संबळ, अक्षरमैफल, एप्रिल 2019
औरंगाबाद शहरात जिथे औरंगजेबाचा राजवाडा होता (होता म्हणायचे कारण आता केवळ अवशेष शिल्लक आहेत) त्या किलेअर्क परिसरात नौबत दरवाज्या जवळ कबरस्तानात एक छोटी मजार आहे. बाकी सगळ्या उजाड वातावरणात ही छोटीशी वास्तू वेगळी उठून दिसते. गालिबच्याही आधी ज्यांनी उर्दूत पहिली गझल लिहीली त्या वली औरंगाबादी सोबतचा शायर सिराज औरंगाबादी याची ही कबर आहे. या सिराजची एक गझल आजही जगभरचे कव्वाल गातात. पाकिस्तानातले कराचिचे कव्वाल फरिद्दूदिन अय्याज व अबु मुहम्मद यांच्या सारख्यांनी लोकप्रिय केलेल्या या गझलेचे शब्द आहेत
खबर-ए-तहव्वूरे इश्क सून
न जूनू रहा न परि रही
न तो तू रहा ना तो मै रहा
जो रही सो बेखरी रही
सिराजचा काळ (1712-1763) हा तसा अलीकडचा काळ. सिराज यांनी चिश्ती संप्रदायाचे सुफी संत शाह अब्दुर्रहमान यांच्या पासून दिक्षा घेतली होती. याच्याही पेक्षा जूनी रचना अमीर खुस्रो (1253-1325) ची ‘मै निजाम से नैना लडायी रे’ ही पण हे कव्वाल गातात. अमीर खुस्रो ख्वाजा निजामोद्दीन औलिया यांना आपला गुरू मानत. तेंव्हा उर्दू भाषा जन्मलेलीच नव्हती. तेंव्हा अमीर खुस्रोने आपल्या रचना त्या काळातील बोली असलेल्या ‘खडी बोली’ मध्ये केल्या आहेत.
इस्लामचा भारतात जो प्रवेश झाला तो क्रुर राज्यकर्त्यांमुळे झाला असा गैरसमज बाळगला जातो. पण प्रत्यक्षात असे नाही. इस्लामचा सगळ्यात पहिला ठळक संदर्भ प्रत्यक्ष मुहम्मद पैगंबरांच्या हयातीतलाच आहे. केरळचा राजा चेरामन हा मक्केत गेला आणि त्याने इस्लाम स्विकारला. पैगबरांच्या नात्यातील मुलीशी लग्न केले (भाची किंवा पुतणी). परत येत असताना वाटेतच त्याचे निधन झाले. भारतीय किनार्यावर त्याची नाव लागल्यानंतर त्याच्या राणीने या राजाच्या स्मृतीत प्रार्थना स्थळ उभारण्याचे ठरवले. भारतातील ही पहिली मस्जिद (आणि जगातील दुसरी) केरळात आहे जिचे नाव ‘चेरामन जामा मस्जीद’ असेच आहे. जिचे तोंड पश्चिमेस नसून हिंदू पद्धतीप्रमाणे पूर्वेलाच आहे. शिवाय इथे रोज हिंदू पद्धतीप्रमाणे दिवाही लावला जातो.
जालंधर येथील इमाम नसिरूद्दीन (इ.स. 945) आणि डाक्का येथील अल कादर (इ.स.951) या सुफी संतांच्या कबरी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आगमनाच्या कितीतरी आधीच्या आहेत.
सर्व सुफी संतांमध्ये सगळ्यात जास्त ज्यांना लोकप्रियता लाभली ते चिश्ती संप्रदायाचे संत म्हणजे अजमेर येथील ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती (इ.स. 1192). हजरत मुहोम्मद पैगंबरांपासून सुफींमधील चिश्ती संप्रदायाची सुरवात होते असे मानले जाते. पैगबरांना पहिले ख्वाजा मानले जाते. मोईनोद्दीन चिश्ती हे 17 वे ख्वाजा होते.
सुफींचे चार प्रमुख संप्रदाय आहेत. 1. चिश्ती 2. सुर्हावर्दी 3. कादरी 4. नक्क्षबंदी.
महाराष्ट्रीय परंपरेत सुफी संतांचे एक मोठे योगदान राहिले आहे. (या लेखाची मर्यादा महाराष्ट्रातील सुफींपुरती आहे)
महाराष्ट्रात पहिला संदर्भ सुफी संतांचा मिळतो तो औरंगाबाद जिल्ह्यात. डोणगांव येथे समाधिस्त असलेले संत नुरूद्दीन हे महाराष्ट्रातील पहिले सुफी संत. संत एकनाथांचे गुरू संत जनार्दन स्वामी हे देवगिरीच्या किल्ल्याचे किल्लेदार होते. या जनार्दन स्वामींचे गुरू म्हणजे चांद बोधले. हे चांद बोधले सुफींच्या कादरी परंपरेतील होते. चांद बोधले हे सुफी परंपरेतील हिंदू संत. ते दत्तसंप्रदायी होते. वारकरी संत शेख महंमद यांचे वडिल राजे महंमद हे ग्वाल्हेरच्या कादरी परंपरेतील सुफी संत होते. हे राजे महंमद हे चांद बोधले यांचे गुरू. याच चांद बोधलेंचे दोन शिष्य म्हणजे संत जनार्दनस्वामी (संत एकनाथांचे गुरू) आणि शेख महंमद.
चांद बोधले यांनी सुफी संप्रदाय स्विकारला म्हणून त्यांची समाधी बांधण्यास हिंदू तयार नव्हते. तर त्यांनी इस्लाम स्विकारला नसल्या कारणाने मुसलमान त्यांच्या कबरीसाठी पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीत संत जनार्दन स्वामींनी आपल्या अधिकारात गुरूची समाधी बांधली. ही समाधी देवगिरी किल्ल्याच्या अगदी समोरच आहे. सध्या ही समाधी दुर्लक्षीत अवस्थेत आहेत. कमानी भक्कम असल्यातरी एका बाजूची भिंत ढासळायला लागली आहे. छताचा काही भाग कोसळला आहे.
चांद बोधलेंचे दूसरे शिष्य म्हणजे शेख महंमद. शेख महंमद हे वारकरी संप्रदायातील संतकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. पण हे मुलत: सुफींच्या कादरी परंपरेतील आहेत. शेख महंमदांचे मुळ घराणे बीड जिल्ह्यातील धारूरचे. शेख महंमद यांच्या लिखाणात वारकरी संप्रदायातील अद्वैतमत, नाथ संप्रदायातील योगसाधना आणि सुफीमत असा तिन्हींचा संगम आहे. शेख महंमदांच्या रचनांचा अभ्यास वारकरी मंडळीत होत राहिलेला आहे.
मुसलमानात होऊनिया पिरू ।
मराठियांत म्हणती सद्गुरू ।
तोचि तारील हा भवसागरू ।
येर बुडोन बुडविती ॥
अशा सुबोध प्रसादिक शब्दरचनेत आपले मनोगत शेख महंमदांनी मांडून ठेवले आहे.
सर्व महाराष्ट्री सुफी संतांमध्ये सर्वात जास्त प्रभाव मराठी मनावर अजूनही टीकून आहे तो शेख महंमद यांचा. शेख महंमद यांनी आपल्या सुफी कादरी परंपरेचा वारकरी संप्रदायाशी संयोग घडवून आणला आणि एक सुंदर अशी साहित्य निर्मिती झाली. ‘ज्ञानयाचा एका, नामयाचा तुका आणि कबीराचा शेका’ अशी एक सुंदर म्हणच आहे. ज्ञानेश्वरांची तत्त्वज्ञान सांगण्याची परंपरा एकनाथांनी चालवली, नामदेवांच्या काव्यगुणांचा वारसा तुकारामांमध्ये सापडतो त्या प्रमाणेच कबीराच्या निर्गूणाची परंपरा शेख महंमद मध्ये आढळते.
शेख महंमदांनी आपल्या काळांतील मुसलमान राज्यकर्त्यांनी ज्या प्रकारे हिंदू मंदिरांचा विद्धंस केला त्यावर अतिशय परखडपणे कोरडे ओढले आहेत. ते लिहीतात
अनिवार पंढरी । अविनाश श्रीहरी ।
वाहीन अंतरी । व्यापुनि अलिप्त ॥
मूर्ती लपविल्या । अविंधी फोडिल्या ।
म्हणती दैना जाल्या । पंढरीच्या ॥
अढळ न ढळे । ब्रह्मादिकां न कळे ।
म्हणती आंधळे । देव फोडिले ॥
चराचरीं अविट । गुप्त ना प्रकट ।
ओळखावा निकट । ज्ञानचक्षे ॥
हरि जित ना मेे । आले ना ते गेले ।
हृदयांत रक्षिले । शेख महंमद ॥
या शेख महंमदांची समाधी श्रीगोंदा येथे आहे.
सुफींच्या चिश्ती परंपरेतील 21 वे ख्वाजा बुर्हानोद्दीन गरीब व 22 वे ख्वाजा जैनोद्दीन चिश्ती यांच्या समाध्या खुलताबाद येथे आहेत. बुर्हानोद्दीन गरीब यांच्या जवळच पहिले निजाम मीर कमरूद्दीन यांचीही कबर आहे. या बुर्हानोद्दीन गरीब यांच्या दर्ग्यात कव्वाली गायनाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. आजही खुलताबादला या दर्ग्यात देश विदेशातून कव्वाल येवून आपली हजेरी लावून जातात.
21 वे ख्वाजा बुर्हानोद्दीन गरीब यांच्या नंतरचे 22 वे ख्वाजा म्हणजे जैनोद्दीन चिश्ती. औरंगजेब यांना आपले गुरू मानायचा. आपल्या मृत्यूनंतर आपल्याला याच गुरूच्या सान्निध्यात पुरावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली होती. त्याप्रमाणे आलमगीर औरंगजेबाची कबर याच जैनोद्दीन चिश्ती दर्ग्यात आहे. या दर्ग्यात गायनाला बंदी आहे. इथे कव्वाली गायली जात नाही.
अजेमरच्या ख्वाजा मोईनोद्दीन चिश्तीच्या उरूसानंतर भारतातील सगळ्यात मोठा उरूस मराठवाड्यात परभणी येथे भरतो. सुफी संत हजरत तुरूत पीर हे कादरी परंपरेतील संत आहेत. यांनी रामदासांच्या मनाच्या श्लोकांचा ‘मन समझावन’ नावाने दखनी भाषेत अनुवाद केलेला आहे.
जून्या हैदराबाद संस्थानात गुलबर्गा रायचूर बीदर हे कर्नाटकातील तीन जिल्हे समाविष्ट होते. महाराष्ट्राला लागून असलेल्या या परिसरात बीदर येथील बादशहा शहा मुंतोजी ब्राह्मणी (इ.स. 1575-1650) हे ‘मृत्युंजय स्वामी’ या नावाने ओळखले जातात. हे कादरी परंपरेतील सुफी संत होत.
शाह मुतबजी ब्रह्मणी ।
जिनमे नही मनामनी ।
पंचीकरण का खोज किये ।
हिंदू-मुसलमान येक कर दिये ॥
अशी त्यांची रचनाच प्रसिद्ध आहे.
सुफी संतांचे महाराष्ट्रात विविध स्मृती स्थळे आहेत. त्या ठिकाणी उरूस भरतात. या दर्ग्यांमधून कव्वालीच्या रूपाने संगीत परंपरेचेही जतन केले जाते. ही पीरांची ठीकाणं हिंदूंचीही श्रद्धास्थळे आहेत. याचे सर्वात मोठे उदाहरण महाराष्ट्राची अस्मिता असलेले शिवाजी महाराज यांच्या बाबतीतच आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांनी पुत्र प्राप्तीसाठी शाह शरीफ दर्ग्यात नवस बोलला होता. हा दर्गा अहमद नगर येथील भिंगार परिसरात आहे. पुत्र झाल्यास त्याचे नाव पीरावरून ठेवले जाईल असा तो नवस होता. पुढे मालोजी राज्यांच्या पत्नी दीपाबाई यांच्या पोटी दोन पुत्र जन्मले. या दोघांची नावे शाह शरीफ दर्ग्याच्या नावावरून शाहजी आणि शरीफजी अशी ठेवण्यात आली. या दर्ग्याला उत्पन्नासाठी दोन गावे इनाम दिल्याची कागदपत्रे मराठा रिसायतीत सापडली आहेत. छत्रपती शाहूंपासूनची काही कागदपत्रेही उपलब्ध आहेत.
इस्लामच्या भारतातील आगमनांनंतर तीन गोष्टीत ठळकपणे इस्लाम-हिंदू परंपरेचा मिलाप झाल्याचे दिसून येते. त्यातील सगळ्यात जूने संदर्भ सुफी संगीत आणि साहित्याचे आहेत. इस्लामच्या जगातील इतर भागांतील संगीतापेक्षा भारत उपखंडातील संगीत वेगळं आढळून येतं. सुफी साहित्याचीही समृद्धी भारतात सगळ्यात जास्त आहे.
दुसरी ठळक बाब म्हणजे स्थापत्य. इस्लामी राज्यकर्त्यांनी मंदिरं पाडून मस्जिदी बनविल्या याची शेकडो हजारो उदाहरणं आहेत. पण या सोबतच या परिसरात ज्या काही नविन वास्तू उभारल्या त्या अतिशय अप्रतिम अशा आहेत. ताजमहाल सारख्या वास्तू ज्यांच्या कळसावर कमळाच्या फुलांसारखी हिंदू प्रतिकं कोरली आहेत ही अतिशय ठळक अशी उदाहरणं आहेत. ताजमहाल नव्हे तेजोमहाल म्हणत पोरकटपणा करणार्यांनी हे समजून घेतलं पाहिजे बिहार मधील शेरशहा सुरींचा मकबरा (इ.स.1545), दिल्लीतील हुमायून मकबरा (इ.स.1572), औरंगाबादचा बिबी का मकबरा (इ.स.1678) आणि जूनागढच्या नवाबाचा मकबरा (इ.स.1892)अशी किमान चारशे वर्षांची एकाच पद्धतीचे मकबरे बांधण्याची परंपरा मुसलमान राज्यकर्त्यांची आहे. ताजमहाल या मालिकेतील सर्वात सुंदर अशी निर्मिती आहे (इ.स. 1648). तेंव्हा आरोप करताना त्यातील तथ्य समजून घेतलं पाहिजे. हिंदू पद्धतीत गर्भगृह कधीच प्रशस्त भव्य असे बांधले जात नाही. ते आधीपासून लहान कमी उंचीचे असे राहत आले आहे. (अपवाद वेरूळचे कैलास लेणे. पण ते पारंपरिक अर्थाने मंदिर म्हणून पूजा होत नाही.) या उलट मुसलमानी मकबर्यांमध्ये आतील मोठ्या जागेत कबर असते. खांब कमानी अशा कितीतरी बाबी इस्लामी स्थापत्याची वैशिष्ट्ये आहेत.
परंड्याच्या (जि. उस्मानाबाद) किल्ल्यातील मस्जिद तर जगातील एकमेव अशी हिंदू पद्धतीचे खांब आणि छत असलेली मस्जित असावी. ही मस्जिद म्हणजे मंदिर तोडून त्याचे खांब वापरून बांधलेली नाही. गुलबर्ग्याचा बहामनी सुलतान याचा वजीर महमुद गवान याने या परिसरातील हिंदू कारागिरांना आमंत्रित करून खास बांधून घेतली आहे. इस्लामला मानवी आकृत्या मंजूर नाही म्हणून खांबांवर किंवा इतरत्र कुठेही मानवी शिल्प नाहीत. बाकी सर्व कलाकुसर हेमाडपंथी मंदिरांतील खांबांप्रमाणेच आहे.
इस्लामवर हिंदूंचा ठळक प्रभाव असलेली तिसरी गोष्ट म्हणजे उर्दू भाषा. ही भाषा दिल्लीत जन्मली. इस्लामला विरोध करणार्यांना हे लक्षात येत नाही उर्दू ही कुठल्याही मुसलमानी प्रदेशात जन्मलेली भाषा नाही. भारतीय उपखंड वगळता ही भाषा कुठल्याही इस्लामी देशात बोलली जात नाही. या भाषेच्या पूर्वी दक्षिणेतील सुफी संतांनी ‘दखनी’ भाषेत तर उत्तरेतील संतांनी ‘खडी बोलीत’ रचना केल्या आहेत. त्या मोठ्या प्रमाणात उपलब्धही आहेत.
आज इस्लामचे कट्टरपंथी अनुयायी हा सुफी उदारमतवादी प्रवाह थांबवायला निघाले आहेत. भारतातील बहुतांश मुसलमान हे सुफी प्रभावातील आहेत. तेंव्हा त्यांच्या या भावनेची बूज ठेवत आपण हे सुफी संगीत, सुफी अध्यात्म आणि स्थापत्याच्या रूपाने ही सौंदर्यवादी परंपरा जतन केली पाहिजे. कारण यातून आपल्याच संस्कृतीचे प्रगल्प पैलू जगासमोर येत गेले आहेत.
(लेखातील छायाचित्र बुऱ्हानोद्दिन गरीब दर्गा, खुलताबाद)
(या लेखासाठी संदर्भ खालील पुस्तकांतून घेतले आहेत. अभ्यासकांनी ही पुस्तके जरूर वाचावीत.)
1. सुफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन/ डॉ. मुहम्मद आजम/ पद्मगंधा पुणे
2. इमारत/ फिरोज रानडे/ मौज मुंबई
3. मुसलमान (सूफी) संतांचे मराठी साहित्य/ डॉ. यु.म.पठाण/ म.रा.साहित्य संस्कृती मंडळ मुंबई
4. मुसलमान मराठी संतकवी/ रा.चिं.ढेरे/पद्मगंधा पुणे
5. दखनी भाषा-मर्हाटी संस्कृतीचा एक आविष्कार/श्रीधर रंगनाथ कुलकर्णी/राज्य मराठी विकास संस्था, मुंबई.
श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575