Tuesday, October 13, 2020

चांगल्या रस्त्यांशिवाय कृषी पर्यटन शक्य नाही


उरूस, 13 ऑक्टोबर 2020 

 ंकृषी पर्यटन हा विषय महाराष्ट्र शासनाने आपल्या धोरणात अग्रक्रमाने घेतला आहे. तसे निवेदनही शासनाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले. 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन होवून गेला. लॉकडाउन च्या काळात कुंठीत झालेली अर्थव्यवस्था सगळ्यांचीच डोकेदुखी बनली आहे. यातून मार्ग काढायचा तर सर्वच जण शेतीकडे आशेने बघत आहेत. या काळात शहरातून स्थलांतरीत झालेली लोकसंख्या खेड्यांनी विनातक्रार सांभाळली. शिवाय खरीपाच्या हंगामात विक्रमी पेरणी करून संकटाला तोंड देण्याची आपली मानसिकताही सिद्ध करून दाखवली. 

देशाचा संसारही सांभाळालायला खेडी तयार आहेत हे पण या संकटाकाच्या काळात लख्खपणे समोर आले. पण नेहमीप्रमाणे शेतकरी आणि एकूणच ग्रामीण माणूस हतबल होतो तो सरकारी कामकाजामुळे. किमान ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याही अजून आपण ग्रामीण भागात पोचवू शकलेलो नाहीत. जोपर्यंत त्यांची सोय होत नाही तोपर्यंत ग्रामीण भागाचे म्हणजेच एकूणच भारताचे प्रश्‍न सुटू शकत नाहीत. हे वारंवार सिद्ध होत आलेलं आहे. 

आताही कृषी पर्यटन म्हणत असताना अशी केंद्र सुरू करण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे सरकारी पातळीवर सांगितले जाते आहे पण यासाठी जी प्रमुख गोष्ट स्वत: शासनाने करायला पाहिजे त्याचे काय? त्याकडे लक्ष देवून तातडीने ही कामं होणार कशी? 

सगळ्यात पहिली गोष्ट समोर येते ती म्हणजे संरचना (इन्फ्रास्ट्रक्चर). ग्रामीण भागात किमान बरे बारमाही असे रस्ते अजूनही आपण तयार करू शकलेलो नाही. आत्ता मुद्दा पर्यटनाचा येतो आहे. तेंव्हा त्यापुरता विचार केला तर किमान तालूक्यांना जोडणारे रस्ते तरी बारमाही आहेत का? गेल्या 5 वर्षांपासून अचानक मोठा पाउस येण्याचे प्रमाण खुप वाढले आहे. थोड्या काळात भरपूर पाऊस कोसळून जातो. मग अगदी छोट्या नदी नाल्या ओढ्यांनाही पुर येतो. परिणामी वाहतूक ठप्प होवून बसते. अगदी चांगले रस्ते असलेल्या ठिकाणीही पण अशी अवस्था आहे. (सप्टेंबर 2010 मध्ये वैजापूर जवळ उकडगांव ता. कोपरगांव येथे पुर आला असताना पुलावरच्या पाण्यात माझा सख्खा भाउ श्रीकृष्ण उमरीकर व त्याचा मित्र सुनील कोरान्ने हे वाहून गेले. यात माझा भाउ वाचला. पण सुनील कोरान्नेचा बळी या पुराने घेतला.)

तेंव्हा आपल्याला ग्रामीण भागात पर्यटकांना आणावयाचे असल्यास आधी रस्ते आणि त्यावरचे पुल यांची व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी कसा आणि कुठून निधी आणायचा हे नियोजनकर्त्यांनी ठरवावे. पण रस्त्यांच्या अभावी पर्यटन शक्य नाही. 

दुसरा गंभीर मुद्दा कृषी पर्यटनाच्या बाबतीत समोर येतो ज्याचा उल्लेख सरकारी निवेदनात नाही. ग्रामीण भागातील ऐतिहासिक वास्तूंची अवस्था अतिशय खराब आहे. यांची डागडुजी दुरूस्ती, जून्या मंदिरांचा जिर्णोद्धार या बाबी आपण पूर्णत: दूर्लक्षिल्या आहेत. अशी ठिकाणं विकसित केली तर त्या आकर्षणाने पर्यटक तिथे येवू शकतात. त्यातून कृषी पर्यटनाला चालना मिळू शकते. स्वतंत्रपणे कृषी पर्यटन म्हणून काहीही करता येणे अशक्य आहे. बहुतांश पर्यटन स्थळं किल्ले प्राचीन मंदिरे ही ग्रामीण भागातच आहेत (अगदी तालूका नसलेल्या गावात किंवा जवळपास आहेत).

उदा. म्हणून मराठवाड्यातील काही ठिकांणाचा उल्लेख करतो. अजिंठा डोंगर रांगांत अंतूर किल्ला, वाडीचा किल्ला, पितळखोरा लेणी, घटोत्कच लेणी, रूद्रेश्वर लेणी, अंभईचे वडेश्वर मंदिर, अन्वा मंदिर. खाम नदीच्या काठावरील औरंगाबादपासून वाळूजच्या दिशेने पुढे जात डाव्या बाजूने गेल्यावर गणपती स्थान असलेले शेंदूरवादा, पैठण जवळचे कडेठाण, खुलताबादपासून उजव्या बाजूने एक वाट शुलीभंजनच्या दिशेने जाते. हा सगळा रस्ता कृषी पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय पोषक आहे. पण रस्ता अतिशय खराब असल्याने कुणी इकडे फिरकतच नाही. 

जालन्यात शहागड, अंबड जवळचे जामखेड, भोकरदन जवळची लेणी ही ठिकाणं अगदी ग्रामीण भागात आहेत. शहागड तर राष्ट्रीय महामार्गाला लागून आहे. 

बीड जिल्ह्यात गेवराई तालूक्यात तलवाडा येथे उंच टेकडीवर त्वरीता देवीचे मंदिर आहे, शिवाय गढी नगर महामार्गावर मादळमोही हे बारवेतील देवीचे प्राचीन मंदिर असलेले ठिकाण आहे, बीड पाटोदा रस्त्यावर नायगांव मयुर अभयारण्य आहे, अंबाजोगाई जवळ धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिराचा जिर्णाद्धार पुरातत्त्व विभागाच्या वतीने चालू आहे.

लातुर जिल्ह्यात पानगांव रेल्वे स्टेशन येथे प्राचीन विठ्ठल मंदिर आहे, उस्मानाबाद येथे भूम तालूक्यात माणकेश्वर मंदिर आहे, परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालूक्यात गोदावरी काठी धारासूर येथे अप्रतिम गुप्तेश्वर मंदिर आहे नांदेड जिल्ह्यात देगलूर लातूक्यातील होट्टल येथील दोन मंदिरांचा जिर्णोद्धार झाला असून तिसर्‍या मंदिराचे काम बाकी आहे. हिंगोली जिल्ह्यात सुप्रसिद्ध औंढा नागनाथ जवळ राजापुर येथेे सरस्वती, योग नरसिंह व अर्धनारेश्वरांच्या मूर्ती जतन केलेल्या आहेत. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालूक्यात असलेले चारठाणा हे गांव "हेरीटेज व्हिलेज" बनावे यासाठी प्रयत्न चालू आहेत. हा सर्व परिसर कृषी पर्यटनासाठी अतिशय पोषक असा आहे.

ही सर्व ठिकाणे अगदी तालूका नसलेल्या गावांत किंवा गावा जवळ आहेत. ही ठिकाणं विकसित झाली, इथपर्यंत पोचण्यास किमान रस्ते झाले, तर या निमित्ताने इथे पर्यटकांची संख्या वाढू शकते. मग या भोवती कृषी पर्यटनाचा विकास होवू शकतो. शासनाने तातडीने करावयाची ही बाब आहे. एकदा हे मार्गी लागले की मग आपोआप त्या ठिकाणी बाकी सोयी स्थानिक लोक करत जातात. त्यासाठी परत शासनाला कुठलीच योजना आखायची गरज नाही.

अशा जागांची साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, संरक्षण आदी बाबी स्थानिक स्वराज्य संस्था करू शकतात. कारण त्यातून त्यांच्याच गावात रोजगार निर्माण होतो. आलेल्या पर्यटकांची खाण्याची राहण्याची व्यवस्था पण होवू शकते.

अगदी छोट्या गावांत असलेल्या एखाद्या मंदिराबाबत त्याचा विकास लोकांनी मिळून कसा केला याचा अनुभव आपण नेहमीच घेतो. मंदिरांबाबत ही व्यवस्था लोकांनी कशी वर्षानूवर्षे चालवली आहे? त्यासाठी शासनाने किमान सोयी पोचविण्याशिवाय (रस्ते वगैरे) काय केले? जर हे यशस्वी मॉडेल आपल्या समोर आहे तर तेच कृषी पर्यटनासाठी का वापरल्या जावू नये? 

तसेही मुख्य रस्त्याला लागून असलेल्या शेतांमधून सध्या हुर्डा पार्ट्या यशस्वीरित्या होतच आहेत. उन्हाळ्यात शेतकरी रसवंत्या रस्त्याला लागून चालवतच आहेत. बर्‍याच ठिकाणी ढाबेही उघडले आहेत. त्यातून सिद्ध इतकेच होते की एकदा का चांगला बारमाही रस्ता तयार झाला की त्याला लागून इतर उद्योग उभे राहतात. रोजगाराला चालना मिळते. हीच बाब कृषी पर्यटनालाही 100 टक्के लागू आहे. (रस्त्याला जोडूनच मग वीज, पिण्याचे पाणी आणि आधुनिक काळाची गरज म्हणजे नेटची सुविधा पण आवश्यक आहे. यामुळे पर्यटनाची वाढ होण्यास मदत होते.)

 

            श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Monday, October 12, 2020

कन्हैया - बुडती राजकीय "नैय्या"


उरूस, 12 ऑक्टोबर 2020 

 ं2014 च्या लोकसभा निकालानंतर विरोधी पक्षाचे संख्येच्या दृष्टीने लोकसभेत खच्चीकरण झाले. याचा इतर माध्यमांनी इतका धसका घेतला की आता मोदी-भाजप-अमित शहा यांना राजकीय विरोध कसा करायचा? याची चिंता त्यांना सतावत राहिली. विरोधीपक्ष नेतेपदही मिळू नये इतका संख्येच्यादृष्टीने विरोधी पक्ष कमकुवत असणे हे काही नविन नव्हते. पहिल्या पाच सार्वत्रिक निवडणुका अशा होत्या की त्यात सत्ताधार्‍यांशिवाय संख्येने कुणीच मोठं नव्हते. त्यामुळे विरोधीपक्ष नेता हे पदच मुळात आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकांत पहिल्यांदा निर्माण झाले. पूर्वी हे पद होते पण त्याला मंत्र्याचा दर्जा आणि इतर सोयी सवलती देण्याची व्यवस्था पहिल्यांदाच जनता राजवटीत करण्यात आली.  कारण पहिल्यांदाच विरोधी पक्ष इतका मजबूत झाला होता. तेंव्हा ‘लोकशाही मेलीच आता काही खरे नाही’ अशी ओरड करणारे ढोंगीपणा करत आहेत. (परत 1984 च्या निवडणुकांत विरोधी पक्ष संख्येच्या दृष्टीने सफाचाट झाला होता) 

या वातावरणात राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या इतर चळवळीतल्या व्यक्ती हुडकून त्यांना अप्रत्यक्षपणे मोदी विरोधात विरोधी आवाज म्हणून मोठं करायला माध्यमांनी सुरवात केली. याचे ठळक उदाहरण म्हणजे कन्हैय्या कुमार. जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थी संसदेत निवडून आलेला अध्यक्ष इतकीच खरे तर त्याची ओळख. पण माध्यमांनी मोदी भाजप विरोधातील बुलंद तरूण आवाज अशी त्याची संभावना करून त्याला देशपातळीवरचे नेतृत्व जवळपास बहालच करून टाकले. 

त्या पूर्वी आण्णांच्या आंदोलनातून अरविंद केजरीवाल पुढे आले होते. त्यांच्या बाबतीतही माध्यमांनी अशीच जास्तीची हवा तयार करून त्यांना जणू देशाचा नेताच म्हणून समोर करायला सुरवात केली होती. पण तो फुगा 2014 च्या निवडणुकांत फुटला. माध्यमे तोंडावर आपटली. केजरीवाल यांनी निदान दिल्ली राज्य जिंकून तेवढ्यापुरते आपण नेते आहोत हे सिद्ध केले. यानंतर आला तो कन्हैय्याकुमार. बघता बघता देशभर त्याचे दौरे सुरू झाले. त्याला प्रसिद्धी मिळायला लागली. 

रोहित वेमुला प्रकरण असो, गौरी लंकेश यांची हत्या असो, दादरी मधील अखलाखची हत्या असो या सर्वात कन्हैय्या कुमारची वक्तव्ये त्याच्या भेटी याच्या बातम्या व्हायला लागल्या. गुजरात मध्ये उनाचे प्रकरण घडले. त्यातून लगेच जिग्नेश मेवाणी या दलित नेतृत्वाचा चेहरा पुढे आला. लगेच तिथे जावून कन्हैय्या धडकला. त्या दोघांचे फोटो माध्यमांतून चमकले. या सोबतच उमर खालीद, शेहला राशीद ही कश्मिरातील नावेही पुढे आली. अगदी अलिकडच्या काळातले शर्जील इमाम हे नाव पण असेच पुढे आणले गेलेले आहे. खालीद जिग्नेश मेवाणी एल्गार परिषदेतही हजर होते. महाराष्ट्रात अजून एक नाव सचिन माळी आणि शीतल साठ्ये या कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांचे घेता येईल. यांचा संबंध नक्षलींशी कसा होता हे सगळे समोर आले आहे. 

गुजरात विधान सभा निवडणुकांत तर असे चित्र निर्माण केल्या गेले होते की जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकुर या तीन नविन चेहर्‍यांनी भाजपला कशी जबरदस्त टक्कर दिली आहे. गुजरात विधानसभेचे निकाल लागले. जिग्नेश मेवाणी अपक्ष म्हणून निवडून आला पण त्याशिवाय यांच्या हाताशी फार काही लागले नाही. पण तरीही ही नावं देशपातळीवर गाजती ठेवली गेली. पुढे 2019 च्या लोकसभा निवडणुका जाहिर झाल्या. एव्हाना कन्हैय्या कुमारने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सी.पी.आय.) मध्ये अधिकृत रित्या प्रवेश केला होता. लगेच त्याला पक्षाच्या केंद्रिय कार्यकारिणीत घेण्यात आले. म्हणजे एकीकडे आयुष्य पक्षासाठी चळवळीसाठी खर्च करणारे लोकं राहिले बाजूला पण कालच्या विद्यार्थी नेत्याला आज लगेच आपल्या कार्यकारिणीत पायघड्या घालून कम्युनिस्टांनी आपणही कसे प्रवाहपतीत आहोत हेच सिद्ध केले. एरव्ही हे आव मात्र असा आणायचे की पक्ष कसा केडर बेस्ड आहे, आमच्याकडे वैचारिक घुसळण कशी होते, अभ्यासू नेतृत्वच कसे समोर आणले जाते, आमच्या ज्येष्ठ नेत्यांनाही आम्ही कसे प्रसंगी बाजूला टाकत असतो (सोमनाथ चटर्जी यांचे पक्षातून निलंबन किंवा ज्योती बसू यांना पंतप्रधानपदी बसण्याची परवानगी नाकारणे किंवा सिताराम येच्युरी यांना राज्यसभा नाकारणे). पण याच कम्युनिस्टांनी कन्हैय्या इतक्या तातडीने देश पातळीवरचा नेता कसा बनला याचे मात्र उत्तर कधी दिले नाही. माध्यमांनी हे करणे आपण समजू शकतो. पण कम्युनिस्ट पक्षानेही त्याला इतक्या कमी वयात  तातडीने कार्यकारीणीत कसे घेतले? याचे उत्तर कधी दिले नाही. 

2019 च्या निवडणुकीत कन्हैय्याला बिहार मधून लोकसभेचे तिकीट देण्यात आले. त्या निवडणुकीच्या भरपुर बातम्या करण्यात आल्या. याचा परिणाम काय झाला ते सर्वांनाच माहित आहे. भाजप तर सोडाच तो तर जाणून बुजून विरोधात होताच. पण लालुप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही कन्हैय्याला पाठिंबा दिला नाही. उलट विरोधात उमेदवार उभा केला. शिवाय त्या उमेदवाराने कन्हैय्या पेक्षाही जास्तीची मते घेवून आपणच कसे व्यवहारिक पातळीवर बरोबर होतो हे सिद्धही केले. भाजपचे केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह प्रचंड मतांच्या फरकाने निवडुन आले.

इथे पहिल्यांदा कन्हैय्याच्या राजकीय वाटचालीवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले. जिग्नेश मेवाणी निदान आपल्या विधानसभेत निवडून तरी आला होता. पण कन्हैय्याला तेही जमले नाही. याच काळात शेहला राशीद हीने कश्मीरमधील स्थानिक निवडणुकांतून माघार घेतली. शाह फैजल या कश्मिरी युवकाने प्रशासनातील उच्च नौकरी (आयएएस) सोडून राजकीय पक्ष काढला होता. त्यानेही आपला पक्ष गुंडाळून ठेवला आणि परत प्रशासनात जाण्याची तयारी चालवली. जिग्नेश मेवाणीचेही देश पातळीवरील दलित नेतृत्वाचे नाटक संपुष्टात आले. हार्दिक पटेल तर कॉंग्रेसमध्ये जावून प्रदेश कॉंग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष बनला. अल्पेश ठाकुरने भाजपची वाट धरली. उमर खालीदची रवानगी तुरूंगात झाली आहे.

हे सगळं परत आठवायचे कारण म्हणजे नुकतीच बिहार विधानसभेची निवडणुक गाजत असताना उमेदवारांची पहिली यादी विविध पक्षांनी जाहिर केली आहे. यातून कन्हैय्याचे नाव गळाले आहे. शिवाय त्याला निवडणुक प्रचारातही उतरविण्यास पक्ष तयार नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उमर खालीद प्रमाणेच कन्हैय्यावरही खटला चालू आहे. कधीही त्याच्यावर कारवाई होवून तुरूंगाची वारी घडू शकते. 

याच्या नेमके उलट भाजपने तेजस्वी सुर्या सारख्या कन्हैय्याच्याच वयाच्या आपल्या कार्यकर्त्याला बेंगलोरमधून तिकीट दिले. तो निवडून आला. त्याला आता बिहार विधानसभा प्रचारात उतरविले आहे. पश्चिम बंगाल मध्ये निवडणुका होवू घातल्या आहेत. तिथेही तेजस्वी सुर्याने आत्तापासूनच दौरे सुरू केले आहेत. त्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी बसविण्यात आले आहे. 

एकीकडे डावे पुरोगामी पक्ष आपल्याच तरूण नेतृत्वाला किमान तिकीटही द्यायला तयार नाहीत. त्याला प्रचारातही उतरवताना दिसत नाहीत. आणि दुसरीकडे ते ज्यांच्यावर टीका करतात तो भाजप कर्नाटकांतून तेजस्वी सुर्या, लदाखचा तरूण नेता जामयाग नामग्याल, महाराष्ट्रातून पुनम महाजन यांना संसदेत भाषणांसाठी पुढे करताना दिसतो आहे. केवळ संसदेतच नाही तर रस्त्यावरच्या आंदोलनातही आपले युवा नेतृत्व हा पक्ष पुढे करताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र), बिप्लबकुमार देव (त्रिपुरा) या तरूण नविन नेत्यांच्या हाती राज्याचे मुख्यमंत्रीपदही भाजपने देवून दाखवले आहे. याच्या उलट कॉंग्रेसमधील युवा नेतृत्वाचे खच्चीकरण करण्यात आले (सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे). बाकी पुरोगामी म्हणविणारे पक्षही या बाबत मागे पडलेले दिसत आहेत. डाव्या पक्षांच्या हाती कन्हैय्या सारखा चेहरा लागला होता. पण त्याच्यावरही आता न्यायालयीन कारवाईची टांगती तलवार आहे. या सोबतच माध्यमांनी जी नावे 2014 पासून पुढे केली होती ती सर्व राजकीय दृष्ट्या मागे पडलेली दिसून येत आहेत. 

कन्हैय्या कुमार हा एक राजकीय बुडबुडा होता का ‘लंबी रेस का घोडा’ आहे हे येत्या काही काळात सिद्ध होईल. पण याच काळात इतर राजकीय पक्षांतून चिराग पासवान (बिहार), दुष्यंतकुमार चौटाला (हरियाणा), जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश) असे काही तरूण चेहरे समोर येत आहेत. म्हणजे भाजपेतर तरूण चेहरे परत राजकीय पक्षांतून चळवळीतूनच येत आहेत. माध्यमांनी जी एक हवा अराजकीय चळवळीतील चेहर्‍यांबाबत केली होती त्याची हवा गेलेली सध्या तरी दिसून येते आहे.                

            श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Saturday, October 10, 2020

‘अर्बन नक्षलीं’च्या गळ्याशी कायद्याचा फास !

  


उरूस, 10 ऑक्टोबर 2020 

 भीमा कोरेगांव दंगल प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तपास करत आहे. काल या तपासात आठ नक्षलींविरोधी आरोप पत्र दाखल करण्यात आले. आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, स्टॅन स्वामी, रमेश गायचोर, ज्योती जगताप, हॅनी बाबू, सागर गोरखे आणि मिलींद तेलतुंबडे ही ती आठ नावे आहेत.

नोव्हेंबर 2018 पासून आनंद तेलतुंबडे न्यायालयीन खेळ करत आपली अटक चुकवत होते. त्यांना शेवटी सर्वौच्च न्यायालयाने फटकारले. त्यांचा जामिन नाकारून शरणागती पत्करण्यास सांगितले. त्यांनी बरोबर 14 एप्रिल 2020 हाच दिवस शरणागतीसाठी निवडला. ही संधी साधत सगळ्या पुरोगाम्यांनी तेंव्हा अशी बोंब केली की आनंद तेलतुंबडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातजावाई (प्रकाश आंबेडकर यांच्या बहिणीचे पती) असून त्यांना बाबासाहेबांच्या जयंतीलाच कशी अटक केली?

वारंवार हे पुरोगामी अशा देशविघातक शक्तींच्याच बाजूने कसे उभे राहतात? वारंवार यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची उबळ देशविरोधी बाबींतच कशी येते? आनंद तेलतुंबडे हे जसे बाबासाहेबांचे नातजावाई आहेत तसेच ते मिलींद तेलतुंबडे या फरार नक्षलवाद्याचे सख्खे भाऊ आहेत हे का नाही सांगितले जात? त्यांना सर्व कायदेशीर संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. आपली बाजू न्यायालयासमोर मांडण्याची संपूर्ण मुभा दिली होती. दीड वर्ष त्यांना अटकेपासून पळता आले. असे असूनही त्यांना पोलिसांना शरण यावं लागलं आणि अटक व्हावं लागलं की लगेच ओरड सुरू होते.

आता रितसर त्यांच्यासह इतर आठ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कायदा त्याचे काम करतो आहे. मग असं असताना त्यात अडथळा आणण्याचे काय काम? 

मुळात भिमा कोरेगांव हे प्रकरण काय आहे? ब्रिटीशांसाठी लढलेल्या महार रेजिमेंटच्या सैन्याची गौरवगाथा ही अस्सल भारतीयांसाठी अभिमानाचा विषय कसा काय होवू शकते? याचे कारण काय दिले तर ही लढाई पेशव्यां विरूद्ध म्हणजेच ब्राह्मणशाही मनुवादी यांच्या विरोधात होती. यातही पुन्हा एक बौद्धिक भ्रष्टाचार हे शाहू फुले आंबेडकरांची जपमाळ ओढणारे पुरोगामी विचारंवत करत असतात. पेशवे हे सातारच्या छत्रपतींचे वजीर म्हणजेच पंतप्रधान होते. छत्रपतींच्या वतीने ते राज्यकारभार पहात होते. युद्ध करत होते. मग हे सैन्य पेशव्यांचे कसे ठरते? अगदी पानिपतची लढाई असो की दिल्ली जिंकून त्या तख्तावर मोगल वंशाच्या व्यक्तीस बसवून त्याच्या बादशाहीस मान्यता देणे असो ही सगळी कामं पेशव्यांनी केली ती कुणाच्या आदेशाने? छत्रपतींच्याच आदेशाने आणि नावाने केले ना? पेशवाईची वस्त्रे सातार्‍यातूनच येत होती ना. मग असे असताना या सैन्याला पेशव्यांचे सैन्य असे अभ्यासक विचारवंतांनी म्हणायचे काय कारण? बोलीभाषेत ‘पेशवाई’ हा शब्द रूढ होता हे एकवेळ ठीक आहे. प्रत्यक्षात शिक्का चालत होता तो छत्रपतींचाच. 

स.गो.सरदेसाई यांनी जी रियासत लिहीली आहे त्याचे नाव ‘मराठी रियासत’ असेच आहे. हीची सुरवात शिवाजी महाराजांपासून होते आणि 1818 मध्ये पेशव्यांच्या पराभवापाशी संपते. याला वेगळे ‘पेशवे रियासत’ असे नाव दिले नाही. मग वैचारिक पातळीवर पेशवाई हा शब्द का वापरल्या जातो? 

भीमा कोरेगांवच्या लढाईत ब्रिटीशांकडून जे काही दलित लढले गेले होते ते पोटार्थी सैनिक म्हणून लढले होते. जसे ते ब्रिटीशांकडून लढले हा त्यांचा दोष नाहीच तसेच त्यांनी काही मनुवादाविरूद्ध ब्राह्मणशाही विरूद्ध लढा दिला असेही नाही.  मग हा विषय का उकरून काढला जातो? 

स्वत: बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात भीमा कोरेगांव येथे काही एक उत्सव दरवर्षी सुरू केला का? प्रकाश आंबेडकर आणि आनंद तेलतुंबडे यांनीही जानेवारी 2018 च्या पूर्वी भीमा कोरेगांव म्हणजे दलित अस्मितेचे स्मारक आहे असे काही कधी कुठे लिहीले भाषण केले तशी मांडणी केली आहे? मग भीमा कोरंगांव म्हणजे मनुवादा विरूद्धची लढाई आहे ही मांडणी कुठल्या वैचारिक आधारावर केली जाते? त्यासाठी कसला पुरावा आहे? राजकारण करण्यासाठी राजकीय नेते काहीही करतात याचा अनुभव आपण घेतो. पण विचारवंत कशाच्या आधारावर ही मांडणी करतात? 

बुद्धीभेद करण्याची विचारवंतांची खोडी अगदी सर्वौच्च न्यायालयात नुकत्याला लागलेल्या राम जन्मभुमी प्रकरणांतील निकालांतूनही ही बाब समोर आली आहे. रोमिला थापर आणि इरफान हबीब सारखे इतिहासकार यांनी खोटी शपथपत्रं देवून सांगितले होते की बाबरी मस्जिद ही समतल जागेवर उभारल्या गेली होती. तेथे कुठलेही मंदिर पूर्वी नव्हते. जे की उत्खननात खोटे सिद्ध झाले. 

त्याच प्रमाणे भीमा कोरेगांवचा स्तंभ हा या लढाईत मृत्यू पावलेल्या दलित सैनिकांचे (त्यात इतरही नावे आहेत) स्मारक आहे इतपत ठीक आहे. पण त्याला चातुर्वर्ण्याविरूद्धच्या लढाईचे प्रतिक बनवून जो गौरव केला गेला आणि त्यासाठी एक वैचारिक मांडणी केल्या गेली हा शुद्ध वैचारिक भ्रष्टाचार आहे. 

एल्गार परिषदेत एकावर एक चार मडके ठेवण्यात आले होते. हे म्हणजे चातुर्वण्याचे प्रतिक असे सांगण्यात आले. परिषदेची सुरवात हे मडके फोडून करण्यात आली. सर्वात वरचे मडके म्हणजे ब्राह्मण म्हणून त्यावर काठी मारताना खालची मडकी पण फुटली. म्हणजे चारही वर्णांवर आघात झाला. आता हे नेमके कशाचे प्रतिक झाले? वर्ण्य व्यवस्था नाकारायची  आपण म्हणतो ती तर तशी कायद्याने नाकारली आहेच. घटना स्विकारली तेंव्हाच हा विषय कागदोपत्री संपला.

पेशवाई विरोधात जो काही संताप व्यक्त करायचा असेल तो जरूर करावा, त्यासाठी पेशव्यांनी केलेले अपराध साधार समोर आणावेत. त्यावर वैचारिक मंथन करावे. पण त्यासोबतच सातारचेआणि कोल्हापुरचे छत्रपतीं पण त्याला जबाबदार धरावे लागतील. शाहू महाराजांचे नाव घेत पेशवाईवर आघात असला ढोंगीपणा चालणार नाही. केवळ पेशवेच नाहीत तर गायकवाड, होळकर, शिंदे, पवार हे सगळे प्रमुख सरदार/संस्थानिक यासाठी जबाबदार धरावे लागतील. 

मुळात भीमा कोरेगांव हा एक मोठा वैचारिक भ्रष्टाचार आहे. या विचारवंतांनी जो नैतिक पाठिंबा या प्रकरणाला दिला त्याचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी यात घुसून हिंसाचार केला. 

रानावनातला नक्षलवाद त्यांच्या विरूद्धच्या कडक पोलिस कारवायांमुळे आटलेल्या जनसमथर्सनामुळे जेरीस आलेला होता. गेली 20 वर्षे हा नक्षलवाद शहरात शिरला फोफावला. त्याला विचारवंत लेखक पत्रकार कलाकार यांनी आश्रय दिला. ‘शहरी नक्षलवाद’ हा शब्दप्रयोग कॉंग्रेसच्याच काळात केल्या गेला. पी. चिदंबरम, शिवराज पाटील चाकुकर हे गृहमंत्री असताना त्यांची संसदेतील वक्तव्ये तपासा. या शहरी नक्षलींवर वारंवार कारवायी होत आलेली आहे. हे काही आत्ता घडले असे नाही. शाहिनबाग आंदोलनातीही नक्षलवादी सक्रिय राहिले आहेत.  देशभरात कुठेही कोणत्याही कारणाने अस्वस्थता पसरत असेल तर त्यात तेल ओतायचे काम नक्षलवादी करत आहेत. अर्बन नक्षली आपले काम शहरी भागात लिखाण, पत्रकारिता, सामाजिक चळवळी, कला या माध्यमांतून करत आहेत. याचा अतिशय बारकाईने तपास पोलिस यंत्रणा करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या आठ अर्बन नक्षलींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल होत नाहीत मग कसे काय आरोप करता? अशी ओरड करणार्‍या पुरोगाम्यांचा गळा आता बसला आहे.  

पाक धार्जिणे आतंकवादी, नक्षलवादी, चीनचे समर्थन करणारे देशविरोधी डावे आणि इतर पुरोगामी यांची सगळ्यांची मिळून तयार झालेली ‘तुकडे तुकडे गँग’ आता कायद्याच्या जाळ्यात पुरती अडकत चालली आहे. ज्या बाबासाहेबांचे नाव हे उठता बसता घेतात त्यांना बाबासाहेबांच्याच लोकशाहीवादी स्वतंत्रताप्रिय संविधानाने अडकवून टाकले आहे.     

 

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Friday, October 9, 2020

राहूल है के मानता नही !


 उरूस, 9 ऑक्टोबर 2020 

 ‘समजावून सांगितल्यावर ज्याला कळते ते मुल, समजावून सांगूनही ज्याला कळत नाही तो राहूल’ 

अशी एक  दोनोळी व्हाटसअपवर सध्या फिरत आहे. चीनप्रश्‍नावर राहूल गांधी यांनी केलेले वक्तव्य पाहून या दोनोळीचा नेमकेपणा माझ्या लक्षात आला.

एक प्रचार सभेत भाषण करताना राहूल गांधी यांनी नेहमीप्रमाणे बौद्धिकतारे तोडले. त्यांच्या बोलण्याकडे आता तसं कुणी फारसं लक्ष देत नाही. हे एक बरं आहे. पण त्यातील देशाच्या संरक्षणासंबंधी विषय गंभीर आहे म्हणून त्याची त्यादृष्टीने दखल घेणं भाग आहे. 

एक तर 1962 च्या चीन युद्धात आपल्या भूमीचा एक भाग चीनने बळकावला आहे हे विदारक कटू सत्य आहे. त्यावेळेस झालेल्या करारात जैसे थे परिस्थिती ठेवण्यात यावी असे ठरले. प्रत्यक्ष ज्याच्या ताब्यात जो प्रदेश आहे तो सध्यातरी तसाच राहिल असे ठरले. अर्थात हे अंतिम नाही. अंतिम निर्णय सवडीने ठरविण्यात येईल (यावर तज्ज्ञांनी सविस्तर लिहीलं आहे. जिज्ञासुंनी ते जरूर वाचावे). ही ताबा रेषा म्हणजेच लाईन ऑफ ऍक्चुअल कंट्रोल म्हणजेच एलएसी. यातही परत एक गुंता आहे. भारत आणि चीन यांच्या ताबा रेषात परत एक नो मेन्स लँड अशी भूमी आहे. त्या ठिकाणी दोन्ही देशांना केवळ पहारा देण्यासाठी अथवा टेहेळणीसाठी फिरण्याची गस्त घालण्याची मुभा आहे. 

पण हे काहीच राहूल गांधी यांना समजून घ्यायचे नाही. खरं तर त्यांना जाणीवपूर्वकच असा धूराळा उडवून द्यायचा आहे. चौकीदार चोर है या प्रकरणांत सर्वौच्च न्यायालयाने कान उपटल्यावरही ते सुधरायला तयार नाहीत. याचा अर्थ स्पष्टच होतो तो म्हणजे हे सर्व ठरवून ठरवूनच चालू आहे. 

आपण संविधान पाळणारे लोक आहोत. आपली घटनात्मक लोकशाही आहे. यात संसद सर्वौच्च आहे. मग हेच राहूल गांधी त्यांचे जे काही प्रश्‍न/शंका होत्या त्या घेवून आत्ता चालू असलेल्या लोकसभेच्या सत्रात का नाही सामील झाले? त्यांनी संसदेच्या पटलावर हे प्रश्‍न का नाही उपस्थित केले? कोरोना संकटकाळात सर्व खबरदारीचे उपाय घेवून कठीण परिस्थितीतही हे अधिवेशन बोलावण्यात आले होते. तेंव्हा राहूल गांधी यांची जबाबदारी होती की त्यांनी या अधिवेशनाला उपस्थित राहूल सरकारला खडे प्रश्‍न विचारायला हवे होते. पण हे नेमके त्याच काळात परदेशी पळून गेले. (मी जाणीपूर्वक असा शब्द वापरत आहे. कारण वारंवार राहूल गांधी यांनी संसद अधिवेशनांकडे पाठ फिरवली आहे. ते संसदीय लोकशाहीत विस्तृत नेमके मुद्दे उपस्थित करून प्रश्‍न विचारून सरकारला कोंडित पकडणे टाळत आले आहेत.)

आपल्या बेताल बडबडीत राहूल गांधी यांनी असेही एक विधान केले की केवळ 15 मिनीटांत चीनला उचलून 100 किमी दूर फेकणे शक्य आहे. त्यांचे सरकार असले असते तर त्यांनी फेकले असते. 

2004 ते 2014 या काळात राहूल गांधी हे 34 ते 44 वर्षे अशा प्रौढ वयात होते. शिवाय कॉंग्रेस पक्षाच्या  सर्वेसर्वा त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी याच होत्या. राहूल गांधी हे प्रत्यक्ष लोकसभेत खासदार म्हणून याच काळात निवडूनही आले होते. त्यांच्याकडे काय आणि किती अधिकार आहेत याचा पुरावा त्यांनी सगळ्या जगाला पत्रकार परिषदेत सरकारचा अध्यादेश फाडून दिला होता. मग याच राहूल गांधी यांना 2004 ते 2014 या संपूर्ण 10 वर्षांच्या कालखंडात चीनला 100 किमी दूर फेकण्यासाठीची 10 मिनीटे मिळाली नाहीत का? का त्या काळात अशी 15 मिनीटे आलीच नाहीत?

नरेंद्र मोदी या व्यक्तीवर टीका करणे ही एक वेगळी बाब आहे. पण हेच नरेंद्र मोदी जेंव्हा देशाचे पंतप्रधान असतात तेंव्हा ते एका सर्वौच्च अशा संविधानिक पदावर बसलेले असतात. अशावेळी त्यांच्यावर चीनसारख्या नाजूक संवेदनशील लष्करीदृष्ट्या अतिशय गुंतागुंतीच्या अशा आंतरराष्ट्रीय विषयावर इतकी बालीश टीका करणे योग्य आहे का? 

याबाबतीत माध्यमांची पण कमाल आहे. ही माध्यमे राहूल गांधी किंवा त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते यांना याबाबत जाब का विचारत नाहीत? देशाच्या सुरक्षेशी संबंधीत हा गंभीर प्रश्‍न आहे. ही काही केवळ राजकीय टीका म्हणून सोडून द्यायची गोष्ट नाही. 

मनाली-लदाख प्रदेशातील अतिशय महत्त्वाच्या  ‘अटल टनल’ बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात आणि नेमके तेंव्हाच अगदी बरोबर वेळ साधत राहूल गांधी हे विधान करतात. यात काही एक आंतरराष्ट्रीय कट आहे अशी शंका येत राहते. अर्थात असे कट कुमार केतकरांना आता दिसत नाहीत. त्यांना मुळात भारताने अटल टनेल बांधून आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत केली हाच एक आंतरराष्ट्रीय कट वाटू शकतो. भारत ज्या जोरकसपणे लदाख मध्ये लष्करी कारवाया सुलभ जाव्यात म्हणून सीमेवर रस्ते पुल यांची कामं करत आहे हे मुळीच रूचलेले नसणार.

या नविन बोगद्यामुळे लष्कराच्या हालचाली सुलभ गतीमान होणार आहेत. पण या सोबतच त्या भागातील नागरिक जे वर्षानुवर्षे मुख्य भूमीपासून तुटलेले होते. त्यांना संपर्काच्या अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत होते ते मुख्य भूमीशी जोडले जातील आणि भारताच्या मुख्य भूमीतील नागरिकही या प्रदेशाशी जोडले जातील. हे फार महत्वाचे आहे. राहूल गांधीं पुरेपुर मनापासून आत्तापासूनच प्रयत्न करत आहेत की 2024 च्या निवडणुकांत भाजपला 350 ते 400 जागा मिळाव्यात. राहूल गांधी यांच्या या प्रयत्नाला मनापासून शुभेच्छा. कॉंग्रेसचा अवतार संपविण्याचे जे व्रत त्यांनी हाती घेतले आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वास जावो.   

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Thursday, October 8, 2020

शाहीनबाग : सर्वोच्च न्यायालयाची थप्पड कुणाच्या गालावर?


उरूस, 8 ऑक्टोबर 2020 

 7 ऑक्टोबर 2020 ला सर्वौच्च न्यायालयाने शाहिनबाग प्रकरणांत स्पष्ट निकाल देत अशा प्रकारे आंदोलन करणे संपूर्णत: चुक असल्याचे सांगितले. या निकालाने बर्‍याच जणांच्या गालावर थप्पड बसली आहे. 

15 डिसेंबर 2019 रोजी सीएए च्या विरोधात दिल्लीच्या शाहिनबाग परिसरांत मुस्लीम महिलांना समोर करून रस्ता रोको आंदोलन सुरू झाले. खरे तर या महिलांना वारंवार विचारले गेले होते की तुमच्यावर नेमका कोणता अन्याय झाला? तूम्ही हे आंदोलन कशाकरता करत आहात? याचे कुठलेही संयुक्तीक उत्तर या दादी नानी देवू शकल्या नाहीत.

वारंवार सगळे कायदेतज्ज्ञ सांगत होते की सीएए चा कुठल्याही भारतीयाच्या नागरिकत्वाशी काहीही संबंध नाही. त्यात भारतीय मुसलमानही आलेच. मुळात हे विधेयकच धार्मिक अत्याचाराला बळी पडलेल्या पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानच्या असहाय्य नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यासाठीचे आहे. कुणाचे नागरिकत्व हरण करण्यासाठी नव्हे. पण मुसलमानांचा जाणीवपूर्वक गैरसमज करून दिल्या गेला. या गैरसमजाचा अग्नी सगळ्यांनी मिळून प्रज्ज्वलीत केला. आणि दिल्लीचा एक महत्त्वाचा रस्ता 100 दिवस अडवल्या गेला. शाहिनबाग परिसरांतील दोन तीन लाख नागरिकांना त्रास झाला, या भागातील दुकाने बंद राहिली. पुढे करोना आला आणि त्यांना परत बंदीचा त्रास भोगावा लागला. अशा प्रकारे आपल्या हक्कासाठी निदर्शने करत आहोत असा आव आणत इतर नागरिकांच्या मुलभूत अशा संचार स्वातंत्र्यावर गदा आणल्या गेली.

शाहिनबागचा विषय इतकाच मर्यादीत नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा भारतात दौरा होता तेंव्हा या शाहिनबागेच्या निमित्ताने देशभर दंगे उसळविण्याचा एक कट होता हे पण आता समोर आले आहे. दिल्लीत तर प्रत्यक्ष दंगे उसळलेही. त्यात 53 निरपराध नागरिकांचा बळीही गेला. आता यावर कारवाई होउन उमर खालीद, सफुरा झरगर, नताशा नरवाल, देवांगना कालीता सारख्या विद्यार्थी म्हणवून घेणार्‍यांना तुरूंगवासही झाला आहे. ताहिर हुसेन आणि खालिद सैफी हे दंग्याचे मुख्य सुत्रधारही म्हणून समोर आले आहेत.

सर्वौच्च न्यायालयाने आपल्या निकालाने या आंदोलनाचे समर्थन करणारे पुरोगामी होते त्यांच्यावरही थप्पड लगावली आहे. हे लोक आंदोलनाचे समर्थन करताना रस्ता रोको हा कसा मुलभूत आधिकार आहे असेही सांगत होते. पण याने सामान्य नागरिकांचे संचार स्वातंत्र्य धोक्यात आले हे ते लपवून ठेवत होते. इतकेच नाही तर देशभरात विविध ठिकाणी शाहिन बाग आंदोलन चालवताना मुख्य रस्ते कसे अडचणीत सापडतील अशीच योजना होती. पण प्रशासनाने ती हाणून पाडली. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथेच आंदोलन करण्यासाठी हे सर्व आग्रही होते. यांना आंदोलनासाठी पर्यायी जागा आझाद मैदानावर दिली तर लगेच एक दिवसांत आंदोलन गुंडाळून सर्व घरी बसले. 

सर्वौच्च न्यायालयाने अशा प्रकारे दुसर्‍यांच्या अधिकारावर आक्रमण करून आंदोलन करता येणार नाही हे स्पष्ट करून  पुरोगाम्यांना निरूत्तर केले आहे. पोलिस यंत्रणांना असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत की अशा प्रकारे कुठलेही आंदोलन रस्ते अडवून कुणी चालवत असेल तर त्याचा तातडीने निपटारा करा. त्यासाठी न्यायालयाच्या निर्देशाची वाट पाहू नका. पोलिसांचे हे कामच आहे. त्यासाठी कुणाच्या हुकुमाची आदेशाची वाट पहाण्याची गरज नाही. 

म्हणजे शाहिनबागचे समर्थक जे स्वत:ला संविधानवादी म्हणवून घेत होते, बाबासाहेबांच्या शपथा घेत होते, संविधान हातात घेवून या दादी नानींसमोर भाषणे करत होते त्या सगळ्यांना तुम्ही संविधानाचा अपमान करत अहात असे खडे बोल  न्यायालयाने सुनावले आहेत. 

आंदोलनाचा राजकीय पैलू जरा बाजूला ठेवू. यातील धार्मिक पैलूही जरा बाजूला ठेवू. आंदोलनाला पैसा कुणी पुरवला, या महिलांना खावू पिउ कोण घालत होते हा पण विषय खुप चर्चिला गेला आहे. पण स्वत:ला बुद्धिवान म्हणविणारे पत्रकार लेखक विचारवंत यांना कोणता विंचू चावला होता? यांच्या विचारात हे संविधान विरोधी विष कोणी पेरले? यांनी काय म्हणून या आंदोलनातील रस्ता आडविण्याचेही समर्थन केले? 

हे आंदोलन पोलिसांनी दिलेल्या जागेवर शांतपणे चालू राहिले असते तर त्याला एक नैतिक आधार तरी राहिला असता.  या निमित्ताने उपोषण केले गेले, निदर्शने झाली, काळ्या फिती लावल्या, मेणबत्या पेटवल्या तर समजून घेता आले असते. पण तसे झाले नाही. आंदोलन चालविणार्‍यांचे उद्देश काहीही असोत पण त्याला समर्थन देणार्‍यांनी आपली नैतिकता कुठे गहाण टाकली होती? 

24 मार्चला पहाटे आंदोलन स्थळ पोलिसांनी बुलडोझर फिरवून रिकामे केले. रस्ता मोकळा झाला. त्याचे फोटो जेंव्हा समाजमाध्यमांवर आले तेंव्हा तातडीने ते शेअर करत मी लिहीले होते, ‘शाहिनबाग तमाशा उठला, धन्यवाद कोरोना’. यावर मला वैयक्तिक पातळीवर प्रचंड प्रमाणात ट्रोल केल्या गेले. शिवीगाळ झाली. अगदी सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कानावर याची तक्रार घालावी लागली. त्यातील अनोळखी अपरिचित लोकांबद्दल माझी तशी काहीच तक्रार नाही. त्यांना मी ब्लॉकही केले. पण माझ्या अगदी परिचित असलेले लेखक विचारवंत पत्रकार मित्र मैत्रिणींचे आश्चर्य वाटते. शाहिनबाग आंदोलनाने रस्ता आडवून तमाशाच केला होता यावर आता सर्वौच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. ही मंडळी आपली बुद्धी गहाण ठेवून का बसली होती? रस्ता अडवणे हे चुक आहे. शिवाय हे आंदोलन कशासाठी? याचे कसलेच उत्तर ही बुद्धीवादी पुरोगामी मंडळी देत नव्हती. आजही देवू शकत नाहीत. सामान्य माणसांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवुन उत्तर दिले होतेच. आता न्यायालयाने अधिकृतरित्या आंदोलन चुक ठरवून याची बाजू घेणार्‍यांच्या नैतिकतेवर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. आता मात्र हे कोणीच पुढे येवून आमचे चुकले असे म्हणणार नाहीत. कारण तेवढा वैचारिक निर्लज्जपणा यांनी अंगी बाणला आहे. 

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Wednesday, October 7, 2020

माणकेश्वर मंदिरावरील अप्रतिम शिल्पाविष्कार


उरूस, 7 ऑक्टोबर 2020 

 महाराष्ट्रातील अगदी प्राचीन उत्तम शिल्पाविष्कारांनी नटलेली मंदिरे मोजायची झाल्यास एका हताची पाच बोटेही पुरेशी आहेत. अंबरनाथ बदलापुरचे शिवमंदिर, खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर, औंढ्याचे नागनाथ मंदिर, अन्व्याचे मंदिर आणि पाचवे नाव घ्यावे लागते ते माणकेश्वर (ता. परंडा  जि. उस्मानाबाद) च्या मंदिराचेच.हीच नावं का घ्यायची तर या मंदिरांच्या बाह्य भिंतींवरील (जंघा) अप्रतिम असा शिल्पाविष्कार. आणि दुसरं म्हणजे यांचे प्राचीनत्व. 

माणकेश्वर मंदिर बाराव्या शतकांतील आहे. औरंगाबाद उस्मानाबाद रस्त्यावर कुंथलगिरीपासून उजव्या हाताच्या रस्त्याला वळलो की डोंगररांगांतून एक छानसा रस्ता जातो. टेकड्या हिरवळ तळे असा निसर्गसुंदर परिसर. या रस्त्याने भूम पर्यंत गेल्यावर तेथून 11 किमी दक्षिणेला माणकेश्वर गाव आहे. विश्वकर्मा नदीच्या चंद्राकृती वळणावरची नयनरम्य जागा शोधून या मंदिराची उभारणी केल्या गेली आहे.


एका उंचपीठावर तारकाकृती अशी मंदिराची रचना आहे. पायर्‍या चढून मुखमंडपाकडे गेल्यावर तेथून संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा पथ आहे. मंदिराच्या मुखमंडपातून आत शिरल्यावर मुख्यमंडप लागतो. त्याच्या मध्याशी चौकोनी अशी रंगशीळा आहे. या मंडपाला 20 सुंदर स्तंभांनी तोलले आहे. यातील चार प्रमुख स्तंभांवर अप्रतिम असे कोरीवकाम आढळते. होयसळेश्वर मंदिरावर आढळून येणारे अतिशय बारीक असे कोरीवकाम या स्तंभांवर आहे. सोन्याच्या बांगड्यांवर ज्या पद्धतीने नक्षीकाम केलेले आजकाल दिसून येते त्याचे नमुने माणकेश्वर मंदिरावरच्या खांबांवर आढळून येतात. यातील  नक्षीकामात कोरलेले मणी तर इतके बारीक आणि सुंदर आहेत ते दगडाचे आहेत म्हणून नसता मोत्याचेच वाटावेत असे सुबक आणि सुंदर आहेत. 


माणकेश्वर मंदिराचे सगळ्यात मोठे आणि वेगळेपण त्याच्या गर्भगृहाच्या द्वारशाखेत आहे. डॉ. गो.ब.देगलुरकरांसारख्या अभ्यासकांने हे वेगळेपण नोंदवून ठेवले आहे. गर्भगृहाच्या चौकटीवर कोरीवकाम केलेली पट्टी असते. ही सहसा तीन किंवा चार या प्रमाणात असते. म्हणजे एक पट्टी फुलांची नक्षीची, त्यामागे दुसरी पट्टी पानांची, तिसरी पट्टी नृत्य करणार्‍या स्त्री पुरूषांची. पण हे एकमेव असे मंदिर महाराष्ट्रात आढळले आहे जिथे एक दोन नव्हे तर सात द्वारशाखा आहेत. 

मंदिराचा बाह्यभाग अप्रतिम अशा सुरसुंदरींच्या शिल्पांनी व इतर देवतांच्या शिल्पांनी नटलेला आहे. सगळ्यात खालचा नक्षीचा थर हा गजथर आहे. याच्यावरती नरथर म्हणजेच स्त्री पुरूषांचा गायन वादन करणार्‍यांचा आहे. 


मंदिरावर बाह्य भागात एकूण 109 सुंदर मुर्ती आहेत. आतील मुर्तींची संख्या गृहीत धरल्यास एकूण 347 मुर्ती अभ्यासकांनी नोंदवल्या आहेत. वीणा वादन करणारी सरस्वती, बासरी वाजविणारा कृष्ण, मृदंग वाजविणारी सुंदरी, चतुर्भज दोन हातात घंटा असलेली नृत्य मुर्ती, तंतुवाद्य वाजविणारी सुंदरी, डमरुधारी शिव असे संगीतविषयक संदर्भ असलेली शिल्पे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जातात. केवल शिव, ऐरावतधारी इंद्र, ब्रह्मदेव, लक्ष्मी या मुर्तीही मंदिराचे वैशिष्ट्य आहे. हरिहर म्हणजेच विष्णु आणि शिव यांची संयुक्त मुर्ती. अशी मुर्ती माणकेश्वर मंदिरावर आढळून आली आहे.


मंदिराच्या समोर एका मंडपाचा चौथरा दिसून येतो. त्यावरचा अप्रतिम असा गजथर अजूनही शाबुत आहे. पण बाकी मंडप कोसळलेला आहे. इथे सध्या एक नंदी ठेवलेला आढळतो. मंदिराला मकरप्रणाल (गाभार्‍यातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्याची जागा) आहे. त्यावर दोन निष्कर्ष निघतात. एक तर या मंदिराचा कालाखंड मध्ययुगाच्या मागे जातो. दुसरं म्हणजे हे शिव मंदिर नसून विष्णु मंदिर असण्याची जास्त शक्यता आहे. कारण शिवमंदिराला गोमुख असते. (अर्थात या सगळ्यांना अपवाद आहेत. यावर विविध तज्ज्ञांनी आपली मते नोंदवून ठेवली आहेत.) 


अणदुरच्या शिलालेखात या मंदिराला अनुदान दिल्याचा संदर्भ सापडलेला आहे. त्यावरून याचा कालखंड 12 व्या शतकातला असल्याचे सिद्ध होते. 

मंदिर त्रिदल पद्धतीचे (तीन गर्भगृह असलेले) आहे. ही पद्धत मराठवाड्यात मंदिर शैलीतील विकसित अशा कालखंडातील मानली जाते. 

या सुंदर प्राचीन अद्वितीय शिल्पसौंदर्याने नटलेल्या मंदिराच्या बाजूलाच नविन झालेले सटवाईचे मंदिर आहे. इथे लहान मुलाचे जावळं काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. मंदिराच्या परिसरांतच बोकड कापल्या जातो. सगळा परिसर त्याने अस्वच्छ होतो. माणकेश्वर मंदिराच्या परिसरांत प्राचीन मुर्तींचे अवशेष आढळून येतात. मंदिरासमोरचा सभामंडप आहे तेथे मोठा शिल्पाविष्कार एकेकाळी असावा. त्याचे अवशेष अजूनही आजूबाजूला सापडतात. तेंव्हा हा सगळा परिसर संरक्षीत करण्याची नितांत गरज आहे.

बाजूच्या सटवाई मंदिराला वेगळी संरक्षक भिंत करून त्याचा परिसर वेगळा केला पाहिजे. नदीच्या काठावर सुंदरसा घाट बांधून या परिसराला रम्य बनवता येईल. आम्ही जेंव्हा सुदाम पाटील, सरपंच विशाल अंधारे,  भाजप जिल्हाध्यक्ष माझे मित्र नितीन काळे  या प्रतिष्ठीत लोकांशी बोललो तेंव्हा त्यांनी यासाठी अनुकुलता दाखवली. अशी पुरातन मंदिरे हा फार मोठा ऐतिहासिक मोलाचा ठेवा आहे. तो आपण जतन करायला पाहिजे. अशी मंदिरे आज बांधता येत नाहीत. तर निदान त्यांचे जतन तरी काळजीपूर्वक केले पाहिजे.

(या लिखाणासाठी माया पाटील शहापुरकर, डाॅ. गो.ब. देगलुरकर, डाॅ. प्रभाकर देव यांच्या पुस्तकांतून संदर्भ घेतले आहेत. त्यांचे आभार)

(छायाचित्रे सौजन्य Akvin Tourism) 

    

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Monday, October 5, 2020

सिमेंटने गिळले अंभईचे प्राचीन मंदिर


उरूस, 5 ऑक्टोबर 2020 

जून्या मंदिरांबाबत दोन मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एक तर उद्ध्वस्त प्राचीन मंदिरांचे अवशेष इततस्त: विखुरलेले असतात. यातील काही दगड लोकांनी सरळ उचलून नेले आणि त्यांचा वापर घरगुती कामांसाठी (धुणे धुण्यासाठी) केला किंवा बिनधास्तपणे बांधकामांसाठी त्यांचा वापर केलेला दिसून येतो. तर काही ठिकाणचे दगड दुसर्‍याच मंदिराच्या बांधकामासाठी वापरले (बीडच्या कंकालेश्वराचे मोठे ठळक उदाहरण आहे).

दुसरी विचित्र अडचण अशी आहे की जिर्णोद्धार करण्याच्या नावाखाली अशा मंदिरांची नविन पद्धतीने सिमेंट वीटांत बांधणी केली जाते. त्यात पुरातन अवशेष नष्ट होतात. त्यांची हेळसांड होते. सौंदर्यदृष्ट्याही हा जोड विजोडच ठरतो. महत्त्वाचे म्हणजे मंदिरांवरची नक्षी छोटी शिल्पे त्या द्वारे सांगितलेली गोष्ट त्यातील गुढ अर्थ याची अपरिमित हानी होते. काही ठिकाणी जून्या दगडी मंदिराला रंग/वॉर्निश फासून विद्रूपता आणली गेली आहे. 

अंभई (ता. सिल्लोड. जि. औरंगाबाद) येथील प्राचीन वडेश्वर शिव मंदिराबाबत दुसर्‍या प्रकारची अडचण आहे. 

डॉ. देगलुरकर, डॉ. प्रभाकर देव सारख्या विद्वानांनी या प्राचीन मंदिराचे महत्त्व आपल्या ग्रंथांत संशोधन प्रकल्पांत नमुद केले आहे. यावर सविस्तर लिहून ठेवले आहे. हे मंदिर बहुतांश उद्ध्वस्त झाले होते. मुळ पाया मातीत बुजून गेलेला होता. मुखमंडप आणि मुख्य मंडप कधीच नष्ट झाले होते. तिन गर्भगृहे आणि त्यांच्या बाह्य भिंती तेवढ्या शाबुत होत्या. शिखरेही ढासळलेली होती. गावकर्‍यांनी मंदिराचा जिर्णाद्धार करताना सिमेंटचे बंदिस्त सभागृह समोर बांधले. त्यांचा हेतू आणि तळमळ गैर नव्हती. पण त्यामुळे मंदिराचे मुळ रूपच नष्ट झाले. 

मराठवाड्यात एक गर्भगृह असलेली मंदिरे अकराव्या शतकातील अगदी मोजकीच अशी आहेत. त्यानंतर तिन गर्भगृह असलेली त्रिदल मंदिर शैली विकसीत झाली. अशा दुर्मिळ प्राचीन मंदिरापैकी एक म्हणजे वडेश्वरचे हे शिव मंदिर. 


मंदिराच्या तिन्ही गर्भगृहांवर अप्रतिम असे कोरीव काम आहे. मुख्य गर्भगृहात महादेवाची पिंड आहे. चार पद्धतीच्या द्वारशाखा आढळून येतात. मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर किर्तीमुख आहे. ललाटबिंबावर गणेशाची मुर्ती कोरलेली आहे. चालुक्य शैलीचे या गर्भगृहाचे छत आहे. गर्भगृहाच्या अंतराळात देवकोष्टके आहेत. (अंतराळ म्हणजे मुख्य मंडप आणि गर्भगृह यांना जोडणारी जागा.) यात ब्राह्मी, सरस्वती, वैष्णवी यांच्या मुर्ती आहेत. हे मंदिर बाराव्या शतकातील आहे. 


डॉ. देगलुरकरांनी यातील एका विष्णु मुर्तीचा विशेष असा उल्लेख केला आहे. विष्णुची जी विविध नावे आहेत त्याप्रमाणे त्या त्या पद्धतीच्या मुर्ती मंदिरावर कोरलेल्या असतात. यातील उपेंद्र नावाने ओळखली जाणारी अतिशय दुर्मिळ अशी मुर्ती या मंदिरावर आढळून आली आहे. मुख्य गर्भगृहाच्या ललाटबिंबाच्या वर मध्यभागी ही उपेंद्र विष्णुची मुर्ती आहे. उपेंद्र मुर्तीची वैशिष्ट्य म्हणजे वरच्या उजव्या हातात गदा, खालचा उजवा हात वरदमुद्रेत, वरच्या डाव्या हातात चक्र आणि खालच्या डाव्या हातात पद्म असते. 


या मंदिरातील काही मिथून शिल्पे परिसरात मातीत पडली आहेत. मुख्यमंडपाचे काही अवशेषही तसेच इतस्तत: विखुरले आहेत. मुख्य गर्भगृहासमोर नंदी नाही. तो मंदिराबाहेर एका वेगळ्याच चौथर्‍यावर दिसतो आहे. लक्षात असे येते की हे मंदिर मुलत: शिवाचे असण्याची शक्यता नाही. ते देवीचे असावे किंवा विष्णुचे. (असे बहुतांश मंदिरांच्या बाबत झाले आहे. आक्रमणाच्या भितीने मुख्य मुर्ती हलवल्या गेली. कालांतराने तेथे घडविण्यास सोपी असलेली महादेवाची पिंड बसविण्यात आली.)   


मंदिराचा परिसर गावकर्‍यांनी स्वच्छ ठेवला आहे. मंदिरासमोर आणि बाजूला पेव्हर्स ब्लॉक बसवून त्यांनी जमिन समतल केली आहे. पण मागचा भाग व आपण प्रवेश करतो त्याची विरूद्ध बाजू मात्र अजूनही खराबच आहे. त्याच ठिकाणी शिल्पं विखुरलेली आहेत. 


जून्या मंदिरांचे जतन चांगल्या पद्धतीने कसे करता येवू शकते याचे तीन नमुने याच मराठवाड्यात समोर आहेत. अन्वा  (ता. भोकरदन जि. जालना) येथील मंदिराचा जिर्णोद्धार पुरातत्त्व विभागाने चांगल्या पद्धतीने केला आहे. सर्व परिसरांत दगडी फरशी बसवली आहे. आधारासाठी लोखंडी खांब उभे केले आहेत. निखळलेले दगड नीट बसवले आहेत. जिथले दगड सापडत नाहीत तिथे त्याच आकारात नविन दगड तासून बसवलेले आहेत. (पुरातत्त्व खात्यानेच गडचिरोली येथील मार्कंडा मंदिराचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालविले आहे. अंबाजोगाई जवळ धर्मापुरी येथील मंदिराचे कामही याच खात्याने चांगले केले आहे.)

दुसरे अतिशय चांगले काम इंटॅक्ट या देश पातळीवरील नावाजलेल्या संस्थेने होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथे केले आहेत. दोन मंदिरांचा जिर्णोद्धार अतिशय शास्त्रीय पद्धतीने एक एक दगड हुडकून त्याची जागा शोधून तिथे तो बसवून करून दाखवला आहे. 

तिसरे काम जामखेड (ता. अंबड, जि. जालना) येथील खडकेश्वर शिव मंदिराबाबत गावकर्‍यांनी करून दाखवले आहे. साध्या दगडी घोटीव दगडांव बाह्य भिंत उभारून मंदिर सावरून धरले आहे. 

कुठल्याही जून्या मंदिराचे काम करावयाचे असल्यास कृपया त्या विषयातील तज्ज्ञांना विचारून करा. सिमेंट वीटांचा वापर करून रसायनिक रंग दगडांना फासुन विद्रुप करू नका. काहीच जमणार नसेल तर जसे आहे तसेच ठेवून किमान जागेची स्वच्छता आणि जवळपास विखुरलेले दगड शिल्पं एका ठिकाणी आणून ठेवले तरी पुरे. जनावरे येवू नयेत म्हणून जागेला संरक्षक असे तारेचे कुंपण घालण्यात यावे. तातडीने इतके तरी काम करा. शिवाय गावात इतरत्र आढळून येणारी शिल्पे कोरीव दगड मंदिर परिसरांत आणून ठेवा. 

दृश्य स्वरूपात जी मंदिरे किमान अस्तित्वात आहेत ज्यांचा अभ्यास झाला आहे अशा 11 व्या ते 14 व्या शतकांतील महाराष्ट्रातील 93 मंदिरांची यादी डॉ. गो.ब. देगलुरकरांनी आपल्या ग्रंथात दिली आहे. या शिवाय मराठवाड्यातील अगदी किमान अवशेष सापडले अशी ठिकाणे शोधून त्यांची एक यादी डॉ. प्रभाकर देव यांनी दिली आहे. अशी 114 ठिकाणं/ मंदिरे आहेत. आपआपल्या गावांत अशी पुरातन मंदिरे अवशेष कोरीव दगड वीरगळ, सतीचे दगड काही आढळूनआले तर आम्हाला जरूर कळवा. त्यांची छायाचित्रे पाठवा. संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिरांचा कोश तयार करण्याची गरज आहे. या कामासाठी सहकार्य करण्याचे विविध संस्था/ व्यक्तींनी मान्य केले आहे. त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू या. हे काम संपूर्ण महाराष्ट्रात करावयाचे आहे. माझ्या स्वत:च्या मर्यादांमुळे सध्या मी मराठवाड्यात फिरतो आहे. पण तशी प्रदेशाची मर्यादा या कामाला नाही.    

(छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)

    

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575