काव्यतरंग, दै. दिव्य मराठी. रविवार १६ फेबु २०२०
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडोवेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली
हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिजे
हरघडी अश्रु वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले
दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे; याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
-नारायण सुर्वे
(ऐसा गा मी ब्रह्म, पॉप्युलर प्रकाशन)
कुठल्याही उत्कृष्ठ कलाकृतीच्या तळाशी अपार अशी वेदना असते. ही वेदना प्रकट करण्याचे कलात्मक माध्यम हे खुप संयत असते. काही वेळा वेदना इतकी तीव्र असते की संयतपणाच्या पदराआडूनही तीची धग जाणवते. किंबहुना जेवढा अविष्कार संयत तेवढी ही तीव्रता जास्तच जाणवते.
नारायण सुर्वे यांची बहुतांश कविता अशीच आहे. रस्त्यावरच्या सामान्य माणसाचे महानगरातील कामगाराचे दु:ख सुर्वे यांनी आपल्या कवितेत मांडले. त्यांची शैली कुठेही आक्रस्ताळी नाही, शब्दही अगदी साधे वापरले आहेत. पण आपण जसजशी ही कविता वाचत जातो तस तसे आतून हादरून जातो.
‘झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले’ अशी ओळ सहजपणे सुर्वे लिहून जातात. पण त्यातील वेदना जाणवून हा चटका वाचताना आपल्याला बसल्याशिवाय रहात नाही. हीच या लिखाणाची खरी ताकद आहे.
शेवटचा मुगल सम्राट बहादूरशहा जफरच्या उर्दू कवितेचा एक शेर सुर्वे यांना फार भावला.
उम्र-ए-दराज से मांग के लाये थे चार दिन
दो आरजू मे कट गये दो इंतजार मे
या ओळींपासून प्रेरणा घेवून पुढे सुर्वे यांनी ही कविता आख्खी स्वतंत्रपणे रचली. मुळच्या ओळीतील आरजू म्हणजेच इच्छा आकांक्षा हा शब्द बदलून सुर्वे यांनी दु:ख हा शब्द वापरला.
कवितेची दुसरीच ओळ ‘हिशोब करतोय किती राहिलेत डोईवरतील उन्हाळे’ अशी आली आहे. इथूनच कविता वेगळे वळण घेते. एरव्ही पावसाळ्याचा हिशोब वय मोजताना आपण करतो पण सुर्वे उन्हाळ्यांचा आणि तोही राहिलेले उन्हाळे असा करतात आणि त्यांचे वेगळेपण जाणवते. बहादूरशहा जफर स्वत:ला बदनसीब म्हणवून घेत असला तरी राजमहालात राहणारा सम्राट होता. आणि सुर्वे म्हणजे अगदी रस्त्यावर सापडलेले अनाथ पोर. ‘दो गज जमी भी न मिले दफन के लिऐ’ अशी वेदना बहादूरशहाने लिहीली आहे. इथे तर सुर्वे जगायचाही किमान अवकाश न लाभणार्या सामान्य पिडीतांचे दु:ख उजागर करत आहेत आपल्या शब्दांमधून.
‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली’ अशी एक वेगळी ओळ या कवितेत येते. महानोरांनी जोंधळ्याला चांदणे लखडून जावे अशी कल्पना मांडली आहे. त्याच्या नेमकी विरूद्ध ही प्रतिमा येते.
माणूस परिस्थितीनुसार घडत जातो असे आपण म्हणतो पण हे असं घडत जाताना त्याला मोठे घाव सोसावे लागतात आणि यासाठी ‘झोत भट्टीत शेकावे पोलाद’ अशी एक उपमा सुर्वे यांच्या कवितेत येते. परिस्थिती आपल्याला हवा तसा आकार देते. त्यासाठी मोठी किंमत आयुष्याची मोजावी लागते. हे सगळं दु:ख भोगून येणार्या शांतपणात सुर्वे लिहून जातात.
सुर्वे कविता वाचनही अतिशय सुंदर करायचे. त्यांचा जाडसर आवाज, त्याला असलेला अप्रतिम असा नाद, त्या वाचनाची एक सुंदर गद्य लय यावर अरूण खोपकर यांनी आपल्या ‘चलत् चित्रव्यूह’ पुस्तकात एक सुंदर लेखच लिहीला आहे. खोपकर सुर्व्यांच्या कविता वाचनाबाबत लिहीतात, ‘सुर्व्यांची कविता ऐकणे हा एक विशेष अनुभव असायचा. ते कविता सादर करीत आहेत असे न वाटता, ते आपल्याशी बोलताहेत असे ऐकणार्याला वाटायचे. त्यांच्या वाचनात नाट्य आणि निवेदन असले तरी अभिनिवेश नसायचा. त्यांच्या आवाजाला खर्जाचे वजन होते. आवाजाचे जे चढउतार ऐकू यायचे त्यात कधी संताप असायचा, कधी करुणा असायची, कधी मिष्कीलपणा असायचा, तर कधी रोमांच असायचे, भावना कुठली का असेना, भाषा दैनंदिन व्यवहाराची असायची. मात्र राजच्या भाषेतला विस्कळीतपणा त्यांच्या वाचनात नसायचा. ते एक सुरीले, तालिये कवी होते. त्यांचे कवितावाचन किंवा गायन ह्याला एका उत्तम बांधलेल्या बंदिशीची शिस्त होती.’
सुर्वे यांचे कविता वाचन मला स्वत:ला बर्याचदा ऐकायला मिळाले हे माझे भाग्य. परभणीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षच होते. त्यांच्या सहवासात तेंव्हा बराच काळ राहता आले. परभणीला होणार्या त्रैभाषिक कवि संमेलन मुशायर्यात ते बर्याचदा आमंत्रित असायचे. त्यांच्या कवितेची गद्य लय अजूनही कानात घुमते आहे.
ही कविता तशी समजायला सोपी आहे. त्यामुळेच कदाचित तिचे सौंदर्य चटकन समजत नाही. आपण ते गृहीत धरूनच चालतो. सुर्वे यांच्या समग्र कविता एकत्र करून पॉप्युलर प्रकाशनाने सुंदर पुस्तक प्रसिद्ध केले आहे. सगळ्या मिळून दीडदोनशे कविता आहेत फक्त. इतका कमी पण फार महत्त्वाचा ठेवा सुर्वे मागे ठेवून गेले आहेत.
श्रीकांत उमरीकर जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575