उरूस, 12 ऑक्टोबर 2020
ं2014 च्या लोकसभा निकालानंतर विरोधी पक्षाचे संख्येच्या दृष्टीने लोकसभेत खच्चीकरण झाले. याचा इतर माध्यमांनी इतका धसका घेतला की आता मोदी-भाजप-अमित शहा यांना राजकीय विरोध कसा करायचा? याची चिंता त्यांना सतावत राहिली. विरोधीपक्ष नेतेपदही मिळू नये इतका संख्येच्यादृष्टीने विरोधी पक्ष कमकुवत असणे हे काही नविन नव्हते. पहिल्या पाच सार्वत्रिक निवडणुका अशा होत्या की त्यात सत्ताधार्यांशिवाय संख्येने कुणीच मोठं नव्हते. त्यामुळे विरोधीपक्ष नेता हे पदच मुळात आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकांत पहिल्यांदा निर्माण झाले. पूर्वी हे पद होते पण त्याला मंत्र्याचा दर्जा आणि इतर सोयी सवलती देण्याची व्यवस्था पहिल्यांदाच जनता राजवटीत करण्यात आली. कारण पहिल्यांदाच विरोधी पक्ष इतका मजबूत झाला होता. तेंव्हा ‘लोकशाही मेलीच आता काही खरे नाही’ अशी ओरड करणारे ढोंगीपणा करत आहेत. (परत 1984 च्या निवडणुकांत विरोधी पक्ष संख्येच्या दृष्टीने सफाचाट झाला होता)
या वातावरणात राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या इतर चळवळीतल्या व्यक्ती हुडकून त्यांना अप्रत्यक्षपणे मोदी विरोधात विरोधी आवाज म्हणून मोठं करायला माध्यमांनी सुरवात केली. याचे ठळक उदाहरण म्हणजे कन्हैय्या कुमार. जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थी संसदेत निवडून आलेला अध्यक्ष इतकीच खरे तर त्याची ओळख. पण माध्यमांनी मोदी भाजप विरोधातील बुलंद तरूण आवाज अशी त्याची संभावना करून त्याला देशपातळीवरचे नेतृत्व जवळपास बहालच करून टाकले.
त्या पूर्वी आण्णांच्या आंदोलनातून अरविंद केजरीवाल पुढे आले होते. त्यांच्या बाबतीतही माध्यमांनी अशीच जास्तीची हवा तयार करून त्यांना जणू देशाचा नेताच म्हणून समोर करायला सुरवात केली होती. पण तो फुगा 2014 च्या निवडणुकांत फुटला. माध्यमे तोंडावर आपटली. केजरीवाल यांनी निदान दिल्ली राज्य जिंकून तेवढ्यापुरते आपण नेते आहोत हे सिद्ध केले. यानंतर आला तो कन्हैय्याकुमार. बघता बघता देशभर त्याचे दौरे सुरू झाले. त्याला प्रसिद्धी मिळायला लागली.
रोहित वेमुला प्रकरण असो, गौरी लंकेश यांची हत्या असो, दादरी मधील अखलाखची हत्या असो या सर्वात कन्हैय्या कुमारची वक्तव्ये त्याच्या भेटी याच्या बातम्या व्हायला लागल्या. गुजरात मध्ये उनाचे प्रकरण घडले. त्यातून लगेच जिग्नेश मेवाणी या दलित नेतृत्वाचा चेहरा पुढे आला. लगेच तिथे जावून कन्हैय्या धडकला. त्या दोघांचे फोटो माध्यमांतून चमकले. या सोबतच उमर खालीद, शेहला राशीद ही कश्मिरातील नावेही पुढे आली. अगदी अलिकडच्या काळातले शर्जील इमाम हे नाव पण असेच पुढे आणले गेलेले आहे. खालीद जिग्नेश मेवाणी एल्गार परिषदेतही हजर होते. महाराष्ट्रात अजून एक नाव सचिन माळी आणि शीतल साठ्ये या कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांचे घेता येईल. यांचा संबंध नक्षलींशी कसा होता हे सगळे समोर आले आहे.
गुजरात विधान सभा निवडणुकांत तर असे चित्र निर्माण केल्या गेले होते की जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकुर या तीन नविन चेहर्यांनी भाजपला कशी जबरदस्त टक्कर दिली आहे. गुजरात विधानसभेचे निकाल लागले. जिग्नेश मेवाणी अपक्ष म्हणून निवडून आला पण त्याशिवाय यांच्या हाताशी फार काही लागले नाही. पण तरीही ही नावं देशपातळीवर गाजती ठेवली गेली. पुढे 2019 च्या लोकसभा निवडणुका जाहिर झाल्या. एव्हाना कन्हैय्या कुमारने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सी.पी.आय.) मध्ये अधिकृत रित्या प्रवेश केला होता. लगेच त्याला पक्षाच्या केंद्रिय कार्यकारिणीत घेण्यात आले. म्हणजे एकीकडे आयुष्य पक्षासाठी चळवळीसाठी खर्च करणारे लोकं राहिले बाजूला पण कालच्या विद्यार्थी नेत्याला आज लगेच आपल्या कार्यकारिणीत पायघड्या घालून कम्युनिस्टांनी आपणही कसे प्रवाहपतीत आहोत हेच सिद्ध केले. एरव्ही हे आव मात्र असा आणायचे की पक्ष कसा केडर बेस्ड आहे, आमच्याकडे वैचारिक घुसळण कशी होते, अभ्यासू नेतृत्वच कसे समोर आणले जाते, आमच्या ज्येष्ठ नेत्यांनाही आम्ही कसे प्रसंगी बाजूला टाकत असतो (सोमनाथ चटर्जी यांचे पक्षातून निलंबन किंवा ज्योती बसू यांना पंतप्रधानपदी बसण्याची परवानगी नाकारणे किंवा सिताराम येच्युरी यांना राज्यसभा नाकारणे). पण याच कम्युनिस्टांनी कन्हैय्या इतक्या तातडीने देश पातळीवरचा नेता कसा बनला याचे मात्र उत्तर कधी दिले नाही. माध्यमांनी हे करणे आपण समजू शकतो. पण कम्युनिस्ट पक्षानेही त्याला इतक्या कमी वयात तातडीने कार्यकारीणीत कसे घेतले? याचे उत्तर कधी दिले नाही.
2019 च्या निवडणुकीत कन्हैय्याला बिहार मधून लोकसभेचे तिकीट देण्यात आले. त्या निवडणुकीच्या भरपुर बातम्या करण्यात आल्या. याचा परिणाम काय झाला ते सर्वांनाच माहित आहे. भाजप तर सोडाच तो तर जाणून बुजून विरोधात होताच. पण लालुप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही कन्हैय्याला पाठिंबा दिला नाही. उलट विरोधात उमेदवार उभा केला. शिवाय त्या उमेदवाराने कन्हैय्या पेक्षाही जास्तीची मते घेवून आपणच कसे व्यवहारिक पातळीवर बरोबर होतो हे सिद्धही केले. भाजपचे केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह प्रचंड मतांच्या फरकाने निवडुन आले.
इथे पहिल्यांदा कन्हैय्याच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. जिग्नेश मेवाणी निदान आपल्या विधानसभेत निवडून तरी आला होता. पण कन्हैय्याला तेही जमले नाही. याच काळात शेहला राशीद हीने कश्मीरमधील स्थानिक निवडणुकांतून माघार घेतली. शाह फैजल या कश्मिरी युवकाने प्रशासनातील उच्च नौकरी (आयएएस) सोडून राजकीय पक्ष काढला होता. त्यानेही आपला पक्ष गुंडाळून ठेवला आणि परत प्रशासनात जाण्याची तयारी चालवली. जिग्नेश मेवाणीचेही देश पातळीवरील दलित नेतृत्वाचे नाटक संपुष्टात आले. हार्दिक पटेल तर कॉंग्रेसमध्ये जावून प्रदेश कॉंग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष बनला. अल्पेश ठाकुरने भाजपची वाट धरली. उमर खालीदची रवानगी तुरूंगात झाली आहे.
हे सगळं परत आठवायचे कारण म्हणजे नुकतीच बिहार विधानसभेची निवडणुक गाजत असताना उमेदवारांची पहिली यादी विविध पक्षांनी जाहिर केली आहे. यातून कन्हैय्याचे नाव गळाले आहे. शिवाय त्याला निवडणुक प्रचारातही उतरविण्यास पक्ष तयार नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उमर खालीद प्रमाणेच कन्हैय्यावरही खटला चालू आहे. कधीही त्याच्यावर कारवाई होवून तुरूंगाची वारी घडू शकते.
याच्या नेमके उलट भाजपने तेजस्वी सुर्या सारख्या कन्हैय्याच्याच वयाच्या आपल्या कार्यकर्त्याला बेंगलोरमधून तिकीट दिले. तो निवडून आला. त्याला आता बिहार विधानसभा प्रचारात उतरविले आहे. पश्चिम बंगाल मध्ये निवडणुका होवू घातल्या आहेत. तिथेही तेजस्वी सुर्याने आत्तापासूनच दौरे सुरू केले आहेत. त्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी बसविण्यात आले आहे.
एकीकडे डावे पुरोगामी पक्ष आपल्याच तरूण नेतृत्वाला किमान तिकीटही द्यायला तयार नाहीत. त्याला प्रचारातही उतरवताना दिसत नाहीत. आणि दुसरीकडे ते ज्यांच्यावर टीका करतात तो भाजप कर्नाटकांतून तेजस्वी सुर्या, लदाखचा तरूण नेता जामयाग नामग्याल, महाराष्ट्रातून पुनम महाजन यांना संसदेत भाषणांसाठी पुढे करताना दिसतो आहे. केवळ संसदेतच नाही तर रस्त्यावरच्या आंदोलनातही आपले युवा नेतृत्व हा पक्ष पुढे करताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र), बिप्लबकुमार देव (त्रिपुरा) या तरूण नविन नेत्यांच्या हाती राज्याचे मुख्यमंत्रीपदही भाजपने देवून दाखवले आहे. याच्या उलट कॉंग्रेसमधील युवा नेतृत्वाचे खच्चीकरण करण्यात आले (सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे). बाकी पुरोगामी म्हणविणारे पक्षही या बाबत मागे पडलेले दिसत आहेत. डाव्या पक्षांच्या हाती कन्हैय्या सारखा चेहरा लागला होता. पण त्याच्यावरही आता न्यायालयीन कारवाईची टांगती तलवार आहे. या सोबतच माध्यमांनी जी नावे 2014 पासून पुढे केली होती ती सर्व राजकीय दृष्ट्या मागे पडलेली दिसून येत आहेत.
कन्हैय्या कुमार हा एक राजकीय बुडबुडा होता का ‘लंबी रेस का घोडा’ आहे हे येत्या काही काळात सिद्ध होईल. पण याच काळात इतर राजकीय पक्षांतून चिराग पासवान (बिहार), दुष्यंतकुमार चौटाला (हरियाणा), जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश) असे काही तरूण चेहरे समोर येत आहेत. म्हणजे भाजपेतर तरूण चेहरे परत राजकीय पक्षांतून चळवळीतूनच येत आहेत. माध्यमांनी जी एक हवा अराजकीय चळवळीतील चेहर्यांबाबत केली होती त्याची हवा गेलेली सध्या तरी दिसून येते आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575