उरूस, 11 जून 2020
जम्मु कश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लारकीपुरा-लोकबावन गावचा सरपंच अजय पंडिता याची दहशतवाद्यांनी 8 जून रोजी निघ्रृण हत्या केली. आज याला 3 दिवस उलटून गेले आहेत. काही इंग्रजी वाहिन्यां व्यतिरिक्त याची बातमी तूम्ही कुठे वर्तमानपत्रांत वाचली का? या बाबत सविस्तर काही वाचायला मिळालं का?
याच्या नेमके उलट ही घटना बघा. या घटनेच्या दहा दिवस आधी जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा अमेरिकेत पोलिस कस्टडीत मृत्यू झाला. लक्षात घ्या हा मृत्यू भारतात झाला नाही अमेरिकेत झाला. जॉर्ज हा कोणी संत महात्मा समाजसेवक देशभक्त नव्हता. जॉर्ज एक सामान्य कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिक होता जो 20 डॉलरची खोटी नोट खपवून वस्तू खरेदी करताना पोलिसांकडून पकडला गेला. म्हणजे तो गुन्हेगानी प्रवृत्तीचा होता हे सिद्ध होते. त्याला पोलिस पकडून नेत होते. त्या वेळी झालेली झटापट त्याच्या जीवाशी आली. पोलिसांनी त्याच्यावर ज्या पद्धतीनं शारिरिक अत्याचार केले त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा इतका गवगवा करण्यात आला. अमेरिकेत तर प्रचंड हिंसाचारच उसळला. 40 शहरांत संचारबंदी लावण्यात आली.
अमेरिकेचे ठिक आहे. गुन्हेगार असला तरी जॉर्ज हा कृष्णवर्णीय होता म्हणून ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ अशी चळवळ तिथे उभी राहिली. पण जॉर्जसाठी भारतातील पुरोगामी का छाती बडवायला लागले? अशी सरकार विरोधी निदर्शने भारतातही झाली पहिजे असले ट्विट का करायला लागले? त्यावर भारतात लेख छापून यायला लागले. (अगदी आज 11 जूनला सुहास पळशीकर यांनी इंडियन एक्स्प्रेस मध्ये लिहीलं आहे. जरूर वाचा.)
मग माझ्यासारख्याला साधा बाळबोध भाबडा प्रश्न पडतो जॉर्ज सारख्या गुन्हेगारासाठी तूमच्या डोळ्यात पाणी येतं, तूमच्या लेखणीला पाझर फुटतो तर मग अजय पंडिता या कश्मिरी हिंदूसाठी का नाही? त्यानं आपल्या नावात बदल करवून आडनाव भारती असे घेतले होते. हा तर अस्सल देशभक्त होता ना.
जॉर्ज तर गुन्हेगार होता पण अजय लोकनियुक्त सरपंच होता. 370 कलम हटल्या नंतर कश्मिरमध्ये जी शांततेची प्रक्रिया सुरू झाली, ग्राम पातळीवर जनजीवन सामान्य करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले त्यात सक्रिय मदत करत होता. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात ग्राम पंचायतीला निधी दिला. अजय पंडिता हा अशा निधीचा वापर आपल्या गावात करून रस्ते, पुल, पाणी पुरवठा, ग्राम स्वच्छता, शौचालये, फळझाडांची लागवड आदी कामे गावपातळीवर निष्ठेने करत होता.
लोकशाही गावपातळीवर सुरळीत चालू आहे, लोकांची कामे होत आहेत, जनजीवन पूर्वपदावर येत आहे हे पाहून पाकप्रेरीत दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांची हत्या करायला सुरवात केली. त्यातील पहिला बळी अजय पंडिता हा आहे. हा अजय पंडिता जो की विस्तापित कश्मिरी पंडित होता आपल्या गावाकडे जावून लोकशाही प्रक्रियेत भाग घेवून एक प्रकारे देशासाठी लढत होता. मग याची दहशतवाद्यांनी हत्या केली ही बातमी माध्यमे का दाबून टाकतात?
कुणाही हिंदूंची हत्या झाली की त्याचा संबंध भाजपशी जोडण्याची एक विलक्षण कला जमात-ए-पुरोगामी यांनी आत्मसात केली आहे. अजय पंडिता बाबत इथेही त्यांची प्रचंड गोची झाली. हा चक्क कॉंग्रेसचा कार्यकर्ता होता. कॉंग्रेस कडूनच त्याने निवडणुक लढली होती व तो सरपंच बनला होता. त्याची मुलगी शीन हीने आपल्या दु:खाला आवर घालत मोठ्या हिंमतीने टाईम्स नॉउ या वाहिनीवर मुलाखत दिली. तिनेच ही बाब सांगितली की माझे बाबा कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. माझे वडिल देशासाठी काम करत होते. ते कुठल्याच जाती धर्म पंथापुरता संकुचित विचार करत नसत. त्यांच्या नावामागे शहिद हुतात्मा ही पदवी लागली याचा मला अभिमान आहे. तिच्या या वाक्याने देशभर ही मुलाखत ऐकणार्या भारतियांच्या अंगावर काटा आला. डोळ्यात पाणी तरळले.
आश्चर्य म्हणजे आज तीन दिवस उलटून गेल्यावरही एकाही कॉंग्रेस नेत्याने याची दखल घेतली नाही. जम्मु कश्मिरमधील चीनच्या कथित घुसखोरीवर शेरोशायरी करत अर्धवट माहितीवर आधारीत ट्विट करणार्या राहूल गांधींना त्याच कश्मिर मध्ये आपल्याच कार्यकर्त्या सरपंचाची हत्या दहशतवाद्यांनी केल्याची दखल घ्यावी वाटली नाही. प्रवासी मजदूरांसाठी खोटे अश्रु ढाळणार्या सोनिया गांधींचा एकही अश्रू आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याच्या हत्येवर ढळत नाही, खोट्या बसची रांग स्थलांतरीतांसाठी उभी करणार्या प्रियंका गांधी अजेय पंडिताच्या हत्येनंतर त्या कुटूंबाच्या पाठीशी उभे असलेल्या दिसत नाहीत. (या कुणाचे ट्विट नजरेस आढळले तर मला जरूर सांगा. उमेश कुलकर्णी यांनी माझ्या निदर्शनात राहूल गांधी यांचे या घटने बाबतचे ट्विट आणून दिले.)
अमेरिकेतील गुन्हेगाराच्या पोलिस हिरासतीमधील मृत्यूवर मातम करणारे आपले पुरोगामी अस्सल देशभक्त असलेल्या अजय पंडिताची हत्या मात्र विसरू पहातात ही मोठी शोकांतिका आहे.
भारतात बसून अमेरिकेतील ब्लॅक लाईव्हज मॅटर चळवळीची भलामण करत असताना कश्मिर मधील भारतीय लाईव्हज मॅटर असलं काही असू शकतं याचा विचार करत नाहीत. गेल्या आठवड्यात 14 आतंकवाद्यांना भारतीय सैन्याने धारातीर्थी केले आहे. जबरदस्त योजना आखून आतंकवाद्यांची पाळेमूळे खणून काढली जात आहेत. यामुळे पाकशिक्षीत दहशतवाद्यांमध्ये विलक्षण खळबळ उडालेली दिसून येते आहे. याचाच पुरावा म्हणजे अजय पंडिताची झालेली हत्या.
एकाही वृत्तपत्राने अजय पंडिताच्या हत्येची दखल ठळकपणे दिली नाही (अपवाद लोकसत्ताच्या १० जूनच्या अग्रलेखाचा). स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. विधान सभेच्या निवडणुकाही आता होणार आहेत. सामान्य जनतेने या लोकशाही प्रक्रियेत भाग घेवू नये. कारण जर मोठ्या प्रमाणात मतदान झाले तर आपोआपच भारताला असलेला सामान्य नागरिकांचा पाठिंबा जगाला दिसेल. आणि आपली अजूनच नाचक्की होत जाईल याची आतंकवाद्यांना खात्री आहे.
जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्युचे दु:ख एक मानवतावादी म्हणून कुणाही माणसाला आहेच. पण एक लोकनियुक्त सरपंच एक सच्चा देशप्रेमी देशभक्त असलेल्या अजय पंडिता भारतीच्या हत्येची वेदना प्रचंड मोठी आहे. या वीर हुतात्म्याच्या आत्म्याला शांती भेटो. अश्रुपूर्ण श्रद्धांजली !
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575