उरूस, 24 फेब्रुवारी 2020
या लेखाच्या सुरवातीला वापरलेला फोटो कुणाल गायकवाड या तरूण मित्राच्या फेसबुकवरचा आहे. ही पोस्ट त्याने ‘पॉवरफुल’ असा शेरा लिहून आपल्या फेसबुक पेजवर टाकली आहे (ता. 22 फेब्रुवारी 2020).
पेटीवरचे बाबासाहेब आणि बुद्ध यांची छायाचित्रे आणि खाली लिहीलेला जयभीम सिद्ध करतो की हा कलाकार आंबेडकरी चळवळीची गाणी गाणारा रस्त्यावरचा कलाकार आहे. याचा गौरव करताना किंवा त्याच्या विपन्नावस्थेवर अस्वस्थ होवून शिवी देताना कुणाल गायकवाड काहीच कारण नसताना ‘फक युअर क्लासिकल, फक युअर गुरूज’ अशी वाह्यात उठवळ टीका करून जातो. यातील ‘फक युअर कॉन्सर्ट’ मी एकवेळ समजू शकतो. (पूर्वी त्याने सवाई गंधर्व महोत्सवावर टीका केली होती. ती योग्य होती.) अतिशय महान जगाला अभिमान वाटावी अशी परंपरा असताना आणि त्याचाही बहुतांश भाग अबाह्मणी लोकांनीच टीकवलेला असताना शास्त्रीय संगीताला शिवी देण्याचे काय कारण? संगीतात शिक्षण हे गुरूमुखातूनच घेतले जाते. आणि हा गुरू कुठल्या जाती धर्माचा आहे हे कधीच पाहिल्या गेलं नाही.
‘भरतनाट्यम’ सारखी नृत्यकला तर केवळ आणि केवळ देवदासींच्या नृत्यावरून अगदी अलीकडच्या काळात नावारूपाला आली. ओडिसी नृत्याचाच एक प्रकार असलेले गोटीपुआ नृत्य हे तृतीयपंथी लहान मुलांना घेवून केले जाते. कलकत्त्यात बाऊल गायन वादन नृत्याची जी परंपरा किमान एक हजार वर्षांपासून चालू आहे तिच्यात कुणीच उच्चवर्णीय नाही.
हे सगळे लोक आपल्या गुरूंबद्दल आजही प्रचंड आदर बाळगून आहेत. आजही ते हजारो वर्षांपासून चालत आलेले कलेचे नियम सांभाळतात. अगदी महाराष्ट्रात आणि कुणाल गायकवाड ज्या भागांतून आला आहे (परभणी जिल्हा) कोल्हाटी, मांग, पूर्वाश्रमीचे महार यांच्या घरांत चर्मवाद्य वाजविण्याची नृत्याची परंपरा आहे. ते सगळे त्यांच्या गुरूंबाबत काय आणि कशी भावना बाळगून असतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही. उस्ताद गुलाम रसूल यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेली दोन वर्षे आम्ही संगीत महोत्सव भरवीत आहोत. त्याची वर्गणी देताना उच्च विद्याविभुषीत डॉक्टर असलेल्या दलित भगिनीने निधी देवून झाल्यावर आमच्या पायावर डोकं ठेवलं. कारण तिच्या गुरूसाठी आम्ही कार्यक्रम करत आहोत म्हणून.
टीका करताना आपण नेमकी कशावर करतो आहोत याचे तर भान ठेवावे. शास्त्रीय संगीतातील कितीतरी महान गायक वादक हे अब्राह्मणी राहिले आहेत. काही जणांना तर उलट ब्राह्मणी चौकटीचाच जाच सहज न झाल्याने त्यांनी इस्लामचा स्विकार केला. (जयपुर घराण्याचे महान गायक उस्ताद अल्लादिया खां यांचे उदाहरण ज्वलंत आहे.) अब्दूल करीम खां साहंबांची अनौरस संतती म्हणून हिराबाई बडोदेकर यांना अतिशय खडतर संघर्षाला तोंड द्यावे लागले. गंगुबाई हनगल, मोगुबाई कुर्डीकर, केसरबाई केरकर, मल्लिकार्जून मन्सूर, कुमार गंधर्व आणि कितीतरी मुस्लिम गायक वादक हे अब्राह्मणी आहेत. त्यांनी कधीच त्यांच्या गुरूंबाबत आणि संगीत परंपरेबाबत अनादर दाखवला नाही. भिमसेन जोशी ब्राह्मण होते म्हणून त्यांना कुठलीच सवलत गुरूकडून मिळाली नाही. अगदी आत्ताच्या गायकांमध्ये प्रभाकर कारेकर, विजय कोपरकर, राजशेखर मन्सूर, मुकुल शिवपुत्र, एम. व्यंकटेशकुमार, कैवल्यकुमार, यादवराज फड वादकांमध्ये मुकेश जाधव, उद्धवबापु आपेगांवकर, कल्याण अपार हे सगळे अब्राह्मणी आहेत.
लोककलांच्या बाबतीत तर जवळ जवळ 100 टक्के कलाकार अब्राह्मणी आहेत. कुणाल गायकवाडच्याच जवळ गोंधळ महर्षी राजारामभाऊ कदम आणि गवळणी गाणार्या लोकगायिका गोदावरी बाई मुंढे ही दोन मोठी उदाहरणं आहेत. या सगळ्यांनी गुरूबाबत आणि परंपरेबाबत कधी अपशब्द काढले आहेत का?
आंबेडकरी चळवळीत गाणार्या कडूबाई खरात यांना लोकांनी सन्मानाने मोठी व्यासपीठं अगदी अलीकडच्या काळात त्यांच्या आवाजावर खुश होवून मिळवून दिलीच ना? दारोदारी एकतारी घेवून फिरणार्या कडूबाई यांचे कार्यक्रम आता जाहिर भव्य मंचावरून होत आहेत ना? त्यांच्याही रस्त्यावरच्या गाण्याचा आता भव्य ‘कॉन्सोर्ट’ झालाच ना?
शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर ग्रंथात वर्णन केलेले किन्नरी वीणा जीला किंगरी म्हणतात ती केवळ मांग समाजातील कलाकारच वाजवतात. या कलाकाराला भव्य मंचावर सन्मानाने निमंत्रीत करून पुरस्कृत करणारे कोण आणि कुठल्या जातीचे पाठीराखे होते? सुंदरी हे अतिशय छोटे वाद्य (सनईची छोटी बहिण) वाजवणारे सोलापुरचे कपिल जाधव कोणत्या जातीचे आहेत? त्यांना सन्मानाने आमंत्रित करणारी व्यासपीठं कोणती आहेत?
अभिजात परंपरेला शिव्या देताना दलित अदिवासी बहुजन इतर मागास यांच्या संघटना व्यक्ती संस्था यांनी किती व्यासपीठं बहुजनांच्या कलेसाठी उभी केली आणि सातत्याने चालविली? तमाशा मधील लावणीला भारतीय नृत्य परंपरेत स्थान मिळावं म्हणून कुणी प्रयत्न केले? लावणी नृत्यातील मुद्रा, हावभाव, यांची एक सांगितिक परिभाषा कायम करण्यासाठी काय प्रयत्न झाले?
गेली दहा वर्षे औरंगाबादमध्ये महागामी गुरूकुल (ही संस्था ब्राह्मणांची नाही.) शारंगदेव समारोह साजरा करतं आहे. या समारंभात देशभरांतील लोककलांचे सादरीकरण, त्यांच्यावर अभ्यास करणार्यांची व्याख्यानं, चर्चासत्र यांचे आयोजन केलं जाते आहे. याच वर्षी गुजरात, केरळ, मणिपूर, आसाम, तिबेट येथील लोककलांचे अप्रतिम सादरीकरण झाले. बुद्ध धर्मातील भिख्खुंना सन्मानाने आमंत्रित करून त्यांच्या धर्मविषयक विधींतील सांगितिक योगदानाची चर्चा आणि सादरीकरण झाले. याची किती कल्पना तथाकथित अभिजातला ‘फक यु’ म्हणून शिव्या देणार्यांना आहे? किमान औरंगाबाद शहरांतील दलित चळवळीतील किती कार्यकर्ते हे समजून घ्यायला उपस्थित होते?
द हिंदू सारख्या वृत्तपत्रांनी या महोत्सवावर देशपातळीवरील त्यांच्या पुरवणीत स्थान दिले. आवर्जून दखल घेतली. मग ही ‘फक यु’ गँग इकडे का नाही फिरकली?
केवळ फेसबुकी चर्चा करण्यात मला रस नाही. मी कुणाल गायकवाड आणि त्याच्या पोस्टला लाईक करणार्या सर्वांना आवाहन करतो. त्यांना माहित असलेले ताला सुरात गाणारे वाजवणारे किमान दहा आंबेडकरी जलसा कलाकारांची नावे सांगा. त्यांचा संपूर्ण महोत्सव करण्याची जबाबदारी आम्ही औरंगाबाद शहरात घेतो. आणि इतकेच नाही तर हा महोत्सव दरवर्षी होईल याचीही हमी देतो. सांगित परंपरेत जी काही कला या जाती जमातींनी जपली आहे त्याची दखल घेण्याची त्याला प्रोत्साहन देण्याची आमची पूर्ण तयारी आहे. शास्त्रीय संगीतात जे कुणी ब्राह्मणेतर कलाकार आहेत त्यांना आम्ही आवर्जून सन्मान देत आलेलोच आहोत.
श्रीकांत उमरीकर 9422878575