काव्यतरंग, १० जुलै शुक्रवार २०२०, दै. दिव्यमराठी
या बालांनो, या रे या !
या बालांनो, या रे या
लवकर भरभर सारे या
मजा करा रे ! मजा मजा !
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे । तोचि फसे ।
वनभूमी । दाविन मी ।
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया ॥ 1 ||
खळखळ मंजुळ गाति झरे
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुळे फळे
सुवास पसरे रसहि गळे
पर ज्यांचे । सोन्याचे ।
ते रावे । हे रावे ।
तर मग कामे टाकुनिया
नवी बघाया ही दुनिया ॥ 2 ||
पंख पाचुचे मोरांना
टिपति पाखरे मोत्यांना
पंख फडकती घोड्यांना
मौज दिसे ही थोड्यांना
चपलगती । हरिण किती ।
देखावे । देखावे ।
तर मग लवकर धावुनिया
नवी बघा या ही दुनिया ॥ 3 ||
-भा.रा.तांबे (तांबे यांची समग्र कविता, पृ. 32, व्हिनस प्रकाशन, आ.11, 2004)
तांब्यांची ही कविता प्रसिद्ध असे बालगीत आहे. पूर्वी अभ्यासक्रमात ही कविता हमखास असायची. रॉबर्ट ब्राउनिंग याच्या ‘पाईड पायपर’ या सुप्रसिद्ध कवितेचे हे भाषांतर आहे.
एक दोन नव्हे तर तब्बल 110 कडव्यांची ही कविता आहे. तांबे हे मध्य प्रदेशातील धार संस्थानचे युवराज खासेराव पवार यांचे शिक्षक म्हणून नेमले गेले होते. त्यांना शिकवत असताना ही कविता 1895 साली त्यांनी लिहीली. या कवितेतील 91,92,93 क्रमांकाची कडवी म्हणजे ही कविता.
स्वातंत्र्यपूर्व कालातील अगदी पहिल्या पिढीचे केशवसुतांचे समकालीन कवी म्हणजे भा.रा.तांबे. तांबे ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी होते. (जन्म 27 नोव्हेंबर 1874, मृत्यू 7 डिसेंबर 1941)
ही कविता बालगीत म्हणून प्रसिद्ध असली तरी बारकाईने वाचल्यास लक्षात येते की ही केवळ बालकविता नाही. लहान मुलांना अदभूताचे वेड असते. कल्पनेच्या जगात रमायला मुलांना आवडते. तसेच कलेची निसर्गाची आवड मुलांना मुलत: असतेच. आपण पुढे ‘कथित’ संस्कार करून ही आवड घालवतो.
नगरात उंदीर फार झाले. त्यावर काही उपाय सुचत नाही. तेंव्हा आपल्या बासरीच्या/पुंगीच्या नादाने उंदरांना पळवणारा एक जादूगर आहे. त्याला बोलावले तर हे उंदीर तो आपल्यामागे घेवून जाईल असे समजते. तेंव्हा गाव प्रमुख त्या जादूगाराला बोलावून आणतात. तो पुंगी वाजवून सगळे उंदीर आपल्या मागोमाग घेवून जातो. नदीच्या काठावर जो जातो आणि त्याच्या इशार्यावर सर्व उंदीर नदीत उडी मारतात. मग हा जादूगार आपली बिदागी गावाला मागतो. त्याने मागितलेली रक्कम देण्यास गाव कां कू करते. उंदीर तर मेले आता कशाला याला पैसे द्यायचे. हे समजल्यावर तो जादूगर रागाने निघून जातो पण जाताना आपल्या पुंगीच्या नादात गावातील सगळ्या मुलांना मोहित करून घेवून जातो. अशी ही कथा आहे.
ताब्यांनी ही कविता मराठीत आणताना महेश्वर हे अहिल्याबाईंचे राजधानीचे किल्ला मंदिरे नदीवरील घाट असलेले सुंदर शहर, खळखळा वाहणारी नर्मदा नदी असे सगळे संदर्भ घेतले आहेत. या कवितेतील हा छोटासा तुकडा आहे.
ही कविता मोठ्यांसाठी पण आहे. किंबहुना ही मोठ्यांसाठीच आहे. आज आपण लहान मुलांना शिक्षण म्हणजे चार भिंतीत कोंडून ठेवतो. तसं न करता त्यांना निसर्गाच्या जवळ नेल्यास खुप शिकवता येते. म्हणूनच पहिल्या कडव्यात शब्द येतात, ‘स्वस्थ बसे । तोची फसे। वनभुमी । दाविन मी।’. व्यंकटेश माडगुळकर यांची ‘शाळा’ नावाची फार अप्रतिम अशी कथा आहे. मुले शाळेला जाण्यासाठी निघतात आणि दप्तरं नदीकाठी झाडाखाली झुडपात वाळूत पुरून ठेवतात. दिवसभर रानात हिंडतात. हवं ते खातात. नदीत डुंबतात. निसर्गाच्या बिनभींतीच्या शाळेतच खुप काही शिकतात. भिंतीच्या शाळेत जातच नाहीत. संध्याकाळी दिवस मावळताना दप्तरं शोधून परत घराकडे फिरतात अशी ही गोष्ट आहे.
दुसर्या कडव्यात तांब्यांनी निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे. मंजूळ गाणारे झरे आहेत, पाखरे गोड आवाजात किलबिल करत आहेत, फुले फुलली आहेत, फळं रसाळ पिकली आहेत, या सगळ्याचा एक सुवास सर्वत्र भरून राहिला आहे. फळं इतकी पिकली आहेत की त्यांतून रस गळत आहे. आणि हे सगळं का आहे तर तिथे माणसाने कसलाही हस्तक्षेप केला नाही. सध्याच्या कोरोनाच्या काळात वाहने कमी झाली, त्यामुळे प्रदुषण कमी झाले, हवा शुद्ध झाली पाखरांचे आवाज घराघरांत ऐकू येवू लागले आहेत.
तिसर्या कडव्यांत मुलांना आवडणार्या अदभूत रसात भिजलेले वर्णन आहे. मोरांना पाचुंचे पंख आहेत, पाखरे दाणे नाही तर मोती टिपत आहेत, घोडे पंख लावून उडत आहेत.
मोर नेहमी मानवी वस्तीजवळ राहतो. अजिंठ्याच्या डोंगरात वाडीच्या किल्ल्याजवळ एका झोपडीच्या अंगणात अगदी पोज देवून नाचणारा मोर आम्ही बधितला होता. अगदी जवळ जावून त्याचे फोटो काढता आले. त्या झोपडीत राहणार्याला विचारले तेंव्हा कळले की कोंबडीच्या अंड्यासोबतच हे मोराचे अंडे उबवल्या गेले. कोंबडीच्या पिल्लांसोबतच हे मोराचे पिल्लू वाढले. तेंव्हा आता ते इतर कोंबड्यांसारखेच त्या मालकाच्या झोपडीच्या जवळपास खेळत असते. मोर पाळायची हीच पद्धत आहे. मोराचे अंडे कोंबडीच्या अंड्यांसोबत उबवले जाते. माणसाने निसर्गाच्या जवळ जायला शिकले पाहिजे.
तांबे या नगराला लागूनिया सुंदर ती दुसरी दुनिया म्हणतात त्याचा अर्थ इतकाच की आपल्या या व्यवहारी जीवनाला लागूनच आनंदाचा ठेवा असणारे एक जग आहे. त्यासाठी आपण आपली सर्व व्यवधाने विसरून तिथे गेले पाहिजे. ‘तर मग कामे टाकूनिया’ हे म्हणण्या मागे हाच अर्थ दडला आहे.
निसर्ग, कला यांचे जग आपल्या व्यवहारी जगाला खेटूनच असते. पण आपण तिथपर्यंत पोचत नाही. एक अदृश्य अशी भिंत आपण उभी केलेली आहे. या व्यवहारी तटबंदीत बाहेरून कुणी येवू शकत नाही अशी तजवीज आपण करतो पण सोबतच आपणही बाहेर पडत नाही. परिणामी आनंदाच्या एका मोठ्या ठेवल्याला आपण मुकतो.
राजशेखर रेड्डी याचा एक फार सुंदर शेर आहे.
मेरे दिल के किसी कोने मे एक मासुम सा बच्चा
बडों की देखकर दुनिया बडा होने से डरता है ।
आणि इथे तर तांबे या आपल्या मनात दडलेल्या लहान मुलाला ‘या बालांनो या रे या’ म्हणून बाहेर बोलावत आहेत. या व्यवहाराच्या नगराला लागून जी दुसरी सुंदर दुनिया आहे तिच्यात खेळायला बोलावत आहेत.
शतकोत्तर रौप्यमहोत्सव (125 वर्षे) वय असलेली ही कविता. रॉबर्ट ब्राउनिंगने दुसर्या भाषेत दुसर्या प्रदेशात वेगळ्या काळात लिहीली ही कविता. आज इतक्या वर्षांनी आपल्यापर्यंत हीच्यातील भाव सहज पोचतो आहे. अगदी एक शब्दही शिळा झालेला नाही. ही ताकद आहे ब्राउनिंगच्या आणि भा रा तांब्यांच्या प्रतिभेची.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575