उरूस, 7 मे 2020
जंगल भागात सशस्त्र क्रांतीने व्यवस्थेविरूद्ध लढणारी चळवळ म्हणजे नक्षलवाद. या नक्षलवादाला गेली दहा वर्षे सुरक्षा यंत्रणांनी बर्यापैकी नियंत्रणात आणले आहे. नाकेबंदी झाल्यावर हाच नक्षलवाद शहरी भागात सामाजिक चळवळींच्या माध्यमांतून पसरविण्यात आला. याला शहरी नक्षलवाद असे संबोधले जाते. कायद्याचा मजबूत फास आता या शहरी नक्षलवाद्यांच्या गळ्याशी आवळला गेला आहे. नुकतेच अटक करण्यात आलेले गौतम नवलखा व आनंद तेलतुुंबडे ही त्याचीच उदाहरणे.
आता यानंतर नक्षलवाद वेगळ्याच अंगाने समार येताना दिसतो आहे. त्याचा पहिला ठळक पुरावा 5 मे 2020 ला दुपारी 2.24 मि. राहूल गांधी यांनी केलेल्या ट्विटरवरून प्राप्त होतो. 370 कलम हटविल्यानंतर कश्मिर मधील जनजीवनाबाबतचे केलेल्या छायाचित्रणासाठी यासिन दार, मुख्तार खान आणि चन्नी आनंद या तिघांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित केल्या गेले. राहूल गांधी यांनी तातडीने यांचे अभिनंदन केले.
जे लोक यांचे अभिनंदन करत आहेत आणि या फोटोंची दखल मोठ्या प्रमाणात घेत आहेत त्यांनी हे फोटो कलात्मक दृष्ट्या श्रेष्ठ आहेत का हे सांगावे.
पहिली बाब म्हणजे हे फोटो सामान्य दर्जाचे आहेत. मग यांना पुरस्कार का मिळाला? आणि देणार्या संस्थेचा जो काही अजेंडा असायचा तो असा पण त्यांचे आपण का कौतूक करायचे?
राहूल गांधी यांनी तातडीने अभिनंदनाचे ट्विट केले. त्यांना अजूनही पालघरच्या झुंडबळींची दखल घ्यायला वेळ मिळाला नाही. ज्या कश्मिरच्या छायाचित्रांसाठी हा पुरस्कार आहे त्याच कश्मिर मध्ये रियाझ नायकू या आतंकवाद्यांचा नायनाट आपल्या जवानांनी केला. राहूल गांधींना जवानांचे कौतूक करायला वेळ नाही. आणि या छायाचित्रकारांच अभिनंदन करायची मात्र मोठी हौस.
दुसरी बाब म्हणजे हे फोटो तर सरळ सरळ भारत विरोधी आहेत. एकात पाकिस्तानचा झेंडा फडकवणारे नागरिक आहेत, दुसर्यात स्वतंत्र कश्मिरचा फलक दिसतो आहेत आणि तिसर्यात पोलिसांच्या व्हॅनवर लाथ मारणारा कश्मिरी दिसतो आहे. मग या छायाचित्रांचे एक सच्चा भारतिय म्हणून मी कौतूक का करू?
यातील एक छायाचित्रकार (यासीन दार) कश्मिरचा उल्लेख ‘इंडिया कंट्रोल्ड कश्मिर’ असा करतो. जे कुणी या लोकांचे कौतुक करत आहेत हे त्यांना मंजूर आहे का?
राहूल गांधी यांचे तातडीने केलेले ट्विट आणि लष्कर-ए-मिडियाने त्याला दिलेले महत्त्व पाहता नक्षलवादाचा हा नविन अवतार आहे याची खात्री पटत चालली आहे. जमात-ए-पुरोगामी ज्या पद्धतीनं रियाज नायकु या आतंकवाद्याचे उदात्तीकरण करत आहे, ज्या पद्धतीनं या छायाचित्रकारांचे कौतुक चालू आहे त्यातून हा नविन नक्षलवाद ठळक दिसून येतो आहे. याला कलात्मक नक्षलवाद म्हणता येईल. कलेच्या निमित्ताने भारतीयांवर मानसिक हल्ला करायचा. आपल्याच सैनिकांबद्दल द्वेष निर्माण करायचा. आतंकवाद्यांना मारले तर मानवाधिकाराचे तुणतुणे वाजवायचे. आणि वर हे सर्व कलेचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वतंत्र पत्रकारिता या नावाखाली चालू द्यायचे.
याच पुलित्झर पुरस्कारांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी झोडपून काढले आहे. कारण अमेरिका विरूद्ध काम करणारी अमेरिकेतीलच रशियन लॉबी यात सक्रिय आहे. अमेरिका राष्ट्रविरोधी पत्रकार यात सन्मानिल्या गेले आहेत. या पत्रकारांना पुलित्झर पुरस्कार मिळाला ज्यांनी अमेरिका विरोधी बातम्या सातत्याने छापल्या. म्हणजे तेथे राष्ट्राध्यक्ष अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलात्मक स्वातंत्र्य यांची कसलीही भाडभीड न बाळगता आपल्या देशातील अशा संस्थांवर टीका करतो आहे आणि इथे आपले जबाबदार विरोधीपक्ष नेते मा. राहूल गांधी देशविरोधी पत्रकारांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करत आहेत.
यात परत एक ढोंग आहे एन.सी.ई.आर.टी. चे माजी संचालक प्रा. जगमोहनसिंह राजपुत यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. राजपुत यांना युनेस्कोने पुरस्कार घोषित केला होता. तेंव्हा यु.पी.ए. सरकारने युनेस्कोला पत्र लिहून राजपुत यांना पुरस्कार देवू नका असे सांगितले होते. कारण राजपुत यांचे लिखाण आणि मांडणी मुलभूत मुल्यांचे उल्लंघन करते. यावर राजपुत सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने राजपुत यांच्या बाजूने निकाल दिला. यात काहीच देशविरोधी नाही मग तूम्ही राजपुत यांच्या पुरस्कारावर आक्षेप कसा काय घेता? या न्यायालयाच्या प्रश्नावर तत्कालीन यु.पी.ए. सरकारला काहीच उत्तर देता आले नाही.
हे सर्व छायाचित्रकार पाकव्याप्त काश्मिर मध्ये जावून तेथील हालअपेष्टांचे चित्रण का नाही करत? कश्मिरचाच विचार केला तर गेल्या दोन एक वषार्र्ंत मेहबुबा मुफ्ती सरकार कोसळल्यावर तिथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत 40 हजार ग्रामपंचायत सदस्य शांततेच्या मार्गाने निवडून आले. लोकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावून मतदान केले. मतदानाला रांगा लावणार्या लोकांना छायाचित्राला का नाही पुरस्कार मिळाला?
लोकशाहीच्याच मार्गाने 370 कलम संसदेत दीर्घ चर्चा करून मतदान घेवूनच हटवले गेले. जे की तात्पुरते कलम होते. कुठलीही लष्करी कारवाई करून दडपशाही करून हे कलम हटवले गेले नाही. जम्मु कश्मिरचे प्रतिनिधी लोकसभेत राज्यसभेत हजर होते. त्यांना आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आली होती.
2019 च्या लोकसभा निवडणुका जम्मु कश्मीरच्या 6 मतदार संघामध्ये भारतातील इतर प्रांतांप्रमाणेच शांततेत पार पडल्या. या सहा पैकी 3 जागा भाजपला मिळाल्या. आणि नॅशनल कॉन्फरन्सला 3 जागा मिळाल्या. म्हणजे आकड्यांच्या भाषेत 6 पैकी 3 म्हणजे 50 टक्के यश भाजपला मिळाले.
प्रत्यक्ष प्राप्त मतांची आकडेवारी अशी आहे. भाजप- 16,48,041. कॉंग्रेस- 10,11,527. नॅशनल कॉन्फरन्स- 2,80,356 आणि पीपल्स डेमॉक्रेटीक पार्टी-84,054. विरोधी मतांची एकत्र बेरीज केली तरी ती 13,75,937 इतकी होते.
मग जर जम्मू कश्मीर मधील एकूण मतांपैकी भाजपची मते इतर विराधी मतांपेक्षा जास्त असतील तर हे जनमत कशाचे द्योतक आहे? भाजपला मतदान करणार्यांना आधीपासूनच माहित होते की भाजप 370 हटविण्याच्या बाजूने आहे. या उलट इतर पक्षांना मतदान करणारे हे जाणून होते की हे पक्ष 370 रहावे याच बाजूने आहेत. मग त्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून भाजपचा दावा खोडून का नाही काढला?
लोकशाहीच्या मार्गाने काश्मिर विरोधी शक्ती काहीच साध्य करू शकत नाहीत. शस्त्रांचा मार्गही आता कमकुवत होत चालला आहे. रियाज नायकू याची खबर स्थानिक कश्मिरींनीच भारतीय सैन्याला दिल्याचे बोलले जात आहे. म्हणजे सामान्य लोकांची सहानुभूती पाठिंबाही आता अटला आहे. नोटबंदी नंतर भयानक आर्थिक कोंडी आतंकवादी चळवळीची झाली आहे. शहरी नक्षलवाद अंगाशी येतो आहे. अशा वातावरणात पुलित्झर पुरस्काराच्या निमित्ताने कलात्मक नक्षलवाद समोर येतो आहे.
किमान विचार करणार्यांनी आणि सच्चा भारतीय असणार्यांनी याचा कडाडून निषेध केला पाहिजे. कलात्मक नक्षलवादाला कदापिही थारा दिला नाही पाहिजे. देश टिकला तरच कला साहित्य संस्कृती टिकत असते. देशविरोधी तत्त्वावर आधारलेला कुठलाही कलावाद कामाचा नाही हे ठामपणे सांगितले पाहिजे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575