उरूस, 3 ऑक्टोबर 2020
30 सप्टेंबरला सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल आला. बाबरी मस्जिद पाडण्याचा कट रचला होता का? हे शोधण्यासाठी हा खटला होता. एकूण 48 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरेंसह इतर 15 आरोपी आता हयात नाहीत. जिवित असलेल्या 32 जणांवर हा खटला चालू होता. या सर्वांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. आणि नेमके हेच बहुतांश पुरोगाम्यांना आवडले नाही. त्यांच्या मनासारखा न्याय आला नाही म्हणून लगेच छाती बडवून देशात आणिबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वधर्मसमभाव आता संपून गेला आहे. काळेकुट्ट पर्व देशाच्या इतिहासात चालू झाले आहे. आता एका धर्माचीच हुकुमशाही प्रस्थापित होणार वगैरे वगैरे बडबड नेहमीप्रमाणे सुरू झाली आहे.
5 ऑगस्टला राम मंदिराचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल तेंव्हा खा.असदुद्दीन ओवैसी यांनी सेक्युलर देशाचा पंतप्रधान मंदिराच्या भुमिपुजनाला जातोच कसा म्हणून मुक्ताफळे उधळले होती. त्यावर ‘बाबरा प्राण तळमळला’ असा एक लेख मी लिहीला होता. आता त्याच लेखाचा हा दुसरा भाग म्हणावा लागेल.
पुरोगामी का तळमळत आहेत? मुळात खटला हा बाबरी मस्जिद कुणी पाडली यासाठी नव्हता. कायदेतज्ज्ञांनी पण असा निर्वाळा दिला आहे की मुख्य खटला निकालात निघाल्यानंतर या खटल्याला तसा काहीच अर्थ शिल्लक राहिला नव्हता. कट सिद्ध करणारे पुरावे समोर आले नाहीत तेंव्हा न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. आता ओरड करणारे पुरोगामी असे म्हणत आहेत जर सगळेच निर्दोष असतील तर बाबरी काय आपोआप पडली का?
सत्य सगळ्यांनाच माहित आहे. हजारो वर्षांपासून आपली मंदिरे मुर्त्या यांचा नाश हिंदू समाज सहन करत आला आहे. त्याचा एक संताप त्याच्या मनात साठलेला होता. त्याची एक प्रतिक्रिया म्हणून राम जन्मभुमीचे आंदोलन उभे राहिले. तो खटला लवकरात लवकर निकाली निघाला असता तर हा विषय इतका देशव्यापी झालाच नसता. पण तेंव्हाच्या सरकारांनी आणि आपल्या न्यायव्यवस्थेने यात सातत्याने चालढकल केली. याचा परिणाम म्हणजे सहिष्णू असलेल्या हिंदूंचा कडेलोट झाला व 6 डिसेंबर 1992 ला बाबरी पडली.
इतिहासातील एक उदाहरण या संदर्भात पाहण्यासारखे आहे. शिवाजी महाराजांच्या काळात परिस्थिती अतिशय प्रतिकुल होती. राज्य करणारे जुलमी मुसलमान राज्यकर्ते तर सोडाच पण स्वकीय असलेले वतनदारही सामान्य रयतेला लुटत होते. अतिशय वाईट असा तो काळ होता. शिवाजी महाराजांनी शर्थीने स्वराज्य निर्माण केले. पण महाराजांनाही आपली कोंडी केल्या गेल्याचे पाहून सुरतेवर हल्ला करावा लागला. खरे तर त्या काळातील नियम असा होता की जी जहागीर स्त्रीच्या नावाने असते त्यावर कुणीच हल्ला करायचा नाही. याच कारणाने जिजाउ मांसाहेब या शिवनेरी किल्ल्यावर बाळंतपणासाठी जावून राहिल्या होत्या. कारण ती जहागीर त्यांच्या नावाने होती. त्यामुळे आपण सुरक्षीत असू याची त्यांना खात्री होती. तसेच सुरत ही औरंगजेबाच्या बहिणीच्या नावाने असलेली जहागीर होती. तेंव्हा त्यावर आक्रमण होणार नाही याची सर्वांना खात्री होती. पुढे अशीच स्थिती अहिल्याबाई होळकरांची होती. महेश्वर ही त्यांच्या सासुच्या नावाने असलेली जहागीर. म्हणून त्यांनी आपली राजधानी महेश्वर बनवली.
शिवाजी महाराजांनी नियम मोडून सुरतेवर हल्ला केला. महाराष्ट्राबाहेरच्या कितीतरी इतिहास लेखकांनी शिवाजी महाराजांना लुटारू संबोधले होते. अगदी पंडित नेहरूंच्या पुस्तकांतील संदर्भ पण तपासून पहा. पण महाराजांच्या सुरत लुटीचा अर्थ आपण काय लावतो? ही कृती नियम मोडून त्यांना का करावी लागली?
बाबरी पाडणे ही कृती हिंदूंनी हजारो वर्षांच्या संतापातून उत्स्फुर्तपणे केली होती. तेही पन्नास वर्षे त्या खटल्याचा निकाल लागत नाही म्हणून केली होती. आणि हे जागा रामजन्मभुमी होती म्हणून त्यावरचे बाबराचे अतिक्रमण लोकांनी पाडले. कुठली मस्जिद स्वत:च्या जागेवर उभी असलेली कधीच पाडली नाही. एकही दाखला नाही की मुळ मस्जिद पाडून मंदिर उभे केल्याचा. पण हे समजून न घेता आजही त्यावर आगपाखड करण्यात पुरोगामी धन्यता मानतात.
ज्यांच्यावर आरोप दाखल करण्यात आले ते केवळ हिंदूंच्या या भावनेला शब्दरूप देत होते इतकेच. पण मुळात ही भावना निर्माणच का झाली? बाबरी मस्जिद पाडल्यानंतर इतर कुठल्या मस्जिदीला धक्का दिला का?
ज्या गुजरात दंगलीं बाबत वारंवार ओरड आजही पुरोगामी करतात ते आधी साबरमती एक्स्प्रेस जाळली ते का सांगत नाहीत? हे केवळ भारतातच घडले असे नाही. बामियानाच्या अप्रतिम उत्तुंग बुद्धमुर्ती पाडण्यात आल्या. तालिबान्यांच्या या कृत्याबद्दल कुठलाही पुरोगामी का काही बोलत नाही?
अजून एक दुसरा संदर्भ सावरकरांचा देता येईल. गांधी हत्या कटात सावरकरांन गोवण्यात आले. तसा रितसर खटला दाखल झाला. त्यातून सावरकर निर्दोष सुटले. आता ज्यांना सावरकर दोषी आहेतच असा विश्वास होता त्यांनी या खटल्यावर वरच्या न्यायालयात का अपील केले नाही? पण तसे न करता केवळ सावरकरांवर शिंतोडे उडविण्यात आजही पुरोगामी धन्यता मानतात.
गांधी हत्येच्या कटाची माहिती सरकारला होती का? याची चौकशी करण्यासाठी कपुर आयोग नेमण्यात आला. या कपुर आयोगाचे संशोधन करून अशी माहिती सरकारला नव्हती हे सत्य समोर आणले. खरं तर आयोगाची व्याप्ती केवळ कटाची माहिती सरकारला आहे का? याचे संशोधन करण्यापुरतीच होती. पण कपुर आयोगाने कारण नसताना आपल्या अहवालात सावरकरांवर काही परिच्छेद लिहीले. आणि त्याचाच आधार घेवून ए.जी.नुरानी सारखे लेखक सावरकर दोषी आहेतच असा हट्ट आपल्याा लिखाणातून करायला लागले. आजही बहुतांश पुरोगामी नुरानींच्या पुस्तकाचा संदर्भ देत सावरकर दोषीच आहेत असा आग्रही दावा करतात. वस्तूत: सावरकर दोषी आहेत का नाहीत याचा निर्वाळा न्यायालयात झाला होता. पण तो मानायचाच नाही असा एक पुरोगामी खाक्या आहे.
आज कपुर आयोगाच्या ऐवजी सीबीआय न्यायालय आले आहे. (बाबरी मस्जिद प्रकरणी एक लिबरहम आयोग स्थापन झाला होता. त्याने १९ वर्ष लावले अहवाल सादर करायला). कपुर आयोगा सारखे आपल्या कक्षेबाहेरचा विषय घेवून त्यावर टिपणी न्यायालयाने केलेली नाही. उलट सर्व आरोपींना निर्दोष सोडून खटला निकाली काढला आहे. पण त्यावर समाधान न मानता उच्च न्यायालयात जाणार असल्याचे फिर्यादींनी सांगितले आहे. म्हणजे याचाच अर्थ हा विषय यांनाच जिवंत ठेवायचा आहे.
विरोधक असेच बिनमहत्त्वाचे मुद्दे उगाळत राहिले तर त्याचा फायदा परत भाजपला होणार आहे. काहीच न बोलता भाजपला त्यांचा हिंदूत्वाचा मुद्दा पुढे चालवता येणार आहे. भाउ तोरसेकर म्हणतात तसे मोदींच्या जाळ्यात विरोधक आपणहुन फसत आहेत. त्याला कोण काय करणार?
ने मजसी ने परत सत्ता भुमीला
बाबरा प्राण तळमळला
हे गीत गात कॉंग्रेस सारखे विरोधक तळमळत राहताना दिसत आहेत.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575