2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये काय असेल तर माध्यमे, पुरोगामी विचारवंत पत्रकार यांची पतंगबाजी. वारंवार माध्यमे काहीतरी बातमी लावून धरतात. आणि काही दिवसांतच त्या पतंगबाजीचे चिंधड्या उडालेल्या समोर येतात. गेली काही दिवस प्रियंका गांधी वाराणशीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडूका लढविण्याची बातमी मोठ्या प्रमाणात चालविली गेली. प्रियंका यांनीही कधी याचा स्पष्ट शब्दांत नकार दिला नाही. यावर किमान चर्चा करून विचार करून काहीतरी मांडले जायला हवे होते. पण तो आणि तितका विचारच कुणाला करायचा नाही असे आता सिद्ध होते आहे. 25 एप्रिल रोजी मोदींनी मोठा रोड शो करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कॉंग्रेसच्या वतीने 2014 मध्ये पराभूत उमेदवार अजेय राय यांनाच परत उमेदवारी घोषित झाली. प्रियंकांच्या उमेदवारीच्या ‘पतंगबाजी’वर पडदा पडला.
हे असं वारंवार का होते आहे? ‘महागठबंधन’ चा पतंग उडवून झाला. त्याच्या चिंधड्या झाल्या. आप आणि कॉंग्रेसची दिल्लीतील आघाडी तर इतकी ताणल्या गेली की शेवटी ती तुटली तरी त्याची कुणाला बातमीही करावी वाटली नाही. झाली असती तरी कुणी त्याकडे लक्ष दिले नसते इतकी त्याची रया निघून गेली.
गुजरात विधानसभा निवडणुकांपासून अल्पेश ठाकोर-जिग्नेश मेवाणी- हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाचे पतंग हवेत उडवल्या गेले. अल्पेश यांनी कॉंग्रेस पक्षच सोडला, हार्दिक पटेल यांना त्यांच्यावरील गुन्ह्यांमुळे निवडणुक लढविण्यास बंदी घालण्यात आली, जिग्नेश मेवाणी गुजरात सोडून बिहारात निघून गेले. याही पतंगाच्या चिंधड्या उडाल्या.
पत्रकारांची खरी गोची राहूल गांधींनी केली केरळमधील वायनाड मधून उमेदवारी घोषित करून. केरळात भाजपची राजकीय ताकद अतिशय कमी आहे. केरळात कॉंग्रेसचा मुख्य विरोधक म्हणजे डावी आघाडी. त्यांच्या विरोधात लढून राहूल काय मिळवणार? यात परत माध्यमे फसली. वायनाड मधील निवडणूकही पार पडली. पण तिथल्या बातम्या काही माध्यमांना देता आल्या नाहीत किंवा द्याव्या वाटल्या नाहीत.
बिहारमध्ये बेगुसराय मध्ये कन्हैय्या कुमार यांच्या विरोधात लालूंच्या राजदचा उमेदवार उभा आहे. याही लढाईवर काय बोलावे ते माध्यमांना कळत नाहीये. कारण यांनीच अशी पतंगबाजी केली होती कन्हैय्या कुमार हे सगळ्या विरोधी पक्षांचे मिळून उमेदवार असतील भाजप विरोधात. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये मराठवाड्यात कन्हैय्या कुमार यांच्या सभा आयोजीत केल्या होत्या. त्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसने कम्युनिस्टांना आपल्या सोबत निवडणुकीत घेतले नाही. परभणीला राष्ट्रवादीच्या विरोधात कन्हैय्याच्या पक्षाचा उमेदवार उभा होता. आणि आता हेच राष्ट्रवादीचे आमदार बाबा जानी बेगुसराय मध्ये कन्हैय्या कुमार यांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. मग या सगळ्यात भाजप विरोधी ‘महागठबंधन’ च्या पतंगबाजीचे काय झाले?
या सगळ्या घटना पाहिल्यावर लक्षात येते आहे की पत्रकार माध्यमे पुरोगामी विचारवंत यांना भाजप-मोदी-अमित शहा-संघ विरोधाची कावीळ झाली आहे. त्या दृष्टीने हे कुठल्याही छोट्या मोठ्या घटनेकडे पहात आहे. वाळलेलं पान जरी पाठीवर पडलं तरी आभाळ कोसळले म्हणणार्या सश्यासारखी यांची अवस्था झाली आहे.
यामुळे एक मोठा तोटा संभावतो आहे. उद्या या सगळ्यांनी मिळून भाजप सरकारच्या काही चुक निर्णयांवर, गैरव्यवहारावर, लोकशाही विरोधी धोरणांवर टीका केली तर वाचणार्याला त्यावर विश्वास बसणार नाही. लांडगा आला रे आला सारखे होवून बसेल. माध्यमांनी जागल्याची भूमिका निभवायची असते. पण त्याचा अर्थ असा नाही प्रत्येक छोट्या मोठ्या बाबतीत बोंेब मारून घाबरावयाचे असते. सरकारच्या चांगल्या कामाचे कौतूक करायचे नसेल तर आपण समजू शकतो. पण चुक पद्धतीनं किंवा अस्थानी टीका करू नये. त्यामुळे टीकेची तीव्रता कमी होते. गांभिर्य नष्ट होते.
ई.व्हि.एम. वर प्रचंड गदारोळ विरोधी पक्षांकडून माजवला जातो आहे. त्याला इतकी प्रसिद्धी देण्याचे काय कारण? सगळे राजकीय पक्ष बाजूला ठेवून तंत्रज्ञान क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून यावर लेख लिहून घेता आले असते. त्यांच्या मुलाखती प्रसारीत करता आल्या असत्या. एखादे डमी मशिन मिळवून प्रत्यक्षात एक डमी मतदान घेवून त्याचे सगळे चित्रण करून ते दाखवता आले असते. पण असे काहीच केल्या जात नाही.
प्रियंका यांची एक तरी सविस्तर मुलाखत कॉंग्रेस पक्षाच्या पूर्व उत्तर प्रदेश कार्यकारिणीवर सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाल्यावर आली का? किंवा उत्तर प्रदेश मध्ये कॉंग्रेसची संघटनात्मक ताकद काय आहे? जिल्हा अध्यक्षांनी नियुक्ती झाली आहे का? आता ज्या जागा कॉंग्रेस लढवत आहे त्यांचा काही एक आढावा घेत या पूर्वी तिथे कॉंग्रेसची काय परिस्थिती राहिली? असं काहीही होताना दिसत नाही.
पत्रकारिता म्हणजे काहीतरी सनसनी उडवून द्यायची. त्याला काही आगापिछा असण्याची गरजच नाही. नंतर या गोष्टींना सामान्य लोकांनी दुर्लक्षिले तरी चालेल. आताही जेंव्हा प्रियंका यांच्याऐवजी अजय राय यांना उमेदवारी देण्यात आल्यावर त्याबाबत जराही अंदाज पत्रकारांना का आला नाही?
भाऊ तोरसेकर यांच्यासारख्या ज्येष्ट पत्रकारांनी वारंवार प्रियंकांच्या राजकीय ताकदीबाबत लिहीलं आहे. प्रस्थापित माध्यमांवर ताशेरे ओढले. ज्येष्ट पत्रकार संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी महाराष्ट्रातील पत्रकारांच्या ‘मंत्रीमंडळाचा विस्तार’ या पतंगबाजीवर झोड उठवली होती. पण आपली माध्यमं सुधरायला तयार नाहीत.
मोदी हरायला पाहिजे असं वाटणं वेगळं आणि मोदी हरण्यासारखी परिस्थिती आहे हे नोंदवणे वेगळं. नीरजा चौधरी सारख्या पत्रकार ज्या तटस्थ किंवा मोदी विरोधी राहिल्या आहेत त्यांनी स्पष्टपणे मोदींच्या बाजूने ‘अंडरकरंट’ म्हणजेच सुप्त लाट असल्याचे लिहीले आहे. आपल्या मुलाखतीतही सांगितले आहे. त्यांनी जो संदर्भ दिलाय तो मोदींच्या वाराणशीच्या रोड शो चा आणि प्रियंकाच्या माघारीचाच आहे. पण हे असं काही पत्रकारांना दिसत नाहीये का?
आज कॉंग्रेस केवळ 350 जागांच्या आसपास लढत आहे. हा पक्ष प्रत्यक्षात सगळ्या जागाच लढत नाहीये. शिवाय पूर्वीपेक्षाही कमी जागा लढवत आहे. हा मुद्दा गंभीर आहे. पण पत्रकार हे समजून नीट मांडायलाच तयार नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेससोबत युती करण्याच्या सगळ्या शक्यता खुल्या ठेवल्या. पण त्याला राहूल गांधींनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
प्रियंका यांनी तर असे विधानच केले आहे की उत्तर प्रदेशात आम्ही विजयासाठी लढत नाहीत. जिथे जिथे आमचे हलके उमेदवार असतील तिथे आम्ही भाजपाची मते खावूत. आता याला काय म्हणायचे? एकीकडे भाऊ तोरसेकर सारखे पत्रकार राहूल-प्रियंका यांच्यावर टीकेची झोड उठवत असताना हे सातत्याने सांगत आहेत की हे आपल्याच पक्षाचे नुकसान करायला बसले आहेत. आणि पुरोगामी पत्रकार मात्र यांच्या जीवावर भाजपचा पराभव होणार याची ग्वाही देत आहेत. म्हणजे परत परत पत्रकार माध्यमे तोंडघाशी पाडण्याचे काम राहूल-प्रियंका करत आहेत. 23 मेच्या निकालानंतर तर माध्यमे जास्तीच तोंडघशी पडतील असे दिसते आहे.
श्रीकांत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575