एकता मासिक जानेवारी २०२०
गेली 140 वर्षे मराठी साहित्य संमेलन भरत आहे. साहित्य संमेलनाचे स्वरूप वरकरणी थोडेफार बदलले दिसून येत असले तरी मुलत: त्यात फारसा बदल झालेला दिसत नाही.
मागील वर्षीपर्यंत साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मतदान घेवून निवडल्या जायचा. त्यावर भरपूर टिका झाली. मतदार निवडायची प्रक्रियाच संशयास्पद असल्याचे साधार आरोप केल्या गेले. या सगळ्यांतून शेवटी महामंडळाने माघार घेतली आणि घटना दुरूस्ती करून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बदलली. मागील वर्ष हे अध्यक्षपदासाठी निवडणूकीचे शेवटचे वर्ष होते. पण तरी अरूणा ढेरे यांनी एकमताने निवड केल्या गेली आणि निवडणूक टाळली. या वर्षी तर निवडणुक प्रक्रिया अधिकृतरित्याच रद्द झाली आहे. फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड एकमताने करण्यात आली. संमेलनाचे स्थळ उस्मानाबाद निवडण्यात आले आहे.
साहित्य संमेलनाकडे वेगवेगळ्या दृष्टीने पहाता येवू शकते. एक तर ज्या भागात सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रमांचा अनुशेष बाकी आहे अशा भागात आवर्जून संमेलनं भरवली गेली पाहिजेत. त्याचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे मोठ्या प्रमाणात रसिकवर्ग उपलब्ध होतो. आता उस्मानाबादला हे संमेलन होत आहे. जवळपासच्या गावांमधून अगदी गाड्या करून रसिक तिथे येतील आणि मोठी गर्दी करतील.
दुसरा फायदा म्हणजे ज्या ठिकाणी पुस्तकविक्रीची कायमस्वरूपी दुकानं नाहीत त्या भागात साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शन भरविल्या गेल्यास त्याला मोठा प्रतिसाद मिळतो. जी पुस्तकं कधी पहायलाही मिळत नाहीत ती संमेलनात उपलब्ध होतात. ज्या रसिकांनी वाचकांनी त्या पुस्तकांची वाट पाहिली असते ती त्यांना मिळतात. या भागांतील संस्थांनाही या वेळी खरेदी करण्याची मोठी संधी असते. परभणीला 1995 मध्ये संपन्न झालेल्या साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदशर्नात मोठी विक्री झाली कारण त्या काळात जिल्हा परिषदांच्या शाळांना ग्रंथ खरेदीसाठी मोठा निधी शासनाने उपलब्ध करून दिला होता. शिवाय सार्वजनिक ग्रंथालयांनाही या काळात खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. महाविद्यालयीन ग्रंथालयांनीही मोठी खरेदी केली. याचा एकत्रित परिणाम म्हणजे संमेलनात पुस्तक विक्री प्रचंड झाली.
उस्मानाबाद मध्येही आता असे प्रयत्न जाणीवपूर्वक केल्यास ग्रंथ विक्री मोठ्या प्रमाणात होवू शकते.
साहित्य संमेलनाचा अजून एक फायदा म्हणजे त्या त्या भागातील साहित्य चळवळीला गती मिळू शकते. यासाठीही परत परभणीचे उदाहरण लक्षात घेता येईल. संमेलनाचा एकूण खर्च तेंव्हा 32 लाख रूपये झाला होता. जमा झालेल्या 40 लाखांपैकी 8 लाख शिल्लक राहिले. या शिल्लक निधीतून ‘अक्षर प्रतिष्ठा’ नावाने संस्था तयार झाली. या संस्थेच्या माध्यमांतून पुढे कित्येक वर्ष साहित्यिक उपक्रम, दिवाळी अंकाचे प्रकाशन, पुस्तकांची प्रकाशनं, परिसंवाद, चर्चा आदींचे आयोजन केले गेले होते. आता उस्मानाबादमध्येही साहित्य संमेलनातून काही एक निधी शिल्लक ठेवून त्याच्या व्याजावर साहित्य विषयक उपक्रमांचे नियोजन करता येणे शक्य आहे.
साहित्य संमेलनाचा अजून एक फायदा शालेय पातळीवर चालणार्या साहित्यविषयक उपक्रमांसाठी करता येवू शकतो. अभ्यासक्रमांत ज्या लेखकांचे धडे/कविता आहेत त्यांना संमेलनात आमंत्रित केले जावे. या लेखक/कविंना जवळपासच्या शाळेत मुलांसमोर नेले तर मुलांना त्यांच्याशी संवाद साधता येईल. अशा उपक्रमांचा मोठा फायदा मुलांना होतो. शहरांतील काही शाळांमधून हा उपक्रम योजनाबद्धरितीने राबविता येवू शकतो. त्यासाठी कलाप्रेमी साहित्यप्रेमी शिक्षकांची मोठी मदत होवू शकते.
शाळांसोबतच आत्तापर्यंत दुर्लक्षीत राहिलेला घटक म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी. साहित्य संमेलनात तरूण मुलं फारशी आढळून येत नाहीत. त्यांचा संपर्क संमेलनाच्या आयोजकांशी होत नाही. आयोजकही त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. यासाठी शहरांतील महाविद्यालयांच्या मराठी विभागांना सहभागी करून घेता येणे सहज शक्य आहे. काही तरूण लेखक कवी यांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर विशेष कार्यक्रमाद्वारे पेश केले गेले पाहिजे. कविता अभिवाचन, कथा अभिवाचन, साहित्यिक कलाकृतींवर आधारीत मंचीय सादरीकरण अशा काही अभिनव उपक्रमांमुळे ही तरूण पिढी साहित्य संमेलनाशी जोडली जावू शकते. मोठ्या लेखकांच्या कलाकृतींवर आजकाल अतिशय चांगले दर्जेदार मंचीय सादरीकरणाचे प्रयोग केले जातात. दासू वैद्य यांचा ‘मेळा’ हा ललित लेख संग्रह आणि सौमित्र यांचा ‘बाऊल’ हा कवितासंग्रह यांच्या प्रकाशन प्रसंगी आगळे वेगळे असे प्रयोग रंगमंचावरून सादर झाले. हे तरूणांनीच केले होते आणि त्यांचा प्रेक्षकही मोठ्या प्रमाणावर तरूणच होता. साहित्य संमेलनांमध्येही अशा प्रयोगांची दखल घेतल्या गेली पाहिजे.
राज्य नाट्य स्पर्धा आता परत एकदा मोठ्या जोमाने होत आहेत. बंद पडलेली केंद्रही आता सुरू झाली आहेत. जवळपास 250 नाटके यावेळी या स्पर्धेत महाराष्ट्रभर सादर झाली. या नाट्यस्पर्धेतील पहिल्या आणि दुसर्या क्रमांकाची नाटके साहित्य संमेलनात सादर झाली पाहिजेत. मनोरंजनाचे दुसरे काही एक कार्यक्रम सादर होतात आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होतो. पण हाच निधी जर नाट्य प्रयोगांकडे वळवला तर त्यामुळे तरूण कलाकारांना प्रोत्साहन मिळेल शिवाय नाट्य चळवळीलाही गती येवू शकेल. राज्य नाट्य स्पर्धांत नविन नाटके लिहीणारे भरपूर मराठी लेखक आहेत. त्यांनाही साहित्य चळवळीच्या मांडवात काही एक स्थान मिळू शकेल. नाट्य संमेलन तर दरवर्षी भरतेच. पण साहित्य संमेलनात नाटकाची साहित्य प्रकार म्हणून दखल घेण्याची गरज आहे.
पु.ल. देशपांडे, सुधीर फडके, ग.दि. माडगुळकर यांची जन्मशताब्दी महाराष्ट्रात 100 महाविद्यालयात लेखन कार्यशाळा घेवून साजरी करण्यात आली. ही एक मोठी गोष्ट होती. या कार्यशाळांतून प्रत्येकी 5 चांगले लिहीणारे वाचणारे विद्यार्थी निवडून त्यांना साहित्य संमेलनात बोलावले जावे (मी स्वत: सेलु, वसमत, किनवट अशा तिन गावी महाविद्यालयीन कार्यशाळा घेतल्या आहेत). हे विद्यार्थी अतिशय चांगले असे लेखक/वाचक बनू शकतात. त्यासाठी त्यांना आपण मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे.
वाचक हा सर्वथा दुर्लक्षीत राहिलेला असा वर्ग आहे. महाराष्ट्रात एकूण 200 अ वर्गाची चांगली ग्रंथालये आहेत (अगदी नेमका आकडा 238. यातील अकार्यक्षम वगळूयात). ज्या ठिकाणी नियमित चिकित्सक वाचक म्हणून प्रत्येकी 10 जणं तरी सापडू शकतात. अशा दोन एक हजार लोकांची यादी सहज तयार होवू शकते. मग या चिकित्सक वाचकांना साहित्य संमेलनात आमंत्रित का केल्या जावू नये?
शालेय पातळीवर विचार केल्यास काही शाळांची ग्रंथालये अतिशय चांगली आहेत. याही शाळांची संख्या हजाराच्या जवळपास आहे. मग या शाळांमधील 8 वी ते 10 वी अशी मोठ्या वर्गातील चांगल्या वाचक विद्यार्थ्यांची निवड करता येणे सहज शक्य आहे. (औरंगाबादच्या शाळांमधून असाा प्रयोग आम्ही 2003-2005 मध्ये केला होता.) या निवडक विद्यार्थ्यांना घेवून त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, त्यांच्याशी लेखकांचा संवाद घडवून आणणे सहज शक्य आहे. बुलढाण्यात शालेय पातळीवर असा मोठा आणि चांगला प्रयोग ग्रंथपाल लेखक नरेंद्र लांजेवार यांनी केला आहे. अनेक ठिकाणी शालेय पातळीवर अतिशय चांगले असे उपक्रम राबविले जातात. माजलगांवला मुख्याध्यापक कवी प्रभाकर साळेगांवकर यांनी वाढदिवसाला शाळेसाठी पुस्तक भेट योजना राबवून मुलांसाठी अभिनव अशी योजना राबविली आहे. या सगळ्या उपक्रमांमधून हाती लागणारे चांगले लेखक वाचक विद्यार्थी निवडून त्यांना साहित्य संमेलनात आमंत्रित करता येवू शकते.
साहित्य संमेलनाने अजूनपर्यंत एक घटक पूर्णत: दुर्लक्षीत ठेवला आहे. पुस्तक निर्मितीशी संबंधीत मुद्रक, बांधणी करणारे, अक्षर जूळणी करणारे, मुखपृष्ठ रेखाटणारे चित्रकार हे घटक बाजूला राहिलेले आहेत. यांचाही विचार केला गेला पाहिजे. ग्रंथ विक्रेते हा घटकही पूर्णत: दुर्लक्षीत आहे. प्रकाशकांशी फारसा संपर्क साहित्य महामंडळाचा कधी नसतो. तेंव्हा ग्रंथ निर्मितीशी संबंधीत वाचक, प्रकाशक, मुद्रक, वितरक, विक्रेते या घटकांशीही समन्वय साधला गेला पाहिजे.
महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ मोठ्या प्रमाणात आहे. सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या 12 हजाराच्या पुढे गेली आहे. ग्रंथालय संघटनेशी काही एक समन्वय महामंडळाकडून कधी साधला जातो का? प्रकाशकांची संघटना, वितरकांची संघटना या सगळ्यांशी संवाद साधला गेला तर साहित्य संमेलन जास्त व्यापक होत जाईल. नविन काळाशी त्याचा संवाद अजून चांगल्या पद्धतीनं साधल्या जाईल.
महाराष्ट्रात वर्षभर विविध सांस्कृतिक साहित्यीक उपक्रम साजरे होत असतात. या सगळ्यांचा कळस म्हणजे साहित्य संमेलन झाले पाहिजे. त्यासाठी वर्षभर साजरे होणार्या वविध साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांना सन्मानाने साहित्य संमेलनात आमंत्रित केल्या गेले पाहिजे. विविध संमेलनांमध्ये चर्चिल्या गेलेले विषय मोठ्या साहित्य संमेलनात फेरविचारार्थ समोर आले पाहिजेत. साहित्य व्यवहारात जे गंभीर विषय आहेत, अडचणी आहेत त्यावर विचार मंथन होण्याची जागा म्हणजे सहित्य संमेलन. पण तसे होताना दिसत नाही.
समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर लिखाण केले जाते आहे. यात साहित्यपर लिखाणही भरपूर आहे. मग हे गांभिर्याने लिहीणारे, त्यांचे विविध गट, त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणारे वाचक या सगळ्यांची दखल साहित्य संमेलन कधी घेणार आहे? उथळपणे लिहीणारे आणि व्यक्त होणारे बाजूला ठेवले तरी किमान दहा टक़्के लोक साहित्य विषयक गांभिर्याने काहीतरी लिहीताना वाचताना समाज माध्यमांवर (सोशल मिडीया) आढळून येतात. काही जणांचे ब्लॉग अतिशय नेटाने आणि गांभिर्याने चालू आहेत. त्यांची वाचक संख्याही मोठी आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ब्लॉगने तर कोटी वाचकांचा टप्पा ओलांडला आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकर यांचाही ब्लॉग प्रचंड वाचला जातो. मग याची दखल साहित्य संमेलनाने का घेवू नये? लेखक संजय सोनावणी, पत्रकार लेखक निळू दामले, विचारवंत हरि नरके हे नियमितपणे ब्लॉग लिहीतात. (मी स्वत: गेली दहा वर्षे ब्लॉग लिहीत आहे. वाचक संख्या एक लाख साठ हजार इतकी आहे.) या सगळ्याची दखल साहित्य संमेलन घेणार की नाही?
आधी अडचण अशी होती की नविन कुणी काही चांगले लिहीले तर त्याला प्रकाशक मिळणे आणि ते छापिल पुस्तक वाचकांसमोर जाणे दुरापास्त. अशा स्थितीत जेंव्हा समाज माध्यमांमधून (सोशल मिडीया) नविन तरूण प्रतिभावंतांचे लेखन चांगल्या वाचकांपर्यंत पोचत आहे तेंव्हा एक मोठी कोंडी फुटते आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. पुढे चालून या लेखनाचे चांगले पुस्तक होवू शकते. प्रकाशकांना समाज माध्यम म्हणजे एक ‘टेस्टिंग’ साधन म्हणून वापरता येईल. या सर्वांचा विचार साहित्य महामंडळाने आपली संमेलनाची आखणी करताना करावा.
साहित्य विषयक उपक्रम, लेखकांच्या मुलाखती फेसबुक लाईव्हद्वारे संमेलनात उपस्थित नसलेल्या हजारो लाखो रसिकांपर्यंत पोचवणे सहज शक्य आहे. त्यासाठी आता फारसे खर्चिक तंत्रज्ञान पण लागत नाही. अगदी एखादा चांगला मोबाईल ज्याच्या हाती असेल तो फेसबुक लाईव्ह करू शकतो.
ज्या चांगल्या साहित्यकृतींवर चित्रपट निघतात त्यांचाही नव्याने विचार वाचक करतो. उदा. पानिपत या चित्रपटामुळे शेजवलकरांचे मुळ पुस्तक ‘पानिपत 1761’ हे चर्चेत आले आहे. मग याचा उपयोग साहित्य संमेलनाने करून घ्यावा. ज्या साहित्यकृतींवर नाटके, चित्रपट, एकपात्री, अभिवाचने, एकांकिका असे प्रयोग होत आहेत त्यांचा स्वतंत्र विचार त्या त्या वर्षीच्या साहित्य संमेलनात व्हावा. यासाठी केवळ मराठीपुरताच विचार मर्यादीत न ठेवता इतर भाषांतील साहित्यकृतींचाही विचार करावा. सुनील गंगोपाध्याय यांची ‘मोनेर मानुष’ ही बंगाली कादंबरी, तिच्यावर चित्रपट निघाला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला. या कादंबरीचा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. तेंव्हा हा चित्रपट, त्यावरची कादंबरी यांचा समावेश साहित्य विषयक उपक्रमांमध्ये का केला जात नाही?
साहित्य महामंडळाने एकूणच सांस्कृतिक पर्यावरण समृद्धीसाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजे. यासाठी घटक संस्था, महाविद्यालये, शाळा, सार्वजनिक ग्रंथालये यांचे सहकार्य घेतले पाहिजे. साहित्य महामंडळ ही शिखर संस्था आहे हे एकदा लक्षात घेतले म्हणजे तिच्या कामाची व्याप्ती ठरविता येते. केवळ संमेलनापुरता संकुचित विचार करून साहित्य महामंडळ थांबत असेल तर त्याबाबत मग चर्चा न केलेलीच बरी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे जगभरातील मराठी माणसे एकमेकांशी जोडली जात आहेत. विविधअंगी उपक्रमांची आखणी केली जात आहे. यातून साहित्य महामंडळ आणि त्या अनुषंगाने साहित्य संमेलनच नि:संदर्भ होत चालले आहे. मुख्य प्रवाहाशी स्वत:ला जोडत साहित्य महामंडळाने एकूणच सांस्कृतिक पर्यावरणाचा विकास केला पाहिजे.
श्रीकांत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ- औरंगाबाद
मो. 9422878575