Wednesday, October 28, 2020

मुर्ती मालिका -१


 

जय देव जय देव जय व्यंकटेशा

ही सुंदर बालाजी मूर्ती मला आज सकाळीच सई चपळगावकर हिने पाठवली. त्यांच्या घराण्याची ही कुलदेवता आहे. कर्नाटका सीमेवर चपळगावकर ह्यांचे मूळ गाव आहे. वैष्णव कुटुंबात बालाजी कुलदैवत असते. विष्णूची नेमकी कोणती मूर्ती बालाजी व्यंकटेश ह्या नावाने संबोधली जाते? तर उजव्या वरील हातात चक्र वरील डाव्या हातात शंख, खालील उजवा हात वरद मुद्रेत आणि खालील दावा हात कटीवर. पुरीचा जग्गनाथ, तिरुपतीचा बालाजी आणि पंढरपूरचा विठ्ठल ही तीन मुळचे लोक दैवते. जग्गनाथ "अन्न ब्रह्म", बालाजी "कांचन ब्रह्म" आणि विठ्ठल "नाद ब्रह्म" म्हणून ओळखले जातात. व्यंकटेश बालाजीची आतिशय सुंदर आरती समर्थ रामदास यांनी रचिली आहे. ती बऱ्याच जणांना माहित नाही. इथे देत आहे. रा. चिं. ढेरे यांनी "श्रीव्यंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर" या आपल्या पुस्तकात दिली आहे. देवीचे नवरात्र असतात त्याच वेळी बालाजीचे ही नवरात्र असतात. त्याला ब्रह्मोत्सव म्हटले जाते. बालाजी आणि पद्ममावती विवाह सोहळाही ह्या काळात लावले जाते.
जय देव जय देव जय व्यंकटेशा
आरती ओवाळू तुज रे जगदीशा ॥ धृ०||
अघहरणी पुष्करिणी अगणित गुणखाणी ।
अगाध महिमा स्तवितां न बोलवे वाणी ॥
असंख्य तीर्थावळी अचपळ सुखदानी ।
अभिनव रचना पहातां तन्मयता नयनीं ॥ १ ||
अतिसुखमय देवालय, आलय मोक्षाचे ।
नाना नाटक रचना, हाटक वर्णाचे ॥
थकित मानस पाहे स्थळ भगवंताचे ।
तुळणा नाही हे भू-वैकुंठ साचे ॥ २ ||
दिव्यांबरधर सुंदर तनु कोमल लीळा ।
नाना रत्ने, नाना सुमनांच्या माळा ॥
नानाभूषणमंडित वामांगी बाळा ।
नाना वाद्ये मिनला दासांचा मेळा ॥ ३||

औंढा नागनाथ मंदिरात काचेत ठेवलेली ही विष्णुमुर्ती शिल्पकलेचा अत्युच्च नमुना मानली जाते. या मुर्तीला केशव हे नाव दिलेले आहे. उजव्या खालच्या हातात पद्म, उजव्या वरच्या हातात शंख, डाव्या वरच्या हातात चक्र व खालच्या हातात गदा आहे. मुर्तीवर इतके बारीक कोरीवकाम आहे की बोटावरचे नखंही दिसतात. मराठवाड्यात सापडलेल्या बहूतांश विष्णु मुर्ती केशवराज मुर्ती अशाच प्रकारातील आहेत. या रूपातील विष्णुची जी शक्ती आहे तीला किर्ती" या नावाने संबोधले जाते. मागच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आढळून येतात. १९७२ च्या दूष्काळात रोजगार हमी योजनेत तळ्याचा गाळ काढत असताना ही मुर्ती सापडली. ही मुर्ती गर्भगृहा जवळ ठेवलेली आहे. तिथून काढून मंदिर आवारतच पण बाहेर ठेवावी. जेणेकरून शिल्प अभ्यासकांना नीटपणे पहाता येईल. तसेही आत गर्दी करणारे आंधळे भाविक इकडे पहातच नाहीत. आणि ज्यांना पहायची आहे त्यांना धक्कीबुक्की गर्दीत पहाताही येत नाही. (छायाचित्र सौजन्य अमर रेड्डी)


राजस सुकूमार असा विठ्ठल
तुकाराम महाराजांनी "राजस सुकुमार मदनाचा पुतळा" अशी ओळ ज्याच्याकडे पाहूनच लिहिली असावी अशी ही सुंदर विठ्ठल मुर्ती. सिंधुरवदन गणेशामुळे सर्व परिचित असलेल्या खाम नदीकाठच्या शेंदूरवादा (ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) या गावात एका छोट्या लाकडी माळवदाच्या वाडा वजा मंदिरात ही मुर्ती ठेवलेली आहे. शिवकालीन संत मध्वमुनीश्वरांचे हे ठिकाण. इथे त्यांची समाधी आहे. जहागीरदार कुटूंबियांनी मध्वमुनीश्वरांचा आश्रम नक्षीदार कमानी दगडी ओवर्या असा भव्य बांधुन काढला आहे.
मध्वमुनीश्वर नियमित पंढरपुरची वारी करायचे. शरिर थकल्यावर त्यांनी विठ्ठलाला पत्र लिहिलं आणि येणं शक्य नाही असं म्हणत इथूनच नमस्कार केला. मग विठ्ठलाने त्यांना दृष्टांत देवून मीच तूझ्याकडे येतो असं सांगितले. तीच ही विठ्ठल मुर्ती. दरवर्षी मध्वमुनीश्वरांचा उत्सव साजरा होतो तेंव्हा ही मुर्ती मिरवणुकीने मध्वमुशीश्वर आश्रमात नेली जाते.
समचरण कर कटीवर ठेवलेले अशी ही काळ्या पाषाणातील देखणी मुर्ती. याच मंदिरात गरूडाचीही छोटी मुर्ती आहे. विठ्ठलाच्या प्राचीन सुबक देखण्या मुर्ती फार थोड्या आहेत. आणि ज्या आहेत त्या काहीश्या ओबडधोबड. शिवाय प्राचीन अशी विठ्ठलाची मंदिरेही फारशी नाहीत. पंढरपुर शिवाय पानगांव (ता. रेणापुर जि. लातुर) हाच एक ठळक अपवाद. हे प्राचीन विठ्ठल मंदिर शिल्प सौंदर्याने नटलेले आहे.
विठ्ठलाची मुर्ती एकटीच असते. सोबत रूक्मिणी नसते. अगदी पंढरपुरलाही रूक्मिणी मंदिर वेगळे आहे. यावर अरूण कोलटकर यांची वामांगी नावाची अप्रतिम कविता आहे. नंतरच्या काळात विठ्ठल रूक्मिणी यांच्या मुर्ती एकत्र तयार केल्या जायला लागल्या. या विठ्ठल मुर्तीचे पाय अतिशय देखणे आहेत. "पायावर डोकं ठेवणं" याला वारकरी संप्रदायात वेगळे महत्व आहे.
ही देखणी दूर्मिळ विठ्ठलमुर्ती जरूर पहा. या गावावर एक छोटा video आम्ही केला आहे. यावर लेखही मी माझ्या blog वर टाकला आहे. जरूर पहा. (छायाचित्र सचिन जोशी शेंदूरवादा)
(फेसबुकवर विविध मुर्तींवर रोज लिहीतो आहे. हे लिखाण म्हणजे छोटे टीपण असते. अशा तीन चार मुर्तींवरचे लिखाण एकत्र करून ते या लेखमालिकेत देत आहेत. नवरात्रीत रोज एक मुर्तीवर लिहीले होते. त्यांचे एकत्रीकरण करून नवदुर्गा 9 दिवस 9 मुर्ती हा लेख तयार केला होता. तो पण ब्लॉगवर टाकला आहे.) श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, October 25, 2020

नवदुर्गा ९ दिवस ९ मूर्ती


महालक्ष्मीची ही अप्रतिम मुर्ती माझ्याकडे आहे. २५ वर्षांपूर्वी बी. रघुनाथ प्रकल्पासाठी मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला तेंव्हा माझ्या मित्रांनी कौतूकाने ही मुर्ती दिली. पुस्तकाला पुरस्कार मिळाला तेंव्हा सरस्वती दिली असती तर संयुक्तीक ठरले असते. पण माझ्या मित्रांना वाटले याने "लक्ष्मी"ची उपासना करावी. ती मला नाही जमली. जूनी मंदिरं मुर्ती यांच्या जिर्णोद्धाराचा प्रकल्प हाती घेतला आहे. तेंव्हा स्वत:जवळची ही सुंदर मुर्ती घासून पुसून पुजावी नित्य स्मरावी जेणे करून आपल्या कामाचे नित्य स्मरण होत राहील. आज घटस्थापना. देवीच्या सर्व रूपातील प्रतिमांचे स्मरण.


काल मी महालक्ष्मीच्या माझ्या जवळ असलेल्या मुर्तीचा फोटो टाकला होता. आजचा हा फोटो आहे माझ्या सासुरवाडीच्या (सखारामपंत डांगे) घराण्याच्या देवीचा. कुंभारी, ता.जि. परभणी येथील ही देवी. हे मंदिर २ वर्षांपूर्वी पर्यंत अगदी साधं छोटं होतं. शेंदूर फासलेला दगड इतकंच देवीचं रूप होतं. गावकर्
यांची मोठं मंदिर बांधलं. माझ्या चारही मेहूण्यांनी मिळून हा सुंदर तांदळा मंदिरात बसवला. मोठ्या वहिनी सौ. विंदा डांगे यांनी या मंदिराच्या जिर्णोद्धाराचा ध्यासच घेतला होता. स्वत: चकरा मारून काम करवून घेतले. देवीला दागिने घडवले. मुकूट बसवला. मंदिराला कळस चढवला. आता मंदिराला आणि तांदळ्याला सौंदर्य प्राप्त झाले. बहुतांश ठिकाणी अगदी बेढव असे शेंदूर फासलेले दगड देवी म्हणून पुजले जातात. त्या ठिकाणी चांगल्या मुर्ती अथवा तांदळे बसवायला काय हरकत आहे? याला शास्त्रात आधारही आहे. आक्रमणांच्या काळात मुर्ती नष्ट झाल्या त्यांचा विध्वंस झाला. आता ते सारं विसरून नव्याने काही का केल्या जावू नये? तशीही आपल्याकडे बदलाची मोठी परंपरा आहे.

तूळजापुरची भवानी माझ्या घराण्याची कुलदैवता आहे. आमच्या नित्यपुजेत देवीचा टाक आहे पण मुर्ती नव्हती. जय संतोषी माता चित्रपटामुळे सिंहावर बसलेली देवीची प्रतिमाच सगळ्यांच्या मनात ठसली आहे. प्रत्यक्षात महिषासुर मर्दिनी रूपातील अष्टभुजा देवीची मुर्ती सहसा आढळत नाही. मला ही मुर्ती तूळजापुरात एका दूकानात दिसली आणि पाय खिळूनच राहिले. एक तर मुर्ती मुळच्या देवी रूपातील, दूसरं म्हणजे महिषासुराला मारतानाचा सगळा आवेश मुर्तीत उतरलेला. सगळ्याच मुर्तीला एक अप्रतिम अशी लय आहे. या मुर्तीची मागची नागप्रतिमा असलेली प्रभावळ, त्यावरचे किर्तीमुख सगळंच मोहक वाटले. २० वर्षांपासून ही मुर्ती माझ्या जवळ आहे. मागच्या प्रभावळीत लहान छिद्र आहेत. त्यात फुलांचे देठ अडकवून छान आरास करता येते. खालचे चौकोनी जड आसन वेगळे करता येते. मागची प्रभावळही वेगळी होते. त्रिशुळपण वेगळा करता येतो. जमिनीशी बरोबर ४५ अंशाचा कोन साधणारी त्रिशुळाची रचना गणित तत्वाशी जुळते. या मुर्तीने मला मोहित केले. प्रथेप्रमाणे मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. पण खरी प्राण प्रतिष्ठा माझ्या मनातच झाली. डाव्या हातात महिषासुराचे शीर आहे आणि उजव्या हातातील त्रिशुळ त्याच्या मानेवर रूतवला आहे. बाकी सहाही हातात शस्त्र आहेत. देवीच्या अष्टकातील विष्णुदासांचे पद या मुर्तीला पाहून मला नेहमी आठवते

अष्टादंड भुजा प्रचंड सरळा
विक्राळ दाढा सुळा
रक्त श्रीबुबूळा प्रताप आगळा
ब्रम्हांड माळा गळा
जिव्हा ऊर स्थळा रूळे लळलळा
कालांत कल्पांतके
साष्टांगे करीतो प्रणाम तुजला
जय जय महाकालीके



देवी विविध रूपात पूजली जाते. करमाळा येथे कमला भवानी या नावाने भवानीची पुजा होते. ही महिषासूरमर्दिनी या रूपातील भवानी नसून कमळात बसलेली अशी आहे. रावराजे निंबाळकर यांनी हे मंदिर उभारले व देवीची प्राणप्रतिष्ठा केली. सैराट चित्रपटातील मंदिर ते हेच. येथील कमला भवानीची पितळी मुर्ती आमच्या घराण्यात माझ्या मोठ्या चुलत भावाकडे पुजली जाते. महालक्ष्म्या अतिशय आकर्षक व जिवंत भासणार्या ज्यांच्याकडे मांडल्या जातात ते हेच घर. माझा पुतण्या सखाराम उमरीकर या देवीची रोज आकर्षक सजावट करतो. ही कमलाभवानी महिषासुरमर्दीनी सारखी उग्र रूपातील नसून प्रसन्न अशी आहे.


ही अतिशय वेगळी अशी स्त्री रूपातील मूर्ती अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथील मंदिरावरची आहे. आता महादेव मंदिर म्हणून ओळखलं जात असलेलं हे मुळचं विष्णु मंदिर. शंख चक्र गदा पद्म यांचे चारी हातातील स्थान पाहून विविध नावे विष्णुला दिली जातात. अशी २४ नावं विष्णुची आहेत. त्यातील वरच्या उजव्या हातात चक्र, वरच्या डाव्या हातात शंख, खालच्या उजव्या हाती पद्म आणि खालच्या डाव्या हातात गदा असेल तर त्याला जनार्दन असे नाव आहे. दू:ख हरण करणारा असा हा जनार्दन. या विष्णुची शक्ती म्हणून जिचे वर्णन केले जाते ती म्हणजे उमा. ही त्या उमा शक्तीची मुर्ती आहे. ही विष्णुची पत्नी लक्ष्मी नव्हे. कुठल्याही देवतेच्या उजव्या बाजूला जी स्त्री प्रतिमा कोरली जाते ती त्याची शक्ती असते. (आई, मुलगी, बहिण, सुन या नात्यातील सर्व स्त्रीयांची जागा उजव्या बाजूस असते) डाव्या बाजूला असते ती पत्नी (वामांगी).
या अभ्यासामुळे अन्वा मंदिरांवरील विष्णुच्या शक्तींचा दृश्य पुरावा समोर आला. या मंदिरात मी बर्याचदा गेलो आहे. नुकताच गेलो होतो तेंव्हा हा फोटो काढून आणला. डाॅ. देगलुरकरांच्या पुस्तकात यावर विस्तृत विवरण आहे. विष्णुची २४ नावं आणि त्यांच्या शक्ती सांगितल्या आहेत.
नवरात्रीत पुरूषाची शक्ती असलेली अशी स्त्री तिचीही मनोमन पुजा झाली पाहिजे.



लोभस पुत्रवल्लभा
स्त्रीला माता म्हणून आपण संबोधतो तिचा गौरव करतो पण मातृरूपात तिची प्रतिमा फारशी आढळत नाही. होट्टल (ता, देगलूर जि. नांदेड) येथील मंदिरावरील या शिल्पाने माझे लक्ष्य वेधून घेतले. लहान मुल कडेवर घेतले आहे. एरव्ही स्त्रीयांच्या स्तनांचा उपयोग वासने संदर्भातच येतो. इथे त्या लहान बाळाचा हात स्तनांवर दाखवून मातृत्व सुचीत केले आहे. एकुणच हे शिल्प लोभस आहे. ही स्त्री काही कामात व्यग्र आहे आणि जबाबदारी म्हणून लेकरू काखोटीला मारले असेही नाही. उजव्या हातातील खेळण्याने ती त्याला खेळवते आहे, लाड करते आहे. ते मुलही मान उंचावून तिकडे पाहते आहे. स्त्रीच्या चूहर्यावर तृप्तीचे भाव आहेत. अशा मुर्तीला पुत्रवल्लभा या गोड नावाने संबोधले जाते. महाराष्ट्रात उत्तर चालूक्य कालीन (११ वे ते १३ वे शतक) मंदिरांवर सुरसुंदरींची अतिशय देखणी कमनीय अशी शिल्पे आढळून. त्यातील हे एकदम वेगळे लोभस शिल्प "पुत्र वल्लभा" . आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी मातृदेवता नमोनम: (जानेवारी महिन्यात होट्टल महोत्सवासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी
Vincent Pasmo
या फ्रेंच मित्राने टिपलेले हे छायाचित्र)



केवळ पत्रसुंदरी नव्हे तर ज्ञानमार्गीणी
पत्रसुंदरीचे हे देखणे शिल्प धारासूर (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील गुप्तेश्वर मंदिरावरचे आहे. शिखर शाबुत असलेले ९०० वर्षांपूर्वीचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर. मुळचे हे विष्णु मंदिर. या मंदिरावर सुरसुंदरींची अप्रतिम शिल्पे आहेत. काल होट्टल येथील ज्या पुत्रवल्लभेचे छायाचित्र टाकले होते तसेल याही मंदिरावर आहे. मध्ययुगीन कालखंडात स्त्रीयांना ज्ञानाचा अधिकार नाकारला गेला होता. पण पूर्वीच्या कालखंडातील स्त्रीया ज्ञानाच्या बाबतीत सक्षम होत्या याचा ठोस पुरावा या शिल्पातून मिळतो. या शिल्पाला "विरह कंठिता" असेही संबोधले जाते. पण त्यातून प्रेयसी किंवा विरहिणी इतकाच मर्यादीत अर्थ निघतो. खरं तर हीला लेखीका किंवा ज्ञानमार्गीणी असे संबोधन द्यायला हवे. कारण ती लिहीत आहे त्या कागदाच्या दोन्ही बाजूला उभे दंड आहेत. म्हणजे पोथीसारखी रचना सुचीत होते. हे केवळ पत्र उरत नाही. शिवाय तिच्या चेहर्यावरचे भाव विरहणीचे नाहीत.
सुरसुंदरी या शब्दांतून स्त्रीचे शारिरीक सौंदर्य जास्त सुचीत होते. पण कालची पुत्रवल्लभा, आजची ही लेखीका आणि उद्या जिच्यावर लिहीतोय ती शत्रु मर्दिनी या शिल्पांचा "सुंदरी" इतका मर्यादीत विचार करून चालणार नाही. स्त्री व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास दर्शविणारी ही शिल्पे आहेत. यातून एक सक्षम स्वतंत्र व्यक्तिमत्वाची स्त्री सुचित होते. "अबला" हे तीचे मध्ययुगीन कालखंडातले निर्माण झालेले चित्र मागे पडते. आज सप्तमी, सातवी माळ. त्या निमित्ताने बुद्धीमान स्त्रीचे हे शिल्प अवलोकनार्थ.
(छायाचित्र अरविंद शहाणे या परभणीच्या मित्राने आठच दिवसांपूर्वी काढलेले आहे. या मंदिरावर सविस्तर व्हिडियो त्याने व मल्हारीकांत देशमुख या मित्राने तयार केलाय. त्याचा पहिला भाग u tube वर आहे. जरूर बघा.)



रणझूंझार शत्रुमर्दिनी
आज अष्टमी. नवरात्रीच्या आरतीत "अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी हो" अशी ओळ आलेली आहे. महिषासुराचा वध करणार्या देवीची उग्र प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असते. पण अशी लढव्वयी शत्रुचा शिरच्छेद करणारी योद्धा स्त्री प्रतिमा मात्र कधी डोळ्यासमोर येत नाही. होट्टल (ता. देगलूर जि. नांदेड) येथील मंदिरावर अशा स्त्रीचे शिल्प कोरलेले आहे. हीला "शत्रु मर्दिनी" या नावाने संबोधले जाते. हीच्या डाव्या हातात नरमुंड आहे आणि उजव्या हातात खङग आहे. संस्कृत ग्रंथ "क्षीरार्णव" यात शत्रुमर्दिनी रूपाचे वर्णन आले आहे. या वर्णनाचा दृश्य पुरावा होट्टलच्या मंदिरावर आहे.
अशी शिल्पं मराठवाड्यात धारासुर (ता. गंगाखेड, जि. परभणी) धर्मापुरी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथेही आहेत. या शिवाय लढाउ स्त्रीयांची छोटी शिल्पेही मराठवाडा परिसरांतील मंदिरांवर आढळून आलेली आहेत.
हा परिसर नेमका मातृदेवतांचा आहे. दक्षिणेतील मात्ृसत्ताक समाज व्यवस्थेचे पुरावे आपल्याकडे स्पष्ट दिसून येतात. पैठणचे सातवाहन राजे आईचेच नाव लावायचे (गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र आळूमावी इ.इ.). मामाची मुलगी बायको केली जाते याचाही संदर्भ मातृकुळाशी नातं घट्ट जोडण्याचा आहे.
आपल्याकडे सार्वजनिक संबोधन "ओ मामा, ओ मावशी" असंच आहे. उत्तरेकडच्या पुरूषसत्ताक प्रदेशात हेच संबोधन "ओ चाचा, ओ चाची" असं आहे. दक्षिणेत स्त्रीया केवळ "सुरसुंदरी" नसून आपल्या सर्वांगिण व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंनी झळाळून दिसतात. ही अतिशय वेगळी स्त्री प्रतिमा. अष्टमीला सामान्य स्त्रीच्या रूपातीला झुंजार अष्टभुजेला नमन. (छायाचित्र सौजन्य
Vincent Pasmo
)



विद्या कलेची अधिष्ठाती सरस्वती
एखादा खजिना अचानक सापडावा तशी सरस्वतीची ही अप्रतिम मुर्ती अनपेक्षीत जागी दृष्टीस पडली. औंढा नागनाथ जवळ राजापुर नावाच्या छोट्या गावी साध्या चौथर्यावर ही मुर्ती ठेवलेली आहे. गणेश चाकुरकर हा इंजिनिअरिंगचा मित्र औंढ्याला नौकरीला होता. त्याच्याकडे गेलो असताना त्याने या गावी नेले. या परिसरात तीन मुर्ती लोकांना सापडल्या. योग नरसिंहाची सिद्धासनातील मुर्ती, अर्धनारेश्वर मुर्ती आणि तिसरी ही सरस्वतीची उभी मुर्ती.
अशा मुर्तीला स्थानक मुर्ती असे संबोधतात. (बसलेल्या मुर्तीला आसनस्थ मुर्ती म्हणतात) हीच्या वरील उजव्या हातात फासा आहे, खालील उजव्या हातात अक्षयमाला असून हा हात वरदमुद्रेत आहे. वरच्या डाव्या हातात एकतारी वीणा आहे, खालच्या डाव्या हातात पुस्तक आहे. तीच्या गळ्यातील हातातील कमरेवरील दागीन्यांचा मणी न मणी मोजता यावा इतके हे कोरीवकाम अप्रतिम आहे. डाव्या बाजूला खाली मोत्याची माळ तोंडात घेतलेला हंस आहे. खाली अंजली मुद्रेतील भक्त/सेवक उजव्या बाजूला तर डाव्या बाजूला चामरधारीणी दिसते आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना म्हणून या मुर्तीचा गौरव डाॅ. देगलुरकरांनी आपल्या पुस्तकात केला आहे. अशा मुर्ती घडवण्यासाठी गंडकी म्हणजेच नर्मदा नदितील शिळांचा वापर केला जातो.
ही मुर्ती कुठल्या भव्य सुप्रसिद्ध मंदिरातील नाही. एका साध्या गावात गावकर्यांनी निष्ठेने या मुर्ती छोट्या जागेत जतन करून ठेवल्या आहेत. खरं तर या सुंदर मुर्तीसाठी मोठं शिल्पकामयुक्त दगडी मंदिर उभं करायला पाहिजे.
गेली ९ दिवस विविध मुर्तींवर लिहीलं. या मालिकेतील हे शेवटचं टिपण. स्त्री रूपातील या विविध शक्तींना मनोमन नमन. (छायाचित्र सौजन्य श्रीकृष्ण उमरीकर)


Saturday, October 24, 2020

खडसेंचा राजकीय खडखडाट!

 


 उरूस, 24 ऑक्टोबर 2020 

 मंत्रीपद गेल्यापासून खडसेंची कुरकुर चालू होती. प्रत्यक्ष भाजप सोडून ते दूसर्‍या कोणत्या पक्षात जाणार आणि केंव्हा इतकाच प्रश्‍न शिल्लक राहिला होता. अखेर काल (23 ऑक्टोबर शुक्रवार 2020) अधिकृतरित्या शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि संभ्रम संपवला.

खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तेंव्हा त्यांच्या हातात दोन पर्याय होते. एक तर पूर्णपणे पक्ष कार्यात स्वत:ला गुंतवून घेणे. आपल्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांत (4 महानगर पालिका, 32 नगर पालिका, शेकडो ग्राम पंचायत) पक्षाला मोठे यश मिळवून देणे. खानदेशात मोडणारे 6 लोकसभा मतदारसंघ, 34 विधानसभा मतदार संघ या ठिकाणी 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत पक्षाच्या यशासाठी प्रयत्न करणे. पण खडसेंनी हे केले असे दिसत नाही. 

दुसरा पर्याय याच्या नेमका उलट होता. या सर्व ठिकाणी पक्षाचा दारूण पराभव करून दाखवणे. जेणे करून पक्षाला त्यांची ताकद कळाली असती. असमचे कॉंग्रेस नेते हेमंत बिस्व शर्मा यांनी अशा पद्धतीने कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यावर पक्षाचा पराभव केवळ असमच नव्हे तर संपूर्ण ईशान्य भारतातून करून दाखवला. तसेही काही खडसेंना जमले नाही.

या मुळे खडखडाट हा शब्द वापरला आहे. रिकाम्या भांड्याचा खडखडाट होतो तसे खडसे राजकीय दृष्ट्या रिकामे उरले आहेत. खडखडाटचा दुसरा अर्थ केवळ वाचाळपणा. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ या संत वचनांप्रमाणे नेमकी कृती खडसेंनी केलेली नाही. 

खडसेंनी पक्षांतराची ही नेमकी वेळ कोणती साधली हे पण कळायला मार्ग नाही. आता कुठल्याच निवडणुका नाहीत. राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. ज्या पक्षात खडसेंनी प्रवेश केला त्या पक्षाला आजतागायत महाराष्ट्रात कधीच निर्विवाद यश मिळालेले नाही. उलट खडसे ज्या पक्षातून बाहेर पडले तोच महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून गेल्या दोन विधानसभा निवडणुकां आणि दोन लोकसभांत सिद्ध झाला आहे. 

खडसेंच्या स्नूषा रक्षा खडसे भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. खडसेंची मुलगी विभानसभेत पराभूत झाली तरी इतर स्थानिक सत्तापदांवर आहे. मग खडसेंच्या पक्षांतराचा व्यवहारिक अर्थ काय लावायचा? 

खडसेंनी फडणवीसांनी वैयक्तिक छळल्याचे सांगीतले. शिवाय भाजपच्या दिल्ली श्रेष्ठींनीच आपल्याला राष्ट्रवादीत जायचा सल्ला दिला असे सांगून तर खडसेंनी स्वत: बद्दलची विश्वासार्हता पार संपवून टाकली. जर राष्ट्रवादीत जायचा सल्ला दिल्लीतून आला आणि तो त्यांनी मानला तर मग पक्ष सोडायचा सल्ला कुठून आला हे पण खडसेंनी सांगून टाकावे. 

खडसे 40 वर्षे भाजप संघ परिवाराशी निगडित आहेत. एका व्यक्तीच्या मताने इथे निर्णय होत नाही हे खडसेंना माहित नाही का? भाजपात व्यक्तीमहात्म्य नाही. फडणवीसांची छळायची ईच्छा हा आरोप मान्य केला तरी खडसेंच्या बाबतीतला कुठलाही निर्णय फडणवीस एकट्याने घेतील हे कसे शक्य आहे? 

खडसेंच्या बाबतीत अजून एक अतिशय चुक विश्लेषण केल्या जात आहे. त्यांना इतर मागास वर्गीयांचे नेते संबोधून त्यांची तशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयास होतो आहे. केवळ तांत्रिक दृष्ट्या खान्देशातील लेवा पाटील यांना इतर मागास वर्गीयांत (ओबीसी) गणल्या जाते. पण प्रत्यक्षात हा समाज राजकीय सामाजिक सांस्कृतिक पाळीवर अतिशय संपन्न म्हणून खानदेशात ओळखला जातो. तेंव्हा अशा समाजातील व्यक्ती इतर मागासांचा नेता म्हणून बाकी जातींना कसा काय चालेल? खडसेंनी आत्तापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत तसे काय कार्य केले आहे? मग आज अचानक त्यांच्या गळ्यात ओबीसी नेतृत्वाची माळ कशी काय घातली जात आहे? 

2014 च्या लोकसभा निवडणुकांपासून मुस्लिम, दलित एकगठ्ठा मते किंवा जाती धर्मावरची एकगठ्ठा मते या राजकारणाला एक मोठी मर्यादा पडलेली दिसून येते आहे. 2017 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीने यावर शिक्कामोर्तब करून दाखवले. त्या नंतरच्या सर्व निवडणुकांत जाती धर्मावर आधारलेली गणितं विस्कटलेली दिसून येत आहेत. मग असं असताना पुढारलेल्या महाराष्ट्रात जातीचा नेता अशी प्रतिमा तयार करून काय फायदा?

1990 पासून म्हणजे जागतिकीकरणाच्या पर्वानंतर जवळपास अर्ध्या कालखंडात मराठेतर मुख्यमंत्री महाराष्ट्राने बधितले (सुधाकर नाईक, मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे). उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे, छगन भूजबळ  केंद्रीय पातळीवर विचार केल्यास शिवराज पाटील चाकुरकर, प्रमोद महाजन, मुरली देवरा, सुरेश कलमाडी, नितीन गडकरी, सुशीलकुमार शिंदे, गुरूदास कामत, विलास मुत्तेमवार, हंसराज अहिर, मुकूल वासनिक, प्रफुल पटेल, रामदास आठवले, पियुष गोयल,  मनोहर जोशी ही  प्रमुख मराठेतर नावं दिसून येतात. मग अशा पुरोगामी महाराष्ट्रात आज एकनाथ खडसेंना ओबीसी नेता म्हणून काय साधणार आहे? बरं खडसे जेंव्हा पदावर होते तेंव्हा त्यांना ओबीसी नेता असे कधी संबोधले गेले होते का? 

खडसेंचा राष्ट्रवादीला काय फायदा असे विचारण्यात अर्थ नाही. विदर्भ, खान्देश आणि मुंबई-कोकण विभाग हा राष्ट्रवादीसाठी नाजूक राजकीय प्रदेश आहे. तेंव्हा या प्रदेशातून मिळेल तो माणूस राष्ट्रवादीला हवाच असतो. शिवाय येणार्‍या कुणाला राजकीय पातळीवर कुणीच विरोध करत नसतो. 

खडसेंच्या पातळीवरच एक व्यवहारिक मुद्दा असा आहे की ज्या पक्षाची देशात निर्विवाद सत्ता आहे, महाराष्ट्रात जो सगळ्यात मोठा पक्ष आहे अशा पक्षातून बाहेर जायचे कशाला? आज नाही उद्या काहीतरी राजकीय पुनर्वसन होण्याशी शक्यता असते. शिवाय सध्या घरात पदंही आहेतच. बंडखोरी करण्यापेक्षा शांत बसण्यातच मोठा फायदा असतो. 

एकनाथ खडसेंची उपयुक्तता संपलेली आहे. त्यांच्यामुळे कुणाचा फायदा किंवा कुणाचा तोटा होण्याची काहीच शक्यता नाही. इतकी पदं उपभोगल्यावर विधान परिषदेवरची एखादी आमदारकी किंवा एखादे छोटे मोठे मंत्रीपदं यावरच जर ते समाधान पावणार असतील तर मग आत्तापर्यंतची सगळी राजकीय पुण्याई लयास गेली असेच म्हणावे लागेल.

एकूण काय तर हा खडसेंचा निव्वळ राजकीय खडखडाट आहे. बाकी काही नाही.  

   

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Wednesday, October 21, 2020

औरंगाबाद परिसरांतील अपरिचित 50 पर्यटनस्थळे!


(ऑटोमन कबर खुलताबाद)   

उरूस, 21 ऑक्टोबर 2020 

 घरदार विकून एक बोट खरेदी करून दोन वर्ष नदीत भटकंती करणार्‍या नेदरलँड मधील कुटूंबाबाबत डॉ. राघवेंद्र अष्टपुत्रे या मित्राने फेसबुकवर छोटी पोस्ट टाकली. त्यावर बर्‍याच प्रतिक्रिया उमटल्या. खरं तर घरदार विकून वगैरे अशी काही गरज नाही. अगदी सगळं सांभाळून या कोरोना आपत्तीच्या काळात जवळपासच्या सुंदर ठिकाणांना भेट देणे सहज शक्य आहे. अगदी जास्त पैसेही खर्च न करता. अशी मांडणी मी केल्यावर अशा ठिकाणांची  यादी दे अशी मागणी काही मित्रांनी केली. हा विषय तसाही समाज माध्यमांवरच चर्चिला गेला होता. तेंव्हा प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळं वगळून काहीशी अपरिचित स्थळं हौशी पर्यटकांसाठी सुचवीत आहे. भटकंतीचाही व्यवसायीक पातळीवर विचार करणार्‍यांनी इकडे फिरकू नये. त्यांचे व्यवसायीक समाधान करण्याची माझी ताकद नाही. 

1.शेंदूरवादा :  औरंगाबाद पासून वाळूजमार्गे डावीकडे गेल्यास शेंदूरवादा हे खाम नदीच्या काठावर गणेश स्थान आहे. येथेच मध्वमुनीश्वरांचा आश्रम आहे. गावात एक सुंदर विठ्ठल मुर्ती असलेले मंदिर आहे. (मंदिर साधेच जूने लाकडी माळवदाचे आहे)

2. कायगांव टोका : औरंगाबाद नगर रस्त्यावर कायगांव टोका येथे प्रवरा गोदावरी संगमावर सिद्धेश्वर मंदिर आहे. या मंदिरा जवळच इतर पाच मंदिरे आहेत ती सहसा बघितली जात नाहीत. शिवाय याच मंदिराचा नदीकाठ एक भुईकोट किल्लाच आहे. नदीचे पाणी उतरल्यावर घाटाच्या ओवर्‍या पहायला मिळतात.

3. कर्णसिंहाची छत्री : वाळूज मधील गोलवाडी येथे करणसिंहाची छत्री आहे. आठ दगडी कोरीव स्तंभावरची ही छत्री शेतात आहे. फारसे कुणीच इकडे फिरकत नाही. याच करणसिंहाचा एक पडका महाल कर्णपुर्‍यात आहे. देवीच्या मंदिराच्या जवळ जैन मंदिरापासून पुढे गेल्यावर शेतात एक बारव आहे. भाजलेल्या वीटांची ही बारव तीला चार ओवर्‍या आहेत. 

4. खंडोबा मंदिर : सातार्‍यात खंडोबाचे मंदिर हे अहिल्याबाईंच्या काळातील आहे. देव दर्शनाला जाताना आपण तिथले स्थापत्य पहातच नाही. एकवेळ केवळ स्थापत्य बघण्यास या मंदिराला भेट दिली पाहिजे.

5. साई मंदिर : देवळाई चौकातून उजवीकडची वाट साई टेकडी कडे जाते. या परिसरांतील कितीतरी ठिकाणं अतिशय निसर्गसंपन्न अशी आहेत. साई मुर्तीच्या अगदी समोरच्या टेकडीवर दर्गा आहे. साई मंदिराच्या मागील भागात अतिशय चांगली जागा वन पर्यटनासाठी आहे. हौशी जंगल पर्यटकांनी जरूर जावे.

6. साई टेकडी घाट : साई टेकडीपासून जरा पुढे गेल्यावर एक छोटासा घाट लागतो. तो परिसर अतिशय रम्य आहे. सिंदोण भिंदोण तलावाच्या परिसरांतही इथून जाता येते. 

7. कचनेर : साई टेकडीच्या रस्त्यानीच पुढे गेल्यावर आपण सरळ कचनेर येथे पोचतो. तेथील जैन मंदिर आणि त्यातील मुर्ती  इथेही भेट देता येईल. 

8. भालगांव : कचनेर पासून मुख्य बीड रस्त्याला लागल्यावर परत औरंगाबादला येताना उजव्या हाताला भालगांव म्हणून एक छोटे गांव आहे सुखना नदीच्या काठावर. या गावात समर्थ रामदासांनी स़्थापन केलेल्या रामाच्या मुर्ती आहेत. जूना वाडा वाटावा असे हे मंदिर आहे.

9. इस्लाम खान मकबरा :  औरंगाबाद-जळगांव रस्त्यावर ताज हॉटेल जवळ मौलाना आझाद महाविद्यालयाच्या परिसरांत इस्लाम खान यांचा मोठा मकबरा आहे. त्याची डागडुजी रंगरंगोटी संस्थेने चांगल्या पद्धतीने केली आहे. या मकबर्‍याचे प्रवेश द्वार दक्षिण दिशेला आहे. इतका भव्य आणि सुंदर दरवाजा औरंगाबादेत दुसरा नाही. मुलांच्या वस्तीगृहातून या दरवाजाकडे जाता येते.

10. जयसिंह छत्री : ताज हॉटेल समोरून डावीकडे वानखेडे नगर कडे जाणारा रस्ता जयसिंहाच्या छत्रीकडे जातो. 32 सुंदर दगडी खांबांवर हीचे छत तोलून धरले आहे. छत्रीच्या तळघरात महादेवाचे मंदिर आहे. 

11. हर्सूलची देवी : हे ठिकाणही पाहण्यासारखं आहे. गर्दीचा दिवस टाळून तिथे एखाद्या दुपारी संध्याकाळी गेलं तर हा शांत रम्य परिसर आवडू शकतो. देवीचे मुळ मंदिरही जूने आहे. 

12. हिमायत बाग : ही जागा अगदी जवळ असूनही दूर्लक्षीली जाते. येथील महालाची डागडुजी करून घेतली व कारंजे दुरूस्त केले तर हा परिसर एक बगीचा म्हणून अजून रम्य वाटू शकतो. 

13. सारोळा : औरंगाबाद जळगांव रस्त्यावर चौक्यापासून जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला सारोळा म्हणून पाटी लागते. हे एक छोटे हिलस्टेशन आहे. या जागेपासून दुधना नदीचा उगम होतो. या उंच जागेवरून औरंगाबाद शहराचा विस्तार दृष्टीक्षेपात येतो.

14. लहूगड नांदरा : चौक्याच्या अजून जरा पुढे गेल्यावर उजव्या बाजूला लहुगड नांदरा अशी पाटी लागते. लहुगड हा एक छोटा किल्ला एकेकाळी होता. आता तिथे एक गुहेतील दगडी महादेव मंदिर आणि वर दगडात कोरलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी टाकं आढळतात. 

15. लिंगदरी : लहुगडाला वळसा घालून तो रस्ता परत औरंगाबादला पळशी मार्गे येतो. हा परिसर अतिशय रम्य आहे. वाटेवर तळं लागते. तसेच लिंगदरी नावाचा धबधबा आणि देवस्थानही आहे.

16. बालाजी मंदिर बाबरा :  फुलंब्रीच्या पुढे गेल्यावर डाव्या बाजूला बाबरा गावाकडे रस्ता वळतो. या गावात बालाजीचे जूने मंदिर आहे. मंदिराच्या ओवर्‍या, लाकडी खांब, माळवद एकदच चांगल्या अवस्थेत आहे. मंदिराला कमान आणि इतर दगडी बांधकाम राजस्थानी कारागिरांकडून विश्वस्त मंडळी करत आहेत. 

17. औरंगाबाद लेण्या : मकबर्‍याच्या पाठिमागे जाणारा रस्ता पुढे औरंगाबाद लेण्यांकडे जातो. मकबर्‍याला जाणारे खुप आहेत पण औरंगाबाद लेण्यांकडे फारसे कुणी फिरकत नाही. उजव्या बाजूच्या लेण्यात आम्रपालीचे अप्रतिम असे शिल्प आहे. गायन वादन नृत्य असा एकत्रित भारतातील पहिला संदर्भ याच लेण्यात आढळून आला आहे.

18. गोगा बाबा नविन लेण्या : गोगा बाबा टेकडीच्या पाठीमागे गेल्यावर आता नविन लेण्या सापडल्या असून लोकांनी त्याची साफसफाई केली आहे. ही जागा फार छान असं निसर्गसंपन्न ठिकाण आहे. 

19. सलाबत खान मकबरा : विद्यपीठ परिसरांत साई क्रिडा केंद्राकडे जाताना वाटेत डाव्या बाजूला सलाबत खानाचा मकबरा लागतो. हा मकबरा काहीसा पडक्या अवस्थेत असला तरी मुळ इमारत चबुतरा शाबूत आहे. मकबर्‍याला संपूर्ण चारही बाजूनी संरक्षक भिंत आहे. दक्षिण दिशेला मकबर्‍याचा सुंदर असा दगडी दरवाजा आहे. (ही खासगी मालमत्ता आहे.) 

20. नवखंडा पॅलेस :  भडकल दरवाजा जवळची ही वास्तू मलिक अंबरची आठवण सांगते. हा महाल आता काहीसा पडीक अवस्थेत आहे. पण त्याचा बराचसा भाग शाबूत आहे.

21. भांगसी माता गड : औरंगाबाद दौलताबाद रस्त्यावर दौलताबाद टी पॉईंटपासून डाव्या बाजूचा रस्ता रेल्वे लाईन क्रॉस करून सरळ जातो भांगसी माता गडाकडे. हे ठिकाण देवी ठिकाणा सोबत एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. वरपर्यंत जायला चांगल्या पायर्‍या केलेल्या आहेत. 

22. हमामखाना : देवगिरी किल्ल्याच्या समोर आणि पाठीमागे काही सुंदर ठिकाणं आहेत. त्यातील पहिलं आहे ते किल्ल्यच्या समोर असलेला हमामखाना. ही इमारत बाहेरून पडकी वाटत असली तरी आतून संपूर्ण व्यवस्थीत आहे. 

23. चांदबोधले समाधी : हमामखान्याला लागूनच जनार्दन स्वामींचे गुरू चांद बोधले या सुफी संताची समाधी आहे. चांद बोधले हे हिंदू असून त्यांची सुफी संप्रदायाने कबर बांधली व तिथे दरवर्षी यात्रा भरते. हिंदू संताचा दर्गा असलेले भारतातील एकमेव ठिकाण आहे. 

24. देवगिरी किल्ला तटबंदी :  याच परिसरांत किल्ल्याची संपूर्ण शाबूत अशी तटबंदी आहे. तिचे चार मोठे दरवाजे आहेत. हा भाग कधीच पर्यटकांकडून बघितला जात नाही. देवगिरी किल्ल्याकडून खुलताबादला जाताना ज्या दरवाजात नेहमी वाहतूक अडते. त्याला लागून जी तटबंदी आहे तीच्या कडे कडेने फिरल्यास हे चार दरवाजे आढळतील.

25. हातीमहल- मुसाफिरखाना : देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागे हात्तीमहल, मुसाफिर खाना या इमारती आहेत. मुसाफिरखान्याचा वरचा मजला पडलेला असला तरी तळघरसंपूर्ण शाबूत आहे. हातीमहल तर संपूर्ण शाबूत आहे. त्याच्या जीन्यावरून वर गच्चीवरही जाता येते.

26. रसोई माता मंदिर :  देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीला लागूनच रसोई माता मंदिर आहे. यादवांचा खजिना सांभाळणारी देवता ‘हिरे माणकांची रास म्हणून ती रसोई माता’ अशी दंतकथा सांगतात.

27. खुफिया बावडी : देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागे केसापुरी रस्त्याला फतेपुर गावाजवळ एका शेतात खुफिया बावडी म्हणून सुंदर दगडी ओवर्‍या असलेली बारव आहे. 

28. केसापुरी धबधबा : याच रस्त्यानं पुढे गेल्यावर केसापुरी तांडा गावा जवळ तलाव आहे. शिवाय गावाजवळून पुढे डोंगराच्या दिशेने गेल्यावर केसापुरी धबधबा आहे.

29.  निजामाची कबर : खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आणि भद्रा मारूती सर्वांना माहित आहे. पण या कबरी समोरच असलेल्या बुर्‍हानोद्दीन गरीब दर्ग्यात पहिला निजामाची कबर आहे. हा दर्गा ओवर्‍या ओवर्‍यांचे दगडी बांधकाम असलेला वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे.

30. लाल बाग अरबाज बेग कबर : बुर्‍होनोद्दीन दर्ग्याच्या बाजूलाच लाल बाग नावाची दरवाजापाशी अतिक्रमण केलेला पडलेला बगीचा आहे. त्यात एक पडिक अशी कबर आहे. त्यावरचे रंगकाम अजून बरेच शाबूत आहे. 

31.अरबाज बेग कबर :  लाल बागे जवळ कबरस्तान असून तिथे मिर्झा अरबाज बेग या सरदाराची मलिक अंबर कबरीची छोटी प्रतिकृती असलेली सुंदर सुबक कबर आहे. याच कबरीचा दक्षिण दरवाजा एका तलावापाशी उघडतो. हा परिसर अतिशय सुंदर असा बगीचा होवू शकतो.

32. खुलताबादला वळसा घालून वेरूळकडे जाताना उजव्या बाजूला बनी बेगम बाग लागते. ही वास्तू चांगल्या पद्धतीने जतन केल्या गेली आहे. औरंगजेबाच्या सुनेची इथे कबर आहे. मोठा भव्य दरवाजा यावास्तूला आहे. भक्कम तटबंदी संपूर्ण शाबूत आहे.

33. जर्जर बक्ष दर्गा : म्हैसमाळ कडे जाणारा रस्ता एका कमानीतून पुढे जातो आणि डाव्या बाजूला खुलता बादचा प्रसिद्ध उरूस ज्यांच्या नावाने भरतो त्या सुफी संत जर्जरी बक्ष यांचा दर्गा आहे. हा दर्गा जून्या वास्तूकलेचा नमुना आहे. 

34. मलिक अंबर कबर : जर्जरी बक्ष परिसरांत मलिक अंबरची सुंदर देखणी कबर आहे. शिवाय अजून 8 छोट्या मोठ्या कबरी आहेत. एक रिकामी कबर पण आहे. शिवाय डोंगरावर उंच एक मस्जिद आहे. ते ठिकाण या परिसरांत सर्वात उंच असे आहे. 

35. आटोमन कबर :  खुलताबाद वेरूळ रस्त्यावर डाव्या बाजूच्या डोंगरावर एक तुर्की पद्धतीचा वेगळाच मनोरा दिसून येतो. ही आहे ऍटोमन साम्राज्याचा सुलतानाची कबर. हैदराबादच्या निजामाची सून निलोफर हीच हा पिता. त्याच्यासाठी ही कबर बांधली पण त्याचा मृतदेह इकडे आणता आलाच नाही.  हे ठिकाण अशा नेमक्या ठिकाणी आहे की तेथून सर्व वेरूळ दृष्टीक्षेपात येते.  या कबरीसाठी खुलताबादच्या शक्कर चटाने का दर्गा इथून एक छोटी वाट जाते. शक्कर दर्गा हे ठिकाण पण पाहण्यासारखे आहे. 

36. परियोंका तालाब सुर्‍हावर्दी दर्गा:  खुलताबाद पासून डाव्या बाजूला एक रस्ता शुलीभंजन कडे जातो. या वाटेवर सुफींच्या सुर्‍हावर्दी परंपरेतील संतांचा एक दर्गा आहे. याच दर्ग्याच्या जवळ परियोंका तालाब म्हणून मोठे सुंदर तळे आहे. याच दर्ग्याच्या परिसरांत अंगणात एक स्वयंभू महादेव शाळूंका आहे. तिचीही नियमित पुजा होत असते.

37. शुलीभंजन :  या ठिकाणी नाथ महाराजांनी 12 वर्षे तपश्चर्या केली असे सांगितले जाते. हे एक छान हिलस्टेशन आहे. जून्या नाशिक रस्त्यावरून हे ठिकाण दिसते. तेथून डोंगरावर जाणारा रोपवे तयार केला किंवा पायर्‍या बांधल्या तर या परिसरांत पर्यटकांची गर्दी वाढेल.

38. गणेश लेणी :  खुलताबाद येथील मलिक अंबर कबरी जवळ प्रसिद्ध विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाजवळून एक वाट कैलास लेण्याच्या मागच्या बाजूला निघते. इथे फारसे ज्ञात नसलेले गणेश लेणे आहे. हा परिसर झरे, धबधब्यांनी अतिशय सुंदर असा बनलेला आहे.

39. मालोजी राजे समाधी :  वेरूळला घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी समोर शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांची अतिक्रमाणाने वेढलेली सुंदर समाधी आहे. मंदिराच्या संरक्षक भिंतीला लागून मोकळ्या जागेत एक रिकामी कबर आहे. इथून जवळच जनार्दन स्वामी आश्रम परिसरांत एक राजस्थानी शैलीची अप्रतिम दगडी दोन मजली छत्री (समाधी) आहे.

40. अहिल्या बाईची बारव : अहिल्या बाईंनी उभारलेली एक अप्रतिम बारव घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी जवळच आहे. बारव चौरस आकाराची असून तिला चारही बाजूंनी पायर्‍या आहेत. बारवेत आठ छोटी मंदिरं असून लाल दगडांतील हे बांधकाम फार वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.

41. मोमबत्ती तलाव व तीन कबरी : हिरण्य रिसोर्ट जवळ तीन कबरी आहेत. हिरण्य जवळचे तळेही खुप सुंदर आहे. त्या परिसराला भेट देताना या कबरीही जरूर पहा.

42. कडेठाणची महालक्ष्मी : औरंगाबाद बीड रस्त्यावर अडूळच्या अलीकडून उजव्या बाजूला कडेठाणकडे जाणारा रस्ता लागतो. या गावातील महामक्ष्मीचे मंदिर शिवकालीन बांधकाम असलेले अतिशय छान आहे.

43. जामखेड शिवमंदिर : औरंगाबाद पासून बीड रस्त्याला जाताना अडूळच्या जरा पुढे जामखेडची पाटी लागते. या गावात 12 व्या शतकांतील सुंदर असे प्राचीन महादेव मंदिर आहे. मंदिराचा जिर्णाद्धार गावकर्‍यांनी केला असून परिसर छान ठेवला आहे.

44. जांबुवंत मंदिर : याच जामखेडला जांबुवंताचे एक मंदिर डोंगरावर आहे. हा परिसर निसर्गरम्य असा आहे.

45. रोहिला गड : औरंगाबाद बीड रस्त्यावर जामखेडच्या अलीकडेच रोहिला गडची पाटी लागते. हा जूना किल्ला असून आता फक्त काही अवशेषच शिल्लक आहेत. डोंगरावरचे ठिकाण म्हणून रम्य. 

46. त्वरीता देवी :  गेवराईच्या अलीकडे डाव्या बाजूला तलवाडा गावाकडे एक रस्ता जातो. इथे डोंगरावर त्वरीता देवीचे शिवकालीन मंदिर आहे. ही देवी म्हणजे विष्णुची शक्ती रूपात पुजा केली जाते अशी एकमेव आहे. मंदिर परिसरांतील दिपमाळा सुंदर आहेत. गावकर्‍यांनी मंदिर अतिशय चांगले ठेवले आहे. 

47. शहामुनीची समाधी :  गोदावरीच्या काठावर शहागड म्हणून जे गांव आहे त्या गावात महानुभाव संत शाहमुनी यांची समाधी आहे. समाधी अगदी गोदावरीच्या काठावर असून ही समाधी म्हणजे जून्या किल्ल्याचाच एक भाग आहे. समाधी जवळ प्राचीन जूना भव्य दरवाजा आहे. बाकी किल्ल्याचा बहुतांश भाग पडला आहे. 

48. दाक्षायणी देवी : लासुरची दाक्षायणी देवी हे नदीकाठी असलेले एक प्रेक्षणीय असे स्थळ आहे. याच गावात गणपतीचे शेत म्हणून एक ठिकाण असून तिथे उघड्यावर गणपतीचे मुर्ती आहे.

49. रावणेश्वर मंदिर : शिवूर मध्ये एक रावणेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर उत्तर यादव काळातील आहे. 

50. जटवाडा : जटवाडा इथे जैन मंदिर आहे. शिवाय इथून एक वाट दौलताबादपाशी निघते. आता समृद्धी मार्गासाठी काम इथे चालू आहे. हा घाट सुंदर आहे.

तरूण पत्रकार मित्र संकेत कुलकर्णी याने सुचवलेली ठिकाणे

51. एकलरा देवी : औरंगाबाद करमाड रस्त्यावर उजवीकडे वळल्यावर हे सुंदर ठिकाण आहे. 

52. सातारा डोंगरातील पठारावर असलेले खंडोबा मंदिर. 

अभिजीत शेजूळ मित्राने सुचवलेले ठिकाण

53. चिंचखेड खंडोबा मंदिर : पाचोड अंबड रस्त्यावर हे पुरातन खंडोबा मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोद्धार गावकर्‍यांनी चांगला केला असून मंदिराचे सुंदर दगडी खांब, सभागृह शाबूत आहे. बाह्यभाग नव्याने बांधण्यात आला आहे.


      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Monday, October 19, 2020

बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याची कुलदैवता तुळजा भवानी!

   


उरूस, 19 ऑक्टोबर 2020 

 नवरात्र उत्सव महाराष्ट्रात घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा होतो. याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले ते अगदी अलीकडच्या काळात. गुजराती प्रभावातून सार्वजनिक देवीउत्सव आणि गरबे सुरू झाले. पण पूर्वीपासून महाराष्ट्रातील प्रथा घरोघरी देवीचे घट नवरात्रत बसविण्याची आहे. रोज संध्याकाळी देवीसमोर आरत्या अष्टके पदे म्हणण्याची प्रथा आहे. या आरत्यांना पारंपरिक चालीत बांधलेले असते. आरत्या म्हणजे लोकगीतेच आहेत.

तुळजापुरचे मंदिर हे वेगळ्या अर्थाने हिंदूंच्या अठरापगड जातीचे ऐक्य दर्शविणारे आहे. हे वैशिष्ट्य कधी फारसे लक्षात घेतले जात नाही. ही मुळात क्षत्रियांची देवता. 

तुळजापुरच्या देवीचे पुजारी भोपे हे 96 कुळी मराठा आहेत.  मुख्य पुजारी कदमराव पाटील हे असून त्यांच्या घराण्यात व्रतबंधाची परंपरा आहे. मौंज झाल्यानंतरच त्या मुलाला देवीचे पुजारीपण करता येते. हे भोपे ब्राह्मणांना देवीच्या मुर्तीस स्पर्शही करू देत नाहीत अशी तक्रार 1885 मध्ये प्रकाशीत झालेल्या पुस्तकांत लेलेशास्त्री यांनी केली आहे.

अहिल्याबाई होळकर यांनी आपली स्मृती तुळजापुरात रहावी म्हणून एक सुंदर दगडी बारव येथे बांधली आहे. 1785 मध्ये ही बारव बांधल्याचे तेथील शिलालेखात स्पष्ट होते. अहिल्याबाईंनी विविध शिवमंदिरांचा जिर्णोद्धार केला त्या प्रमाणेच देवी मंदिरांचाही केला. अहिल्याबाईंनी एक वेगळे उदाहरण जातीपातीत विभागलेल्या हिंदू समाजासमोर ठेवले आहे. मठ मंदिरे नदीवरील घाट बारवा ही सार्वजनिक ठिकाणं असून ती केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी नाही. आज जी मांडणी केली जाते की हा सगळा मनुवाद आहे, ब्राह्मणी कट आहे ते पूर्णत: खोडण्याचे काम 250 वर्षांपूर्वी अहिल्याबाईंनी केले. उलट ज्या ठिकाणी मंदिरे चांगली असतात, नदीवर घाट असतात, मठ बांधलेले असतात तेथे चोर्‍या मार्‍या लढाया होत नाहीत असा त्यांचा दावाच आहे. त्यांच्या भारतभरच्या मंदिर जिर्णाद्धार प्रकल्पाचे हे सारच आहे. (महादेव मंदिरात पुजारी हे गुरव असतात. ब्राह्मण नाही)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याची कुलदैवता तुळजाभवानी असल्याचे डॉ. रा.चि.ढेरे यांनी आपल्या पुस्तकांत नमुद केले आहे. कोकणातील बाबासाहेबांचे गाव म्हणजे आंबडवे. या गावी आपल्या घराशेजारीच तुळजाभवानीचे सुंदर मंदिर बाबासाहेबांचे आजोबा हवालदार मालोजी सकपाळ यांनी उभारले होते. 

महाराष्ट्रात देवीची पूजा दलितांमध्ये होते. मातंगी देवी हे त्याचेच प्रतिक. तूळजापुरात ईशान्येकडील द्वाराबाहेर आदिमाता मातंगीचे मंदिर आहे. तिचे पुजारी भोपे हे पूर्वाश्रमीचे महार होय. या देवीचे आधी दर्शन घ्यावे लागते मगच मुख्य देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. दलितांमध्ये प्रचलीत असलेल्या मरीआई, लक्ष्मीआईचे पुजारी मात्र मांग जातीचे असतात. मातंगीचे पुजारी आणि उपासक असलेले महार हे नाग जातीच्या क्षत्रियांचे वंशज असल्याचा निष्कर्षही अभ्यासकांनी लावला आहे. 

धर्मांतरापूर्वी बाबासाहेबांच्या लेटरहेडवर ‘भवानीदेवी प्रसन्न’ किंवा भवानीदेवीचे चित्र आढळून येते. बाबासाहेबांना धर्मांतराचा निर्णय घेतला. हिंदू धर्मात मी जन्मलो तरी त्या धर्मात मरणार नाही या आपल्या ठाम मतालाअनुसरून त्यांनी 1956 ला धर्मांतर केले. पण तो पर्यंत बाबासाहेब आपल्या गावाकडील भवानी मंदिरासाठी नित्यनेमाने देणगी देत होते. 

बाबासाहेबांचे आजोबा हवालदार मालोजी हे रामानंदी संप्रदायाचे तर त्यांचे पिताजी सुभेदार कबीर संप्रदायाचे अनुयायी होते. त्यामुळे त्यांना मांस मद्य वर्ज्य होते. पण देवीच्या नवरात्रोत्सवात सामिष भोजन म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखविण्या येत असे व तो प्रसाद सर्वांना वाटप केला जाई. भवानी मंदिरात होणार्‍या नित्य उपासना, आरत्या, भुपाळ्या, गोंधळ यात सुभेदार रामजी अगत्याने सहभागी होत. 

बाबासाहेबांच्या घराण्याने आपली देवीनिष्ठा जोपासली होती. धर्मांतर झाल्यानंतर ही देवीची मुर्ती, देवीची पालखी, पुजेचे साहित्य, दागिने इतर सर्व सरंजाम गावातील तिलोली कुणबी वाडीकडे सोपावला. हे देवीचे मंदिर आता बुद्ध विहार म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी बाबासाहेबांचा अस्थिकलशही ठेवण्यात आला आहे.

बहुजनांचा देव इतका पवित्र आहे की त्याच्या पायाशी ब्राह्मणही लोळण घेतो असे वर्णन वारकरी संप्रदायातले चांद बोधले यांचे शिष्य संत शेख महंमद यांनी करून ठेवले आहे. (शेख महंमद यांची समाधी श्रीगोंद्याला आहे.) अनामिक म्हणजे पूर्वास्पृश्य समाज. 

स्वये जातीचा विप्र शुद्ध म्हणवी । अनामिकाची पूजा चालवी ॥

सटवीची भक्तिण मांगिण असे । तयेच्या चरणांला ब्राह्मण विश्वासे ॥

देवीची उपासना ही आदिम शक्तीची आदिमायेची उपासना होय. अगदी आर्यपूर्व देवता म्हणून ज्यांना संबोधले जाते त्यात देवीची उपासना येते. आज ज्या जातीव्यवस्थेवर चातुर्वण्यावर कठोर टिका होते ती व्यवस्था रूढ होण्या आधीपासून हा समाज देवीची उपासना करत आला आहे. देवी उपासनेचा अभ्यास करणार्‍या बहुतांश अभ्याकांनी ही अतिशय वेगळी मांडणी समोर आणून सामान्य वाचकांना चकित केले आहे. 

(पुस्तकासाठी संदर्भ श्रीतुळजाभवानी या रा.चिं. ढेरे यांच्या पुस्तकांतून घेतले आहेत. प्रकाशक पद्मगंधा प्रकाशन पुणे, आ. जानेवारी 2012)े

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Sunday, October 18, 2020

महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती


उरूस, 18 ऑक्टोबर 2020 

तुकाराम महाराजांच्या या ओळी मराठी माणसांच्या ओठावरच्या आहेत. त्याचा अर्थही सर्वांना माहित आहे. याचे विश्लेषणही अभ्यासकांनी करून ठेवले आहे. काटकसरीने राहणार्‍या सामान्य भारतीय माणसांना संकटाच्या काळात ‘लव्हाळे’ बनून कसे वाचावे हे चांगले ज्ञात आहे. 

कोरोना आपत्तीत भले भले उद्योग मोठ्या आस्थापना संकटात सापडल्या असून त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. ज्यांनी आजपर्यंत व्यवस्थेचा फायदा उचलला ते या संकटाचा बाउ करून कातडी बचावू धोरण स्विकारत आहेत. मोठ्या प्रमाणात नौकर कपात करत आहेत. सरकारने सरळ खात्यात रक्कम द्यावी म्हणून ओरड चालू आहे. अगदी भले भले अर्थ तज्ज्ञ म्हणवून घेणारे लोकही ‘डायरेक्ट’ पैसे मिळावेत म्हणून आग्रही आहेत. अशा काळी अगदी सामान्य असे छोटे उद्योजक व्यापारी दुकानदार धाडसाने समोर येत आहेत आणि जिद्दीने आपला उद्योग व्यवसाय चालवत आहेत.

अगदी सामान्य असा शेतकरी सगळ्या संकटावर मात करून अन्नधान्य, भाजीपाला, फळे पिकवून दाखवतो आहे. दुग्ध संकलनात कुठेही जराही कमतरता आलेली नाही.

तीन छोटी ठळक उदाहरणं ओळखीच्या तरूण मित्रांनी समोर आणली आणि मी त्यांच्या जिद्दीने धाडसाने चकित झालो. नितीन पवार हा तरूण त्याने ‘गावाकडच्या गोष्टी’ नावाने मराठी वेब मालिका सुरू केली होती. तिला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता. बारा हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा या मालिकेने गाठला आहे. तिच्या दर्शक संख्येने तर कोटीच्या कोटी उड्डाणे केली आहेत. लॉकडाउन काळात सर्वच बंद पडलेलं असताना मागील महिन्यापासून नितीन पवारने आपल्या मालिकेचे पुढील भाग नियमित स्वरूपात दर सोमवारी प्रदर्शित करण्यास सुरवात केली आहे. 

मराठी मातीतली ही अस्सल मालिका संकटांवर आर्थिक अडचणींवर मात करून परत टवटवीतपणे प्रेक्षकांना सामोरी जाते आहे हे विशेष. आजही इतके सातत्य इतकी दर्शक संख्या इतकी सफाई दुसर्‍या कुठल्याच मराठी वेब मालिकेला दाखविता आली नाही. यातील कलाकार गेली 4 वर्षे झाली तेच आहेत. हे सातत्य पण कौतुकास्पद आहे. शाळेत असणारी निल्या-गोट्या-बाब्या ही गोट्या खेळणारी लहान मुलं आता मोठी झाली, अव्या-माधुरीचे प्रेम प्रकरण संपून त्यांचे रितसर लग्न झाले, माधुरी गावची सरपंचही झाली, सुर्खीच्या विरहाचे दु:ख पचवून संत्या सारिकासोबत संसारात अडकला. कलाकारांचे वाढते वय (विशेषत: निल्या, गोट्या, बाब्या, अव्या) आणि त्या सोबत कथानकही पुढे सरकणे हा मुद्दाही या मालिकेचे वेगळेपण सुचित करणारा आहे.

ग्रामीण भागातील घटना प्रसंग, ती सहज ओठांवर येणारी ग्रामीण बाजाची मराठी, सारवलेल्या मातीच्या भिंती, मालिका पाहताना अगदी शेणा मुताचा वास आल्याचा भास होत रहातो.

मोठ मोठे मनोरंजनाचे उद्योग हातपाय गाळून बसले असताना नितीन पवार आणि त्याचे ‘कोरी पाटी प्रॉडक्शन’ हे धाडस करत आहे याचा खुप आनंदही आहे आणि कौतूकही वाटते.

दुसरे उदाहरण आहे ऍक्विन टूरिझम च्या आकाश धूमणे या तरूणाचे. अभियंता असलेला हा तरूण तैवानला भेटलेल्या व्हिन्सेंट पास्किनली या फ्रेंच मित्रामुळे पर्यटन व्यवसायाकडे वळला. भारतात परतून त्याने यात लक्ष घालायला सुरवात केली. शाश्‍वत पर्यटनाचा मुद्दा त्याला महत्त्वाचा वाटला. 

गेली तीन वर्षे मराठवाडा भागात देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमांतून शास्त्रीय संगीताचे उपक्रम करत असताना जूनी मंदिरे, किल्ले, समाध्या, वाडे, गढी, दर्गे, मकबरे यांच्या जिर्णोद्धाराचा दुरूस्तीचा त्या बाबत जागृतीचा एक प्रकल्प आम्ही सुरू केला. यातून शाश्‍वत पर्यटनाचा विषय पुढे आला. ही अपरिचित ठिकाणं सामान्य लोकांना माहित करून दिली तर त्यांना तिकडे पर्यटनासाठी नेता येईल असा विचार पुढे आला. पण ही ठिकाणं अपरिचित असल्याने पर्यटकांना तिकडे खेचणं हे एक आव्हान होतं. शिवाय शाश्‍वत पर्यटन म्हणत असताना स्थानिक अन्न, अगदी शेतात बसून खाणं हा पण एक वेगळा घटक यात होता. हे आव्हान आकाश याने पेललं व 18 डिसेंबरला आपली पहिली सहल घेवून अजिंठा डोंगरातील वेताळवाडीचा किल्ला, रूद्रेश्वरची प्राचीन लेणी, अन्व्याचे 12 व्या शतकातील अप्रतिम शिल्पसौंदर्याने नटलेले मंदिर येथे आयोजित केला. 

अजिंठा लेणी जगप्रसिद्ध आहे. पण त्या डोंगर रांगांमध्ये इतर अनेक सुंदर ठिकाणं आहेत याची फारशी कल्पना पर्यटकांना नाही. नुसती माहिती होवून उपयोग नसतो. आमच्या सारखे या विषयातील लोक केवळ याबद्दल माहिती देवू शकतात. अशा आमच्यासारख्यांना तिकडे जाण्यास प्रोत्साहन देवू शकतात. पण सामान्य पर्यटकांना या ठिकाणी नेणं हे एक आव्हान आहे. हे आकाश सारख्या तरूणांनी स्विकारलं याचे विशेष कौतूक. 

मोठ्या प्रवासी कंपन्या या छोट्या स्थळांचा विचार करत नाहीत. किंवा जरा वेगळा विचार करून आपल्या सहलींची आखणी करत नाहीत. हौस मौज मजा या पलीकडे पर्यटनाचा विचार होत नाही. पण आकाश सारखे छोटे व्यवसायीक हे धाडस करत आहेत हे महत्त्वाचे. शाश्‍वत पर्यटन हा मोलाचा विचार रूजविण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

तिसरे उदाहरण अभिजीत शेजूळ या तरूण मित्राचे आहे. याने एक वर्षापूर्वी व्लॉग सुरू केला. औरंगाबाद परिसरांतील अतिशय वेगळी अपरिचित ठिकाणं निवडून त्याचे व्हिडिओ आपल्या छोट्या मोबाईलवर तयार करून हा तरूण यु ट्यूबवर टाकतो आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व 10 किल्ल्यांचे व्हिडिओ टाकणारा तो पहिलाच ठरला आहे. पेंडका आणि लांजा हे दोन किल्ले तर कुणाला माहितही नव्हते. शिवाय तुर्काबाद खराडी येथील भुईकोट किल्लाही त्यानेच पहिल्यांदा यु ट्यूब वर आणला. जिल्ह्यातील धबधबे, रम्य ठिकाणं देवस्थानं शोधून तिथपर्यंत जावून धडपडत हा तरूण त्यांचे व्हिडिओ तयार करतो आहे. त्याचे चॅनेल आता मॉनिटाईजही झाले आहे. याची भाषा अगदी साधी बोली स्वरूपातली आहे. कुठेही पांडित्याचा आव न आणता प्रमाणिकपणे आपल्याला माहित नसलेल्या बाबी तो गावकर्‍यांना विचारून दर्शकां समोर मांडतो. मोटार सायकलवर सोबत एखाद्या तरूण मित्राला घेवून साध्या मोबाईलच्या सहाय्याने चालविलेला त्याचा हा प्रयास कौतुकास्पद आहे. 

कोरोना काळात घरोघरी भाज्या, किराणा पोचविण्यासाठी काही तरूण धडपड करत आहेत. ऑन लाईन पोर्टल चे प्रयत्न काही तरूण करत आहेत. यु ट्यबच्या माध्यमातून नविन काही तरी मांडण्यासाठी ‘व्लॉगर्स’ धडपडत आहेत. अशा तरूणांची धडपड ही आशादायक आहे. (असे खुप तरूण आहेत. माझ्या परिचयातले असल्याने वानगी दाखल ही उदाहरणं दिली.)  

तुकाराम महाराजांनी म्हटल्या प्रमाणे ही ‘लव्हाळी’ महापुरात टिकून राहताना दिसत आहेत याचे कौतुक. अशा उपक्रमांना आपण पाठिंबा द्यायला पाहिजे. त्यांना सहकार्य करायला पाहिजे. 

 

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Tuesday, October 13, 2020

चांगल्या रस्त्यांशिवाय कृषी पर्यटन शक्य नाही


उरूस, 13 ऑक्टोबर 2020 

 ंकृषी पर्यटन हा विषय महाराष्ट्र शासनाने आपल्या धोरणात अग्रक्रमाने घेतला आहे. तसे निवेदनही शासनाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले. 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन होवून गेला. लॉकडाउन च्या काळात कुंठीत झालेली अर्थव्यवस्था सगळ्यांचीच डोकेदुखी बनली आहे. यातून मार्ग काढायचा तर सर्वच जण शेतीकडे आशेने बघत आहेत. या काळात शहरातून स्थलांतरीत झालेली लोकसंख्या खेड्यांनी विनातक्रार सांभाळली. शिवाय खरीपाच्या हंगामात विक्रमी पेरणी करून संकटाला तोंड देण्याची आपली मानसिकताही सिद्ध करून दाखवली. 

देशाचा संसारही सांभाळालायला खेडी तयार आहेत हे पण या संकटाकाच्या काळात लख्खपणे समोर आले. पण नेहमीप्रमाणे शेतकरी आणि एकूणच ग्रामीण माणूस हतबल होतो तो सरकारी कामकाजामुळे. किमान ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याही अजून आपण ग्रामीण भागात पोचवू शकलेलो नाहीत. जोपर्यंत त्यांची सोय होत नाही तोपर्यंत ग्रामीण भागाचे म्हणजेच एकूणच भारताचे प्रश्‍न सुटू शकत नाहीत. हे वारंवार सिद्ध होत आलेलं आहे. 

आताही कृषी पर्यटन म्हणत असताना अशी केंद्र सुरू करण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे सरकारी पातळीवर सांगितले जाते आहे पण यासाठी जी प्रमुख गोष्ट स्वत: शासनाने करायला पाहिजे त्याचे काय? त्याकडे लक्ष देवून तातडीने ही कामं होणार कशी? 

सगळ्यात पहिली गोष्ट समोर येते ती म्हणजे संरचना (इन्फ्रास्ट्रक्चर). ग्रामीण भागात किमान बरे बारमाही असे रस्ते अजूनही आपण तयार करू शकलेलो नाही. आत्ता मुद्दा पर्यटनाचा येतो आहे. तेंव्हा त्यापुरता विचार केला तर किमान तालूक्यांना जोडणारे रस्ते तरी बारमाही आहेत का? गेल्या 5 वर्षांपासून अचानक मोठा पाउस येण्याचे प्रमाण खुप वाढले आहे. थोड्या काळात भरपूर पाऊस कोसळून जातो. मग अगदी छोट्या नदी नाल्या ओढ्यांनाही पुर येतो. परिणामी वाहतूक ठप्प होवून बसते. अगदी चांगले रस्ते असलेल्या ठिकाणीही पण अशी अवस्था आहे. (सप्टेंबर 2010 मध्ये वैजापूर जवळ उकडगांव ता. कोपरगांव येथे पुर आला असताना पुलावरच्या पाण्यात माझा सख्खा भाउ श्रीकृष्ण उमरीकर व त्याचा मित्र सुनील कोरान्ने हे वाहून गेले. यात माझा भाउ वाचला. पण सुनील कोरान्नेचा बळी या पुराने घेतला.)

तेंव्हा आपल्याला ग्रामीण भागात पर्यटकांना आणावयाचे असल्यास आधी रस्ते आणि त्यावरचे पुल यांची व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी कसा आणि कुठून निधी आणायचा हे नियोजनकर्त्यांनी ठरवावे. पण रस्त्यांच्या अभावी पर्यटन शक्य नाही. 

दुसरा गंभीर मुद्दा कृषी पर्यटनाच्या बाबतीत समोर येतो ज्याचा उल्लेख सरकारी निवेदनात नाही. ग्रामीण भागातील ऐतिहासिक वास्तूंची अवस्था अतिशय खराब आहे. यांची डागडुजी दुरूस्ती, जून्या मंदिरांचा जिर्णोद्धार या बाबी आपण पूर्णत: दूर्लक्षिल्या आहेत. अशी ठिकाणं विकसित केली तर त्या आकर्षणाने पर्यटक तिथे येवू शकतात. त्यातून कृषी पर्यटनाला चालना मिळू शकते. स्वतंत्रपणे कृषी पर्यटन म्हणून काहीही करता येणे अशक्य आहे. बहुतांश पर्यटन स्थळं किल्ले प्राचीन मंदिरे ही ग्रामीण भागातच आहेत (अगदी तालूका नसलेल्या गावात किंवा जवळपास आहेत).

उदा. म्हणून मराठवाड्यातील काही ठिकांणाचा उल्लेख करतो. अजिंठा डोंगर रांगांत अंतूर किल्ला, वाडीचा किल्ला, पितळखोरा लेणी, घटोत्कच लेणी, रूद्रेश्वर लेणी, अंभईचे वडेश्वर मंदिर, अन्वा मंदिर. खाम नदीच्या काठावरील औरंगाबादपासून वाळूजच्या दिशेने पुढे जात डाव्या बाजूने गेल्यावर गणपती स्थान असलेले शेंदूरवादा, पैठण जवळचे कडेठाण, खुलताबादपासून उजव्या बाजूने एक वाट शुलीभंजनच्या दिशेने जाते. हा सगळा रस्ता कृषी पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय पोषक आहे. पण रस्ता अतिशय खराब असल्याने कुणी इकडे फिरकतच नाही. 

जालन्यात शहागड, अंबड जवळचे जामखेड, भोकरदन जवळची लेणी ही ठिकाणं अगदी ग्रामीण भागात आहेत. शहागड तर राष्ट्रीय महामार्गाला लागून आहे. 

बीड जिल्ह्यात गेवराई तालूक्यात तलवाडा येथे उंच टेकडीवर त्वरीता देवीचे मंदिर आहे, शिवाय गढी नगर महामार्गावर मादळमोही हे बारवेतील देवीचे प्राचीन मंदिर असलेले ठिकाण आहे, बीड पाटोदा रस्त्यावर नायगांव मयुर अभयारण्य आहे, अंबाजोगाई जवळ धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिराचा जिर्णाद्धार पुरातत्त्व विभागाच्या वतीने चालू आहे.

लातुर जिल्ह्यात पानगांव रेल्वे स्टेशन येथे प्राचीन विठ्ठल मंदिर आहे, उस्मानाबाद येथे भूम तालूक्यात माणकेश्वर मंदिर आहे, परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालूक्यात गोदावरी काठी धारासूर येथे अप्रतिम गुप्तेश्वर मंदिर आहे नांदेड जिल्ह्यात देगलूर लातूक्यातील होट्टल येथील दोन मंदिरांचा जिर्णोद्धार झाला असून तिसर्‍या मंदिराचे काम बाकी आहे. हिंगोली जिल्ह्यात सुप्रसिद्ध औंढा नागनाथ जवळ राजापुर येथेे सरस्वती, योग नरसिंह व अर्धनारेश्वरांच्या मूर्ती जतन केलेल्या आहेत. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालूक्यात असलेले चारठाणा हे गांव "हेरीटेज व्हिलेज" बनावे यासाठी प्रयत्न चालू आहेत. हा सर्व परिसर कृषी पर्यटनासाठी अतिशय पोषक असा आहे.

ही सर्व ठिकाणे अगदी तालूका नसलेल्या गावांत किंवा गावा जवळ आहेत. ही ठिकाणं विकसित झाली, इथपर्यंत पोचण्यास किमान रस्ते झाले, तर या निमित्ताने इथे पर्यटकांची संख्या वाढू शकते. मग या भोवती कृषी पर्यटनाचा विकास होवू शकतो. शासनाने तातडीने करावयाची ही बाब आहे. एकदा हे मार्गी लागले की मग आपोआप त्या ठिकाणी बाकी सोयी स्थानिक लोक करत जातात. त्यासाठी परत शासनाला कुठलीच योजना आखायची गरज नाही.

अशा जागांची साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, संरक्षण आदी बाबी स्थानिक स्वराज्य संस्था करू शकतात. कारण त्यातून त्यांच्याच गावात रोजगार निर्माण होतो. आलेल्या पर्यटकांची खाण्याची राहण्याची व्यवस्था पण होवू शकते.

अगदी छोट्या गावांत असलेल्या एखाद्या मंदिराबाबत त्याचा विकास लोकांनी मिळून कसा केला याचा अनुभव आपण नेहमीच घेतो. मंदिरांबाबत ही व्यवस्था लोकांनी कशी वर्षानूवर्षे चालवली आहे? त्यासाठी शासनाने किमान सोयी पोचविण्याशिवाय (रस्ते वगैरे) काय केले? जर हे यशस्वी मॉडेल आपल्या समोर आहे तर तेच कृषी पर्यटनासाठी का वापरल्या जावू नये? 

तसेही मुख्य रस्त्याला लागून असलेल्या शेतांमधून सध्या हुर्डा पार्ट्या यशस्वीरित्या होतच आहेत. उन्हाळ्यात शेतकरी रसवंत्या रस्त्याला लागून चालवतच आहेत. बर्‍याच ठिकाणी ढाबेही उघडले आहेत. त्यातून सिद्ध इतकेच होते की एकदा का चांगला बारमाही रस्ता तयार झाला की त्याला लागून इतर उद्योग उभे राहतात. रोजगाराला चालना मिळते. हीच बाब कृषी पर्यटनालाही 100 टक्के लागू आहे. (रस्त्याला जोडूनच मग वीज, पिण्याचे पाणी आणि आधुनिक काळाची गरज म्हणजे नेटची सुविधा पण आवश्यक आहे. यामुळे पर्यटनाची वाढ होण्यास मदत होते.)

 

            श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575