्षात घेतले तर त्यावर टीका करून शक्ती खर्च करण्याची गरज पडणार नाही. 

राहूल गांधी म्हणतात त्याप्रमाणे चीनची घुसखोरी झाली आहे हे खरे आहे. पण ती भारतच्या भौगोलिक हद्दीत झाली नसून राहूल गांधी यांच्या मेंदूत झालेली आहे. त्यामुळे साहजिकच ते सतत असं बडबडत राहणार. याला ते स्वत:ही काही करू शकत नाहीत. 

केवळ राहूल गांधीच नाही तर इतरांच्याही मेंदूत ही घुसखोरी झालेली आहे. त्यांनाही आपण नीट समजून घेतले पाहिजे. यातील दुसरे प्रमुख नाव आहे कश्मिरचे माजी मुख्यमंत्री केंद्रातील विविध सरकारांमध्ये मंत्री राहिलेले विद्यमान खासदार असलले फारूख अब्दूल्ला. त्यांनी असे विधान केले आहे की 370 कलम परत लागू करू आणि तेही चीनच्या मदतीने. म्हणजे भारतीय घटनेतील बदलासाठी चीनची मदत घेता येते असा एक विलक्षण शोध फारूख अब्दूल्ला यांनी आपल्या या वक्तव्यातून लावला आहे. 

हे दोघे कमी पडले म्हणून की काय अजून एका तिसर्‍या मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वाने यात उडी घेतली. तिचे नाव आहे मेहबुबा मुफ्ती. मेहबुबा असे म्हणाल्या की मी फक्त कश्मिरचाच झेंडा हाती घेईन. 5 ऑगस्ट 2019 ला 370 कलम हटल्यानंतर कश्मिरचा विशेष दर्जा रद्द झाला. आता त्या राज्याला वेगळा झेंडा उरला नाही. या गोष्टीला सव्वा वर्षे उलटून गेल्यावरही मेहबुबा मुफ्ती ही वस्तुस्थिती कबुल करायला तयार नाहीत.

राहूल गांधी, फारूख अब्दूल्ला आणि मेहबुबा मु़क्ती या तिघांची वक्तव्ये वरकरणी वेगवेगळी दिसत असली तरी ती तशी नाहीत. हा सगळा कुमार केतकर सांगत असतात तसा एक व्यापक कटाचा भागच असावा अशी शंका येते आहे. कारण बरोबर बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही वक्तव्ये आलेली आहेत. शिवाय हे मुद्दामच अशा पद्धतीने बोलल्या जाते.

यात केवळ चीनच आहे असंही नाही. पाकिस्तानही आहे. म्हणजे चीन सोबत पाकिस्ताननेही यांच्या मेंदूत घुसखोरी केली आहे. 

हे ठरवूनच चालू आहे याचा एक पुरावा लगेच पाकिस्तानच्या संसदेतूनच मिळाला. भारताने जो सर्जिकल स्ट्राईक केला त्याचा उल्लेख आणि त्या आधीच्या भारतातील घातपाती हल्ल्याचा उल्लेख खुद्द पाकिस्तानी मंत्र्यांनीच केला. 

म्हणजे एकीकडे चीन घुसलाच आहे, आपल्या सैनिकांनी चीनचे सैनिक यमसदनी पाठवले याचा पुरावा काय? म्हणून आरडा ओरड भारतात चालू असतो. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले जातात. आणि दुसरी कडे चीनची वृत्तसंस्था ग्लोबल टाईम्स चीनी सैनिक मृत्यूमुखी पावल्याची कबुली देते. आता पाकिस्तानी संसदेतच पाकने केलेल्या हल्ल्याची, भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची कबुली दिली जाते. 

यातून भारताविरोधी क़ट रचल्याचेच चित्र समोर येत रहाते.

आश्चर्य याचेच आहे की तथाकथित बुद्धीमान पत्रकार विचारवंत कलावंत सामाजिक कार्यकर्ते हे अशा वेळी गप्प कसे काय बसतात? यांनीच एकेकाळी राहूल गांधींची बाजू लावून धरत सत्ताधार्‍यांवर टीकास्त्र सोडलेले होते. मग आता चीन असो की पाकिस्तान इथूनच कबुली येत आहे. आता हे गप्प कसे? 

का यांच्याही मेंदूत चीनने घुसखोरी केली आहे. 

एक साधा मुद्दा आहे की भारतात चीनने घुसखोरी केली असे मानणारे राहूल गांधी आणि त्यांचे समर्थन करणारे पुरोगामी यांनी एकदा त्यांच्या दृष्टीने एल.ए.सी. नेमकी कुठे आहे त्याचा नकाशा काढून दाखवावा. म्हणजे त्याच्या पुढे चीन नेमका कुठपर्यंत आहे हे तपासून पहाता येईल. 

गलवान खोरे किंवा पेन्ग़ॉंग त्से सरोवर या बाबत वारंवार सरकारी पातळीवर निवेदने दिली गेली आहेत. आपल्या सैनिकांच्या हालचाली कुठपर्यंत आहेत याचेही सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. भारतीय सैन्यानेच चढाईखोर बनून चीनने पूर्वी ताब्यात घेतलेल्या प्रदेशात जावून त्यावर आपला कब्जा मिळवला आहे हे सांगितले जात आहे. यावर ज्यांचा विश्वास नाही त्यांनी आता हे स्पष्ट करावे की त्यांच्या दृष्टीने नेमकी ताबा रेषा कोणती आहे.

राहूल गांधी, फारूख अब्दूल्ला आणि मेहबुबा मुफ्ती हे तर बोलून चालून राजकारणी आहेत. त्यांच्या डोक्यात चीन पाकिस्तानने घुसखोरी केली असल्याने ते तसे बोलणार यात काही आश्चर्य नाही. पण हे पत्रकार बुद्धीजीवी विचारवंत पुरोगामी यांचे तर तसे नाही ना. यांना समर्थन करताना ही जबाबदारी पूर्ण पाडावी लागेल. सरकारी धोरणांचे स्वागत करणार्‍यांनी  सविस्तर नकाशे मांडले आहेत. इंडिया टिव्ही, रिपब्लिक टीव्ही यांच्यावर आपल्या सैन्याच्या बाजूने विस्तृत विवरण केले जातेश मेजर गौरव आर्या सारखे तज्ज्ञ आपली बाजू भक्कमपणे सामान्य दर्शकांसमोर ठेवतात. 

आता याला उत्तर म्हणून किंवा यांची मांडणी चुक आहे म्हणून काही एक सविस्तर मांडणी या पुरोगाम्यांनी केली पाहिजे. यांनी भारताच्या चुका दाखवून द्यायला पाहिजेत. तसं न करता हे केवळ आरडा ओरड करत आहेत. अगदी चीनी वृत्त संस्था काय सांगत आहे याचा अभ्यास करून या विषयातले तज्ज्ञ वस्तुस्थिती समोर आणत आहेत. याच्या नेमके उलट राहूल गांधींच्या मागे बौद्धिकदृष्ट्या पुरोगामी फरफटत निघाले आहेत. 

              श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Wednesday, October 28, 2020

मुर्ती मालिका -१


 

जय देव जय देव जय व्यंकटेशा

ही सुंदर बालाजी मूर्ती मला आज सकाळीच सई चपळगावकर हिने पाठवली. त्यांच्या घराण्याची ही कुलदेवता आहे. कर्नाटका सीमेवर चपळगावकर ह्यांचे मूळ गाव आहे. वैष्णव कुटुंबात बालाजी कुलदैवत असते. विष्णूची नेमकी कोणती मूर्ती बालाजी व्यंकटेश ह्या नावाने संबोधली जाते? तर उजव्या वरील हातात चक्र वरील डाव्या हातात शंख, खालील उजवा हात वरद मुद्रेत आणि खालील दावा हात कटीवर. पुरीचा जग्गनाथ, तिरुपतीचा बालाजी आणि पंढरपूरचा विठ्ठल ही तीन मुळचे लोक दैवते. जग्गनाथ "अन्न ब्रह्म", बालाजी "कांचन ब्रह्म" आणि विठ्ठल "नाद ब्रह्म" म्हणून ओळखले जातात. व्यंकटेश बालाजीची आतिशय सुंदर आरती समर्थ रामदास यांनी रचिली आहे. ती बऱ्याच जणांना माहित नाही. इथे देत आहे. रा. चिं. ढेरे यांनी "श्रीव्यंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर" या आपल्या पुस्तकात दिली आहे. देवीचे नवरात्र असतात त्याच वेळी बालाजीचे ही नवरात्र असतात. त्याला ब्रह्मोत्सव म्हटले जाते. बालाजी आणि पद्ममावती विवाह सोहळाही ह्या काळात लावले जाते.
जय देव जय देव जय व्यंकटेशा
आरती ओवाळू तुज रे जगदीशा ॥ धृ०||
अघहरणी पुष्करिणी अगणित गुणखाणी ।
अगाध महिमा स्तवितां न बोलवे वाणी ॥
असंख्य तीर्थावळी अचपळ सुखदानी ।
अभिनव रचना पहातां तन्मयता नयनीं ॥ १ ||
अतिसुखमय देवालय, आलय मोक्षाचे ।
नाना नाटक रचना, हाटक वर्णाचे ॥
थकित मानस पाहे स्थळ भगवंताचे ।
तुळणा नाही हे भू-वैकुंठ साचे ॥ २ ||
दिव्यांबरधर सुंदर तनु कोमल लीळा ।
नाना रत्ने, नाना सुमनांच्या माळा ॥
नानाभूषणमंडित वामांगी बाळा ।
नाना वाद्ये मिनला दासांचा मेळा ॥ ३||

औंढा नागनाथ मंदिरात काचेत ठेवलेली ही विष्णुमुर्ती शिल्पकलेचा अत्युच्च नमुना मानली जाते. या मुर्तीला केशव हे नाव दिलेले आहे. उजव्या खालच्या हातात पद्म, उजव्या वरच्या हातात शंख, डाव्या वरच्या हातात चक्र व खालच्या हातात गदा आहे. मुर्तीवर इतके बारीक कोरीवकाम आहे की बोटावरचे नखंही दिसतात. मराठवाड्यात सापडलेल्या बहूतांश विष्णु मुर्ती केशवराज मुर्ती अशाच प्रकारातील आहेत. या रूपातील विष्णुची जी शक्ती आहे तीला किर्ती" या नावाने संबोधले जाते. मागच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आढळून येतात. १९७२ च्या दूष्काळात रोजगार हमी योजनेत तळ्याचा गाळ काढत असताना ही मुर्ती सापडली. ही मुर्ती गर्भगृहा जवळ ठेवलेली आहे. तिथून काढून मंदिर आवारतच पण बाहेर ठेवावी. जेणेकरून शिल्प अभ्यासकांना नीटपणे पहाता येईल. तसेही आत गर्दी करणारे आंधळे भाविक इकडे पहातच नाहीत. आणि ज्यांना पहायची आहे त्यांना धक्कीबुक्की गर्दीत पहाताही येत नाही. (छायाचित्र सौजन्य अमर रेड्डी)


राजस सुकूमार असा विठ्ठल
तुकाराम महाराजांनी "राजस सुकुमार मदनाचा पुतळा" अशी ओळ ज्याच्याकडे पाहूनच लिहिली असावी अशी ही सुंदर विठ्ठल मुर्ती. सिंधुरवदन गणेशामुळे सर्व परिचित असलेल्या खाम नदीकाठच्या शेंदूरवादा (ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) या गावात एका छोट्या लाकडी माळवदाच्या वाडा वजा मंदिरात ही मुर्ती ठेवलेली आहे. शिवकालीन संत मध्वमुनीश्वरांचे हे ठिकाण. इथे त्यांची समाधी आहे. जहागीरदार कुटूंबियांनी मध्वमुनीश्वरांचा आश्रम नक्षीदार कमानी दगडी ओवर्या असा भव्य बांधुन काढला आहे.
मध्वमुनीश्वर नियमित पंढरपुरची वारी करायचे. शरिर थकल्यावर त्यांनी विठ्ठलाला पत्र लिहिलं आणि येणं शक्य नाही असं म्हणत इथूनच नमस्कार केला. मग विठ्ठलाने त्यांना दृष्टांत देवून मीच तूझ्याकडे येतो असं सांगितले. तीच ही विठ्ठल मुर्ती. दरवर्षी मध्वमुनीश्वरांचा उत्सव साजरा होतो तेंव्हा ही मुर्ती मिरवणुकीने मध्वमुशीश्वर आश्रमात नेली जाते.
समचरण कर कटीवर ठेवलेले अशी ही काळ्या पाषाणातील देखणी मुर्ती. याच मंदिरात गरूडाचीही छोटी मुर्ती आहे. विठ्ठलाच्या प्राचीन सुबक देखण्या मुर्ती फार थोड्या आहेत. आणि ज्या आहेत त्या काहीश्या ओबडधोबड. शिवाय प्राचीन अशी विठ्ठलाची मंदिरेही फारशी नाहीत. पंढरपुर शिवाय पानगांव (ता. रेणापुर जि. लातुर) हाच एक ठळक अपवाद. हे प्राचीन विठ्ठल मंदिर शिल्प सौंदर्याने नटलेले आहे.
विठ्ठलाची मुर्ती एकटीच असते. सोबत रूक्मिणी नसते. अगदी पंढरपुरलाही रूक्मिणी मंदिर वेगळे आहे. यावर अरूण कोलटकर यांची वामांगी नावाची अप्रतिम कविता आहे. नंतरच्या काळात विठ्ठल रूक्मिणी यांच्या मुर्ती एकत्र तयार केल्या जायला लागल्या. या विठ्ठल मुर्तीचे पाय अतिशय देखणे आहेत. "पायावर डोकं ठेवणं" याला वारकरी संप्रदायात वेगळे महत्व आहे.
ही देखणी दूर्मिळ विठ्ठलमुर्ती जरूर पहा. या गावावर एक छोटा video आम्ही केला आहे. यावर लेखही मी माझ्या blog वर टाकला आहे. जरूर पहा. (छायाचित्र सचिन जोशी शेंदूरवादा)
(फेसबुकवर विविध मुर्तींवर रोज लिहीतो आहे. हे लिखाण म्हणजे छोटे टीपण असते. अशा तीन चार मुर्तींवरचे लिखाण एकत्र करून ते या लेखमालिकेत देत आहेत. नवरात्रीत रोज एक मुर्तीवर लिहीले होते. त्यांचे एकत्रीकरण करून नवदुर्गा 9 दिवस 9 मुर्ती हा लेख तयार केला होता. तो पण ब्लॉगवर टाकला आहे.) श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, October 25, 2020

नवदुर्गा ९ दिवस ९ मूर्ती


महालक्ष्मीची ही अप्रतिम मुर्ती माझ्याकडे आहे. २५ वर्षांपूर्वी बी. रघुनाथ प्रकल्पासाठी मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला तेंव्हा माझ्या मित्रांनी कौतूकाने ही मुर्ती दिली. पुस्तकाला पुरस्कार मिळाला तेंव्हा सरस्वती दिली असती तर संयुक्तीक ठरले असते. पण माझ्या मित्रांना वाटले याने "लक्ष्मी"ची उपासना करावी. ती मला नाही जमली. जूनी मंदिरं मुर्ती यांच्या जिर्णोद्धाराचा प्रकल्प हाती घेतला आहे. तेंव्हा स्वत:जवळची ही सुंदर मुर्ती घासून पुसून पुजावी नित्य स्मरावी जेणे करून आपल्या कामाचे नित्य स्मरण होत राहील. आज घटस्थापना. देवीच्या सर्व रूपातील प्रतिमांचे स्मरण.


काल मी महालक्ष्मीच्या माझ्या जवळ असलेल्या मुर्तीचा फोटो टाकला होता. आजचा हा फोटो आहे माझ्या सासुरवाडीच्या (सखारामपंत डांगे) घराण्याच्या देवीचा. कुंभारी, ता.जि. परभणी येथील ही देवी. हे मंदिर २ वर्षांपूर्वी पर्यंत अगदी साधं छोटं होतं. शेंदूर फासलेला दगड इतकंच देवीचं रूप होतं. गावकर्
यांची मोठं मंदिर बांधलं. माझ्या चारही मेहूण्यांनी मिळून हा सुंदर तांदळा मंदिरात बसवला. मोठ्या वहिनी सौ. विंदा डांगे यांनी या मंदिराच्या जिर्णोद्धाराचा ध्यासच घेतला होता. स्वत: चकरा मारून काम करवून घेतले. देवीला दागिने घडवले. मुकूट बसवला. मंदिराला कळस चढवला. आता मंदिराला आणि तांदळ्याला सौंदर्य प्राप्त झाले. बहुतांश ठिकाणी अगदी बेढव असे शेंदूर फासलेले दगड देवी म्हणून पुजले जातात. त्या ठिकाणी चांगल्या मुर्ती अथवा तांदळे बसवायला काय हरकत आहे? याला शास्त्रात आधारही आहे. आक्रमणांच्या काळात मुर्ती नष्ट झाल्या त्यांचा विध्वंस झाला. आता ते सारं विसरून नव्याने काही का केल्या जावू नये? तशीही आपल्याकडे बदलाची मोठी परंपरा आहे.

तूळजापुरची भवानी माझ्या घराण्याची कुलदैवता आहे. आमच्या नित्यपुजेत देवीचा टाक आहे पण मुर्ती नव्हती. जय संतोषी माता चित्रपटामुळे सिंहावर बसलेली देवीची प्रतिमाच सगळ्यांच्या मनात ठसली आहे. प्रत्यक्षात महिषासुर मर्दिनी रूपातील अष्टभुजा देवीची मुर्ती सहसा आढळत नाही. मला ही मुर्ती तूळजापुरात एका दूकानात दिसली आणि पाय खिळूनच राहिले. एक तर मुर्ती मुळच्या देवी रूपातील, दूसरं म्हणजे महिषासुराला मारतानाचा सगळा आवेश मुर्तीत उतरलेला. सगळ्याच मुर्तीला एक अप्रतिम अशी लय आहे. या मुर्तीची मागची नागप्रतिमा असलेली प्रभावळ, त्यावरचे किर्तीमुख सगळंच मोहक वाटले. २० वर्षांपासून ही मुर्ती माझ्या जवळ आहे. मागच्या प्रभावळीत लहान छिद्र आहेत. त्यात फुलांचे देठ अडकवून छान आरास करता येते. खालचे चौकोनी जड आसन वेगळे करता येते. मागची प्रभावळही वेगळी होते. त्रिशुळपण वेगळा करता येतो. जमिनीशी बरोबर ४५ अंशाचा कोन साधणारी त्रिशुळाची रचना गणित तत्वाशी जुळते. या मुर्तीने मला मोहित केले. प्रथेप्रमाणे मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. पण खरी प्राण प्रतिष्ठा माझ्या मनातच झाली. डाव्या हातात महिषासुराचे शीर आहे आणि उजव्या हातातील त्रिशुळ त्याच्या मानेवर रूतवला आहे. बाकी सहाही हातात शस्त्र आहेत. देवीच्या अष्टकातील विष्णुदासांचे पद या मुर्तीला पाहून मला नेहमी आठवते

अष्टादंड भुजा प्रचंड सरळा
विक्राळ दाढा सुळा
रक्त श्रीबुबूळा प्रताप आगळा
ब्रम्हांड माळा गळा
जिव्हा ऊर स्थळा रूळे लळलळा
कालांत कल्पांतके
साष्टांगे करीतो प्रणाम तुजला
जय जय महाकालीके



देवी विविध रूपात पूजली जाते. करमाळा येथे कमला भवानी या नावाने भवानीची पुजा होते. ही महिषासूरमर्दिनी या रूपातील भवानी नसून कमळात बसलेली अशी आहे. रावराजे निंबाळकर यांनी हे मंदिर उभारले व देवीची प्राणप्रतिष्ठा केली. सैराट चित्रपटातील मंदिर ते हेच. येथील कमला भवानीची पितळी मुर्ती आमच्या घराण्यात माझ्या मोठ्या चुलत भावाकडे पुजली जाते. महालक्ष्म्या अतिशय आकर्षक व जिवंत भासणार्या ज्यांच्याकडे मांडल्या जातात ते हेच घर. माझा पुतण्या सखाराम उमरीकर या देवीची रोज आकर्षक सजावट करतो. ही कमलाभवानी महिषासुरमर्दीनी सारखी उग्र रूपातील नसून प्रसन्न अशी आहे.


ही अतिशय वेगळी अशी स्त्री रूपातील मूर्ती अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथील मंदिरावरची आहे. आता महादेव मंदिर म्हणून ओळखलं जात असलेलं हे मुळचं विष्णु मंदिर. शंख चक्र गदा पद्म यांचे चारी हातातील स्थान पाहून विविध नावे विष्णुला दिली जातात. अशी २४ नावं विष्णुची आहेत. त्यातील वरच्या उजव्या हातात चक्र, वरच्या डाव्या हातात शंख, खालच्या उजव्या हाती पद्म आणि खालच्या डाव्या हातात गदा असेल तर त्याला जनार्दन असे नाव आहे. दू:ख हरण करणारा असा हा जनार्दन. या विष्णुची शक्ती म्हणून जिचे वर्णन केले जाते ती म्हणजे उमा. ही त्या उमा शक्तीची मुर्ती आहे. ही विष्णुची पत्नी लक्ष्मी नव्हे. कुठल्याही देवतेच्या उजव्या बाजूला जी स्त्री प्रतिमा कोरली जाते ती त्याची शक्ती असते. (आई, मुलगी, बहिण, सुन या नात्यातील सर्व स्त्रीयांची जागा उजव्या बाजूस असते) डाव्या बाजूला असते ती पत्नी (वामांगी).
या अभ्यासामुळे अन्वा मंदिरांवरील विष्णुच्या शक्तींचा दृश्य पुरावा समोर आला. या मंदिरात मी बर्याचदा गेलो आहे. नुकताच गेलो होतो तेंव्हा हा फोटो काढून आणला. डाॅ. देगलुरकरांच्या पुस्तकात यावर विस्तृत विवरण आहे. विष्णुची २४ नावं आणि त्यांच्या शक्ती सांगितल्या आहेत.
नवरात्रीत पुरूषाची शक्ती असलेली अशी स्त्री तिचीही मनोमन पुजा झाली पाहिजे.



लोभस पुत्रवल्लभा
स्त्रीला माता म्हणून आपण संबोधतो तिचा गौरव करतो पण मातृरूपात तिची प्रतिमा फारशी आढळत नाही. होट्टल (ता, देगलूर जि. नांदेड) येथील मंदिरावरील या शिल्पाने माझे लक्ष्य वेधून घेतले. लहान मुल कडेवर घेतले आहे. एरव्ही स्त्रीयांच्या स्तनांचा उपयोग वासने संदर्भातच येतो. इथे त्या लहान बाळाचा हात स्तनांवर दाखवून मातृत्व सुचीत केले आहे. एकुणच हे शिल्प लोभस आहे. ही स्त्री काही कामात व्यग्र आहे आणि जबाबदारी म्हणून लेकरू काखोटीला मारले असेही नाही. उजव्या हातातील खेळण्याने ती त्याला खेळवते आहे, लाड करते आहे. ते मुलही मान उंचावून तिकडे पाहते आहे. स्त्रीच्या चूहर्यावर तृप्तीचे भाव आहेत. अशा मुर्तीला पुत्रवल्लभा या गोड नावाने संबोधले जाते. महाराष्ट्रात उत्तर चालूक्य कालीन (११ वे ते १३ वे शतक) मंदिरांवर सुरसुंदरींची अतिशय देखणी कमनीय अशी शिल्पे आढळून. त्यातील हे एकदम वेगळे लोभस शिल्प "पुत्र वल्लभा" . आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी मातृदेवता नमोनम: (जानेवारी महिन्यात होट्टल महोत्सवासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी
Vincent Pasmo
या फ्रेंच मित्राने टिपलेले हे छायाचित्र)



केवळ पत्रसुंदरी नव्हे तर ज्ञानमार्गीणी
पत्रसुंदरीचे हे देखणे शिल्प धारासूर (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील गुप्तेश्वर मंदिरावरचे आहे. शिखर शाबुत असलेले ९०० वर्षांपूर्वीचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर. मुळचे हे विष्णु मंदिर. या मंदिरावर सुरसुंदरींची अप्रतिम शिल्पे आहेत. काल होट्टल येथील ज्या पुत्रवल्लभेचे छायाचित्र टाकले होते तसेल याही मंदिरावर आहे. मध्ययुगीन कालखंडात स्त्रीयांना ज्ञानाचा अधिकार नाकारला गेला होता. पण पूर्वीच्या कालखंडातील स्त्रीया ज्ञानाच्या बाबतीत सक्षम होत्या याचा ठोस पुरावा या शिल्पातून मिळतो. या शिल्पाला "विरह कंठिता" असेही संबोधले जाते. पण त्यातून प्रेयसी किंवा विरहिणी इतकाच मर्यादीत अर्थ निघतो. खरं तर हीला लेखीका किंवा ज्ञानमार्गीणी असे संबोधन द्यायला हवे. कारण ती लिहीत आहे त्या कागदाच्या दोन्ही बाजूला उभे दंड आहेत. म्हणजे पोथीसारखी रचना सुचीत होते. हे केवळ पत्र उरत नाही. शिवाय तिच्या चेहर्यावरचे भाव विरहणीचे नाहीत.
सुरसुंदरी या शब्दांतून स्त्रीचे शारिरीक सौंदर्य जास्त सुचीत होते. पण कालची पुत्रवल्लभा, आजची ही लेखीका आणि उद्या जिच्यावर लिहीतोय ती शत्रु मर्दिनी या शिल्पांचा "सुंदरी" इतका मर्यादीत विचार करून चालणार नाही. स्त्री व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास दर्शविणारी ही शिल्पे आहेत. यातून एक सक्षम स्वतंत्र व्यक्तिमत्वाची स्त्री सुचित होते. "अबला" हे तीचे मध्ययुगीन कालखंडातले निर्माण झालेले चित्र मागे पडते. आज सप्तमी, सातवी माळ. त्या निमित्ताने बुद्धीमान स्त्रीचे हे शिल्प अवलोकनार्थ.
(छायाचित्र अरविंद शहाणे या परभणीच्या मित्राने आठच दिवसांपूर्वी काढलेले आहे. या मंदिरावर सविस्तर व्हिडियो त्याने व मल्हारीकांत देशमुख या मित्राने तयार केलाय. त्याचा पहिला भाग u tube वर आहे. जरूर बघा.)



रणझूंझार शत्रुमर्दिनी
आज अष्टमी. नवरात्रीच्या आरतीत "अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी हो" अशी ओळ आलेली आहे. महिषासुराचा वध करणार्या देवीची उग्र प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असते. पण अशी लढव्वयी शत्रुचा शिरच्छेद करणारी योद्धा स्त्री प्रतिमा मात्र कधी डोळ्यासमोर येत नाही. होट्टल (ता. देगलूर जि. नांदेड) येथील मंदिरावर अशा स्त्रीचे शिल्प कोरलेले आहे. हीला "शत्रु मर्दिनी" या नावाने संबोधले जाते. हीच्या डाव्या हातात नरमुंड आहे आणि उजव्या हातात खङग आहे. संस्कृत ग्रंथ "क्षीरार्णव" यात शत्रुमर्दिनी रूपाचे वर्णन आले आहे. या वर्णनाचा दृश्य पुरावा होट्टलच्या मंदिरावर आहे.
अशी शिल्पं मराठवाड्यात धारासुर (ता. गंगाखेड, जि. परभणी) धर्मापुरी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथेही आहेत. या शिवाय लढाउ स्त्रीयांची छोटी शिल्पेही मराठवाडा परिसरांतील मंदिरांवर आढळून आलेली आहेत.
हा परिसर नेमका मातृदेवतांचा आहे. दक्षिणेतील मात्ृसत्ताक समाज व्यवस्थेचे पुरावे आपल्याकडे स्पष्ट दिसून येतात. पैठणचे सातवाहन राजे आईचेच नाव लावायचे (गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र आळूमावी इ.इ.). मामाची मुलगी बायको केली जाते याचाही संदर्भ मातृकुळाशी नातं घट्ट जोडण्याचा आहे.
आपल्याकडे सार्वजनिक संबोधन "ओ मामा, ओ मावशी" असंच आहे. उत्तरेकडच्या पुरूषसत्ताक प्रदेशात हेच संबोधन "ओ चाचा, ओ चाची" असं आहे. दक्षिणेत स्त्रीया केवळ "सुरसुंदरी" नसून आपल्या सर्वांगिण व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंनी झळाळून दिसतात. ही अतिशय वेगळी स्त्री प्रतिमा. अष्टमीला सामान्य स्त्रीच्या रूपातीला झुंजार अष्टभुजेला नमन. (छायाचित्र सौजन्य
Vincent Pasmo
)



विद्या कलेची अधिष्ठाती सरस्वती
एखादा खजिना अचानक सापडावा तशी सरस्वतीची ही अप्रतिम मुर्ती अनपेक्षीत जागी दृष्टीस पडली. औंढा नागनाथ जवळ राजापुर नावाच्या छोट्या गावी साध्या चौथर्यावर ही मुर्ती ठेवलेली आहे. गणेश चाकुरकर हा इंजिनिअरिंगचा मित्र औंढ्याला नौकरीला होता. त्याच्याकडे गेलो असताना त्याने या गावी नेले. या परिसरात तीन मुर्ती लोकांना सापडल्या. योग नरसिंहाची सिद्धासनातील मुर्ती, अर्धनारेश्वर मुर्ती आणि तिसरी ही सरस्वतीची उभी मुर्ती.
अशा मुर्तीला स्थानक मुर्ती असे संबोधतात. (बसलेल्या मुर्तीला आसनस्थ मुर्ती म्हणतात) हीच्या वरील उजव्या हातात फासा आहे, खालील उजव्या हातात अक्षयमाला असून हा हात वरदमुद्रेत आहे. वरच्या डाव्या हातात एकतारी वीणा आहे, खालच्या डाव्या हातात पुस्तक आहे. तीच्या गळ्यातील हातातील कमरेवरील दागीन्यांचा मणी न मणी मोजता यावा इतके हे कोरीवकाम अप्रतिम आहे. डाव्या बाजूला खाली मोत्याची माळ तोंडात घेतलेला हंस आहे. खाली अंजली मुद्रेतील भक्त/सेवक उजव्या बाजूला तर डाव्या बाजूला चामरधारीणी दिसते आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना म्हणून या मुर्तीचा गौरव डाॅ. देगलुरकरांनी आपल्या पुस्तकात केला आहे. अशा मुर्ती घडवण्यासाठी गंडकी म्हणजेच नर्मदा नदितील शिळांचा वापर केला जातो.
ही मुर्ती कुठल्या भव्य सुप्रसिद्ध मंदिरातील नाही. एका साध्या गावात गावकर्यांनी निष्ठेने या मुर्ती छोट्या जागेत जतन करून ठेवल्या आहेत. खरं तर या सुंदर मुर्तीसाठी मोठं शिल्पकामयुक्त दगडी मंदिर उभं करायला पाहिजे.
गेली ९ दिवस विविध मुर्तींवर लिहीलं. या मालिकेतील हे शेवटचं टिपण. स्त्री रूपातील या विविध शक्तींना मनोमन नमन. (छायाचित्र सौजन्य श्रीकृष्ण उमरीकर)


Saturday, October 24, 2020

खडसेंचा राजकीय खडखडाट!

 


 उरूस, 24 ऑक्टोबर 2020 

 मंत्रीपद गेल्यापासून खडसेंची कुरकुर चालू होती. प्रत्यक्ष भाजप सोडून ते दूसर्‍या कोणत्या पक्षात जाणार आणि केंव्हा इतकाच प्रश्‍न शिल्लक राहिला होता. अखेर काल (23 ऑक्टोबर शुक्रवार 2020) अधिकृतरित्या शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि संभ्रम संपवला.

खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तेंव्हा त्यांच्या हातात दोन पर्याय होते. एक तर पूर्णपणे पक्ष कार्यात स्वत:ला गुंतवून घेणे. आपल्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांत (4 महानगर पालिका, 32 नगर पालिका, शेकडो ग्राम पंचायत) पक्षाला मोठे यश मिळवून देणे. खानदेशात मोडणारे 6 लोकसभा मतदारसंघ, 34 विधानसभा मतदार संघ या ठिकाणी 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत पक्षाच्या यशासाठी प्रयत्न करणे. पण खडसेंनी हे केले असे दिसत नाही. 

दुसरा पर्याय याच्या नेमका उलट होता. या सर्व ठिकाणी पक्षाचा दारूण पराभव करून दाखवणे. जेणे करून पक्षाला त्यांची ताकद कळाली असती. असमचे कॉंग्रेस नेते हेमंत बिस्व शर्मा यांनी अशा पद्धतीने कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यावर पक्षाचा पराभव केवळ असमच नव्हे तर संपूर्ण ईशान्य भारतातून करून दाखवला. तसेही काही खडसेंना जमले नाही.

या मुळे खडखडाट हा शब्द वापरला आहे. रिकाम्या भांड्याचा खडखडाट होतो तसे खडसे राजकीय दृष्ट्या रिकामे उरले आहेत. खडखडाटचा दुसरा अर्थ केवळ वाचाळपणा. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ या संत वचनांप्रमाणे नेमकी कृती खडसेंनी केलेली नाही. 

खडसेंनी पक्षांतराची ही नेमकी वेळ कोणती साधली हे पण कळायला मार्ग नाही. आता कुठल्याच निवडणुका नाहीत. राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. ज्या पक्षात खडसेंनी प्रवेश केला त्या पक्षाला आजतागायत महाराष्ट्रात कधीच निर्विवाद यश मिळालेले नाही. उलट खडसे ज्या पक्षातून बाहेर पडले तोच महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून गेल्या दोन विधानसभा निवडणुकां आणि दोन लोकसभांत सिद्ध झाला आहे. 

खडसेंच्या स्नूषा रक्षा खडसे भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. खडसेंची मुलगी विभानसभेत पराभूत झाली तरी इतर स्थानिक सत्तापदांवर आहे. मग खडसेंच्या पक्षांतराचा व्यवहारिक अर्थ काय लावायचा? 

खडसेंनी फडणवीसांनी वैयक्तिक छळल्याचे सांगीतले. शिवाय भाजपच्या दिल्ली श्रेष्ठींनीच आपल्याला राष्ट्रवादीत जायचा सल्ला दिला असे सांगून तर खडसेंनी स्वत: बद्दलची विश्वासार्हता पार संपवून टाकली. जर राष्ट्रवादीत जायचा सल्ला दिल्लीतून आला आणि तो त्यांनी मानला तर मग पक्ष सोडायचा सल्ला कुठून आला हे पण खडसेंनी सांगून टाकावे. 

खडसे 40 वर्षे भाजप संघ परिवाराशी निगडित आहेत. एका व्यक्तीच्या मताने इथे निर्णय होत नाही हे खडसेंना माहित नाही का? भाजपात व्यक्तीमहात्म्य नाही. फडणवीसांची छळायची ईच्छा हा आरोप मान्य केला तरी खडसेंच्या बाबतीतला कुठलाही निर्णय फडणवीस एकट्याने घेतील हे कसे शक्य आहे? 

खडसेंच्या बाबतीत अजून एक अतिशय चुक विश्लेषण केल्या जात आहे. त्यांना इतर मागास वर्गीयांचे नेते संबोधून त्यांची तशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयास होतो आहे. केवळ तांत्रिक दृष्ट्या खान्देशातील लेवा पाटील यांना इतर मागास वर्गीयांत (ओबीसी) गणल्या जाते. पण प्रत्यक्षात हा समाज राजकीय सामाजिक सांस्कृतिक पाळीवर अतिशय संपन्न म्हणून खानदेशात ओळखला जातो. तेंव्हा अशा समाजातील व्यक्ती इतर मागासांचा नेता म्हणून बाकी जातींना कसा काय चालेल? खडसेंनी आत्तापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत तसे काय कार्य केले आहे? मग आज अचानक त्यांच्या गळ्यात ओबीसी नेतृत्वाची माळ कशी काय घातली जात आहे? 

2014 च्या लोकसभा निवडणुकांपासून मुस्लिम, दलित एकगठ्ठा मते किंवा जाती धर्मावरची एकगठ्ठा मते या राजकारणाला एक मोठी मर्यादा पडलेली दिसून येते आहे. 2017 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीने यावर शिक्कामोर्तब करून दाखवले. त्या नंतरच्या सर्व निवडणुकांत जाती धर्मावर आधारलेली गणितं विस्कटलेली दिसून येत आहेत. मग असं असताना पुढारलेल्या महाराष्ट्रात जातीचा नेता अशी प्रतिमा तयार करून काय फायदा?

1990 पासून म्हणजे जागतिकीकरणाच्या पर्वानंतर जवळपास अर्ध्या कालखंडात मराठेतर मुख्यमंत्री महाराष्ट्राने बधितले (सुधाकर नाईक, मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे). उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे, छगन भूजबळ  केंद्रीय पातळीवर विचार केल्यास शिवराज पाटील चाकुरकर, प्रमोद महाजन, मुरली देवरा, सुरेश कलमाडी, नितीन गडकरी, सुशीलकुमार शिंदे, गुरूदास कामत, विलास मुत्तेमवार, हंसराज अहिर, मुकूल वासनिक, प्रफुल पटेल, रामदास आठवले, पियुष गोयल,  मनोहर जोशी ही  प्रमुख मराठेतर नावं दिसून येतात. मग अशा पुरोगामी महाराष्ट्रात आज एकनाथ खडसेंना ओबीसी नेता म्हणून काय साधणार आहे? बरं खडसे जेंव्हा पदावर होते तेंव्हा त्यांना ओबीसी नेता असे कधी संबोधले गेले होते का? 

खडसेंचा राष्ट्रवादीला काय फायदा असे विचारण्यात अर्थ नाही. विदर्भ, खान्देश आणि मुंबई-कोकण विभाग हा राष्ट्रवादीसाठी नाजूक राजकीय प्रदेश आहे. तेंव्हा या प्रदेशातून मिळेल तो माणूस राष्ट्रवादीला हवाच असतो. शिवाय येणार्‍या कुणाला राजकीय पातळीवर कुणीच विरोध करत नसतो. 

खडसेंच्या पातळीवरच एक व्यवहारिक मुद्दा असा आहे की ज्या पक्षाची देशात निर्विवाद सत्ता आहे, महाराष्ट्रात जो सगळ्यात मोठा पक्ष आहे अशा पक्षातून बाहेर जायचे कशाला? आज नाही उद्या काहीतरी राजकीय पुनर्वसन होण्याशी शक्यता असते. शिवाय सध्या घरात पदंही आहेतच. बंडखोरी करण्यापेक्षा शांत बसण्यातच मोठा फायदा असतो. 

एकनाथ खडसेंची उपयुक्तता संपलेली आहे. त्यांच्यामुळे कुणाचा फायदा किंवा कुणाचा तोटा होण्याची काहीच शक्यता नाही. इतकी पदं उपभोगल्यावर विधान परिषदेवरची एखादी आमदारकी किंवा एखादे छोटे मोठे मंत्रीपदं यावरच जर ते समाधान पावणार असतील तर मग आत्तापर्यंतची सगळी राजकीय पुण्याई लयास गेली असेच म्हणावे लागेल.

एकूण काय तर हा खडसेंचा निव्वळ राजकीय खडखडाट आहे. बाकी काही नाही.  

   

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575