विवेक, उरूस, एप्रिल 2019
येत्या सार्वत्रिक निवडणुकांत देशभरातील 600 कलाकारांनी भाजपाला पाडण्याचे आवाहन मतदारांना एका पत्रकाद्वारे केले आहे. पुरोगाम्यांच्या पुरस्कार वापसी नंतर या पत्रकाला मोठी प्रसिद्धी माध्यमांनी दिली आहे. यात कोण कोण कलाकार आहेत, त्यांच्या भूमिका काय आहेत, त्यांचा भाजप-संघ, मोदी-शहा यांच्यावर काय आणि कसा राग आहे हे मुद्दे जरा बाजूला ठेवू. पण या निमित्ताने लोकशाहीच्या एका बलस्थानावरच हे लोक घाला घालायला निघाले आहेत त्याची पुरेशी चर्चा झाली पाहिजे. निवडणुक संपूनही जाईल. पण हा विषय मात्र लोकशाहीसाठी कायम महत्त्वाचा आहे.
1950 ला घटना लागू झाल्यानंतर आपण सार्वत्रिक निवडणुकांची जी पद्धत स्विकारली त्यात एका मतदार संघातून विविध उमेदवारांमधून एक प्रातिनिधीक स्वरूपात निवडल्या जातो. लोकसभेचे 543 मतदार संघ आहेत. म्हणजे 543 उमेदवार प्रतिनिधी म्हणून निवडले जातात. यात इतरांपेक्षा ज्याला किमान 1 मत जास्त मिळाले आहे तो प्रतिनिधी म्हणून निवडला जातो अशी ही पद्धत आहे. ही कितीही दोषास्पद असली तरी हीच पद्धत गेली 65 वर्षे आपल्याकडे चालू आहे.
उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एक आपण निवडतो. ज्या उमेदवारावर आपला राग आहे, जो आपल्या दृष्टीने अयोग्य आहे त्याला आपण मत देत नाही. इतकी साधी ही गोष्ट आहे.
आता एकदा ही पद्धत स्विकारली म्हणजे आपण आवडीचा किंवा त्यातल्या त्यात बरा उमेदवार निवडून देत असतो असा याचा अर्थ निघतो. त्यामुळे प्रत्येक पक्ष अथवा अपक्ष स्वतंत्र उमेदवार मला मत द्या असा आग्रह मतदारांना करत असतो. लोकशाहीत निवडून येण्यासाठी येवढी एकच पद्धत वैध रित्या उपलब्ध आहे. मग जाहिरपणे या उमेदवाराला मते देवू नका अशी मोहिम राबविण्या मागे काय हेतू आहेत? आणि जर असं काही करायचं असेल तर सामान्य मतदार एक साधा प्रश्न अशी मोहिम राबविण्यार्यांना विचारेन. ‘बाबा रे याला मत द्यायचं नाही हे बरोबर आहे पण मग कुणाला द्यायचं ते तू सांग. तूझा कोणता उमेदवार आहे?’
नेमका हाच घोळ सध्या ‘भाजपाला पाडा’ म्हणणारे करत आहेत. मुळात एखाद्याला पाडायचे म्हणजे काय? तर त्याला मते देवू नका. कारण पाडण्यासाठीचे स्वतंत्र असे बटन सध्यातरी इ.व्हि.एम. वर बसविलेले नाही. त्यामुळे जो पर्यंत तूम्ही स्वतंत्र पर्याय देवू शकत नाही तोपर्यंत ‘याला पाडा’ मोहिमेला धार येवू शकत नाही.
याच मानसिकतेच्या लोकांनी काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून ‘नोटा’ ची मागणी लावून धरली होती. आणि प्रत्यक्षात ती गेली दोन निवडणुका अस्तित्वात आली आहे. याचा काय उपयोग झाला? जे लोक असे म्हणत होते की उभे असलेले सगळेच उमेदवार आम्हाला नको आहेत त्यांना हे विचारायला पाहिजे की तूम्हाला मग पाहिजे तरी काय?
‘नोटा’च्या मतदारांची संख्या आत्तापर्यंत तरी नगण्य राहिलेली आहे. स्वत:च्या घरातून बाहेर पडून मतदान केंद्रावर जावून नोटाचे बटन दाबणार्यांनी आपली हीच सगळी ताकद प्रस्थापित राजकीय पक्ष किंवा अपक्ष उमेदवार यांचे मत परिवर्तन करण्यासाठी किंवा त्यांच्यावर दबाव यावा म्हणून का नाही वापरली?
आज जे कलावंत, बुद्धिवादी, लेखक ‘भाजपाला पाडा’ म्हणत आहेत त्यांनी गेली 5 वर्षे एखादा राजकीय पर्याय निर्माण करण्यासाठी का नाही प्रयत्न केले? 2014 मध्ये हीच सगळी मंडळी अण्णा हजारेंच्या प्रभावात येवून आम आदमी पक्षाच्या मागे गेली होती. याच सगळ्यांनी देशभर ‘आप’ हाच जणू प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय आहे असे चित्र निर्माण केले होते. आश्चर्य म्हणजे त्याही निवडणुकीत नोटाचा वापर करणारे होते. त्यांनी ‘आप’लाही इतर प्रस्थापित पक्षांसारखेच नाकारले होते.
या नकार दर्शविणार्या माणसांवर सरकार चालत नाही. टीका करण्यापूरतं, वैचारिक सभांमधून, कार्यशाळांमधून, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिसंवादांतून भाषणं करणं यापुरतं हे नाटक ठीक आहे.
आज जे मोदींना पाडा म्हणत आहेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांना आधी प्रश्न विचारला पाहिजे की तूम्ही पर्याय म्हणून समोर आला होतात. आम्ही तूम्हाला दिल्लीची सत्ता सोपविली होती. त्याचे तूम्ही काय केले?
व्यवहारिक पातळीवर सामान्य लोकांमध्ये मिसळणे, त्यांच्या समस्या समजावून घेणे, त्यासाठी उभ्या आडव्या दिशेने देशभर प्रवास करणे हे सगळं तथाकथित बुद्धिवादी कलाकार विचारवंत लेखक हे विसरूनच गेले आहेत. 1980 नंतर फार मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षांचे (म्हणजे कॉंग्रेसेतर) एनजीओकरण झाले. या लोकांना मोठ्या प्रमाणात माध्यमांमधून प्रसिद्धी मिळायला लागली. यातही डाव्या समाजवादी मंडळींचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ही मंडळी या प्रसिद्धीलाच आपलं मोठेपण मानून भ्रामक समजूत करून घ्यायला लागली. यांना कॉंग्रेसने मोठ्या प्रमाणावर पोसले होते. आता कॉंग्रेसची सत्ता गेल्यावर गेली पाच वर्षे हे व्याकुळ झाले आहेत. निधीचा मुख्य आधारच तुटला आहे.
2014 च्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात आम आदमी पक्षाचा दणकुन पराभव झाला. यात एकाच उमेदवाराची अमानत रक्कम वाचली. ज्याला सगळ्यात जास्त मते मिळाली होती तो उमेदवार म्हणजे चंद्रपुर मतदारसंघातील शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप. त्यांना सव्वादोन लाख मते मिळाली होती. पण याच्या अगदी विपरित केवळ 75 हजार मते घेवून अमानत रक्कम गमावलेल्या मेधा पाटकरांची जास्त हवा माध्यमांनी निवडणुकीपूर्वी केली होती. ही नेमकी काय मानसिकता आहे?
कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-संघ हे धनदांडगे, वर्चस्ववादी, घराणेबाज पक्ष आहेत. यांना सत्तेचा माज आहे. मग उर्वरीत जे काही पक्ष आहेत त्यांच्या पाठीशी हे सगळे महान कलाकार बुद्धिवंत विचारवंत लेखक का नाही उभे राहत? यांनी पत्रक काढून या पैकी त्यांना जे उमेदवार योग्य वाटतात त्यांना आपला पाठिंबा का नाही दिला? असं केलं असतं तर यांचे हेतू स्वच्छ आहेत हे लक्षात आले असते. पण यांनी केवळ ‘भाजपाला पाडा’ असा एक कलमी कार्यक्रम घेवून आपले हेतू शुद्ध नाहीत, लोकशाही निकोप बनविण्याचे नाहीत हेच सिद्ध केले आहे.
भाजप संघाला विरोध करण्याच्या 10 टक्केही आवेश हे लोक वंचित बहुजन आघाडी, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांच्यावर चांगले उमेदवार देण्यासाठी दबाव म्हणून का दाखवत नाहीत? किंवा या सगळ्या कलाकारांनी मिळून प्रतिक म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागत (कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ) एक असे 6 उमेदवार उभे केले?
पण हे यांनी केले नाही. इतकेच नाही जे कुणी लेखक कलावंत बुद्धिवादी विचारवंत आहेत ते नियमित मतदान करतात की नाही हे का नाही तपासले? सुशिक्षीत म्हणवून घेणार्या लोकांमध्ये मतदानाचे प्रमाण कमी असल्याचे सतत आढळून येते. यावर हे शहाणे लोक बोट का नाही ठेवत? नेहमी ग्रामीण भागात मतदान जास्त असते पण उलट शहरी भागात मतदान तुलनेने कमी किंवा फार तर तेवढेच आढळते. नसरूद्दीन शहा, अमोल पालेकर, कोंकणा सेन शर्मा, अनुराग कश्यप यांनी आपल्या राहत्या भागातील बुथवर जावून 100 टक्के मतदान झालेच पाहिजे यासाठी काय आग्रह धरला?
हे लोक ढोंगी आहेत म्हणून यांची फारशी दखल सामान्य जनता घेत नाही. केवळ माध्यमं यांना प्रसिद्धी देतात म्हणून हे असा एक भास निर्माण करतात की यांनी उपस्थित केलेला मुद्दा किती महत्त्वाचा आहे आणि त्याला लोकांमध्ये किती मोठा पाठिंबा आहे. विविध नायक नायिकांनी सतत प्रस्थापित पक्षांकडून तिकीट घेवूनच निवडणुका लढवल्या आहेत. दक्षिणेतील अभिनेते ज्या प्रमाणे स्वतंत्र पक्ष स्थापून सक्रियपणे राजकारणात उतरतात तसे काहीच या कलाकारांनी केले नाही. या सोबतच येणारा पुढचा गंभीर आरोप म्हणजे ज्या नट नट्यांनी राजकीय पक्ष स्थापन केले त्यांनी तरी असे काय वेगळे राजकारण सिद्ध करून दाखवले?
केवळ कुणाला पाडा असा संदेश घेवून जाणे हे लोकशाहीला घातक आहे. या सोबतच सक्षम पर्याय समोर ठेवावा लागतो. या कलाकारांच्यापुढे जात राज ठाकरे यांनी दिवाळखोरपणा केला आहे. त्यांचा तर स्वतंत्र राजकीय पक्ष असताना त्यांनी निवडणुकाच न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. इथपर्यंतही ठीक होते. पण ते आता भाजप विरोधी सभा घेत निघाले आहेत. त्यांना कुणीतरी विचारायला पाहिजे की भाजपाला मते देवू नका हे ठीक आहे पण मग कुणाला मते द्यायचे ते तरी सांगा? शिवाय तूम्ही 13 वर्षांपासून राजकीय पक्ष चालवत आहात तूम्हाला समर्थ पर्याय का नाही उभा करता आला? 13 वर्षातच गुजरातमधून बाहेर पडून मोदी देशाचे पंतप्रधान बनले होते ना. तूमच्यापेक्षा मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला महाराष्ट्रात जास्त मते मिळतात. ही मते म्हणजे तूमच्या विश्वासार्हतेवर सामान्य मतदारांनी लावलेली थप्पड आहे. असे कुणीतरी खडसावून राज ठाकरेंना सांगायला हवे.
‘भाजपला पाडा’ असा एकच पाढा जर हे पुरोगामी घोकत राहिले तर लोक यांनाच राजकीय दृष्ट्या बेदखल करतील यात शंका नाही. या पूर्वी आम आदमी पक्षाला भारतभर झटका मिळालेलाच आहे. पण यातून शहाणपण शिकायचे नसेल तर त्याला कुणी काही करू शकत नाही.
श्रीकांत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575